ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Wednesday, July 30, 2014

२०६. माझे सरकार

नवं सरकार सत्तेवर येतं तेव्हा लोकांच्या त्याच्याकडून खूप अपेक्षा असतात – मग ते सरकार कोणत्याही पक्षाचं असो. लोकांच्या आशा-आकांक्षांशी नाळ जोडलेली असणं हे खरं तर सरकारला लोकाभिमुख कारभारासाठी आवश्यक आहे याबाबत मतभेद असू नयेत. असा प्रयत्न होत असतो; त्याला मर्यादा असतात आणि तरीही काही प्रमाणात त्याचा उपयोगही असतो.

नुकतीच पंतप्रधान श्री. नरेन्द्र मोदी यांच्या सरकारने माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून लोकसहभाग वाढवण्याचा एक प्रयत्न सुरु केला आहे. ‘myGov’ किंवा ‘मेरी सरकार’ असे एक संकेतस्थळ शनिवारी, २७ जुलै २०१४ ला सुरु करण्यात आलं असून त्यात कोणालाही सहभागी होता येईल.

सुरुवातीला सभासद होताना अडचण आली मला, पण ते खूप लोक एका वेळी संकेतस्थळावर आल्याने झाल्याचे व्यवस्थापकांनी कळवले. नाव, पत्ता, ईमेल, फोन क्रमांक ही माहिती देऊन नाव नोंदणी करता येते. (अशी व्यक्तिगत माहिती देण्यात काहींना धोका वाटू शकतो.)

सध्या इथे सहा गट कार्यरत आहेत – स्वच्छ गंगा, मुलींचे शिक्षण, हरित भारत, कौशल्य विकास, स्वच्छ भारत आणि डिजीटल इंडिया.

तुम्हाला चार गट निवडता येतात – खरं तर तीन – कारण तुम्ही राहत असलेल्या जिल्ह्याच्या गटात तुमचे नाव सामील होते. मी ‘मुलींचे शिक्षण’, ‘स्वच्छ भारत’ आणि ‘हरित भारत’ असे तीन कार्यगट निवडले आहेत. संबंधित मंत्रालय या गटात होणा-या चर्चेची नोंद घेईल असे अपेक्षित आहे. चांगले मुद्दे मांडणा-या सभासदांना प्रत्यक्ष पंतप्रधानांना भेटण्याची संधी मिळेल अशी वृत्तपत्रात बातमी होती.
या गटात फक्त चर्चा नाहीत, तर काही कामंही करता येतील.

उदाहरणार्थ ‘स्वच्छ भारत’ गटात एक काम असं आहे: ‘मिड डे मिल’ (मध्यान्ह भोजन) पुरवणा-या कोणत्याही स्वयंपाकगृहात जा, तिथल्या स्वच्छतेची पडताळणी करा आणि त्यात काय सुधारणा करता येतील यावर अहवाल सादर करा. हे काम पूर्ण करण्यासाठी अजून २६ दिवस बाकी आहेत, कामाला लागणारा वेळ आहे २ तास.

‘मुलींचं शिक्षण’ या गटात ‘मुलींसाठी विशेष कोणती कौशल्य अभ्यासक्रमात असावीत की ज्यामुळे त्यांना पुढे चागंली उपजीविका करता येईल’ असा एक उपक्रम आहे. अजून २६ दिवस बाकी असलेल्या या कामासाठी मी नाव नोंदवलं आहे.

यात सामील होणा-या लोकांनी ही सगळी कामं एक नागरिक या नात्याने करायची आहेत. ‘आम्हाला सरकारने नेमलंय’ अशी काही भानगड नाही. त्यामुळे जबरदस्ती, दडपण, खोटेपणा.. असणार नाही अशी अपेक्षा आहे. हे पूर्ण स्वयंसेवी काम आहे – आपल्या खर्चाने, आपला वेळ देऊन, आपलं डोकं चालवून करायचा उद्योग आहे. पक्षीय अभिनिवेशाविना ज्यांना देशाच्या वाटचालीत सक्रीय सहभाग घ्यायचा आहे त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे असं प्रथमदर्शनी दिसतं. पुढे काय होईल ते कळेलच लवकर.

अर्थात माहिती तंत्रज्ञानाची माहिती नसणारे लोक, निरक्षर लोक यात सहभागी होऊ शकणार नाहीत ही याची मर्यादा आहे. केवळ ‘श्रीमंत’ अथवा ‘मध्यमवर्गीय’ लोकांसाठी हे व्यासपीठ आहे अशी त्याच्यावर रास्त टीका होऊ शकते. परंतु या मर्यादा नसणारा वर्ग, जो आंतरजालावर वावरतो, तो यात सहभागी होऊ शकतो – ज्यात आपण सर्वजण आहोत.

‘मेरी सरकार’ संकेतस्थल उपक्रमांत आपल्यापैकी जे कोणी भाग घेतील, त्यांनी त्यांचे अनुभव इथे सांगावेत यासाठी हा धागा. म्हणजे एकदा माझा ‘उप्रकम’ पूर्ण झाला की ते विचार मी इथं मांडेन, तसेच अन्य सदस्यांनीही करावे. 

Wednesday, July 23, 2014

२०५. मर्जी

माझी झोप उडालीय, मन:शांती लयाला गेलीय;
कशातच आनंद नाही; काही सुचत नाहीये.
स्वप्न आहे हे? का खरोखर घडतंय?

त्यांचा सतत आरडाओरडा चालू आहे, अगदी क्षणभरही खंड नाही.
प्रत्येकाला विजयी व्हायचंय, इतरांपेक्षा जास्त जगायचंय, जास्त चमकायचंय.
प्रत्येकाला हवं आहे यश, प्रेम, सुरक्षितता, पैसा आणि प्रसिद्धी.
प्रत्येकाला हवी आहे महत्त्वाची भूमिका.
इतरांना झाकोळून टाकण्याची त्यांची किती लगबग.  

मार्ग काढला असता मी; पण त्यांची संख्या खूप जास्त आहे.
भीती वाटतेय मला.; जो तो धमकी देतोय.
असं किती काळ चालेल?

कधीतरी हे पान उलटेल.  
मग माझ्या मर्जीनुसार मी या सगळ्यांना वागायला लावेन.

पात्रं थोडीच लिहितात कादंबरी? मी लिहितेय.
माझ्या मर्जीने लिहीन, त्यांच्या मर्जीने नाही!

Tuesday, July 1, 2014

२०४. आत्ममंथन!

तो लेखक आहे. आणि चित्रकारही. त्याचं नाव भारत. (की भरत? इंग्रजी अनुवाद वाचताना नावांची ही अशी पंचाईत होते! पण बहुधा ‘भारत’ असावं!)

ब-याच दिवसांनी तो घराबाहेर पडतो तर त्याला शहर बदललेलं दिसतं. काय आहे भवताली?

आता शहराच्या हद्दीत हसायला बंदी आहे.

‘कुणालाही मदत करू नका, कारण एकदा मदत केली की लोक तुमच्या मदतीवर अवलंबून राहतात’ असं सांगणा-या मुलांसारख्या दिसणा-या मुली आहेत; मुलीच्या वेशात नोकरीचा शोध घेणारा मुलगा आहे. खरं सांगायचं तर स्त्रिया आणि पुरुष यांच्या दिसण्यातला फरक नाहीसा झाला आहे आता.

दुकानांत दिव्यांचा झगमगाट आहे, रस्त्यांवर आता माणसांना नाही तर वाहनांना प्राधान्य आहे असा नवा नियम झाला आहे. संगीतकार असण्यासाठी तुम्हाला संगीत कळायला पाहिजे अशी सक्ती नाही, खांद्यावर हस्तिदंत घेऊन संगीतकार असल्याचा आविर्भाव असला तरी पुरे. असे बदललेले हजारो नियम ज्यात कालचं ओळखीचं शहर नष्ट झालंय.

समुद्रमंथनातून तर विष निघालं होतं म्हणतात; मग या शहरमंथनातून काय बाहेर पडेल?

ज्या शहरात भारत राहतो, तिथं नेमकं काय घडतंय? कोणते बदल होताहेत? या बदलांचा शहरातल्या लोकांवर काय परिणाम होतो आहे? या सगळ्याबद्दल बोलायचा, रडायचा त्याला अधिकार का नाही? त्याच्यावर शांत बसण्याची सक्ती का केली जातेय?

पहिल्या एक दोन पानांतच कादंबरी मनाची पकड घेते. ही कादंबरी थोडी जॉर्ज ऑर्वेलच्या “१९८४” ची आठवण करून देतेय का? का यात त्याच्याच “अ‍ॅनिमल फार्म”चे पण धागे आहेत? मनात प्रश्न येत राहतात.

या कादंबरीत रुढार्थाने पात्रं नाहीत आणि पारंपारिक शैलीतली वर्णनंही नाहीत. आहेत त्या एकामागोमाग घडणा-या घटना; त्या घटनांबद्दल प्रश्न निर्माण करणारा भारत. जणू आपला सभोवताल आणि आपली जाणीव यांची ही दोन्ही प्रतीकं. काहीकाही आठवतं. वाचलेलं; पाहिलेलं; अनुभवलेलं; घुसमट करणारं; दंगली, बॉम्बस्फोट यांच्यातून तगताना हतबल करणारं – काहीतरी जे लिंपून टाकलंय आपण सगळ्यांनी, पण अविरत आपला हिस्सा असणारं! जे प्रश्न विचारतं राहतं... ते .. आपल्यामधलं एक आवर्तन..

हे शहर ‘आपल्या’ शहरासारखंच आहे – गरीब आणि श्रीमंत यांच्यासाठी वेगवेगळं; दुभंगलेलं! इथं मुखवटे विकले जाताहेत; लोक ते धारण करताहेत त्यामुळे माणसा-माणसांतील फरक नाहीसा होतोय; सगळे अनोळखी वाटताहेत. मुखवटे माणसांच्या फक्त चेह-याचा नाही तर विचारांचा ताबा घेताहेत; मुखवटा पुरवणा-यांचा तोच उद्देश आहे. एकदा मुखवटा चढला की जबाबदारी आपली वाटायला लागते, मुखवटा विकणा-या गटाने फसवलं तरी लक्षात येत नाही; कल्पना आणि वास्तव यातल्या सीमारेषा पुसट होत जातात.

लेखकाला काही प्रश्न पडतात आणि हे प्रश्न जाऊन इतरांना विचारायची जबाबदारी त्याचा शेजारी घेतो. हा शेजारी सावलीसारखा सतत लेखकाच्या सोबत आहे. पण त्याला नाव नाही. हा सतत लेखकाला वास्तवाची जाणीव करून द्यायचा प्रयत्न करतो, लेखकाला जपायचा प्रयत्न करतो आणि तरीही लेखकाचे प्रश्न बाहेर जाऊन विचारायला तयार होतो. 

तर प्रश्न असे आहेत: तुम्ही स्वत:च्या जवळ आहात की स्वत:पासून दूर? तुम्ही कुटुंबाच्या जवळ आहात की कुटुंबापासून दूर? तुम्ही शेजा-यांच्या जवळ आहात की दूर? तुम्ही रस्त्यांच्या, झाडांच्या, गल्लीच्या, भिंतीच्या, विटांच्या जवळ आहात की त्यांच्यापासून दूर आहात? जर तुम्ही जवळ असाल तर त्याने (तुम्ही स्वत:, कुटुंब, रस्ता, झाड ...) तुमच्यासाठी काय केलंय? तुम्ही त्याच्यासाठी काय केलंय?

या प्रश्नांचा शोध घेताना शेजा-याला विविध अनुभव येतात. एक स्त्री सांगते, “ मी स्वत:पासून फार दूर आहे. मी माझ्यातला दुसरा भाग कधी माझ्यातल्या पहिल्या भागाशी जोडू शकले नाही. माझ्यातल्या एका भागाला या जगाचा आणि जगण्याचा प्रचंड कंटाळा आला आहे पण दुसरा भाग मात्र जगण्याची लालसा राखून आहे. ..... इतका दुभंग घेऊन मी कशाच्या जवळ असणार आहे?”

हे वाचताना सार्त्र, काम्यू असं काहीबाही मला आठवलं असतं एरवी (आत्ता लिहिताना ते आठवले), पण वाचताना स्वत:च्या आरपार कट्यार घुसल्यागत वेदना झाली. ती क्षणिकच होती, पण खरी होती. असे प्रश्न, अशी वेदना निर्माण करणं हे या कादंबरीचं वैशिष्ट्य. वाचकाला स्वत:कडे पाहायला ही कादंबरी भाग पाडते हे या कादंबरीचं वैशिष्ट्य! यातलं काहीही अवास्तव वाटत नाही; उलट हे आपल्याभोवती घडतंय आणि आपल्याला त्याची जाणीवही नाही याचं भान ही कादंबरी जागं करते – हेही तिचं वैशिष्ट्य! ही कादंबरी आत्ममंथन करायला उद्युक्त करते – आपल्याही नकळत.

मग ती कादंबरी फक्त ६३ पानांची आहे याचं महत्त्व राहत नाही.
ती मूळ डोगरी भाषेत आहे; ही भाषा जम्मू परिसरात (आणि लगतच्या पाकिस्तानमध्ये) बोलली जाते, तिथे कुठे असलं शहरीकरण झालंय असा तार्किक प्रश्न महत्त्वाचा राहत नाही.
या कादंबरीला १९७९ मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे यात नवल वाटत नाही. 

“नग्न रुख” – श्री ओ. पी. शर्मा ‘सारथि’.
इंग्लीश अनुवाद श्री शिवनाथ यांनी केला आहे: ‘चर्निंग ऑफ द सिटी’ या नावाने.
प्रकाशक आहे साहित्य अकादमी, दिल्ली.
किंमत? १९९१ मध्ये मी विकत घेतलेल्या प्रतीची किंमत फक्त दहा रुपये आहे.


(१९९१ नंतर आजच मी ही कादंबरी पुन्हा वाचली.)