ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Sunday, August 29, 2010

४१. स्वप्न

माझे सामान्यज्ञान जेमतेम असल्याने स्वप्नं अनेक प्रकारची असतात इतकच मला माहिती आहे. त्यांच वर्गीकरण अथवा विश्लेषण कोणी मला करायला सांगितलं, तर आनंददायक, भीतिदायक, अजब असे काही प्रकार सांगून मला गप्प बसावं लागेल. मी आपली माझ्या स्वप्नांची विभागणी दोन साध्या प्रकारांत करते - पाहिलेली स्वप्नं आणि पडलेली स्वप्नं!

स्वप्न पाहणं हे काही अंशी आपल्या हातात असतं, पण आपल्याला आपल्या मर्यादांची जाणीव तरूण वयात नसली तरी हळूहळू वय वाढते तशी होत जाते. आणि स्वप्नं पाहण्यावर आपोआप मर्यादा यायला लागतात. स्वप्नं पडण्याला मात्र वास्तवाच काही बंधन नसतं.

मला स्वप्नं बरीच पडतात याच एक अगदी सरळ साध कारण म्हणजे मी भरपूर झोपते, मला नेहमीच भरपूर झोप येते. ’अलिकडे झोप लागत नाही हो फारशी’ अशी तक्रार असणा-या लोकांच मला नेहमीच आश्चर्य वाटतं, कारण मला स्वतःला ’अजून पाच मिनिट झोपायला मिळालं तर काय बहार येईल’ अस रोज सकाळी उठताना वाटत असत.

मला जवळजवळ रोजच रात्री स्वप्नं पडतात. सुट्टीच्या दिवशी दुपारी झोपले तर मला न चुकता दुपारीही स्वप्नं पडतात, एक नाही अनेक पडतात. आता माणसाला स्वप्नं का पडतात, त्या स्वप्नांचे अर्थ काय असू शकतात असल्या विवेचनात मी काही पडणार नाही कारण त्या विषयातले मला काहीही कळत नाही. मला एवढच कळतं की, स्वप्न पडलेली मला खूप आवडत असणार म्हणून मला इतक्या नियमितपणे अशी शेकडो, हजारो स्वप्न पडतात.

’मनी वसे ते स्वप्नी दिसे’ या म्हणीला ओलांडून मला अनेक स्वप्ने पडतात. मला भीतिदायक स्वप्ने क्वचितच पडतात. माझी बहुतेक स्वप्ने विनोदी आणि मजेदार असतात. सगळ्यात गंमतीचा भाग म्हणजे स्वप्न पाहतानाही ’हे स्वप्न आहे’ अशी माझ्या मनात कोठेतरी जाणीव असते. म्हणून स्वप्नातही माझे प्रश्न, माझ्या शंका काही संपत नाहीत. स्वप्नातही ’छे! हे असे घडणे शक्य नाही, हे बहुतेक स्वप्न आहे’ हे मी मला अनेकदा सांगत असते. शंकराचार्यांना हे कळले, तर ते नक्कीच खूष होऊन मला आशीर्वाद देतील. पण मला ’माया’ आणि ब्रह्म समजले आहे असा दावा मी करणार नाही. मी स्वप्न ही संज्ञा डोळे उघडे नसताना जे जे दिसते त्या सगळ्यासाठी वापरते आहे.

आपण ढगांमधून तरंगत आहोत, किंवा पाण्यावरून चालत आहोत हे ’स्वप्न’ आहे हे समजणे तुलनेने फारच सोपे असते. स्वप्न पाहतानाही अनेकदा ’हे स्वप्न आहे’ हे स्वच्छ जाणीव माझ्या मनात असते हा त्यातल्या त्यात गमतीचा भाग आहे! उदाहरणार्थ, मी काही मित्र मैत्रिणींसमवेत पर्वतरांगा चढते आहे - प्रत्यक्ष आयुष्यात माझे जे मित्र-मैत्रिणी एकमेकांना ओळखत नाहीत (कारण ते माझ्या आयुष्यातील वेगवेगळ्या कालखंडांशी निगडित आहेत) ते येथे एकमेकांशी अत्यंत मैत्री असल्यागत वागत आहेत. यांची एकमेकांशी इतकी ओळख कशी आणि कधी झाली हा प्रश्न मला पडला, की आपण स्वप्न पाहत आहोत हे मला कळते. किंवा मी तामीळ अथवा तेलगु अशा भाषांत जेव्हा बिनधास्त सहजपणे बोलत असते - तेव्हा ते स्वप्न आहे हे मला स्वप्नातही कळते - कारण प्रत्यक्ष आयुष्यात मला या भाषा अजिबात बोलता येत नाहीत.

मला स्वप्ने मालिकेच्या थाटातही पडतात. म्हणजे पहाटेच्या झोपेत दारावरच्या अथवा दूरध्वनीच्या आवाजाने स्वप्न सोडून जागे व्हावे लागते अनेकदा. पण असे काम संपवून मी पुन्हा झोपू शकते आणि माझ्या मनाला ’चला, ते मघाचे अर्धवट राहिलेले स्वप्न पाहू पुढे’ असे सांगू शकते आणि ते माझे स्वप्न ब्रेकनंतर मालिका चालू व्हावी अशा थाटात पुढे चालू होते.

अर्थात कधीकधी स्वप्न कोणते आणि वस्तुस्थिती कोणती याबाबत मनात गोंधळ होतो हे खरे! स्वप्नात पूर्ण केलेले काम खरोखर झाले आहे अशा थाटात राहिल्याने काही वेळा मला अडचणी आलेल्या आहेत. म्हणून मधल्या काही वर्षांत मी सकाळी जाग आल्या आल्या स्वप्न लिहून ठेवत असे. अशी सुमारे दोनशे अडीचशे स्वप्ने लिहून झाल्यावर आता सरावाने मी स्वप्न कोणते आणि प्रत्यक्षातले कोणते हे बरोबर ओळखू शकते - म्हणजे असे निदान मला वाटते तरी!

जेंव्हा जेंव्हा माझ्या आयुष्यातले महत्त्वाचे निर्णय घेण्याची वेळ माझ्यावर आली आहे - ती सगळयांवरच येते म्हणा - तेंव्हा तेंव्हा त्या काळात मला स्वप्नांमध्ये असंख्य अनोळखी माणसे दिसलेली आहेत. हे चेहरे ’आपल्याला पुढे भेटणा-या लोकांचे आहेत’ अशी मी स्वत:ची समजूत घालत असते. ’तुमच्यापैकी अनेकांना मी आधी स्वप्नात पाहिले होते’ असे मी माझ्या मित्र मैत्रिणींना म्हणते त्यात मजेचा भाग जास्त असतो - मनाच्या ताकदीबद्दल उगीच अवास्तव दावा करण्यात काही अर्थ नाही. म्हणजे मनाची ताकद अनंत असेल, पण तिचा सर्वार्थाने आपल्याला काही अनुभव येत नाही, आपला अनुभव सीमित असतो. आणि खरे सांगायचे तर स्वप्नांतही आपण कल्पनेचे इमले रचायचे सोडत नाही; स्वप्नातही आपण आणखी काही स्वप्ने पाहत असतो हे मला मजेदार वाटते.

सगळीच स्वप्ने खरी होत नाहीत, त्यातली काही शेवटपर्यंत स्वप्नेच राहतात. म्हणून स्वप्न आणि सत्य यांची सरमिसळ न करण्यात, त्यांचे तुकडे वेगळे राखण्यात शहाणपण असते. सगळी स्वप्ने खरी होत नाहीत ही जशी दुर्दैवाची बाब आहे, तशीच ती कधीकधी सुदैवाचीही बाब असते!

आपल्याला कोणती स्वप्ने पडावीत हे आपल्या हातात नसते. पण कोणती स्वप्ने पाहावीत हे मात्र आपण नक्की ठरवू शकतो. तसेच पडलेल्या स्वप्नांचा उचित अर्थ लावून (त्यांना बरेचदा काही अर्थ नसतो हे समजून घेऊन) आपण पुढची वाटचाल करू शकतो. स्वप्नांना साध्य न मानता त्यांना साधन मानण्यातून हे संतुलन साधता येते.

पण कधीकधी स्वप्न आणि सत्य यांच्यात अगदी पुसटशी सीमारेषा असते! तेंव्हा हे सगळे शहाणपण विसरले जाते आणि व्हायचा तो गोंधळ होतोच. चालायचेच! लहानपणी कधीतरी एका माणसाची गोष्ट वाचली होती. त्याचे घर जळून खाक होते, तरी तो माणूस काही दु:ख करत नाही. त्यावर बघ्यांनी आश्चर्य व्यक्त केल्यावर तो माणूस म्हणतो, "अरे बाबा, आत्ताच माझे पूर्ण राज्य गेले, दु:ख त्याचे करू की या एका घराचे दु:ख करू?” आता हा माणूस अर्थातच राजा वगैरे नसतो, त्यामुळे कोणीतरी त्याची समजूत घालते की ’ते राज्य स्वप्नातले होते, पण घर मात्र प्रत्यक्षातले आहे". तोवर तो माणूस म्हणतो, “कशावरून हे घर आणि तुम्ही सगळे जमलेले लोक माझ्या स्वप्नातले नाही? काय पुरावा तुम्ही सत्य असल्याचा?” त्यावर सगळे निरुत्तर होतात.

जोवर स्वप्न कोणते आणि सत्य कोणते याबाबत आपल्याला निश्चित माहिती नाही, तोवर फार विचार करण्यात काहीच अर्थ नाही. दोन्ही मजेत उपभोगावे एवढेच खरे तर आपल्या हातात आहे.
**

Thursday, August 19, 2010

४०. पाचवी सावित्री

सावित्री म्हटलं की दोनच सावित्री साधारणपणे आठवतात.
पण नीट विचार केल्यावर दोन नाही, तर चार सावित्री डोळयांसमोर येतात.

एक थेट प्राचीन काळातून आपल्यापर्यंत येते ती महाभारताच्या माध्यमातून. सूर्यदेवतेची उपासना करून झालेली ही मुलगी, ’सवितृ’ बद्दलची कृतज्ञता म्हणून तिचे नाव आहे सावित्री. कथा असे सांगते की तिच्या तेजामुळे कोणीही राजपुत्र तिच्याशी लग्न करायला तयार होत नाही. मग ती स्वत:च वर निवडते. वनवास पत्करावा लागलेल्या अंध राजाच्या मुलाची - सत्यवानाची ती पती म्हणून निवड करते. त्याचे एक वर्षाचेच आयुष्य बाकी आहे, हे नारदांनी सांगूनही सावित्री त्याच्याशीच लग्न करते.  

मृत्युशी गप्पागोष्टी करत स्वत:च्या हुषारीने सत्यवानाचे प्राण परत मिळवणारी सावित्री. स्वत:च्या आयुष्याचे निर्णय स्वत: करणारी, बाह्य गोष्टींपेक्षा स्वत:च्या सहचराचे आंतरिक गुण पाहणारी, यमाशी न घाबरता संवाद करणारी सावित्री. तिचे हे सगळेच गुण विलक्षण वाटत लहानपणी; आणि खरे तर अजूनही.

पण कधीकधी असेही वाटते की परिस्थितीपुढे एवढी शरणागती पत्करणे हे सावित्रीने का स्वीकारले असेल? तिच्या स्वत:त असामान्य क्षमता असतानाही? काहीही करून, तडजोड स्वीकारून लग्न केलेच पाहिजे या मानसिकतेतून तिला बाहेर का पडता आले नाही? कदाचित काळाच्या फार पुढे कोणालाच जाता येत नाही हेच तात्पर्य याही कथेतून द्यायचे असेल त्या काळच्या समाजधुरिणांना!

शिवाय यमाकडून सावित्री जे तीन वर मागते तेही जरासे मजेदार आहेत. पहिला वर सावित्री मागते तो सास-याची दृष्टी परत येऊन त्याचे राज्य त्याला परत मिळावे हा. दुस-या वरानुसार स्वत:च्या पित्याला शंभर मुलगे व्हावेत अशी ती मागणी करते. तिस-या वरानुसार सत्यवानापासून तिला स्वत:ला शंभर मुलगे व्हावेत असे ती मागते. यमासारख्याकडून हुषारीने स्वत:च्या मागण्या मान्य करून घेणे हे नि:संशय वादातीत कौशल्य आहे. पण यात सावित्री स्वत:च्या बाईपणाला कमी लेखते असे वाटत राहते नेहमीच मला ही गोष्ट वाचताना! मागून मागायचे, तर स्वत:सारखी एखादी तरी मुलगी तिने मागायला हवी होती अशी हळहळ मला लहान वयात वाटत असे. सावित्रीचा सगळा लढा वैयक्तिक स्वरूपाचा होता - जरी तो तेजोमय असला तरी व्यक्तिगत स्वरूपाचा होता हे जाणवते.

सावित्रीच्या गुणांची झलक परिस्थितीशी हसतमुखाने दोन हात करणा-या अनेक स्त्रियांकडे पाहताना आजही मिळते. स्वत:ला कमी लेखून कुटुंबाचे भले करण्यासाठी कितीतरी असंख्य स्त्रिया स्वत:ची हुषारी खर्च करत असतात. ते करत असताना त्या स्वत:ला कमी लेखण्यात त्यांची ताकद खर्च होते. महाभारतात वर्णन केलेली अशी सावित्री खरोखर होऊन गेली असेल, ती केवळ कविकल्पना नसावी असे भक्कमपणे वाटावे इतक्या स्त्रिया - समाजातल्या अनेक घटकांतील, वयोगटातील, आर्थिक परिस्थितीतल्या स्त्रिया मला पाहायला मिळाल्या.

दुसरी सावित्री म्हणजे जोतिबांच्या बरोबरीने स्त्रियांच्या शिक्षणासाठी झटणारी! हिचा लढा वेगळाच होता. ती यमाला इतर सर्व मर्त्य माणसांसारखीच सामोरी गेली. पण समाजाला सामोरी जाताना मात्र त्या आधीच्या सावित्रीचा तेजाचा वसा तिने चालवला. भारतातल्या स्त्रियांच्या पहिल्या शाळेची पहिली शिक्षिका, अस्पृश्य मुलींसाठी पहिली शाळा चालविणे, अस्पृश्यांसाठी स्वत:च्या घरची विहीर खुली करणे, विधवेचे मूल दत्तक घेणे असे कितीतरी ’पहिले’ प्रयत्न या स्त्रीने केले. त्यात तिला तिच्या पतीची जोतिबांची साथ होती, किंबहुना त्यांची प्रेरणाही होती हे आहे. पण त्या काळात एका स्त्रीने समाजात सुधारणा घडवून आणण्यासाठी इतका सक्रिय पुढाकार घेणे हे असामान्यपणाचे लक्षण होते यात शंकाच नाही. जे इतर कोणाला सुचू नये ते सुचणे, इतकेच नाही तर इतरांचा विरोध असताना ते काम आयुष्यभर सातत्याने आणि निष्ठेने करत राहणे हे विलक्षणच आहे. त्या काळात ’बालहत्या प्रतिबंधक गृह’ चालवणे हा क्रांतीकारक कार्यक्रम होता. सामाजिक काम करत असताना तिने कविताही लिहिल्या. आधुनिक मराठी कवितेतला तिचा वाटा अगदी नगण्य मानता येणार नाही. १८४८ म्हणजे आता फार जुना काळ वाटतो, पण त्या काळच्या वर्तमानाचे चटके सावित्रीबाईंनी सोसले.

जोतिबांच्या निधनानंतर शेतकरी कामकरी वर्गाकरता विचारांचे आणि संधींचे नवे दालन उघडणा-या ’सत्यशोधक समाजाची’ धुरा सावित्रीने यशस्वीपणे सांभाळली. शिक्षणाचे आणि समाजसुधारणेचे काम करत असताना या सावित्रीची दृष्टी अधिक व्यापक होती, त्यात कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नव्हता असे जाणवते. ’स्व’ विस्तारला की काय होते याचे चित्र या सावित्रीच्या आयुष्यात दिसून येते. काळाच्या पुढे जाऊन विचार करण्याची, काळाच्या पुढे जाऊन कृती करण्याची एक नवी परंपरा या सावित्रीने निर्माण केली असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. सत्यवानाच्या सावित्रीइतकीच हीदेखील तेजस्वी आणि स्वयंपूर्ण होती - पण हिच्या तेजाचा अविष्कार दीनदुबळयांसाठी होत राहिला, स्वत:साठी नाही.

काही वर्षांपूर्वी तिसरी एक सावित्री भेटली. ती म्हणजे पु.शि. रेगे यांची सावित्री. त्यात पहिल्या वाचनात खरे तर सावित्रीपेक्षा ’मोर यावा’ म्हणून आजीजवळ हट्ट करणारी, ’मी येईन तेंव्हा आधी लच्छीनं नाचलं पाहिजे’ ही मोराची अट लक्षात ठेवून सदैव आनंदात राहणारी आणि त्या ओघात मोराचे भान न उरणारी लच्छी जास्त भावली होती. पुढे कधीतरी त्या कथेचा  ’म्हणजे आपल्याला जे हवं आहे ते आपणच व्हायचं’ असा अर्थ लावणारी सावित्री वेगळीच आहे हे जाणवलं आणि तिच्याशी एक प्रकारची जवळीक निर्माण झाली.

रेगेंची सावित्री आवडण्याचं आणखी एक कारण म्हणजे मलाही तिच्यासारखी स्वगतात्मक पत्र लिहायला आवडतात. पूर्वी पत्र लिहायचे; आजकाल ई-मेल लिहिते मी, इतकाच काय तो फरक! शिवाय असा मनमोकळा संवाद साधायला समोरच्या माणसाची आणि आपली फार ओळख असायला पाहिजे असा माझा कधीच आग्रह नसायचा, आजही नसतो. किंबहुना जोवर ओळख कमी असते तोवरच मनमोकळा संवाद होतो, असा माझा अनुभव आहे .असो.  हा अतिशय वादाचा मुद्दा होऊ शकतो याची मला जाणीव आहे.

ही सावित्री म्हटले तर आत्ममग्न आहे, म्हटले तर स्वत:ला विसरून दुस-यासाठी काही करणारी आहे. तिला वीणा वाजवता येते, लेखन करता येते. स्वत:च्या मर्यांदांची तिला जाणीव आहे तशीच स्वत:च्या सामर्थ्याचीही. स्वत:च्या भावनांना ती निखळपणे सामोरी जाऊ शकते, पराभवाचे तिला दु:ख होते, पण त्या पराभवाला स्वीकारून तिला पुढेही जाता येते. ही सावित्रीही गूढच आहे, पण ती पुष्कळशी तुमच्या आमच्यासारखी वाटते. मला वाटतं, एका विशिष्ट वयात, तारूण्याच्या काळात प्रत्येकच तरूण मुला मुलीत या सावित्रीचा अंश दडलेला असतो. काही त्याच्यासह पुढे जगतात, काही तो गाडून त्याच्या पायावर जगण्याची इमारत रचतात.

आणखी काही काळाने पॉंडिचेरीच्या वास्तव्यात आणखी एक सावित्री भेटली, ती व्यक्ती म्हणून नाही तर एक असामान्य कल्पना म्हणून! योगी अरविंदांनी सत्यवान – सावित्री कथेचा आध्यात्मिक स्तरावरून एक वेगळाच अर्थ लावला आहे. त्यांच्या मते वैदिक ऋषींनी या कथेद्वारे शाश्वत सत्य सांगण्याचा प्रयत्न केला आहे. अरविंदांच्या मते सत्यवान आंतरिक दैवी सत्य असलेल्या पण अंध:कारात आणि अज्ञानात अडकलेल्या मानवजातीचा प्रतिनिधी आहे. सत्यवानाचा पिता द्युमत्सेन (हा अंध आहे) हे अंध झालेले दैवी मन आहे. सावित्रीचा पिता अश्वपति तपस्येचे प्रतीक आहे. तर स्वत: सावित्री तपस्येतून उदय पावणारी आणि दैवी सत्याला अज्ञानातून मुक्त करणारी दैवॊ शक्ती आहे. सावित्री शाश्वततेचं, अनंतत्त्वाचं रूप आहे. योगी अरविंदांच्या मतानुसार सावित्री हा परिवर्तनाचा मंत्र आहे - आणि ते येथे कोणत्याही सामाजिक परिवर्तनाबाबत बोलत नाहीत तर मनुष्यत्वाकडून ईशत्वाकडे नेणा-या मार्गाबद्दल बोलत आहेत. मानव्याकडून महामानव्याकडे होणा-या प्रवासाबाबत बोलत आहेत.

अरविंदांची सावित्री मला जवळची वाटली, पण ती मला समजली नाही. तितकी प्रगल्भता माझ्यात बहुधा तेव्हा नव्हती - आणि कदाचित आजही नाही. अरविंद सांगतात त्या दृष्टीकोनातून सावित्रीची कथा वाचली, की वरती मी उल्लेख केला होता ते सारे प्रश्न गायब होतात. आजवर न दिसलेले, न भावलेले, न कळलेले काही नवे कळल्यासारखे वाटते - पण ते क्षणभरच! एक भव्य दिव्य स्वप्न डोळ्यांसमोर यावे पण क्षणार्धात नाहीसे होऊन आपले मोडके तोडके जगणे शिल्लक राहिले आहे अशी विषण्णता मला अरविंद वाचताना येते. म्हणून माझ्यापुरता मी एक नियम केला आहे - मी फक्त अरविंदांची पत्रे वाचते. त्यात एक वेगळेच अरविंद समोर येतात – मिस्किल, साधे, मानवी, दुस-यांच्या मर्यादा समजून घेणारे. ते मग जवळचे वाटतात – मित्रासारखे वाटतात.

या सगळ्या सावित्रींची आठवण मागचे काही दिवस सातत्याने माझ्यासोबत आहे.

त्याचं काय झालं, काही मित्रमैत्रिणींच्या प्रोत्साहनाने मी संगीत ऐकण्याकडे एकदम वळले. माझ्या नादिष्ट स्वभावानुसार मग दिवसातला (आणि रात्रीचाही) जमेल तितका काळ मी संगीत ऐकण्यात घालवायला लागले. कुमार गंधर्वांनी गायलेल्या कबीराच्या रचना ऐकताना मला अनेक गोष्टी आठवल्या. त्यात प्रकर्षाने आठवली ती पु. शि. रेगेंच्या ’सावित्री’मधली लच्छी. म्हणून प्रवासात असतानाही रात्री दहा वाजता एका मैत्रिणीला फोन करून मी तिच्याकडचं ’सावित्री’ माझ्यासाठी आणायला सांगितलं  आणि तिने ते आणलही.

तो दिवस चांगला गेला होता माझा. त्या आनंदात ’सावित्री’ वाचायला घेतली. लच्छीची गोष्ट संपली आणि मला एकदम बावचळल्यासारखचं झालं. कारण त्या ’सावित्री’शी माझा काही सूर जुळेचना. जेमतेम १२० पानांच पुस्तक आहे ते - त्यामुळे तासाभरात वाचून झाल. आणि ते झाल्यावर फार रिकामं वाटल मला - उदास नाही (ते चाललं असतं मला!) - रिकामं!

रात्रभर माझी चिडचिड झाली. एक दोन जणांना ई मेल लिहून उगाच माझा वैताग त्यांच्यावर ढकलायचा प्रयत्न केला. ’सावित्री मला कळलीच नाही’ अशी तक्रारही मी काही जणांकडे गेली. त्यावर सगळे फक्त हसले - समंजसपणे हसले - त्यामुळे मला जास्तच रिकामं वाटायला लागलं!

मला वाटतं मी ’सावित्री’ला बाहेरच्या जगात शोधायचा प्रयत्न करते ही आत्ताच्या घटकेला सगळ्यात मोठी अडचण आहे. खरी ’सावित्री’ बहुधा आपल्यातच असते. ज्या ज्या टप्प्यावर जी जी सावित्री समजण्याची माझी लायकी होती, ती ती सावित्री मला भेटली. बुद्धीची तलवार परजून मी विश्लेषण केल्याने त्यातल्या कोणत्याच सावित्रीचे काही बिघडले नाही - अर्थात माझेही काही बिघडले नाही म्हणा, उलट काही घडतच गेले. सावित्री वेगवेगळ्या स्वरूपांत समोर येते, कारण त्या त्या वेळच्या माझ्या गरजा वेगळ्या असतात. मी बदलते म्हणून मला भावणारी ’सावित्री ’ बदलते. आता माझी गरज बदलल्याने जुनी ओळखीची सावित्री मला अनोळखी वाटण अगदी स्वाभाविक आहे. म्हणून जुनं नातं चुकीचं होतं, गैरवाजवी होतं, अवास्तव होतं .. असे कोणतेही निष्कर्ष घाईने काढायचीही गरज नाही. त्या सगळ्यांच ऋण घेऊनच आता पुढची वाटचाल करायला हवी. सावित्रीचा वसा घ्यायचा म्हणजे स्वत:च भानं राखून जगायचं...

सावित्री हवी, तर स्वत:च सावित्री व्हायला हवं............ते अद्याप जमेल की नाही हे माहिती नाही.
पण आता बहुतेक पाचवी सावित्री भेटण्याची वेळ आलेली दिसते आहे

Friday, August 13, 2010

३९. फसवणुकीचं दु:ख

हे संपूर्ण विश्व म्हणजे एक कोडं, एक गूढ आहे. हे गूढ केवळ चंद्र – सूर्य – तारे यांच्यामुळे नव्हे तर माणसांच्या वागण्यामुळेही जाणवतं! एखादा माणूस एखाद्या विशिष्ट प्रसंगी अमूक असा का वागला असावा - याच उत्तर त्याच्या /तिच्या मनाचा, परिस्थितीचा सहृदयतेने विचार करूनही अनेकदा मिळत नाही!

इतकी वर्षे उलटली तरी नानांनी आणि भाऊंनी मला गोंधळात टाकलेलं आहे. आता दोघेही काळाच्या पडद्याआड गेले, त्यामुळे भविष्यात कधीतरी उत्तर मिळेल ही आशाही संपलीच आहे. नाना सुप्रसिद्ध संगीतकार! उभा महाराष्ट्र गेली पन्नास वर्षे त्यांच्या संगीतावर लुब्ध आहे. आणि भाऊ ज्येष्ठ संस्कृततज्ञ! देश विदेशात त्यांना अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत. लोक त्यांना ’या शतकाचा कालिदास’ म्हणतात. डाळ तांदूळ महागले तरी हल्ली पदव्या अन पारितोषिके भलतीच स्वस्त झाली आहेत.

बरीच वर्षे झाली त्या घटनेला आता. नितीन नुकताच कन्याकुमारीला जाऊन आला होता आणि स्वाभाविकपणे विवेकानंदांच्या विचारांनी भारावून गेला होता. आपणही १२ जानेवारीला विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने मोठा युवक मेळावा घ्यायचा अशी त्याची कल्पना होती.

आमच्या ग्रुपमध्ये - मंथनमध्ये - यावर बरेच विचारमंथन झाले. सर्वानुमते मोठा कार्यक्रम करायचा ठरले आणि आम्ही सगळेजण झपाटून कामाला लागलो.

या युवक मेळाव्यासाठी नवीन गीत लिहिले जावे आणि तेही संस्कृतमध्ये अशी कल्पना सुनीताने मांडली. संस्कृत आम्हाला कोणालाच येत नव्हते, तरीही आम्ही ती कल्पना उचलून धरली. पण लिहिणार कोण? याला त्याला विचारल्यावर चंदूच्या काकांनी भाऊंचे नाव सुचवले. आम्ही बेधडक भाऊंकडे गेलो, त्यांच्याशी बोललो. पंचवीस तीस हेलपाटे घातल्यानंतर भाऊंकडून आम्हाला एक छान संस्कृत पद्य मिळाले. “कितीही संकटे आली तरी ध्येयमार्गावर पुढे पुढेच चालत राहिले पाहिजे" असा सुंदर आशय होता त्या गीताचा! आम्ही सर्वजण भलतेच खूष होऊन गेलो.

या गाण्याला चांगली चाल लावायला पाहिजे हे आमच्या आठवडाभराने लक्षात आले. पुन्हा धावपळ. अखेर भाऊंनीच नानांचे नाव सुचवले. नानांचे नाव ऐकून आम्ही दबकलो. पण भाऊंनी एक फोन करताच नानांची भेटीची वेळ मिळाली. नानांनी शांतपणे आमचे बोलणे ऐकून घेतले. ’तरूण मुले मुली विवेकानंदांच्या नावाने काही कार्यक्रम करताहेत हे मला मानधन मिळाल्यासारखेच आहे’ असे काहीबाही ते म्हणाले.

नानांनी दहा दिवसांत गाण्याची कॅसेट आमच्या हाती दिली तेव्हा आमच्या डोळयांत पाणी आले. ’मंथन’च्या कार्यालयात त्या गाण्याची अनंत पारायणे झाली. कार्यक्रमाच्या आठ दिवस आधीच आम्हा कार्यकर्त्यांच्या तोंडी ते गाणे बसले - अगदी अर्थासकट!

वेळ मिळाला तेव्हा मी धावतच जनुकाकांकडे गेले. हे गाणे ऐकवून मला त्यांना फक्त चकितच नाही तर सुखीही करायचे होते. माझ्या लगबगीने जनुकाका गोंधळले होते. मी कॅसेट चालू करून मोठया अपेक्षेने जनुकाकांकडे पाहत होते.

पण आश्चर्याचा धक्का जनुकाकांना नाही, तर मला बसायचा होता! कारण जनुकाका ते गाणे अगदी त्याच चालीत गुणगुणत होते. माझ्या आधीच ही कॅसेट त्यांना कोणीतरी ऐकवली होती तर! पण पुढचे वाक्य ऐकून मी चक्रावलेच! कारण काका म्हणाले, “ वा! मजा आली! पंचवीस वर्षांपूर्वीचे हे गाणे.. त्याचे शब्द, त्याची चाल आजही किती ताजी वाटतेय नाही! कोठे मिळाले तुला हे इतके जुने गाणे?”

मी गप्पच होते. काकांना माझी मनस्थिती आणि या गाण्याची परिस्थिती यातले काही माहिती नसल्याने ते सविस्तर बोलत होते. पंचवीस वर्षांपूर्वी भाऊंनीच हे गीत लिहिले होते. काकांनी त्यांच्या संग्रहातले पुस्तक काढून मला ते गाणे दाखवले. आणि पंचवीस वर्षांपूर्वी नानांनीच या गाण्याला चाल लावली होती!

धरणी पोटात घेईल तर बरं - असं त्या क्षणी मला वाटलं. जुनीच गोष्ट आपण नव्याने निर्माण करत आहोत असा आव भाऊंनी आणि नानांनी का आणला असेल? आमच्यासारख्या तरूणांशी ते दोघे असा खेळ का खेळले? त्यातून त्यांना नेमके काय समाधान लाभले असेल? एकजण एका वेळी कदाचित विसरू शकतो - पण दोघेही गाणे जुने असल्याचे विसरले - हा योगायोग नक्कीच असू शकत नाही. ते आम्हाला फसवण्याच्या भरात स्वत:लाही फसवत होते, हे त्यांना कळलेच नाही का? आपण कधीतरी, कोठेतरी उघडे पडू अशी त्यांना शंकाही आली नाही का?

आजही तो क्षण मला भयंकर अपमानास्पद वाटतो. आजही त्या आठवणीने माझे डोळे पाणावतात.
फसवणुकीच दु:ख कळत नकळत आयुष्य व्यापून टाकतं!!

Friday, August 6, 2010

३८. काही कविता: १२ पांडुरंग

बेल वाजली..
’आत्ता या वेळी कोण?’
चडफडत दार उघडले,
तर समोर पांडुरंग -
मला म्हणाला, “बोल".

कटेवर हात नव्हते,
पायाखाली वीट नव्हती,
चंदनाचा टिळा नव्हता,
भोवती भक्तीचा मळा नव्हता.

मी म्हटले, “या, बसा.
सुखदु:खाच्या गोष्टी बोलू हवे तर,
पण उगीच दांभिक
देवत्त्वाचा आव आणू नका.”

“हे तर लई बेस झालं"
म्हणत तो विसावला,
आरामखुर्चीत बसून
गॅलरीतून दिसणारा
आकाशाचा तुकडा
न्याहाळताना हरवून गेला.

त्याने मला
प्रश्न विचारले नाहीत,
मीही नाही.
त्याने मला
उपदेश केला नाही,
मीही नाही.
त्याने स्वत:भोवती
एक अदृष्य भिंत रचली,
मीही तेच केले.
माझ्या सहवासात
त्याने स्वत:चे एकाकीपण
मनमुराद जपले -
मीही तेच केले.

तरीही आम्ही
एकमेकांचे झालो
आणि त्या एकतानतेतही
दोन भिन्न वस्तू उरलो.

खूप दिवसांनी
काचेला तडा जाताना
मधेच एकदा भावूक म्हणाला,
“ज्ञाना, तुका, नामा
गेल्यापासून
जीव रमत नाही....”
त्याला पुढचे बोलू न देता
(ते जरासे चुकलेच माझे!)
मी चकित होऊन म्हटले,
“मायेच्या
या जंजाळात अडकून
देवा, तुम्ही वायाच गेलात!”

त्याने दयार्द्र
(की कसल्याशा त्याच)
नजरेने माझ्याकडे पाहिले
आणि गप्प झाला.
माझे लक्ष नसताना
कधीतरी अचानक
मला न सांगताच
हलके निघून गेला.

माझ्या घरात
अजून त्याची
वैजयंती माळ आहे;
सगळे व्यापून
एकाकीपणाशी
चिरंतन नाळ आहे;
मुठीत आलेले
हरपून गेले
रौद्र त्याचा जाळ आहे;
व्याकूळ स्वर
भिरभिरणारा
अनंत बाहू काळ आहे.

वाट पाहते मी रोज
पण मला खात्री आहे-
तो इकडे फिरकणार नाही,
विटेविना त्याचा
अधांतरी पाय आता
माझ्या दारात थिरकणार नाही.

आता अखेर
मलाच पाऊल उचलावे लागेल,
त्याच्या दारात
जाऊन म्हणावे लागेल,
“बोल".

पण तो अखेर
पांडुरंग आहे.
माझ्या घरात येणे, गुंतणे
आणि निघून जाणे
त्याला शक्य होते -
मला जमेल का गुंतणे?
आणि गुंतल्यावर
सहज निघून जाणे?


पुणे १५ मार्च २००५ २१.३०