ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Monday, April 11, 2011

६९. ‘जंतर मंतर’लेल्या संध्याकाळी

‘इंडिया गेट’ पासून आम्ही ‘जंतर मंतर’ ला परत येत आहोत. आयोजकांनी ‘घोषणा नको’ अशी सूचना दिली आहे. म्हणजे मौन नाही; पण घोषणाही नाहीत. मला आयोजकांच्या शहाणपणाच कौतुक वाटत. लोक दमले आहेत हे त्यांनी बरोबर ओळखलय. आधी जंतर मंतरपासून इंडिया गेटकडे जाताना आम्ही असंख्य घोषणा दिल्या आहेत. आज मिरवणुकीत मेणबत्त्या नाहीत; त्याऐवजी थाळी आणि चमचा आहे. त्यांच्या आवाजाने, लोकांच्या आवाजाने सरकार जागे व्हावे अशी आंदोलनाची अपेक्षा आहे.

गेला पाऊण तास आम्ही सगळे विश्रांती न घेता सलग ‘वंदे मातरम’ म्हणत आहोत. ‘इन्किलाब झिंदाबाद’ आणि ‘भारत माता की जय’ या आणखी दोन लोकप्रिय घोषणा आहेत. आणखी एक घोषणा म्हणताना सगळ्यांच्या चेह-यावर हसू दिसतंय – ती घोषणा आहे “सोनिया जिसकी मम्मी है, वर सरकार निकम्मी है” ! फक्त तरुण वर्गच नाही तर मध्यम वयाचे स्त्री पुरुषही मोठया संख्यने मिरवणुकीत सामील झाले आहेत.


पण आता घोषणा बंद असल्याने लोक आपापसात बोलत आहेत. मी एकटीच चालते आहे. माझ्यासोबत कोणी दुसरे नसल्याने मी कोणाशी बोलायचा प्रश्न नाही. त्यामुळे मला इतरांचे आपापसातले संभाषण ऐकू येतय – माझ्या बाजूला, पुढे, मागे – सगळीकडे लोकांचे छोटे गट गप्पा मारताहेत. हे बोलणे ‘कॅमे-या’ समोर असते तसे नाही. मी त्यांचे बोलणे ऐकतेय हे त्यांना माहितीही नाही.

कॉलेज विदयार्थ्यांचा एक गट आहे. एक मुलगा म्हणतो, “ मी पहिल्यांदाच अशा निषेध मोर्चात सामील झालोय. नेहमी फक्त टीव्हीवर आणि यु ट्युबवर पाहिल होत! आज मला फार ग्रेट वाटतय!”
त्यावर गटातल कोणीतरी हसलं असणार. कारण हा पहिला आवाज विचारता झाला, “हसताय का तुम्ही? मी काही विनोदी बोललो नाही.”
मग त्याचा मित्र म्हणाला, “अरे, तू निषेध मोर्चाच बोललास. मला तर आठवतय तसं मी आयुष्यात पहिल्यांदाच रस्त्यावर इतका वेळ चालतोय. मला फार बर वाटतय. असे खूप लोक असतील की ज्यांना रोज नाईलाजाने चालाव लागत असेल. त्यांच जगण कस असेल याची मी कल्पना करतोय!”

आणखी एक गट आहे मुला-मुलींचा.
एक मुलगा म्हणतो, “तुम्हाला माहिती आहे का, या म्हाता-या माणसाला घर, कुटुंब वगैरे काही नाही.”
“म्हणजे काय म्हणायचं आहे तुला?’ एका मुलीचा प्रश्न.
“आपण सगळे त्यांच्या घरातलेच आहोत,” आणखी एकजण भावूकतेने म्हणतोय.
“अरे ऐक तर यार! मला अस म्हणायच्य की त्यांना काही मुलगा, मुलगी, नातवंड, जमीन, इस्टेट नाही. ते स्वत:साठी हा संघर्ष करत नाहीत. ते लढताहेत आपल्यासाठी – आपल् जगण भल व्हावं म्हणून!”
“वा! याहून चांगल आजवर तू काही बोलला नव्हतास” त्याचे सहकारी त्याला शाबासकी देतात.

आणखी एक गट.
एक मुलगी म्हणते, “वर्ल्ड कप सेलेब्रशन बेस्ट होत, पण आज आपण जे काही करतोय ते बेस्टेस्ट आहे!”
‘का?” तिच्या मित्र मैत्रिणीना कुतुहल आहे.
“कारण क्रिकेट खेळतात ते सचिन, युवी, एम एस, झाक, भज्जी वगैरे – आपण नुसतेच ओरडतो त्यांच्या विजयानंतर. आपला त्यात वाटा शून्य असतो. पण इथे मात्र आपण राष्ट्राच्या एका कामात प्रत्यक्ष सहभागी होतोय,” ती स्पष्टीकरण देते.
“ उपोषणाला बसलेले ते ३०० लोक खरे सहभागी आहेत, आपण काय नुसते चालतोय” गटातला कोणीतरी जमिनीवर पाय असणारा त्यांना आठवण करून देतो.
“ते तर आहेच – ते ३०० लोक खरे हिरो आहेत यात वादच नाही. पण आपणही खारीचा वाटा उचलतो आहोत ना! माझ्या आयुष्यातला हा अगदी अविस्मरणीय प्रसंग आहे,” कोणीतरी म्हणते आणि त्यावर सगळे सहमत होतात – अगदी तो जमिनीवर पाय असणारासुद्धा!
आणखी एक गट.
“आपण १३च्या जेल भरोत सामील होऊया.” एक मुलगी सुचवते.
“पण त्यांनी आपल्याला खरच जेलमध्ये टाकल तर? पोलिस मारहाण तर करणार नाहीत आपल्याला? आणि कॉलेजने काढून टाकल तर?” दुसरी मुलगी नुसत्या विचारांनीही घाबरली आहे.
“काय काळजी करतेस एवढी? पोलिस मारणार वगैरे नाहीत काही. हजारो लोक येतील तुरुंगात जायला – तेवढी जागा कुठे आहे तुरुंगात?” एक मुलगा तिला समजावतो.
दुसरा मुलगा आपल्या गटाला प्रोत्साहित् करतो. तो म्हणतो, “आपण भगतसिंग आणि इतर स्वातंत्र्य योद्ध्यांबद्दल वाचले आहे. त्यांनी आपल्यासाठी बलिदान केले. ही आपली वेळ आहे, हा आपला क्षण आहे, ही आपली जबाबदारी आहे. आता या वेळी पळ काढून चालणार नाही.”
“हो, आपण यात सहभागी होऊ” ते सगळे एकमुखाने म्हणतात.

एक मध्यम वयीन स्त्री एकटीच चालताना दिसते. मी तिच्याशी बोलायला जाते. तरुणाईच्या प्रतिसादांनी – त्यांच्या संख्यने आणि त्यांच्या उत्साहाने ती भारावली आहे. ती माझ्याशी सविस्तर बोलते. “इथल वातावरण फारच चांगल आहे. दिल्लीची गर्दी स्त्रियांशी बहुधा नेहमीच वाईट वागते. पण इथे मात्र मुलींची आणि स्त्रियांची काळजी घेताहेत. एखाद्याचा चुकून धक्का लागला तर तो लगेच मनापासून माफी मागतो. चांगले काम, चांगले वातावरण लोकांमध्ये कसा बदल घडवते याचे हे एक उदाहरण आहे.”

मी त्या स्त्रीशी पूर्ण सहमत आहे. तुम्हाला माहिती आहेच की जंतर मंतर येथे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे त्यांच्या सहका-यासह ‘जन लोकपाल बिलाच्या’ मागणीकरता आमरण उपोषण करत आहेत (होते). मी येथे अनोळखी लोकांच्या गर्दीत आहे, संध्याकाळचे काही तास आहे. रात्रीचे दहा वाजले तरी असुरक्षित वाटत नाही. एक चांगले वातावरण आहे भोवती – आपण सगळे एक आहोत असा दिलासा देणारे. ही दिल्ली माझ्या आजवरच्या अनुभवापेक्षा अगदीच वेगळी आहे.

******
अण्णा हजारे; लोकपाल आणि जन लोकपाल; सामाजिक संस्थांची आणि संसदेची भूमिका, जंतर मंतरचा पडद्यामागचा गट, सरकारला कसा अंदाजच आला नाही; सगळ्या स्तरातल्या लोकांचा उत्स्फूर्त सहभाग; गांधीजींचा सत्याग्रहाचा मार्ग; लोकांचा राजकीय नेतृत्वावरचा उडालेला विश्वास; या आंदोलनाची रणनीति, मीडियाचा वापर, लोकशाही प्रक्रियांचे संस्थात्मिकीकरण – अशा अनेक मुद्द्यावर बरेच काही लिहिले गेले आहे आणि आणखीही बरेच लिहिले जाईल.

चर्चा आणि वाद आता नुकताच सुरु झाला आहे.
*****
या छान वाटणा-या चित्राची दुसरीही एक बाजू आहे. ती मी सांगितली नाही तर तुम्हाला मी अर्धसत्य सांगितल्यासारख होईल.

लोक मोठया संख्येने जंतर मंतरला येतात. कशासाठी? तर उपोषणाला बसलेल्या लोकाना पाठिंबा देण्यासाठी. आणि ते – सगळे नाही तरी बरेचसे – काय करतात?

थोडया घोषणा देऊन झाल्या, फोटो काढून झाले (मुख्यत्वे स्वत:चेच) की समोरच्या खाद्य पदार्थांच्या गाड्यांकडे ते मोर्चा वळवतात. उपोषणाला बसलेल्या लोकांसमोर ते निर्लज्जपणे खात असतात. उपोषणाला बसलेल्या लोकांना पाठिंबा देताना काही तासदेखील ते आपल्या भुकेवर नियंत्रण राखू शकत नाहीत. त्यांच्या पाठिंब्यांचा नेमका अर्थ काय असतो?

कचरापेटी भरून वाहते आहे. उपोषणकर्त्यांच्या भोवतालचे वातावरण अस्वच्छ होते आहे पण त्याची कोणाला फिकीर नाही, त्यामुळे उपोषणकर्ते आजारी पडण्याचा धोका वाढतो – पण त्याकडे कोणाचे लक्ष नाही. स्वयंसेवक बहुधा रात्री सगळा भाग साफ करतात. ते त्यांचे काम आहे का?

जवळजवळ प्रत्येकाकडे कॅमेरा आहे. ते ठीक आहे. पण बहुतेक सगळे स्वत;चेच फोटो काढण्यात मग्न आहेत. कॅमेरा आणायला बंदी केली तर इतके लोक येतील का?

घोषणा देणे ही देशभक्तीचे एकमेव प्रतिक बनले आहे. अण्णा हजारे पत्रकारांशी बोलत असतानादेखील या घोषणाबाजानां शांत बसवत नाही. संयोजक सूचना देतात की, एका उपोषणकर्त्याची प्रकृती बिघडली आहे – त्याला वैद्यकीय उपचारासाठी नेण्यासाठी वाट दया. त्यावर एक तरुण ‘भारत माता की ..” ओरडतो. मी त्याच्या खांद्यावर थाप मारून त्याला सूचना नेमकी काय होती ते सांगते. तो खजील होते, माफी मागतो आणि निघून जातो. घोषणा देता येत नसतील तर त्याला तिथे थांबण्यात रस नाही.

एक गट ‘मनमोहन सिंग भारत छोडो’ अशी घोषणा देतो आहे. मनमोहनसिंगसुद्धा त्यांच्याइतकेच भारतीय आहेत ही वस्तुस्थिती त्यांच्या गावीही नाही. ‘भ्रष्टाचा-यांना गोळी मारा’ अशी घोषणा ऐकून आमच्यापैकी काहीजण ‘हिंसात्मक भाषा नको वापरायला. हे आंदोलन अहिंसेच्या तत्त्वावर उभारले आहे’ असे सांगतात तेव्हा तो गट आमच्यापासून दूर जातो.

काही युवक रस्त्यावर पाण्याच्या रिकाम्या बाटल्या फेकतात तेव्हा त्याना कचराकुन्डीचा वापर करण्याची आठवण करून द्यावी लागते.

एक पत्रकार अण्णांना ‘तुम्ही सरकारला वेठीस धरले आहे’ असे म्हणते. आता त्या बाईना common sense कमी होता हे उघडच आहे. असा निराधार आरोप, पूर्ण आत्मविश्वासाने, हजारो समर्थकांसमोर करताना त्यांनी जरा विचार करायला हवा होता. जमलेल्या गर्दीने आरडाओरडा करत त्या बाईना बोलूच दिल नाही. अण्णांनी तिच्या प्रश्नच उत्तर दिल हा भाग वेगळा. पण गर्दीचे वागणे अजिबात समर्थनीय नव्हते. पत्रकार काही देव नव्हेत आणि त्यांनी तारतम्य राखावे हे खरे. पण दुस-यांचे काही ऐकून घ्यायचे नाही अशी मानसिकता आपल्या भविष्यात कुठे नेणार याची चिंता वाटलीच.
*****
लोकांच्या उत्स्फूर्त सहभागाबद्दल माझ्या मनात अनेक शंका आहेत.

हा आणखी एका प्रकारचा mass hysteria तर नाही? ‘सचिन, सचिन’ ऐवजी देश आता ‘अण्णा हजारे, अण्णा हजारे’ अस ओरडत नाही ना? अण्णांना देवत्व बहाल करण्याची मानसिकता अंगावर शहारे आणणारी आहे. आणि त्यांना खाली खेचून मूर्तिभंजन करायलाही आम्हाला वेळ लागणार नाही. त्यांच्या लढ्याचा मुद्दा लोकांनी फार उथळपणे समजून घेतला आहे अस दिसत. म्हणजे अनेकांना ‘जन लोकपाल’ आलं की जादूने एका रात्रीत सगळ काही बदलून जाईल अशी अपेक्षा आहे – जे वास्तवापासून फार अंतरावर आहे. आणि आम्ही फक्त घोषणा देऊ, त्या म्हाता-या माणसाने लढावे अशीच आमची अपेक्षा आहे. अनेकांना ही एक वेगळी करमणूक, वेगळी excitement आणि चर्चेला वेगळा विषय इतकाच या घटनेचा अर्थ!

India Against Corruptionचळवळीत सामील व्हायचं? एक missed call दया, किंवा फेसबुक किंवा Twitter वर एक क्लिक करा. जंतर मंतर किंवा अशा एखाद्या ठिकाणी तुम्ही मोर्चात सामील होऊ शकलात तर उत्तम. मी हे सगळ केल आणि त्यातला फोलपणा मला जाणवला. किती सहजपणे तुम्ही ऐतिहासिक घटनेत सामील होऊ शकता! पण माझा अनुभव सांगतो की एखाद्या विचाराला, एखाद्या चळवळीला सामील व्हायचं ही इतकी सोपी गोष्ट नाही. तो एक अवघड मार्ग आहे. त्यासाठी बरच काही सोडाव लागत, बरच काही नव शिकावं लागत, समाजाला बदलण्याआधी स्वत:ला बदलाव लागत! जीवनमूल्य न बदलता माणस कस काय एका नवीन विचारधारेत सामील होऊ शकतात?

ही लढाई ‘खरी’ होईल तेव्हा इतके समर्थक असतील का? हा उत्साह टिकेल का? एकी टिकेल का? आताच विरोधाचे स्वर तीव्र होऊ लागले आहेत. पोलिस सावध होते पण त्यांनी बळ वापरल नाही. उदया शासनाने ही चळवळ बळाचा वापर करून मोडायची ठरवलं तर (सुदैवाने तसं आता घडल नाही) – तर समाजाला, समर्थकांना अहिंसक मार्गाने चालण्याची प्रेरणा नेतृत्त्व देऊ शकेल का? गोष्टी सोप्या न राहता अवघड झाल्या तर काय? खरच त्याग करावा लागला तर काय?

काळच याच उत्तर देईल.
****

जी गर्दी कालपर्यंत ‘वन डे मातरम’ गात होती ती अचानक ‘वंदे मातरम’ गाताना पाहून बर वाटलं. अभिमान वाटला. उत्साह वाटला.

जे वाईट क्षण आहेत त्याना क्षणभरासाठी विसरल, त्यांच्याकडे दुर्लक्ष केल तर मला असे शेकडो, हजारो प्रेरणादायी क्षण आठवतात. कॅमेरा नसताना लोक जे बोलले, जे वागले, त्यातून समाजाच्या शक्तीच, निश्चयाच, साहसाच, निष्ठेच एक वेगळ दर्शन मला झालं. हे नाव नसलेले, चेहरा नसलेले अनामिक नागरिक होते – पण त्यांच्यात एक अनोखी शक्ती आहे याचा मला प्रत्यय आला. आज आम्हाला गरज आहे विश्वासार्ह, प्रामाणिक आणि सृजनात्मक नेतृत्त्वाची. ते मिळेल का?

आमचा बदललेला दृष्टिकोन टिकेल का? आमच्या निष्ठा आमच्या नवा उत्साह जागवतील का? कर्तव्य आणि जबाबदारीचे आमचे भान टिकेल का? संवेदनशीलता टिकेल का?

मी आंधळी अपेक्षा ठेवत नाही बदलाची. पण जंतर मंतरवरच्या त्या संध्याकाळच्या अनुभवानी माझ्यातला आशावाद वाढवला आहे. ‘India Shining’ वर माझा कधीच विश्वास नव्हता पण ‘भारत पुन्हा एकदा जागा होतो आहे’ अस मात्र मला नक्की वाटलं. जंतर मंतरने मला तो एक विश्वास दिला आहे.
**
प्रसिद्धी: साप्ताहिक विवेक, २४ एप्रिल २०११

10 comments:

 1. दुसरी बाजू दाखवल्याबद्दल आभारी आहे. उत्साहाच्या भरात सामील होणारे तरूण खरोखरचे समर्थक ठरु शकतात का हा प्रश्न असला तरी त्यांचा सहभाग ही एक सकारात्मक गोष्टच मानावी लागेल. उत्तम लेख्न.

  ReplyDelete
 2. atishay uttam,
  chalval ubharne, ti chalvine, aani mukhya mhanje aaj kal sagle hause, nause, ani gause tyat samil honyach prayatna kartat.
  karach ase kiti jan aahe je atmiyatene tyat bhag gheun shevat paryant sahbhagi rahtat? ha prashnach aahe.....

  ReplyDelete
 3. I deliberately write this in English, for I know PC-savvys know English.
  Corruption – intellectual / monetary / moral / dogmatic / power / profit / adulteration – name anything – has now become National Dharma. Hence we want Leader/s – not Autonomy that is, in other words, Responsibility!
  Anna Hajare rightly said he has two point agenda, 1- Abolish corruption and 2- Decentralization of Power.
  But who will be ready for Decentralization of Power?
  “Leadership” is new name for old wine called Feudal Master of yesteryear in a new bottle named Democracy, promoted by Power-mongers and Profit-hungry all over the world!!

  ReplyDelete
 4. मला खूप बरं वाटलं हा लेख वाचून. मीही हेच बिंदू मनात ठेऊन व्यंगात्मक लेख लिहिला आहे माझ्या ब्लॉगवर. समविचारी भेटल्याचा आनंद आहे. :-)
  http://vikramwalawalkar.blogspot.com/2011/04/blog-post.html

  ReplyDelete
 5. प्रचंड आवडला लेख.. दुसरी बाजू संयतपणे मांडण्याची पद्धत तर विलक्षण !!

  ReplyDelete
 6. साधकजी, शेवटी प्रत्येकच गोष्टीला दोन्ही बाजू असतातच .. त्या लक्षात घेऊनच आपल्याला पुढे जावे लागते. प्रतिसादाबद्दल आभार.

  नितीनजी, हौशे, नवशे .. अशांना निष्ठावंत पाईक बनवण्यातच तर नेतृत्त्वाचा खरा कस असतो. लोकांनी मुद्दा नीट समजावून घेतला आणि ते सहभागी झाले तर पुष्कळ गोष्टी बदलतील. प्रतिसादाबद्दल आभार.

  रेमीजी, चांगला नेता आम्हाला लागतो कारण मग त्याच्या/तिच्या खांद्यावर सगळे ओझे टाकून आम्हाला निवांत बसता येते! आपली लोकशाही अजून लोकांनी जबाबदारी घेण्याइतकी प्रगल्भ झालेली नाही हे खरेच आहे!

  विक्रमजी, आभार. तुमच्या ब्लॉगची लिंक मला अजून एका ब्लॉगर मित्राने पाठवली होती .. आभार तुमचेही.

  हेरंब, दुसरी बाजू ब-याचदा आपल्याला 'न आवडणारी' असते म्हणून ती जास्त संयतपणाने मांडावी लागते :-)

  ReplyDelete
 7. nuktach ha lekh vivek madhe vachanyat aala.social networking warachi comment wachali.hi madhyame prabhavi tharu shakat nahit ya baddal mi sahamat nahi.nukatach thanyat galichh panipuri walyacha prakar ugahdakis aala...tya aadhi to video facebook war firat hota.hajaro lokani baghitala aani tyapramane pune-mumbait pratikriya umatalya.ya madhyamatun ekach weli olakhichya-anolakhi lokanparynat pohochata yete.konatihi bhiti n balagata lok ithe aapale vichar mandtat.bhavishyat he madhyamch prabahvi tharel yachi mala khatri aahe!!

  swapna-pune

  ReplyDelete
 8. स्वप्नाजी, तुम्ही आवर्जून इथे प्रतिसाद नोंदवलात त्याबद्दल आभार. सोशल नेटवर्किंग साईट्स अगदीच निरुपयोगी आहेत अस मला म्हणायचं नाही. नुसत क्लिक करून आपण एखाद्या सामाजिक आंदोलनात सहभागी होण्याची सुरुवात करू शकतो - पण तितकच पुरेस नाही. आंदोलनात सामील व्हायचं तर त्याहून अधिक कृतिशील व्हाव लागत इतकच मला म्हणायचं होत. मी स्वत: सोशलं नेटवर्किंग साईट्स वापरते आणि त्या मला उपयुक्तही वाटतात!

  ReplyDelete
 9. दुसरी बाजू खरच अंतर्मुख करतेय...या लिखाणाबद्दल आभारी....मी फारच दुरून हे आंदोलन पाहतेय आणि इतके संभ्रम आहेत की....

  ReplyDelete
 10. संभ्रम आपल्या सगळ्यांचेच अजून काही काळ तरी टिकतील अस चित्र दिसतंय आता सप्टेंबरमध्ये!

  ReplyDelete