ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Thursday, November 11, 2010

५२. तुळशीची माळ

एखादी गोष्ट आपण सहज म्हणून, अगदी निर्हेतुकपणे करायला जावी आणि त्यातून लोकांना मात्र चर्चेला खुसखुषीत विषय मिळावा, असं तुमच्याबाबतीत कधी झालय? मला वारंवार हा अनुभव आला आहे.

’तुळशीची माळ’ हा असाच एक विषय!

खरं तर तो एक साधा प्रसंग होता.

उत्तर प्रदेशात भटकायला गेले होते. एक मुक्काम अलाहाबादला (प्रयागला) आशाकडे होता. आशा दोन तीन वर्षांपासून तिथे राहत होती. ती एका संघटनेचे पूर्ण वेळ काम करत होती. त्यामुळे बघताबघता चार आठ दिवसांत माझ्याही तिकडे भरपूर ओळखी झाल्या. आशा कामात असली की तिच्या संघटनेचे कोणी ना कोणी कार्यकर्ते मंडळी मला वेळ देत – माझ्याशी गप्पा मारणे; मला आग्रहाने घरी नेऊन खायला घालणे, मला फिरायला नेणे असले उद्योग ते आस्थेने करत.

कल्पना त्यांच्यापैकी एक. नुकतीच नोकरीला लागलेली. जराशी लाजरी बुजरी. आशाने तिला माझ्याबद्दल नेमके काय सांगितले होते, कोण जाणे! पण पहिल्या क्षणापासून ती अत्यंत भक्तिभावाने माझ्याशी वागत होती. एक दिवस कल्पना मला जवळचे राम मंदिर पाहायला घेऊन गेली. तसे मला लोक अनोळखी असतात तोवर त्यांच्याशी गप्पा मारायला आवडते. ओळखीच्या लोकांशी आपण तेच तेच आणि मुखवटे सांभाळत बोलतो असे माझे उगाचच मत आहे! याच न्यायाने कल्पनाची आणि माझी फारशी ओळख नसल्याने मी तिच्याशी मनमोकळया गप्पा मारत होते. तीही मनापासून बोलत होती.

देवदर्शन करून बाहेर आलो. पत्येक मंदिराभोवती असतो, तसा इथेही बाहेर बाजार भरला होता. एकाएकी कल्पना मला म्हणाली, “दीदी, मला तुम्हाला काहीतरी द्यायचे आहे. काय हवे ते फक्त सांगा.” मी एकदम चमकून तिच्याकडे पाहिलं. तिला पुष्कळ सबबी सांगितल्या. देण्याघेण्याबद्दलचे माझे तिरकस तत्त्वज्ञानही मी तिला ऐकवले. पण ती तिच्या निश्चयावर ठाम होती. शिवाय हे उत्तरेतले लोक इतक्या अदबीने बोलतात, की आपले साधे बोलणे त्यांच्यासमोर रासवट आणि जंगली वाटायला लागते.

मी कल्पनापुढे हार पत्करली. समोरच्या दुकानाकडे नजर टाकली तेव्हा सर्वात आधी मला दिसली ती तुळशीची माळ! मागचा पुढचा विचार न करता मी म्हटले, “ कल्पना, मला ही तुळशीची माळ हवी आहे.” त्या माळेची किंमत फक्त दोन रुपये होती, त्यामुळे कल्पना अतिशय निराश झाली. पण तिने मला वस्तू निवडीची संधी आपण होऊन बहाल केली होती. त्यामुळे तिला जास्त काही बोलता आले नाही, गप्प बसावे लागले. घेणे थोडक्यात निभावले म्हणून मी खुषीत होते.

पण या तुळशीच्या माळेवरून लगेच वेगवेगळया प्रतिक्रिया आल्या. आशा म्हणाली, “तू अगदी खडूस आहेस. ती पोरगी एवढं प्रेमान म्हणत होती, तर घ्यायचसं काहीतरी छान. दुस-याचा अपमान करण्यात तुला काय गंमत वाटते?”

रंजन म्हणाला, “दीदी, पैसे कल्पना देणार होती ना? मग तू कशाला कंजूषपणा केलास? सारखे कसले पैसे वाचवतेस?”

तुळशीच्या माळेपेक्षा रूद्राक्षांची माळ कशी शक्तिशाली असते, हे ऐकवत अवस्थी काकांनी एक रूद्राक्षाची माळ माझ्या गळ्यात घातली. ’तुम्ही आध्यात्मिक आहात (!!) हे आम्हाला माहिती नव्हत हो आजवर" असं म्हणत एकीने तांब्याची अंगठी, एकाने गोरखपूर प्रेसची छोटी गीता दिली. आणखी एकाने आधी माझ्यासाठी प्रेमचंदांचे एक पुस्तक आणले होते, पण ते बदलून त्याने विवेकानंदांचे पुस्तक आणले ते केवळ तुळशीच्या माळेमुळे!

महाराष्ट्रात परत आल्यावर तर आणखी गमतीजमती झाल्या. काहींना वाटले, मी कोणत्यातरी मठाची दीक्षा घेऊन आले. एका जेमतेम ओळखीच्या माणसाने "अरे वा! म्हणजे मांसाहार सोडलात वाटतं आता" असे चारचौघात म्हटल्यावर मी भडकलेच त्याच्यावर - “तुम्हाला काय करायच्यात नुसत्या चौकशा" म्हणून. त्याने चाचरत तुळशीच्या माळेकडे बोट दाखवल्यावर मला मुकाट बसावे लागले. एस. टी. च्या प्रवासात माझ्या शेजारचा शेतकरी माझ्याशी एकदम ’पंढरीच्या वारी’बद्दल का बोलतो आहे हे समजायला मला वेळ लागला. ’माळकरी वारकरी असतात अशी माझ्या ज्ञानात त्यादिवशी भर पडली. माझा एक आयुर्वेदिक डॉक्टर मित्र तुळशीचे औषधी महत्त्व मला पटल्याचे पाहून भलताच खूष झाला.

रोज तुळशीच्या माळेवरून काही ना काही घडायला लागले. अखेर मी ती माळ अश्विनीच्या बाहुलीला देऊन टाकली. माझ्या गळयातली तुळशीची माळ का नाहीशी झाली असावी याबाबत अनेक तर्क वितर्क होत राहिले.

नुकतीच आळंदीला गेले होते. सुमनमावशींच्य सोबत गेले होते. त्या म्हणाल्या, “मला तुला तुळशीची माळ द्यावी वाटतेय. घालशील का पण तू ती?” मला जुन्या गोष्टी आठवल्या. मी घाईघाईने नकार देत त्यांच्याकडून चॉकलेटचा मोठ पॅक घेतला.

आता सुमनमावशींच्या वर्तुळात मी तुळशीची माळ घालायला नकार दिला यावर चर्चा होते. शिवाय स्वदेशी विदेशी वाद पण मी घेतलेल्या चॉकलेटमुळे. ’निदान सुमनमावशींचा मान तरी राखायचा’ असं काहीजण म्हणाले. ’हे काय लहान मुलांसारख वागणं चॉकलेट खायचं काय वय राहिलय का आता?” असं आणखी काही म्हणाले.

तुळशीच्या माळेच्या मोहाचा अनेक वर्षांपूर्वीचा तो एक क्षण! त्यात इतके प्रसंग, इतक्या प्रतिक्रिया निर्माण करण्याची सुप्त शक्ती..

अनाकलनीय आहे सगळं, नाही का?

8 comments:

  1. छोटे छोटे प्रसंग विलक्षण रीतीने फुलवून सांगण्याच्या तुमच्या हातोटीला लवून मुजरा !! आजचा लेख तर सगळ्यात ग्रेट जमलाय.. मस्तच !!

    ReplyDelete
  2. हा हा हा... खूप छान.... हे तर रोजचे अनुभव आहेत....
    पण "ओळखीच्या लोकांशी आपण तेच तेच आणि मुखवटे सांभाळत बोलतो"..... हे मात्र अगदी खरे आहे....

    आणि हे अगदी व.पु.काळे छाप वाक्य झाले आहे बरं का.... थोडक्यात तत्वज्ञान सांगणारे...

    ReplyDelete
  3. प्रचंड भारी आहे...
    छोट्याशा खड्याचे, तरंग किती उमटले!!!

    ReplyDelete
  4. हेरम्ब. बापरे! मुजरा वगैरे कोणी केलेला नाही आजवर मला ... ही मला आठवते तशी पहिलीच वेळ! त्याला उत्तर कस दयायच ते माहिती नाही :-)

    ReplyDelete
  5. राजेश, बऱ्याच दिवसांनी दिसलास. व पु वगैरे ज़रा जास्तच होतय पण!

    ReplyDelete
  6. विद्याधर, एका ओळइची कविता झाली की तुमची!

    ReplyDelete
  7. >>>>>ओळखीच्या लोकांशी आपण तेच तेच आणि मुखवटे सांभाळत बोलतो असे माझे उगाचच मत आहे!

    वरील वाक्याशी मी सुद्धा सहमत आहे .....

    बाकी त्या तुळशी माळेचे सहीच पडसाद उमटले.... :)

    ReplyDelete
  8. देवेन, पडसाद एकदम सहीच हे एकदम बरोबर!

    ReplyDelete