ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Thursday, April 1, 2021

२५९. टु बर्मा: विथ लव्ह!

 *** (‘महाअनुभवच्या मार्च २०२१ च्या अंकात हा लेख प्रसिद्ध झाला आहे. To Burma: With Love या माझ्या २ फेब्रुवारीच्या मूळ इंग्रजी लेखाचा अनुवाद महाअनुभवने केला आणि त्यात मी काही मुद्द्यांची भर घातली. मूळ इंग्रजी लेख इथं वाचता येईल.) ***

जवळपास ३६ तास उलटून गेले आहेत .. तमदॉने (म्यानमारचं लष्कर) कायदेशीररीत्या निवडून आलेल्या नेत्यांना ताब्यात घेऊन देशावर कब्जा केला आहे. कालचा दिवस माझ्यासाठी फार वाईट होता. म्यानमारच्या लोकांसाठी हे किती अवघड गेलं असेल याची मी कल्पना करू शकते. माझ्या बर्मी मित्रमंडळींना कल्पना आहे, की जगापासून त्यांचा संपर्क कोणत्याही क्षणी तुटू शकतो. असं झालं तर त्यांच्यापर्यंत कसं पोहोचायचं मला माहिती नाही. त्यांना मदत कशी करायची मला माहिती नाही. त्यांना कसा आधार द्यायचा मला माहिती नाही. उद्ध्वस्त झाल्यासारखं वाटतंय. पण बर्माच्या लोकांना पाठिंबा देण्याचाही माझा निश्चय आहे.

मला बर्मामध्ये अडीच-पावणेतीन वर्ष राहण्याची संधी मिळाली. तिथं विविध राजकीय विचारसरणीच्या, लिंग-वंश-वर्गाच्या, वेगवेगळ्या वयांच्या आणि शिक्षणस्तरांतल्या बर्मी नागरिकांशी अनेकदा बोलणं व्हायचं. आमच्या आशादायी, सकारात्मक गप्पांचा शेवट कायम हे सगळं (स्वातंत्र्य, लोकशाही) किती दिवस टिकेल माहिती नाही या वाक्याने व्हायचा. थोडक्यात, आम्हाला सर्वांनाच याचा अंदाज होता, पण तरी ते प्रत्यक्षात घडू नये अशी आम्ही प्रार्थना करायचो.

पण ते घडलंय. पुन्हा एकदा.

बर्मामध्ये येण्यापूर्वी मला या देशाबद्दल जेमतेम माहिती होती, की रंगून ही या देशाची राजधानी आहे (गेल्या एक दशकाहून अधिक काळ नेपिडॉ ही राजधानी आहे.), बर्मा हा ब्रिटिश इंडियाचा एक भाग होता (त्यामुळे इथले वसाहतकालीन अनुभव आपल्यासारखेच आहेत) आणि बर्मामध्ये विपश्यनेची परंपरा जीवित आहे.

जून २०१६ मध्ये मी बर्मात पाय ठेवला तेव्हा इथे नव्या लोकशाही सरकारमुळं ताजंतवानं वारं खेळत होतं. मला हा देश एखाद्या निरागस लहान मुलासारखा भासला. अनेक दशकांचं शोषण आणि दुरावलेपण यातून तो नुकताच जागा होत होता. मात्र, त्याच्या आसपासचं जग तोपर्यंत पुरतं बदलून गेलं होतं. बर्मी लोकांचं कौतुक, की त्यांनी लष्कराच् जुलुमी राजवटीदरम्यान झालेली हानी भरून काढण्याची आशी बाळगत या न्या वास्तवाला तोंड देण्याची जय्यत तयारी केली होती. तेव्हाचं ते अत्यंत आशावादी वातावरण मला आजही आठवतं.

ऑगस्ट २०१७ मध्ये रोहिंज्यांच्या विस्थापनाने जग हादरलं. सू ची यांच्याकडून जगाच्या या वेळी खूप मोठ्या अपेक्षा होत्या. पण त्यांनी (माझ्यासह) अनेकांचा भ्रमनिरास केला. सू ची यांनी रोहिंज्या प्रश्नावर घेतलेल्या भूमिकेमुळे ही आजची परिस्थिती उद्भवली का, असा प्रश्न अनेकांनी मला विचारला आहे. बर्मामध्ये एकूम १३५ लोकसमूह आहेत, त्यांची विभागणी सात मुख्य गटांमध्ये होते. रोहिंज्या हा त्यातला एक गट. १९८२ मध्ये झालेल्या नागरिकत्व कायद्यानुसार रोहिंज्यांना बर्माचं नागरिकत्व नाकारण्यात आलं आहे. रोहिंज्या समूहाचे प्रश्न गुंतागुंतीचे आहेत. त्यांच्या विस्थापनाचा प्रश्न नॅशनल लीग फॉर डेमाक्रसी (एनएलडी) सत्तेवर आल्यावर निर्माण झालेला नाही. संरक्षण, गृह आणि सीमारेषा (डिफेन्स, होम आणि बॉर्डर अफेअर्स) ही तीन महत्त्वाची खाती नेहमीच तमदॉकडं असतील अशी घटनेनुसार तरतूद आहे. त्यामुळे रोहिंज्यांवर जे अत्याचार झाले त्याला सू ची यांची संमती होती असं अजिबात म्हणता येणार नाही. बर्मामधल्या अनेक वांशिक समूहांचा तमदॉशी आजही संघर्ष चालू आहे. तमदॉवर वेळोवेळी एथनिक क्लिन्झिंगचे आरोप झालेले आहेत, पुराव्यानिशी झालेले आहेत.

पण सू ची यांनी त्या वेळी तमदॉविरोधात भूमिका का नाही घेतली? एक म्हणजे तमदॉचे संस्थापक आहेत सू ची यांचे वडील – बोज्यो ऑंग सान. तसंच तमदॉची प्रशासनावर मोठी पकड आहे. अनेक एथनिक गट तमदॉ आणि सू ची या दोघांच्याही विरोधात आहेत. वेळ आलीच तर अन्य एथनिक गट एनएलडीच्या बाजूने उभे राहतील याची त्यांना खात्री नसावी. २०१७ मध्ये सू ची यांनी तमदॉच्या विरोधात भूमिका घेतली असती तर १ फेब्रुवारी २०२१ ला जे झालं तेच २०१७ मध्ये होण्याची शक्यता होती. तमदॉला थेट विरोध न करता २००८ च्या घटनेत दुरूस्ती घडवून आणण्यासाठी एनएलडी प्रयत्नशील होती असं दिसतं. लोकशाहीचा प्रयोग नवा होता. त्यात लगेच अडथळा नको, थोडा संयम दाखवत वाट चालायला हवी अशी त्यांची भूमिका असावी. दुर्दैवाने त्यांची ही रणनीती अयशस्वी ठरली इतकंच. (सू ची यांनी रोहिंज्या प्रश्नावर घेतलेली भूमिका दुर्दैवी होती आणि तिचं कुठल्याही प्रकारे मी समर्थन करू इच्छित नाही. परंतु अनेकवाद आदर्शवाद प्राप्त परिस्थितीत व्यवहारात आणता येत नाही – ही मला आवडत नसली तरी एक वस्तुस्थिती आहेच.)

बर्मातील अनेक नागरिकांनाही रोहिंज्या समस्येवर सू ची यांनी घेतलेली भूमिका पटला नव्हती, पण त्या भूमिकेच्या अपरिहार्यतेची त्यांना जाणीव होती असंच २०२० च्या निवडणूक निकालांवरून दिसून येतं. २०२० च्या राष्ट्रीय निवडणुकीत सू ची यांच्या एनएलडी पक्षाला ८३ टक्के जागा मिळाल्या (२०१५ मध्ये त्या ७९ टक्के होत्या). युनियन सॉलिडॅरिटी ऍन्ड डेवलपमेंट पार्टी (युएसडीपी) हा तमदॉच्या माजी अधिकाऱ्यांनी स्थापन केलेला राजकीय पक्ष आहे. २०१० मध्ये निवडणूक लढवण्यासाठी या पक्षाची स्थापना झाली. युएसडीपीला २०२० च्या निवडणुकीत अवघ्या ६.९ टक्के जागा मिळाल्या . युएसडीपीचे फक्त ३३ उमेदवार निवडून आले. (२०१५ मध्ये त्यांचे ४१ उमेदवार निवडून आले होते.) यावेळचा मुख्य फरक असा, की युएसडीपीचे अनेक माजी मंत्री, वरिष्ठ उमेदवार, पक्षाचे पूर्वाध्यक्ष आणि दोन विद्यमान उपाध्यक्ष – या सर्वांचा पराभव झाला. युएसडीपीच्या एकूण मतांमध्येही लक्षणीय घट झाली. खरं तर त्यामुळे तमदॉला काही फरक पडायला नको. कारण २००८ च्या घटनेनुसार संसदेच्या दोन्ही सभागृहांत प्रत्येकी २५ टक्के जागा तमदॉसाठी राखीव आहेत. मात्र, निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा तमदॉचा दावा अमेरिकेतल्या ताज्या निवडणुकांबाबतच्या ट्रम्पच्या दाव्याइतकाच कपोलकल्पित आहे. एक बातमी अशी आहे, की सिनियर जनरल मिन ऑंग लाय यांना राष्ट्राध्यक्ष होण्याची मनीषा आहे. निवडून आलेल्या संसदेचं चित्र पाहता त्यांची इच्छा पूर्ण होण्याची शक्यता कमी असल्याने त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असावं. (या बातमीची सत्यता तपासून पाहणं अवघड आहे.)

असे सगळे मुद्दे लक्षात घेतले, तरी सू ची यांना अटक झाल्याबद्दल जल्लोष करणाऱ्या सोशल मीडियावरच्या काही पोस्ट्स व्यथित करणाऱ्या आहेत. एखादा राजकीय नेता/पक्ष तुमच्या अपेक्षा पूर्ण करत नाही असं वाटलं तर त्याला (तिला) दूर करण्याचा एक लोकशाही मार्ग असतो, तो म्हणजे दुसऱ्या पक्षाला मत देणं. एनएलडी आणि द लेडी (सू ची यांना बरेच जण या नावाने ओळखतात) यांच्या पतनाबद्दल जल्लोष करणाऱ्यांना तमदॉची ताकद अजून लक्षात आलेली नाही. लक्षात घ्या, ताकद हा शब्द मी कौतुकाने वापरलेला नाही. जगातल्या कुणावरही या लष्करासारख्या राजवटीला तोंड देण्याची वेळ येऊ नये. माझ्या बर्मी सहकाऱ्यांकडून मी तमदॉच्या अत्याचारांच्या अनेक कहाण्या ऐकल्या आहेत. या विषयावरची अनेक पुस्तकं मी वाचली आहेत. त्याचबरोबर बिग ब्रदर इज वॉचिंग यू या गोष्टीचा मी वैयक्तिक अनुभवसुदधा घेतलेला आहे.

मी एकदा रंगूनमधल्या एका एन.जी.ओ.च्या कार्यालयात गेले होते. (इथे जाणीवपूर्वक नामोल्लेख टाळला आहे.) त्या इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ एक छोटं दुकान होतं. मी शोधत असलेल्या पत्त्याची खात्री करून घेण्यासाठी मी दुकानातल्या माणसाकडं चौकशी केली त्याने पत्ता बरोबर असल्याचं सांगितलं; मी कोण आहे, तिथं कशासाठी आले आहे हेदेखील विचारलं. मी तेव्हा त्या देशात नवीन होते, त्यामुळे मला त्या सहज गप्पा असाव्यात असं वाटलं आणि मी त्याला माहिती दिली. मी त्या कार्यालयात शिरले, तर तिथले कर्मचारी अस्वस्थ झालेले दिसले. मी चौकशी केली, तर त्या दुकानदाराला मी भेटले का, हे त्यांना जाणून घ्यायचं होतं. मला गंमत वाटली. त्या गोष्टीत अस्वस्थ होण्यासारखं काय होतं? नंतर त्यांनी मला सांगितलं, की तमदॉची माणसं अशी वेषांतर करून फिरतात आणि लोकांवर लक्ष ठेवतात. हे कधी, तर २०१६ साली, जेव्हा एनएलडी नुकतीच सत्तेत आली होती.

बर्मामध्ये मी ज्या एनजीओसोबत काम करत होते त्यांनी एकदा त्यांच्या आगामी उपक्रमांसदर्भातली माहिती देण्यासाठी प्रसारमाध्यमांतल्या काहीजणांना आमंत्रित केलं होतं. ते उपक्रम स्त्रिया आणि मुलींसोबत होणाऱ्या हिंसेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठीचे होते. मीटिंग सुरू झाली, तेवढ्यात तिथं साध्या वेषातली दोन माणसं आली आणि पत्रकार परिषदेसाठी तुम्ही संबंधितांकडून पूर्वपरवानगी का घेतली नाही, असं विचारायला लागली. आम्ही चक्रावलो, कारण ती काही पत्रकार परिषद नव्हती. मी तिथं जमलेल्या पत्रकारांकडं पाहिलं आणि लक्षात आलं की त्यांच्यातले काहीजण व्हिडिओ कॅमेरे घेऊन आले होते. पण त्या दोन माणसांना या पत्रकारांबद्दल कसं समजलं? म्हणजे कुणीतरी आमच्यावर लक्ष ठेवून होतं आणि संबंधित अधिकाऱ्यांना खबर पोचवली होती. त्या दोघांनी अखेरपर्यंत त्यांची ओळख सांगितली नाही, मीटिंग अटेड्न्सवर सही करायला नकार दिला. मीटिंगमध्ये बोलला गेलेला शब्द न शब्द त्यांनी लक्षपूर्वक ऐकला. २०१७ मधली ही गोष्ट.

२०१८ मध्ये मी राजधानी नेपिडॉमध्ये कामाला सुरूवात केली. त्या शहरात राहण्यासाठी (हॉटेलमध्ये नव्हे, एखाद्या घरात, दीर्घकाळासाठी) संबंधित इमिग्रेशन ऑफिसरकडून आम्हाला परवानगी घ्यावी लागली होती. कागदपत्रांवर सह्या करताना त्या ऑफिसरने मला सांगितलं, की शहरातून बाहेर जायचं असेल तेव्हा त्याला तसं आधी कळवावं लागेल. तो अधेमध्ये कधीही फोन करून मी कुठं आहे वगैरे तपासण्या करायचा. तसा तो चांगला होता, त्याला नेमून दिलेलं काम करत होता तो. एकदा माझी एक मीटिंग लांबली आणि मला धावतपळत रंगूनची बस पकडावी लागली. त्यामुळे मी त्या ऑफिसरला रंगूनला जात असल्याचं कळवलं नाही. बस जेमतेम नेपिडॉमधून बाहेर पडत होती, इतक्यात माझा फोन वाजला. पलीकडून तो ऑफिसर बोलत होता. मी रंगूनला जात असल्याचं त्याला कळवलं नाही म्हणून तो माझ्यावर प्रचंड चिडला होता. पुन्हा, मी त्या बसने निघाले होते हे त्याला कसं कळलं? कुणी कळवलं? मी त्याची क्षमा मागितली आणि आश्वासन दिलं, की पुन्हा अशी चूक होणार नाही. मी पुन्हा कधीही ती चूक केली नाही.

असे अनेक अनुभव आहेत.

परदेशी व्यक्तींवर नजर ठेवणं मी समजू शकते. आपल्या नागरिकांचं रक्षण करणं हे प्रत्येक सरकारचं कर्तव्यच असतं. त्यासाठी ते माझ्यावर लक्ष ठेवणार असतील तर ठेवोत, त्याला माझी हरकत नाही. ते मला आवडलं नाही तर मी कधीही माझ्या देशात परत जाऊ शकते. पण विचार करा, की माझ्या स्वत:च्याच देशात माझ्यावर असं लक्ष ठेवलं जात असेल तर कसं वाटेल? याला स्वातंत्र्य म्हणत नाहीत. तमद़ॉने किती परोकोटीची संविधानिक सत्ता स्वत:च्या हातात घेतली आहे आणि त्यात बदल करणं किती अवघड आहे हे जगभरातल्या लोकांनी लक्षात घेणं आवश्यक आहे.

बर्मामध्ये अनेकजण असे आहेत की जे सू ची आणि एनएलडीवर टीका करतात, पण त्यांतला प्रत्येकजण मनातल्या मनात हे जाणून आहे, की सू ची आणि तमदॉ असे दोनच पर्याय असतील तर ते केव्हाही सू ची यांचीच निवड करतील. द लेडी परिपूर्ण नाही. आपल्यापैकी प्रत्येकाच्या हातून चुका होतात. चुकांमधून शिकून पुढं जात राहणं हे माणूसपणाचं महत्त्वाचं लक्षण आहे.

बर्माकडून मी अनेक गोष्टी शिकले. त्यातल्या उल्लेखनीय म्हणजे दया आणि क्षमा. सिग्नलवर टॅक्सीचालकांकडं कुणी पैशाची मदत मागितली तर ते नेहमी देतात. ते कधीही स्वत:च्या गरिबीबदद्ल तक्रार करत नाहीत किंवा पैसे मागणाऱ्यांचा अपमानही करत नाहीत. देण्यासाठी ते खास सुट्टे पैसे जवळ ठेवतात. पहाटे चार वाजता, सिग्नल हिरवा असतानाही भिक्खू रस्ता ओलांडत असतील तर वाहनं शांतपणे थांबतात. मी एकदा एका चाळिशीतल्या राजकीय आंदोलकाशी बोलत होते. त्यांनी वीस वर्ष तुरूंगात काढली होती. मी त्यांना विचारलं, "मानवी हक्क उल्लंघनाबद्दल तुम्ही लष्कराला कोर्टात का खेचत नाही?" ते शांतपणे म्हणाले, मी माझं कर्तव्य केलं. सुदैवाने आता परिस्थिती सुधारते आहे. आता समेट घडून येत असताना सूड घेण्याने काही फायदा होईल असं वाटतं तुम्हाला? खरं तर सूडाने कधीच फायदा होत नसतो. माझ्या बाबतीत अन्याय घडला असता तर मी इतकी उदार मनाने विचार करू शकले असते का, शंका आहे.

बर्माने मला क्षमा, दया यांचं मोल ओळखायला शिकवलं; दुसऱ्यांसाठी नव्हे, तर स्वत:साठी. त्यांचे पगोडा, पठण, दया, मैत्री, स्मित, खळाळून हसणं, बर्मी खाद्यपदार्थ आणि भाषेसोबतचे प्रयोग, बर्मी लुंगी .... बर्मामधल्या वास्तव्याने माझ्या व्यक्त्तिमत्त्वात बदल घडवला – चांगला बदल – असं म्हणावसं वाटतं.

बर्मातलं वास्तव्य ही मला मुक्त करणारी प्रक्रिया होती. जगण्याची म्हणून एक वेदना असते, अहंकारातून अनेक व्यथा निर्माण होत असतात... त्याच्यापासून बर्माने मला मोकळीक मिळवून दिली. सामाजिक कार्यकर्त्यांना अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागतं. ते करत असताना बर्माने आंतरिक शांतीची कवाडं माझ्यासाठी खुली केली. बर्माबद्दल माझ्या मनात कायमच एक खास स्थान असेल.

बर्मा हा अर्थातच स्वर्ग नाही; सरसकट सगळ्यांसाठी तर नाहीच नाही. तमदॉच्या अत्याचारांशिवायही इथली माणसं इतर अनेक समस्यांशी झुंजत आहेत. त्यातल्या काही नैसर्गिक तर काही समाजनिर्मित आहेत. बर्माला आणखी बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. बर्माच्या लोकांकडं मोठी स्वप्नं बघण्याची आणि ती पुरी करण्यासाठी झटण्याची मोठी क्षमता आहे. ते शांतताप्रेमी आणि आनंदात राहणारे लोक आहेत. त्यांच्या क्षमतांनुसार अपेक्षित जीवन जगण्यासाठी त्यांना हवं आहे ते फक्त स्वातंत्र्य.

तमदॉने त्यांच्याकडून त्यांचं हे स्वातंत्र्य हिरावून घेतलं आहे. तमदॉच्या अत्याचारांकडं दुर्लक्ष करत त्यांचा उदो उदो करणाऱ्या प्रत्येकाकडं याची जबाबदारी जाते. तमदॉने सत्ता हाती घेण्याचं नेमकं काय कारण असेल यासंबंधी सध्या तरी आपण फक्त अंदाज बांधू शकतो. काळच याचं उत्तर देईल. पण दरम्यान लोकांची आयुष्यं पणाला लागली आहेत. बर्माला आपल्या पाठिंब्याची गरज आहे.

टु बर्मा: विथ लव्ह!

8 comments:

 1. मराठीत पण अनुवाद झआला आणि तो प्रसिदधही झआला हे बरीक छान झआलं

  ReplyDelete
 2. बर्माच्या राजकीय, सामाजिक परिस्थिती बद्दलचे बारकावे खूप सुंदर रित्या उकलले आहेत.बर्माच देणं..दया,क्षमा,स्वीकार, विपश्यना... बर्माबद्दल वाटणारी आस्था खूप संयमित,नेमक्या शब्दांत व्यक्त केली आहे.
  इतका सुंदर लेख लिहून आपल्या या शेजारी राष्ट्राविषयी अतिशय संवेदनशीलतेने माहिती देणारा हा लेख उत्कृष्ट उतरला आहे.

  ReplyDelete
 3. सुंदर आहे लेख. इतकी माहिती नव्हती बर्मा बद्दल.
  एकंदर किती भीषण परिस्थिती आहे ह्याची कल्पना येते.
  आपल्या कडे असे होईल की काय अशी एक भीतीदायक शंका देखील मनात येऊन गेली लेख वाचताना.

  ReplyDelete
 4. छान आहे लेख, मावशी

  ReplyDelete
 5. सगळं पुन्हा अनेक वर्ष मागं गेलं आहे. निरपराध लोकांना सरळ मारून टाकतात ...!!
  तू लिहिलंस ते चांगलं झालं!

  ReplyDelete
 6. छान लेख आहे. बर्मा बद्दल अगदीच जुजबी माहिती आहे मला.

  ReplyDelete
 7. सविताताई,

  राखीन प्रांतातल्या रोहिंज्यांनी ब्रह्मदेशापासून फुटून वेगळं इस्लामिक राज्य स्थापायचा प्रयत्न केला होता हे खरं आहे का? तसं असल्यास त्यांना हुसकावून लावणं साहजिक प्रतिक्रिया असल्याचं म्हणता येईल. मात्र ते समर्थनीय खचितंच नाही.

  रोहिंज्यांना हुसकावून लावलं तर सगळं जग हादरलं. पण काश्मिरी हिंदूंना कापून, त्यांच्या बायकामुलांवर बलात्कार करून, त्यांना नेसत्या कपड्यानिशी देशोधडीस लावलं तेव्हा काप परिस्थिती होती ? जग सोडा, भारतात देखील कुणालाही काहीही वाटलं. नाही. साधा तोंडदेख्ला निषेधही नाही. नेमक्या याच कारणासाठी भारतात हिंदुराष्ट्र पाहिजे आहे.

  तुमचे विविध अनुभव वाचनीय आहेत. त्यांच्यातनं बऱ्याच गोष्टी कळतात व शिकायला मिळतात. सदर अनुदिनी परत जोमाने चालू करावी ही विनंती.

  आपला नम्र,
  -गामा पैलवान

  ReplyDelete
 8. Very very important information sir thanks for sharing such a great informationmahiti in Marathi

  ReplyDelete