ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Wednesday, September 25, 2013

१७७. यष्टी

परवापासून घरात, साळंत “यष्टी येणार” बोल्तेत.
गुर्जीबी ‘जगाची कवाडं उगडणार’ असलं कायबाय म्हन्ले.
आमी समदयांनी जग्याकडं माना वळवून पायलं; तर बेनं रडाया लागलं जोरात.

राती भाकरी हाणली की माजे डोळे गपागपा मिटत्यात.
आण्णा म्हन्ले, “अन्जाक्का, झोपू नका. आपण एसटी पहायला जाऊ”
“अंदारात दिसाचं नाय; सकाळी जाऊ” असं म्या बोल्ले तर आजीबी हसाया लागली.

चावडीवर पोरंसोरं, आजीसकट झाडून समद्या बायाबी आल्यता.
मान्सं तमाकू थुकत व्हती.
बत्तीच्या उजेडात म्या आण्णांच्या मांडीवर जाऊन बसली.
ते ‘विकास व्हणार, गाव सुदारणार’ म्हनत व्हते.

जोरात आवाज आला. डोंगरावर कायतरी चमाकलं.
“यष्टी” समदे वराडले.

आण्णा हसत व्हते.
तेस्नी मला खांद्यावर बशिवलं.
लई लई दिसांनी.


मला यष्टी आवडली. 

Monday, September 16, 2013

१७६. नर्मदा खो-यातून ... (२)


पुनर्वसन नेमकं किती कुटुंबाचं करायचं यामध्ये अजून घोळ आहेत. ‘घोषित’ कुटुंबांची मध्य प्रदेशमधली संख्या आहे ५२५७; पण यात सरकारने ‘वयस्क पुत्र’ (१८ वर्षांवरील मुलगे) धरलेले नाहीत. यातही सरकारने आकड्यांचा खेळ केला आहे. उदाहरणार्थ भिताडा गाव प्रत्यक्ष पाण्याखाली गेलं ते २००६ मध्ये पण तिथलं ‘कट ऑफ’  वर्ष आहे १९९३. म्हणजे १९९३ ची कुटुंबं २००६ सालीही तशीच आणि तेवढीच राहायला हवीत सरकारच्या मते. मुलगे मोठे होणार, त्यांची लग्न होणार, त्यांना मुलबाळं होणार, ते वेगळं घर करणार – या शक्यता सरकारने कधी गृहित धरल्याच नाहीत! आणि ही भविष्याची तरतूद नाही तर वर्तमान स्थिती आहे. त्यामुळे अनेक गावांत प्रत्यक्ष कुटुंबाना पुरेसे पुनर्वसन उपलब्ध नाहीच.

अर्थात “घोषित” कुटुंबांसाठीही पुरेशी व्यवस्था नाही. कडमाळ – खापरखेडामध्ये आहेत सुमारे सातशे कुटुंबं! त्यांचं पुनर्वसन आठ निरनिराळ्या ठिकाणी विभागून केलं आहे. थोडक्यात म्हणजे सरकारची योजना फक्त गाव बुडवायची नाही  नाही तर ते तोडायचीही आहे! नातलग, भावकी, सोडून गावातले लोक असे दुसरीकडे कसे जातील? त्यांच्या अडीअडचणीला कोण धावून येईल – अशी रास्त भीती त्यांच्या मनात आहे. इथंही लोकांशी नीट विचारविनिमय केला तर ही अडचण सोडवता येईल. पण ‘चर्चा करायची, संवाद साधायचा म्हणजे आपलं लोकांनी फक्त ऐकून घ्यायचं’ अशी सवय अनेक सरकारी अधिका-यांना असते – ती याही ठिकाणी असावी असा अंदाज आहे माझा.

पुनर्वसनात ६० मीटरवाले , ७० मीटरवाले, ८० मीटरवाले .. असाही एक प्रकार आहे. ८० मीटरवाले म्हणजे धरणाची उंची ८० मीटर करण्यापूर्वी ज्याचं पुनर्वसन आवश्यक आहे ते! लोकांच्या मते ८० मीटरवाल्यांच्या पुनर्वसनाचा घोळ अजून बाकी असता केवळ राज्य सरकारांनी “झिरो बॅलन्स” (म्हणजे पुनर्वसन बाकी शून्य. म्हणजे सगळं पुनर्वसन पूर्ण) अशी खोटी शपथपत्र कोर्टात सादर करून (२००८ पासून) धरणाची उंची १२२ मीटरपर्यंत गेली. (या सगळ्या विषयांवर गावकरी ज्या आत्मविश्वासाने बोलतात आणि जी आकडेवारी सांगतात त्याने मी थक्क झाले!) आता निदान पुढची उंची वाढू नये धरणाची म्हणून गावकरी आंदोलन करत आहेत. ही अशी शपथपत्र देण्यात कुणाचे काय हितसंबध गुंतलेले होते? राज्यव्यवस्था कल्याणकारी उरलेली नाही हे माहिती होतं – पण ती जाणीवपूर्वक आपल्याच लोकांच्या विरोधात काम करतेय हे माहिती होणं मात्र क्लेशकारक होतं. झा कमिशन आता या सगळ्याचा अभ्यास करत आहे – बघू काय निष्कर्ष येतोय ते!

वाळू उपसा: एक नवी लूटमार

दुस-या दिवशी सकाळी पिछोडीत गेलो. इथला अवैध वाळू उपसा महिनाभरापूर्वी धरणं देऊन, ट्रक थांबवून आणि काहीनी तुरुंगात पाठवून ‘आंदोलना’ने बंद केला आहे. ‘वाळू उपसा’ या विषयावर गटात जोरदार चर्चा झाली. शहरात काय आणि खेड्यांत काय, बांधकामासाठी वाळू हवीच. मग “वाळू उपसा बंद करून कसं चालेल?” असा प्रश्न एकाने विचारल्यावर (थोडक्यात ‘तुम्ही नेहमीच विकासाला विरोध करून कसं चालेल’ असा तो प्रश्न होता. ‘विकासाची नेहमी एका विशिष्ट समाजघटकांनी का किंमत मोजायची’ असाही त्यात एक प्रश्न आहे खरं तर – पण त्याबद्दल नंतर कधीतरी!)  वैध आणि अवैध वाळू उपसा यावर चर्चा झाली. मुळात पिछोडी गाव बुडीत असल्याने आता तिथली जमीन नर्मदा नियंत्रण प्राधिकरणाच्या (Narmada Control Authority) ताब्यात आहे. इथले स्थानिक अधिकारी वाळू उपसा करण्याची परवानगी देऊ शकत नाहीत. ‘अवैध आणि बेदरकार वाळू उपसा’ काय नुकसान करू शकतो हे पिछोडीचं दृश्य पाहिलेल्या आम्हा लोकांना कुणी वेगळ्या शब्दांत सांगायची गरज राहिली नाही.तीनही प्रकाशचित्र नीट पहिली की नदीतट किती उंच होता, किती वाळू खोदली गेली आहे, पाणी किती आत आलं आहे या गोष्टी स्पष्ट होतात.  मागे पाण्याची रेघ दिसतेय ती नर्मदा. हिरवा  उंच तुकडा दिसतोय ती  तटाची आधीची (म्हणजे दोन महिन्यांपूर्वीची पातळी). आणि खोदकाम किती फूट आहे आणि नदीचं पाणी किती आत आलं आहे तेही दिसतंय. ही पाऊस नसतानाची स्थिती. नर्मदा आता गावात घुसू शकते कधीही – एक समुद्र होऊन. मातीचा वरचा थर तिथचं ठेवलेला होता – तो गाळ तिने एव्हाना सरदार सरोवरात नेऊन टाकला आहे. अर्थात दोष नर्मदेचा नाही – तिच्या स्वाभाविक प्रवासात अडसर निर्माण करणा-या माणसांचाच आहे तो.

कालव्यासारखाच हाही प्रकार मैलोगणती पाहायला मिळतो. इथं पक्षभेद विसरून स्थानिक पातळीवरच्या राजकारणी लोकांच्या युती आहेत. पोलिस सामील आहेत. विरोध केलात तर गुंड तुमच्या दारात येतील जसे ते आंदोलनच्या बडवानी कार्यालावर आले १६ ऑगस्टच्या रात्री!

सततचा जीवनसंघर्ष

पिछोडीमधल्या लोकांशी बोलून आम्ही ‘राजघाट’वर आलो. हो, इथं बडवानीतही ‘राजघाट’ आहे. 
चिखलद्याचे श्री भागीरथ धनगर यांनी राजघाटाविषयी माहिती सांगितली. इथल्या पुलावरून १९ मीटर नुकतंच वाहून गेलं होतं – त्यामुळे घाट आणि गाव बुडल्याच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. निमाडमधले काशीनाथ त्रिवेदी आणि त्यांचे सहकारी यांची राजघाटाची ही कल्पना. १९६५ मध्ये हे स्मारक पूर्ण झालं. इथलं वैशिष्ट्य म्हणजे गांधीजींच्या रक्षेसोबत इथं कस्तुरबा आणि महादेवभाई देसाई यांचीही रक्षा आहे. अशी देशातली ही एकमेव समाधी असावी.

पण सोबतच घाटावर धार्मिक विधी चालू होते, काहीजण किडूकमिडूक विकत होते तर काहीजण भीक मागत होते. संपूर्ण देशाचं जणू प्रातिनिधिक चित्र होतं त्या ठिकाणी. ‘राजघाटा’ही बुडीतक्षेत्रात येत असल्याने त्याचंही पुनर्वसन होणं आहे – पण त्यालाही अजून ‘योग्य’ जमीन मिळालेली नाही. अर्थात “आम्ही इथून हलणार नाही” असा निश्चय तिथल्या गोपालबाबांनी बोलून दाखवला. नुकत्याच येऊन गेलेल्या बुडिताचा पंचनामा अद्याप बाकी आहे.

‘वसाहतीत’ काय सोयी असायला हव्यात याची एक मोठी यादी आहे. हॅन्ड्पंप वीज, आंतरिक रस्ते, मुख्य रस्त्याला जोडणारा रस्ता, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक शाळा, पंचायत घर, स्मशान, मंदिरं-मशीद -चर्च, समाज मंदिर, शौचालय अशा १७ गोष्टींची यादी ‘सरदार सरोवराच्या’ संकेतस्थळावर मला दिसली. खलबुजुर्गमध्ये यातल्या काही सोयी दिसल्या पण पिछोडीला जाताना आणि पुढच्या प्रवासात ज्या एक दोन वसाहती दिसल्या त्यांची  अवस्था आता त्यांचचं पुनर्वसन करावं अशी दिसली! त्यामुळे अनेक गावांत वसाहतीत फारसं कुणीच गेलं नाहीये.

इथला आणखी एक प्रश्न म्हणजे ‘बिन बारिश की बाढ’. इथं पाउस पडत नाहीये. पण २०० -२५०  किलोमीटर अंतरावरच्या धरणक्षेत्रात तुफान पाउस पडतोय – त्यावेळी धरणातून पाणी सोडलं की इकडे पूर येतो. पाउस पडत नसताना पुराचा अंदाज येणं हे कठीणच, नाही का!

महाराष्ट्रात ‘टापू’चं सर्वेक्षण झालंय – मध्य प्रदेशात तेही काम मागं पडलंय. टापू म्हणजे चारी बाजूंनी पाण्याने वेढला गेलेला पण वसाहतयोग्य प्रदेश – हा अर्थात उंचावर असतो. इथले सारे प्रश्न वेगळे – कारण रस्ता पाण्यातून. हे पाण्यातून प्रवास करणं म्हणजे काय याचा अनुभव आम्ही पुढे ककराणा ते भिताडा आणि भिताडा ते बिलगाव प्रवासात घेतला.

भिताडयाला जाताना वाटेत भादल जीवनशाळेच्या मुलांशी थोड्या गप्पा झाल्या.म्हणजे आम्ही बोटीतच बसून आणि शाळेचे लोक जमिनीवर (कारण इतक्या सगळ्या लोकांना उभं राहायला पुरेसा जमिनीचा तुकडा तिथं नव्हता!)  तिथले शिक्षक श्री गोकरू यांनी जीवनशाळेबद्दल माहिती दिली. १९९२ मध्ये ‘आंदोलनाने’ जीवनशाळा सुरु केल्या. शाळेला सरकारी अनुदान नाही. त्यामुळे या वर्षी तीन शाळा कमी कराव्या लागल्या आहेत. महाराष्ट्रात अलीकडेच निदान “मान्यता” तरी मिळाली आहे या शाळांना. आज १३ जीवनशाळांमध्ये १८०० मुले-मुली शिक्षण घेत आहेत. “जीवनशाला की क्या है बात; लडना पढना साथ साथ” ही घोषणा जीवनशाळेचं सार सांगणारी होती.

त्या दिवशीचा मुक्काम भिताडयाच्या जीवनशाळेत होता. दीड किलोमीटरची चढण आम्हाला दमवणारी होती पण मुलांचा उत्साह मात्र काही कमी होत नव्हता. या जीवनशाळेत ७१ मुलं-मुली आहेत, दोन शिक्षक (एक स्त्री, एक पुरुष) ती जबाबदारी सांभाळताहेत. परिसरातल्या तीन गावांतून विद्यार्थी इथं आले आहेत.

सातपुड्याच्या अंगणात आणि पिठूर चांदण्यात गावक-यांशी गप्पा रात्री उशीरापर्यंत चालू राहिल्या. भिताडा पाण्यात बुडलं आहे – पण ‘वसाहट’मध्ये (पुनर्वसनाचं ठिकाण) लोकांना जायचं नाहीये. अगदी सुरुवातीला आठ-दहा कुटुंबं गुजरातेत गेली – पण त्यांचा अनुभव काही चांगला नाही. सरकारी अधिकारी दाखवताना ‘चांगली’ जमीन दाखवतात पण प्रत्यक्ष पुनर्वसन मात्र खडकाळ जमिनीत होतंय हे लोकांनी पाहिलं. मग इतर लोक कुठे गेलेच नाहीत. गावात ३२२ घरं आहेत – लोकसंख्या १७०० च्या आसपास आहे. कैलास अवस्थी, गोविंद गुरुजी या कार्यकर्त्यांबरोबर मखरामभाऊ, सुरभानभाऊ, रतनभाऊ  या लोकांनीही माहिती सांगितली. इथल्या ९ कुटुंबांना जमिनी मिळाल्या आहेत खलबुजुर्ग या ठिकाणी – पण रात्री दोन वाजता घाईने अलिराजपूर कोर्टात कशा सह्या घेतल्या गेल्या लोकांच्या – अशी त्याची एक मोठी कहाणी आहे स्थानिक लोकांच्या मते.

इथून जवळचं गाव चालत वीस किलोमीटरच्या अंतरावर आहे.या ठिकाणी दिसताहेत ते लोक काही ट्रेकिंगला आलेले नाहीत. भिताडा गावातून आम्ही निघालो तेव्हा हा असा डोंगर उतरून बोट पकडायला खाली यावं लागलं. आमच्यासाठी हे एक दिवसाचं; पण इथं मात्र रोजचंच! बोटीतून उतरायला नीट व्यवस्था पण करता येत नाहीत – कारण पाण्याची पातळी बदलत राहते. त्यामुळे लोक कायम चिखलातून उडी मारत चढतात आणि उतरतात! बोट बाजाराच्या दिवशी वीस-पंचवीस रुपयांत एकमार्गी नेते. पण एरवी आजारी माणसाला दवाखान्यात घेऊन जायचं असेल तर किमान हजारभर रुपये प्रवासाला घालवावे लागतात. एरवी लोक ‘लाहा’ पद्धतीने एकमेकांना मदत करतात त्यामुळे घरबांधणी किंवा शेतीची कामं होऊन जातात.

विस्थापितांच्या यादीत अनेक घोळ आहेत असं इथल्या लोकांनी सांगितलं. आदिवासी समाजात परंपरेने काही कागदोपत्री नोंदी नसतात. शाळेत न गेलेले, घरीच जन्माला आलेले लोक पुराव्यासाठी जन्मतारखेचा दाखला कुठून आणणार? पण सरकारी अधिकारी त्यावर हटून बसतात. ‘आमचा पुनर्वास कुठं आहे तो दाखवा’ असं म्हटलं की जेलमध्ये टाकतात अशी तक्रार सुरभानभाऊंनी केली. पोलिस आले की आमचे सगळे लोक पहाडात कसे पळून जायचे किंवा आम्ही आमच्या गावाचं सर्वेक्षण कसं होऊ दिलं नाही हेही त्यांनी विस्ताराने सांगितलं.

इथली दोन तरुण मुलं – सिमदार आणि कालूसिंग - बिलासपूरमधून नऊ महिन्यांचा आरोग्य प्रशिक्षण कोर्स करून आली आहेत. दुस-या दिवशी सकाळी इथल्या आरोग्य केंद्राचं उद्घाटन झालं.त्यात सुमारे चाळीसेक गावकरी सहभागी झाले होते. या भागात आरोग्यसेवा नाहीच म्हणा ना! बाळंतपणं घरातच होतात, लस टोचायला इथवर कुणी येत नाही; साप चावणं – झाडावांती (उलट्या-जुलाब) नेहमीच आहे. आता आजारावर प्राथमिक उपचारासोबत “रेफरल” सेवा हे केंद्र देईल. त्याचसोबत आजार कमी करण्यासाठी जागरुकता आणि लोकशिक्षणाचे काम हे केंद्र करेल.

 इथून दिसणारी नर्मदा या सा-या समस्या क्षणभर विसरून टाकायला लावणारी होती.आरोग्य केंद्राचा उद्घाटन कार्यक्रम लांबाल्यामुळेबिलगावमध्ये आम्हाला पोचायला उशीरच झाला. या परिसरात मी पाच-सहा वर्ष आधी काम केलेलं असल्याने काय काय बदल झाले आहेत आता (मी २००९ नंतर इकडे आले नाही) हे नकळत पाहत होते. पाटील पाड्यातली हायड्रो पॉवर प्लान्ट जागा पाहताना त्याची माहिती सगळ्यांनी घेतली. उधई आणि टीटवडी नदीच्या संगमावर हे विद्युत केंद्र श्री अनिल यांच्या तांत्रिक मार्गदर्शांतून आणि स्थानिक लोकांच्या श्रमसहभागातून २००३ मध्ये पूर्ण झालं होतं. १५ किलोवॅट विद्युतनिर्मितीची त्याची क्षमता होती. परिसरातली ३०० आदिवासी कुटुंबं रास्त भावात ही वीज वापरत होते – हे मीही प्रत्यक्ष पाहिलं आहे माह्या आधीच्या भेटींत. २००६ मध्ये नदीत पाणी जोरात आलं आणि विद्युत केंद्र नष्ट झालं. सरकारच्या मते हे केंद्र ‘पूररेषे’च्या पल्याड होतं – पण सरकारी नियम निसर्ग काही मानत नाही हे आपण लक्षात घेत नाही. थोडक्यात काय तर ‘नुकसान कुणाचं होणार; भरपाई कुणाला मिळाली पाहिजे’ हे सरकारी आकडे विश्वास ठेवण्याआधी आपण आपले तपासून घेतले पाहिजेत.

जीवनशाळेतल्या कार्यक्रमात योगिनीताई, चेतनभाऊ, विजयभाऊ या सहका-यांनी महाराष्ट्रातल्या कामाची सविस्तर माहिती दिली. सरदार सरोवराच्या विस्थापितांबरोबर चालण्या-या कामाला इथं आणखी अनेक कामांची जोड आहे. रेशन, रोजगार, आरोग्य, वनाधिकार, महिला सक्षमीकरण, उर्जा .. अशा अनेकविध क्षेत्रात इथं काम चालू आहे. तो एक स्वतंत्र लेखाचा विषय होईल. विस्तारभयास्तव थांबते.

पुनर्विचार

या तीन दिवसांच्या प्रवासात आपण स्वीकारलेल्या विकासाच्या धोरणाबाबत अनेक प्रश्न मनात पुन्हा डोकावले. काही विसरलेले मुद्दे आठवले; काही नव्याने कळले. इतर धरणांच्या (मुळशी, डिंभे, उजनी..) परिसरात यातले काही परिणाम पहिले होते, त्या लोकांची पुन्हा आठवण आली. आपल्याला जिना उतरायला लिफ्ट पाहिजे, दिवस-रात्रीचे क्रिकेट सामने पहायला वीज पाहिजे, चोवीस तास पाणी पाहिजे, आंतरजालावर वावरायला वीज पाहिजे, वातानुकूलित यंत्र चालवता आली पाहिजेत   .... हे सगळं सहजासहजी मिळत असतं तर कदाचित प्रश्न नव्हता काही. पण आपल्या या सोयींसाठी लाखो लोकांचं जीवन उध्वस्त होतं आहे हे प्रत्यक्ष पाहिलं की आपल्या सुखसोयींचा पुनर्विचार करावासा वाटतो.

या तीन दिवसांत हृदय पिळवटून टाकणारे अनेक क्षण अनुभवले. बोटीतून जाताना पाण्याकडे हात दाखवत जेव्हा कुणी सांगायचा की ‘इथं आमचं गाव होतं’ – तेव्हा आमच्या अनेकांच्या  डोळ्यांत नकळत पाणी तरळायचं आणि आम्ही गप्प होऊन जायचो. मेधाताईही पाण्याकडे हात दाखवत ‘इथं आमचं कार्यालय होतं, इथं आम्ही अमुक सत्याग्रह केला होता ...’ अशा आठवणी सांगायच्या. आपलं घर असं बुडेल तेव्हा विस्थापनाविषयी आपली भूमिका आज आहे अशीच असंवेदनशील असेल का?

प्राचीन काळीही नर्मदातीरी इतिहास घडला असेल. पण आपल्या डोळ्यांसमोर पाण्यात गेलेलं हे जग टाळता आलं असतं – असं सतत वाटत राहिलं. एवढ्या सगळ्या लोकांना किंमत मोजायला लावून सरदार सरोवरातून आपण काय साधलं आजवर याचा हिशोब केला की उपद्व्याप घाट्याचा झालाय हे लक्षात येतं. ठीक आहे, जे झालं ते आता काही ‘अनडू’ करता येणार नाही. पण यातून धडा घेऊन पुढच्या वाटचालीत योग्य ती पावले उचलायला हवीत, वेळीच उचलायला हवीत याचं भान मात्र आलं आहे. खेडोपाडी गेली अठ्ठावीस वर्षे अविरत संघर्ष करणारांनी हे भान माझ्यात जागवलं आहे.


“नर्मदा घाटी”बाबत प्रसारमाध्यमांत विविध मतं वाचायला मिळतात. “हे लोक” विकासाच्या विरोधात आहेत असाही एक मतप्रवाह शहरांत मोठ्या प्रमाणात आढळतो. जमल्यास आपण एकदा या क्षेत्रात दोन तीन दिवस प्रत्यक्ष जाऊन यावं; स्थानिक लोकांशी बोलावं आणि स्वत:च्या डोळ्यांनी परिस्थिती पहावी अशी विंनती मी जरूर करेन. माझ्यासारखा तुम्हालाही अनेक गोष्टींचा पुनर्विचार करावासा वाटेलही -  कदाचित! 

समाप्त 

Friday, September 6, 2013

१७५. नर्मदा खो-यातून...(१)

गेली अनेक वर्ष ‘आंदोलन’ मासिक (http://www.andolan-napm.in) नियमित वाचनात असल्याने “सरदार सरोवर” विषय अद्याप संपलेला नाही याची माहिती होती. गुजरात आणि महाराष्ट्रात माझ्या कामाच्या निमित्ताने धरणग्रस्त परिसरातल्या लोकांशी बोलायची संधी यापूर्वी अनेक वेळा मिळाली होती. मे २०१२ मध्ये ‘सरदार सरोवराला’ भेट दिली होती. तिथल्या तीन दिवसांच्या मुक्कामात शासकीय अधिका-यांसोबत अनेक मुद्यांवर चर्चा झाली होती. त्याचवेळी ‘पुन्हा एकदा धरणग्रस्त परिसराला भेट दिली पाहिजे आणि यावेळी ती भेट आंदोलनाच्या जाणकार लोकांसमवेत केली पाहिजे’ असं ठरवलं होतं. ऑगस्टच्या दुस-या आठवड्यात जेव्हा १७ ते १९ ऑगस्टच्या “नर्मदा घाटी यात्रा”चं आमंत्रण आलं तेव्हा क्षणाचाही विचार न करता मी नावनोंदणी केली.

१७ ऑगस्टच्या सकाळी खलघाटला उतरलो तेव्हा मुंबईचे इतर साथी आणि बडवानीचे साथी हजर होते. दिल्ली, पंजाब, राजस्थान, गुजरात, पुणे-ठाणे-मुंबई-धुळे-लातूर  आणि मध्य प्रदेशातून आणखी काहीजण थोड्या वेळाने सामील झाले. दोन विदेशी साथीही होते. आम्ही ५५ जण बाहेरून आलो होतो. यात प्रामुख्याने तरुण-तरुणींची संख्या मोठी होती. यातले अनेक विविध सामाजिक कामांत सक्रिय सहभागी आहेत. चार पत्रकारही सोबत होते. त्यामुळे चर्चा तीनही दिवस चालू राहिल्या. माहिती देण्याच्या मेधाताईंच्या (मेधा पाटकर) उत्साहात कधीच खंड पडत नव्हता त्यामुळे सतत नवे प्रश्न विचारायचा धीर गटाला आला आणि आणि तो पुढे तीन दिवस टिकला. दोन दिवस आम्ही मध्य प्रदेशमध्ये होतो तर तिस-या दिवशी महाराष्ट्रात. गुजरातमध्ये प्रत्यक्ष जायची संधी मिळाली नाही पण त्यावर चर्चा झाली आणि माहिती मिळाली.

या भेटीत पाच मुख्य मुद्दे वारंवार समोर आले.
  1. सरकार सांगत आहे की “सरदार सरोवर” पुनर्वसनाचा प्रश्न संपला आहे पण तो अद्याप मोठ्या प्रमाणात तसाच बाकी आहे.
  2. सरदार सरोवराचे फायदे अपेक्षेपेक्षा फारच कमी मिळाले आहेत.
  3. मध्य प्रदेशाच्या सरदार सरोवरग्रस्त भागातच कालव्यांच्या जाळ्याची योजना आहे. या योजनेत पुन्हा एकदा शेतक-यांच्या जमिनीचं अधिग्रहण केलं जात आहे, तिथं पुनर्वसनाचा प्रश्न आहे आणि आणि त्यात अमाप भ्रष्टाचार होतो आहे.
  4. नर्मदेच्या तीरी मोठ्या प्रमाणावर वाळूचा अवैध उपसा होत आहे. त्यातून कागदोपत्री पुनर्वसन झालेल्या पण प्रत्यक्ष जुन्याच गावांत असणा-या अनेकांचं जीवन आणि शेतजमीन धोक्यात आहे. गाळ भरून सरदार सरोवराचे आयुष्य कमी होण्याची शक्यता या वाळू उपशामुळे वाढली आहे.  
  5. कागदोपत्री पुनर्वसन झालेल्या पण जुन्याच गावाच्या जवळच्या टेकडीवर घरे वसवून राहणा-या लोकांना शिक्षण, आरोग्य, वाहतूक, पिण्याचे पाणी अशा अनेक जीवनावश्यक सोयींपासून वंचित राहावं लागतं आहे. 


धरणाने ग्रस्त, कालव्यांनी त्रस्त

आमच्या प्रवासाची सुरुवात झाली खलघाटपासून. खलघाट हे मुंबई-आग्रा महामार्गावरचं, नर्मदेच्या किना-यावरचं एक महत्त्वाचं शहर. सरदार सरोवरापासून २०० किलोमीटर दूर असलेल्या क्षेत्रात आता आपल्याला जे पहायला मिळेल त्याहून अधिक विपरीत परिस्थिती धरणाच्या जवळच्या भागात असणार ही खूणगाठ मी तिथं मनाशी बांधून ठेवली.

खलघाट आंदोलनातलं एक महत्त्वाचं शहर. या परिसरातली आणखी पंधरा गावं धरणाच्या बुडीतक्षेत्रात आहेत. १९९० मधल्या २८ तासांच्या ‘रास्ता रोको’च्या आणि ट्रक्टर परिक्रमेच्या आठवणी मेधाताईंनी आणि इतर लोकांनी सांगितल्या. ४ जुलै २०१३ रोजी कालवे फुटून बडवाह परिसरातली ५०० एकर शेतजमीन आणि घरं पाण्याखाली गेल्याची माहिती दयाराम पटेल यांनी दिली. ‘कालवे हवेत की नकोत – हो का नाही’ एवढं एकाक्षरी उतर घेण्यासाठी या भागात १४ ऑगस्टला ग्रामसभा झाल्या. लोकांचे जीवनमरणाचे प्रश्न असे एका अक्षरात कसे सुटतील? हे कालवे नेमके आहेत तरी काय, ते कुणासाठी बनताहेत  – असे अनेक प्रश्न मनात आले.हा होता ओकारेश्वर योजनेचा डावा मुख्य कालवा. याची लांबी आहे १५६८७ मीटर. त्यापैकी दोन-तीन किलोमीटरमध्ये आम्ही जे पाहिलं त्यावरून बाकी चित्राची कल्पना आलीअमलठा हे खरगोन जिल्ह्यातल्या बडवा तहसीलमधलं गाव. तिथं नजरेच्या एका टप्प्यात दहा ठिकाणी फुटलेला कालवा दिसला; दीड-दोन  किलोमीटर चाललो. दर दहा फुटांवर तेच दृश्य दिसत होतं. आम्ही चालताचालता पाहत होतो आणि लोकांचं ऐकतही होतो. पुढे नांद्रा गावात तोच विषय झाला. छोटा बडदा गावात एक मोठी सभा रात्री नऊपर्यंत चालली; त्यातही अनेकांनी ‘कालवा’ योजनेबद्दल त्यांचे अनुभव सांगितले. इथला समाज गेली २८ वर्ष त्यांचं गाव. घर, शेत, परिसर सरदार सरोवराच्या बुडीतून वाचावं म्हणून प्रयत्न करतोय. ती लढाई अजून चालूच आहे; तोवर ही एक नवी लढाई समोर येतेय त्यांच्या. ज्या विभागाने, ज्या समाजाने, ज्या गावांनी आधीच सरदार सरोवराची झळ सोसली आहे तिथं पुन्हा हे कालवे कशासाठी?

अनेक नव्या गोष्टी समोर आल्या ज्या अस्वस्थ करणा-या होत्या. ओंकारेश्वर आणि इंदिरा सागर धरणातून निघणा-या कालव्यांचं जाळं या भागात नियोजित आहे आणि त्यात सुमारे १०००० हेक्टर जमीन जाणार आहे. याचा फटका कमी अधिक प्रमाणात ११०० गावांना बसणार आहे. सरदार सरोवरात जी गावे बुडीत आहेत, तीच कालव्यांच्या लाभक्षेत्रात दाखवली आहेत – ही सरळसरळ दिशाभूल आहे. कालव्यांच्या योजनेत सिंचन आणि पिण्याच्या पाण्याची सोय हे मुख्य लाभ दाखवले आहेत. पण लाभक्षेत्र आधीच सिंचित आहे आणि नर्मदा जवळ असल्याने पिण्याच्या पाण्याची तितकी चणचण नाही. “आधे गाव मे जलाशय आधे गाव मे नहर- अशी आमची स्थिती आहे” असं एक गावकरी म्हणाला तेव्हा चित्र विदारक आहे हे लक्षात आलं.

नियोजनाच्या बाबतीत सरकारची नेहमीची बेपर्वाई इथं दिसून आली. कालव्यांचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यावर दुसरा टप्पा हातात घेण्याऐवजी ठेकेदार घाईघाईने खोदकामाला सुरुवात करत आहेत. नांद्रामधल्या लोकांनी “आधीचा टप्पा पूर्ण झाला नाही, आमच्या गावातलं काम सुरु करायची घाई करु नका - म्हणत ठेकेदाराला काम सुरु करण्याला विरोध केला तर पोलिसांनी आम्हाला अटक करून तुरुंगात डांबलं आणि एका रात्रीत १५ मशीन लावून खोदकाम केलं. ही होळीच्या आसपासची गोष्ट – गावात कालवा बांधण्यासाठी संचारबंदी कलम १४४ अ लागू करण्यात आलं होतं त्यावेळी” – असं लालूभाई यांनी सांगितलं. कालवे शेतांच्या मधून जात असल्याने शेतक-याचे शेत आता तुकड्यात विभागले जात आहे. अनेक ठिकाणी कालवे ओलांडून जायची व्यवस्था नाही. त्यामुळे शेतक-यांना आपल्याच शेताच्या एका भागातून दुस-या भागात जायला लांबचा वळसा घ्यावा लागतो. कालवे आखताना, कालवे ज्यांच्या जमिनीतून जाणार आहेत त्या शेतक-यांशी सरकारने काहीही सल्लामसलत केली नाही. ठेकेदार आणि सरकार यांची पूर्ण मनमानी चालू आहे.

कालव्यांच्या भिंतींचं बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचं आहे.इथं सरकारी अधिकारी आणि ठेकेदार यांची ‘मिली भगत’ आहे हे स्पष्ट आहे. कालवे खोदताना अनेक ठिकाणी शेतांत मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. ते व्यवस्थित भरून देण्याची जबाबदारी ठेकेदारांची आहे पण ठेकेदार त्या बाबतीत टाळाटाळ करताहेत. खोदकामानंतर निर्माण झालेला मलबा शेतक-यांचा शेतात, सरकारने अधिग्रहण न केलेल्या जमिनीत  तसाच ठेवून ठेकेदार निघून जात आहेत. आत्ता धरणातून पाणी कालव्यात सोडलेलं नसताना (महेश्वर धरणाचे दरवाजे उघडे आहेत तर ओंकारेश्वरमध्ये पाणी पूर्ण भरलेलं नाही) केवळ जोरदार पावसाच्या झटक्याने कालवे फुटले. कालव्यातून अतिरिक्त पाणी बाहेर पडण्याची – निकासाची – काहीच व्यवस्था नाही. मग पुढे तर काय होईल? कालवे योजनेलासुद्धा धरणाप्रमाणे विस्थापितांच्या पुनर्वसनाचे सर्व नियम लागू आहेत. पण कालव्यात ज्यांच्या जमिनी जाताहेत त्यांच्या पुनर्वसनाचा काहीही विचार नाही, त्यामुळे कृतीही नाही. कोर्टाच्या निर्णयांचं पालन होत नाही याची लोकांना खंत आहे. कोर्टात अनुकूल निर्णय अनेकदा मिळूनही लोकांची लढाई संपत नाही अशी विलक्षण परिस्थिती आहे इथं.

४ जुलैच्या रात्री हे कालवे अनेक ठिकाणी फुटले आणि अनेक गावांत पाणी शिरलं. घरं पाण्याखाली गेल्याने लोकांना रात्र झाडांवर बसून काढावी लागली. शेतातलं पीक पाण्याखाली गेलं. ‘आंदोलना’च्या सर्वेक्षणानुसार केवळ बडवा आणि महेश्वर या दोन तालुक्यांत सुमारे नऊ कोटींचं नुकसान झालं आहे. हे नुकसान म्हणजे ‘नैसर्गिक आपत्ती’ आहे हा शासनाचा दावा असला तरी ज्या अनास्थेने आणि निष्काळजीपणाने कालवे खोदले गेले आहेत त्यावरून ही ‘शासननिर्मित आपत्ती’ हे गावक-यांचे मत पटण्याजोगे आहे. सरकारने या आपत्तीची काही गांभीर्याने दखल घेतलेली नाही असं लोकांच्या बोलण्यात वारंवार येत होतं. कमल जैन, पुन्ना जैन, मुकेश, लालूभाई, राधुभाई पठाण, देवरामभाई  अशा लोकांनी अतिशय पोटतिडकीने असे अनेक मुद्दे मांडले.

छोटा बडदा या गावात रात्री नऊपर्यंत आमची जोरदार मीटिंग झाली आणि त्यांनतर रात्री साडेनऊ ते अकरा पिपरीमध्ये. छोटा बडदा गावात ‘इंदिरा सागर’चा कालवा येऊ घातलाय आणि हे गावही नर्मदेच्या किना-यावर आहे. गावक-यांनी कालव्यासाठी साफ नकार दिलाय सरकारला आणि पाणी आलं तरी गाव सोडायचं नाही असा त्यांचा निर्धार आहे. ही सगळी ‘राहती गावं’ सरदार सरोवराची उंची १७ मीटरने वाढवणारे ‘गेट’ बांधून झालं की पाण्यात जातील हा विचार अस्वस्थ करणारा होता. हे अजूनही आपण वाचवू शकतो, त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत हे जाणवत राहिलं तीन दिवसांच्या प्रवासात.

सरकार पुन्हापुन्हा अशा जनहितविरोधी योजना का बनवतं, नीट नियोजन का केलं जात नाही हे काही केल्या कळत नाही. १९०१ चा Irrigation Commission Report या भागात जमिनीवरून सिंचन (surface irrigation) करू नये असं सांगतो तरी हे कालवे का खोदले जात आहेत? मेधाताईंच्या अंदाजानुसार महू-पिथमपूर-धार या होऊ घातलेल्या औद्योगिक पट्ट्याला पाणी देण्याची ही तयारी आहे. दिल्ली-मुंबई औद्योगिक क्षेत्रात (डीएमआयसी) या भागातली जमीन असणार आहे. ओंकारेश्वराचं पाणी पाईपने क्षिप्रा नदीत सोडण्याची योजना आहे, इंदोर, बडोदा, अहमदाबाद या शहरांना ‘सरदार सरोवर’ पाणी देतंय – जे मूळ योजनेत नव्हतं. म्हणजे सरकार योजना बनवताना सांगतं एक पण प्रत्यक्षात करतं काहीतरी दुसरंच! लाभ बदलतो पण किंमत मोजणारे मात्र तेच राहतात.

पुनर्वसनाच्या भूलथापा

सरकार पुनर्वसन पूर्ण झाल्याचं ब-याच वर्षांपासून सांगत आहे. सरकारी आकड्यांवर किती विश्वास ठेवायचा याबाबत माझे काही अंदाज आहेत (म्हणजे सरकारने सांगितलेल्या आकडेवारीची किती टक्केवारी गृहित धरायची)  – पण दुर्दैवाने तेही अंदाज पार फसले. मध्य प्रदेशमधली १९३ गावं बुडीतक्षेत्रात आहेत – त्यापैकी १५० गावात आजही लोक राहत आहेत. “आमचं पुनर्वसन झाल्याचं सांगताना सरकार निव्वळ खोटं बोलत नाही तर आम्हाला कस्पटासमान लेखते” ही खंत एकाने व्यक्त केली. छोटा बडदा, पिपरी, पिछोडी, कडमाळ, खापरखेडा, भिताडा, बिलगाव ... जिल्हे बदलले, गावं बदलली – पण परिस्थिती मात्र सगळीकडे तीच. जमिनीच्या बदल्यात रोख रक्कम नाकारणारे शेतकरी, पाण्याच्या भीतीत जगणारे लोक, सरकारी दडपशाहीचा सामना करणारे लोक, न्यायासाठी कोर्टात खेपा मारणारे लोक, आणि “आमु आखा एक से”, “लडेंगे – जीतेंगे” असा दुर्दम्य आशावाद जागता ठेवणारे लोक.

“जमिनीच्या बदल्यात पैसे घ्या आणि आपलं काय ते बघा” अशी मध्य प्रदेश सरकारची भूमिका होती. पण गावकरी त्याला बधले नाहीत. काही अपवाद वगळता बहुसंख्य गावक-यांनी पैसे स्वीकारले नाहीत. जमिनीच्या बदल्यात जमीन – म्हणून सरकारने बाद जमिनी दाखवल्या – त्याही शेतक-यांनी स्वाभाविकच नाकारल्या. ‘कृषी सेवा केंद्राची’ (सरकारी) जमीन कसून तिचं उत्पन्न वाटून घेण्याचा प्रयोग काही वेळा यशस्वी झाला.

या सगळ्या खटपटीना यश येऊन मध्य प्रदेश सरकारने  २१ कुटुंबाना प्रत्येकी पाच एकर जमीन खलबुजुर्ग या ठिकाणी दिली आहे. तिथं पिछोडीतल्या १० आणि भादलमधल्या ११ कुटुंबाना नुकतीच  ही जमीन मिळाली आहे. खलबुजुर्गमधल्या नव्या जमिनीत सध्या हिरवेगार सोयाबीन लहरतं आहे. या २१ कुटुंबांना मिळालेल्या न्यायातून इतर कुटुंबांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत आणि त्यांचा निर्धारही अजून पक्का आहे.  या कुटुंबाना जमीन मिळाली असली तरी राहायला घर – त्यासाठी प्लॉट – मात्र अजून मिळाले नाहीत. एकाच घरात नऊ – दहा कुटुंब सध्या राहत आहेत.

त्याआधी २००० मध्ये भिताडाच्या ९ कुटुंबाना (गावात ३०० पेक्षा जास्त कुटुंबं आहेत) प्रत्येकी पाच एकर जमीन मिळाली आहे. पिछोडी ते खलबुजुर्ग हे अंतर किमान दीडशे किलोमीटर आहे. पिछोडीत एकूण ७००हून जास्त कुटुंबं आहेत आणि त्यापैकी ११ ना आत्ताशी जमीन मिळाली आहे – यावरून पुनर्वसनाचा वेग आणि वस्तुस्थिती लक्षात यावी. मध्यप्रदेशात अशी  ५२५७ घोषित कुटुंबं आहेत. घरांसाठी आणखी जमीन लागणार आहे – आणखी १०००० भूमिहीन कुटुंब आहेत – त्यांच्या राहत्या घराचा प्रश्न वेगळाच! त्या घरांचा दर्जा काय हाही प्रश्न वेगळाच! 

हा आहे खलबुजुर्ग – पुनर्वास. 


तिकडे मीटिंग चालू असताना मी शेजारच्या या इमारतीत डोकावले. एक दार दिसलं आधी.ते उघडल्यावर कळलं की इथं लोक राहतात.शेजारी त्याचं स्वयंपाकघर.एका कुटुंबाला अजून काय द्यायचं सरकारनं – असं वाटतंय ना? 
माफ करा -किती कुटुंबं राहतात इथं? तर अकरा. 
भिताडा गावातल्या ११ पुनर्वसित घरांसाठी ही व्यवस्था(!) आहे. 
अशाच दुस-या ‘घरात’ भादल गावातली १० कुटुंबं राहतात. 

ही मला दिसलेली पुनर्वसनाची झलक पुरेशी बोलकी आहे. 

(भाग २ पुढे)
(‘आंदोलन’ मासिकाच्या सप्टेंबर २०१३ च्या अंकात प्रसिद्ध झालेल्या मूळ लेखात भर घालून पुनर्प्रसिध्द)

Monday, September 2, 2013

१७४. विवेकानंदांचा वेदान्त विचार: भाग १५: आत्मविचार (१)


आपल्याला भोवताली दिसून येणारे विश्व म्हणजे दुसरे तिसरे काही नसून देश-काल-कारण यातून प्रतीत  होणारे ब्रह्म आहे ही विवेकानंदांची भूमिका आपण यापूर्वीच पाहिली आहे. 'जीवो ब्रह्रौव नापर: या शंकराचार्यांच्या भूमिकेशी हा विचार अगदी मिळताजुळता आहे यात काहीच शंका नाही. पण हा विचार 'व्यवहार्य आहे का? - असा प्रश्न आपल्या मनात स्वाभाविकपणेच येतो.

माणसाच्या सामाजिक प्रगतीचा विकास जर आपण पाहिला तर एक गोष्ट लगेच लक्षात येते ती ही की, सारी प्रगती सहजासहजी झालेली नाही. हा सारा संघर्षाचा, युद्धांचा, लढयांचा इतिहास आहे. सर्वत्र आणि सर्व काही ब्रह्मच आहे अशी जाणीव जर सर्व माणसांना एकावेळी झाली तर मानवी जगाची भौतिक प्रगती पूर्णत: थंडावण्याचीच शक्यता जास्त आहे - कारण माणूस ना बैलांकडून शेतीची कामे करुन घेऊ शकेल ना यंत्रांकडून. प्राणी आणि वनस्पती यांच्या उपभोगावर (आणि शोषणावर) जे जे काही आधारलेले आहे ते ते सारे थांबले की एका अर्थी मानवी जीवन समूळ नष्ट होईल.

शिवाय आपला दैनंदिन अनुभव आपल्याला सांगतो की, माणूस इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे – अर्थात आपण माणूस आहोत त्यामुळे आपण माणसांना ‘वेगळे’ मानणार! हत्ती आणि वाघ सिंहासारखे अजस्र आणि काही प्रसंगी क्रूर होणारे प्राणी माणूस लीलया हाताळू शकतो, ते माणसामध्ये त्यांच्यापेक्षा काहीतरी वेगळे आहे म्हणूनच ना! मग माणूस आणि एखादे झाड यांची तुलना कशी होऊ शकेल? माणूस झाडापेक्षा वेगळा आहे हे तर एखादं लहान मूल देखील सहज सांगेल!

हे जग म्हणजे ब्रह्मच असले तरी ब्रह्म सर्वांमध्ये समान प्रमाणात अभिव्यक्त झाले आहे असे मात्र विवेकानंद मानत नाहीत. तसे असते तर मग सृष्टिप्रक्रियेचा काही प्रश्नच उदभवला नसता! मनुष्याच्या दुर्गुणांविषयी बोलताना स्वामीजी एका प्रसंगी मानवाची गायीशी आणि भिंतीशी तुलना करतात. गाय आणि भिंत कधी खोटे बोलत नाहीत हे खरे...... पण ते कायम गाय आणि भिंतच राहतात. मनुष्यात कितीही दुर्गुण असले तरी तो (यात ‘ती’ही आहे)  मात्र स्वत:च्या आंतरिक प्रकृतीवर विजय मिळवून स्वस्वरुप -  म्हणजे सचिचदानंद स्वरुप - जाणू शकतो.

विवेकचुडामणि ग्रंथात उल्लेख केल्याप्रमाणे 'दुर्लभं त्रयमेवैतत् देवानुग्रहहेतुकम्। मनुष्यत्वं मुमुक्षत्वं महापुरुषसंश्रय:।। हा शंकराचार्यांचा श्लोक विवेकानंदांना फार आवडत असे. मनुष्यजन्म दुर्लभ आहे आणि आणि केवळ मनुष्यजन्मातच मोक्षप्राप्तीची शक्यता आहे या दोन बाबींविषयी स्वामीजींच्या मनात कधीही संदेह नव्हता. 'सारेच नारायण आहेत हे खरे, तरी पण वाघनारायणापासून दूरच राहायला हवे. सगळेच पाणी नारायण हे खरे, परंतु गढूळ पाणी पीत नसतात या रामकृष्णांच्या उदगारांची स्वामीजी आपल्याला आठवण करुन देतात. तत्वत: ऐक्य पण व्यवहारात भेद – असे काहीसे स्वरूप आहे या विचारांचे. यातून समाजाला दांभिक व्हायला वाव मिळतो असेही मला वाटत आले आहे.

विवेकानंद म्हणतात की, क्रमविकास हाच होय - यात क्रमश: शरीराकडे कमी कमी लक्ष दिले जाते. या जगात मनुष्य हाच सर्वश्रेष्ठ प्राणी आहे. मनुष्य हा शब्द संस्कृतमधील मनस् या शब्दापासून बनला आहे. मनस् म्हणजे विचार. मनुष्य मननशील म्हणजे विचार करणारी प्राणी होय, केवळ इंद्रियांच्या द्वारे विषय ग्रहण करणारी प्राणी नव्हे.

पण आहोत का आपण खरोखर विचार करणारे आणि अन्य प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ दर्जाचे? एका संस्कृत सुभाषितामध्ये मनुष्य आणि इतर प्राणी यांच्या स्थितीवर एक सुंदर भाष्य केले आहे. ते असे -
आहारनिद्राभयमैथुनंच ।सामान्यमेतत् पशुभिर्नराणाम्
बुद्धिर्हि तेषामधिको विशेष: ।बुद्धयाविहीन पशुभि: समान:।।
आज आपण सगळेजण कसे जगत आहोत? तर अगदी पशुवत् - कधी कधी तर पशूंनाही आपली लाज वाटेल असे! विवेकानंद म्हणतात, उद्वेगाने म्हणतात की, आपली अवस्था घाण्याच्या बैलासारखी आहे. आपण जन्मत:च प्रकृतीचे गुलाम आहोत ..... हे सारे मृगजळ आहे. ज्याच्या आपण शोधात आहोत ते आपल्याला न मिळता असंख्य जन्मांच्या फे-यात आपण फिरत आहोत.... ....'सर्वसाधारण लोक जणू यंत्र बनले आहेत, इतके की ते विचार सुद्धा करत नाहीत. कुत्रयायामांजरासारखे किंवा इतर पशुंसारखे त्यांचे जीवन चाललेले असते .... प्रकृतीचा चाबूक त्यांना हाकत असतो ....

जसे आहे तसेच राहायचे ही पशुंचा स्वभाव असतो. प्रकृतीशी ते फारसे लढत नाहीत. केवळ जगण्यासाठीचा म्हणून जो काही लढा आहे तो प्रकृतीत सर्वांना अनिवार्य आहेच. बळी तो कान पिळी, जीवो जीवस्य जीवनम्”;  “survival of the fittest अशा अनेक शब्दांत त्याचे वर्णन केले जाते. पण यापलिकडे जाऊन, जगणे सुसहय व्हावे किंवा जगण्याचा दर्जा कायम सुधारावा म्हणून पशुपक्षी जाणीवपूर्वक प्रयत्न करताना दिसत नाहीत. (अपवाद म्हणता येईल तो जॉर्ज ऑर्वेल यांच्या 'अ‍ॅनिमल फार्म' या कादंबरीतील प्राण्यांचा - पण अर्थात तेथे प्राणी मानवी प्रवृत्तीचे प्रतीक म्हणूनच येतात!) त्यांच्या जीवनात जे काही बदल होतात ते केवळ परिस्थितीच्या रेटयाने. जाणीवपूर्वक काही नाही! त्याउलट माणसाचे पाहा! इंद्रियसंयमाचे, मनाचे सामर्थ्य वाढविण्याचे, शरीर परिपूर्ण करण्याचे प्रयोग मानवप्राणी गेली हजारो वर्षे करीत आला आहे असे आपल्याला दिसून येते.

अर्थात सगळीच माणसे असा प्रयोग करीत नाहीत आणि समजा प्रयोग केला तरी त्यात यशस्वी होत नाहीत. असे प्रयोग करणा-यांची आणि त्यात पूर्ण यश मिळविणारांची संख्या कमी आहे हे स्वामीजींना माहिती आहे. ते म्हणतात की, ज्यांना आपण मानव म्हणतो, ते सगळे खरे पाहता, अजून मानव नाहीत. प्रत्येकाला आपापल्या बुद्धीने जगाचे स्वरुप ठरवावे लागते. जगासंबंधीचे उच्च ज्ञान ही फार कठीण गोष्ट आहे. अनेकांना सूक्ष्म तत्त्वापेक्षा स्थूल भौतिक वस्तूच जास्त ख-या वाटत असतात. पण आपल्याकडे पशुपेक्षा जास्त काहीतरी आहे. कुत्रा जितका चवीने हाड चघळतो तितक्या चवीने आपण अन्न खाऊ शकत नाही!

याचा अर्थ असाही नाही की, आपण या चराचर सृष्टीहून श्रेष्ठ दर्जाचे आहोत किंवा तिच्याहून भिन्न आहोत. आजच्या माणसाचे बरेचसे दु:ख या आसक्तीतून, या अहंकारातून येते. माणसाला असे वाटते की, या सा-या  विश्वाच्या केंद्रस्थानी जणू काही तोच आहे आणि ईश्वराने या जगाची उत्पत्ती जणू काही आपल्याच भोगासाठी केली आहे अशा थाटात तो वावरत असतो. त्यातूनच एक तर 'परमेश्वराला रिटायर करा अशी टोकाची मागणी येते किंवा दैनंदिन जगात थोडी जरी प्रतिकूल परिस्थिती  निर्माण झाली की 'या जगात ईश्वर आहे का? अशी शंका माणसाच्या मनात येते. भूकंप किंवा अपघात अशा प्रसंगी हृदयद्रावक दृष्ये पाहून आपण ईश्वराच्या असितत्वाविषयी प्रश्न विचारतो. पण माणूस रोज अन्नासाठी म्हणा, वैज्ञानिक प्रयोगासाठी म्हणा अथवा स्वत:च्या आरोग्यासाठी म्हणा.... कोटयवधी प्राण्यांची हत्या करत असतो. तेंव्हा ईश्वराच्या असितत्वाचा प्रश्न त्याला का नाही सुचत? कारण त्याची अशी प्रामाणिक धारणा असते की हे जग त्याच्या उपभोगासाठीच निर्माण झाले आहे अथवा करण्यात आले आहे.

स्वामीजी म्हणतात, विश्व हे त्या विश्वपुरुषाचेच दृश्य स्वरुप आहे. आपल्या इंद्रियांद्वारा गोचर होणारे त्याचे रुप म्हणजेच हे विश्व ....  आणि आपण या विश्वापासून भिन्न नाही. तसे असते तर मग या विश्वात आपण काही पाहू शकलो नसतो की काही ऐकू शकलो नसतो आणि कशाचाही अनुभव घेऊ शकलो नसतो. ज्या अर्थी आपण हे करु शकतो, त्या अर्थी आपण या विश्वाचाच एक भाग आहोत हे निश्चित आहे. आपली शरीरे म्हणजे जड द्रव्याच्या महासागरातील केवळ भोवरे आहेत. हा पर्वत, ही नदी, हा वृक्ष, हा पक्षी ..... आपली नामे आणि रुपे जरी वेगवेगळी असली तरी वस्तुत: आपण सारे एक आहोत.

माणसाचे उदाहरण घेतले तरी हा मुददा स्पष्ट होतो.ऑस्ट्रेलियन आणि भारतीय माणूस यांच्यात आपल्याला कितीतरी भेद आढळतात. दोन्हीकडच्या आदिवासींना तर कदाचित एकमेकांशी संवाद सुद्धा साधता येणार नाही. पण त्यांच्या दैनंदिन जीवनातील त्यांचे भावविश्व, त्यांचे विचार, त्यांच्या धार्मिक संकल्पना, थोडक्यात सांगायचे तर त्यांचा जीवनविषयक दृष्टिकोन जणू एकमेकांचे प्रतिबिंबच असतो. याचे कारण काय? तर माणूस 'एक आहे. तरीही त्यांच्यातील वरवरच्या भेदांना बळी पडून आपण एकमेकांशी लढतोच ना!

तसेच विश्वातील आपण सारेजण वस्तुत: 'एक आहोत. मायेच्या, अविद्येच्या आवरणामुळेच आपल्याला भेदांचा, विविधतेचा केवळ भास होतो इतकेच! विवेकानंद म्हणतात, सर्व दृष्टींनी आपण एक आहोत...ही गोष्ट कधीही कळत नाही आपल्याला. सर्व विश्व हे देश-काल-निमित्त यांचे बनलेले आहे आणि ईश्वर या विश्वरुपाने प्रकट झालेला आहे....

मनुष्यजन्माचे हे महत्त्व लक्षात घेऊन आपले भवितव्य अधिक उज्ज्वल करण्याच्या दिशेनेच मानवाने आपली वाटचाल केली पाहिजे. त्याने लक्षात ठेवले पाहिजे की, स्वर्ग हे त्याचे ध्येय नव्हेच! त्याचे ध्येय आहे मुक्ती .... मोक्ष! मोक्ष ही काही प्राप्त करुन घेण्याची गोष्ट नव्हे असे शंकराचार्यांप्रमाणेच विवेकानंदांचेही मत आहे. या मोक्षाचा, मोक्षमार्गांचा सविस्तर विचार आपण पुढे करणार आहोतच. तत्पूर्वी माणसाच्या अस्तित्वासंबंधी विवेकानंदांनी मांडलेल्या विचारांचा आपण परामर्ष घेऊ.

अस्तित्व

मानवी अस्तित्वासंबंधीचे विवेकानंदांचे विचार आपण जेंव्हा वाचतो तेंव्हा त्यातील प्रबळ आशावादाने मन थरारुन जाते. आज आपल्याभोवती इतके नकारात्मक आणि विघातक वातावरण आहे की, बहुसंख्य लोक केवळ मरण येत नाही म्हणून जगतात असेच वाटत राहते. हीच जणू त्यांच्या जीवनाची प्रेरणा आहे. आला दिवस कसाबसा ढकलायचा हेच त्यांचे ध्येय! थोडी प्रतिकूल परिस्थिती  निर्माण झाली की आत्महत्या करणारांचे प्रमाण आपल्या देशातही अलिकडे दखल घेण्याइतके वाढू लागले आहे. सारेजण फक्त इंद्रियसुखाच्या मागे धावत आहेत. आणि त्यात थोडे काही उणे अधिक झाले की, आयुष्यात अजिबात अर्थ नसल्याची तक्रार करत आहोत. आपण का केवळ आपल्या इंद्रियांचे, भावनांचे, विचारांचे गुलाम आहोत  - याचा आपण काही विचारच करत नाही.

विवेकानंद म्हणतात, तुम्ही असे निराश व्हायचे काहीच कारण नाही! तुम्हाला शरीर आहे पण तुम्ही म्हणजे केवळ शरीर नाही! तुम्हाला मन आहे पण तुम्ही म्हणजे केवळ मन नाही! .... दु:खाची ही अवस्था केवळ स्वप्नवत आहे.....तुम्ही तिच्यावर मत करु शकता”.  विवेकानंद वाड्मय वाचल्यावर मन निराश  अथवा उदास राहणे अशक्य आहे असा माझा व्यक्तिगत अनुभव अनेकांना स्वत:चाही वाटेल याची मला खात्री आहे.

श्री. मुजुमदारांच्या मते One striking feature of Advaita that is very often stressed by Vivekananda is the unshakable optimism. The Advaita alone can make man strong and self-reliant, non-resisting, calm, steady, worshipful, pure and meditative. By urging that every man is potentially divine, the Advaita gives hope of infinite progress to every man, however degraded and lowly he may be. As a true Advaitist Vivekananda restored the lost spirit of man and thereby made him conscious of his heritage, dignity and responsibility. याबाबत दुमत असण्याचे मला तरी काहीच कारण दिसत नाही!

माणूस सभोवताली जेंव्हा जाणीवपूर्वक पाहू लागला तेंव्हा एक गोष्ट त्याच्या लक्षात आली की, अस्तित्वातअसणारी प्रत्येक गोष्ट विनाशाच्या दिशेने वाटचाल करत आहे. आपण नेहमीच या प्रक्रियेला नाश म्हणत नाही, कधीकधी आपण त्यालाच परिवर्तन म्हणतो. पण परिवर्तन देखील आधीच्या अवस्थेच्या नाशानंतरच शक्य असते ही बाब आपण नजरेआड करतो.

या प्रकारच्या विचारांच्या फरकातून दोन प्रकारचे विचारप्रवाह जगात उदयास आले. एक विचारप्रवाह  म्हणतो की:  या जगात आपल्याला कशाचाच शोध लागणे शक्य नाही. जगाच्या अवाढव्य पसा-यात मी (म्हणजे मानव) इतका क्षुद्र जीव आहे की, माझ्या आयुष्यात काही हेतू आहे असे मानणेही वेडेपणाचे आहे. दुसरा संप्रदाय म्हणतो की:  माझे हे शरीर, सृष्टी ज्या मूलद्रव्यापासून बनली, नेमक्या त्याच मूलद्रव्यांचे बनलेले आहे. मग शरीर हेच सर्वस्व मानून का जगू नये? या जगाचा पूरेपूर उपभोग आणि आस्वाद मी का घेऊ नये?

पण विवेकानंद आणखी एक पाऊल पुढे जातात. आपण म्हणजे फक्त शरीर नाही हे तर त्यांनी सांगितले आहेच. शरीर हे आध्यात्मिक शक्तीच्या अभिव्यक्तीचे एक साधन मात्र आहे असे विवेकानंदांचे मत आहे. माणूस हा आत्मा आहे हे त्यांनी वारंवार सांगितले आहे.

माणूस हा आत्मा आहे - या मताचेही परिणाम दोन प्रकारांनी दिसून येतात. एक म्हणजे शरीराला अजिबातच महत्त्व द्यायचे नाही, त्याला अगदी तुच्छ लेखायचे, त्याचा अगदी तिरस्कार करायचा किंवा शरीर नाही असेच म्हणत त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करायचे. व्यावहारिक पातळीवर शरीराला अस्तित्व  आहे, त्याचे भरणपोषण आणि त्याची काळजी घेणे आवश्यक आहे हे विसरुनच जायचे. दुसरे मत असे की शरीराला खूप अवास्तव महत्त्व द्यायचे, त्याचे खूप लाड करायचे, त्याच्या उपभोगाभोवतीच आपले जगणे केंद्रित ठेवायचे!

विवेकानंद या दोन्ही टोकांच्या भूमिकांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यात संतुलन साधण्याचा प्रयत्न करतात. माणसाच्या अंतर्यामी विकसित होण्याच्या अनंत शक्यता असतात पण त्यासाठी शरीर नावाचे बाहय साधनही आवश्यक आणि उपयोगी असते.

शरीराची माणसाला आवश्यकता आहे हा मुददा आपण वर पाहिला आहेच. या भौतिक अस्तित्वाविषयी विचार करताना तैत्तिरीय उपनिषदातील पंचकोष विवरणाची येथे आठवण येणे स्वाभाविक आहे. या उपनिषदात माणसाच्याअस्तित्वाचे पाच स्तर प्रतिपादन करण्यात आले आहेत. अन्नमय कोष म्हणजे आपले स्थूल शरीर; प्राणमय कोष म्हणजे चैतन्यशक्तीच्या प्रवाहाचा स्तर;  मनोमय कोष म्हणजे भावनांचा आणि विचारांचा स्तर;  विज्ञानमय कोष म्हणजे प्रज्ञायुक्त जाणीवेचा स्तर आणि आनंदमय कोष म्हणजे आपले सचिचदानंद स्वरुप!

विवेकानंद या पारंपरिक भाषेत मानवी शरीराचे वर्णन करत नाहीत, पण ते वेदान्ताची परिभाषा वापरतात. ते म्हणतात, वेदान्त दर्शनानुसार मनुष्य हा तीन घटकांचा बनलेला आहे असे म्हणता येईल. सर्वात बाहेरचा भाग म्हणजे शरीर होय. हेच माणसाचे स्थूल स्वरुप आहे. यातच संवेदनांची सारी साधने विद्यमान असतात. पण ही इंद्रिये म्हणजे फक्त साधने आहेत. मनाच्या साहचर्याविना ही इंद्रिये संवेदना ग्रहण करु शकत नाहीत...... त्यानंतर इच्छाशक्तीच्या रुपात प्रतिक्रिया होणे जरुरीचे आहे. जिच्याद्वारे ही प्रतिक्रिया होते, त्या ज्ञानशक्तीला अथवा विचारशक्तीला बुद्धी अशी संज्ञा आहे. स्थूल शरीरात सतत परिवर्तन होत असते. आंतरइंद्रिये, मन, बुद्धी आणि अहंकार ही इतकी सूक्ष्म असतात की ती युगानुयुगे टिकू शकतात.....

केवळ भौतिक किंवा स्थूल शरीराच्या पातळीवरही माणूस इतर जीवांपेक्षा श्रेष्ठ आहे असे विवेकानंदांचे मत आहे. माणसाकडे खूप शक्ती, सामर्थ्य, बळ आहे अशातला भाग नाही.  श्रवणेंद्रिय, घ्राणेंद्रिय, स्पर्शेंद्रिय या सा-याच बाबतीत माणसापेक्षा इतर प्राण्यांची क्षमता कैक पटींनी चांगली आहे हे आपण जाणतो. मग माणसाला त्या सर्वांपेक्षा सामर्थ्यवान कशामुळे म्हणायचे? एक कारण म्हणजे माणसाची शरीरयंत्रणा जास्त व्यवस्थित सुनियोजित आणि अधिक विकसित स्वरुपाची आहे. निसर्गामध्ये ज्या काही गोष्टी घडतात त्याबाबत प्राण्यांचे प्रतिसाद अत्यंत प्राथमिक स्वरुपाचे, ठरीव आणि साचेबंद प्रकारचे असतात. माणसांचे प्रतिसाद, प्रतिक्रिया मात्र इतक्या यांत्रिक नसतात. त्यात काही विकास दिसून येतो, त्यात काही निवडप्रक्रिया  दिसून येते, काही हेतू दिसून येतो. माणसाचा विकसित मेंदू हेच यामागचे प्रमुख कारण होय!

शिवाय माणसाला ‘तो म्हणजे फक्त सान्त शरीर नाही याचीही जाणीव आहे. माणूस एकाच वेळी सान्तही असतो आणि अनंतही असतो. म्हणूनच आपण स्वत:चा शोध सान्त परिभाषेत घेण्याचा प्रयत्न तर करतो पण त्याला यश येत नाही. आत्म्याशिवाय दुसरे काहीच अस्तित्वात नसून दिसणारे विभिन्न पदार्थ हे त्याचेच उत्तरोत्तर स्थूल होत जाणारे भिन्न भिन्न विष्कार आहेत.

पण सद्यस्थितीतला माणूस अगदी सदगुणांचा पुतळा आहे असेही नाही. विवेकानंद म्हणतात, दैवी, मानवी व पाशवी अशा तीन प्रकारच्या गुणांनी मनुष्य बनला आहे. तुमच्यातील देवत्वाचा ज्यामुळे विकास होतो ते सदगुण होत व ज्यामुळे पाशवी वृत्ती बळावते ते दुर्गुण होत.

मानवी मनाच्या संकुचित्पणाविरुद्ध स्वामीजी आपल्याला सूचना देवून सावध करतात. आपले शरीर सान्त, मर्यादित, सीमित आहे पण मन मात्र अज्ञानाने, स्वार्थाने, क्षुद्रपणाने ते शरीर अनंत, अमर्याद, असीम असल्याचा दावा करते. हे दुसरे तिसरे काहीही नसून माणसाचा अहंकार होय याची माणसाला जाणीव होणे आवश्यक आहे.


आपण अमर्याद आहोत ते सान्त शरीररुपाने नव्हे तर आत्मरुपाने! कोणी मग असा प्रश्न विचारेल की, कशावरुन आपण आत्मरुप आहोत? अनंत आहोत? अमर्याद, असीम आहोत?

क्रमश: