ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Tuesday, July 23, 2013

१७१. नौस


म्या सक्काळी उटायच्या आदीच आण्णा कुटतरी जातेत.
आज सांजच्याला आले तवा हासत व्हते.
म्हन्ले, “आन्जाक्का, उद्यापासून आम्ही पण तुमच्या शाळेत येणार बरं का!”

ह्ये काय ल्हान नाईत. उगा कायबी बोल्तेत.
“तुमास्नी गुर्जी घ्येणार नायती,” म्या बोल्ली.
आण्णा हस्ले. म्हन्ले, “हेडमास्तर आहे मी...”.

बाबौ! आता कायबी कराया येतंय.
कुणाची टाप नाय भांडायची. गुर्जीबी वरडायचे न्हाईत. मज्जा.

पन आण्णांचं कायतरी येगळंचं सुरु.
अब्यास कर, सुद्द बोल,
भांडू नको, श्या दिऊ नको,
पाडे म्हन. अकशर चांगलं कहाड.
गंपतीचं भजन म्हन.

घरात आय, साळंत हे. हैतच.
पोरपोरी हस्त्येत.
रडू रडू होतंय मला.

येशीतल्या मारोतीरायाला दोन रुपैचा नौस बोलून आलेय.
“द्येवा, माजीबी बदली कर” म्हनूनशान!  

*शतशब्दकथा 

Thursday, July 11, 2013

१७०. विवेकानंदांचा वेदान्त विचार: भाग १४: माया

भाग १३ 

योगी अरविंद एके ठिकाणी असे म्हणतात की, What people call consistency is usually a rigid or narrow minded inability to see more than one side of the truth or more than their own narrow personal view or experience of things.”

श्री. अरविंदांनी हे विधान त्यांच्यावर केलेल्या तार्किक विसंगतीच्या आरोपांना उल्लेखून, अनुलक्षून केले होते. परंतु याच विधानात विवेकानंदांवरील आरोपांचेही उत्तर मिळते. श्री. मुजुमदार लिहितात, “‘But in India and also abroad Vivekananda spoke extempore, inspired by ideas and circumstances, which made a deep impression on his mind. He hardly cared if his words were consistent with one another. Truth does not consist in just a position of mutually consistent sentences. So, Vivekananda believed but in the spirit of the words uttered.”

विवेकानंदांचे निर्गुण ब्रह्म, सगुण ब्रह्म आणि जगत् याविषयीचे विचार वाचले, विशेषत: ते सलगपणे वाचले की सामान्य माणसाचा गोंधळ उडण्याची शक्यता असते. हा गोंधळ होऊ नये म्हणून विवेकानंदांचा आणखी एक विचार जाणून घेणे आवश्यक ठरते आणि हा विचार आहे 'मायेचा!

शंकराचार्यांच्या मते ब्रह्मच फक्त सत्य आहे आणि बाकी सारे मिथ्या आहे; ब्रह्म हेच ‘सच्चिदानंद’ होय; सर्व जीव हे वस्तुत: ब्रह्मच आहेत. थोडक्यात म्हणजे, ब्रह्म -एकमेवाद्वितीय ब्रह्मच - अनेकविध रुपे धारण करते. याचे स्पष्टीकरण देताना शंकराचार्य विवर्तवादाचा सिद्धान्त मांडतात. यानुसार संपूर्ण जगत् हे ब्रह्मावरील विवर्त आहे. या सिद्धान्ताच्या स्पष्टीकरणार्थ शंकराचार्य नेहमीच सर्प-रज्जुचे उदाहरण देतात. या ठिकाणी रज्जुचे वास्तविक सर्पात रुपांतर होत नाही, अन तरीही सर्प मात्र खरा भासतो. तद्वतच ब्रह्माचे वास्तविकपणे जगात रुपांतर होत नाही, पण जग मात्र आपल्याला खरे भासते. मायेमुळेच आपल्याला जगाचा भास होतो. माया त्’ही नाही आणि असत्’ही नाही, ती त्-असत्-विलक्षण आहे.

विवेकानंदांनी केवलद्वैतवादाचा मायेचा हा सिद्धान्त स्वीकारला जरुर आहे, पण जसाच्या तसा मात्र नाही. शंकराचार्यांनी मांडलेल्या मायेच्या सिद्धान्तात विवेकानंदांनी काही बदल घडवून आणलेले आहेत.  रामानुजाचार्य अथवा मध्वाचार्यांप्रमाणे विवेकानंद माया सिद्धान्ताचे खंडन करत नाहीत ही बाब आपण लक्षात ठेवली पाहिजे. विवेकानंदांना माया तत्त्वत: मान्य आहे. पारमार्थिक पातळीवर जगाचा नकार आणि व्यावहारिक पातळीवर जगाचा स्वीकार - या दोन्ही गोष्टी एकाच वेळी घडणे म्हणजे माया असा अर्थ विवेकानंद लावताना दिसतात.

श्री. मुजुमदार यांच्या शब्दांत सांगायचे तर, Vivekananda’s aim in propounding the Advaita was not to spin a cobweb of metaphysics with the help of niceties of logial analysis. All that he was keen on emphasizing was the basic truth that the Absolute, which is Existence – Consiousness – Bliss, is the underlying reality of all the ‘IS’. Vivekananda’s exposition of the Maya doctrine is, therefore, slightly different from the orthodox Advaiata view.

विवेकानंदांच्या मते माया ईश्वराचीच शक्ती होय. ती ईश्वराचे नामरुप होय. या नामरुपत्मक विकारालाच माया म्हणतात. या मायेचे अस्तित्व निर्विकार सत्तेवर अवलंबून असते आणि तिच्याहून स्वतंत्र असे अस्तित्व  मायेला नसते. मायेची व्याख्या करताना विवेकानंद म्हणतात, माया म्हणजे आपण काय आहोत आणि आपल्या सभोवार आपण काय बघतो हयासंबंधीचे अगदी वस्तुस्थिती निदर्शक साधे सरळ वर्णन.

आपल्या दैनंदिन जीवनात पुरेपूर विसंगती भरली आहे. या विसंगतीचे चित्र लंडन येथे दिलेल्या एका व्याख्यानात स्वामीजींनी त्यांच्या ओजस्वी शैलीत रंगविले आहे. देश-काल-कार्यकारणभावाचे कोडे सोडविण्याचे मानवी मनाचे प्रयत्न नेहमीच विफल ठरणार आहेत - कारण तीच मानवी मनाची मर्यादा आहे असे स्वामीजींना वाटते. हे कोडे म्हणजेच माया. आपले संपूर्ण जीवनच सत्-असताच्या आधारावर उभारलेले आहे. जीवनाच्या प्रत्येक अविष्कारात हा विरोध आपल्या निदर्शनास येतो. ज्ञानाची कितीही तीव्र लालसा आपल्या मनात निर्माण होवो, आपल्या बुद्धीच्या मर्यादेपुढे आपली काहीही मात्रा चालत नाही. आपली स्वाभाविक प्रेरणा अत्यंत स्वार्थीपणाची असते - पण आपल्या हृदयातून कोणी अमानवी शक्ती आपल्याला  नि:स्वार्थीपणाची दिशा दाखवित असते. प्रत्येक बालक जन्मत:च आशावादी असते. पण उत्तरोत्तर निराशावाद हाच त्याचा स्वभाव बनत जातो. हे असे का - हे कोणालाच सांगता येत नाही. जीवनाची गती अविरत चाललीच आहे - तिला कोठे ना खंड ना कधी विश्रांती! सारी दुनिया मृत्युच्या दिशेने वाटचाल करत आहे पण ज्याला पाहावे त्याला आस असते ती मात्र जीवनाचीच! या ठिकाणी स्वामीजीं महाभारतातील एक श्लोक उदधृत करतात. यक्षाने युधिषिठरास विचारले होते की, या पृथ्वीच्या पाठीवर सर्वात विस्मयकारक काय आहे? त्यावर युधिषिठर उत्तरतो,

अहन्यहनि भूतानि गच्छन्ति यममंदिरम्
शेषा: स्थिरत्वमिच्छन्ति किमाश्चर्यमत: परम्।।

सभोवार प्रत्यक्ष दिसत असते की मृत्यू अहर्निश एकामागून दुस-याचा सारखा फडशा पाडत आहे. तरी उरलेले मात्र स्वत:ला अमरपटटा मिळालेला आहे अशाच थाटात वागत असतात. यापेक्षा आणखी विस्मयकारक काय असू शकते? स्वामीजी म्हणतात, हीच ती माया!

समाजाची अवस्था एखाद्या जुन्यापुराण्या वाडयासारखी आहे. एका ठिकाणी डागडुजी केली की, दुस-या  ठिकाणी पडझड होते आहे. शिक्षण हवे, शिक्षण हवे म्हणून आपण ओरडतो ...... पण शिक्षणामुळे आपले सुख वाढले की दु:ख? शिक्षणाने माणसाचे सारे ज्ञानतंतू दुबळे बनून गेले आहेत, तो अगदी हळवा झाला आहे. हवे कशाला ते शिक्षण - असा प्रश्न पडण्याजोगीच परिस्थिती  सर्वत्र दिसते.

स्वामीजी म्हणतात, हया संसारगतीच्या वास्तव वर्णनाचेच नाव माया. आमच्या या दुनियेचे रहाटगाडगे कसे फिरत आहे याविषयीची सत्यकथा म्हणजे माया.

आपल्याला नेहमी सांगितले जाते की, 'घाबरु नका, निराश होऊ नका, अंतत: सर्वांचेच भले होणार आहे. पण वाईटातून चांगले कसे काय निष्पन्न होणार आहे याविषयी मात्र कोणीच काही बोलायला तयार नाही. कित्येकदा तर असे होते की, भल्याचा मार्ग वाईटातूनच जातो. जीवसृष्टीचेच  उदाहरण बघा. 'जीवो जीवस्य जीवनम्'. ...............सारी जीवसृष्टी दुस-याला मारुनच आपले उदरभरण करत आहे. भल्या मार्गानेच का बरे भले साधले जात नाही या जगात? उत्क्रांतीमध्ये वाईटाची जागा चांगले घेतेच असे दिसत नाही. किंबहुना चांगले गणितश्रेणीने वाढताना दिसत असेल तर वाईट भूमितीश्रेणीने वाढताना दिसते आहे - हीच आहे माया!

शंभर टक्के चांगले अथवा  शंभर टक्के वाईट असे या जगात काहीच नाही. अग्नीचेच उदाहरण घ्या. वापरणाराच्या इच्छेवर आणि क्षमतेवर अग्नीचा चांगला अथवा वाईट उपयोग अवलंबून आहे. हीच आहे माया!

माया हा कसलाही सिद्धान्त नाही. ते केवळ वर्णन आहे. आपल्या जगण्यातील विसंगतींचे वर्णन! या विसंगती आपण संपवू शकत नाही. ज्याक्षणी मृत्यू संपेल त्याच क्षणी जीवनही संपेल अशा रीतीने ते एकमेकांशी बांधले गेले आहेत. म्हणून हे जीवनचक्र असेच अबाधितपणे चालू राहणार आहे.

काय बरे आहे या मायेचे कारण? विवेकानंद म्हणतात, यासंबंधी तर्कशुद्ध प्रश्न मांडणे जेंव्हा जगाला शक्य होईल, तेंव्हाच याचे उत्तर मिळू शकेल. आजच्या संदर्भात हा प्रश्नच मुळी स्वविरोधी आहे.  ब्रह्म निरुपाधिक, कारणरहित आहे. ज्याला कोणतेच कारण नाही, ज्याला कोणतीच उपाधि नाही, त्याचे परिवर्तन होईलच कसे? तेंव्हा परिवर्तन झाले कसे - हा प्रश्नच चुकीचा आहे.

तुम्ही क्रिकेटचा खेळ पाहता. फलंदाजी, गोलंदाजी, ष्टीरक्षण, क्षेत्ररक्षण सारे काही पाहता. पण त्यावर तुम्ही 'काय हो, ती संघभावना की काहीशी म्हणतात ती मात्र नाही दिसली, दाखवा बरे ती! अशी तक्रार केलीत तर काय करायचे? ब्रिटिश तत्त्ववेत्ता Ryle हा याला Category Mistake असे संबोधतो. अर्थात हे तो देकार्तच्या शरीर-मनाच्या तत्त्वज्ञानावर टीका करताना म्हणतो. पण मायेबददल प्रश्न विचारणे ही देखील Category Mistake च आहे.

निरुपाधिक ब्रह्म सोपाधिक झाल्यावर आणि देश-काल-कार्यकारणभावाच्या कक्षेत ते आल्यावर मायेबाबतचा प्रश्न उभा केला जाऊ शकतो. ब्रह्म हे ज्ञानाच्या अतीत आहे, ते ज्ञेय होऊ शकत नाही - मग त्याच्याविषयी बोलणार कसे? हा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी एक गोष्ट सांगितली जाते.

एका जन्मत: अंध व्यक्तीने (येथे केवळ उदाहरण म्हणून अंध व्यक्तीचा उल्लेख केला आहे. ज्यांना अंधत्व बरोबर घेऊन जगावे लागते त्यांचा कोणत्याही प्रकारे अवमान करण्याचा हेतू नाही.) 'दूध पांढरे असते म्हणजे काय? असा प्रश्न विचारल्यावर दुस-या डोळस व्यक्तीने 'बगळयासारखे शुभ्र असे उत्तर दिले. मग अंध व्यक्तीने स्वाभाविकपणेच 'बगळा कसा असतो? हे विचारले. दुस-या ने मग बगळा पकडून त्याच्या हातात दिला. त्याला चाचपून पाहिल्यावर अंध व्यक्ती म्हणाली, ' अरे वा! म्हणजे दुधालाही असे दोन पाय असतात तर! हे  उदाहरण आपल्याला इतकेच सांगते की ब्रह्माविषयी बोलताना आपलीही स्थिती अशीच असते. ब्रह्माविषयी बोलले जाऊ शकत नाही, बोललेच तर ते अर्धवट, अपुरे आणि तद्दन चुकीचे असू शकते.

स्वामीजी म्हणतात, कार्यकारणभावाच्या पलीकडील क्षेत्रात 'का हा प्रश्नच विचारला जाऊ शकत नाही. मायेच्या राज्यातच हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आम्ही म्हणतो की, जेंव्हा तुम्ही हा प्रश्न तर्कशुद्ध पद्धतीने मांडाल तेंव्हाच आम्ही त्याचे उत्तर देऊ. त्याच्या आधी उत्तर मागण्याचा तुम्हाला अधिकार नाही.

मायाविषयक विचार मांडताना विवेकानंदांनी डार्विनच्या उत्क्रान्तीवादाच्या सिद्धान्ताचे, क्रमविकासाचे जोरदार खंडन केले आहे. जेथे वाईटाचा, दु:खाचा, अश्रूंचा, संकटांचा वाराही नसेल अशा जगाची स्वप्ने ज्यांना पाहायची आहेत त्यांनी खुशाल पाहावीत ..... पण वास्तवात असे परिपूर्ण चांगले जग अशक्य आहे.

विवेकानंद म्हणतात, हे जग चांगले किंवा वाईट नाही. हे भगवंताचे विश्व आहे. हे शुभाशुभातीत व स्वयंपूर्ण असे आहे.  ते पुढे असेही म्हणतात, ज्या वेळी आपण हे विसरतो की, हा सारा खेळ आहे आणि आपणही या खेळात सामील आहोत, यातील एक खेळगडी आहोत, त्याच वेळी दु:ख येते; त्याचे वेळी मग कष्टांना फावते; हृदय भारावते. संसार आपल्या अक्राळविक्राळ स्वरुपात भेडसावू लागतो; तुमच्या मानगुटीला बसून तुम्हाला दे माय धरणी ठाय करुन सोडतो.

मायेबददलचे विवेकानंदांचे हे विवेचन वाचून कोणाला एकदम निराश वाटेल. हे जर सारे असेच चालणार असेल तर मग माणसाने प्रयत्न तरी कशाला करायचे? काय आहे त्याच्या बिचा-याच्या हातात? कशासाठी हे सारे नीतिनियम? चांगली कामे करण्याचा उपयोग तरी काय? कोणाचे तरी वाईट केल्याखेरीज आपल्याला आपले चांगले देखील साधता येत नाही - किती भयानक स्थिती  आहे ही!

या प्रश्नावर विवेकानंद असे उत्तर देतात की, प्रथमत: म्हणजे दु:ख कमी करण्यासाठी आपण झटलेच पाहिजे. कारण स्वत:ला सुखी करण्याचा तोच एकमेव मार्ग होय.................. द्वितीयत्:, आपल्याला आपला वाटा उचललाच पाहिजे, आपले काम केलेच पाहिजे, कारण या विरोधाची कोंडी फोडण्याची तीच एकमेव युक्ती आहे. आपण स्वप्नातून जोवर जागे होणार नाही, जोवर हे गंजिफांचे वाडे वसविणे थांबविणार नाही, तोवर चांगल्या आणि वाईट शक्ती संसाराचे हे मृगजळ आपल्या दृष्टीसमोर असेच सारखे नाचवित राहतील. म्हणून तो धडा आपल्याला शिकावाच लागेल......

मायेच्या या स्पष्टीकरणामुळे, मायेच्या या ज्ञानामुळे आपण जरा अधिक शहाणे होऊ अशी विवेकानंदांना आशा आहे. आपला कडवेपणा, स्वमताविषयीचा दुराभिमान आणि माथेफिरुपणा हे दुर्गुण, मायेची जाणीव झाल्यानंतर तरी दूर व्हावेत अशी विवेकानंदांची रास्त अपेक्षा आहे. एरवी आपली बरीचशी शक्ती उगाचच वाया जात असते, निदान तेवढी तरी वाचेल आणि सत्कारणी लागेल अशी त्यांना आशा वाटते.

मायेच्या या स्वरुपाने आपल्याला बिचकून जायचे कारण नाही. मायेचे स्वरुप असेच असल्याने 'खाओ पिओ मजा करो या वृत्तीने जगणेही चुकीचेच आहे. आपण वस्तुत: ब्रह्मस्वरुपच आहोत हे विसरुन कसे चालेल? आपण या मायेतून काहीतरी मार्ग तर काढलाच पाहिजे, नुसते स्वस्थ बसून कसे चालेल?

विवेकानंद केवळ संन्यासी नव्हते तर योद्धा संन्यासी होते. लढाऊ बाणा त्यांच्या नसानसांत होता..... आणि म्हणूनचे ते आपल्याला सांगतात, ही माया - ही सगळीकडे आहे. तिने आपल्याला चहू बाजूंनी घेरुन टाकले आहे. ही माया भयंकर आहे. पण आपल्याला तिच्यातून मार्ग काढून कार्य करीत जावयाचे आहे ..... आपल्याला मार्ग क्रमायचा आहे, मायेच्या हातात हात घालून नव्हे तर तिच्याशी दोन हात करीतच.........आपण प्रकृतीचे साहाय्यक म्हणून जन्माला आलेलो नाही तर तिचे प्रतिस्पर्धी म्हणून जन्माला आलेलो आहोत. आपण तिचे स्वामी आहोत..........

हे साधायचे कसे? तर धर्माच्या मार्गावर चालून! कारण, प्रत्येक धर्म हा या मायेपलिकडे जाण्याचा लहानमोठा प्रयत्नच आहे. अर्थात धर्म ही या प्रवासाची केवळ सुरुवात आहे. काहीच न करण्यापेक्षा हे पहिले पाऊल उचलणे शतपटींने बरे आहे.

विवेकानंदांची माया शंकराचार्यांच्या मायेपेक्षा कशी वेगळी आहे हे आपण इथवर पाहिले. मायेच्या पलिकडे घेऊन जाणारी वाट आपण चोखाळली पाहिजे असे स्वामीजी वारंवार सांगतात. 'श्रृण्वन्तु विश्वे अमृतस्य पुत्रा: आ ये धामानि दिव्यानि तस्थु: .... अशी उपनिषदांची घोषणा विवेकानंदही पुन्हा करीत आहेत. या मायेच्या पलिकडे जे काही तत्त्व आहे, जे मायेच्या अधीन नाही ..... तेथवर आपण पाहोचू शकू असा दिलासाही विवेकानंद आपल्याला देत आहेत.

मायेच्या प्रांतात सगळे स्वरुपत: ब्रह्म आहेत, अभिव्यक्त स्वरुपात नव्हेत याची विवेकानंदांना जाणीव आहे. पण प्रत्येक जीवाला आपले हे ध्येय साध्य करण्याचा हक्क आहे यावर विवेकानंदांचा दृढ विश्वास आहे. श्री. मुजुमदार यांच्या मते, According to Vivekananda, Being or Sat manifests itself into the Universe, Man and Soul. The same divine nature is present in the lowest worm as well as in the highest human being. But Brahman does not manifest equally at all levels of existence. There is a hierarchy of beings. The worm is the lower form and man is the higher form of the manifestation fo the Divine.


मेंढयांच्या कळपातील सिंहाच्या छाव्याची गोष्ट स्वामीजींना अतिशय आवडत असे. आपणही आपले स्वस्वरुप विसरुन मेंढयांप्रमाणे जगत  आहोत याचे त्यांना वैषम्य वाटे. म्हणून ते गर्जतात ...त्तिष्ठत! जाग्रत! प्राप्य वरान्निबोधत....

क्रमश: