ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Thursday, November 18, 2010

५३. निमित्तमात्र दिल्ली भाग: २

आपण अनेक घटनांमध्ये, प्रसंगांमध्ये, शहरांमध्ये, माणसांच्या आयुष्यांमध्ये निमित्तमात्र असतो. पण तशाच अनेक घटना, प्रसंग, माणसे, शहरे आपल्याही आयुष्यात निमित्तमात्रच असतात. माझ्या जगण्यातल्या निमित्तमात्र दिल्लीची ही झलक.....

भाग १ वाचायचा आहे? इथे आहे.

एखाद्या शहराची, गावाची आपली ओळख असते – म्हणजे नेमकं काय? हा प्रश्न मला दिल्लीची ओळख होताना वारंवार पडला.

एक तर त्या ठिकाणी काही माणसं – पन्नास, शंभर, दोनशे अशी मर्यादितच – आपल्या ओळखीची असतात. या ओळखीचेही अनेक उपप्रकार असतात. नुसत्या चेह-याची ओळख – रोज रस्त्यावर दिसणारे सफाई कामगार, रिक्षावाले, बसमधले सहप्रवासी वगैरे. काही ओळखी रोजच्या कामानिमित्त होतात आणि त्यामुळे संभाषण नियमित घडत असले तरी त्यात औपचारिकता जास्त असते – जसे आपल्या कार्यातले सहकारी, भाजीवाले, इस्त्रीवाले वगैरे. तिसरे म्हणजे ज्यांच्याशी आपण मनमोकळेपणाने बोलतो असे लोक. हे अर्थातच आपण राहतो त्या गावाबाहेरही असतात.

शहराच्या ओळखीचा दुसरा भाग म्हणजे त्या शहरातल्या वेगवेगळया जागा आपल्याला माहिती असतात. एका जागेपासून दुस-या जागेपर्यंत मार्गदर्शकाच्या मदतीविना आपण जायला लागलो, की शहर आपल्या ओळखीच झालं असं म्हणता येतं. कोणत्या प्रकारच्या खरेदीसाठी, करमणुकीसाठी, खाण्यासाठी नेमकं कुठं जायच हे आपल्याला माहिती होणं म्हणजे या ओळखीची परिसीमा!

तिसर म्हणजे कोणत्या परिस्थितीत या शहरातली माणसे कशी वागतील याचा ढोबळमानाने अंदाज बांधता येणं! म्हणजे दंगल, नैसर्गिक आपत्ती अशा वेळीच नाही, तर रोजच्या रस्त्यावरच्या गर्दीत, वाहतुकीचे नियम पाळण्याच्या बाबतीत, साध्या गप्पांच्या बाबतीत. आपणही त्या सामूहिक मानसिकतेचा भाग बनणं म्हणजे त्या शहराने आणि आपण एकमेकांना सामावून घेतल्याची खूण असते.

ही प्रक्रिया बराच काळ चालते. त्याला काही विशिष्ट क्रम असतो असं नाही. अनेक गोष्टी एकाच वेळी घडत राहतात.

दिल्लीत महिनाभरात माझ्या पंचवीस तीस ओळखी झाल्या असतील. पण ओळख वाढण्याची अजिबात शक्यता नसलेली काही माणसं चांगलीच लक्षात राहिली. बंगला साहिब गुरूद्वाराच्या परिसरातून अशोक मार्गावर जाताना एका सफाई कामगाराने मला रस्ता दाखवला. मग पुढचे पाच दिवस रोज सकाळी एकमेकांकडे पाहून हसता हसता आम्ही काही वाक्ये एकमेकांशी बोलायला लागलो. नंतर माझ राहण्याचं ठिकाण बदललं आणि आमच बोलणं थांबल. आमची ओळख झाली होती – ती टिकली नाही, वाढली नाही – ही दुर्देवाची गोष्ट आहे. आता त्या ठिकाणी सकाळी जायला मला वेळ नाही आणि संध्याकाळी कदाचित आमची भेट होणार नाही. एखाद्या सुट्टीच्या दिवशी सकाळी तेथे जाऊन मी ही ओळख टिकवण्याचा प्रयत्न करून पाहायला हरकत नाही.

चाणक्यपुरीतून सफदरजंग एन्क्लेवला संध्याकाळी सरदारजींच्या टॅक्सीतून गेले. मला टॅक्सी, रिक्षा चालकांशी गप्पा मारायला आवडतात, एक वेगळा दृष्टिकोन मिळतो त्यातून. वाटेत भरपूर ’जाम’ असल्यामुळे आम्ही बराच वेळ एकमेकांशी बोललो. रस्त्यांवरची वाहनांची गर्दी, महागाई असे विषय बोलता बोलता अचानक आमच बोलणं ’धर्म’ या विषयाकडे वळ्लं. ’अयोध्या निर्णयाबाबत तुम्हाला काय वाटतं?” अस सरदारजींनी मला अचानकच विचारलं. मग आम्ही त्या विषयावर सविस्तर बोललो. फाळणीचे दु:ख अजून किती लोकांच्या मनात जागं आहे, १९८३ च्या शीख हत्यांची जखम अजून कशी ठसठसते आहे ….. याच एक दर्शन मला या संभाषणातून झाल. माझी आणि या सरदारजींचीही ओळख झाली. चाणक्यपुरी परिसरातून कधी टॅक्सी करायची वेळ आली तर हे सरदारजी मला पुन्हा भेटण्याची शक्यता आहे, आमची ओळख वाढण्याची शक्यता आहे, कारण त्यांचा टॅक्सी स्टॅन्ड मला माहिती आहे.

आणि रोजच्या व्यवहारातली असंख्य माणसं भेटली. काहींशी थोड्याच काळात संवादाचे सूर जुळले काहींच्या बाबतीत अजून एकमेकांचा अंदाज घेण्याची प्रक्रिया चालू आहे.

माणसांप्रमाणेच दिल्लीतल्या जागाही भेटल्या.

मला पाच दिवसांच्या आठवड्याची सवय नाही. आता एकदम शनिवार, रविवार असे दोन दिवस मोकळे मिळायला लागले. मी रहात होते गेस्ट हाऊसमध्ये – त्यामुळे घराच्या साफसफाईचे काम नव्हतं. कोणाच्या घरी भेटायला जाण्याइतपत ओळखी नव्हत्या – आणि जरी मी सारखी कोणाच्या ना कोणाच्या घरी जात असले तरी तसाही तो उत्साह मला कमीच असतो म्हणा. पुण्यातून येताना चार पुस्तकं सोबत आणली होती, ती चार दिवसांतच वाचून झाली. सोबत संगणक नाही त्यामुळे काही काम करण्याचा, लिहिण्याचा प्रश्न नव्हता.

मग मी काही संग्रहालयं पाहिली. राष्ट्रीय संग्रहालय, रेल्वे संग्रहालय, नेहरू तारामंडल (हा शब्द मला तारांगण शब्दापेक्षा आवडला), नेहरू संग्रहालय .. अशा ठिकाणी मी वेळ मिळेल तशी जात राहिले.

खर तर संग्रहालय पाहायला एक विशिष्ट प्रकारची मानसिकता लागते – जी माझ्याकडे अजिबातच नाही. म्हणजे माहितीचा भडिमार मला झेपत नाही. एखादी गोष्ट आवडली तरी ती खूप उपभोगणे मला जमत नाही. आनंद, सुख, आश्चर्य, समाधान यात थोडे आणि जास्त असा संख्यात्मक फरक नसतो, जास्त उपभोगामुळे जास्त आनंद मिळतो असे नाही; किंबहुना उलटेच घडते (Law of Diminishing Returns) हे मला अनुभवाने माहिती आहे. त्यामुळे काही आठवड्यांत सिंधु संस्कृतीच्या अवशेषांपासून आधुनिक काळापर्यंतचा प्रवास माझ्या क्षमतेच्या पल्याड होता. मी माझ्या गतीने, माझ्या आवडीप्रमाणे, माझ्या कुवतीप्रमाणे समोर आलेल्यातल्या निवडक गोष्टी पाहिल्या. आजवर कोणतेच संग्रहालय मी पूर्णपणे पाहिलेले नाही, आणि कदाचित कधी पाहणारही नाही.

राष्ट्रीय संग्रहालयातल्या मूर्ती पाहताना प्रादेशिक इतिहास वेगळा आहे हे दिसते. म्हणजे सूर्याची म्रूर्ती राजस्थानमधली, कार्तिकेयाची तामिळनाडूमधली, यमुनेची मध्य प्रदेशातली वगैरे – जरी राज्यांची ही नावं अलिकडची असली तरी त्यांची वैशिष्ट्य मात्र जुनी दिसताहेत. समाज आज जसा आणि जितका विविधांगी आहे, तितकाच तो पूर्वीही असणार. पण मग तेव्हा कोणत्या प्रेरणेने हा समाज जोडला गेला असेल? ’आपले पूर्वज आपल्यापेक्षा (आजच्यापेक्षा) जास्त उदारमतवादी होते” असे ढोबळ विधान करण्यात काही अर्थ नाही; कारण समाजाच्या प्रत्येक कालखंडात युध्द होते, हिंसा होती, क्रूरता होती, धर्मांधता होती, विषमता होती. पण तरीही एक जोडणारा धागा निर्माण झाला, टिकला, रूजला असे म्हणता येते. त्या प्रक्रियेचे रहस्य आपल्याला कधी उलगडेल का?

संग्रहालयात काळाच्या पडद्याआड गेलेल्या लोकांची खेळणी दिसली; भांडी दिसली; शस्त्रास्त्रे दिसली; मूर्ती दिसल्या; चित्रे दिसली; नाणी दिसली. पुढच्या पिढ्यांना आपली अशी आठवण जपून ठेवावी वाटेल का हा एक प्रश्नच आहे. त्यांना कुतुहल, आश्चर्य, कौतुक वाटावे असे आपण काही मागे ठेवू का? का फक्त विध्वंसाच्याच खुणा राहतील मागे?

नाणी आणि लिपी या दोन्हीत मला जास्त रस असल्याने मी तो विभाग जरा आवर्जून पाहिला. कदाचित आता पुढची एक भेट त्याच्यासाठीचीच असेल. त्या विषयावरचे काही वाचून मग तेथे जावे असा विचार आहे. बघू कसे जमतेय ते.

रेल्वे संग्रहालयातला प्रदर्शन विभाग दुरूस्तीसाठी बंद होता म्हणून निराशा पदरी पडली. पण तिथेही साठ सत्तर इंजिने पाहताना मजा आली. ती कदाचित चालताना पाहणे जास्त आनंददायक झाले असते. तिथले सगळ्यात मजेदार दृश्य होते ते म्हणजे छोट्या रेल्वेतून प्रवास करणारे असंख्य बालप्रवासी. त्यांच्या चेह-यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. मजा आली मला ते पाहताना. काही दिवसांनी हीच मुले मुली ’यात काय विशेष?’ अशा ठराविक तरूणाईच्या प्रतिक्रियेपर्यंत पोचतील – तेव्हा त्यांना हे आजचे कुतुहल आणि आनंद कदचित आठवणारही नाही. तेही ठीकच म्हणा. मला तरी माझ्या लहानपणचे काय आठवते? तसे काही कोणाला आठवायला लागले की ’ते म्हातारपणाचे लक्षण आहे’ असे म्हणून मी आजही मोकळी होतेच की!

तीन मूर्ती परिसरात भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहास आहे. या संग्रहालयात नेहरूंची तीन भाषणे ऐकण्याची आता सोय आहे. १५ ऑगस्ट १९४७ चे ’Tryst with Destiny’, गांधीहत्त्येच्या प्रसंगीचे ‘The Light has gone out of our lives…’ आणि “New thinking for the new world” हे Science and Technology बाबतचे त्यांचे विचार त्यांच्या आवाजात ऐकताना एकदम इतिहासाशी नाते जुळल्यासारखे वाटले.

या संग्रहालयात जरी केंद्रस्थानी जवाहरलाल नेहरू असले तरी त्या काळाचे अनेक पैलू तेथे आहेत तो सगळा इतिहास पाहताना अस्वस्थ वाटलं! या माणसांनी जी काही स्वप्नं पाहिली होती स्वतंत्र भारताची, ती पूर्ण झाली आहेत का – या प्रश्नाचे उत्तर उघड आहे. बदलत्या काळाचा आवाका कोणालाच येत नाही का? काळ संथ चालला आहे अस वाटत असलं तरी तो गतिमान असतो - असं संग्रहालय पाहताना नक्कीच जाणवत.

नव्या शहराची ओळख करून घेताना आणखीही एक घडत असतं. या नव्या शहराला आपण कसे सामोरे जातो – किती पूर्वग्रह, उत्साह, निरागसता, आत्मविश्वास, सहजता, भय, मौज… घेऊन आपण या नव्या परिस्थितीला सामोरे जातो - यातून आपली आपल्याला नव्याने ओळख होण्याची एक मजेदार प्रक्रियाही घडत असते! म्हणजे उदाहरणार्थ सर्व संग्रहालयांत हिंदी आणि इंग्रजी भाषेत माहिती दिलेली असताना मी इंग्रजी भाषेतली माहिती वाचत होते. देवनागरीमुळे हिंदीबाबत जास्त आपुलकी असायला हवी खर तर – पण!! ते लक्षात आल्यावर मी हिंदीतली माहिती वाचायला सुरूवात केली. एखादा शब्द समजला नाही तर इंग्रजीतल्या माहितीफलकाच्या मदतीवरून मी पुढे जात राहिले.

काही खूप जुनी माणसं भेटली – अगदी कॅनडापासून कन्याकुमारीपर्यंतची. दिल्लीत आता कोणी येते तेव्हा मला भेटण्याचा त्यांचा एक अजेंडा असतो याचीही गंमत वाटते. मग गप्पा होतात. फोन येतात, केले जातात. मेल लिहिल्या वाचल्या जातात.
पुन्हा पुन्हा दिल्लीबद्दल बोलले जाते. दिल्लीबाबत लिहिले जाते.

पण माझ्या सवयीप्रमाणे त्यात मीही असतेच. किंबहुना ’मी’ जास्त असते आणि दिल्ली कमी असते.

हेही बदलते की तसेच राहते, ते पाहायला मला आवडेल.

9 comments:

 1. नवीन शहर नव्या व्यक्तीसारखंच सामोरं येतं! आणि व्यक्तीगणिक त्याचे नवे नवे चेहरे दृष्य होतात...
  हे दिल्लीचं वर्णन त्यात तू आहेस म्हणून वाचायला मजा येतेय.... नाहीतर इतिहास भूगोलाच्या पुस्तकातली रुक्ष वर्णनं कमी नसतात!

  ReplyDelete
 2. >>कोणत्या परिस्थितीत या शहरातली माणसे कशी वागतील याचा ढोबळमानाने अंदाज बांधता येणं!
  >>आपणही त्या सामूहिक मानसिकतेचा भाग बनणं म्हणजे त्या शहराने आणि आपण एकमेकांना सामावून घेतल्याची खूण असते.
  हे अचूक वर्णन आहे... मी ह्या तर्‍हेनं कधीच विचार केला नव्हता.
  आणि ते लहान मुलामुलींचं तरूण झाल्यावरचा विचार करणं वाचून एकदम स्वतःही असाच अनुभव घेतल्याचं जाणवलं आणि गंमत वाटली.
  मस्त वाटलं वाचायला, एस्पेशियली मी दिल्ली बघितली नसल्यानं वाचायला मजा येतेय.

  ReplyDelete
 3. अनु, माणसांची मतं आणि दृष्टिकोण तसे महत्त्वाचे असतातच.. नव्या परिस्थितीत ते जास्त प्रकर्षाने जाणवतं.

  ReplyDelete
 4. विद्याधर, दिल्ली अर्थात तुम्ही बघाल तेव्हा तुमच्या नजरेतून पहाल.. .. माझी मतं तेव्हा कदाचित तुम्हाला पटणार नाहीतही!

  ReplyDelete
 5. >> हेही बदलते की तसेच राहते, ते पाहायला मला आवडेल.

  मस्त.. तिसर्‍या कळेल ना ते? कधी येतोय?

  ReplyDelete
 6. तिसर्‍या भागात*

  ReplyDelete
 7. हेरम्ब, बदल इतक्या झटपट होत असता, तर मी आधीच नसते का बदलले?

  ReplyDelete
 8. >> मला तरी माझ्या लहानपणचे काय आठवते? तसे काही कोणाला आठवायला लागले की ’ते म्हातारपणाचे लक्षण आहे’ असे म्हणून मी आजही मोकळी होतेच की!

  का?

  ReplyDelete
 9. का?

  हा चांगला प्रश्न आहे.. त्याच उत्तर लिहिण्यासाठी वेगळी पोस्ट लिहावी लागेल अस दिसतंय!

  ReplyDelete