हल्ली शहरात, खेडयात कोठेही गेले तरी संध्याकाळ होताना घराची दारे खिडक्या बंद करण्याची सर्वांची लगबग दिसते. कारण? डास. आणि मग सुरू होते चर्चा डासांच्या वाढत्या प्रतिकारशक्तीची आणि त्यांना रोखण्यास कमकुवत ठरलेल्या ’डीडीटी’ ची! डीडीटीच्या फवारणीचे प्रमाण वाढवायला पाहिजे; ग्रामपंचायत अथवा महापालिकेने त्याची फवारणी जरा जास्त वेळा केली पाहिजे असे चर्चेच्या ओघात मत जोरदारपणे मांडले जाते. मग कोणीतरी जाणकार ’डीडीटी माणसांसाठी कसे घातक आह” हे सांगतात. अशा चर्चा लहानपणापासून इतक्या वेळी आपण ऐकलेल्या आहेत, की त्याचे मला स्वतःला फारसे गांभीर्य कधी जाणवत नसे.
या विषयावरचे एक अतिशय चांगले पुस्तक नुकतेच माझ्या वाचनात आले. रेचल कार्सन या अमेरिकन लेखिकेचे १९६२ मध्ये प्रसिद्ध झालेले ’सायलेंट स्प्रिंग’ हे पुस्तक आपल्याला विचार करायला प्रवृत्त करते. वसंत ऋतुमध्ये कोकिळेचे गाणे कानी पडले नाही, तर आपल्याला नक्कीच चुकल्यासारखे वाटेल. असे चुकलेसे वाटण्याची वेळ आपल्यावर आपल्याच कृतींनी येऊन ठेपली आहे, याची जाणीव हे पुस्तक वाचताना पदोपदी होते. जागतिक पातळीवरच्या आणि विशेषतः अमेरिकेतील पर्यावरण चळवळीचा पाया रचणारे पुस्तक अशी ’सायलेंट स्प्रिंग’ची ख्याती आहे. न्यू्यॉर्क टाईम्स्च्या बेस्ट सेलर यादीत हे पुस्तक आहे आणि मॉडर्न लायब्ररीच्या विसाव्या शतकातील श्रेष्ठ पुस्तकांच्या यादीत त्याला पाचवे स्थान देण्यात आलेले आहे. अमेरिकेत ५० आणि ६०च्या दशकात जे घडत होते, विकासाचे जे धोरण तेथे राबवले जात होते, ते कमी अधिक फरकाने आज आपल्याकडे आहे. विकासाच्या निसर्गविरोधी धोरणाबाबत जागे होऊन आज आपण कृतीशील नाही झालॊ, तर कीटकांची, प्राण्यांची, जलचरांची आणि पक्षांची आज जी अवस्था झाली आहे, तेच मानवजातीचेही भविष्य आहे असा इशारा ’सायलेंट स्प्रिंग’ आपल्याला देते.
या पुस्तकाची आणि पर्यायाने या महत्त्वाच्या विषयाची सुरुवात ओल्गा हकिन्स या मैत्रिणीने रेचल कार्सनला लिहिलेल्या एका पत्रामुळे झाली. खरे तर ओल्गाने ते पत्र ’बोस्टन हेराल्ड’ या दैनिकाला पाठवले होते आणि त्याची प्रत रेचलला पाठवली होती. डास मारण्यासाठी डीडीटीची हवाई फवारणी ओल्गाच्या परिसरात केल्यामुळे तिच्या शेतीच्या परिसरातल्या पक्षांचा मृत्यू मोठया प्रमाणात झाल्याचे निरीक्षण ओल्गाने नोंदवले होते. रेचल कार्सन आधीपासूनच वर्तमानपत्रात सागरी जीवशास्त्रावर आणि निसर्ग इतिहासावर लेखन करत होती. २७ मे १९०७ या दिवशी जन्मलेल्या रचेलने वयाच्या आठव्या वर्षी लिखाणाला सुरूवात केली होती. महाविद्यालयीन काळात प्राणीशास्त्राचा अभ्यासक्रम तिने पूर्ण केला. सागरी माशांचा अभ्यास हा तिच्या कामाचा भाग होता. समुद्रासबंधी तिची तीन पुस्तके १९५५ पर्यंत प्रसिद्ध झाली होती. ओल्गाच्या पत्रातला मजकूर तिच्या तोवरच्या कामाशी प्रत्यक्ष नसला तरी अप्रत्यपक्षपणे निगडित होता.
ओल्गाच्या पत्रानंतर रेचल कार्सनने ”रासायनिक कीटकनाशकांचा पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम’ या विषयावर अधिक लक्ष केंद्रित केले. अर्थात डीडीटी विरोधातला लढा त्यापूर्वी म्हणजे १९४० मध्ये सुरू झाला होता. १९५७ मध्ये अमेरिकेत लॉन्ग आयलंडवर डीडीटीची हवाई फवारणी केल्याबद्दल अमेरिका सरकारच्या कृषि खात्यावर एक खटलाही दाखल करण्यात आला होता. रेचल या विषयाचा अभ्यास करत होतीच. ओल्गाच्या पत्रामुळे त्याला गती मिळाली.
कीटकनाशकाचे - मुख्यत्वे डीडीटीचे - पर्यावरणावर आणि विशेषतः पक्षांवर होणा-या दुष्परिणामांचे विवेचन या पुस्तकात अतिशय परिणामकारकरीत्या केले आहे. डीडीटीमुळे पक्षांच्या अंडयाचे कवच पातळ होते आणि त्यामुळे पिल्लांच्या वाढीत समस्या निर्माण होतात आणि पिलांच्या मृत्युचे प्रमाण वाढते असे कार्सनचे मत आहे. रासायनिक उद्योग स्वतःचा माल खपवण्यासाठी आम जनतेला चुकीची माहिती पुरवतात आणि शासनही त्याकडे डोळेझाक करते असा कार्सनचा आरोप आहे. परंतु रासायनिक कीटकनाशकांचा वापर पूर्णपणे थांबवावा असे रेचल कार्सनने कधीही म्हटले नव्हते हे आपण लक्षात घेतले पाहिजे. रासायनिक कीटकनाशके आपण पूर्ण जबाबदरीने वापरली पाहिजेत असे तिचे मत होते. त्यांचा पर्यावरणावर आणि माणसांवर होणारा परिणाम लक्षात घेऊन, रासायनिक कीटकनाशकांचा अवास्तव वापर टाळून आवश्यक तेवढाच वापर आपण करावा या तिच्या मताला कोणाचाही विरोध असण्याचे खरे तर काही कारण नाही. जैविक कीटकनाशकांचा पर्याय आपल्याला खुला आहे हे देखील ती आवर्जून सांगते.
’सायलेंट स्प्रिंग’ लिहिताना रेचल कार्सनने अनेक कागदपत्रांचा सखोल अभ्यास केला. रासायनिक पदार्थांशी संपर्क वाढल्याने मानवजातीत कॅन्सरसारख्या असाध्य रोगांचा प्रादुर्भाव वाढतो आहे असे रेचलचे मत बनले. रासायनिक कीटकनाशकांचा संसर्गात आल्यामुळे दुर्धर रोगांना तोंड देत असलेल्या हजारो व्यक्तींबरोबर तिने संपर्क साधला. पर्यावरणाच्या विनाशाबाबत अशीच अनेकांची निरीक्षणे जाणून घेतली. पुस्तकाचा कच्चा मसुदा त्या त्या विषयातील जाणकार शास्त्रज्ञांकडून तपासून घेउन पुस्तकात माहितीच्या पातळीवर कोणतीही चूक राहू नये याची तिने खबरदारी घेतली. या दूरदृष्टीचा पुढे चांगला उपयोग झाला. दुर्दैवाने पुस्तक लेखनाच्या या काळातच रेचलला स्तनांच्या कॅन्सरचा विकार झाला असल्याचे निदान झाले आणि १४ एप्रिल १९६४ या दिवशी म्हणजे पुस्तकाच्या प्रसिद्धीनंतर दोन वर्षांच्या आतच मृत्युने तिच्यावर घाला घातला.
रेचल कार्सनने केवळ डीडीटीबद्दल प्रश्न विचारले नाहीत. तर दुस-या महायुद्धानंतर अमेरिकेने ’वैज्ञानिक प्रगती’, ’शेती विकास’ अशा नावाखाली जे धोरण स्वीकारले होते, त्या धोरणालाच तिने आरोपीच्या पिंज-यात उभे केले. माणसांच्या ध्येयधोरणांचा फक्त माणसांवर परिणाम होत नाही तर तो सबंध जीवसृष्टीवर होतो हे तिने असंख्य उदाहरणांसह सांगितले - आणि असे करण्याचा माणसाला काही अधिकार नाही असेही ठणकावून सांगितले.
रासायनिक कीटकनाशकांच्या फवारणीमुळे शत्रू कीड काही काळ नष्ट होते हे खरे - कालांतराने ती पुन्हा येते, आणि अधिक बळकट होऊन येते - हे आपण आता अनुभवले आहे. पण अशी बेधुंद फवारणी मित्र कीडही नष्ट करते आणि पर्यायाने पर्यावरणाचे संतुलन ढासळते. रासायनिक पदार्थ पाण्यातून, हवेतून वापराच्या क्षेत्राबाहेर पोचतात आणि जीवनसाखळीत हैदोस माजवतात हे आपण कधी लक्षात घेत नाही. एखाद्या कीडीचा सामना करताना जणू काही पूर्ण निसर्गाच्या विरोधात आपण युद्धाला उभे ठाकले आहोत असा आपला व्यवहार असतो. असे करण्याचा ना आपल्याला नैतिक अधिकार आहे ना त्यात काही शहाणपण आहे हा ’सायलेंट स्प्रिंग’चा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे असे मला वाटते.
अमेरिकेत आज परागीकरणात महत्वाची भूमिका बजावणा-या मधमाशा नाहीशा होत आहेत हे आपण वाचले असेल. भारतातही सागरी किना-यांवर मृत माशांचा ढिगारा पडल्याच्या, गिधाडे नष्ट होत असल्याच्या, बेडूक नाहीसे होत असल्याच्या बातम्या आपण वाचतो. पुण्यात मध्यतरी ’चिमण्या कोठे गायब झाल्या?’ हा चर्चेचा विषय होता हे आपल्याला आठवत असेल. म्हणजे आपल्या कल्पनेपेक्षा जास्त जीवजंतूंना आपण मारत सुटलो आहोत. जमिनीत रसायने साठून तिची सुपीकता कमी होत चालली आहे.
राष्ट्राध्यक्ष केनेडींच्या Science Advisory Committee' समोर रेचल कार्सनने साक्ष दिली. १९६३ मध्ये या समितीचा अहवाल प्रसिद्ध झाला तेव्हा समितीने रेचल कार्सनच्या मताचे समर्थनच केले. कीटकनाशकांचे दुष्परिणाम, प्रदूषण याबाबत जनमानसात मोठया प्रमाणात जागृती घडवून आणण्याचे या पुस्तकाचे निःसंशय श्रेय आहे. अमेरिकन सरकारने १९७२ मध्ये डीडीटी वर बंदी घातली, ज्याची सुरूवात रेचल कार्सनच्या लेखनातून झाली. Deep Ecology, Environmental Justice सारख्या पुढे निर्माण झालेल्या अनेक चळवळी रेचल कार्सनचे ऋण मान्य करतात. ’सायलेंट स्प्रिंग’ ने पर्यावरण जागरूकतेचा एक प्रचंड झंझावातच निर्माण केला.
’सायलेंट स्प्रिंग’ मध्ये व्यक्त करण्यात आलेल्या मतांमुळे अनेक उद्योगसमुहांच्या पोटावर पाय आला. हितसंबध दुखावलेली मंडळी पुस्तकावर तुटून पडली. व्यक्तिगत स्वरूपाच्या टीकेलाही रेचल कार्सनला तोंड द्यावे लागले. शेती खात्याच्या निवृत्त एका माजी सचिवांनी तर "रेचल कार्सन इतकी सुंदर असूनही ती अविवाहित राहिली, म्हणजे ती नक्की कम्युनिस्ट असावी’ अशी टिप्पणी केली. एखाद्याला जीवनातून उठवायचे असले की त्या व्यक्तीला ’कम्युनिस्ट’ म्हणायचे ही अमेरिकेची त्या काळची रीत होती. रेचलच्या मृत्युनंतरही या पुस्तकावर टीका होत राहिली, कारण ’सायलेंट स्प्रिंग’ ने काही मुलभूत प्रश्न उपस्थित केले आहेत, जे आजही तितकेच वाजवी आहेत.
’डीडीटीमुळे मलेरिया आटोक्यात आला आणि लाखो माणसांचे प्राण वाचले, या वस्तुस्थितीकडे रेचलने डोळेझाक केली. डीडीटीला विरोध करून, मलेरिया प्रतिबंधात अडचणी निर्माण करून, अनेकांना तिने जणू मरणाच्या खाईत ढकलले’, असा आरोप अगदी अलिकडे म्हणजे २००५ मध्ये डिक टव्हर्न या ब्रिटिश राजकारण्याने केला. "रेचल कार्सनचे ऐकायचे ठरवले तर तमोयुगात परतण्याशिवाय आपल्याला गत्यंतर राहणर नाही’ अशीही टीका झाली. पण रेचल कार्सनचे असे म्हणणे होते की : मलेरिया नियंत्रणासाठी डीडीटीच्या वापराची फक्त एक बाजू - यशाची बाजू - आपण आजवर पाहिली. पण त्यात आपल्याला झेलाव्या लागलेल्या पराभवांबाबत आपण कधी काही ऐकले आहे का? आपले विजय क्षणभंगूर आहेत हेच पुनःपुन्हा दिसून येत नाही का? रासायनिक कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे काय झाले, तर फक्त कीटकांची प्रतिकारशक्ती वाढली. आजचे मरण आपण पुढे ढकलले इतकेच! मोठया क्षेत्रावर डीडीटीची हवाई फवारणी करूनही डास तसेच राहिले, इतर प्रजातींना त्याला हकनाक बळी पडावे लागले.
सन २००० मध्ये Human Events नामक मासिकाने १९ व्या आणि २० व्या शतकातील ’सर्वात जास्त हानी करणा-या’ पुस्तकांच्या यादीत सायलेंट स्प्रिंगला ’मानाचे स्थान’ दिले. ’रेचल कार्सनच्या काळात फारशी आकडेवारी उपलब्ध नव्हती. पण तिने मांडलेले धोके काल्पनिक आहेत, निदान डीडीटीच्या वापरामुळे हानी होते असा ठोस पुरावा अब्जावधी डालर्स खर्च करूनही मिळालेला नाही’ हा आरोप पर्यावरणाच्या चळवळीचे पाय मागे खेचण्यासाठी केला जात आहे असे कार्यकर्त्यांचे मत आहे.
पैसा कमावणे हेच ज्यांचे ध्येय आहे अशा मोठया उद्योगांचे ’आधी उत्पादन, मग विचार’ असे स्वार्थी धोरण असते. जनसामान्यांमध्ये जागरूकता निर्माण होईपर्यंतच्या काळात त्यांनी त्यांचे खिसे भरून घेतलेले असतात. आज एकटया अमेरिकेत १०००० हून अधिक मानवनिर्मित रासायनिक पदार्थ आहेत, ज्यांचा मानवजातीवर आणि निसर्गावर काय दुष्परिणाम होऊ शकतॊ याचा कसलाही अभ्यास नाही. अमेरिकेत बंदी असलेल्या गोष्टी ’विकासाच्या’ गोंडस नावाखाली भारतासारख्या विकसनशील देशांच्या गळ्यात मारल्या जातात. उत्पादन वाढवण्याच्या हव्यासापायी आपणही पुढच्या पिढयांचा विचार न करता, तात्कालिक फायद्यांच्या मागे धावून आपल्या पायांवर धोंडा पाडून घेत आहोत. होणा-या नुकसानीला मोठया उद्योगांइतके आणि शासनाइतकेच आपणही जबाबदार आहोत. कारण आपण शिकलेले असूनही प्रश्न विचारणे, एखाद्या बाबीमागील वैज्ञानिक तत्त्व समजून घेणे , जास्तीत लोकांच्या दीर्घकालीन फायद्याचा विचार करणे आणि मुख्य म्हणजे निसर्गाला आपले शत्रू न मानता जगणे... यातले आज आपण काहीच करत नाही. कोणी हे काम तळमळीने, निष्ठेने करत असेल तर त्या व्यक्तीला आपण वेडयात काढतो, किंवा टीका करत बसतो.
’सायलेंट स्प्रिंग’ यातून आपल्याला जागे करते. पुस्तक इंग्रजी भाषेत आहे आणि त्यात वैज्ञानिक परिभाषा आहे म्हणून ते वाचण्याचा आपल्याला थोडा कंटाळा येऊ शकतो. पण रेचल कार्सनने अतिशय सोप्या पद्धतीने एक अवघड विषय आपल्यापुढे मांडला आहे. तो तुमच्याआमच्या सर्वाच्या जीवनाशी संबंधित आहे, म्हणून आपण सर्वांनी हे पुस्तक वाचले पाहिजे, गटाने मिळून वाचले पाहिजे, आपल्याला झेपेल, जमेल असा कृती कार्यक्रम आपण आखला पाहिजे ही काळाची गरज आहे.
हा लेख लिहिताना ’सायलेंट स्प्रिंग’ या पुस्तकासोबत ’विकिपीडिया’ या संकेतस्थळावरील माहितीचाही आधार घेण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी www.rachelcarson.org या संकेतस्थळाला अवश्य भेट द्यावी.