ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Thursday, March 7, 2019

२५४. अवघड विषयाचा तास


पुण्यात बऱ्याच काळाने आलं की इथली वाहनांची गर्दी पाहून भीती वाटते. दरवेळी त्यावर मात करून काही आठवड्यांसाठी आले असले तरी मी स्कुटी चालवते. पण यावेळी मात्र काही ना काही कारणांनी मैत्रिणीकडं ठेवलेली स्कुटी आणायला जमलं नाही. वेगवेगळ्या कामांसाठी लांब अंतरांवर जायचं असल्याने तशीही मी स्कुटी वापरण्याची शक्यता जवजवळ नव्हतीच हे स्कुटी न आणण्यामागचं मुख्य कारण.

कामासाठी वेळेत पोचायचं असतं तेंव्हा रिक्षा वापरायची आणि घरी येताना निवांत वेळ हाताशी असल्याने बससेवेचा उपयोग करायचा असं एकंदर सोयीचं वाटलं आणि ते करत गेले.

गेल्या दोन-तीन आठवड्यांत अनेक रिक्षावाल्यांशी गप्पा झाल्या आणि पुण्याचे रिक्षावाले हे एक स्वतंत्र विद्यापीठ (चांगल्या अर्थाने)  असल्याचा मला (पुन्हा एकदा) साक्षात्कार झाला. एका रिक्षावाल्याने मला मसुद अजहर या दहशतवाद्याचा पूर्ण जीवनक्रम समजावून सांगितला. तर दुसऱ्या एकाने नोटाबंदीने काय साधलं यावर त्याचे मौलिक विचार ऐकवले. विलास नावाच्या एका रिक्षाचालकाने (नाव बदलले आहे) त्याची सगळी जीवनकहाणी सांगितली, आणि काकू, तुम्हाला काय वाटतं, बरोबर केलं ना मी?’ असं वारंवार मला विचारलं. आणखी एकाने आमच्या विभागातल्या राजकारणाची अद्ययावत माहिती मला दिली. तर कोणी मेट्रो झाल्यावरही वाहतुकीचा प्रश्न कसा मिटणार नाही हे सांगितलं.

आज पासपोर्ट कार्यालयातलं काम अपेक्षेपेक्षा लवकर संपलं. मग आगाखान पॅलेसला भेट द्यायचा विचार मनात आला. पासपोर्ट कार्यालयाच्या बाहेर रिक्षांची रांग असते, पण जवळच्या अंतराला नकार देण्याची पुणेकर रिक्षावाल्यांची परंपरा लक्षात घेऊन मी ओला रिक्षा बोलावली. पुढचा अर्धा तास मग त्या तरूण रिक्षावाल्याने माझी रीतसर शाळा घेतली.

अहो मॅडम, इथं एवढ्या रिक्षा असतात, ओला कशाला बुक केली तुम्ही?” मी रिक्षात पाऊल टाकताक्षणी त्याचा प्रश्न.

मग जवळच्या ठिकाणी जायला रिक्षावाले तयार नसतात असं मी म्हटलं तर तो म्हणाला, अहो, ओलावाली रिक्षा महाग असते. वीसेक रूपये जास्त द्यावे लागतात तुम्हाला. ते ना आम्हाला मिळतात, ना तुम्हाला, मारवाडी मालकाची भरपाई करता तुम्ही लोक. त्यापेक्षा रिक्षावाल्याला दहा रूपये जास्त दिले तर काही बिघडणार नाही तुमचं!” त्याच्या या सल्ल्यावर मान डोलावत मी पुढच्या वेळी लक्षात ठेवेनअसं नम्रपणे सांगितलं.

मी वाद न घातल्याने किंवा रिक्षावाल्यांवर जास्त टीका न केल्याने या दादांना आणखी स्फुरण चढलं. लोकसभेत कोण जिंकेल असं तुम्हाला वाटतं?” असा थेट प्रश्न माझ्यावर येऊन आदळला. मी चकित झाले आणि सावधही. सावध अशासाठी की भारताची विभागणी सध्या मोदी-समर्थक आणि मोदी-विरोधक अशा दोन गटांत झाली असल्याचा प्रत्यय पुण्यात आल्यापासून मला वारंवार आला होता.

तसं काही सांगता येणं अवघड आहे हो. तुम्हीच सांगा, तुमचा काय अंदाज?” कुंपणावरची भूमिका घेण्यात मी आता पटाईत झाले आहे.

दादांनी एकदम गाडी बदलली म्हणजे संभाषणाची गाडी. मला विचारलं, कुठं राहता तुम्ही?” मी माझ्या उपनगराचं नाव सांगितलं.

त्याने विचारलं, तुमचे आमदार कोण आहेत, माहिती आहे का तुम्हाला?”

मला अर्थातच माहिती नाही. तरी मी अंदाजाने एक नाव घेतलं. तो हसला. मला म्हणाला, त्या मॅडम कोथरूड मतदारसंघाच्या आमदार आहेत, तुमचे आमदार आहेत – श्री .....”.

मी आठवल्यासारखं मान डोलावत म्हटलं, हो, त्या अमुक पक्षाचे आहेत ना ते, आता आठवलं.

काय मॅडम तुम्ही पण. ते त्या नाही तर ... पक्षाचे आहेत. आता त्याच्या स्वरांत एक प्रकारची तुच्छता मला जाणवली. की तो फक्त आभास होता? चर्चा थांबवण्यासाठी मी मोबाईलमध्ये डोकं घातलं.

तुमचे नगरसेवक कोण आहेत हे तरी माहिती आहे का तुम्हाला?” त्याचा पुढचा प्रश्न.

नाही हो, नाही माहिती, माझ्या मते मी सरळ उत्तर दिलं होतं.

तुम्ही मतदान केलं होतं का हो?” दादा काही मला सोडायला तयार नव्हते.

महापालिकेच्या वेळी नाही केलं. मी दिल्लीत होते तेव्हा. मी अर्धसत्याचा आश्रय घेतला. म्हणजे मी मतदान केलं नाही हे खरं पण मी दिल्लीत होते हे मात्र खोटं.

हे काही बरोबर नाही, मद्दान केलं पाहिजे मॅडम तुमच्यासारख्या लोकांनी. आता नाव नोंदवलं का पुन्हा?” मी होकार दिला.

कुठं केली नावनोंदणी?” त्याने संशयाने विचारलं.

ऑनलाईन केली, मी सांगितलं. यावर मात्र त्याचा चटकन विश्वास बसला. बायकोचं नाव राहिलंय नोंदवायचं, ते आता करतो ऑनलाईन, असं तो म्हणाला.

एकदाची माझी (सत्व)परीक्षा संपली म्हणून मी सुस्कारा सोडला.

मोदी साहेबांनी नोटाबंदी केली तेंव्हा किती लोकांनी पैसे फेकले तुम्हाला माहिती आहे का?” पुढचा प्रश्न आला. मी नकारार्थी मान हलवली. मग त्याने मला नोटबंदीचे फायदे, सुकन्या योजना, उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना ... अशा किमान अर्धा डझन योजनांवर प्रश्न विचारले. मी अंदाजपंचे दिलेली काही उत्तरं बरोबर आली (कारण नाव बदललं असलं तरी योजना जुन्याच आहेत) काही चुकली – कारण गेली काही वर्षी माझा इथल्या वास्तवाशी तुटलेला संपर्क.

तो दणादण बोलत होता, श्वास घ्यायलाही न थांबता. मग आगाखान पॅलेस जवळ आला तसं समारोप करायच्या थाटात म्हणाला, तुमच्यासारखे शिकले सवरलेले लोक काही माहिती घेत नाहीत आणि उगा मोदी साहेबांवर टीका करत बसतात. काँग्रेसची राजवट पाहिजे काय तुम्हाला परत?”

मी खरं तर मोदी सरकारवर कसलीही टीका केली नव्हती की काँग्रेसची भलावणही केली नव्हती. पण माझ्या विभागाच्या नगरसेवकाचं आणि आमदाराचंही नाव मला माहिती नसल्याने मी खजिल होते. आणि त्याहीपेक्षा या तरूण माणसाला असलेल्या राजकीय आणि प्रशासकीय माहितीने थक्क झाले होते. त्याचं बरोबर आहे. इतकी माहिती तर एक नागरिक या नात्याने मला असायलाच हवी.

मी भ्रष्ट काँग्रेस राजवटीची समर्थक नाही असं मी स्पष्ट केल्यावर त्याला जरासा दिलासा मिळाल्यासारखा वाटला. अर्ध्या तासाच्या संभाषणात तो पहिल्यांदा हसला. मला म्हणाला, मॅडम, यावेळी मद्दान करा आणि कमळावरच शिक्का मारा. येऊद्यात परत मोदीच.

मी हसून मान डोलावली. मी आगाखान पॅलेसच्या प्रवेशद्वाराकडे वळलं. तो पुढं गेला.

शाळेतला अवघड विषयाचा तास संपल्यावर वाटायचं तसं वाटलं.