ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Saturday, January 30, 2010

२०. नक्षत्रांचे देणे

आरती प्रभू याच्या शब्दांत नेहमीच ठसठसणारे दुःख असे ओतप्रोत भरलेले असते. आयुष्याच्या एखाद्या अचानक समोर आलेल्या वळणावर ’आता नक्की रस्ता चुकला बरं का आपला, परतीची वाट नाही यापुढे ’ अस मलाही कधीकधी वाटून जात. आणि ही कविता वाचताना तर नक्कीच तस वाटत. सगळी ताकद संपल्यावर मनाचा दगड उशाला घेऊन कण्हत झोपणे तुमच्या आमच्या सर्वांच्याच वाटयाला येते, पण ते दाहक सत्य इतक्या निरपेक्षपणे केवळ आरती प्रभूच व्यक्त करू शकतात. कवीच्या या सामर्थ्याचा मला हेवा वाटतो कधीकधी. अर्थात त्यासाठी कवीने मोजलेली किंमत माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या कुवतीच्या तर सोडाच, कल्पनेच्याही बाहेरची आहे.

तरी अनेक प्रश्न पडतातच. कविता वाचताना, तिचा अर्थ लावण्याची धडपड करताना, तिच्या सान्निध्यात मनावर चढणा-या मळभाकडे त्रयस्थपणे पाहताना... मागे उरलेल्या पाचोळ्यात जीव गुंतताना....

काहीतरी समजल्यासारख वाटतं ही कविता वाचताना पण तरीही काही तरी सुटतेच हातातून...

गेले द्यायचे राहून
तुझे नक्षत्रांचे देणे
माझ्यापास आता कळया
आणि थोडी ओली पाने.

आलो होतो हासत मी
काही श्वासांसाठी फक्त
दिवसांचे आता ओझे
रात्र रात्र सोशी रक्त

आता मनाचा दगड
घेतो कण्हत उशाला
होते कळ्यांचे निर्माल्य
आणि पानांचा पाचोळा.

Saturday, January 23, 2010

१९. दहा रूपयांची सत्ता

पैशांना किती किंमत असते? हा प्रश्न तसं पाहायला गेल तर चमत्कारिक वाटतो. त्या त्या नाण्यावर किंवा नोटेवर जी काही किंमत लिहिली असेल ती - हे तर चिमुरडी मुलं- मुलीसुद्धा हसत हसत सांगतील. आपल्याच शहरात आपण वावरत असतो तेव्हा हे बरोबर असतं, पण जरा वेगळ्या जगात भटकायला गेल की सगळ चित्र बदलून जात. मी अर्थातच अमेरिका किंवा युरोपच्या सहलीविषयी बोलत नाही. विनिमयाच माध्यम बदललं म्हणून केवळ तिथे आपल्या पैशांची किंमत कमी होते अशातला भाग नाही. तो एक वरवरचा व्यावहारिक मुद्दा झाला. पण त्याच्या खोलात आत्ता नको जायला. आपल्याच देशात वावरतानासुद्धा पैशांची किंमत अनेक वेळा बदलत जाते या गोष्टीवर सहजासहजी कोणाचा विश्वास बसणार नाही हे मला माहिती आहे. माझा तरी कोठे होता विश्वास?

उत्तर प्रदेशातील चित्रकूट भागात पहिल्यांदा गेले, तेव्हा राहण्याच्या ठिकाणापासून कामाच्या ठिकाणी रोज ये-जा कशा पद्धतीने करायची हा प्रश्न उपस्थित झाला. चित्रकूट तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असल्याने रस्त्यांवर गर्दी भरपूर, पण माणस तिथे क्वचितच एकटी येतात. माझ राहण्याच ठिकाण आणि कामाच ठिकाण यात किमान पंधरा किलोमीटरच अंतर असल्याने रोजचा प्रवास अटळ होता.

इतकी गर्दी या शहरात असूनही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा मात्र काहीच पत्ता नाही. लोकांनी आपली आपली काय ती व्यवस्था लावून घ्यावी, त्यातून जे काही हितसंबंध निर्माण होतील, त्यातून आपल्या बळावर मार्ग काढावा असं बहुधा शासनाच्या मनात असावं. लोकांनी पण याचा आनंदाने स्वीकार केला असावा असं दिसतं. कारण जिकडे तिकडे खांद्यावर बंदूक लटकवून लोक - म्हणजे पुरूषवर्ग - रोजच्या व्यवहारात मग्न असतात. बंदूक घेऊन चहा पीत बसलेले पुरूष, एका हातात बंदूक धरून एकमेकांना टाळी देत मनसोक्त हसणारे पुरूष , हे इथलं अगदी नेहमीचचं दृश्य!

असल्या असुरक्षित वातावरणाची मला सवय नसेल असं वाटून तिथेले माझे सहकारी माझी फार काळजी घ्यायचे. सकाळी घ्यायला यायचे, संध्याकाळी सोडायला यायचे. पण तीस किलोमीटरचा फेरा म्हणजे आपल्या सहकारी कार्यकर्त्यांच्या वेळेचा आणि इंधनाचा अपव्यय असं मला सारखं वाटायला लागलं. तोवर खूप वेळा जाऊन माझ तिथलं पाहुणेपणही संपुष्टात आलं होतं.

मग पर्याय निघाला सहा आसनी रिक्षांचा. अर्थात सहा आसनी हे केवळ म्हणण्यापुरतं झालं. या रिक्षात कमीत कमी पंधरा प्रवासी भरायचे, असा तिथला अलिखित नियम. एवढ्या गर्दीत विड्या, दारू, गुटखा यांचे वास अंगावर घेत प्रवास करणं जिवावर यायचं. कितीही अंग चोरून बसलं तरी सहप्रवाशांचे आगंतुक स्पर्श झेलावे लागायचेच. हे सगळं करून मी कामाच्या जागी थेट पोचायचे नाही. त्यासाठी पुन्हा काही अंतर सायकलरिक्षाने काटावं लागायचं. संपूर्ण अंतर सायकलरिक्षाने एकदा गेले, तर भरपूर वेळ लागला. शिवाय सायकलरिक्षावाल्याला लागलेला दम पाहून मला अपराधीपण आलं.

स्थानिक प्रवासाच्या या प्रश्नावर उत्तर शोधण्याची मनाची नकळत बरीच धावपळ चालली असणार यात काहीच शंका नाही. एका सकाळी एका रिक्षावाल्या माणसाला मी धीर करून विचारलं, "पुढे तुम्ही किती माणसं बसवता?" त्याने जरा चमत्कारिक नजरेनं पाहिलं. तो म्हणाला, "आहे ना जागा, बसून घ्या." तरी पण मी तोच प्रश्न विचारल्यावर त्याने "तीन" असं उत्तर दिलं. प्रवासी फारसे नसल्यामुळे त्याला थोडा मोकळा वेळ होता. मला कुठे जायच आहे याची त्याने विचारणा केली. "पाच रूपये सीट, पाच रूपये सीट" असं ओरडत तो आणखी प्रवासी शोधू लागला.

मी त्याला म्हटलं, "मी पुढे बसते. मी तुम्हाला तीन प्रवाशांचे पैसे देते. तुम्ही कोणालाही पुढे बसवू नका." तो चांगल्यापैकी गोंधळला होता. तीन- चार लोकांनी मिळून प्रवास केला तर वाद घालून कमी पैसे द्यायची इथली पद्धत. अशा स्थितीत कोणी एकटंच प्रवास करून तीन लोकांचे पैसे द्यायला का तयार होतं आहे, हे त्याला समजत नव्हतं. माझा हिशोब सोपा होता. दहा रूपये खर्च करून मी माझी सोय बघत होते. पण त्या भागात दिवसभराचा खर्च भागविण्यासाठी दहा रूपये जवळ असणं ही चैनीची परिसीमा आहे. अशा वेळी कोणी दहा रूपये असे हकनाक कशाला उडवेल?

बराच वेळ मी त्याला तेच सांगत होते आणि तो नुसताच हसून दुर्लक्ष करत होता. मी त्यावेळी उत्तर प्रदेश सरकारच्या विश्रामगृहात राहत होते. मी बराच वेळ रिक्षावाल्याशी बोलतेय हे पाहिल्यावर तिथला एक कर्मचारी धावत माझी मदत करायला आला. त्याने मग त्या रिक्षावाल्याला सांगितलं, " मुंबईच्या आहेत
मॅडम."

स्वत:च्या सोयीसाठी दहा रूपये खर्च करणं म्हणजे फार मोठी चैन झाली तिथल्या हिशोबाने. सहा आसनी रिक्षात मी पुढच्या सीटवर एकटीने बसून केलेला प्रवास हा लोकांच्या कुतुहलाचा आणि चर्चेचा विषय झाला. दर दोन मिनिटांनी रिक्षा प्रवाशांसाठी थांबायची. पुढे मोकळ्या दोन जागा पाहून प्रवासी ऐटीत पुढे यायचे आणि रिक्षावाला त्यांना मागे जायला सांगायचा. पुढे मोकळी जागा असताना मागे का जावं लागत आहे हे त्यांना समजत नसे. मग मागे बसलेल्या प्रवाशांपैकी कोणीतरी स्पष्टीकरण देई, " मॅडम तीन सीट का पैसा दे रही है". माणस अवाक होत. मग आणखी कोणीतरी कुजबुजे," मॅडम बंबई से आयी है".

मग हे नेहमीचचं झालं. रिक्षावाल्यांना पण ही व्यवस्था सोयीची होती, कारण त्यांना दोन प्रवासी कमी शोधायला लागायचे. एखाद्या रिक्षात पुढे कोणी प्रवासी बसले असतील तर त्यांना उठवू नका, अशी मी रिक्षावाल्यांना विनंती करायचे. आपल्याकडे त्यांच्यापेक्षा दहा रूपये जास्त आहेत, हा केवळ सुदैवाचा भाग आहे याची मला जाणीव होती.

मी दूरवर दिसले की ते पुढे बसलेल्या प्रवाशांना मागे बसवायचे. कधीच कोणा प्रवाशाने " मी उठणार नाही, त्यांच्याकडे पैसे जास्त असले म्हणून काय झालं?" असं प्रत्युत्तर दिलं नाही. "एवढी पैशांची मस्ती असेल तर स्वतःची गाडी घेऊन हिंडा" असा अनाहूत सल्लाही मला कोणी दिला नाही.

चार साडेचार वर्षांच्या काळात किमान पंचवीस वेळा मी चित्रकूटला गेले असेन, त्या सगळ्या काळात स्थानिक प्रवास मी असाच केला. दहा रूपयांत घेता येईल तितकं सुख विकत घेण्याचा मी प्रयत्न केला.

मी खरे तर दहा रूपयांची सोय घ्यायला गेले, दहा रूपयांच सुख मिळवायला गेले. ते तर मला मिळालच,पण त्याचबरोबर मिळाली दहा रूपयांची सत्तादेखील! ही काही अनिर्बंध सत्ता नव्हती, पण ती ठोस होती.

पैशांची किंमत नोटेवरच्या आकडयावरच अवलंबून नसते. इतरांच्या तुलनेत पैसा तुम्हाला काय मिळवून देऊ शकतो, यावर पण ती अवलंबून असते तर! पैसे मिळवताना सत्तेची ही सुप्त प्रेरणा तुमच्या आमच्या सर्वांच्या मनात असणारच. म्हणूनच आपण सारे कदाचित पैशांच्या मागे धावतो. सुखाची प्रेरणा स्वाभाविक आहे, पण सत्तेची ऊर्मी आपल्याला टाळता येईल का? एकदा इतर व्यक्तींच्या मापाने आपण आपल्याला तोलायला लागलो की सुख आणि समाधान हाती लागण्याची शक्यता दुरावणारच....पैसा कितीही असला तरी! म्हणून आपल्यावर पैशांची सता चालणार की नाही हे आपल्यालाच ठरवावं लागतं ---- कितीही कठीण असलं तरी!

पूर्वप्रसिद्धी: तनिष्का, आगस्ट २००९ **

Thursday, January 14, 2010

१८. काही कविता: ८ सख्य

आपण ज्या समाजात वावरतो, ज्या संस्कृतीत वाढतो, त्याचा आपल्यावर कळत नकळत - बरेचदा नकळतच! - फार मोठा पगडा असतो. माझ्या कवितांमध्ये जेव्हा जेव्हा कृष्ण प्रकटतो, तेव्हा त्याच्या अचानक येण्याने मी आश्चर्यचकित होते.

मी कोणत्याही अर्थाने धार्मिक नाही. मी व्रत करत नाही, उपास करत नाही, नवस करत नाही, पूजा करत नाही. मला देऊळ आवडते, पण मी देवाला नमस्कार करत नाही. या जगात आपल्याला न कळणारे बरेच काही आहे हे मला जाणवते. दुःख दिसते तसेच सुखही दिसते. या शक्तीचा शोध मानवी मनाच्या पल्याड आहे आणि तो माझा प्रांत नाही असे मी स्वतःला फार पूर्वी सांगितले आहे.

कृष्ण मला माहिती नाही असे नाही. लहानपणापासून अनेक गोष्टी ऐकताना तो भेटला आणि त्याचा खोडकरपणा आणि त्याचे शूरपण भावले. मोठेपणी भगवद्गीता वाचायची संधी मिळाली. ती समजली नाही अजुनही, पण त्याची भव्यता आकर्षक वाटली. हा लोणी वगैरे चोरून खाणारा आपल्या लहानपणीचा कृष्ण तत्त्ववेत्ता आहे हे लक्षात आल. पुढे एकदा नेटाने मी संपूर्ण महाभारतही वाचल.. त्यातला मानवी मनाचा व्यापक आवाका पाहून मन थक्क झाल.

ते सगळ नेणीवेत रूजले असणार आणि संधी मिळताच मला त्याची जाणीव करून देत असणार...अन्यथा या कल्पनेचा दुसरा काय अर्थ लावणार?


सुदाम्याने पोहे केले,
मला बोलावले;
कृष्ण होता भुकेजला,
त्याला सारे दिले.

कृष्ण तृप्त झाला,
जरा डोळाही लागला;
स्वप्न त्याने पाहिले,
त्याचा अंश मला आला.

सख्य ओतप्रोत दिले,
जिणे बहकून गेले;
सावळ्याच्या सावलीला,
मीच घुंगरू बांधले.

पुणे, ८ नोव्हेंबर २००५ ११.५०

Friday, January 8, 2010

१७. अज्ञेयाचे रुद्धद्वार

काही वेळा शब्दांचा अर्थ लागत नाही पण त्यामागची भावना आपल्यापर्यंत पोचते. हे नेमके कसे घडते ते सांगता येत नाही, ते शब्दांत पकडता येत नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांची ही कविता वाचताना मला हा अनुभव आला. एकदा नाही, तर अनेकदा आला. आजही ही कविता मला नीट ’समजलेली’ नाही, पण ही माझी एक आवडती कविता आहे.

आणखी एक मुद्दा. बुद्धिवाद आणि कविता यांचा काही संबंध असतो अस मला कधीच वाटल नव्हत. ही कविता वाचताना कविता म्हणजे नुसता भावनांचा झंझावात असत नाही, तर त्यात विचारांनाही स्थान असते हे मला अगदी पटलेच म्हणा ना!

ज्या घरापासुनी मार्ग सर्व फुटणारे
येणार घरासी मार्ग त्याची ते सारे

ऐकोनी तुझ्या भाटांच्या
गप्पांसी गोड त्या त्यांच्या
घ्यायासि विसावा माझ्या
जीवासि ये घरी तुमच्या

ठोठावित थकलो! अजुनि नुघडतो बा रे
आंतूनि तुझी ती बंद सदोदित दारे

अशी शॊधाची साद देणारी ही एक वेगळीच कविता. हा शोध घेताना कवी काही शक्यता बाकी ठेवत नाही. तो पुराण कथांचा वेध घेतो, परपरेच्या मांदियाळीत सामील होतो, एकान्तपथाचीही कास धरतो. अगदी अणुंच्या बोगद्यातून हिंडून कवी अनंतत्त्वाचा शोध घेतो.

अखेर कवी म्हणतो,

घर दुजे बांधु देईना
आपले कुणा उघडीना
या यत्न असा चालेना
बसवे न सोडुनी यत्ना

ठोठावित अजि मी म्हणुनि पुनरपि बा रे
ती तुझ्या घराची बंद सदोदित दारे!

कवितेचे फक्त पहिले आणि शेवटचे कडवे येथे आहे. मूळ कविता वाचायला तुम्हाला नक्कीच आवडेल!

Saturday, January 2, 2010

१६. न कळलेले....

सकाळी साडेदहाच्या सुमारास कार्यालयातील माझ्या जागेपाशी आवाज ऐकू आला. हा आवाज खारींचा आहे हे आता अनुभवाने मला माहीत झाले होते. आज सकाळीच यांचा गप्पा मारायचा, इतकेच नाही तर दंगा करायचा मनसुबा दिसतोय.. हे माझ्या लक्षात आल. बाहेर व्हरांडयात एक चक्कर टाकून त्यांच काय चाललय ते पाहाव असा विचार माझ्या मनात आला अन तितक्यात टेबलावरचा फोन खणखणला. मग कामात मी गुंतले ती गुंतलेच. मी काही फार महत्त्वाच आणि सृजनात्मक काम करते अशातला भाग नाही. पण सवयीने निरर्थक कामातही माणूस अडकत जातो. पोटासाठी अनेकदा आपण अशा कामाचे गुलाम बनतो! का असे होते ते कळत नाही, पण घडते खरे तसे! मी मुकाटयाने ही बाब ’न कळलेले’ या सदरात टाकून दिली आहे.

बघताबघता दुपारचा एक वाजून गेला. जेवणाची वेळ झाली. कार्यालयाच्या दुस-या इमारतीत कन्टीन आहे. जेवायला मला नेहमीसारखा उशीर झालेला असल्याने त्यावेळी त्या अर्ध्या मिनिटांच्या रस्त्यावर मी एकटीच होते. वाटेत दोन्ही बाजूंना बरीच झाडे आहेत. तिकडे जाताना खारीचा आवाज मला अगदी जवळून ऐकू आला. काही कामे समाधानकारकपणे हातावेगळी झाल्याने आता त्यांच्याकडे लक्ष द्यायला मला थोडी फुरसत होती. मी अर्जुनाच्या तडफेने आवाजाचा वेध घ्यायचा प्रयत्न करू लागले. आधी मला काहीच दिसले नाही. पण खारीचा आवाज मात्र येतच होता, किंबहुना आता तो जरा जास्तच जोरात येत होता.

आवाजाच्या दिशेने जात जात मी एका झाडाजवळ पोहोचले. खालच्या फांद्यांपासून सुरुवात करून मी वरती नजर फिरवत होते. लक्षपूर्वक पाहिल्यावर एका फांदीवर खारीचे एक पिल्लू मला दिसले. ते एकटेच होते. मला वाटले होते तसे अनेक खारींचा हा दंगा नव्ह्ता तर! हे एकटे पिल्लू इतका आवाज का बर करत असेल?

मी झाडाच्या जवळ जाताच ते पिल्लू आणखीनच जोरात आवाज करायला लागले. त्याला पाहून घसा ताणून ओरडणा-या आणि काही वेळा रडणा-या लहान मुलांची मला आठवण झाली. हे बहुधा हरवलेले पिल्लू होते. त्याच्या आईला ते शोधत असणार असे मला आपले उगाचच वाटले - प्राण्यांच्या आणि पक्षांच्या पिल्लांना त्यांच्या वडिलांचा आधार वाटतो की नाही हे मला माहिती नाही, हा माझा नुसताच एक अंदाज! अरे बापरे! सकाळी दहा साडेदहा वाजल्यापासून म्हणजे मागचे तीन साडेतीन तास हे पिल्लू ओरडते आहे. रडते आहे. एकटेच आहे. त्याला नक्कीच आता मदतीची गरज आहे. मी परिस्थितीकडे नीट पाहिले.

ते पिल्लू एका निमुळत्या होत गेलेल्या फांदीच्या वरच्या टोकाला होते. त्याला धड वरही जाता येत नव्हते आणि परत खालीही फिरता येत नव्हते. एक दोन फुटांवर फांदी संपत होती. आत्ताही ती फांदी किंचित वाकलेली होती आणि वा-याच्या झुळुकीने हलत होती. पाय गच्च पकडून आणि शेपटीच्या साहाय्याने त्याने कशीबशी तग धरली होती. मागे वळताना स्वतःचा तोल सांभाळता येईल अशी बहुधा त्या पिल्लाला खात्री नव्हती.

खरे तर खारीच्या त्या इवल्या पिल्लाकडे पाहताना मला माझीच स्थिती आठवली. आयुष्यात जेव्हा पुढे जाण्याचा रस्ता दिसत नाही आणि मागचेही सगळे दरवाजे बंद असतात, त्यावेळी काय वाटते हे मला अनुभवाने चांगले माहिती आहे. अशा प्रसंगी कोणी मदतीला येऊ नये अशीही इच्छा मनात असते, आपले आपण निभाऊन नेऊ असा आशावाद असतो. पण कोणी श्रेयाची अपेक्षा न करता मदत केली तर त्याचे अप्रूपही असते. मला अशा अनेक क्षणांची, प्रसंगांची आठवण त्या पिल्लाकडे पाहताना आली. कदाचित म्हणूनच खारीच्या त्या पिल्लाबद्दल माझ्या मनात ’सह- अनुभूति’ ची प्रबळ भावना दाटून आली.

अशा परिस्थितीत एरवी जे घडत तेच माझेही झाले. म्हणजे एखादी समस्या फक्त हृदयापर्यंत पोचून फारसा उपयोग नसतो, ती मेंदूपर्यंतही पोचावी लागते, तरच त्यातून मार्ग काढता येतो. त्या खारीच्या पिल्लाला नेमकी कशी मदत करावी हे मला समजत नव्ह्ते. ते पिल्लू माझी मदत मागत होते का पण? एक क्षणभरच माझी नजर त्या पिल्लाच्या नजरेत मिळाली आणि पिल्लाने मागे फिरण्याचा प्रयत्न केला. तो अर्थातच यशस्वी झाला नाही. कसाबसा स्वतःचा तोल सावरत खाली पडण्यापासून त्याने स्वतःला वाचवले. आता ते पिल्लू अधिकच जोरात ओरडू लागले. त्याचे सर्वांग थरथर कापत असलेले मला दिसत होते. ते माझ्या मदतीची अपेक्षा करत होते की ते आता मला घाबरत होते हे कळायला काही मार्ग नव्हता.

मी पायांखाली साठलेल्या पाचोळ्याचा अजिबात आवाज होणार नाही याची काळजी घेत एक पाउल पुढे सरकले. मनातल्या मनात, शब्दांविना त्या पिल्लाशी संवाद साधण्याचा मी प्रयत्न करत होते. माझ्या डोळ्यांतून माझी मदतीची भावना त्या पिल्लापर्यंत पोचेल अशी माझी भाबडी आशा होती. ’सावकाश मागे फिर, घाई करू नकोस. तुला मी खाली पडू देणार नाही, माझ्या ओजळीत मी तुला झेलेन, तू पडणार नाहीस...’ असे काहीबाही मी मनोमन त्या पिल्लाला सांगण्याचा प्रयत्न करत होते. माझी सद्भावना त्या पिल्लापर्यंत पोचेल, ते सुखरूप मागे फिरेल असे मला आपले उगाचच वाटत होते.

पण प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. माझ्या कृतीमुळे ते पिल्लू आणखी भयभीत झाले. ते जिवाच्या आकांताने ओरडू लागले. प्राणी, पक्षी, वनस्पती अत्यंत तरलपणे आपल्याला स्वीकारल्याचा अथवा नाकारल्याचा संदेश देतात. तो सूक्ष्म असतो पण अत्यंत स्पष्टही असतो. माणसेही खरे तर या भावना आपल्याप्रर्यंत पोचवतात पण जसजसे वय वाढते तसतसे त्याकडे दुर्लक्ष करण्याइतका बेरकीपणा आपल्या सर्वांकडे येतो.

खारीच्या या पिल्लाने माझी मदत नाकारताना मलाही नाकारले होते. ते स्वीकारण्याशिवाय गत्यंतर नव्ह्ते. मी हळूहळू मागे सरकले. कदाचित त्या पिल्लाची आई जवळच असेल आणि मी समोर असल्याने ती मदतीला येत नसेल, अशी मी स्वतःची समजूत घातली. मी मागे फिरताच पिल्लाचा कंप कमी झाला, आवाजाचा जोरही थोडा कमी झाला. मी शांतपणे त्या जागी थांबले. माझ्या श्वासाचाही आवाज येऊ नये इतकी मी स्तब्ध होते. क्षणभर मी डोळे मिटले. पण मला काही सुचेना. त्या क्षणी मी पूर्णपणे रिक्त होते. पिल्लाची गोठलेली नजर अजून माझ्यावर खिळलेली होती. त्याला माझी भीती वाटत होती हे आता मला स्वच्छ समजत होते.

मी आणखी मागे सरकले. घाई न करता वळले. विचारमग्न अवस्थेत मी कन्टिनमध्ये गेले. त्या पिल्लाला माझे जवळ असणे आश्वासक वाटण्याऐवजी भीतीदायक का वाटले असावे हे मला समजत नव्हते. त्याचा आणि एकंदरच झाल्या प्रसंगाचा अर्थ शोधत मी दोन घास कसेबसे पोटात ढकलले. काही मिनिटांतच मी परत त्या झाडापाशी होते.

आता तेथे पूर्ण शांतता होती. कसलाही आवाज नव्हता, कसलीही हालचाल नव्हती. खारीच्या पिल्लाचा मागमूसही नव्हता. फक्त ते झाड आणि मी असे दोघेच होतो. ते झाडही जणू स्वतःच्या विचारांत मग्न होते, आपण त्या गावचे नसल्याच्या थाटात ते उभे होते. काय झाले त्या पिल्लाचे? त्याची आई त्याला घेऊन गेली? की ते खाली पडले? की आकाशात हिंडणा-या एखाद्या घारीचे ते शिकार बनले? मी चहूकडे नजर टाकली. कशाचीही खूण नव्हती. काहीही वेगळे दिसत नव्हते. सगळे जणू नेहमीसारखे होते. ते पिल्लू वेदनेने तळमळत होते? की ते खेळत होते? की ते स्वतःच्याच नादात होते? मी त्या पिल्लाला तशीच सोडून गेले हे बरोबर केले? की ती टाळता येण्याजोगी चूक होती? पिल्लाला माझ्याबद्दल विश्वास वाटावा यासाठी मी नेमकी काय काळजी घ्यायला हवी होती? मी त्याला कशी मदत करायला हवी होती? आता ते आनंदात असेल का?

खरेच पाच मिनिटांपूर्वी असे एखादे खारीचे एकटे आणि हतबल पिल्लू येथे होते? की हा सारा मला झालेला भास?

आणखी एका गूढाची भर पडली आयुष्यात! सत्य मला कधीच कळणार नाही! नेमके काय घडले, ते का घडले, ते टाळता येण्याजोगे होते की नव्हते, पर्याय काही होता की नाही …. ते सारे काही असेच ’न कळलेले’ या सदरात राहणार तर आयुष्यभर!
*