ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Saturday, July 31, 2010

३७. सांत्वन

मला पुष्कळ गोष्टी करायला आवडत नाहीत! काही करायचं म्हणजे झडझडून करावं लागतं - त्यापेक्षा न करणं सोपं, म्हणून नाही म्हणत मी! उलट कित्येक वेळा एखादी गोष्ट न करण्यातून खूप चर्चा अंगावर ओढवून घेतली जाते! लोकांच्या विरोधात जायचं धाडस नसतं म्हणून काही वेळा नावडत्या गोष्टी कराव्या लागतात!

त्यादिवशी तसच झालं! धावत पळत वासंतीकडे पोचले. तशी वेळ सहाची ठरलेली होती; पण ठरलेल्या वेळी कोणीच येत नाही हे माहिती असल्याने हातातलं काम उरकत बसले, तर थेट साडेसहाच वाजले! कधी नव्हे ते सगळयाजणी वेळेवर जमल्या होत्या. माझीच वाट पाहत होत्या. "कळलं का तुला, देशमुख बाईंचा नवरा गेला!" सुमन गंभीरपणे म्हणाली.

एक तर मला आडनाव वापरायची फारशी सवय नाही. त्यामुळे देशमुख बाई म्हणजे नेमक्या कोण, याबद्दल मी चाचपडत होते. मरणा-याशी आपल्या असणा-या नात्यावर मरणाच्या बातमीचा आघात अवलंबून असतो, हे मला अनुभवाने माहिती आहे. म्हणून देशमुख बाईंची मी जरा नीट चौकशी केली.

मग लक्षात आलं, की त्या आमच्या संस्थेच्या सभासद. दोन तीन वर्षांपासून कधी कधी कार्यक्रमांना येतात. सतरंजी उचलणं, सभागृह झाडून काढणं, सामानाची आवराआवरी करणं अशा कामांत मदतही करतात. बाई तशा साध्या, सरळ. फारशा कुणाच्या अध्यात-मध्यात नसणा-या. काहीशा अबोल, लाजाळू. देशमुख बाई आता मला नीटच आठवल्या. त्यांच्या नव-याला मी कधी पाहिलं नव्हतं. पण मला त्याच्या मरणाच वाईट वाटलं. देशमुख बाईंचा चेहरा आठवून जरा जास्तच वाईट वाटलं.

दु:खाचा प्रसंग आला की जरा निवांत बसून विचार करावासा वाटतो मला. विशेषत: मृत्युची बातमी म्हणजे स्वत:च्या आयुष्याकडे वळून पाहण्याचा प्रसंग! आपल्या तरी जगण्याला काही अर्थ आहे का, असा विचार मनात येतोच अशा वेळी!

माझ्या मैत्रिणी देशमुख बाईच्या सांत्वनाला निघाल्या होत्या. आजच. कारण पुढच्या आठवडयात कोणाच्या मुलांची परीक्षा होती, कुणी सहलीला जाणार होतं, कुणाच्या घरी मंगळागौर होती, वगैरे! त्यांना विरोध करण्यात अर्थ नव्हता. त्या आजच जाणार होत्या. त्यांच ’सांत्वन’ मी यापूर्वीही पाहिलेलं असल्याने त्यांच्याबरोबर जाण्यात काही राम नव्हता. पण सांत्वनाला न जाणं म्हणजे क्रूरपणा असा माझ्या मैत्रिणींचा समज! माझी भावनाशून्यता, असंवेदनशीलता याबद्दल बरच काही ऐकून घेतल्यावर मी त्या वाचाळ समुहापुढे शरणागती पत्करली.

देशमुख बाईंच्या घराचं दार उघडच होतं. दारात चपलांचा ढीग होता. शेजा-यांच्या घरात समंजस शांतता होती. माणसं एकमेकांत कुजबुजत होती. बायाबापडया हलकेच डोळे पुसत होत्या. माणसांच्या गराडयात देशमुख बाई हरवल्यासारख्या बसल्या होत्या. त्यांच्या चेह-यावरचे भाव मला वाचता येत नव्हते. प्रत्येक माणूस त्यांना ’धीराने घेण्याचा’ उपदेश करत होता. त्यांच्या विशी पंचविशीतल्या मुलाला आणि मुलीला अनेक सल्ले मिळत होते. कुणी सूचकपणे तर कुणी उघडपणे आर्थिक व्यवहारांची, स्थितीची चौकशी करत होते. आणखी लोक आले, की आधीची मंडळी काढता पाय घेत होती.

देशमुख बाई बेचाळीस पंचेचाळीसच्या असतील. शाळेत असताना हुशार होत्या. पण लवकर लग्न झालं आणि शिक्षण थांबलं. का कोण जाणे, पण बाईंच्या वाटयाला नव-याकडून कायम हिडिसफिडिसच आली. शहरात राहायला आल्यावर बाईंचा एकटेपणा आणि न्यूनगंड वाढला. काही नवं करायचं म्हटलं की नवरा टोमणे मारायचा - ’मी मर मर मरतोय आणि तू नुसती आयती बसून खातेस!’ असं नवरा बाईंना मुलं, पाहुणे, शेजारी यांच्यादेखत बिनदिक्कत सुनवायचा.

हळूहळू बाई विझत गेल्या. मुलं मोठी झाली आणि आईचा आधार बनण्याऐवजी तीही बापाच्या स्वरांत स्वर मिसळू लागली. ’बाईंना डोकं नाही’ याबाबत घरात मतैक्य होतं. स्वत:च्या घरात बाईंना कधी मोकळेपणाने वावरता येत नसे. सतत नव-याची, मुलांची भीती असे.

या सा-या वातावरणाचा परिणाम बाईंच्या व्यक्तिमत्त्वावर झाला होता. शेजारणीही त्यांना बावळट समजत. त्यामुळे चारचौघींत वावरायला बाईंना नकोच वाटे. हातात कधी पैसे नाहीत, कधी कोणते निर्णय घेतलेले नाहीत, दुस-यानं सांगितलेलं निमुटपणे ऐकण्यात बाईंच आजपर्यंतच आयुष्य गेलेलं. त्या स्त्री असल्याने त्यांच असं जगणं कुणालाच खटकत नव्हतं.

एका उमद्या स्त्रीचं आयुष्य कोमेजून गेलं होत. पण सांत्वन त्याबद्दल नव्हतं. त्याला निमित्तमात्र असा तो पुरूष या जगातून निघून गेला होता म्हणून जग बाईंच सांत्वन करत होतं. वास्तविक अशी कितीतरी आयुष्यं आपल्या डोळयांदेखत संपून जातात. उरतात माणसांची कलेवरं! शरीराचा नाश अटळ आहे. पण आयुष्यात काहींची फुलण्याची, उमलण्याची संधी दुस-यांच्या हातात असते. ज्याच्या साथीने जगायचं, उमलायचं त्याच्यावर /तिच्यावर कुरघोडी करण्यात, सत्ता गाजवण्यात काहींना धन्यता वाटते. ही ’सत्तावान’ माणसं आयुष्यात किती काय गमावतात, हे त्यांच त्यांनाही कळत नाही.

पुरूष - स्त्री नातं हा या उद्दाम सत्तेचा एक पैलू झाला, पण तो एकमात्र पैलू नव्हे. एका स्त्रीच दुस-या स्त्रीशी, एका पुरूषाच दुस-या पुरूषाशी या प्रकारच नात असतं हे आपण पाहतो. जात, वर्ग, धर्म, वय ज्ञान, कौशल्य, वर्ण, बुद्धी, पद असे वेगवेगळे मुखवटे आपण धारण करतो. त्यांनाच आपला चेहरा मानून सत्तेच्या खेळात आपण सर्वजण सहभागी होत असतो. कधी आपण शोषित असतो, आणि संधी मिळाली की आपण शोषक बनतो.

जगताना हरवून जायचं नसेल तर आपल्यामुळे कुणी उजाड होत नाही ना, हे तपासून बघणं गरजेच आहे. केवळा शोषणापासून स्वत:ला वाचवणं पुरेसं नाही; शोषक बनण्यापासूनही आपण आपल्याला वाचवलं पाहिजे.

सत्तेच्या या खेळातून आपण जाणीवपूर्वक बाहेर नाही पडलो, तर आपलं सांत्वन करायलाही कोणी उरणार नाही! आणि स्वत:लाच स्वत:चं सांत्वन करावं लागणं याइतकी वाईट गोष्ट नाही! शोषणाविरूद्ध बंड ही नाण्याची एक बाजू झाली. आपणही कोणाच शोषण करत नाही हे पाहणही तितकच महत्त्वाचं!!

Friday, July 23, 2010

३६. समुद्रभेट

अखेर एकदाचा पाऊस आला.
पण येताना साथीला चक्रीवादळही घेऊन आला.
चालायचेच! पावसालाही सोबत हवीशी वाटणारच!

मुंबईच्या रस्त्यांवर झेपावत आलेल्या समुद्राच्या लाटांची प्रकाशचित्रे जिकडेतिकडे झळकली. ती पाहताना मला एक खूप जुनी गोष्ट आठवली.

किती बरे वर्षे झाली असतील त्याला आता? निदान दोन दशके तरी नक्कीच उलटून गेलीत.

आम्ही काही जणांनी मिळून एक युवक शिबिर घेतले होते. शिबिर तीन महिने रोज संध्याकाळी दोन तास चालायचे. साधारण दुस-या महिन्याच्या शेवटी आम्ही या मुला-मुलींना सहलीला नेले. सहलीत आम्ही एका सामाजिक प्रकल्पाला भेट दिली. सर्वेक्षण केले. शिबिरार्थी सहलीवर एकदम खूष होते.


काही दिवसांनी ते म्हणाले, “चांगली झाली ती सहल. पण ही तर तुमची सहल झाली. ती तुम्ही आयोजित केलेली सहल होती, तुमच्या कल्पनांची. पण आता आम्ही तुम्हा कार्यकर्त्यांना सहलीला नेणार. पहा आम्हालाही सहल आयोजित करणे नीट जमते का नाही ते!”

शिबिरार्थींच्या उत्साहाला मोडता घालायचे काही कारण नव्हते. सर्वांची सोय पाहून, वेळ पाहून निघालो.

याही वेळी एका सेवा प्रकल्पाला भेट. तेथील कार्यकर्त्यांशी बातचीत. गरमागरम चर्चा.
शेवटचा कार्यक्रम होता समुद्रभेट.

आता समुद्राने वेढलेल्या मुंबईकरांना समुद्राचे काय अप्रूप? पण तरीही काहींच्या उत्साही आग्रहास्तव गेलो. दुपारची चार साडेचारची वेळ होती.

किनारा अगदी ओस होता.
वाळूवर खूप दूरवर नजर टाकली तरीही पाणी दिसूच नये इतका समुद्र लांब खेळायला गेला होता.
बहुतेकांनी ’ओहोटी!’ असा उद्गार काढून पर्यायच नसल्याप्रमाणे रस्त्यावरच्या झाडाखाली बैठक मारली. त्यांच्या गाण्यांच्या भेंडया सुरूही झाल्या. (गाण्यांच्या भेडयांना तोवर ’अन्ताक्षरी’ म्हणत नसत – त्या काळची ही गोष्ट आहे!)

आम्ही तिघे चौघे समुद्रवेडे मात्र चुळबुळत होतो.
पाण्यात पाऊल भिजवल्याशिवाय समुद्राच्या सहवासाची खरी मजा येत नाही.
आम्ही पाण्याच्या दिशेने चालायला लागलो.
खूप वेळ चाललो, पण पाणी काही जवळ येत नव्हते.
डावी उजवीकडे पाहावे तर पाणी होते. पण तोंड वळवून ती दिशा धरावी तर आमच्यात तितकेच अंतर उरत होते. समुद्र जणू हट्टाला पेटला होता आणि त्या हट्टाची लागण आम्हालाही झाली होती.

किती वेळ गेला कोण जाणे!
पण आता लाटांचा आवाज अगदी जवळून येऊ लागला.
समुद्राच्या भिनत जाणा-या वासाने माझे मन टवटवीत होऊ लागले होते.
आता पाण्यात आणि आमच्यात जेमतेम काही फुटांचे अंतर उरले होते.
पाण्यात पाय घालायला आम्ही अगदी अधीर झालो होतो.

मागून काहींच्या ओरडण्याचा आवाज आला पण आम्ही त्याकडे दुर्लक्ष केले. दुस-या एखाद्या गटाची काहीतरी गंमत चालली असावी असेच मला वाटले. पण अचानक त्या हाकांची तीव्रता वाढली. माझे नाव ऐकून मी मागे वळून पाहिले आणि माझ्या डोळयांवर माझा विश्वासच बसेना! गेला अर्धा तास आम्ही जी वाळू चालून आलो होतो, तिचे नामोनिशाणही आता शिल्लक नव्हते! आमच्या चारी बाजूंना फक्त पाणी होते आणि ते पाणी आमच्या पावलांना स्पर्श करत होते.

आमचा एक मित्र दोन तीन कोळ्यांच्या पोरांसह आमच्या मागे धावत येत होता.
“भरती! भरती! लवकर मागे फिरा" असा त्याचा आक्रोश चालू होता.
आम्ही सर्वजण सुसाट धावत सुटलो.
पण ओल्या वाळूत पळणेही अवघड!
अर्ध्या पाऊण तासाचे अंतर समोर होते आणि समुद्राचे पाणी क्षणाक्षणाला वाढत होते.

ज्या समुद्राची त्या क्षणापर्यंत आस होती, त्याच्यापासून पळ काढण्यासाठी आम्ही आता धडपडत होतो.

आणखी काहीजण मदतीला धावून आले.
आम्ही किनारा गाठला तेव्हा केवळ आमचा नव्हे तर सर्वांचाच जीव भांडयात पडला.

आज दर वेळी समुद्र पाहताना मला तो क्षण आठवतो.
इतक्या अनुभवानंतरही मनात आज पाऊल लाटांमध्ये भिजवण्याची आस उरलेलीच असावी याची गंमत वाटते.
कुतुहलापायी, आसक्तीपायी, मनाच्या वेडेपणापायी पळ काढण्याचे असे प्रसंग पुन:पुन्हा येतच राहिले.

आपण आपले किना-यावर बसून राहावे, भरतीची लाट कधी ना कधी तिथवर पोचतेच – हा सिद्धान्त मनाला कळतो - पण वळत मात्र नाही. दर वेळी गुंतणे आणि जीवावर बेतल्यावर पळ काढणे हे चक्र चालू राहते.

ज्याचे त्याचे मन! दुसरे काय?

आता इतक्या वर्षांनंतर मला त्या दिवशीचे पळणे हास्यास्पद वाटते हे मात्र खरे!
पण हे वाटणेही अलिकडचेच!

पूर्वप्रसिध्दी: मुंबई तरूण भारत २४ जुलै १९९६

Friday, July 16, 2010

३५. पळवाट

या जगात येणा-या प्रत्येकाला (आणि प्रत्येकीलाही अर्थातच) परमेश्वराने एक देणगी दिलेली असते. माझ्याबाबतीत सांगायचे तर माझे दिशांचे ज्ञान अगाध आहे! अगदी आयुष्याची दिशा वगैरे तर सोडूनच द्या, पण ईशान्य मुंबई, दक्षिण मुंबई या भानगडीही मला कळत नाहीत. माहीममधली एखादी इमारत जर मला शिवाजी उद्यानापासून (की मैदान?) माहिती असेल, तर माटुंगा स्थानकापासून आधी मी शिवाजी मैदानापाशी येते आणि माहितीच्या रस्त्याने परत माहीमपर्यंत जाते.

माझी ही खासियत मित्रमंडळींना माहिती आहे. त्यामुळे ओळखीची माणसे मला निमुटपणे नेण्या - पोचवण्यासाठी येतात. त्यामुळे दिशा, खुणा याबाबतचे माझे अज्ञा अबाधित राहायला - किंबहुना ते वाढायला मदतच झाली आहे. पोस्टमन, रिक्षावाले, टॅक्सीवाले मला थोर वाटतात. आणि आकाशाकडे (तेही रात्री!) पाहून दिशा वगैरे ठरवणारे खलाशी तर मला या भूतलावरचे वाटतच नाहीत!

त्यादिवशी मात्र अघटितच घडले. पुण्यात बसच्या भरवशावर राहण्याचा गुन्हा माझ्या हातून घडला होता. तिची वाट पाहताना अखेर रिक्षाने जाण्याविना पर्यायच उरला नव्हता. मी रिक्षात बसून ’कसबा गणपती ’ असे सांगितले.. पुण्यातला हा प्रसिद्ध आणि मानाचा गणपती कोणा एखाद्या रिक्षावाल्याला माहिती नसेल अशी मी कल्पनाही केली नव्हती. पुण्यातल्या कोणा एका केंद्रिय मंत्र्यांना तो माहिती नसल्याची अफवा एके काळी वाचल्याचे आठवते - पण मंत्र्यांचे सारेच वेगळे!

रिक्षावाला पोरसवदा होता, नवीनही असावा. कारण मी रिक्षात बसताच त्याने "ताई, कसे जायचे ते सांगाल का जरा?” असे नम्रपणे विचारले. नम्र रिक्षावाला भेटण्याचा अनुभव मला नवाच होता. मी काहीशी गांगरले. शिवाय याला कसबा गणपतीही माहिती नाही - म्हणजे दुहेरी संकट! मी इकडे तिकडे पाहिले, पण दुसरी रिक्षा दिसेना. ती मिळती, तर मी ही रिक्षा सोडून दिली असती. पण मला उशीर होत होता. एका थोर गृहस्थांची भेट ठरलेली होती आणि ’वेळ पाळणे’ या विषयावर त्यांचे भाषण ऐकायची माझी तयारी नव्हती.

ठीक आहे! शनिवारवाडयाकडे घ्या", मी जरा बेफिकीरीचा आव आणत रिक्षावाल्याला सांगितले. तिकडे एखाद्या दुकानात विचारता येईल पत्ता - असा मी विचार केला. “ताई, शनिवारवाडा पण नाही सापडणार मला. पहिलाच दिवस आहे माझा. या गल्लीबोळांनी डोकं पार फिरलयं बघा माझं! तुम्ही सांगाल का रस्ता जरा?” रिक्षावाला काकुळतीने म्हणाला.

ते ऐकून माझ्या पोटात गोळाच आला. मी त्याला रस्ता दाखवणे अशक्यप्राय होते. पण त्या क्षणी कोंडाण्यावरच्या मावळ्यांसारखे माझे सारे दोर कापलेले होते. दुसरी रिक्षा नव्हती, दिग्गजांच्या भाषणाची भीती होती, बस येत नव्हती, हा रिक्षावाला नवा होता, शिवाय तो नम्रही होता. त्याच्या नम्रतेमुळे मी अधिकच हतबल झाले होते.

मला त्या रिक्षावाल्याची नाही, पण स्वत:चीच कीव आली. ’करा किंवा मरा’ अशी वेळ आली की मग मरण्यापेक्षा करणेच परवडते. माझ्यावरच्या संकटाचे निवारण करण्यासाठी आता ईश्वरी अधिष्ठानाचीच गरज होती. या ठिकाणापासून शनिवारवाडयापर्यंत मी आजवर किमान हजार वेळा तरी गेले होते. देवाचे नाव घेऊन मी आजवरच्या त्या प्रवासांच्या असंख्य अनुभवांवर मन एकाग्र केले. डावीकडे - उजवीकडे बघत, दुकानांच्या पाटया वाचत मनाचा हिय्या करून मी रिक्षावाल्याला रस्ता सांगायला सुरूवात केली.

अमूक पेठ कोणती? हा तिरका रस्ता पुढे कुठे जातॊ? इकडून बालगंधर्वला जायला जवळचा रस्ता कोणता? ---- असे नाना प्रश्न विचारून रिक्षावाला मला हैराण करत होता. मी आपली सुचेल ती उत्तरे देत होते – बरोबर चूक पाहायला आम्ही थोडेच पुन्हा भेटणार होतो? आणि भेटलोच समजा चुकून तरी थोडेच एकमेकांना ओळखणार होतो?

लांबून शनिवारवाडयाची भिंत दिसली तेव्हा मला अपरिमित की काय म्हणतात तसला आनंद झाला. माझी सगळी भीती पळाली. बोलण्यात आत्मविश्वास आला. माझ्या आत्मविश्वासाने आणि सहजतेने ते थोर गृहस्थही प्रभावित झाले! माझे त्यांच्याकडचे काम यशस्वी झाले. अशा रीतीने दिवस फारच चांगला गेला!

रात्री या घटनेचा विचार करताना मला फार आश्चर्य वाटले. जो रस्ता मला नीट माहिती नव्हता, ज्याची माझी मला खात्री नव्हती, तो मी बिनधास्त ( नाही, खरे म्हणजे धास्तावतच!) रिक्षावाल्याला सांगितला - आणि त्यातून आम्ही योग्य ठिकाणी पोचलो देखील!

माझ्याभोवती अज्ञानाच्या भिंती रचून घेणे माझे मलाच आवडत असावे! कारण अज्ञानात निष्क्रियतेची, आपला भार दुस-यांवर टाकण्याची सोय आली! पण रस्ता माहिती आहे म्हटल्यावर चालले पाहिजेच, पुढे गेले पाहिजेच! ज्ञानात जबाबदारी येते, काहीतरी करावे लागते. डावीकडे वळावे, उजवीकडे वळावे की सरळ जावे असे निर्णय वारंवार घ्यावे लागणारच रस्ता माहिती असला की! शिवाय आपल्या चुकण्याचे खापर दुस-यांवर फोडता येत नाही! म्हणून मग ’मला रस्ताच माहिती नाही, मला काही कळतच नाही’ अशा मनाच्या पळवाटांना एरवीही किती महत्त्व द्यावे? निदान ही पळवाट आहे इतके तरी भान मला आले आहे का?

पूर्वप्रसिद्धी: मुंबई तरूण भारत,१७ जुलै १९९

Friday, July 9, 2010

३४. जीवो जीवस्य...

आज खूप दिवसांनी दुपारच्या वेळी मी घरात होते. रणरणत्या उन्हामुळे आसमंत चिडीचूप होता. मी राहते त्या भागात बरीच झाडे आहेत. मी खिडकीतून दिसणा-या झाडांकडे नुसतीच निरर्थकपणे पाहत होते. इतक्या उन्हात यांच्या आत काय लगबग चालू असेल, याचही मला कुतुहल होतं! इतक्यात एका फांदीवरून खार धावत गेली. तिच्या पुढेमागे कोणीच नव्हतं खर तर! याच बाईसाहेबांची दुपारच्या वेळी इतकी धांदल का चालली होती?

क्षणार्धात एक जुनच चित्र माझ्या डोळ्यांपुढे उभ राहिलं! तो क्षण आठवला की अजून माझ्या काळजाचा एक ठोका चुकतो. मी तेंव्हा नेमके काय करायला हवे होते? काहीच न करता नुसतीच अलिप्तपणे मी बघत राहिले, ते बरोबर की चूक? परिस्थितीची नीट माहिती न घेता आपल्या बळाच्या आधारावर कोणा एकाची बाजू मी उचलून धरणे योग्य झाले असते का?

पॉंडिचेरीला होते मी. अरविंद आश्रमाच्या परिसरात राहत होते. अरविंदांची काही पुस्तके तेथे बसून नीट वाचावीत या इराद्याने गेले होते, त्यामुळे तेथे बरेच महिने माझा मुक्काम होता. आश्रमाचे ग्रंथालय छानच होते (अजूनही आहे!). पुस्तकांचा संग्रह तर चांगला होताच, शिवाय वाचत बसायची जागा निवडायलाही पुष्कळ वाव होता. मी बहुधा पहिल्या मजल्यावरच्या उघडया गच्चीत बसायचे. सावली देणारा कोपरा एक दोन दिवसांतच ध्यानात आला. डॊळे पुस्तकातून उचलून समोर पाहिले की चकाकणारा निळा आणि संथ समुद्र दिसायचा. त्याच्यावरून येणा-या वा-याच्या झुळुकांनी जवळपासची झाडे जणू खुषीत नाचायची. गच्चीतल्या मोकळ्या जागेत फुलझाडांच्या ब-याच कुंडया होत्या. त्यांच्या संगतीत एकूण छान चालला होता माझा वाचनाचा कार्यक्रम.

तिस-या चौथ्या दिवशी खारींची वर्दळ सुरू झाली. आधी त्या बहुधा मला बिचकल्या होत्या. पण आता त्यांनाही माझी सवय झालेली दिसत होती. अगदी निर्भयपणे, आत्मविश्वासाने त्या आमच्यासमोर (आणखी एक दोन जण असायचे वाचत बसलेले!) वावरायच्या. हातभर अंतरावरून बिनधास्त धावायच्या. कधी एखादी खार निवांतपणे समोर बसून टुकूटुकू पाहत राहायची - तत्त्वचिंतक असल्याचा आव आणत! फार गंमत वाटायची मला. दोन तीन तास मी माझ्या ठराविक खुर्चीत बसून असायचे. थोडा वेळ अरविंद वाचणे आणि बाकी वेळ समुद्र आणि खारी पाहणे असे माझे एकंदर छान चालले होते.

एक दिवस मी नेहमीच्या वेळी ग्रंथालयात गेले. सायकल लावून प्रवेशद्वारात येते तोच डावीकडे झुडुपात असलेले मांजर इमारतीच्या पाठीमागे धावले. एकदम सात आठ खारींचा चित्कार मला ऐकू आला. काही कळायच्या आतच इमारतीला मागच्या बाजूने वळसा घालून तो बोका माझ्यासमोर उभा होता.

ही सगळी घटना सेकंदाच्या जणू काही अंशातच घडली. मी अद्याप खारींच्या आवाजाचा वेध घेत होते, तोवर हे बोकोबा माझ्यासमोर उभे ठाकले. त्याला पळ काढायला पुष्कळ वाव होता, तरीही तो बोका उभा का राहिला हे मला आजतागायत कधी कळले नाही. तो बोका तसाच उभा होता म्हणून माझी नजर अजाणता त्याच्याकडे वळली! क्षणभर माझी नजर गोठलीच. त्या बोक्याच्या तोंडात एक खार होती. सुटकेसाठी ती धडपडत होती. आणि एखाद्या विजयी वीराच्या थाटात बोका माझ्यासमोर उभा होता.

मी झटकन खाली पाहिले. आसपास एकही दगड नव्हता. बोक्याला काहीतरी फेकून मारले की स्वत:चा जीव वाचवण्यासाठी तो खारीला सोडेल असा माझा हिशोब होता. बोका बिथरू नये म्हणून मी सावकाश हालचाल केली. एक पाय वरती उचलून हातात चप्पल घेतली. खार अजून तडफडत होती. बोका शांतपणे माझ्यासमोर उभा होता.

बोक्याच्या त्या नजरेने माझे अवसान गळाले. मला वाटले, आपण फक्त आपल्याच भावनेचा विचार करतो आहोत! ’जीवो जीवस्य जीवनम’ हा तर निसर्गाचाच न्याय आहे! रोजच्या सहवासामुळे आपल्याला खारीबद्दल जास्त आत्मीयता वाटते आहे. पण ही खार म्हणजे त्या बोक्याचे अन्न आहे. एवढया चपळ खारीला पकडण्यासाठी त्या बोक्यालाही काही कमी श्रम करावे लागले नसतील! त्याच्या तोंडचा घास काढून घेण्याचा मला काय अधिकार? निसर्गाने सर्वांना लढण्याची अस्त्रे दिली आहेत, तशीच बचावाचीही! आजवर किती खारी या बोक्याच्या तावडीतून निसटल्या असतील, पण आज बाजी याने मारली आहे. मी बळ वापरले तर कदाचित ही खार सुटेलही. पण या घटनेत मी मध्येच नाक खुपसणे न्याय्य होईल का?

माझा पुतळाच झाला होता. या विचारांच्या आंदोलनात मी गुंतलेली असतानाच खारीची तडफड संपली. बोका मला ओलांडून शांतपणे पुढे गेला. या सगळ्या घटनेला इतका कमी वेळ लागला की आसपासच्या माणसांना काही पत्ताही लागला नाही.

मला ती खार आठवते. तो बोका आठवतो. अनेक प्रसंग आठवतात. माणसे आठवतात. स्वत:च्या करण्याचे आणि नाकर्तेपणाचे सोयिस्कर समर्थन मला करता येते. पण दर वेळी मी न्याय्य बुध्दीने वागले असा कौल माझे मन मला देत नाही. मनालाही निसर्गाची एक गती आहे. त्या गतीचे मी समर्थन करते आहे का? पण ते तरी न्याय्य ठरते का?

पूर्वप्रसिद्धी: मुंबई तरूण भारत, १० जुलै १९९६

Saturday, July 3, 2010

३३. यशस्वी माघार

खरे तर मोठया सार्वजनिक कार्यक्रमांत ’मुख्य पाहुणे’ या नात्याने सामील होण्याचे मी सहसा टाळते. तरीही अनेकदा अनेक छोटया मोठया कार्यक्रमांमध्ये दीपप्रज्ज्वलन आणि प्रतिमा पूजन अशी कामे मला करावी लागतात. दत्तगुरू, सरस्वती, अंबाबाई, गणेश....अशा अनेक देवतांना फुलांचा हार घालणे, त्यांच्या प्रतिमांना हळद कुंकू वाहणे, त्यांची आरती करणे... या गोष्टी मी करते - मला पटत नाहीत तरी त्या क्षणी मनापासून करते.

वास्तविक माझ्या घरात एकाही देवतेची मूर्ती अथवा प्रतिमा नाही. मी नवे घर घेतले तेंव्हा कोणताही मुहूर्त न पाहता माझ्या सोयीने मी येथे राहायला आले. ’वास्तुशांत’ नावाचा प्रकार मी केला नाही, की जाणतेपणाने मी कसली पूजा केली नाही. मग तरीही सार्वजनिक कार्यक्रमांत मी अशा पूजा का करते? कारण बहुसंख्य लोकांच्या भावना अशा कृतींशी जोडल्या गेलेल्या असतात. ’त्या कृती निरर्थक आहेत’ असे म्हटले तर संवाद सुरू होण्यापूर्वीच थांबतो, अशा अनुभवातून पोळले गेल्यानंतर मी ही तडजोडीची भूमिका स्वीकारली आहे.

ज्या कोणाला लोकांबरोबर काम करायचे आहे, परिवर्तनाचे काम करायचे आहे, त्या व्यक्तीला सतत एका संघर्षाला सामोरे जावे लागते. आपले मत, आपले विचार यांच्याशी बेईमानी न करता, कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत अशा बेताने मध्यम मार्ग काढत राहावा लागतो. यातून कदाचित ’व्यक्तिगत’ (Personal) आणि ’व्यावसायिक’ (Professional) अशी एक 'सोयीची' विभागणी अनेक कार्यकर्ते करताना दिसतात. मला अशी विभागणी मान्य नाही. प्रत्येक गोष्ट - अगदी आपले सामाजिक आणि व्यावसायिक कामही - व्यक्तिगत असते अशी माझी धारणा आहे. आपल्या भावना, आपली मूल्ये, आपले विचार यातूनच आपल्या बाह्य कृतींना वळण आणि दिशा मिळते. पण सार्वजनिक जीवनात देवदेवतांच्या, धार्मिक श्रद्धांच्या बाबतीत ही विभागणी पटत नसली तरीही मी मान्य केली आहे. एका अर्थी समाजाने 'माघार कशी घ्यायची असते’ याबाबत माझे केलेले दीर्घकाळचे हे शिक्षणच आहे म्हणा ना!

समाजात वावरताना ’धार्मिकता’ अनेक अंगांनी सामोरी येते. स्त्रिया धार्मिक असतात, पुरूष धार्मिक असतात, लहान मुले-मुलीही धार्मिक असतात. श्रद्धा फक्त गरीब आणि ग्रामीण भागातल्याच लोकांच्या असतात असे नाही. नावाजलेल्या संस्थेत शिकलेल्या आणि सामाजिक परिवर्तनाच्या कामात रमणा-या लोकांच्याही श्रद्धा असतात. काही पुराणातील देवांना भजतात तर काही ऐतिहासिक माणसांना देवासमान मानतात. काहींनी माणसांना जिवंतपणीच देवत्व बहाल केलेले असते. प्रत्येकाची देवता वेगळी, प्रत्येकाचे श्रद्धास्थान वेगळे आणि प्रत्येकाची आपल्याकडून असणारी अपेक्षाही वेगळीच! काहींची धार्मिकता सहिष्णू असते, तर अनेकांची आक्रमक; काहींची सौम्य असते, तर काहींची धगधगती; काहींची भयातून आलेली असते तर काहींची समजण्यातून. शिवाय व्यक्तीची धार्मिकता आणि सामूहिक धार्मिकता यांतही एक सूक्ष्म पण सतत जाणवणारा भेद असतो. जीवनाच्या सर्वांगाला व्यापून असणा-या धार्मिकतेला स्पर्श न करता काम करणे अवघड; आणि तिला छेद देऊन काम करणेही तितकेच अवघड!

काही अनुभव

मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यातील एक छोटे गाव. आमचा एक प्रकल्प तेथे चालू होता. परसबाग लागवड हा त्यातील एक उप-कार्यक्रम. घराच्या अंगणात, परसात सांडपाण्याचा वापर करून भाजीपाला लावायचा असा हा अगदी साधा आणि छोटा कार्यक्रम. स्त्रियांमधले कुपोषण कमी करण्यासाठी परसबाग उपयोगी पडते असा आजवरचा अनुभव. पण परसबागेचा उपक्रम तेथे काही केल्या नीट चालत नव्हता. फक्त पावसाळ्यात चार महिने परसबाग असायची आणि नंतर ती नाहीशी व्हायची. स्त्रियांच्या एका समूहाबरोबर याच विषयावर बोलायला मी आले होते.

’पावसाळ्यानंतर पाणी नसते आणि म्हणून परसबाग मरते. पिण्याच्या पाण्यासाठीच मग वणवण असते, झाडांना कोण पाणी घालणार?’ असे स्त्रियांचे मत पडले. परसबागेला वेगळे पाणी घालण्याची गरज नाही असे मी त्यांना समजावून सांगत होते. आम्ही बसलो होतो त्या पडवीतून मला समोर एक अर्ध्या भिंतीची मोरी दिसली. 'या मोरीतल्या आंघोळीच्या पाण्यावरही भाज्या वाढतील’ असे मी म्हटल्यावर बैठकीत क्षणभर सन्नाटा पसरला. एक तरूण स्त्री तिचे हसू काबूत राखू शकली नाही, ती खुदकन हसली. अनेकींच्या चेहर-यावर स्मित झळकले. “दीदी हमको बच्चा कम करनेका तरीका बता रही है", असे एकीने मोठयाने म्हटल्यावर त्या सगळ्याजणी खिदळायला लागल्या.

माझ्या बोलण्यामुळे नेमका काय विनोद झाला हे मला समजले नव्हते. त्यांच्या शेरेबाजीचा संदर्भ मला कळत नव्हता. “मी काही चुकीचे बोलले का?” या माझ्या प्रश्नावर हसण्याची आणखी एक जोरदार लाट आली. एका प्रौढ स्त्रीने मग मला ओढत एका कोप-यात नेले आणि ती मला रागावून म्हणाली, “औरतोंकी माहवारी के नहाने के पानीपर उगी सब्जिया हमारे मर्द खायेंगे, तो उनकी मर्दानगी कम नही होगी क्या? तुम शहरके लोग कुछ समझते नही हो, और आते हो हमे पढाने के लिये! यहा तुम्हारा यह कार्यक्रम नही होगा, अभी दुसरा कुछ बताना है तो बताओ, नही तो मीटिंग खत्म करके मेरे घर चाय पीने चलो".

प्रजननात्मक आरोग्यावर काम केल्याशिवाय परसबाग यशस्वी होणार नाही हा त्या स्त्रियांनी मला शिकवलेला एक धडा! विकास कार्यक्रमाचा जीवनविषयक दृष्टिकोनाशी - त्याला मी अंधश्रद्धा नाही म्हणणार – संलग्न असलेला हा पैलू तोवर माझ्या कधी ध्यानातच आला नव्हता. जे करायचे ते संदर्भ लक्षात घेऊन, लोकांच्या विचारांना सामावून घेऊन करायला शिकणे भागच असते अशा वेळी. कधी कधी मनात असलेले सगळे करायला जमत नाही, याचाही स्वीकार करावा लागतो.

खूप वर्षांपूर्वी अरूणाचल प्रदेशात गेले होते. गावात गेले की एखादे घर गाठायचे आणि बैठक मारायची. हळूहळू इतर माणसे जमा होत. पुरूष येत तशा स्त्रियाही येत, मुले मुली तर अगणित जमा होत. माझी भाषा त्यांना कळत नसे आणि त्यांची मला. सहकारी कार्यकर्ता दुभाषाचे काम करे, त्यामुळे संवादाची गती आपोआप कमी राही. मला शांतपणे निरीक्षण करायला भरपूर वेळ मिळत असे. अगदी मजेदार दिवस होते ते.

पहिल्या बैठकीत माझ्यासमोर एका पेल्यात पेय आले. माझ्या खाण्यापिण्याच्या फारशा आवडीनिवडी नाहीत. जेथे जाईन तेथले पदार्थ खाऊन बघायचे, त्याबद्दल जरा माहिती घ्यायची अशी माझी साधारण पद्धत. त्यानुसार मी त्या समोर आलेल्या पेयाचे नाव विचारले. त्यावर ’अपांग’ असे उत्तर आले, ज्यातून मला काहीच अर्थबोध झाला नाही. मी ते पेय घेणार तेवढयात माझ्या सहका-याचा चेहरा मला दिसला आणि मी पेला खाली ठेवला. 'कडू काढा वगैरे आहे की काय?’ असे मी त्याला गंमतीने विचारले. तो भयंकर गंभीरपणे मला म्हणाला, “दारू आहे ती".

आता नेमके काय करावे हे मला सुचेना. त्या आदिवासींनाही काही सुचेना. जमलेल्या सगळ्यांचे डोळे एका वृद्ध माणसाकडे वळले. वातावरणातील ताण हलका करण्यासाठी मी 'अपांग कशी करतात?’ असा प्रश्न विचारला, त्यावर एका युवकाने मला उत्साहाने दहा मिनिटे माहिती दिली. मी मग त्यांना शांतपणे म्हटले, “अपांग घ्यायला आवडली असती मला, पण आज ती मी नाही घेतली तर चालेल का तुम्हाला?”

तो वृद्ध गृहस्थ त्याच्या भरदार आवाजात म्हणाला, “ ती दारू आहे म्हणून तू ती घेणार नाहीस हे माझ्या लक्षात आले आहे. पण तुला एक घोट तरी घ्यावाच लागेल. आलेल्या पाहुण्याला अपांग नाही पाजली तर आमचे पूर्वज कोपतील आणि आमच्या गावावर संकटे कोसळतील.” मी बराच वेळ त्याच्याशी बोलत होते. पण त्याने अखेर निर्वाणीचा इशारा दिला, “ तुला जसा तुझा धर्म आहे, तशी आम्हालाही आमची परंपरा आहे. आमच्या गावात तुला आमची परंपरा पाळावी लागेल. ही परंपरा न पाळण्याने तुझे काही नुकसान नाही होणार, पण आमचे होईल. यासाठीच तू आमच्याकडे आलीस का?” दुस-या बाजूने मी अपांगला स्पर्शही करू नये असा माझ्या सहका-याचा आग्रह. अपांगचा एक घोट घेऊन मी त्या समुहाच्या भावनेचा मान राखला खरा....पण त्या बदल्यात मी माझे अनेक सहकारी गमावले. काही राखायचं तर काही गमवावं लागतं --- हा मला मिळालेला आणखी एक धडा.

भारतीय रेल्वेची मला सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे गाडयांची नावे. पुष्पक, ज्ञानगंगा, झेलम, इंद्रायणी, राप्ती सागर ….अशा नावांच्या गाडयांतून प्रवास करताना जणू तो इतिहास आणि भूगोल आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो. जम्मू ते कन्याकुमारी या गाडीचेही 'हिमसागर एक्स्प्रेस’ असे अत्यंत समर्पक नाव आहे. कार्यकर्त्यांच्या एका समूहात या गाडीला ’विवेकानंद एक्स्प्रेस’ असे नाव देण्याबाबत, तसा विनंतीअर्ज रेल्वेकडे पाठवण्याबाबत अत्यंत गंभीरपणे चर्चा चालू होती. मी ’हिमसागर’ हे नाव कसे अधिक चांगले आहे, व्यक्तीचे नाव गाडयांना न देण्याची रेल्वेची भूमिका कशी योग्य आहे, विवेकांनंदाचे मोठेपण असल्या भौतिक गोष्टींवरून ठरत नाही ….असे अनेक मुद्दे मांडले. पण मला आठवते तसे त्याही चर्चेची सांगता 'हिला विवेकानंदबद्दल काही आदर नाही’ अशीच झाली होती. तुमच्या श्रद्धा तुम्हाला बाजारात विकता आल्या तरच तुम्ही त्या विचारांचे खरे पाईक असता, हे मार्केटिंगचे तत्त्वज्ञान आजही मला समजत नाही, पण ते तसे आहे खरे! काल्पनिक देवता एक वेळ परवडल्या, पण माणसांना देवाचे स्थान दिले की बुद्धी गहाण ठेवणॆ अपरिहार्य बनते, हे न पचणारे सत्यही या प्रसंगाने मला दिले.

कर्नाटकमध्ये बचत गटाची बैठक एका देवळात ठेवली म्हणून गटाची अध्यक्षच बैठकीला येऊ शकली नाही - कारण त्यावेळी तिची मासिक पाळी चालू होती. राजस्थानमधील एका छोटया गावातील प्रशिक्षणात 'मुलगा व्हावा’ म्हणून उपवास करणारी सहा महिन्यांची गर्भवती, सातपुडयच्या अक्राणी परिसरात अश्वत्थामा दिसल्याचे सांगणारा आदिवासी म्हातारा, बाळाला लस टोचली तर देवतेचा कोप होईल म्हणून घरात लपून राहणारे आदिवासी....असे कितीतरी प्रसंग आठवतात. या सगळ्यातून वाट काढत चालायचे तर दमछाकही होते.

सकारात्मक बाजू

पण देवदेवतांवरील लोकांच्या श्रद्धेबाबत केवळ एवढेच लिहिणे एकांगी होईल. कोणाला पटो अथवा ना पटो, पण या सगळ्याला एक सकारात्मक बाजू आहे. भले ती विचारांनी स्वीकारलेली जीवनशैली असेल किंवा नसेल, पण याच श्रद्धेतून समाजात काही चांगले बदलही होताना दिसतात.

उदाहरणार्थ, शहरांत दारू पिण्याला प्रतिष्ठा मिळताना दिसते आहे. पूर्वी गावाच्या वेशीवर मंदिर असायचे; आता कोणत्याही गावात प्रवेश करताना दारूचे दुकान दिसते - अगदी सरकारमान्य दुकान! अशा परिस्थितीत एखादा आदिवासी पाडा जेंव्हा "आमच्या गावात दारू अजिबात नाही बरं ताई, आम्ही माळकरी आहोत" असे अभिमानाने सांगतो, तेंव्हा दूरच्या त्या विठोबाला 'अशीच कृपा राहू दे बाबा यांच्यावर’ अशी प्रार्थना मनात आपोआप उमटते.. घर सोडून दहा मैलांच्या पलिकडे न गेलेल्या स्त्रियांच्या समुहात जेंव्हा कोणीतरी ’त्रिंबकपर्यंत’ किंवा ’प्रयागपर्यंत’ जाऊन आल्याचे कौतुकाने सांगते तेंव्हा कुंभमेळ्याचा सामाजिक पैलूही समोर येतो. पूर्वजांची पूजा करणारे, त्यांच्या अधिभौतिक शक्तींवर विश्वास ठेवणारे लोक नकळत समाजाचा इतिहास जपत असतात. देवाच्या आवारातली झाडे तोडायची नाहीत, अशा पारंपरिक नियमातून मोजक्याच ठिकाणी का होईना ’देवराई’ आत्ताआत्तापर्यंत जगली आहे. विशेषतः हिंदू धर्मातले बरेच सण निसर्गाची जाणीव करून देणारे आहेत. - त्यामुळे झाडे, डोंगर, नद्या, पशु, पक्षी.. … अशा निसर्गातल्या अन्य घटकांशी माणसांचे नाते जुळलेले आहे. प्रवासात वाटेत दिसणा-या नदीत पैसे टाकण्याची लोकांची लगबग मजेदार वाटली तरी एखाद्याच्या मनात ते करताना सर्वस्व अर्पण करण्याची भावना असू शकते हेही लक्षात घ्यावे लागते.

समाजातील सगळी माणसे ज्ञानाच्या अथवा जाणीवेच्या एका पातळीवर एका वेळी पोचतील, असतील असे कदाचित कधीही घडणार नाही. हा प्रत्येकाचा एक स्वतंत्र प्रवास आहे. पण रस्ता परंपरेने, अनुभवाने आखलेला आहे, म्हणून वरवर पाहता, सगळ्यांचा प्रवास सारख्याच गतीने आणि एकाच दिशेने चालला आहे असे वाटते. पण तसे नसते.

देवदेवतांच्या या सकारात्मक बाजूच्या मोहात पडून याच मार्गाने समाजपरिवर्तनाचे काम करावे असे काहींना वाटते. पण यातून समाज बदलण्याऐवजी बहुसंख्यांच्या दबावाला बळी पडून आपणच बदलण्याचा धोका असतो. दुस-यांच्या भावनांचा आदर करता करता आपण स्वत:च्या भावना आणि विचारांना कमी तर लेखत नाही ना, हेही सतत तपासून पाहावे लागते. ध्येय साधण्यात अडसर ठरत नाही तेंव्हा माघारही यशस्वी ठरते – अशी आपली मी माझ्या मनाची वेळोवेळी समजूत घालत असते!

पूर्वप्रसिद्धी: विश्रांती दिवाळी अंक, २००९