ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Saturday, August 17, 2024

२७१. शोध ... पुस्तकाचा

तसं पाहायला गेलं तर हे लेखन त्या एका कादंबरीबद्दल आहेही आणि नाहीही.

हे लेखन त्या एका कादंबरीबद्दल नाही, कारण पुस्तक परिचय करून देण्याचा या लेखाचा उद्देश नाही.

हे लेखन त्या कादंबरीबद्दल आहे, कारण.... सांगते.

खरं म्हणजे हे लेखन त्या कादंबरीबद्दल कमी आणि माझ्याबद्दलच जास्त आहे.

नेहमीप्रमाणेच 😉

*****

१९९३-९४ या काळातली ही गोष्ट. इतकी जुनी, आणि बारकावे धूसर झालेली, की हे वर्षही कदाचित मला चुकीचं आठवत असावं. तर मुद्दा इतकाच की गोष्ट भलतीच जुनीपुराणी आहे.

माझी एक मैत्रीण तेव्हा इलाहाबादला काम करत होती. इलाहाबाद न म्हणता प्रयागराज म्हणायचं असं त्या काळात आग्रहाने सांगण्याइतपत तिच्याभोवतीचं वातावरण होतं. ती एका संघटनेचं पूर्ण वेळ काम करत होती. मी त्या संघटनेत साडेसहा वर्ष पूर्ण वेळ काम करून दोन-तीन वर्षांपूर्वी बाहेर पडले होते. पण माझ्या जुन्या संघटनेतल्या स्थानिक सहकाऱ्यांमध्ये आणि माझ्यामध्ये कसलीही कटुता नव्हती. किंवा असलीच तर ती मला कळण्याइतपत मी शहाणी नव्हते असंही म्हणता येईल.

ही मैत्रीण, तिचं नाव मीना (आमचा आता काहीही संपर्क नसल्याने नाव अर्थातच बदललं आहे). ती आग्रहाने मला प्रयागराजला बोलवत होती. माझं तेव्हा असंच काहीबाही चालू होतं. स्पष्ट दिशा वगैरे असण्याचं आणि माझं कधीच तितकंस जमलं नाही. त्यामुळे नवं काही खेळणं दिसलं की तिकडं डोकावून बघायचं असा प्रवास त्या काळात चालू होता. (आजही काही वेगळं घडतंय अशातला भाग नाही म्हणा!)

तर गेले प्रयागराजला. मीना तिच्या कामात व्यस्त होती. सभोवताली कार्यकर्त्यांचा कोंडाळं असायचं. सगळे उत्साही होते. तरूण होते. त्यातल्या काहींना संघटनेच्या कामानिमित्त मी आधी भेटलेले होते. काहींना माझ्याबद्दल ऐकून माहिती होतं. त्यामुळे मीना मोकळी नसेल तेव्हा त्यातले कुणी ना कुणी माझ्यासोबत असायचे. मला इकडंतिकडं घेऊन जायचे, गप्पा मारायचे, खाऊ घालायचे, भेटवस्तू द्यायचे.

एकदा मात्र कुणीच माझ्यासाठी वेळ द्यायला मोकळं नव्हतं. त्यांचा एक महत्त्वाचा कार्यक्रम ठरत होता आणि अर्धा दिवस ते बैठकीत असणार होते. मला मीनाच्या टेबलावर एक पुस्तक दिसलं. मी म्हणलं, तुमची बैठक निवांत होऊ द्या. तोवर मी हे पुस्तक वाचत बसते. मग ते निश्चिंतपणे त्यांच्या कामाला लागले.

तोवर मी बहुधा कधीच हिंदी पुस्तक वाचलं नव्हतं. त्यामुळे सुरूवातीला मी थोडी अडखळले. पण त्या कादंबरीने मला गुंतवून टाकलं. ओघवती भाषा, आगळावेगळा विषय, प्रपंच आणि आध्यात्मिकतेची त्यात घातलेली सांगड ... दिल खुष हुआ... मजा आली. तीन-साडेतीन तास कसे गेले ते कळलंही नाही. एकदम दुसऱ्या जगात गेल्यासारखं वाटतं होतं. मी आठवणीने पुस्तकाचं आणि लेखकाचं नाव एका कागदावर लिहून तो कागद व्यवस्थित माझ्या सॅकमध्ये ठेवला. आपलं जेव्हा कधी घर होईल तेव्हा हे पुस्तक आपल्या संग्रहात नक्की असायला हवं असंही मनाने ठरवलं. हा विचार कादंबरीच्या संदेशाच्या एक प्रकारे विरोधाभासी असल्याने मला हसूही आलं.

पुढचे काही दिवस गडबडीत गेले. यथावकाश मी मुंबईला परतले. (तेव्हा मी मुंबईत रहात होते.) पुढं मुंबईतून बाहेर पडले. दुसऱ्या शहरात स्थिरावले. लातूरच्या भूकंपग्रस्त भागात वर्षभर स्वयंसेवी काम केलं. मग चार वर्ष आणखी एका संस्थेचं पूर्ण वेळ काम केलं. महाराष्ट्राच्या विविध भागात कामानिमित्त खूप फिरले. या सगळ्या घडामोडीत अधुनमधून त्या कादंबरीची आठवण यायची. पण सॅकमध्ये व्यवस्थित ठेवलेला कागद गायब झाला होता. मला कादंबरीतली काही पात्रं आठवत होती, काही संवाद आठवत होते, काही घटना आठवत होत्या. पण कादंबरीचं नाव आणि लेखकाचं नाव – दोन्हीही आठवत नव्हतं. स्मरणशक्तीला ताण देऊनही आठवत नव्हतं. मीना भेटली तेव्हा तिला मी त्याबद्द्ल विचारलं, पण असं काही पुस्तक तिच्या टेबलावर होतं हेच तिला आठवत नव्हतं. त्यामुळे पुढचं काही विचारायचा प्रश्नच राहिला नाही.

इलाहाबाद भेटीला दहा वर्ष होत आली तेव्हा योगायोगाने मी परत एकदा त्या शहरात नियमितपणे जायला लागले होते. स्वयंसेवी पूर्ण वेळ काम थांबवून मी आता एका सामाजिक संस्थेत पगारी काम करायला लागले होते. प्रत्येक इलाहाबाद भेटीत त्या कादंबरीची हमखास आठवण यायला लागली. माझ्या नव्या सहकाऱ्यांना मी या कादंबरीबद्दल काही विचारायचं म्हटलं, तर मला विचारता येईल ते इतकं त्रोटक होतं की कदाचित त्यातला कुणी पट्टीचा वाचणारा असता-असती तरी त्यांना ते कदाचित कळलं नसतं. शिवाय माझ्याभोवती वाचनाची आवड असणारे फारसे लोक नव्हते. जे मोजके होते, त्यांना हिंदी वाचायची आवड नव्हती. आपसूक इंग्रजी वाचन वाढत गेलं.

जसंजसं आयुष्य स्थिरावत गेलं तसंतसं त्या कादंबरीचं नाव आठवायचा प्रयत्न  नकळत होऊ लागला. दरम्यान आंतरजालाशी चांगली ओळख झाली होती. पण शोध घेताना कीवर्ड्स काय द्यायचे ते कळत नव्हतं. लेखकाचं नाव मला आठवत नव्हतं. पुस्तकातले काही निवडक शब्द आठवत होते ते असे – ऋषिकुमार, राजकुमारी, बैलगाडी, प्राण, ब्रह्म, याज्ञवल्क्य, तात्विक चर्चा .......मला देवनागरी टायपिंग जेमतेम येत होतं. रिकामा वेळ मिळाला की यातलं काही शोधायचा प्रयत्न करायचे मी, पण यश मिळत नव्हतं. योग्य कीवर्ड्स द्यायला मला फारसं काही आठवत नव्हतं.

मग मी प्रसिद्ध हिंदी लेखकांची यादी शोधली. पण त्यातलं एकही नाव मला त्या कादंबरीसंदर्भात आठवेना. मग सुरू झाली एक अस्वस्थता, अंधारातला आणखी एक शोध. आवडलेलं पुस्तक असूनही त्याबद्दल काही आठवत नाही म्हणून होणारी चिडचीड. त्याबद्दल योग्य माहिती देणारं (हिंदी वाचक) आपल्या संपर्कात कुणी नाही म्हणून येणारा वैताग. वीस वर्षांपूर्वी पुस्तकाचं आणि लेखकाचं नाव लिहिलेला कागद हरवला म्हणून स्वत:चा येणारा राग. जाऊ दे मरू दे. आपल्याला आठवत नाही म्हणजे ते तितकं महत्त्वाचं नव्हतंच पुस्तक आपल्यासाठीअशी स्वत:ची समजूत घालण्याचे वारंवार येणारे प्रसंग आणि त्यानंतर दाटून येणारी अगतिकता. बाहेर अनंत घडामोडी चालू होत्या. कामातून वेळ मिळत नव्हता ...पण मनातल्या मनात त्या पुस्तकाचं नाव आठवण्याची धडपड सातत्याने चालू होती.

दरम्यान २०१० मध्ये मी दिल्लीत राहायला गेले. त्या काळात हिंदी पुस्तकं वाचण्यावर मी लक्ष केंद्रित केलं. खूप हिंदी पुस्तकं खरेदी केली, ती सगळी वाचायला अनेक वर्ष लागली तो भाग वेगळा. कथासरित्सागर, संत कवियों के प्रमुख दोहे, प्रेमचंद यांचं मानसरोवर, श्रीकांत, इस्मत चुगताई यांचं टेढी लकीर, श्रीलाल शुक्ल यांचं राग दरबारी .... अशी बरीच पुस्तकं विकत घेतली. पण मला हवी  होती ती कादंबरी काही त्यात मिळाली नाही.

यथावकाश दिल्ली सुटलं. दुसऱ्या देशांत राहताना उरला तो फक्त किंडलचा आधार. आणि इतर (इंग्रजी सोडून इतर) परकीय भाषांची मुळाक्षरं गिरवण्याचा उद्योग. त्या भाषांमधलं काही वाचण्याचा मोडकातोडका प्रयत्न.

*****

हिंदी लेखकांचा शोध चालू असताना २०२१ मध्ये राजकमल पेपरबॅक्स यांच्याकडून काही हिंदी पुस्तकं मागवली. त्यात एक होतं हजारीप्रसाद द्विवेदी यांचं पुनर्नवा’. हजारीप्रसाद यांच्या पुस्तकांचा शोध घेताना त्यात अनामदास का पोथा हे नाव आढळलं आणि काहीतरी ओळखीचं वाटलं. आंतरजालावर शोधलं तर हे मुखपृष्ठ दिसलं, 



आणि हीच ती आपण गेली तीस वर्ष आठवण्याचा प्रयत्न करत असलेली कादंबरी असं जाणवलं.

पण राजकमलकडं ते पुस्तक उपलब्ध नव्हतं. बहुधा त्याची आवृत्ती संपली होती.

डिसेंबर २०२३ मध्ये पुण्यातल्या पुस्तक प्रदर्शनात राजकमलच्या स्टॉलवर गेले. काशी का अस्सीहे काशीनाथ सिंह यांचं पुस्तक घ्यायचं ठरवून गेले होते. आणि अचानक अनामदास का पोथा दिसलं. ते लगेच विकत घेतलं हे वेगळं सांगायला नकोच.

तर असं हे तीस वर्षांनी पुन्हा भेटलेलं पुस्तक.

कायनात (कहते हैं किसी चीज़ को पूरी शिद्दत से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है.....) वगैरे काही नसतं, आपल्याला प्रयत्न करावे लागतात .. हेही एक सत्य उमगलं या प्रवासात.

जणू काही भूतकाळातल्या मला मी पुन्हा एकदा भेटले. त्यावेळच्या मला ही कादंबरी जशी भावली होती, तशी आज पुन्हा भावेल का?  तेव्हा जे कळलं असं वाटलं होतं, ते आज पुन्हा कळेल का? की नवे काही शोध लागतील – कादंबरीबद्दल, स्वत:बद्दलही?

पुस्तक मिळाल्यावर जाणवली ती एक अपार स्वस्थता. आपल्याला मौल्यवान वाटणारं काहीतरी आपल्या हातातून (आणि स्मरणातूनही) निसटंलय ... या जाणीवेतून येणाऱ्या अस्वस्थतेतून मुक्ती. एक शांतता. बाहेरचा कोलाहल पूर्ण बंद करण्याची एक ताकद. आता शोधायचं काही नाहीये .... अशी एक भावना. मुक्काम गाठलाय, आता काही करायची गरज नाहीये असं समाधान.

कादंबरीतल्या संदेशाशी या भावना अजिबात मिळत्याजुळत्या नाहीत असं आत्ता वाटतंय. पुन्हा कादंबरी वाचेन तेव्हा याबाबत अधिक स्पष्टता येईल.

हे पुस्तक वाचण्यासाठी उघडायला नंतर काही कारणांनी सहा महिने गेले.

सध्या वाचते आहे, म्हणून हे इतकं सारं आठवलं.

*****

हजारीप्रसाद (१९०७ ते १९७९) हे हिंदीतले एक प्रसिद्ध लेखक आहेत. त्यांनी अनेक वर्ष शांतिनिकेतनमध्ये  शिकवलं आणि त्याचा प्रभाव त्यांच्या लेखनातही दिसतो.

छांदोग्य उपनिषदात उल्लेख असलेल्या रैक्व ऋषिची कथा या कादंबरीत आहे.

लहानपणी आईवडिलांचं छत्र गमावलेला रैक्व ध्यान आणि तप करत असतो, प्राण हेच ब्रह्म आहे या निष्कर्षाप्रत तो आलेला असतो. एका वादळी पावसात त्याची भेट जानश्रुति राजाची मुलगी जाबाला हिच्याशी होते. रैक्व याने पाहिलेली ही पहिली स्त्री असते. त्यातून पुढं फुलते ती एक प्रेमकथा आहे आणि सत्याच्या शोधाचीही कथा आहे.

कादंबरीतल्या सगळ्याच व्यक्तिरेखा विलक्षण आहेत. बरंच काही लिहिता येईल त्यासंबंधी. पण सुरूवातीला म्हटलं त्याप्रमाणे पुस्तक परिचय हा उद्देश नाही.

कादंबरीसंबंधी अधिक इथं जाणून घेता येईल.  

Monday, June 17, 2024

२७०. बावळटपणा? की .....?

 (नोंद: मूळ पोस्ट फेसबुकवर प्रकााशित केली होती. तिचा जीव तेवढाच आहे खरं तर. नोंद रहावी म्हणून इथंही प्रकाशित करते आहे.)

१९८४मध्ये पहिल्यांदा मुंबईत राहायला गेले तेव्हा अनेकांनी (त्यात मुंबईत जन्मलेले-वाढलेले-बरीच वर्ष राहिलेले लोकही होते) सांगितलं की, 'मुंबई शहरात सगळे लोक आपापल्या गडबडीत असतात, इतरांकडं पाहायला त्यांना वेळ नसतो.' थोडक्यात काय तर माणुसकी, संवाद वगैरेची अपेक्षा करू नकोस.
पहिल्या दिवशी लोकलच्या गर्दीत अनेकींनी 'कुठं उतरणार' असं मला विचारलं, डब्यातल्या इतर अनेक स्त्रियांनाही विचारलं. तेव्हा मी मुंबईतल्या माणुसकीच्या दर्शनाने भारावून गेले होते. काही दिवसांनी कळलं की 'बसण्याची जागा पक्की होतेय का आणि कोणत्या स्थानकात' हे तपासून पाहण्यासाठी हा प्रश्न असतो. अगदी व्यावहारिक, त्यात भावना वगैरे काही नसते.
(मुंबईतल्या माणुसकीचे, संवादाचेही पुष्कळ सारे अनुभव यथावकाश मिळाले, तो विषय वेगळा आहे.)
मोडलेल्या हातासाठी फिजिओथेरपीचे उपचार करून घेण्यासाठी गेले दीड महिना एका प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये जातेय. तिथं रांगेत उभं राहून, आपला रजिस्टर्ड नंबर सांगून, कोणत्या डॉक्टरांकडं जायचंय ते सांगितलं की पास मिळतो. तो दाखवल्यावरच आत प्रवेश मिळतो.
तर पास देणाऱ्या ताईंनी 'एकट्याच आहात का?' असं विचारलं तेव्हा इथल्या लोकांमध्ये माणुसकी आहे, रूग्णांची फार काळजी घेतात हे लोक - असं वाटून मी खूष झाले होते.
इथंही दोन दिवसांनी कळलं की 'एकट्याच आहात का?' या प्रश्नाचा अर्थ 'तुम्हाला एक पास हवा आहे की दोन हवे आहेत' असा एवढाच असतो.
वर्ष कितीही उलटली तरी माझा बावळटपणा काही कमी होत नाहीये हेच खरं ....😉

किंवा निरागसता कायम ठेवण्यात मी यशस्वी झालेय असंही म्हणता येईल 🤣


Sunday, February 4, 2024

२६९. गृहितक? अनुभव?

उंच स्टुलावर चढून घरातले पंखे, माळे... पूर्वी मी अनेक वर्ष साफ केले आहेत. पण आता ते काम करता येईल असं वाटेनासं झालं. मग "अर्बन कंपनी"च्या ऍपवर घराच्या सफाईसाठी पैसे भरले.

कंपनीचा तरूण मुलगा आला. वेळेच्या अर्धा तास आधीच आला. तो काय काम करणार ते मला सांगून कामाला लागला. मुलगा मराठी, हिंदी, इंग्रजी आणि तेलगु (त्याचं कुटुंब मूळचं हैद्राबादचं) अस्खलितपणे बोलत होता. (त्याच्या फोनवरच्या बोलण्यात या भाषा कानावर पडल्या.)
त्याचं काम सुरू झाल्यावर मी बाहेरच्या खोलीत वाचत बसले. एकदोनदा वाटलं की तो मला काहीतरी विचारतोय. पण तो अखंड फोनवर बोलत होता.
काम संपवून निघताना "पाच स्टार रेटिंग द्या" असा त्याने आग्रह केला. त्याने काम चांगलं केलं होतं, त्यामुळे मी त्याला लगेच पाच स्टार दिलेही.
निघताना मला म्हणाला, "तुम्हाला राग येणार नसेल तर एक सांगा. तुम्ही काय काम करता?" मी सध्याच्या कामाबद्दल त्याला थोडक्यात सांगितलं. त्यावर तो म्हणाला, "तुम्ही या वयात पुस्तक वाचत बसला होता ते पाहून मला वाटलंच की तुम्ही असं काहीतरी काम करत असणार!"
'या वयात'चा अर्थ 'तुमचं वय झालंय' असा अभिप्रेत असेल, तर तो वस्तुस्थितीला धरूनच आहे. 😀
पण पुस्तकं वाचायचंही 'वय' असतं? असो.
मी वाचत असलेलं "शूद्र मूळचे कोण होते?" हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं पुस्तक मी त्याला उत्साहाने दाखवलं.


पुस्तकाबद्दल तीन-चार वाक्यांत सांगितलंही. त्यावर पठ्ठ्या म्हणाला,"तुम्ही वरच्या जातीतल्या असून (माझ्या आडनावावरून जात कळतेच!) बाबासाहेबांचं पुस्तक वाचताय हे विशेष आहे."
मला त्यावर काय प्रतिक्रिया द्यायची ते कळलं नाही.

डॉ. आंबेडकर यांची पुस्तकं अमूक एका सामाजिक गटातलेच लोक वाचतात - हे त्याचं गृहितक आहे? का अनुभव?

Friday, January 12, 2024

२६८. कातरवेळी ...

झोपेतून जागी झाले आणि क्षणभर ही सकाळ आहे की संध्याकाळ आहे या संभ्रमात पडले. कधी कधी तर मैं कहा हूं असं फिल्मी थाटात स्वत:ला विचारण्याची वेळ येते. हल्ली प्रवास कमी झालाय, त्यामुळे तो फिल्मी संभ्रमदेखील कमी झालाय. पण ते असो. सांगत होते ते कातरवेळी जाग आल्यावर येणाऱ्या अनुभवाबाबत. आपल्यापैकी अनेकांना असा अनुभव येत असणार याची मला कल्पना आहे. त्यामुळे काळजी न वाटता हसू येईल याचीही कल्पना आहे. 😊

संध्याकाळी झोपणं अशुभ आहे असं काही लोक मानतात. शुभ-अशुभावर माझा विश्वास नसला तरी संध्याकाळी झोपले, तर उठते तेव्हा प्रत्येकवेळी मला उदास, खिन्न वाटतं हा अनुभव आहे. त्यामुळे कितीही दमले तरी संध्याकाळी पाचनंतर (किमान रात्री दहापर्यंत तरी) झोपायचं मी टाळते. पण त्यादिवशी खूप दमणूक झाली होती, बरेच दिवस वर्क फ्रॉम होममुळे झोप पुरेशी झाली नव्हती. त्यामुळे कितीही अनुभव गाठीशी असला तरी त्यादिवशी मी संध्याकाळी पाच वाजता झोपलेच.

पाऊण तासाने उठले. गजर लावला होता, नाहीतर मी थेट दुसऱ्या दिवशी सकाळीच उठले असते. तर मग अपेक्षेप्रमाणे अतिशय उदास वाटायला लागलं. काही सुचेना. काही हालचाल करावी वाटेना. अगदी परत झोपावं असंही वाटेना. म्हटलं चला, कुणालातरी फोन करू. फोनवर गप्पा मारून बरं वाटेल. कुणाला बरं फोन करावा असा विचार करायला लागले.

तसे माझ्या संपर्कयादीत (म्हणजे कॉन्टक्ट लिस्टमध्ये) चारेकशे लोक आहेत. त्यातले काही नंबर विविध सेवांच्या कस्टमर केअरचे आहेत, म्हणजे ते अशा अनौपचारिक संवादासाठी बाद. काही अन्य सेवांचे आहेत – जसे की फार्मसी, इलेक्ट्रिशियन, प्लंबर, वाहन दुरूस्ती वगैरे. त्यांचाही उपयोग नाही. काही नंबर कामाच्या ठिकाणचे आहेत. माझ्या कामाच्या ठिकाणचे लोक दुसऱ्या देशांत आहेत, त्यामुळे सहज म्हणून फोन होत नाहीत. वेळ ठरवून ते करावे लागतात. त्यांच्याशी होणाऱ्या अनौपचारिक संवादातही मुख्य भर फोनऐवजी चॅटिंगवर असतो. काही नंबर मी पूर्वी ज्या लोकांसोबत काम केलं, त्यांचे आहेत. ते कधीतरी कामासाठी अजूनही फोन करतात, त्यामुळे ते अद्याप काढून टाकलेले नाहीत. फक्त फॉरवर्ड पाठवणाऱ्या लोकांचे (आणि अनेक व्हॉट्सऍप गटांचे) नंबर archive करण्याची युक्ती मला अलिकडेच समजली आहे. त्यामुळे माझी अजिबात चौकशी न करता फक्त स्वत:चे लेख, फोटो, वर्तमानपत्रांची कात्रणं वगैरे पाठवणारे सध्या तिकडं आहेत. या लोकांचे आणि माझे काही कॉमन ग्रुप्स असल्याने यांना यादीतून काढून टाकणं जरा अवघड असतं.

काही नंबर अशा लोकांचे आहेत, की जे मरण पावले आहेत. आता तो नंबर ठेवण्यात काहीही अर्थ नाहीये, हे माहिती असूनही त्यांचे नंबर मात्र काढून टाकावेसे वाटले नाहीत, तसा विचारसुद्धा कधी केला नाही. पण या लोकांना काही फोन करता येत नाही.

काही लोकांशी वर्षानुवर्ष काहीही संवाद नाहीये. १ जानेवारीला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि दिवाळीला लक्ष लक्ष दिव्यांची…” छापाचे फॉरवर्डेड मेसेजेस ते मला पाठवतात, यापल्याड आमच्यात काहीही संवाद नाही. काही लोक मला फक्त व्हॉट्सऍप फॉरवर्ड पाठवतात, व्यक्तिगत संवाद साधण्यात त्यांना काही रस नसतो. मग बहुतेक अशा वेळी मी त्यातले दोन-चार नंबर डिलीट करून टाकते. तो या कातरवेळच्या उदासीनतेचा एक फायदा.

या गाळणीतून काही ठरलेली नावं मागे राहतात. हे लोक अनेक वर्ष माझ्या संपर्कात आहेत ही जमेची बाजू. यातल्या सर्वांची वर्ष दोन वर्षांतून एकदा तरी निवांत भेट होते, गप्पागोष्टी होतात. त्यांच्या घरी माझं जाणं आहे. मी फार कमी लोकांना घरी बोलावते, मात्र हे लोक कधीही माझ्या घरी येऊ शकतात, येतातही. त्यांच्या घरातली माणसं मला ओळखतात. मला काही अडचण आली तर यातले अनेक लोक धावत येतात, मदत करतात. वेळी-अवेळी, पूर्वनियोजित नसलेला फोन करण्यासाठी खरं तर एवढं पुरेसं आहे.

पण त्यातल्या कुणालाही मी लगेच फोन करायला तयार होत नाही. काहीजण काही मिनिटांनंतर त्यांच्या आध्यात्मिक गुरूविषयी बोलायला लागतात. हे मला ओळखतात का खरंच -असा प्रश्न पडावा इतकं ते अध्यात्मिक बोलतात. यातले काहीजण फक्त तक्रार करतात. कुणाबद्दल तक्रार हे महत्त्वाचं नाही, फक्त तक्रार करतात. मला या तक्रारखोर लोकांबाबत नेहमी एक प्रश्न पडतो. ज्या लोकांबाबत हे तक्रार करताहेत, त्यांच्याशी तर यांचे चांगले संबंध आहेत, ते एकंदर एकमेकांच्या सहवासात सुखी दिसतात. मग माझ्याकडेच तक्रार का? आणि दुसरं म्हणजे मी फोन केलाय. तरीही माझी जुजबी चौकशी करून मग हे लगेच आपल्या तक्रारीच्या विषयाकडं वळतात. सुखाच्या काही गोष्टी सांगायला यांना जमतच नाही. मी फक्त उदास वाटल्यावर नाही, तर चांगलं घडल्यावरही या लोकांना फोन करत असे. हल्ली मात्र मी टाळते.

काहीजणांना फक्त गॉसिप करण्यात आणि नकारात्मक बातम्या पसरवण्यात रस असतो – तेही नको वाटतं. क्ष या व्यक्तीचं माझ्याबद्दल किंवा माझं क्ष या व्यक्तीबद्दल काहीही मत असलं तरी त्याने माझ्या किंवा क्षच्या जगण्यात काय फरक पडतो? काहीच नाही. मग असू द्यावं ज्यांचं मत त्यांच्यापाशी. काहीजण लगेच खूप काळजी करत भरमसाठ सल्ले द्यायला लागतात. कुणी जेवणाखाणाचा उपदेश करायला लागतं. प्रत्येकाची तऱ्हा वेगळी. एरवी मी त्या प्रत्येकाच्या वैशिष्ट्याचा, वेगळेपणाचा आनंद घेते. त्यांच्या व्यक्तिमत्वासकट ते माझे मैत्रीण-मित्र असतात, त्यांनी माझ्यासाठी खूप काही केलं आहे याबद्दल मी कृतज्ञही असते. पण यावेळी मात्र फोन करायला नको वाटतं.

काहीजण त्यांच्या व्यापात खोलवर बुडालेले आहेत हे माहिती असतं. मग त्यांना असा अवेळी फोन केला जात नाही. काहीजण ऑफिसच्या कामात किंवा परतीच्या प्रवासात असतील म्हणून फोन करायला नको वाटतो.

असं मी एकेक नाव पहात जाते. पुढं जाते. फोन कुणालाच करत नाही. आपल्या उदासीनतेला काही कारण नाही, ती आपोआप नाहीशी होईल हे मला माहिती आहे. बोलण्यासारखं आपल्याकडं काही नाहीये हेही मला कळतं. आणि या क्षणी कुणाचं काही ऐकत बसण्याइतका उत्साह मला नाहीये, हेही मला माहिती आहे. खरं सांगायचं तर त्या निरर्थक, पोकळ वाटणाऱ्या त्या क्षणांमध्ये एक अद्भूत असं काहीतरी असतं. त्याच्या मोहात मी त्या क्षणी असते, त्यामुळे माणसांची सोबत नकोशी वाटते.

शेवटचा नंबर नजरेखालून गेल्यावर मी स्वत:शीच हसते. उरतो तो फक्त आपलाच नंबर. आपणच आपल्याशी संवाद साधणं, राखणं महत्त्वाचं असतं याची आठवण करून देणारा तो आपलाच नंबर.

मग O Mister Tambourine manलावते.

किंवा हृदयसूत्र ऐकते.

किंवा मग आमि शुनेछि शेदिन तुमि हे बंगाली गीत ऐकते.

उन्हाळ्याचे दिवस असतील तर कपाटातली दुर्बिण काढते. गॅलरीतून दिसणारे पक्षी पाहते. पावसाळा असेल तर पाऊस पहात बसते.

कुठल्यातरी पुस्तकातलं एखादं वाक्य आठवून संग्रहातलं ते पुस्तक शोधते. एखादी कविता, गाणं गुणगुणत बसते.

डोळे मिटून निवांत श्वासाकडे बघत बसते. झोपाळ्याच्या हालचालीसोबत वाजणाऱ्या छोट्या घंटेच्या किणकिणाटाच्या नादाने स्तब्ध होऊन जाते.

मग कधीतरी विनाकारण आलेली खिन्नता विनासायास निघून जाते.

रिकामपणाचा तो एक क्षण मात्र सोबत राहतो. बाहेर कितीही गर्दी असली तरी तो क्षण सोबत राहतो. तो वेदनादायी वगैरे अजिबात नसतो, फक्त वेगळा असतो. क्वचित कातडी सोलून काढणारा असतो आणि तरीही वेदनादायी नसतो. अधुनमधून असा क्षण अनुभवता येणं ही एक चैनच आहे एका अर्थी. ती वाट्याला येईल तेव्हा मी ती करून घेते.

मग कुणाचातरी फोन येतो. गप्पा सुरू होतात.

आत्ताच मला हे असं वाटतं होतं - वगैरे इतकं सगळं काही मी त्या मैत्रिणीला-मित्राला सांगत बसत नाही. आपल्याला फोन आला की आपण ऐकायचं हे सूत्र उभयपक्षी लाभदायक असतं हे मला अनुभवाने माहिती आहे.

मी कन्याकुमारी स्थानकातून पहाटे पाच वाजता सुटणाऱ्या रेल्वेने प्रवासाला निघाले आहे असं स्वप्नं मला अनेक वर्ष पडायचं. कन्याकुमारी कायमचं सोडण्याचा तो क्षण मी स्वप्नांमध्ये अनंत वेळा पुन्हापुन्हा अनुभवला होता. एकदा कधीतरी मी त्याबद्दल लिहिलं आणि मग मला कधीच ते स्वप्न पडलं नाही.

मला आत्ता भीती वाटतेय की रिकामपणाच्या, निरर्थकतेच्या अनुभवाबद्दल मी लिहिते आहे, तर कदाचित ते क्षण मला परत कधाही अनुभवता येणार नाहीत. लिहिणं हे भूतकाळाचं ओझं कमी करण्याचा माझ्यासाठी तरी एक रामबाण उपाय आहे.

बघू, आगे आगे क्या होता हैं 😊