ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Tuesday, December 24, 2013

१८२. विवेकानंदांचा वेदान्त विचार: भाग १७: मोक्षविचार (१)


या जगाचे वर्णन गौतम बुद्धाने दोनच शब्दांत अत्यंत समर्थपणे केले आहे. आपल्या सर्वांनाच ते एकदम मान्य होईल. बुद्ध म्हणतात, 'सर्वं दु:खम्’.  तत्त्वज्ञानाचा उदय जगाच्या या दु:खस्वरुपामुळेच झाला आहे असे काहीजण गंमतीने म्हणतात. त्यात तथ्य आहे की काय असेही कधीकधी वाटते. त्यामुळेच कदाचित सध्याच्या युगात 'गुरु होणे हा सर्वात किफायतशीर धंदा होताना दिसतो आहे.

या जगात तीन प्रकारची दु:खे आहेत असे तत्त्ववेत्ते सांगतात. आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक अशी ती तीन प्रकारची दु:खे आहेत. सर्वसामान्यपणे लोक आधिभौतिक आणि आधिदैविक दु:खांनी व्याकूळ होऊन ईश्वराकडे वळताना दिसतात. मुक्ती म्हणजे या दोन्ही प्रकारच्या दु:खांपासून सुटका असाच त्यांचा समज असतो.

वेदान्ताचा मात्र मुक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन थोडासा वेगळा आहे. इतर दर्शनांची मुक्तीची संकल्पना काहीशी नकारात्मक - म्हणजे दु:खापासून सुटका - अशी आहे. वेदान्त मात्र मुक्तीकडे सकारात्मक दृष्टया बघतो. मुक्ती म्हणजे केवळ तापत्रयातून सुटका नाही तर आनंदाची, परमानंदाची साक्षात अनुभूती! विवेकानंदांच्या संपूर्ण मोक्षविचारांत हा आनंदघन स्वर लागलेला दिसतो.

आपल्या आयुष्याबददल आपल्याला अनेक प्रश्न पडतात. मानवी जीवनाचा हेतू काय असावा? - हा प्रश्न आपल्याला नेहमीच गोंधळात टाकतो. आपण इतक्या विविध साखळयांमध्ये अडकलेलो आहोत की, यातून सुटका होण्याची सुतराम शक्यता दिसत नाही. मग ईश्वराने आपल्याला जन्माला घालून, आपल्याभोवती अशी परिस्थिती  निर्माण करुन आपली थटटा का केली असेल या विचारांनी आपण बेचैन होऊन जातो. 'जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय हे माहिती असतानाही आपण गुंतत जातो .... गुंतत राहतो!

आपली ही असली गुंतवणूक विवेकानंदांना पूर्णत: अमान्य आहे. ते म्हणतात, प्रत्येक जीव हा अव्यक्त ब्रह्म होय. बाहय आणि आंतर प्रकृतीला वशीभूत करुन स्वत:चे हे अव्यक्त ब्रह्मस्वरुप व्यक्त करणेच जीवनाचे परम उदिदष्ट होय!

जार्ज विल्यम्स त्यांच्या Swami Vivekananda: Archetypal Hero or Doubting Saint? या लेखात म्हणतात, Swami Vivekananda’s Vedanta proceeded from the epistemological questions: What is by realizing which everything is realized? This question sets the goal of the belief system and directs it toward a special kind of knowledge. It affirmed that the goal is that of unity in which everything is realized.

बृहदारण्यक उपनिषदात विचारलेल्या 'येन इदं सर्वं विजानाति ते केन  विजानीयात्' या प्रश्नाचा हा नव्या युगात उमटलेला प्रतिध्वनी होता. अर्थात त्याचे उत्तरही होते, 'तद्  ब्रह्रोति असेच!

मुक्ती म्हणजे काय? तर स्वामीजी म्हणतात, मुक्ती म्हणजे अपूर्णता, जन्ममुत्यू, आधिव्याधि वगैरेंच्या कचाटयातून सुटका! ईश्वराची कृपा झाली तरच केवळ आत्म्याचे बंधन गळून पडू शकते. मुक्ती हेच आत्म्याचे अंतिम लक्ष्य आहे. अनंत स्वरुपावर त्याचा जन्मसिद्ध हक्क आहे. आपल्या भोवतालच्या  परिवर्तनशील गोष्टी केवळ आपल्या अनुभवासाठी, आपल्या शिक्षणासाठी आहेत. ज्या पाय-यांनी आत्म्याचे अनंतत्व अभिव्यक्त होते, ते सारे आपले पूर्वजन्म होत. आपण जणू काही खालच्या श्रेणीचे एक शरीर घेतो आणि त्याद्वारे स्वत:ला अभिव्यक्त करायचा प्रयत्न करतो. ते शरीर अपुरे वाटले की आणखी उच्च प्रतीचे शरीर धारण करतो. मुक्तीपर्यंत त्याचा हा क्रम चालूच राहतो.

मुक्ती म्हणजे आत्म्याचे यथार्थ रुप! आत्मा स्वयंप्रकाशी आहे, स्वयंज्योती आहे. कार्य-कारण संबंध आत्म्याला स्पर्श करु शकत नाही. आणि त्या विदेह अवस्थेचे नाव आहे मुक्ती!

'आत्म्याची स्वत:च्या बंधनाविषयी जागृती व त्याचा वर उठण्याचा आणि स्वत:चा प्रभाव प्रस्थापित करण्याचा प्रयत्न याचेच नाव जीवन आहे. या संघर्षात यश येणे हाच क्रमविकास आहे”, असे स्वामीजी आपल्याला सांगतात. आत्म्याचा हा शोध तुम्ही कोठे घेणार? तुमच्या बाहेर? का म्हणून? आपण आपल्याबाहेर मुक्तावस्थेचा शोध घेणे म्हणजे एखाद्या राजाने स्वत:ला विसरुन त्या राज्याचा राजा शोधण्यासारखेच आहे. आता तो स्वत:च राजा असताना त्याला त्याच्याविना दुसरा राजा भेटणार कसा?

आपण सर्वजण नेमकी हीच चूक करत असतो. आपल्या आत दडलेल्या देवदत्त वारशाचा आपल्याला पत्ताच नाही, आणि आपण जातो आहोत या मठात अन त्या मंदिरात! या प्रवचनाला आणि त्या सत्संगाला! सतत बाहेर शोध घेणे आणि तेथे काही मिळत नाही म्हणून अस्वस्थ होणे हा माणसाचा स्वभावच बनला आहे.

मुक्ती म्हणजे काही कमावणे नाही, काही घडवायचे नाही आणि काही व्हायचे देखील नाही. फक्त आपण जे काही आहोत ते सरळपणे जाणायचे आहे. आपल्या आरशावर बरीच धूळ बसली आहे, ती पुसून टाकली की झाले काम! नवा आरसा आणायला नको की नवा चष्मा आणायला नको! आपल्याला मुक्त व्हायचे नसून आपण मुक्तच आहोत, आपण बद्ध असल्याचे सारे विचार भ्रमात्मक आहेत”, असे विवेकानंद पुन:पुन्हा सांगतात. मोक्ष प्राप्य, उत्पाद्य, विकार्य, संस्कार्य यांपैकी काहीही नाही या शंकराचार्यांच्या मताशी ते पूर्णत: सहमत आहेत.

मुक्तीची ही भूक अजिबात कृत्रिम नाही, तर ती नैसर्गिक, अगदी जन्मजात आहे. आपल्या कोणा प्रिय व्यक्तीचा मृत्यू झाला की, जीवनाची नश्वरता, क्षणभंगुरता आपल्याला जाणवते. 'याचे/हिचे पुढे काय झाले असेल बरे? असा प्रश्न आपल्या मनात एकदा तरी येतोच. आपले हे स्मशानवैराग्य काही फार काळ टिकत नाही हा भाग वेगळा. पण आत्म्यासंबंधी, मुक्तीसंबंधी, मृत्यूनंतरच्या जीवनासंबंधीचे प्रश्न आपल्यापैकी प्रत्येकालाच जीवनात कधी ना कधी वेढून टाकतात.

एका अर्थी तुमची आमची मुक्तीची कल्पना ही अमरत्वाची कल्पना असते. माणसाला सर्वात जास्त भय कशाचे वाटत असेल तर ते मृत्यूचे! मृत्यू अटळ आहे ही गोष्ट समजून उमजूनही त्याच्या सावलीत भयशंकित अवस्थेत माणसे जगतात. मृत्यू नक्की आहे पण तो येणार कधी हे अनिश्चित असल्याने असे घडत असावे. म्हणूनच मुक्तीच्या अवस्थेत मरण नाही ही कल्पना माणसाला खूप चांगली वाटते. मुक्ती म्हणजे जन्मही नाही हे तो सोयिस्करपणे विसरुन जातो.

अमरत्वात अविनाशित्वाची ग्वाही असते. माणूस स्वत:मध्ये इतका गुंतलेला असतो की, स्वत:चे अस्तित्व  रुजविण्यात त्याला फारच रस असतो. वंशसातत्याची कल्पना यातूनच इतकी प्रभावी ठरली असावी. 'जबतक सूरज चांद रहेगा ... तेरा नाम रहेगा' .... असल्या राजकीय घोषणाबाजीतही हीच मनोवृत्ती प्रकट होते. पण नामे - रुपे अमर नसतात. त्यांचा विनाश अटळ असतो ही गोष्ट आपल्याला विसरुन चालणार नाही.

कर्म आणि पुनर्जन्माचे चक्र संपणे म्हणजे मुक्ती! जन्म मृत्यूच्या संसाराचे बंधन संपणे म्हणजे मुक्तावस्था!

मुक्तीचे स्वरुप काय आहे? तिचे लक्षण काय आहे? कशावरुन ओळखायची ही अवस्था? एखाद्याच्या बाहय अभिव्यक्तीवरुन त्याची आंतरिक अवस्था ओळखणे ही फार कठीण गोष्ट आहे. त्याला तसाच अंत:चक्षू विकसित झालेला माणूस हवा!

गीतेच्या बाराव्या अध्यायात जीवनमुक्ताचे सविस्तर वर्णन आहे. 'सम: शत्रौ च मित्रे च तथा मानापमानयो:। शीतोष्ण सुखदु:खेषु सम: सङ्गविवर्जित:।। असे अठराव्या श्लोकात सांगितले आहे. विवेकानंद म्हणतात, कशाच्या मागेही लागू नका, काही टाळण्याचाही प्रयत्न करु नका, सा-यालाच सादर असा, त्याज्य-ग्राहय भावनारहित होऊन जा,  यदृच्छालाभसंतुष्ट व्हा. जेंव्हा काही म्हणता काहीच तुम्हाला ढळवू शकणार नाही तेंव्हाच तुम्ही मुक्त झाला आहात, तुम्हाला स्वाधीनतापद लाभले आहे असे म्हणता येईल. नुसते सहन करुन चालणार नाही, अनासक्त व्हा. ही अनासक्ती हेच मुक्तीचे लक्षण!

ज्या गोष्टीची आपल्याला आवड नाही त्या गोष्टीबाबत अनासक्त होणे फारच सोपे असते कारण ते आपल्या सोयीचे असते. खूप वेळा असल्या दांभिक अनासक्तीलाच आपण खरी अनासक्ती मानण्याची चूक करत असतो. कोल्हयाला द्राक्षे आंबट असाच प्रकार म्हणायचा हा! ज्या गोष्टी आपल्याजवळ नाहीतच, त्यांचा आपण त्याग केला असे म्हणण्यात तरी काय अर्थ?

ब्रह्मदृष्टीखेरीज अन्य दृष्टीने जगाकडे न पाहणे हे मुक्तावस्थेचे लक्षण आहे. तशी तर एका अर्थी सर्वच माणसे ब्रह्म जाणतात, कारण प्रत्येक जण जाणतो की 'मी आहे. परंतु हा 'मी खरोखर कोण आहे हे मात्र आपण जाणत नसतो. सर्व भ्रमांतून, त्यांच्या तावडीतून सुटका होणे म्हणजेच मुक्ती!

या भ्रमाचे, भासाचे कारण तरी कायविवेकानंद म्हणतात, हे जग आपल्या भोगासाठीच उत्पन्न झाले आहे ही पराकाष्ठेची ओंगळ धारणाच आपल्याला बद्ध करुन ठेवते. तीच अध:पाताचे मूळ होय. हे जग आपल्यासाठी नाही. प्रतिवर्षी लक्षावधी, कोटयवधी लोक या जगातून निघून जातात, जगाचे तिकडे लक्षदेखील नसते. त्यांच्या जागी दुसरे लक्षावधी पुरवले जात आहेत.


आपल्यापैकी प्रत्येकाच्या ठायी मुक्तीची प्रेरणा आहे हे विशेष! आपला अंतरात्मा मुक्त आहे आणि तोच आपल्या ठायी मुक्तीची प्रेरणा निर्माण करतो असे म्हणावयास हरकत नाही. त्यामुळे 'मुक्तीचा अधिकारी कोण? असा प्रश्नच उदभवत नाही. मुक्तीसाठी वेदाध्ययन केलेच पाहिजे अशी आवश्यकता नाही. मुक्तीसाठी अमुक एका विशिष्ट प्रकारच्या कर्मकांडाची आवश्यकता नाही. योग, ध्यानधारणा, प्राणायामाचीही आवश्यकता नाही. यांपैकी काही केले तर ते वाया जाणार नाही, किंबहुना मुक्तीच्या मार्गावर चालण्याचे बळ त्यातून मिळेल. पण ही सारी साधने मुक्तीची अपरिहार्य अट नाही. 

क्रमश: 

1 comment: