ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Thursday, September 16, 2010

४४. उणीव

एखादी गोष्ट आपल्याला चांगली जमत नसेल तर त्याबद्दल वाईट वाटणं अगदी स्वाभाविक आहे. पण त्याची जास्त खंत करत बसण्यात पण काही अर्थ नसतो. बरेचदा ती गोष्ट आपल्याला जमत नाही याचा आपण स्वीकार केला की फार गंमतीशीर चित्र समोर येतं! आपल्या बलस्थांनामुळेच केवळ जगणं चांगलं होतं अशातला भाग नाही; अनेकदा आपल्यातल्या कमतरतांमुळेही आपल जगणं साधं, सोप, सरळ आणि सुरळीत होत जातं - आपल्याही नकळत!

माझचं बघा ना. माझी स्मरणशक्ती जेमतेम आहे. शाळेत असताना ’तुमच्या जीवनातील संस्मरणीय क्षण’ , किंवा ’पावसाळयातील एक दिवस’ असल्या छापाचे निबंध लिहिणं मला फार त्रासदायक वाटायचं. ’अमुक तारखेला घडयाळात इतके वाजले असताना’ झालेल्या घटनांची वर्णनं कोणी करायला लागलं तर मला आश्चर्य वाटतं. क्वचित अपवाद वगळता मला जुनं काही फारस कधी आठवत नाही. एक म्हणजे ’सध्या’ आजुबाजूला इतक काही घडत असतं नेहमी, की भूतकाळाचा विचार करायला फारसा अवधी नसतो. दुसरं म्हणजे अनेक वर्षांपासून मी ब-यापैकी नियमितपणे रोजनिशी लिहीत आले आहे. एकदा माझे विचार, माझ्या भावना कागदावर (हल्ली स्क्रीनवर!) उतरवल्या - सुखाच्या असोत, दु:खाच्या असोत, गोंधळाच्या असोत – की मी ते सोयिस्करपणे विसरून जाते. एकदा व्यक्त झालेल्या भावना- विचारांना माझ्या आयुष्यात पुन्हा म्हणून येण्याचा हक्क नाही अशा थाटात मी ते सारं काही विसरून जाते.

अर्थात स्वत:च्या भावना-विचार शब्दबद्ध करण्यात एक मोठा धोका नेहमी असतो. तो म्हणजे एकदा जगून झालेले क्षण, निसटून गेलेले क्षण शब्दांच्या आधारे पुन्हा जगण्याचा, भूतकाळाला पकडून ठेवण्याचा वेडा प्रयत्न मन करत राहू शकते. माझ्या सुदैवाने अजून तरी माझ्या बाबतीत तसे फारसे घडत नाही.

मी जवळजवळ एक तपाहून अधिक काळ सेवाभावी संस्थांचे ’पूर्ण वेळ’ काम केले. त्या काळात मला माझे खासगीपण जपायची संधी फार कमी मिळायची. सदैव लोकांच्या सानिध्यात राहणे हा त्या कार्यशैलीचा अविभाज्य हिस्सा होता. २४ तास, वर्षातले ३६५ दिवस असे लोकांसोबत जगणे, स्वत:साठी काही वेगळी जागा न ठेवता जगणे हे खरोखर अवघड असते. (तेव्हा मला ते जमून गेले, आज कदाचित अजिबात जमणार नाही!). त्याआधी महाविद्यालयीन काळात होस्टेलला राहिल्याने खासगीपणा नसण्याची तशी थोडीफार सवय झाली होती म्हणा! कोणी जरा ’वेगळेपणा’ जपायचा प्रयत्न केला तर समवयस्क मंडळी त्याचा /तिचा नक्षा कसा उतरवता त्याचा अनुभव आपण सर्वांनी कधी ना कधी नक्की घेतला असेल.

सदैव लोकांमध्ये राहत असण्याच्या काळातही मला रोजनिशी लिहायची सवय जडली. किंबहुना विचार, भावना, मत, राग, वैताग, कंटाळा .. असल्या गोष्टी सेवाभावी संस्थेच्या ’पूर्ण वेळ’ कार्यकर्त्यांनी व्यक्त करणे अपेक्षित नसते - त्यामुळे त्या काळात रोजनिशी लिहिणे आवश्यक होऊन बसले होते. पण खासगीपणा नसल्यामुळे आपण लिहिलेले कोणाच्या हातात कधी पडेल याचा नेम नसायचा. लिहिलेले जपून ठेवायला वेगळी जागा नसायची. शिवाय एरवी अगदी प्रगल्भ असणा-या लोकांनासुद्धा दुस-यांची रोजनिशी हातात पडली तर ती वाचायचा मोह होतो.

म्हणून मी एक युक्ती केली. रोजनिशी लिहिताना गावांची, व्यक्तींची खरी नावे लिहायची नाहीत, त्यांना काही सांकेतिक नावे अथवा टोपणनावे द्यायची अशी मी स्वत:ला शिस्त लावून घेतली. जगण्याच्या एका टप्प्यात तीच तीच माणसे अनेकदा भेटतात. त्यामुळे एका व्यक्तीला एक सांकेतिक नाव द्यायचे आणि त्यात सातत्य ठेवायचे असे मी सुरू केले. चुकून कोणी मी लिहिलेले वाचले (जे त्यांनी न वाचणे अपेक्षित होते!) तर त्यांना नेमके कोठे, काय आणि कोणाच्या बाबतीत हे (मी लिहिलेले) घडले असावे त्याचा थांगपत्ता लागू नये इतक्या सफाईने मी रोजनिशी लिहित गेले. अनेक वर्षे मी असे केले. त्याचा उपयोग झाला. त्यामुळे मी सांकेतिक, प्रतिकात्मक लिहित राहिले. तशी मला सवय लागली. मी पूर्ण वेळ काम करणे थांबवले, तरीही सवय तशीच राहिली. पुढे माझे स्वत:चे घर झाले तरी ती सवय तशीच राहिली. चोरांचा अपवाद वगळता माझ्या आमंत्रणाशिवाय या घरात कोणी येत नाही - आणि न आवडणा-या माणसांना घरी येण्याचे आमंत्रण देण्याचा दांभिकपणा मी करत नाही - तरीही ती सांकेतिक लिहिण्याची सवय राहिली ती राहिलीच! आजही मी ख-या नावांनिशी, गावांनिशी काही लिहीत नाही. फक्त स्वत:साठी मी जे लिहिते, तेव्हाही लिहित नाही.

 यामुळे एक अनपेक्षित गंमत झाली. एकदा एखादी घटना, एखादी व्यक्ती विस्मरणात गेली, की दोन चार वर्षांनी रोजनिशीची जुनी पाने वाचताना मलाही काही आठवेनासे झाले. म्हणजे एखाद्याला मी ’उदय’ असे नाव दिले असेल, तर त्या उदयचा उल्लेख वाचून मला काहीच आठवेनासे झाले. एखाद्या सांकेतिक लिपीची किल्ली हरवल्यावर सारे लेखन अनोळखी होऊन बसावे तसे माझे झाले. ’त्या वेळी मला उदयच्या म्हणण्याचा त्रास झाल्याचा’ उल्लेख असेल तर हा नेमका कसला त्रास होता हेच मला आठवेना! किंवा ’स्वातीशी (हे पुन्हा एक असेच नाव..) गप्पा मारताना मजा आली” याही वाक्याचा अर्थ लागेनासा झाला. मला त्या त्या क्षणी वाटलेले सुख, दु:ख, गंमत, आनंद.. नेमके कशामुळे होते हेच मला सापडेनासे झाले. माझ्या रोजनिशीची मी भरभरून लिहिलेली जुनी पाने वाचताना मला स्वत:चे जगणे परक्यासारखे वाटले. त्यातल्या कोणत्याच प्रसंगांत मी जणू नव्हते. मी जणू काही दुस-याच कोणाची रोजनिशी वाचत होते - ती मी वाचणे अपेक्षित नसल्याने मला ते वाचून काहीच कळत नव्हते.

असे पहिल्यांदा झाले तेव्हा मी चक्रावलेच. स्मरणशक्ती चांगली नाही वगैरे ठीक आहे - पण पानेच्या पाने भरून आपणच जे लिहिले त्यातले काहीच आठवू नये म्हणजे अतीच झाले. मी संवेदनशील आहे, काही वेळा नको इतकी संवेदनशील (hypersensitive) असते. त्यामुळे काही माणसे मला फार सहज दुखावतात, तर काहींशी माझे मन पटकन जोडले जाते. अशा माणसांत, नात्यांत गुंतून जाण्याची, तुटण्याची प्रक्रिया माझ्याबाबत वेगाने घडते. या सगळ्या उत्कट जगण्याच्या खाणाखुणा पानोपानी पसरलेल्या असताना, ते माझेच जगणॆ असताना - मला कालांतराने ते काही आठवू नये हे अजब होते. स्वत:ला परके होण्याची ती एक धारदार भावना होती.

पण एकदा अशाच एका भावावेगात "हे तुला अजून पाच वर्षांनी आठवेल तरी का?” असा प्रश्न माझा मला मी विचारला.
अनुभवाने या प्रश्नाचे प्रामाणिक उत्तर “नाही” असे आहे हे मला माहिती होते.
ते मग माझ्या आयुष्यातले एक मजेदार वळण ठरले.

आता "हे तुला अजून पाच वर्षांनी आठवेल तरी का?” हा प्रश्न माझ्यासाठी “लिटमस टेस्ट” आहे.

कोणत्याही भावनिक प्रसंगाला सामोरे जाताना मी या प्रश्नाची ढाल वापरते. जुने काही फारसे मला आठवत नाही या न्यायाने आजचे काही मला उद्या आठवणार नाही हे मला नीट समजले आहे. अर्थात काही गोष्टींचा आपल्या जीवनावर प्रभाव पडतो - पण त्या इतक्या आतल्या होतात की त्या मुद्दाम आठवाव्या लागत नाहीत! त्या आपल्या अस्तित्त्वाचा एक भाग बनतात, आपल्यापासून त्यांना वेगळे करता येत नाही.

या प्रश्नाचा परिणाम म्हणून परिस्थितीला सामोरे जाण्याची माझी शैली बदलली आहे. एखादी गोष्ट पाच वर्षांनीही मला महत्त्वाची वाटेल असे अगदी आतून वाटले तरच मी त्याकडे जरा गांभीर्याने बघते. अन्यथा ’आला क्षण गेला क्षण’ अशी एक काहीशी विरक्त अवस्था मी अनुभवते. या सगळ्या विचारांमुळे मी एक वेगळीच व्यक्ती बनून गेली आहे - चांगली नाही, वेगळीच! कधी कधी मला वाटते की इतके अलिप्तपण बरे नाही. कशात तरी मन गुंतायला हवे, कशाने तरी सुखावायला हवे, कशाने तरी दुखावायलाही हवे. उत्कटता असेल तरच जगण्यात मजा. नाहीतर हे वरवरचे जगणे काय कामाचे? मी अशी बदलले नसते तर बरे होते असेही मला वाटते.

पण तरीही मी सुखी आहे. भावनांच्या तालावर नाचणे थांबले आहे असे वाटते (ते पुन्हा कधी ताबा घेईल सांगता येत नाही). स्वत:त रमण्याचे पुष्कळ क्षण येतात, त्यामुळे इतर कोणावर काही अवलंबून राहिले नाही. कोणी भेटले आपल्यासारखे तर बरे वाटते, पण ते तुटले तर मन उदास होत नाही. एक जागा सोडून दुस-या जागी जायचे तर भांबावल्यासारखे वाटत नाही आता. हे सगळे आपलेच आहे आणि तरीही यातले काहीच आपले नाही अशा दोन्ही तीरांना पाणी एका वेळी स्पर्श करत राहते.....

एका अर्थी ही शांतता, ही स्तब्धता हे सारे माझी स्मरणशक्ती चांगली नसल्याचाच परिणाम.

उणीवांनीही जगणे असे बनते तर! आपल्या नकळत.
**

9 comments:

  1. >> चोरांचा अपवाद वगळता माझ्या आमंत्रणाशिवाय या घरात कोणी येत नाही -

    हेहेहे

    >>आणि न आवडणा-या माणसांना घरी येण्याचे आमंत्रण देण्याचा दांभिकपणा मी करत नाही.

    मस्तच

    ReplyDelete
  2. बाप रे!
    स्वतःचीच डायरी परकी वाटणं.. हा खराच भयावह अनुभव...
    >>कशात तरी मन गुंतायला हवे, कशाने तरी सुखावायला हवे, कशाने तरी दुखावायलाही हवे. उत्कटता असेल तरच जगण्यात मजा. नाहीतर हे वरवरचे जगणे काय कामाचे?
    हे अगदी १०० नंबरी खरं...
    पण खरं सांगू का... कधी कधी... अगदी स्तब्ध आणि शांत क्षणी विरक्तीसुद्धा खूप खूप सुख देऊन जाते (पण विरक्तीत सुखाला थारा नसतो..)!

    ReplyDelete
  3. खुपच अंतर्मुख करुन टाकणारा लेख...
    >> चोरांचा अपवाद वगळता माझ्या आमंत्रणाशिवाय या घरात कोणी येत नाही - हे मलाही आवडल.
    >>हे सगळे आपलेच आहे आणि तरीही यातले काहीच आपले नाही अशा दोन्ही तीरांना पाणी एका वेळी स्पर्श करत राहते.....खुप छान

    ReplyDelete
  4. माझी स्मरणशक्ती बरी आहे, पण अडचणींकडे देखील तटस्थपणे पाहण्याच्या स्वभावामुळे मला गतकाळात रममाण होता येत नाही. कदाचित मला त्याची गरजही नसावी.

    ReplyDelete
  5. हेरंब, :-)

    विद्याधर, विरक्तीत सुखाला थारा नसतो असं का वाटतं तुम्हाला? विरक्ती म्हणजे कोरडेपणा नसतो खरे तर.. त्यामुळे त्यात सुखच असतं - ते फक्त बाह्य कशावर अवलंबून नसतं इतकच!

    दवबिंदू, तुमच नाव मला आवडल. स्वागत आणि आभार.

    शरयू, गतकाळात न रमणं ही एक कला आहे, तुम्हाला ती साधलेली दिसतेय.

    ReplyDelete
  6. गतकाळात रमणे .... माझ्याबाबत सांगू तर अनेक बारिकसारिक प्रसंग,घटना सगळं सगळं अगदी आत्ता घडल्यासारखे लक्षात असते पण त्याचवेळेस अनेक माणसं त्यांची नावं अजिबात आठवत नाहीत.... स्वत:पुरता काढलेला निष्कर्ष असा की फारसा कचरा मी मनातही साठवत नसावे, कारण काही वेळा एखाद्या व्यक्तीबद्दल घटनेबद्दल कितीही खाणाखूणा सांगितल्या तरी माझ्या मेंदूतली ती नोंद काही सापडत नाही, याउलट एखादा हलकाफुलका प्रसंग अचानक आठवून एकटीच खुदकन हसतेय असेही होते..... भुतकाळात रमू नये हे जितके खरे आहे तितकेच कधी कधी रमावे हे ही खरे आहे :)

    बाकि तुझा लेख उत्तम नेहेमीप्रमाणेच.... काही काही वाक्य तर अशी जमलेली आहेत की मस्तच :)

    ReplyDelete
  7. तन्वी, माणसाचा मेंदू अजब आहे हेच खरं! कारणमीमांसा करता येत नाही सगळ्याच गोष्टींची. पण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ’कचरा न साठवण्याची’ वृत्ती महत्त्वाची.

    ReplyDelete
  8. मस्त लेख...पासवर्ड विसरणे हा माझा नित्याचा उद्योग ..पण हे असं स्वत:च्या नोंदीतल काही विसरलं तर कसला गोंधळ बाप रे..

    ReplyDelete
  9. अपर्णाजी, पासवर्ड तर माझा शत्रू आहे .. आणि हल्ली इतके पासवर्ड असतात की आपण सारख 'गुप्त'पणे काहीतरी करत आहोत अस उगाच वाटत राहत :-)

    ReplyDelete