यंदा माझ्यासाठी दिवाळी जरा लवकरच आली. एक-दोन दिवस पुढेमागे नाही, चांगली पंधरा दिवस आधी आली. फटाक्यांचे आवाज, घरांसमोरच्या अंगणात मंद तेवणार्या पणत्या आणि मेणबत्त्या, घरांच्या खिडकीतून डोकावणारे आकाशकंदील. सुपरमार्केटमध्ये लागलेले जंगी सेल आणि मालाने भरलेली दुकानं. रस्त्यावर दिसणारी अगणित माणसं. खरेदीची लगबग आणि सगळीकडे ओसंडून वाहणारा उत्साह.
प्रकाशचित्र १ - रस्त्यावरून दिसणारं एक दुकान, बाहेर पानाच्या ठेल्यावर स्त्री विक्रेती आहे.
प्रकाशचित्र २ - जंक्शन स्क्वेअर सुपरमार्केटमधले आकाशकंदील
प्रकाशचित्र १ - रस्त्यावरून दिसणारं एक दुकान, बाहेर पानाच्या ठेल्यावर स्त्री विक्रेती आहे.
प्रकाशचित्र २ - जंक्शन स्क्वेअर सुपरमार्केटमधले आकाशकंदील
देश कोणताही असो, सांस्कृतिक उत्सव हे बाजारासाठी एक मोठी संधी असते. जंक्शन स्क्वेअर सुपरमार्केटमध्ये लटकलेले आकाशकंदील पाहताना या देशाच्या भविष्यात काय वाढून ठेवलं आहे याची चुणूक मिळाली. केवळ बाजाराच्या स्पर्धेत इथल्या सण-उत्सवांची निरागसता किती काळ टिकून राहील, हा एक प्रश्नच आहे. ते असो.
हं! तर काय सागंत होते, की दिवाळीची तंतोतंत आठवण करून देणारं वातावरण, पण ही दिवाळी नव्हती. हा होता दिवाळीसारखाच महोत्सव, स्थानिक दीपोत्सव. या उत्सवाचं नाव आहे ‘तडिंजु’
ही कुठली भाषा? हा कुठला देश? ‘तडिंजु’ या शब्दाचा नेमका काय अर्थ? असे बरेच प्रश्न तुमच्या मनात आले असणार.
गेले काही महिने मी ‘म्यानमार’मध्ये आहे. मी राहते ‘यांगों’ शहरात. आपण ज्याला ‘रंगून’ म्हणतो, ते स्थानिक भाषेत आहे ‘यांगून’ (Yangon), त्याचा उच्चार करायचा ‘यांगों’ असा. इथे गो या अक्षरावर अनुस्वार आहे, तो विसरायचा नाही. ही भाषा आहे बर्मी उर्फ म्यानमार.
सगळ्यात आधी ‘Thadingyut’ या शब्दाचा उच्चार ‘तडिंजु’ असा करायचा, याची सवय पडायला काही दिवस गेले. जसजसा उत्सव जवळ येत चालला, तसं हा उत्सव पाहायला नेमकं कुठे जायचं याची चाचपणी सुरू झाली. म्यानमारमधले काही उत्सव हे एखाद्या विशिष्ट शहरातच साजरे होतात, पण ‘तडिंजु’ हा सण देशभरात साजरा करत असल्यामुळे शहराबाहेर जाण्याची गरज नव्हती.
‘तडिंजु’ म्हणजे काय, हे सांगायचं राहिलंच.
म्यानमारमधले बहुसंख्य लोक ‘थेरवाद बौद्ध’ धर्माचे अनुयायी आहेत. म्यानमारमध्ये सण-उत्सवांसाठी आपल्यासारखीच परंपरेने चालत आलेली चांद्रगणना आहे. या कालगणनेनुसार वर्षातल्या सातव्या महिन्याचं नाव आहे ‘तडिंजु’. या महिन्यातल्या पौर्णिमेला तीन दिवसांच्या दीपोत्सवाचा मधला दिवस असतो, म्हणून हा आहे ‘तडिंजु उत्सव’. यंदा १६ ऑक्टोबरला ‘तडिंजु’ पौर्णिमा होती. म्हणजे तडिंजु १५, १६ आणि १७ ऑक्टोबरला होता. पण उत्सवाचा मुख्य दिवस असतो तो पौर्णिमेचा.
साधारणपणे जुलै महिन्यात बर्मी ‘वासो’ (हा चांद्र) महिना येतो. आपल्याकडच्या चतुर्मासासारखा इकडे ‘त्रिमास’ चालू होतो. या काळात बौद्ध भिक्षूंना रात्री मठाबाहेर राहण्यास परवानगी नसते, त्यामुळे ते प्रवास करत नाहीत. तीन महिन्यांचा काळ ध्यान-मनन-चिंतन यात ते व्यतीत करतात. बरेच सामान्य लोकही या काळात दारू आणि मांसाहार टाळतात. या तीन महिन्यांत विवाह, नवीन घरात राहायला जाणं अशा चांगल्या गोष्टी शक्यतो केल्या जात नाहीत. इथल्या पावसाचं धुंवाधारपण लक्षात घेता, शेतीच्या सोयीने हे नियम आले असावेत असं म्हणता येईल.
तीन महिन्यांनी, ‘तडिंजु पौर्णिमे’ला त्रिमासाचं हे व्रत पूर्ण होतं. पावसाने तोवर माघार घेतलेली असते. आकाश निरभ्र असतं (पण तडिंजु पौर्णिमेला यांगोंमध्ये मात्र पाऊस हजेरी लावून गेला, हा भाग वेगळा.) हिवाळा जवळ आलेला असतो. हवेत होणार्या सुखद बदलाच्या मुहूर्तावर तीन दिवसांचा दीपोत्सव साजरा होतो – तोच हा तडिंजु दीपोत्सव.
या उत्सवामागे एक मुख्य धार्मिक संकल्पनाही आहे. आजही तीच या उत्सवाच्या केंद्रस्थानी आहे, ती थोडक्यात सांगते. बौद्ध धर्मातल्या विविध संकल्पना समजून घेण्यासाठी हा छोटा लेख पुरेसा नाही. त्याबद्दल नंतर कधीतरी लिहायचा प्रयत्न करीन.
तर अशी लोकमान्यता आहे की बुद्ध सदेह स्वर्गात (किंवा देवांच्या जगात – असे सहा वेगवेगळे स्वर्ग आहेत, त्यांपैकी एका जगात) गेला (बुद्धाचा एकेरी उल्लेख प्रेम आणि आदरातून आलेला आहे, याविषयी शंका नसावी.) आणि त्याने तिथं देवांना ‘अभिधम्म’ प्रवचनांद्वारा उपदेश दिला. ‘तडिंजु पौर्णिमे’ला ‘अभिधम्म दिवस’ असंही म्हटलं जातं. तिथल्या देवतांमध्ये बुद्धाची पूर्वजन्मातली माता ‘माया’ हीदेखील होती. बुद्धाच्या जन्मानंतर सातव्या दिवशी मातेचं निधन झालं होतं. तिच्या पुढच्या जन्मात ती देवतारूपात या स्वर्गात निवास करत होती. मातेचं ऋण चुकतं करण्यासाठी, आपल्याला मिळालेलं ज्ञान तिलाही मिळावं, या उद्देशाने बुद्ध तीन महिने Tavatimsa या स्वर्गीय निवासात होता. ‘तडिंजु पौर्णिमे’च्या दिवशी तो पृथ्वीतलावर सदेह परतला. त्याचा परतीचा मार्ग देवांनी प्रकाशाने उजळला होता. त्या घटनेच्या स्मरणार्थ हा तीन दिवसांचा दीपोत्सव असतो.
या काळात घरातील ज्येष्ठ माणसांना वंदन करून त्यांना भेटवस्तू देण्याची प्रथा आहे. पौर्णिमेच्या दिवशी काही लोक उपास करतात. मठातल्या भिक्षूंना अन्नदान आणि वस्त्रदान, तसंच पंखा, छत्री आदी उपयोगी वस्तू देण्याचंही खूप महत्त्व आहे.
हा उत्सव मोठ्या धामधुमीत साजरा केला जातो तो ‘पय्या’ (अथवा पया)मध्ये. ‘पय्या’ म्हणजे पगोडा. घराघरातही रोषणाई असते; पण सामूहिक रोषणाई पाहायची, तर ‘पय्या’मध्ये जायला हवं. सगळ्यात पहिला पर्याय होता ‘श्वेडगों (Shwedagon) पय्या’. श्वे म्हणजे सुवर्ण आणि डगो म्हणजे डोंगर. डोंगरावर असलेला सुवर्णमयी पगोडा. केवळ यांगों शहराचीच नाही, तर म्यानमार देशाची शान असणारा हा पगोडा धार्मिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. (याबद्दलही नंतर कधीतरी) माझ्या कार्यालयातून, माझ्या घरातून ‘श्वेडगों पय्या’ सतत दिसतो. ही भव्य वास्तू जणू या शहरावर कृपादृष्टी ठेवून आहे असं वाटत राहतं. ‘श्वेडगों पय्या’च्या परिसरात गेले कित्येक महिने कितीतरी वेळा भटकंती केली आहे, ती केवळ ‘श्वेडगों’ला विविध वेळी आणि वेगवेगळ्या कोनांतून पाहण्यासाठी.
पण माझ्या स्थानिक सहकार्यांनी मला या बेतापासून तातडीने परावृत्त केलं. ‘तडिंजु’साठी श्वेडगोंमध्ये अपरंपार गर्दी असते, त्यामुळे तू तिथं जाऊ नकोस, असं त्यांनी ठामपणे सांगितलं. अशा गर्दीत स्त्रियांना येणारे अनुभव त्रासदायक असतात, असं माझ्या स्त्री सहकार्यांनी सांगितलं. अनेक गोष्टींचे निर्णय मी स्थानिक सहकार्यांवर सोपवलेले असतात. आणि तशीही गर्दी मला आवडत नाहीच. म्हणून मग ‘श्वेडगों’चा बेत रद्द केला. दुसरा पर्याय होता ‘सुले (Sule) पय्या’. थोडा लांब, पण तरी आवाक्यातला. पण तिथेही गर्दी असणार म्हणून तोही बाद.
रिचर्ड हा माझा ब्रिटिश सहकारी ‘चायवाय (Kyaik Waing) पय्या’जवळ राहतो. (इथे पुन्हा शब्दांची पुनरावृत्ती आहे. मॉन या म्यानमारच्या एका भाषेत ‘चाय’ म्हणजे पगोडा, ‘चाय’ म्हणजेच ‘पय्या’.) हा पय्या यांगों शहराच्या उत्तर भागातील तमै (Thamaing) उपनगरात आहे. मग मोर्चा तिकडे वळवला. रिचर्ड, मी आणि इलेना ही आमची एक बेल्जियन मैत्रीण असे तिघं संध्याकाळी सहाच्या सुमारास तिकडे गेलो. या पगोडालाही मोठा इतिहास आहे. एका ‘नट’ने (Nat – powerful spirit) बुद्धाला लपाछपीचा खेळ खेळण्याचं आव्हान दिलं. शक्तिशाली जीव असूनही नट पैज हरला (तो लपल्यावर बुद्धाने त्याला क्षणार्धात शोधलं, नट मात्र बुद्धाला शोधू शकला नाही.) आणि तो बुद्धाचा शिष्य झाला, अशी कथा आहे. १८७२मध्ये हा पगोडा बांधण्यात आला आणि वेळोवेळी त्याचा विस्तार करण्यात आला आहे.
‘चायवाय’मधल्या ‘तडिंजु’ची ही काही क्षणचित्रं.
प्रकाशचित्र ३ - स्वखर्चाने पणत्या-मेणबत्त्यांची ‘पाय’मध्ये रोषणाई करणारे नागरिक
प्रकाशचित्र ४ - खास बनवलेल्या लोखंडी स्टँडवर पणत्या ठेवायची सोय
प्रकाशचित्र ५ - एका छोट्या मुलीची भावमुद्रा टिपणारी तिची आई
प्रकाशचित्र ६ - युवकवर्गाचा सहभाग
प्रकाशचित्र ७ - वार्याने विझलेल्या काही पणत्या
प्रकाशचित्र ८ - मात्र या विझलेल्या पणत्या लगेच दुसरं कोणीतरी पेटवत होतं.
‘श्वेडगों’ आणि ‘सुले’ पय्यामध्ये एरवीही परदेशी लोक मोठ्या संख्येने असतात. ‘चायवाय’मध्ये मात्र दोन तासांच्या वास्तव्यात आमच्याव्यतिरिक्त कोणीही परदेशी लोक दिसले नाहीत. असंख्य लोकांनी आम्हाला आणि आम्ही त्यांना ‘मिंगलाबा’ (नमस्कार) म्हणून अभिवादन केलं. ‘डापौ यायलो यामला?’ (निदान मला तसं ऐकू आलं) – आम्ही तुमच्यासोबत एक फोटो घेऊ का? – असं एका मुलीने विचारलं. माझ्या बर्मी भाषेच्या मर्यादित ज्ञानात तोवर हे वाक्य मी शिकले होते. तिला होकार दिल्यावर मग काय, फोटोसेशन झाल्यासारखं अनेकांनी आमच्यासोबत फोटो काढले. शाळेत शिकणारी काही छोटी मुलं आमच्यासोबत इंग्लिश भाषेचा सराव करून गेली. कुणीतरी आम्हाला सरबत आणून दिलं. कुणी नुसते हसून अभिवादन करून पुढं गेले. कुणी ‘निकौला?’ (कसे आहात?), ‘असिम्पिला?’ (ठीक आहात ना तुम्ही?) असं विचारलं. एकंदर तिथे गर्दी असली, तरी ती अंगावर येणारी गर्दी नव्हती. लोकांनी आमच्याशी संवाद साधला आणि आमचं आम्हाला निवांत हिंडूही दिलं. दोन तास आम्ही तिथल्या प्रसन्न वातावरणाचा मनमुराद आनंद लुटला.
‘चायवाय’च्या ‘विश्वस्त मंडळा’च्या सभासदांनी आमच्यासोबत गप्पा मारल्या आणि फोटो काढले. ‘चायवाय’संबंधीची बर्मी भाषेतली माहिती पुस्तिका त्यांनी आम्हाला दिली. विश्वस्त मंडळाशी मी मोडक्यातोडक्या का होईना, पण बर्मीमध्ये संवाद साधल्यामुळे सदस्य अत्यंत खूश झाले. अध्यक्ष मला म्हणाले, “त्या दोघांचं सोड, तू तर भारतीय आहेस, म्हणजे आमची शेजारी आहेस. तुला तर बर्मी शिकणं अवघड जाणार नाही, शिकून घे लवकरात लवकर आमची भाषा. मग तुला आमचा इतिहास, आमची संस्कृती जास्त चांगली समजेल.” खरं आहे त्यांचं म्हणणं.
रात्री दहाच्या सुमारास परत येताना ‘इन्या तलावा’च्या परिसरात शेकडो लोक दिसले. परिसर फटाक्यांच्या आवाजाने दुमदुमत होता. आकाशात रंगीबेरंगी अग्निकण दिसत होते.
दीपोत्सव आपण भारतीयांनी दक्षिण आशियाई देशांकडून स्वीकारला की त्यांनी तो भारतातून आयात केला, हे सांगणं मला तरी अवघड आहे. कुणी त्याबाबत संशोधन केलं असेल तर मला जाणून घ्यायला आवडेल. पण या विषयावर उगाच ‘ते आणि आपण’, ‘आपल्या संस्कृतीचा प्रसार’, ‘बर्मा मुळात भारताचा भाग आहे’ असली बिनापुराव्याची चर्चा करण्यात मला रस नाही. आपल्या पूर्वजांनी इतरांना जितकं दिलं, तितकंच सांस्कृतिक संचित इतरांकडूनही ते घेत आले असावेत असा माझ्या मते साधा हिशोब आहे.
तर यंदाची दिवाळी माझ्यासाठी नेहमीपेक्षा लवकर आली. मला काही नवं सांगून गेली. भौगोलिक, सांस्कृतिक, धार्मिक भिंतींच्या पल्याड डोकावण्याची एक संधी माझ्यासाठी घेऊन आली.
त्याचं असं आहे की माणसं कोणत्याही भूमीतली असोत, कोणत्याही धर्माची (वा धर्म न मानणारी) असोत, कोणतीही भाषा बोलणारी असोत – माणसांना उत्सव साजरे करायला आवडतं. अंधाराचा नाश होऊन प्रकाशाने उजळणारं जग पाहायला माणसांना आवडतं. ‘दीपोत्सव’ ही जगातल्या माणसांची 'एक' भाषा आहे, अंधारातून प्रकाशाकडे नेणार्या मार्गाच्या आकांक्षेची ती एक जागतिक अभिव्यक्ती आहे. 'तमसो मा ज्योतिर्गमय' ही माणसांची स्वाभाविक प्रार्थना आहे. त्यालाच आपण ‘दीपावली’ म्हणतो, तर म्यानमारचे लोक म्हणतात ‘तडिंजु’.
_____________________________________
(या लेखातले बर्मी उच्चार इंग्रजी बोलणार्या स्थानिक सहकार्यांकडून तपासून घेतले आहेत. पण ‘दहा मैलांवर भाषा बदलते’ हे तत्त्व म्यानमारलाही लागू पडतं. त्यामुळे या लेखातील शब्दांचे वेगळे उच्चार आपल्यापैकी काहींनी कदाचित ऐकले असतील)
पूर्वप्रसिद्धी - मिसळपाव दिवाळी अंक २०१६
'मिसळपाव'वरील प्रतिसाद - http://misalpav.com/node/37727
ReplyDeleteइंटरेस्टिंग माहीती आहे. छान सांगितलीय, फोटोंसहित.
ReplyDeleteधन्यवाद.
Deleteमस्त! म्हणजे आपल्या कोजागिरी तुम्ही तिथे दिवाळी + त्रिपुरी अनुभवली!!!
ReplyDeleteहो ना, मजा आली.
DeleteVery interesting blog. A lot of blogs I see these days don't really provide anything that attract others, but I'm most definitely interested in this one. Just thought that I would post and let you know.
ReplyDeleteThanks.
DeleteHowever, I wonder whether you can read Marathi!