ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Saturday, December 7, 2013

१८१. शोध स्वत्वाचा ....

१९६७ ची गोष्ट.
एका वीस वर्षांच्या मुलीचं लग्न. मागणी मुलाने घातलेली. मुलगी मंगलोरची; मुलगा मुंबईचा. टाटा कंपनीतला पगारदार.
मुलीला वडील नाहीत. विधवा आईच्या पदरी पाच मुली. मुलगा “हुंडा नको” म्हणतो – ही आणखीच चांगली गोष्ट. मुलाला आणखी नऊ भावंड आहेत.
लग्न होतं.

पहिल्यांदा जेव्हा नवरा “मी तुला मारेन” म्हणतो, तेव्हा  तिला “तो गंमत करतोय” असं वाटतं.
पण नवरा खरंच मारहाण करायला लागतो तिला. अगदी नेहमी.
कारण? काहीही. कारण असो वा नसो – मार ठरलेला. कधीही, कसाही.
कधी हाताने, कधी हाती लागेल त्या वस्तूने – लाकडी हँगर, पट्टा ...

तिचा दम्याचा विकार उफाळून येतो या ताणाने.
तोवर मुलीच्या गर्भात बाळ रुजतं; ते जन्माला येतं.
आपल्या विधवा आईला अजून दोन लहान बहिणींची लग्न करायची आहेत; त्यांची आयुष्यं आपल्यामुळे बिघडायला नकोत म्हणून ही मुंबईला परत येते.

मुलगी विचारांत पडते. मुलगी दैवाला दोष देते. वेदनांना मुरड घालायचा प्रयत्न करते. संसार सुखाचा असल्याची बतावणी पुरेपूर निभावते.

पण मुलगी गोंधळलेली आहे. मारहाण झाली की नव-याचा “प्रेमाचा अंक” चालू होते.
आणखी दोन मुली जन्माला येतात.

घरात कधी खाण्याची चंगळ तर कधी उपासमार. हिच्या हातात पैसा नाही, या शहरात तिला कुणी मैत्रिणी नाहीत. नातेवाईक आहेत काही, पण घराची लाज कुठे उघडी करायची त्यांच्यासमोर?

मुलगी सोसत राहते. तिच्या शरीराला जखमा होतच आहेत, मन मोडून गेलंय तिचं. ती जीव संपवत नाही फक्त मुलांकरता.

घर सोडून जायचं आणि परत यायचं – असं अनेकदा घडतं. कधी मुलांसह घर सोडायचं तर कधी मुलांविना.
अशा परिस्थितीत सुरु होतो एक शोध – स्वत्वाचा शोध ....

*****
२०१३ ...
या आहेत  फ्लेविया अ‍ग्नेस.
‘मजलिस’च्या संथापिका आणि संचालिका.

काय आहे 'मजलिस'?
शब्दश: बघितलं तर  “एकत्र येणं” – सल्लामसलतीसाठी एकत्र येणं.

ही आहे स्त्रियांच्या हक्कासाठी कार्यरत असणारी एक संस्था. स्त्रीविषयक कायद्यांमध्ये सुधारणा घडवून आणणं, कौटुंबिक हिंसाचाराने पीडित स्त्रियांना कायद्याची लढाई लढून त्यांचे अधिकार मिळवून देण्यात मदत करणं, कायदेविषयक साक्षरता वाढवणं..... अशी अनेक कामं! 'मजलिस'कडे वकिलांची एक फौज आहे – आणि या सर्व वकील स्त्रिया कोर्टात पीडित स्त्रियांच्या अधिकाराची लढाई त्यांच्या वतीने लढत आहेत.

‘मजलिस’चं कार्यालय मुंबईत असलं तरी पूर्ण महाराष्ट्रात त्यांच नेटवर्क आहे. जिल्हा न्यायालयांत स्त्रियांच्या बाजूने लढणा-या वकिलांना – ज्यात स्त्रिया जास्त असतात; पण पुरुषही असतात – प्रशिक्षण तर दिलं जातंच; पण त्यातल्या निवडक १५ लोकांना (प्रामुख्याने स्त्रिया) वर्षभराची फेलोशिपही दिली जाते. हा कार्यक्रम २००३ पासून चालू आहे. अशा संवेदनशील आणि जाणकार स्त्रिया वकील जिल्ह्याच्या स्तरावर असण्याचा पीडित स्त्रियांना फायदा होतो. जात –धर्म- वय- शिक्षण  अशा भेदांचा विचार न करता स्त्रियांना मदत केली जाते.

 “कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण  कायदा २००५” च्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य शासनासोबत “मोहीम” (Monitoring of  Himsa (PWDV Act) in Maharashtra) चालवली जात आहे. लैगिक छळ/शोषण अशा घटनांनी ग्रस्त असणा-या स्त्रियांसाठी सामाजिक आणि कायद्याच्या मदतीचा “राहत” कार्यक्रम “महिला आणि बालक विकास” मंत्रालयाच्या सोबतीने चालू झाला आहे. पहिल्या टप्प्यात मुंबई शहरात हा कार्यक्रम सुरु झाला आहे.

१९८० च्या आसपास फ्लेविया अ‍ग्नेस ही एक “पीडित महिला” होती. आज फ्लेविया अ‍ॅग्नेस स्त्रियांचे हक्क जपणारी कायदेतज्ञ आणि सामाजिक कार्यक्षेत्रातलं एक सर्वार्थाने मोठं नाव आहे. अकरावीपर्यंत शिक्षण झाल्यावर लग्न झालं होतं फ्लेवियाचं. प्रतिकूल परिस्थितीत, कष्टाने, जिद्दीने त्यांनी कायद्यात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे आणि एम. फिल. देखील केलं आहे.

१९८५ मध्ये फ्लेविया अ‍ग्नेस यांचं छोटेखानी आत्मकथन प्रसिद्ध झालं ते इंग्रजी भाषेत. १९८५ मध्येच श्री प्रकाश बुराटे यांनी त्याचा “अंधारातून प्रकाशाकडे” या नावाने केलेला अनुवाद प्रसिद्ध झाला. आठ अन्य भाषांतही हे पुस्तक आता उपलब्ध आहे.



“ हे खरंय की या पुस्तकामुळं कौटुंबिक हिंसेमुळे होरपळणा-या स्त्रियांचा संघर्ष कमी तीव्र किंवा कमी वेदनादायक होत नाही. प्रत्येक महिलेला आयुष्याच्या संघर्षाचे परिणाम स्वत:च भोगावे लागतात, स्वत:च वेदनेची ओझी वाहावी लागतात. परंतु या पुस्तकामुळं त्यांना नवीन जीवन उभारणं शक्य कोटीतलं वाटतं, त्यांची जिद्द जिवंत राहते आणि आशेचा किरण दिसत राहतो ..."  हे फ्लेविया यांचे प्रस्तावनेतले उद्गार हे आत्मकथनाचा संदर्भ आजही किती महत्त्वाचा आहे हेच सांगून जातात.

*****

मी अनेक वर्षापासून फ्लेविया अ‍ग्नेस यांचं नाव ऐकत आले आहे; त्यांचे लेख वाचले आहेत अनेकदा. त्यांची पुस्तकं सगळी नाही; पण दोन वाचली आहेत. स्त्रियांचे अधिकार आणि स्त्रीविषयक कायदे या क्षेत्रातलं त्यांच योगदान नावाजलेलं आणि महत्त्वाचं आहे ते केवळ त्या पीडित स्त्री आहेत म्हणून नाहीत तर पीडित स्त्रियांबाबत त्यांनी केलेल्या कामामुळे.  ‘मजलिस’च्या  एका कार्यक्रमात सामील झाल्यामुळे मला त्यांची आणि त्यांच्या कामाचीही जवळून ओळख झाली.

‘मजलिस’चे काही मुद्दे मला “अनपेक्षित” होते. उदाहरणार्थ “समान नागरी कायद्या”ला असणारा त्यांचा विरोध. त्यामागची त्यांची भूमिका “भावनिक” नसणार हे माहिती असल्याने मी त्यांचा “विचार” समजून घेण्याचा प्रयत्न करणार हे नक्की. माझे अनेक विचार मी बदलायची गरज कदाचित असेलही!

एका व्यक्तीचा 'स्वत्वाचा शोध' किती अनेकांना  उपयोगी पडतो याचा अनुभव  फ्लेविया यांना भेटल्यावर मला आला असं म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही. 

10 comments:

  1. Aabhar Aativas! Ha lekh lihilyabaddal!!
    Aativas, Swarg ani Nark pruthvivarach asto nahi ka... aplyach aaju bajula... Aani tyatli arvat vaait gosht hi ki Nark aplya bajuchya gharat asel tari to kadhitari disaach nahi

    ReplyDelete
    Replies
    1. Well said Shriraj .. we need to keep on working for positive change - that is absolutely essential!

      Delete
  2. मीही फार जास्त वाचलेलं नाही ’ फ्लेविया अ‍ग्नेस ’ यांचं लिखाण. नोंद करुन ठेवली आहे. धन्सं गं!

    ReplyDelete
    Replies
    1. मी मिळाले तर काही लेखांचे दुवे नक्की देईन .

      Delete
  3. MAJALIS baddal thode aikun hote ata he pustak nakki vachen.... thank you Savitatai!

    ReplyDelete
    Replies
    1. अनघा, या पुस्तकाचं प्रकाशन ‘मजलिस’ने केलं आहे – त्यांच्या वेबसाईटवर त्यांच्या कार्यालयाचा पत्ता व संपर्क क्रमांक आहे. तिथं विचारून पाहा. तुम्ही पुण्यात असलात तर माझी प्रत तुम्हाला वाचायला मिळेल :-)

      Delete
  4. चांगली पोस्ट. १९९३-९६ मध्ये अशाच एका स्त्रीचा संघर्ष डोळ्यासमोर पाहत होतो. मदत तर खूप करायची होती पण मार्ग नव्हता. मी तर अजून शिकत होते. जमेल तेवढी मदत केली पण हरलोच :( तेव्हा हे सगळं असतं तर तिला खूप आधार मिळाला असता. या संस्थेबद्दल माहिती दिल्यासाठी खास आभार.

    ReplyDelete
    Replies
    1. अपर्णा, ‘मदत न करता येण्याचं, पुरेशी मदत न करता येण्याचं’ दु:ख मी समजू शकते. :-(
      Better late than Never!

      Delete
  5. "majalis" he navahi chan ahe.....

    ReplyDelete