ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Thursday, December 15, 2011

१०४. रिकामपणातलं पूर्णत्व


एखाद शहर कितीही सुरक्षित वाटत असलं आपल्याला, तरी भल्या पहाटे तिथ पोचण टाळायला पाहिजे शक्यतो, हे मी पुरेशा अनुभवानंतर शिकले.

मी ऑफिसच्या क्वार्टर्समध्ये रहात होते तेव्हा आलेल्या एका अनुभवानंतर आता ‘पुरेसे’ झाले आहेत अनुभव असा निष्कर्ष मी एकदाचा काढला. एकदा सकाळी साडेपाच वाजता घरी पोचताना रिक्षावाल्याने मला शांतपणे ‘फक्त तीनशे रुपये’ मागितले – त्या काळच्या शंभर रुपयांच्या अंतरासाठी. अगदी ‘परतीचे भाडे’ गृहित धरले तरी ही रक्कम दीडशे रुपयांच्या वर जात नव्हती. पण माझ ऑफिस एकाकी रस्त्यावर होतं आणि आमचे गेटवरचे सुरक्षारक्षक गायब झाले होते कुठेतरी. रस्त्यावर कोणी नव्हतं मी आणि तो रिक्षावाला वगळता. मी त्या रिक्षावाल्याला काही म्हणायच्या आधीच तो म्हणाला, मी आत्ता तुमच्या हातातला laptop घेऊन पळालो, तर तुम्हाला केवढ्याला पडेल ते बघा.’ त्यावेळी मी हाक मारली तर ऐकायला परिसरात कुत्रही नव्हतं. मला धक्का वसला त्या रिक्षावाल्याच्या बोलण्याचा – तरी ‘बर झाल तुम्ही काय परिणाम होईल ते आधी बोललात ते ‘ अस म्हणत मी त्याला मुकाट्याने त्याने मागितलेले पैसे दिले. तो भाग किती एकाकी आहे हे मला माहिती होतं, रिक्षावाल्याला माहिती असण्याची शक्यता कमी (नाहीतर त्याने थेट कृती नसती केली का धमकी देण्याऐवजी) असा तर्कशुद्ध विचार मला नंतर    ब-याच तासांनी सुचला!

मग मी पुणे रेल्वे स्थानकावर असलेली (गेले ते दिवस!) ‘Pre Paid’ रिक्षा सेवा वापरायला सुरुवात केली. इथ निदान काही झालच दुर्दैवाने तर नंतर तक्रार तरी करता येते. एक पोलिस हवालदार त्या बूथवर असायचा आणि रिक्षाचा नंबर आणि आपला संपर्क नंबर लिहून घ्यायचा तो. ही सेवा केवळ एक रुपयात मिळायची – तरीही पुणेकरांनी न वापरून ही सेवा बंद पाडली पुढे. असो.

एकदा पहाटे पाच वाजता मी या बूथवर पोचले. मी एकटीच आहे अशी खात्री करून घेतल्यावर पोलिसमामांनी मला एक तासभर स्थानकावरच वेळ काढण्याचा सल्ला दिला. त्या काळात रिक्षावाल्यांनी प्रवाशांना लुटण्याच्या असंख्य घटना घडत होत्या त्यामुळे पोलिस जास्त सावधगिरी बाळगत होते. ‘एक कप चहा घ्या, एखादा पेपर घ्या, वाचत बसा, तास कसा गेला तुम्हाला कळणारही नाही ... अशी मोलाची भर त्याने त्याच्या सल्ल्यात टाकली. ‘सहाच्या आत एकट्या व्यक्तींना रिक्षाने जाऊ द्यायचं नाही पहाटे’ अस काहीतरी धोरण त्या काळात असणार पोलिसांच! आता साक्षात पोलिस ‘जाऊ नका’ म्हटल्यावर आणि ते आपल्या भल्यासाठी असल्यावर स्थानकावर बसून राहण भाग होत मला. आपल्याच गावात, प्रवासातून परत आल्यावर असा स्थानकावर वेळ काढावा लागण म्हणजे काय भयंकर अनुभव असतो, हे जे त्यातून गेलेत त्यांनाच कळेल.

मग मी माझ प्रवासाच धोरण बदललं. भल्या पहाटे पुण्यात पोचणार नाही अशाच ट्रेनन मी यायला लागले. मला खर तर भल्या पहाटे माझ्या घरी परत यायला आवडायचं ..पण काय करणार?

पण त्या दिवशी मात्र मला पहाटे पाच वाजता पुण्यात पोचणा-या ‘अहिंसा एक्सप्रेस’च तिकीट मिळालं होत. दिवाळीच्या सुट्ट्यांचे दिवस होते – जे तिकीट मिळतं ते घ्या अशी स्थिती होती. त्यामुळे तिकीट बदलायच्या भानगडीत मी पडले नाही. मला पुढच चित्र दिसत होत – स्टेशनवर बसून राहाण्याच – पण नाईलाज होता. मला पुणे रेल्वे स्थानकावर बसून रहायचं जीवावर आलं होत. मग मी ठरवलं की आपण शिवाजीनगर स्टेशनवर – म्हणजे एक स्टेशन आधीच उतरू. तिथही बसून राहावं लागेल तासभर – पण निदान बसून राहण्याची जागा तरी बदलेल असा माझा विचार होता. पावणेपाचच्या आसपास गाडी शिवाजीनगरला पोचेल तेव्हा तिथे पहिली लोणावळा लोकल पकडणा-या लोकांची गर्दी असेल असा मी अंदाज बांधला.

शिवाजीनगरला गाडी थांबली. बरेच लोक उतरले. मीही उतरले. हातात घड्याळ नव्हत त्यामुळे वेळेच काही भान नव्हत. दोन नंबरच्या फलाटावरून एक जिना चढून आणि उतरून मी एक नंबरच्या फलाटावर आले तेव्हा फलाट अगदी रिकामा होता. स्टेशनवर उतरलेले सगळे लोक घाईघाईने बाहेर पडले होते. ते ठीक. पण लोणावला लोकलसाठी कोणीच कसं नव्हत? मी फलाटावरच्या घड्याळाकडे नजर टाकली आणि माझ्या लक्षात आलं की पहाटेचे फक्त साडेतीन वाजलेले आहेत. ही गाडी राजकोट ते त्रिवेंद्रम अशी सुपर असल्यामुळे ती पुण्यात तासभर आधी येते नेहमीच्या अहिंसा एक्सप्रेसपेक्षा हे मी विसरून गेले होते पार!



त्या क्षणी त्या फलाटाच, त्या स्थानकाच रिकामपण आणि तिथली शांतता मला एकदम आवडली. जणू ती माझ्यात झिरपली. मी एकटी होते तरी मला भीती नाही वाटली. स्टेशन असं निर्मनुष्य नसेल, कोणीतरी रेल्वेची माणस असतील इथच कुठतरी असा विश्वास होता मला कदाचित. मी दोन तीन दीर्घ श्वास घेतले. पहाटेच्या त्या ताज्या हवेने मला एकदम बर वाटल, डोळ्यातली झोप निघून गेली. मग मला एका बाकड्यावर झोपलेलं एक कुत्र दिसलं. माझी चाहूल लागल्यावर त्याने क्षणभर डोळे उघडले, आणि निर्विकारपणे माझ्याकडे पाहिलं. परत त्याने डोळे मिटले – माझी अजिबात दखल न घेता!

आसमंतात फक्त शांतता होती. फलाटावरच्या घड्याळाची टिकटिक आणि माझ्या हृदयाचे ठोके एवढाच काय तो आवाज होता. कुत्री भुंकत नव्हती, पाखर झोपली होती, माणसं नव्हतीच तिथ. मी एका नव्या जगात; एका गूढ विश्वात गेल्यासारखं वाटत होत मला त्या क्षणी! सगळ माहितीच असूनही नवं वाटाव असं काहीतरी विचित्र होत! एक प्रकारच मृगजळ, मायावी दृश्य होत ते! आता यातून नवं जग उदयाला येईल आपल्या नजरेसमोर अस वाटाव अशी परिस्थिती होती. एक परिपूर्ण आणि असीम शांतता होती माझ्या भोवताली आणि तिच प्रतिबिंब माझ्या आतही होत! माणसांनी निर्माण केलेल्या रचना, वास्तू यांच्यातही एक वेगळ सौंदर्य आणि शांती असते असं मला त्या पहाटे प्रकर्षाने जाणवलं. माणसाच आणि निसर्गाच नात कधीही तुटणार नाही असा दिलासा मिळाला मला तेव्हा – का कुणास ठावूक!

शिवाजीनगर स्थानकावर भल्या पहाटे एकटीने व्यतीत केलेल्या त्या क्षणांनी मला नकळत पुष्कळ बळ दिलं. भौतिक विकास, भौतिक प्रगती आणि आंतरिक विकास हे किती परस्पर संबधित असतात, किती परस्पर विरोधी असतात, त्यांच्या नात्याचे ताणेबाणे काय असतात .... असा काहीसा असंबद्ध विचार त्या काळात मी करत होते .... त्या सगळ्या प्रश्नांची एकदम उत्तर मिळाल्यागत झालं त्या अनुभवातून. जणू सगळे प्रश्न संपून गेले.

असाच अर्धा पाऊण तास गेला. मग चहाचा काउंटर उघडला. त्या माणसाने माझ्याकडे पाहिलं. पेपर विकणारा आला. त्यानेही माझ्याकड पाहिलं. लोक आले. आवाज वाढला. तोवर शांत झोपलेलं कुत्र एक आळस देऊन नाहीस झालं. कावळे-चिमण्यांचे आवाज यायला लागले. गाडी आली. त्यात लोक चढले – उतरले कोणीच नाहीत. कारण पुणे स्थानकातून लोणावळ्याला जाणारी पहिली लोकल होती ती. एका मिनिटासाठी ती गाडी चुकलेल्या लोकांची गर्दी झाली. दिवस उजाडला. तोवर ते गूढ वाटणार जग आता रोजच्यासारख झालं. मला त्या सगळ्या बदलाशी जुळवून घ्यायला थोडे कष्ट पडले. हातातून काहीतरी अमूल्य निसटतय अस वाटल ..... पण तसं नाही हेही कळलं.

आजवर शेकडो वेळा मी आले गेलेले हे स्टेशन. त्या पहाटे रिकामपणातल पूर्णत्व, काही नसल्यातलं असलेपण .... याचा मला एक वेगळाच अनुभव आला. वरवर दिसणा-या विरोधाभासात एक धागा असतो सातत्याचा हे समजून आतून एकदम शांत झाले मी.

आता कधी जेव्हा एखाद्या द्वंद्वात सापडते मी मनाच्या – भावनांच्या, विचारांच्या, मूल्यांच्या – त्यावेळी रिकामपणातल्या त्या पूर्णत्वाची मला आठवण येते .. आणि हरवली आहे असं वाटणारी वाट पुन्हा एकदा नव्याने गवसते मला.
**

19 comments:

  1. ekdam mast lekh, sthal badala tari mala pan khupda asa anubhav aala aahe.

    ReplyDelete
  2. एखाद शहर कितीही सुरक्षित वाटत असलं आपल्याला, तरी भल्या पहाटे तिथ पोचण टाळायला पाहिजे >>>>>

    हे अगदी १००% खरे आहे.

    सुमारे २५ वर्षांपूवीची गोष्ट असेल. मी मुंबई-मद्रास मेलने सकाळी ५ च्या सुमारास मद्रास सेंट्रल स्टेशनवर पोहोचलो. तिथून ब्रॉडवे बसस्टँड रिक्षाने सुमारे ३रु च्या अंतरावर असे. मी आधी ठरवून घेऊन, रिक्षा करून तिथे पावणे सहाच्या सुमारास पोहोचलो. रिक्षावाला रु७ मागू लागला. जसजसा वाद वाढू लागला तसा आत्तापर्यंत हिंदीत बोलणारा रिक्षावाला तामिळमध्ये बोलू लागला. गर्दी जमा होऊ लागली. त्यातही बहुतेक रिक्षेवालेच. अखेरीस मुकाट्याने मागितलेले पैसे देऊन जीव सोडवून घ्यावा लागला होता.

    ReplyDelete
  3. मी मराठी, स्वागत आहे तुमच आणि आभार ..

    ReplyDelete
  4. नरेंद्रजी, चार रुपयांसाठी काय एवढ .. असच बहुधा पुढची पिढी म्हणेल. पण असे जुने उल्लेख वाचले की पैशांची किमत कशी कमी होत चाललीय (आणि वाढतही चाललीय) हे कळत.

    ReplyDelete
  5. >> असा स्थानकावर वेळ काढावा लागण म्हणजे काय भयंकर अनुभव असतो, हे जे त्यातून गेलेत त्यांनाच कळेल.

    हो.. फार वैताग येतो. मी एकदाच गेलोय या अनुभवातून. पण खरंच फार कंटाळा येतो..

    पहिला अनुभव (रिक्षावाला आणि लॅपटॉप) दिल्लीचा आहे का?

    ReplyDelete
  6. रिकामपणातल्या पूर्णत्वाची आठवण खूप छान मांडली आहे..
    एकदा पहाटे असं मी आणि आईबाबा असताना बंगलोरला एका रिक्षावाल्याने अडवायला घेतलं होत तेव्हा तिथे जॉगिंग करणाऱ्या दोन मुलींनी जाम झाडला होता त्याला....फुकट पण सोडलं असत त्याला...

    ReplyDelete
  7. त्याला नाही त्याने लिह्याच होतं...

    ReplyDelete
  8. आवडला लेख. :)
    भर गर्दीत उभं राहून देखील कधीकधी इतकी शांतता जाणवते...आणि मग मला माझाच श्वास ऐकू येऊ लागतो.

    ReplyDelete
  9. हेरंब. 'आमच्या' दिल्लीला जास्त बदनाम केलय लोकांनी (परकीय हात?) :-(

    रिक्षावाला आणि laptop हा अनुभव पुण्यातला आहे. दिल्लीत बहुतेक तो laptop घेऊन थेट पळून गेला असता. पण मराठी माणस कृती कमी करतात आणि बोलतात जास्त ... ते माझ्या पथ्यावर पडल इथ!

    ReplyDelete
  10. अपर्णा, चांगलच झाडलेल दिसतय त्या मुलींनी त्या रिक्षावाल्याला.

    ReplyDelete
  11. अनघा, हो, गर्दीतली शांतता हा एक वेगळाच अनुभव! बरेचदा मला वाटत की बाहेर फारस काही नसत; आपल्या मनातल आपण निवडक बाहेर पाहतो इतकच!

    ReplyDelete
  12. वा!मागच्या पोस्टचा प्रभाव माझ्यावर अजून आहे. हरवली/गवसणारी वाट आणि भायर वचपाची वाट यात धागा आहे हं काहीतरी :-)

    ReplyDelete
  13. प्रीति, आजवर अनेक वाटा चालल्याचा (आणि त्या सोडून दिल्याचा) परिणाम असावा हा बहुधा :-)

    ReplyDelete
  14. आता दिवाळी करून बेंगळुरूला परतलो तेव्हा मॅजेस्टिक स्टेशनवर रात्र काढली.. ती शांतता आणि तो अनुभव वेगळाच.. वेटिंग रुममध्ये सगळे झोपलेले असतांना मी मात्र प्लॅटफ़ॉर्मवर भटकत राहिलो.. तंद्री लागते.. आणि मग पहाट उजाडली.. स्शटेनबाहेर पडलो तर परत तोच गोंगाट आणि भौतिक जगात हरवलो. तुमचा शिवाजीनगरचा अनुभव वाचून ती रात्र आठवली..
    पुण्यात एकदा पहाटे उतरलो होतो, तेव्हा रिक्षावाल्याने ३५० मागितले होते,पाउस पडत होता, स्टेशनवर थांबायची इच्छापण नव्हती, मुकाट्याने दिले .

    ReplyDelete
  15. नेहमीची गर्दीची ठिकाण, दिवसा पाहिल्या जाणा-या जागा अचानक रात्री पाहिल्या.... की त्यांचे असे वेगळे पैलू लक्षात येतात. बाकी पाउस पडतोय म्हणल्यावर रिक्षावाला अव्वाच्या सव्वा भाड मागणार हे स्वाभाविक :-)

    ReplyDelete
  16. रेल्वे प्लॅटफॉर्म असू दे नाहितर विमानतळ... एक अशी वेळ असतेच की त्यावेळी सगळा कोलाहल निमालेला असतो... एक अतिशय वेगळेच काही सार्वत्रिक भरून राहिलेले असते... अगदी तू अनुभवलेस तसेच अ‍ॅमस्टरडॅम विमानतळावर मी अनेकदा अनुभवलेय. :)

    बाकी लुबाडणे टाळणे केवढ्याला पडू शकते याचा अंदाज घेऊनच पुढली कृती करावी अन्यथा... :(:(

    ReplyDelete
  17. भाग्यश्री, 'ती वेळ' आपल्याला अशी स्वत: होऊन सामोरी यायला मात्र लागते , शोधून सापडत नाही ती!

    ReplyDelete
  18. मस्त लिहिलंय.. फार आवडलं.. एक स्त्री म्हणून असले अनुभव तुम्हाला फार कमी वेळा घ्यावे लागले असतील पण मुलगा असल्याने (आणि इलाज नसल्यानेसुद्धा,कोकणातून निघणा-या सगळ्या बसेस, चांगल्या झालेल्या महामार्गामुळे,साडेपाचच्या ऐवजी साधारण साडे-तीन वाजता पुण्यात पोचत!) कॉलेज-डेज मधल्या भल्या पहाटे (खरंतर पोस्ट मिडनाईट) स्वारगेटला येवून बस सेवा सुरु होण्याची वाट पाहत बसल्याच्या आठवणी जाग्या झाल्या... सुरुवाती-सुरुवातीला अशाच इतरांच ऑब्झर्वेशन करण्याने सुरु झालेला तो सिलसिला नंतर नंतर एखाद्या उभ्या असलेल्या पी एम टी मध्ये डिजिटल घडाळ्यातला गजर लावून झोपण्यापर्यंत पोचला होता! आता आठवलं तरी उगाच शहारे येतात!! पण भारी लिहिलंय !!

    ReplyDelete
  19. अखिलदीप, स्वागत आहे तुमच 'अब्द शब्द'वर.
    हा लेख वाचून तुमच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्याचे वाचून बर वाटलं. बसमध्ये जाऊन गजर लावून झोपण्या चा अनुभव मी कधी घेतला नव्हता .. पण मी डोळ्यांसमोर आणू शकते ते चित्र ... स्वारगेटला मी एकदा भल्या पहाटे चार वाजत येऊन पोचले होते आणि धुंवाधार पाउस कोसळत होता ते अचानक तुमचा प्रतिसाद वाचताना आठवल :-)

    ReplyDelete