ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Thursday, May 19, 2011

७३. तडजोड

प्रसाद तसा लहान वयापासून वेगवेगळ्या सामाजिक चळवळीत असायचा. ‘सामर्थ्य आहे चळवळीचे’ हे वचन त्याला जणू तंतोतंत लागू होते. सामाजिक कामाचा हा वारसा त्याला थेट त्याच्या आजोबांकडून मिळाला होता. त्याचे आजोबा स्वातंत्र्यसैनिक होते आणि अजूनही सक्रिय होते. विविध सामाजिक संस्थांशी विश्वस्त, सल्लागार, मार्गदर्शक, आधारस्तंभ .. अशा अनेक स्तरांवरचे त्यांचे नाते होते. खर तर आम्ही सगळेजण (आणि त्यातल्या त्यात मी) प्रसादकडे जायचो ते आजोबांना भेटण्यासाठी. त्यांच्याशी गप्पा मारायला मजा यायची. उपदेशाचा आव न आणता ते आम्हाला बरच काही शिकवून जात; एखाद्या गंभीर प्रसंगात दुसरी बाजू दाखवून विचार करायला आम्हाला प्रवृत्त करत. आमच्या सबंध ग्रुपमध्ये मी एकटीच मुलगी असल्याने कदाचित मी आजोबांची जास्त लाडकी होते. माझा आणि त्यांचा विशेष संवाद चालायचा तो गणित आणि कविता या दोन विषयांवर. ते जुन्या काळातले गणिताचे पदवीधर. प्रसादचे आजोबा हे माझ्या गणिताच्या अडचणी सोडवायचे आणि गणितावर विचार व्यक्त करायचे एक हक्काचं ठिकाण होत.

निसर्गक्रमानुसार एक दिवस आजोबा हे जग सोडून गेले. महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर मी पुण्याला रामराम ठोकला आणि दूरच्या गावी जाऊन वेगळ्या प्रकारच्या कामात मग्न झाले. कामात नाविन्य होत आणि माझ्यात प्रचंड उत्साह होता. हे कुरूप जग आपण बघताबघता बदलून टाकू असं वाटण्याचं स्वप्नाळू वय होत ते माझ! मी माझ्या नव्या जगात पूर्णपणे रमून गेले.

अधुनमधून पुणेकर मंडळीची पत्र यायची. क्वचित कोणीतरी मुद्दाम वाकडी वाट करून भेटायलाही यायचे. अशा वेळी प्रसादच्या आजोबांची आठवण हमखास निघायची. दीड दोन वर्षानंतर मी पुन्हा पुण्यात यायला जायला लागले. प्रवासात, नेहमीच्या कट्ट्यावर प्रसादही एक दोनदा भेटला. प्रसादची घोडदौड जोरात चालली होती ते पाहून बर वाटलं. म्हणजे त्याच दुकान तर चांगल चालल होतच पण नुसते पैसे कमवायच्या मागे न लागता तो सामाजिक कामातही सहभागी होता. अनेक सामाजिक संस्थांच्या कार्यकारिणीत, विश्वस्त मंडळात तो इतक्या लहान वयात होता की ‘पोरगा आजोबांची गादी चालवतोय चांगली’ अस जो तो म्हणत होता. आपला मित्र ‘मोठा’ झालाय याच आम्हालाही समाधान होत.

प्रसादशी तीन चार वेळा बोलल्यावर मात्र काही गोष्टी खटकायला लागल्या. एक तर आम्हाला कोणालाच एका संघटनेचे/संस्थेचे काम पूर्ण न्याय देऊन करता येते असा अनुभव येत नव्हता. पूर्ण वेळ कार्यकर्त्यांची गोष्ट वेगळी – पण नोकरी सांभाळून सामाजिक कामासाठी पुरेसा वेळ देता येत नव्हता याची अनेकांना खंत होती. पण प्रसाद मात्र एकाच वेळी चार पाच संस्थांना वेळ देत होता. बर, त्यात काही सुसंगती तरी असावी? एक पर्यावरणावर काम करणारी संस्था; एक देवदासींचे प्रश्न सोडवणारी; एक लहान मुलांसाठी मासिक चालवणारी चळवळ; तर एक रक्तदाता प्रतिष्ठान – काही संस्था तर काही संघटना. काही रचनात्मक कामात तर काही संघर्षात्मक कामात! प्रसाद काही अमानवी कार्यक्षम नव्हता. मग त्याच्या इतक्या कामांचे गौडबंगाल होते तरी काय? प्रसादशी काही बोलायला जावं यावर तर तो विषय बदलायचा.

आम्ही सगळ्यांनी एकदा ठरवून प्रसादला याबाबत छेडले. त्याच्या कामाबाबत प्रश्न विचारले. मग आमच्या लक्षात आलं की, प्रसादला त्या सा-या कामांबाबत, त्या संस्था-संघटनांच्या विचारप्रणाली आणि कार्यपद्धतीबाबत, त्यांच्या समाजातील प्रतिमेबाबत, त्यांच्या ध्येयधोरणांबाबत, त्यांच्या स्वप्नाबाबत काहीच माहिती नव्हत! तो आपला नेमाने फक्त कार्यकारिणीच्या बैठकांना जायचा. त्याला विषयाची गंधवार्ता नसल्याने तो कशाच्या खोलात जायचा नाही, अडचणीत टाकणारे प्रश्न विचारायचा नाही. त्यामुळे प्रसाद फार ‘समंजस आणि सहकार्य करणारा’ माणूस आहे असा बोलबाला झाला. आणि साहेबांना जिकडून तिकडून आमंत्रण येऊ लागली; साहेब सुखावले आणि सगळीकडे जाऊ लागले. महिन्या दोन महिन्यातून एखादी मीटिंग करायची इतक सोपे काम होते ते!

वस्तुस्थिती कळल्यावर आम्ही सगळे काही काळ सुन्न आणि विषण्ण झालो. अखेर प्रसाद आमचा मित्र होता आणि प्रसादच्या आजोबांचे आमच्यावर ऋण होते. आपापल्या संघटना आम्ही सर्वानी आमच्या जगण्याचा एक अविभाज्य हिस्सा मानला होता. त्यातल्या प्रत्येक छोट्या मोठया गोष्टीत आम्ही गुंतलो होतो; बाहेर अभिनिवेशाने संघटनेची प्रतिमा जपत होतो. कधीकधी त्यातल्या ताणतणावांनी, अपेक्षाभंगांनी कोसळत होतो. सामाजिक काम उत्कटतेने, तीव्र आवेगाने, प्रामाणिकपणे, वैचारिक निष्ठेने करण्याची आमची भूमिका होती. प्रसादला आम्ही हे सांगितल्यावर तो हसला. म्हणाला, ‘जास्त मनाला लावून न घेता सहज जमेल तितके करण्यात शहाणपणा आहे.’ शेवटी ‘दोनही जगांत यश मिळवायचं तर तडजोड करावी लागते’ असा सल्लाही त्याने आम्हाला दिला.

त्यावेळी मुक्ता, स्वानंद, पांडुरंग आणि मी वेगवेगळ्या संघटनांचे पूर्ण वेळ काम करत होतो. महेश, सीमा, रामदास आणि इतर अनेक जण नोकरी करून संघटनेला वेळ देत होते, स्वत:चा पैसा खर्च करत होते.

कालांतराने आम्हाला सर्वांनाच आपापल्या संघटनांचे विदारक अनुभव आले. सामाजिक संस्था संघटनांमध्येही एक श्रेणीबद्ध रचना असते; एक उतरंड असते; विचारांचा एक साचा असतो; तिथेही एक कंपू असतो. त्यात कमी अधिक धग सोसून आम्ही हळूहळू बाहेर पडलो. आमच्या गुंतवणुकीने आम्हाला खूप दु:ख दिलं – पण फक्त दु:खच दिलं अस मात्र नाही. त्या अनुभवातून जाताना आम्ही घडलो – काही वेगळेच घडलो. आमच्या कामाच्या आठवणी आजही आम्हाला भावूक बनवतात. आपल्याला शक्य होत तितकं आपण केलं असं वाटून समाधान मिळत.

परवा ब-याच वर्षांनी आम्ही सगळे परत भेटलो तेव्हा हे जाणवल. आम्ही बरेच बदललो होतो त्यामुळे एकमेकांशी बोलायला आमच्याकडे खूप काही होत. प्रसाद मात्र होता तसाच होता आणि त्याच्याकडे सांगण्यासारख काहीच नव्हत. त्याने जणू काही अनुभवलच नव्हत! आम्हाला प्रसादच्या आजोबांची आठवण येत होती. त्यानी सांगितलेले अनेक अनुभव आम्हाला कसे उपयोगी पडले ते आम्ही एकमेकाना सांगत होतो. प्रसादला मात्र आजोबांचा अनुभव वापरायची संधीच मिळाली नव्हती.

गुंतवणुकीत, आसक्तीत दु:ख असत म्हणून अलिप्ततेने जगलो तर अनुभवच येत नाहीत! आणि अनुभव नसतील तर जगण ‘श्रीमंतीच’ होत नाही. प्रसादला त्यादिवशी आमचा हेवा वाटला. त्याच्या आजोबांच्या विचारांचा वारसा त्याच्यापेक्षा आम्ही इतरांनीच जास्त जपला होता अस त्याला जाणवलं – तसं त्याने बोलुनही दाखवलं. प्रसादला जे आज समजलय ते कृतीत आणायला थोडा उशीरच झालाय त्याला - अशी मला भीती वाटतेय. मी त्याला तसं बोललेही.

अर्थात प्रसादला अजुनही स्वत:च्या जगण्याशी तडजोड करता येईल आणि समाधान मिळवता येईल. त्याला अजुनही गुंतता येईल आणि अनुभव घेता येतील. त्याच्या आजोबांच्या विचारांचा वारसा अजूनही त्याला मिळवता येईल ख-या अर्थाने. प्रसाद किंवा मी अशा प्रकारच्या लोकांसाठी वय ही अडचण नसते; माहितीचा अभाव ही अडचण नसते; कौशल्य नसणे ही अडचण नसते; संधी मिळत नाही ही अडचण नसते; मनोवृती हीच अडचण असते अनेकदा.

प्रसादने पूर्वी एकदा जगण्याशी तडजोड केली होती. आज पुन्हा एकदा तडजोड करण्याची संधी आहे त्याच्यापुढे. परिस्थितीशी तडजोड अपरिहार्य असते आयुष्यात – पण जोवर आपण मानतो तोवरच! एकदा ही मान्यता बाजूला टाकली की नवा अर्थ घेऊन येते परिस्थिती आणि तडजोडही!!

17 comments:

 1. खरंय. ‘परिस्थितीशी तडाजोड अपरिहार्य आहे’ हा सुद्धा आपलाच निर्णय असतो ना?

  ReplyDelete
 2. वा.चांगले लेखन.

  ReplyDelete
 3. अप्रतिम लिहिलंय.. पूर्वी काम करत असताना याच बाबीवर आम्हा मित्रांच्या चर्चा चालायच्या त्याची आठवण आली.

  ReplyDelete
 4. गौरी, बरेचदा दृष्टिकोन बदलला की आपली तडजोडसुद्धा बदलते!

  केदारजी, स्वागत आहे तुमच आणि आभार.

  महेशजी, स्वागत. फक्त तडजोड करता करता कधी कधी जगायचं राहून जात आणि त्याचा पश्चातताप होतो :-)

  हेरंब, पिढी बदलली तरी चर्चेचे विषय तेच आहेत हे जाणवून गम्मत वाटली :-)

  ReplyDelete
 5. मनोवृती हीच अडचण असते अनेकदा.
  bass avadlay!
  :D

  mavshi, ya goshtitlya prasad sarakhe kiti lok disatat ajubajula. man, maratab, udghatan samarambh yatach tyancha "samajik" vel jat asato.
  "shal-shreephal" type lok!!

  tadjod pratyek jan kuthe na kuthe karat asato pan tu mhanates tasa "kashashi" tadjod karavi he mahatvacha ahe.

  ReplyDelete
 6. अनू, 'शाल-श्रीफळ' टाईपचे लोक हे अगदी अचूक वर्णन आहे :-)

  ReplyDelete
 7. Very true!!

  Pan ek prashna mala nehami padato....kampu karana / hona he aaplya samajiktela anusarunach nahi ka! Agadi kautumbik patalivarahi aapli wavelength kahi jananshi julate kahinshi nahi... office madhyehi tasach hota...sagalich manasa sagalyaana sarkhich jawal / dur kashi asateel?

  ReplyDelete
 8. विनायकजी, स्वागत आहे तुमच. तुमच्या 'कंपू'बाबतच्या मताशी सहमत आहे मी पूर्णपणे. सगळीच माणस जवळची नसतात; पण त्यामुळे फारस बिघडत नाही. आपल्या आवडीनिवडी जुळणा-या लोकांसमवेत बर वाटत म्हणून 'कंपू' होण हा भाग वेगळा. आणि कोणालातरी त्रास द्यायचाय या एकाच मुद्द्यावर एकत्र येण वेगळ. हा दुसरा प्रकार जरा जास्तच असतो आपल्याकडे - तो कितीही कृत्रिम आणि अल्पकाळ टिकणारा असला तरी!!

  ReplyDelete
 9. छान ! सुंदर लेख..

  ReplyDelete
 10. माझा ब्लॉग तुम्ही वाचता असे दिसते. फॉलोअर म्हणून तुमचे नाव तुम्ही लिहिलेले आहे. एक गोष्ट जाणून घ्यायची आहे-फॉलोअर बनल्यावर आपोआप नव्या पोस्टची माहिती कळते की आपल्यालाच मागावर राहावे लागते ?
  -kedar

  ReplyDelete
 11. Kedarjee, kindly send me your contact address: mine is: aativas@gmail.com

  As this is not concerning the post, will write separately!

  ReplyDelete
 12. जागृतीनंतर तेच ते काम केले तरी कामाचे वैश्विक स्वरूप बदललेले असे रामकृष्ण परमहंसांच्या एका पुस्तकात वाचनात आले आहे... त्यावर चिंतन केले आणि पैशापेक्षा आपले तिथे हजर असणे हा काहीवेळा इतरांना आधारस्तंभ असू शकतो हा वि४ केला की आपल्यालाही प्रसाद (ला)"भेळ"...

  ReplyDelete
 13. यातला 'जागृतीनंतर' हा शब्द महत्त्वाचा आहे!

  ReplyDelete
 14. छान झालाय लेख....

  >>>गुंतवणुकीत, आसक्तीत दु:ख असत म्हणून अलिप्ततेने जगलो तर अनुभवच येत नाहीत! आणि अनुभव नसतील तर जगण ‘श्रीमंतीच’ होत नाही.

  अगदी खर आहे...

  ReplyDelete
 15. देवेन, आपल्या सगळ्यांचे अनुभव तसे एकसारखेच असतात, नाही का?

  ReplyDelete