जेजुरी. खंडोबाची जेजुरी. आपल्यापैकी अनेक लोक एकदा तरी जेजुरीला जाऊन आले असतील. मीही पूर्वी गेले होते. आज जेजुरीला जाऊनही आम्ही खंडोबाच्या दर्शनाला गेलो नाही. जलव्यवस्थापन हा या अभ्यास दौऱ्याचा विषय असल्याने आम्ही गेलो ‘पेशवे तलाव’कडं. भोर तालुका सोडून आम्ही आता पुरंदर तालुक्यात आलो होतो.
जेजुरीच्या पूर्वेला हा विशाल तलाव आहे. आपण साधारणपणे तलाव पाहतो ते एक किंवा दोन बाजूंनी बांधलेले असतात. हा तलाव वर्तुळाकार नसून अष्टकोनी आहे आणि पूर्णपणे दगडाने बांधलेला आहे.
पहिले बाजीराव पेशवे यांनी अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात (इसवी सन १७३४ ते १७४०) हा तलाव बांधला म्हणून याला ‘पेशवे तलाव’ असे नाव आहे. तलावाचे क्षेत्र सदतीस एकर आहे अशी माहिती एका ठिकाणी आहे तर दुसऱ्या ठिकाणी तो एकोणीस एकर क्षेत्रात आहे असं म्हटलं गेलं आहे. डोंगररांगातून येणारं पाणी निर्विघ्नपणे तलावात यावं म्हणून तलावाच्या अनेक बाजूंना छिद्रं आहेत. गाळ-दगड न येता फक्त पाणी तलावात यावं यासाठी ही रचना असावी.
आम्ही गेलो तेव्हा सुदैवाने तलावावर फारशी गर्दी नव्हती. तलावावरून मल्हारगड (खंडोबा आणि महादेवाचे मंदिर असलेले प्रसिद्ध देवस्थान) स्पष्ट दिसतो.
पाण्याचा
प्रवाह नियंत्रित करण्यासाठी या जिन्यात पूर्वी तीन वेगवेगळ्या पातळ्यांवर दट्टे
बसवले होते. (हे दट्टे दगडी होते की लाकडी याविषयी वेगवेगळी माहिती आढळते.) आता हे
दट्टे काढून टाकले आहेत आणि दट्ट्यांची जागा सिमेंटने बंद केलेली आहे. तसाच जिना
शिवलिंगाच्या उजव्या बाजूलाही आहे. हे दोन्ही जिने चढून थेट धरणाच्या भिंतीवर आजही
जाता येतं. भिंतीवरून दिसलेल्या चारपैकी दोन जिन्यांचं रहस्य इथं लक्षात आलं.
बल्लाळेश्वर
मंदिराच्या पायऱ्या उतरण्यापूर्वी डाव्या आणि उजव्या बाजूला छोटे बंदिस्त दगडी
मार्ग आहेत. त्यातून चालत गेलं की खालच्या शिवलिंगाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला
परत जिने आहेत – ज्यातून धरणाच्या भिंतीवर जाता येतं. थोडक्यात सांगायचं तर हे
दुमजली मंदिर आहे आणि ते धरणाच्या भिंतीत साठ फूट खोल आहे. प्रत्येक मजल्यावर दोन जिने आहेत. या मंदिराची आणि धरणाची
जोडरचना हे वास्तूशास्त्रातलं एक आश्चर्य तर आहेच, पण पाणी व्यवस्थापनातलंही एक
उत्तम उदाहरण आहे. पाण्याच्या अशा महत्त्वाच्या ठिकाणी मंदिरांची स्थापना करणं
यातून जनमानसाचा अभ्यासही दिसून येतो. देवाच्या प्रेमाने (अथवा भयाने – कोण कशाने
प्रभावित असेल ते सांगता येत नाही) लोक पाण्याचीही काळजी घेत असत असं दिसतं.
परिसरात प्रवेश करतानाच दोन – नाही तीन – गोष्टी तत्काळ नजरेत भरल्या. एक, मोकळ्या जागेत ठेवलेलं वराहशिल्प. दुसरी पुष्करिणी. आणि तिसरं म्हणजे मंदिराचं शिखर. या मंदिराच्या वरच्या भागाची पडझड झाली असल्याने, बाकी भाग कोसळण्याची शक्यता असल्याने भाविकांना आत जाता येत नाही असं समजलं. काही वर्षांपूर्वीपर्यंत हे दरवाजे उघडे असत असं आंतरजालावरच्या काही लेखांवरून दिसून आलं. पण सुरक्षितता महत्त्वाची, तिच्याशी तडजोड नकोच.
भारतीय हिंदू परंपरेत वराह हा विष्णूचा तिसरा अवतार मानला जातो. हिरण्यक्ष राक्षसाने पृथ्वी समुद्राच्या तळाशी ओढून नेली. विष्णूने वराहाचं रूप धारण करून. एक हजार वर्ष राक्षसाशी लढाई करून पृश्वीला वाचवलं ...ही कथा आपण अनेकांनी लहानपणी ऐकली-वाचली असेल. वराहावताराचं काम संपल्यावर विष्णून ते शरीर त्यागलं, आणि मग त्या शरीरापासून यज्ञाची विविध अंगं बनली अशी कथा विष्णुपुराणात आहे. महावराहाचं किंवा यज्ञवराहाचं शिल्प काहीसं भग्नावस्थेत असलं तरी विलक्षण देखणं आहे. वराहाचं शिल्प आपल्याला आवडू शकेल अशी कल्पनाही मी कधी केली नव्हती. पुष्करणीसमोरच्या मोकळ्या अंगणात आता हा असला तरी पूर्वी तो पुष्करिणीतल्या मंडपात असावा असा अंदाज लावता येतो. तिथं श्रीदत्त या देवतेचं आगमन झाल्यावर वराहाला बाहेर हलवण्यात आलं असावं. वराहाच्या पाठीवर जी झूल दिसते, त्यात विष्णूच्या प्रतिमा कोरलेल्या दिसतात. फोटोतल्या वराहाचे पायही पाहा. तिथंही शंख, गदा ही विष्णूची आयुधं दिसतील.
मल्लिकार्जुन मंदिर पांडवकालीन आहे असा समज लोकांमध्ये प्रचलित आहे. पण मंदिराच्या हेमाडपंथी शैलीवरून हे मंदिर यादवकालीन (तेराव्या किंवा चौदाव्या शतकातलं) असावं असं म्हणता येईल. स्थानिक लोकांच्या माहितीनुसार या मंदिरात दोन शिवलिंगं आहेत. एक शंकराचं आणि दुसरं पार्वतीचं.
छतावरची नक्षीही सुंदर आहे. आता इथं नंदी नाही, पण पूर्वी या मंडपात नंदी असावा. आणि आता जिथं दत्तमंदिर आहे तिथं शिवमंदिर असावं – आणि कदाचित शिवमंदिराच्या पूर्वी विष्णूचं मंदिर होतं की काय असा एक प्रश्न मनात आला. इथं जात्यासारखा एक मोठा दगड दिसला. ते जातं वगैरे नसून चुन्याच्या घाणीचा एक भाग होता असं अभिजित घोरपडे यांनी सांगितलं. त्याविषयी अधिक पुढच्या भागात पाहू.
परतीच्या वाटेवर सोमेश्वर मंदिराला आम्ही भेट दिली ती इथले 'वीरगळ' पाहण्यासाठी.
(क्रमश:)