ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Monday, December 17, 2012

१४४. प्रदर्शन


फोन वाजला. अनोळखी नंबर होता. पण फक्त ओळखीचे, यादीत असलेलेच फोन घेण्याची चैन मला करता येत नाही. मला असेच कुठूनकुठून फोन येतात. हा फोन नंबर त्या अर्थाने सार्वजनिक आहे.
नमस्कार”, एक बाई होत्या. दिल्लीतल्या. त्यांनी स्वत:चं नावं सांगितलं आणि मग श्रीयुत क्ष यांनी मला तुमच्याशी बोलायला सांगितलं आहे म्हणाल्या. या ‘क्ष’ना मी अनेक वर्षांपासून आणि चांगली ओळखते. एका सामाजिक संस्थेचं काम करतात ते. त्यांच्या संस्थेबद्दल मला काही फार प्रेम आहे अशातला भाग नाही; पण ‘क्ष’ अतिशय तळमळीने आणि निस्वार्थीपणाने काम करतात. मग ‘क्ष’चं नाव घेत कुणीही माझ्याकडे आलं की मी त्यांना जमेल तितकी मदत करणं स्वाभाविक आहे माझ्यासाठी.
बोला, काय मदत हवी आहे? मी इकडेतिकडे वेळ न घालवता थेट मुद्याला हात घातला.
क्ष म्हणाले की तुमच्याकडे बरीच माहिती आहे, त्या बाई मोघमपणे म्हणाल्या.
या असल्या स्तुतीच्या चक्रात अडकायचं आता काही माझं वय राहिलेलं नाही – हे कदाचित त्या बाईंना माहिती नसणार.
कसली माहिती हवी आहे तुम्हाला? मी सरळ विचारलं.
स्त्रियांची त्यांनी एका शब्दात उत्तर दिलं.
आता स्त्रियांची माहिती हा फार मोठा आवाका असलेला विषय आहे. या बाईंना नेमकी कसली माहिती हवी आहे हे जोवर मला कळत नाही तोवर मी त्यांना मदत करू शकत नव्हते.
कुठल्या स्त्रियांची? कोणत्या विषयावर? मी पुन्हा विचारलं.
भारतीय स्त्रियांची. कोणत्याही विषयावर चालेल. त्या बाई तितक्याच शांतपणे बोलत होत्या.
मला जरा वैताग आला. पण ‘क्ष’चा संदर्भ असल्याने मी फोन ठेवून देऊ शकत नव्हते.
दहा मिनिटं गेल्यावर आणि मी बरीच चौकशी केल्यावर कळलं की क्ष आणि या बाई यांची संस्था प्राचीन भारतीय इतिहासावर एक प्रदर्शन भरवणार होती, त्यासाठी त्यांना माझी मदत हवी होती.
तुम्ही काही नावं काढली आहेत का? मी विचारलं.
तुमचं नाव आहे की... बाई उत्तरल्या. विनोदी दिसत होत्या बाई.
ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाच्या स्त्रियांबद्दल बोलत होते मी. काय काय पूर्वतयारी केलीय तुम्ही त्याचा अंदाज दिलात तर मी पुढची मदत काय करायची ते बघते. मी.
नाही हो, मला वेळच नाही मिळाला. तुम्ही सांगाल ती नावं घेता येतील, त्यात काही अडचण नाही, बाई उत्तरल्या. अडचण कसली म्हणा? यांचा काही विचारच झालेला दिसत नव्हता. ठीक आहे, नावं देऊ यात यांना असा मी स्वत:शी विचार केला.
प्रदर्शन दिल्लीत असणार म्हणजे मजकूर हिंदीत असायला हवा.
मी इंग्रजीत मजक्रूर दिला तर तुमच्यापैकी कुणी हिंदीत करेल ना तो? मी होकाराच्या अपेक्षेने विचारलं.
नाही हो .. तुम्हीच दिलीत माहिती हिंदीत तर बरं होईल. तुम्ही पण दिल्लीत राहता म्हणजे तुम्हाला हिंदी येत असेलच की ... बाईची फटकेबाजी चालूच होती.
ते नंतर बघू ‘क्ष’शी बोलून असा विचार करत मी पुढचा प्रश्न विचारला.
बरं, तुम्ही पोस्टर्स करणार असाल ना? मी विचारलं.
हो, बहुतेक ... त्या बाई उत्तरल्या.
चित्र कोण काढणार आहे? पोस्टरवर किती मजकूर द्यायचा याला मर्यादा असतात त्यामुळे मजकूर विचारपूर्वक निवडावा लागेल, पोस्टर्सचा आकार काय असेल  ... माझी विचारांची गाडी सुरु झाली होती.
तुमच्याकडे नाहीत का चित्र? त्या बाईंनी विचारलं.
नाहीत, मी शांतपणे उत्तरले. आता ‘क्ष’च्या ओळखीच्या असल्या तरी या बाईंचा मला थोडा राग यायला लागला होता.
मग काय करायचं? बाई विचारत्या झाल्या.
प्रदर्शन यांनी ठरवलं होतं की मी?
तुम्ही ठरवा. मग मला सांगा सावकाश, मी त्या बाईंना सांगितलं.
अहो वेळ कुठं आहे? त्या बाई करवादल्या.
आता मात्र मी राग विसरले आणि मला कुतूहल वाटायला लागलं. या बाईना प्रदर्शन करायचं आहे, त्याच्या विषयाची त्यांना काही माहिती नाही, त्याची कसलीही तयारी नाही यांची. मदत मागण्यासाठी मला फोन करून या मला हुकूम देत सुटल्या आहेत. आमची काही ओळख नाही तरी या माझ्यावर कारण नसताना वैतागत आहेत. यांना ‘क्ष’ने नेमकं काय सांगितलं होतं माझ्याबद्दल? कारण मी या बाईंचा अपेक्षाभंग करत होते हे अगदी उघड होतं. ‘असा कुणालाही माझा फोन नंबर देत जाऊ नका’ असं ‘क्ष’ला सांगितलं पाहिजे याची मी मनातल्या मनात नोंद केली.
घाई होतेच हो अशा वेळी, मी समजूतदारपणा दाखवला.
उत्साहाने मी पुढे बोलले (सवय! सवय!), तुम्ही एकदा तुमच्या टीमशी बोला. मग आपण एकत्र बसू आणि ठरवू. काही काळजी करू नका, होईल सगळं व्यवस्थित.
बाईंना जरा बरं वाटलेलं दिसलं. आज येता संध्याकाळी? त्यांनी विचारलं.
मी आत्ता दिल्लीत नाही. आठवडाभराने येईन परत. मग फोन करते तुम्हाला. तोवर तुम्ही चित्रकार आणि हिंदी अनुवाद करणारे लोक शोधून ठेवा ... मला बहुतेक त्या बाईंची दया आली .
आठवडाभर नाही तुम्ही? मग काय तुमचा उपयोग? बाई मला मोडीत काढत म्हणाल्या.
म्हणजे? मी आवाजावर काबू ठेवत विचारलं.
अहो, प्रदर्शन या शनिवार रविवारी आहे ...बाई उत्तरल्या.
मी तुम्हाला यावेळी काही मदत करू शकत नाही, क्षमस्व. आणि तुम्हाला प्रदर्शनासाठी शुभेच्छा. असं म्हणत मी फोन बंद केला.
प्रदर्शन!
कशाचं प्रदर्शन?
आपण काम करतो याचं? आपल्याला संस्कृती-इतिहास यांचं फार पडलं आहे याचं? आपण सामाजिक काम करतो म्हणजे कसंही केलं तरी चालेल या मानसिकतेचं? वेळ मारून नेण्याच्या वृत्तीचं? आपल्याला इतरांकडून अपेक्षा करण्याचा हक्क आहे या समजुतीचं?
कशाकशाचं प्रदर्शन!!  

16 comments:

 1. फारच गंमतीशीर अनुभव आहे हा. 'क्ष' नी "या बाईंकडे तयार प्रदर्शन मिळेल'असं त्या बाईंना सांगितलं असावं.
  पण इतका संयम ठेवणंही मला विशेष वाटलं. मी बहुधा लगेच कटवलं असतं. :-)

  ReplyDelete
 2. :) एका ओळखीखातर इतके संयमी वागू शकलीस ह्याचे कौतुक.
  ओळख पण इतपत मान ठेवण्याजोगी असायला हवी !

  ReplyDelete
 3. माझ्यामते तुम्ही त्या बाईंना तुमची माझ्याकडून नक्की काय अपेक्षा आहे हे विचारले ते बरे झाले.
  ह्या लोकांना एवढे ही कळत नाही की श ह्या व्यक्तीने तुमच्या बद्दल बहुदा अशी माहिती दिली असावी की तुम्ही एकहाती हे प्रदर्शन पूर्णत्वाला न्याल व ह्या बाईसाहेबांना इकडची काडी तिकडे करावी लागणार नाही ,
  मात्र तुमच्याशी बोलून त्यांना कळायला हवे होते की एकतर श ह्यांच्या कडून तुमच्याबद्दल चुकीची माहिती मिळाली आहे किंवा मिळालेल्या माहितीचा त्यांनी चुकीचा अर्थ लावला आहे ,
  त्या बाई मठ्ठ हो त्या असे प्रथमदर्शनी जाणवते किंवा आवळा देऊन कोहळा घेणाऱ्यापैकी त्या असाव्यात.
  म्हणजे येडा बनके पेडा खानेका

  ReplyDelete
 4. तुमच्या कडे त्या ’क्ष" बाईंना पाठवणाऱ्यांचे नाव कुलकर्णी होते का हो? आणि त्या विदर्भातल्या आहेत का? कारण असे प्रकार , म्हणजे उगीच कोणाला तरी मदत करायला जायचे, आणि तोंडघशी पडायचे हा प्रकार आम्हा कुलकर्ण्यांचा बाबतित हमखास घडतो.

  ReplyDelete
 5. Anaghachya manat tuzyabaddal je vichar ale agdi tech mla hi vatla... mhanje itka saymmi vagna mla hi nasta hi jamla... aaj sakalich mla tyacha anubhav ala :-)

  ReplyDelete
 6. प्रीति, हं! तयार प्रदर्शन! बहुधा 'क्ष' असं काही सांगणार नाहीत .. पण माहिती नाही!

  ReplyDelete
 7. अनघा, बरेचदा आपल्या ओळखीच्या व्यक्तीचा मान ठेवण्यासाठी आपण त्या व्यक्तीची इतर माणसं चालवून घेतो - हाही त्यातलाच एक प्रकार म्हणायचा!

  ReplyDelete
 8. निनादजी, अहो, दिल्लीकरांना 'मठ्ठ' म्हणून कसं चालेल? राज्यकर्ते आहेत ते आपले :-)
  'आवळा न देताच कोहळा काढण्याची' कला असतेच काही लोकांकडे! या बाई त्यातल्या एक दिसताहेत.

  ReplyDelete
 9. महेंद्रजी, असे तुम्हाला वाटतात त्या 'कुलकर्णी' टाईपचे लोक सगळीकडे असतात हो!

  ReplyDelete
 10. श्रीराज, अरे मला सवय आहे चित्रविचित्र माणसं भेटण्याची! कदाचित मी पुरेशी विचित्र आहे म्हणून मला त्रास न होता गंमत वाटते अशा प्रसंगांची!

  ReplyDelete
 11. फारच भारी दिसतायत बाई. काही नाही तरी चार घटका मनोरंजन तर झालं ना बास ;)

  >> 'क्ष' नी "या बाईंकडे तयार प्रदर्शन मिळेल'असं त्या बाईंना सांगितलं असावं.

  प्रीती, LOL !! :)))

  ReplyDelete
 12. हाहा.. हेरंब, फक्त माझंच नाही तर तुमच्यासारख्या (माझा ब्लॉग वाचणा-या) आणखी काही लोकांच मनोरंजन :-)

  ReplyDelete
 13. हा हा हा... भारीच दिसत होत्या या बाई! बोट दिलं की हातच पकडायची काही लोकांची सवयच असते. काही लोकांना अगदी जुजबी ओळखीवर किंवा संदर्भांवर असे हुकूम सोडणं कसं काय जमतं कोणास ठाऊक. आपल्याला मात्र असं हुकून सोडणंही जमत नाही आणि नाही म्हणताही येत नाही. बाकी तुझ्या संयमाची दाद द्यायला हवी.

  ReplyDelete
 14. हं, स्मिता, दिल्लीतल्या लोकांना सगळं जमतं :-)

  ReplyDelete
 15. बाई अचाट आहेत.फक्त प्रदर्शनासाठी नव्हे, तर एकूणातच त्यांना मदतीची गरज आहे!

  ReplyDelete
 16. अनु, त्या बाई अशी सगळीच मदत मला मागायला लागल्या तर - असा एक भीतीदायक विचार मनात आला ...!!

  ReplyDelete