ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Thursday, September 23, 2010

४५. संवाद

माणसं एकमेकांशी कशासाठी बोलतात?

मन मोकळं करण्यासाठी?
वेळ घालवण्यासाठी?
ज्ञान, माहिती, मनोरंजनासाठी?
की सवय म्हणून?

अनेकदा मला हे प्रश्न पडतात, विशेषत: मी स्वत: आवश्यकतेपेक्षा जास्त बोलत असते तेंव्हा तर मला हमखास हे प्रश्न पडतात.

आणि गंमत म्हणजे दरवेळी या प्रश्नांची वेगळीच उत्तरे मला मिळतात.
व्यक्तीनुसार, परिस्थितीनुसार आणि खरे सांगायचे तर माझ्या मनस्थितीनुसार या प्रश्नांची उत्तरे बदलतात असे मला आढळले.

मजा वाटली मला. पण मनातला गोंधळ अधिकच वाढला.

मी मूळची गणिताची विद्यार्थिनी असल्याने (आता आलिकडे मला गणित काहीच येत नाही हा भाग वेगळा!) एखादा प्रश्न सोडवण्याचे एकापेक्षा जास्त मार्ग असतात हे मला माहिती आहे - माझी तशी श्रद्धाच आहे म्हणा ना!

पर्याय म्हणून मी या प्रश्नांकडे दुस-या बाजूने पहायचे ठरवले. मी विचार करायला लागले.
माणसं का ऐकतात?

प्रश्न बदलला तरी उत्तरं मात्र तीच येऊ लागली. म्हणजे:
माणसं वेळ घालवण्यासाठी ऐकतात.
माणसं ज्ञान, माहिती, मनोरंजनासाठी ऐकतात.
माणसं सवय म्हणून ऐकतात.

विचार करताना दोन गोष्टी नव्याने लक्षात आल्या. म्हणजे आहेत तशा त्या जुन्याच, अनेकदा कानांवर पडलेल्या - पण साक्षात्काराचा ठसा काही वेगळाच असतो.
एक म्हणजे - माणसं नाईलाजाने, पर्यायच नसतो म्हणून ऐकतात.
त्याहून अधिक धक्कादायक गोष्ट म्हणजे खरं तर माणसं ऐकतच नसतात! आणि बोलणा-याला (बोलणारीला) तरी कोठे फिकीर असते समोरचा ऐकतोय (ऐकतेय) की नाही ते! आपण आपले आपल्याच बोलण्यावर (- लिहिण्यावरही) खूष असतो!

हे असं चित्र समोर आल्यावर काही काळ माझी अवस्था फार वाईट झाली. म्हणजे मला कोणाशी काही बोलावसं वाटेना, कोणाचं काही ऐकावं वाटेना. संवादाची प्रक्रिया म्हणजे मला एक शुद्ध फसवणूक वाटायला लागली. बोलून मन मोकळं करण्याजोगं आपण काही अनुभवलं तरी आहे का, याच आश्चर्य वाटायला लागलं!

हे सगळे विचार मनात येत होते तेव्हा माझा मुक्काम पॉंडिचेरीत होता. पॉल ब्रन्टनच्या पुस्तकात रमण महर्षींच्या मौनाबद्दल वाचलं होतं. पॉंडिचेरीपासून रमणाश्रम काही तासांच्या अंतरावर! मग मी तिकडे गेले.

रमणाश्रम शांत होता. पण ती गंभीर स्मशानशांतता नव्हती. रमण महर्षींच्या प्रतिमेसमोर बसल्यावर वाटलं: या माणसाला समजेल आपण काय म्हणतो आहोत ते. (मेलेल्या माणसाला कसं समजेल? - असा एरवी सहज सुचणारा विचार तेथे माझ्या मनात आला नाही हेही नवलच!) - जणू ते आधीच समजल्यागत त्यांच ते गूढ स्मितहास्य!

पण मला काही बोलावसं वाटेना. दुस-यांशी बोलायचं नसतं तेंव्हा अनेकदा मला स्वत:शी बोलायला आवडतं. पण तेथे स्वत:शीही बोलावसं वाटेना. ऐकायची तयारी होती माझी - पण माझ्याशी रमण महर्षी कसे बोलणार? तेथे ते नव्हते, त्यांचा फक्त फोटो होता. तो फोटो जिवंत वाटत होता, पण अखेर तो फोटोच होता. मी नुसती बसून राहिले शांतपणे. काहीच मनात नव्हतं. आपल्या मनात काही नाही याची जाणीवही नव्हती.

परतीच्या प्रवासात लक्षात आलं, की आपल्याला नेमकं काय म्हणायचं आहे हे आपल्यालाच नीट माहिती नसतं. चाचपडत असतो आपण, म्हणून भारंभार बोलत राहतो. त्यातून कधीतरी नेमकेपणाने अभिव्यक्त होऊ – या एकमेव आशेवर आपण बोलत राहतो (लिहित राहतो!) आपण जसे आपल्या गोंधळात असतो, तसेच समोरचा(ची)ही बहुतेक तशाच गोंधळात असतो - असते. गोंधळलेल्यांचे ऐकण्यात फायदा नसतो हे अनुभवाने आपण सगळे जाणतो - म्हणून ’ न ऐकण्याची’ प्रवृत्ती एका अर्थी स्वाभाविकच!

’काय बोलायचे’ हे ज्यांना समजले, ती रमण महर्षींसारखी ऋषितुल्य माणसे त्यांच्या जिवंतपणीही फार काही बोलली नाहीत .. आणि त्यांचे ’ऐकायला’ जगभरातून माणसं धडपडत तिथवर येतात – रमणांच्या मृत्युनंतरही येतात.

संवादाचे सार अखेर कळण्यात आहे - बोलणे अथवा लिहिणे ही केवळ साधनेच आहेत.
या साधनांविनाही संवाद होतो यातच त्याचे सारे रहस्य दडलेले आहे काय?

14 comments:

 1. Aativas tumhi kharach Khara tech lihale ahe. Ha anubhav sarvannach yet asto, pan pratyek jan aaplyatach gung aslyamule tyachya lakshyatach yet nahi. Mhanunach tar Ghaliba sudha mhanto ki,

  Ya Rab na samjhe hai,
  Na samajhenge vo meri bat,
  De aur dil unko,
  Jo na de mujhko Juba aur...

  Vashi....
  Oh sorry (Shiva)

  ReplyDelete
 2. खरंय..

  'मौनम् सर्वार्थ साधनम्' असं उगाच म्हणत नसावेत !!

  ReplyDelete
 3. >>आपल्याला नेमकं काय म्हणायचं आहे हे आपल्यालाच नीट माहिती नसतं. चाचपडत असतो आपण, म्हणून भारंभार बोलत राहतो. त्यातून कधीतरी नेमकेपणाने अभिव्यक्त होऊ – या एकमेव आशेवर आपण बोलत राहतो (लिहित राहतो!)

  कम्प्लिटली ऍग्रीड!

  ReplyDelete
 4. दर वेळी बोलायचं कारण एकच नसतं । कधी मन मोकळं करण्या साठी, कधी वेळ घालवण्या साठी तर कधी तरी समोरच्याला बरं वाटावं म्हणून .पण हे झालं सामान्याचं, महर्षी वगैरेंचं नाही.

  ReplyDelete
 5. शिवचंद्र, स्वागत आहे तुमच या blog वर. ’वाशि - शिवा’ लक्षात आलं :-) माझ्या profile वर ’अतिवास’च स्पष्टीकरण आहे :-)
  गालिब मी अजिबात कधी वाचलेला नाही. इथे तुम्ही दिलेल्या ओळी पाहून अधिक वाचावेसे वाटतेय!

  हेरंब, :-)
  विद्याधर, माझ्याशी कोणीतरी पूर्ण सहमत असण्याचे प्रसंग अपवादाचेच! म्हणून बर वाटलं :-)

  आशाजी, स्वागत आहे तुमच blog वर. दरवेळी बोलण्याच कारण ’वेगवेगळ’ असतं हे तुमच म्हणणं पटलं. पण खोलात जाऊन पाहिल्यावर हा ’वेगळेपणा’ उरेल का? - असा प्रश्न तुमचा प्रतिसाद वाचताना माझ्या मनात आला!

  ReplyDelete
 6. अप्रतिम विचार..अद्भुत अनुभव हे तितके दुर्मिळ नसतात..आपण स्वत:चे सेन्स जागृत ठेवले तर काय काय अनुभव मिळतील ती घेऊन बघायचीच गोष्ट. आणि या ब्लॉग पोस्ट मधून तुम्ही जो संवाद साधलात तो म्हणजे लाजवाब..

  ReplyDelete
 7. नचिकेतजी, स्वागत आणि आभार. कोणतेच अनुभव तसं पहायला गेलं तर चमत्कार नसतात .. आपण काय पाहू (ऐकू) इच्छितो यावर बरच काही अवलंबून असतं!

  ReplyDelete
 8. माणुस नावाच्या एका अवाढव्य, अनाकलनीय यंत्राचा सेफ़्टी व्हाल्व्ह शब्द आणी संवाद हा आहे...वपु

  ReplyDelete
 9. he koNatyaa pustakaatala vaakya VaPunchyaa?

  ReplyDelete
 10. प्लेझर बाँक्स १...

  ReplyDelete
 11. रमण महर्षींसारखी साधना जमणाऱ्यांनाच ज्ञानदेवांचे "शब्देविण संवादु" जमेल नाही का?

  ReplyDelete
 12. दवबिंदू, खूप वर्षात वपु वाचले नाहीत .. आता वाचेन कदाचित!
  शुभान्गीजी, बरोबर आहे तुमच!

  ReplyDelete
 13. शब्दवाचून कळले काही शब्दांच्या पलिकडले......संवाद !

  ReplyDelete