ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Sunday, May 22, 2016

२३७. हे किती काळ चालणार?


त्या दिवशी डेक्कन एक्स्प्रेसने पुण्यातून मुंबईला निघाले होते. एरवी पुणे-मुंबई प्रवासाचं आरक्षण करायच्या भानगडीत मी कधी पडत नाही. ब-याचदा उभ्याने प्रवास करताना जीव थकून जातो आणि इतरांकडं लक्षही जात नाही. पण त्या दिवशी मुंबईतून रात्री पुढं जाणारी एक गाडी पकडायची होती, त्यामुळे कधी नाही ते मी तिकिट आधी काढलं होतं. गाडीत बसायला मिळाल्याने सहप्रवाशांकडं लक्ष जात होतं. आपापसात बोलणं नाही झालं तरी अनेक गोष्टी कानावर पडत होत्या, दिसत होत्या. त्यावरच्या प्रतिक्रिया मनात नकळत उमटत होत्या.

माझ्यासमोर एक आई आणि तिची दोन मुलं बसली होती. मुलगा साधारण तेरा-चौदा वर्षांचा असावा, मुलगी त्याच्यापेक्षा दोन-तीन वर्षांनी लहान असावी. आई साधारण चाळीशीची, सौम्य चेह-याची. मुलीच्या आईशी गप्पा चालल्या होत्या तर मुलगा खिडकीतून बाहेरचं जग न्याहाळत होता. मुलांच्या आणि आईच्या पेहरावावरून, बोलण्यावरून ते कुटुंब सुशिक्षित आणि मध्यमवर्गीय वाटत होतं.

तेवढ्यात बाजूच्या बाकावरून एका पुरूषाने त्या मुलाला हाक मारली. अभिजीत, तू इकडं बस! ” मुलाने किंचित नाराजीने आईकडं पाहिलं. आई म्हणाली, बाबा सांगताहेत ना, मग जा तू तिकडं. अच्छा! म्हणजे ते मुलांचे बाबा होते तर! खिडकी सोडणं त्याच्या जीवावर आलं होतं तरी काही प्रतिवाद न करता मुलगा निमुटपणे उठून बाबांच्या जागेवर जाऊन बसला. बाबा येताच मुलगी आणि आई यांच्यातला संवाद थांबला. बाबाही काही बोलत नव्हते. इकडं आल्यावर जर बायकोशी अथवा लेकीशी काही बोलायचं नव्हतं तर बाबांनी आपल्या मुलाला जागेवरून का उठवलं असेल या विचारांत मी पडले.

माझं कुतूहल जागृत झालं. प्रवासात सोबत असलेल्या कुणा व्यक्तीकडं, कुटुंबाकडं असं शोधक नजरेनं पाहू नये हे मला कळत होतं, पण मनाची खोड! माझी जागा खिडकीची नसल्याने मला बाहेर पहात बसण्याचा पर्यायही नव्हता.मी काही त्यांच्या घरात डोकावत नव्हते, सार्वजनिक अवकाशात समोर येणारं दृश्य फक्त पहात होते अशी मी स्वत:ची समजूत घातली.

गाडी पुणे स्थानकातून बाहेर पडून अर्धा-एक तास झाला असेल. खाद्यपदार्थ आणि चहा-कॉफी विक्रेते डब्यात चकरा मारत होते. त्या बाबांनी चहावाल्याला हाक मारून एक कप चहा घेतला. एकच कप? मी जरा चकित झाले. शिवाय चहा विकत घेण्यापूर्वी या सद्गृहस्थांनी स्वत:च्या बायकोला आणि मुलांना चहा हवा आहे का याची साधी चौकशीही केली नव्हती. मुलांचं एक वेळ मी समजू शकते. मुलं लहान असल्याने कदाचित चहा घेत नसतील. पण बायकोचं काय ?

स्वत:च्या मनाच्या उठाठेवीवर मी जरा वैतागलेच. त्या बाई चहा घेतच नसतील असं म्हणून मी स्वत:ला गप्प केलं.

पण हे क्षणिकचं ठरलं. कारण अर्ध्याहून अधिक चहा पिऊन झाल्यावर त्या गृहस्थांनी कप बायकोच्या हाती दिला. ती एक घोट घेते ना घेते तोच दोन्ही मुलांनी तिला चहा मागितला. मुलं आणि आई तिघांनी मिळून अर्ध्यापेक्षा कमी चहावर भागवलं.

माझ्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले. १. बायको-मुलं चहा घेतात, मग त्यांच्यासाठी चहा घेण्याचं या गृहस्थांना का सुचलं नसावं? २. बायको-मुलंही मला पण चहा पाहिजे असं मोकळेपणाने का म्हणू शकली नसतील? ३. या गृहस्थांकडं पैसे कमी असतील का? (तसं तर काही वाटत नव्हतं.) ४. बायको-मुलांच्या आवडीचं एखादं दुसरं पेय (चहा कदाचित त्या तिघांना आवडत नसेलही) बाबा पुढं खरेदी करणार असतील का? ५. आणि मुख्य म्हणजे या छोट्या प्रसंगाकडं स्त्रियांच्या दृष्टिकोनातून पाहताना मी उगाच यात नसलेल्या अर्थछटा आधारभूत मानून त्यांना अवास्तव महत्त्व देते आहे का?

प्रवास चालू होता. कर्जत स्थानक जवळ येऊ लागलं. दिवाडकरांचा वडा घेण्यासाठी हातात पैसे घेऊन लोक दारा-खिडक्यांमध्ये उभे राहिले. आपले बाबा उठले हे पाहिल्यावर मुलगा म्हणाला, बाबा, मला खूप भूक लागली आहे. मुलाची सूचना स्पष्ट होती. ती ऐकून मला जरा हायसे वाटले. बाबा गाडीतून खाली – फलाटावर – उतरले, परत आले. वडा-पावचे पुडके त्यांनी बायकोच्या हाती सोपवले.

आईने पाव उलगडले, त्यात चटणी भरली, वडा भरला. एक वडा-पाव मुलाला, एक मुलीला आणि एक नव-याला दिला. चौथा आणि शेवटचा वडा-पाव हातात घेऊन, तो न खाता, आई स्वस्थ बसून राहिली. मुलाचं खाणं होत आल्यावर तिने विचारलं, अभि, पोट भरलं का रे तुझं? की आणखी देऊ? ” मुलाने एकदा आईच्या हाताकडं, मग तिच्या चेह-याकडं पाहिलं. त्याच्या मनात काहीतरी होतं. क्षणभर थांबून तो म्हणाला, पण आई, मी तोही वडा-पाव खाल्ला तर तुला काहीच राहणार नाही... पण त्याच्या पोटातल्या भुकेने त्याच्या समंजसपणावर मात केली. काहीशा अपराधी स्वरांत तो म्हणाला, बरं आई, मला अर्धा वडा दे, राहिलेला अर्धा तू खा.

मुंबईच्या उपनगरातील घरी पोचेपर्यंत आणखी किती वेळ लागणार ते माहिता नाही, तोवर पोरं भुकेजून नको जायला, या जाणिवेतून, प्रेमापोटी आईने हातातला वडा-पाव दोन्ही पोरांना अर्धा-अर्धा देऊन टाकला. निदान तिने तरी मुलगा-मुलगी यांच्यात भेदभाव केला नाही याचं मला बरं वाटलं. हा सर्व प्रसंग घडत असताना बाबा वर्तमानपत्रात डोकं घालून बसले होते. आपली बायको उपाशी आहे हे त्यांना कळलं नव्हतं.

माझ्या मनातल्या अस्वस्थतेने पुन्हा उसळी मारली. मी समोर घडलेल्या घटनेकडे पूर्वग्रह बाजूला ठेवत पाहिले. घडलं होतं ते असं : १. खूप भूक लागली आहे असं मुलाने स्पष्टपणे सांगितल्यावरही बाबांनी मोजकेच वडा-पाव आणले. २. आपल्याकडं मोजकाच खाऊ आहे, तर आधी पोरांचे पोट भरू दे मग आपण नवरा बायको वडा-पाव खाऊ – असा विचार बाबांना सुचला नाही हे त्यांच्या कृतीवरून स्पष्ट होतं. ३. आपली बायकोही माणूसच आहे आणि इतर माणसांना लागते तशीत तिलाही भूक लागू शकते ही शक्यता बाबांनी विचारात घेतल्याचं दिसलं नाही. ४. बायकोला खायला मिळालं नाही, तर आता गाडीतच दुसरा एखादा खाद्यपदार्थ विकत घ्यावा, तिच्यासाठी निदान कपभर चहा तरी घ्यावा असं काहीच त्यांना प्रवास संपेपर्यंत सुचलं नाही – हेही मी पुढं पाहिलं. ५. या पूर्ण प्रसंगात मुलंही बाबांना काहीही म्हणाली नाहीत.

स्त्रियांचे प्रश्नही वस्तुस्थिती नसून काल्पनिक अतिरेक आहे असं काही लोकांना वाटत असतं. पण या प्रसंगांमधल्या बाईची स्थितीवरून काय दिसतं? अशी किती कुटुंबं आहेत की ज्यात घरातल्या बाईविषयी (आई, बहीण, पत्नी, मुलगी अशा सर्वच नात्यांत ) पुरूषांना आस्था असते? आणि मुख्य म्हणजे किती घरांत ही आस्था पुरूषांच्या व्यवहारातून (फक्त शब्दांतून नाही) प्रकट होते?

त्यागी आणि सहनशील केवळ आईनेच (बायकांनी) नव्हे तर बाबांनाही (पुरूषांनी) असायला हवे अशी धारणा तरी किती कुटुंबांमध्ये असते? किती घरांमध्ये मुलं आईला सहज फटकारतात आणि बाबांना मात्र दबून असतात? – आणि त्याबद्दल बाबांची भूमिका नेमकी काय असते?

त्या बाईंचंही चुकलंच, त्यांनी तरी कशाला इतकं सहन करायचं? – असं पूर्वी कदाचित मला वाटलं असतं. असल्या सहनशील बायकांच्या वाट्याला असलंचं आयुष्य येणार, त्याला आपण तरी काय करणार? – असं म्हणत मी अशा प्रसंगाकडं साफ दुर्लक्ष केलं असतं.

पण अनेक प्रसंगातल्या स्त्रियांच्या अनेकविध प्रकारच्या दर्शनाने मी वरच्यासारखं उथळ मत व्यक्त करायला आजकाल कचरते. स्त्रिया मूर्ख किंवा बावळट नसतात. त्यांना सारं काही कळतं. त्यांच्याही संवेदनशील मनाला परिस्थिती बोचते. त्यांनाही बंड करावं असं वाटतं.

पण चारचौघात आपला अपमान करायला नवरा मागेपुढं पाहणार नाही याची बाईला खात्री असते. तमाशा नको म्हणून ती गप्प बसते. झाकली मूठ चुकून उघडली जाऊ नये यासाठी ती धडपडते. आदर – आत्मसन्मान – सहसंवेदना यांसारख्या शब्दांच्या उच्चारांनी परिस्थिती अधिकच चिघळेल याची तिला जाणीव असते. गप्प बसून, दुर्लक्ष करून सारं काही आलबेल आहे असं ती इतरांना आणि स्वत:लाही भासवण्याचा प्रयत्न करते.

प्रश्न असा आहे की हे किती काळ चालणार? समाज स्त्रियांच्या सहनशीलतेचा किती अंत पाहणार? त्याच्या आड लपलेला जो दाह आहे, त्याची आपल्याला कधी जाणीव होणार? आणि कधीतरी या सगळ्याचा स्फोट होईल, तेव्हा एक समाज म्हणून आपण आपल्याला कसं वाचवणार?

लोकसत्ता चतुरंग मध्ये पूर्वप्रकाशित

2 comments:

  1. तुम्ही जे वागणं इथे लिहिलं आहे तसं वागणाऱ्या स्त्रीला मुळात मला असं वागायचं नव्हतं पण वागायला भाग पडतं आहे असं वाटतं का? तुम्ही म्हणता त्या परिस्थितीवर उपाय म्हणजे घडत्या वयातच एक व्यक्ती म्हणून जडणघडण व्हायला हवी. मी कसं वागावं ह्याच्या अपेक्षांचे स्टिरीओटाइप्स माझं वागणं ठरवणार नाहीत हे रुजायला हवं. पण अनेक मुलींच्या बाबतीत शिक्षण हे केवळ त्यांना उपयुक्त आणि श्रीमंत नोकर बनवणे, त्यातून तसाच जोडीदार मिळवणे आणि संततीची बेगमी करणे ह्याचसाठी कामाला येते. स्वातंत्र्य ही एक कडू गोष्ट आहे. ते वापरताना अनेकांना दुखावल्याचे व्रण घ्यावे लागतात हे आपण तरुण लोकांना सांगतो का? आपण त्यांना केवळ पोटभर ओरपायचे आणि आपल्या नातवंडाच्याही ओरपाण्याची सोय करणे हेच काय ते जीवितध्येय असे शिकवतो.

    ReplyDelete
  2. अगदी आता कुठेतरी जाऊन लागला हा प्रसंग. अशी काही कुटुंबे आसपास पूर्वी पाहिली आहेत. प्रवासातही पहिली असवित. एक स्त्री म्हणून मलाच हे सहन करणाऱ्या स्त्रियांबद्दल आपुलकी/दया वगैरे वाटण्याऐवजी थोडा संताप येतो. आपण असं पहिल्यांदी केव्हातरी नमतं घेतलं तिथेच ही लढाई आपण हरतो मग एका स्टेजला आपणच काही बदल करू शकत नाही. आता तुमच्या वरच्या उदा.मधली मुलगी आज बाबासमोर बोलत नसली तरी तिने स्वतंत्र आयुष्यात नवरा किंवा इतर पुरुषांसमोर कारण नसताना नमतं घ्यायचं टाळलं किंवा ती ते करू शकली तर बरं असं वाटून गेलं

    ReplyDelete