ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६
Showing posts with label माझ्या कविता. Show all posts
Showing posts with label माझ्या कविता. Show all posts

Wednesday, August 13, 2014

२०७. अल्लड रेषा ..

अल्लड रेषा, धावत जाती
निरागसाची. त्यांची वळणे,
शब्द बिलोरी. जोडत गेले
बंध जगाचे, हलके गळणे;

लौकिकात मग, आच जराशी
उगी मनाचे, थोडे ढळणे,
नाते तुटता, भग्न पसारा
स्मशानसाक्षी, किंचित जळणे;

असेच होते, पुन्हा तसे का?
म्हणत उरले, हे हळहळणे,
आसू पुसले मी माझे अन
हसत भोगले, हेही कळणे.

Friday, June 20, 2014

२०३. भान

गोधूळ लेऊन
देह मनावर
अक्षरांची
तरली आण.
आकाशाने
उचलून घेता
तरारले मग
अवघे रान.
पंचम पंचम
मध्यावरती
सुरेल, हळवी
नाजूक तान.
जपले आहे
मुठीत इवल्या
अव्यक्ताचे
अफाट भान. 

Tuesday, February 14, 2012

११३. काही कविता: १९ पालवी

मन रंगात रंगले
रंग मनाला लागेना;

भोगताना सारे काही
मन काहीच भोगेना;

आस सावळ्याची नाही
मन आधार मागेना;

जाणायची वेळ झाली
तरी मन हे जागेना.

मन गवसता त्याची
खूण पुसटशी झाली;

खोळ चढवून पुन्हा
नवी पालवी ही आली.


पुणे २६ मार्च २००५, 

Thursday, January 5, 2012

१०७. काही कविता: १८

जाग आली 
तेंव्हा व्यक्त 
बहराची रास; 
              
               पेटलेले काही
               विझे, हळुवार
                झाले श्वास;


भाव आहे
म्हणूनच
क्षणोक्षणी भास; 
                
                जग बुडताना
                उरे अल्प 
                जगण्याची आस;  


खूण नाही 
काही मागे,
असा रोजचा प्रवास; 
           
             मैत्र तुझे माझे 
             त्याने नवे
             निर्मियले पाश. 


पुणे, २४ नोव्हेंबर, २००४ 

Sunday, October 9, 2011

९३. काही कविता : १७ सातपुडा

तुझ्या
बेफिकीर ऐटीचा
काही अंश
माझ्यात 
नक्कीच उतरला आहे;
सलगीच्या
तुझ्या विविध त-हा
कदाचित मला
त्याच्याच बळावर 
उपभोगता येत आहेत.

*********

प्रथमदर्शनीच
जीवलग सखा बनून जाण्याची,
अंतरंगाचा ठाव घेण्याची;
सा-यांना मोहात पाडून
स्वत: निर्मोही राहण्याची
तुझी किमया मला नको आहे.

जर अखेर नसायचेच 
कोठे आणि कशातही
तर व्याप उभारण्याचा
निरर्थक खेळ कशाला पुनश्च?

*********

तुझ्या भव्य
प्रचंड अस्तित्त्वाने
बरेच काही पाहिले असेल;
पण तू जणू 
त्यांच्या पल्याड -
सा-या अनुभवांना पेलून
दशांगुळे आत्ममग्न.

इतक्या उंचीवरून,
इतक्या विस्तारातून
तुला जे जग दिसते 
ते कसे आहे 
- मी न विचारताही
तू आस्थेने सांगतोस खरा!

******

तू कधीपासून आहेस?
काय घेऊन उभा आहेस?
कोणाचे काय देणे लागतोस?
काही सायास न करता
केवळ नुसते असण्यातून
असण्याला अर्थ लाभतो का? 
- हे प्रश्न तुला पडत नाहीत?
की 
या सा-याला भेदून जाणा-या
गाभ्याची खोल जाण
मला मुठीत पकडता येत नाही?

******

या सगळ्या खटाटोपात
कणाकणाने
जीर्ण होत चालला आहेस;
तुझे स्वत्व गमावत चालला आहेस 
त्याबद्दल तुला काय वाटते?

जाऊ दे,  असो! 
तू ’वासांसि जीर्णानि...’
वगैरे ऐकवणार
हे मला
आधीच कळायला हवे होते!

******

इतक्या अवाढव्य 
भौतिक पसा-यासह
तुला इकडे तिकडे 
भटकता येत नाही -
याचे नाही म्हटले तरी
मला वाईटच वाटते.

तुझे बोट धरून
रोजच्या गर्दीत हिंडायला
कदाचित आवडले असते मला.

सारे मागे ठेवून
केवळ तुझी ओढ लेवून
तुला भेटणारी मी
आणि एरवी
माझ्या जगात वावरणारी मी
यात फरक आहे
- हे एव्हाना 
तुझ्या लक्षात आलेच असेल.

हृदयांच्या नात्यांत
असले किरकोळ तपशील
मन मोडून टाकत नाहीत 
- हे शिकते आहे मी तुझ्याकडून.

******

तुझी ही सात रूपे;
सात अवस्था, सप्त स्वर;
अग्नीच्या झळाळत्या सात जिव्हा;
अज्ञाताचा प्रदेश धुंडाळणारी
सात विराट पावले; 
आकाशात अकस्मात उमलणारे
इंद्रधनुचे सात रंग;
कर्मयोगी सूर्याच्या रथाचे
सात अवखळ अश्व;
महारूद्राच्या नर्तनाने 
डगमगणारे सप्त पाताळ;
समाधीमध्ये अलगद रूजलेले
ते सात ऋषीवर
अजाणतेपणी वाहिलेले
वेदनेचे सात दगड;
ज्यांचा थांग नाही
असे सप्त समुद्र;
आणि मीलनास उत्सुक
सात खळाळते प्रवाह;

अव्यक्त असणारे 
तुझे अन माझे 
सात युगांचे नाते;
'सत्'च्या  तेजाने उजळलेली
तुझी ही सात शिखरे.....

******
तू सप्त; तू व्यक्त.
तू तप्त; तू मुक्त.
तू आकाश.
तू प्रकाश.
तू प्राण.
तू आण.
तू काळाची जाण.

****

पंथ पुष्कळ झाले, आता
भटकंती झाली रगड;
त्रैलोक्याच्या नाथा, फिरून
एकवार दार उघड!! 

सातपुडा, २५ नोव्हेंबर २००४

Friday, March 18, 2011

६६. काही कविता: १६

ऋतु बदलतो
आणि त्याच्याबरोबर
अविरतपणे
मीही बदलते.

रंगीबेरंगी, उत्कट,
धुम्म, गंभीर,
रखरखीत, प्रश्नांकित,
अवखळ, मोकळेढाकळे
वगैरे मीही होऊन जाते.

रस्ता वळतो
आणि त्याच्याबरोबर
मागचे मागे टाकून
मी चालत राहते.

जे सुटले
त्याची फिकीर नसते
तरी नव्या पावलांमध्ये
आसक्तीची खूण
पुन्हा
हमखास पाहते.

ऋतुंचे एक चक्र
पूर्ण होऊन
सारे काही पुनश्च
जणू स्थिर झाले आहे;
सारी जुनी वळणे
एकमेकांत गुंतून, त्याने
क्षितिज काहीसे
अकस्मात धूसर झाले आहे .

***************

हे असेच
निरंतर चालू शकते;
पण प्रश्न आहे -
काय चालू द्यावे?

आत्ता या क्षणी
नेमके त्यातले
साक्षेपी विवेकाने
ओंजळीत काय घ्यावे?

थेट सूत्र पकडून
रानोमाळ भटकताना
अखेर सोबत
भान कोणते न्यावे?

शेवटच्या श्वासाला
जग बदलताना
सहज गाभ्यातून
मनाला काय आठवावे?

पुणे २० मार्च २००५, २०.०० 

Monday, January 24, 2011

६०. काही कविता: १५

कविता लिहिण्याची प्रक्रिया नेमकी काय असते – हा प्रश्न मी स्वत:ला अनेकदा विचारला आहे. तो माझ्यासाठी एक ‘यक्षप्रश्न’च आहे म्हणा ना! लिहायचं का नाही हा पर्याय नसतो अस मी समजून चालते – पण हे केवळ मी साक्षर आहे म्हणून! अक्षरांची आणि माझी ओळख नसती तर मी स्वत:ला कस व्यक्त केल असत – असाही विचार मनात येतो.
कविता कशाची असते? सुखाची? दु:खाची? समाधानाची? उदासीनतेची? वैतागाची?
मुळात कविता अनुभवांची असते? का विचारांची असते? का भावनाची असते? की त्याही पलीकडची असते?
कविता गूढ असते? की ती आपल्याला कळत नाही म्हणून गूढ वाटते?
कवितेला या सगळ्याशी काही देणे घेणे नसते .. ती येते आणि जाते ... आपल्याच नादात ..

उजाडले
रुजलेही
प्राणांतिक
उठसूट;


घेता माघार
मध्यात
राहे झाकली
ती मूठ;

तीर
मौनाचा गाठता
शब्दांची ही
लयलूट;

भग्नतेचा
शाप कोरा
निरंतर
ताटातूट!

दिल्ली, २२ जानेवारी २०११  २.०० 

Thursday, October 28, 2010

५०. काही कविता: १४ नाळ

वेताळाची
हाक येथे
झटकून उगाच
सोंग आण:

आणलेस? ठीक.

निसटून गेले
मर्म जरी
प्रपाताच्या माथी
चार बुक्के हाण;

हाणलेस? भले.

संदर्भांच्या
नागमोडी दगडांआड
विसरून ये एकदा तरी
रसरसले पंचप्राण;

विसरलेस? आता पुढे.

उरलेसुरले लक्तरांचे
शब्द घेऊन
खोल गुहेत बुडवून टाक
लवलव जाण.

जमले इतके? ग्रेट.

आता काय?
काही नाही.
कशाचीच
घाई नाही.

रुतून येथे
जाऊ नको;
हाती कोणाच्या
येऊ नको;
मागे वळून
पाहू नको;
गुंतून कोठे
राहू नको.

डोळे उघडून
पेलून ने हे
अपरंपार मायाजाळ
तोडता तोडता
जुळवून  तीच नाळ.


वांसदा, गुजरात ९ सप्टेंबर २००४ २३.००

Friday, September 3, 2010

४२. काही कविता: १३: लगाम

लगाम आवरून धरत
दुस-या हाताने
एकमेकांत अस्ताव्यस्त गुंतलेली
सारी मुळे
नीट केली मी,
आणि वळून पाहत
जणू प्रथमच तुझ्याकडे
मी म्हटले:
हं! आता बोल.


पण तू
काहीच म्हटले नाहीस
आजतागायत.


आता हे देखील
नेटाने
आवरून धरणे
क्रमप्राप्त आहेच तर!

नाशिक ३० सप्टेंबर २००६ ०१.२०

Friday, August 6, 2010

३८. काही कविता: १२ पांडुरंग

बेल वाजली..
’आत्ता या वेळी कोण?’
चडफडत दार उघडले,
तर समोर पांडुरंग -
मला म्हणाला, “बोल".

कटेवर हात नव्हते,
पायाखाली वीट नव्हती,
चंदनाचा टिळा नव्हता,
भोवती भक्तीचा मळा नव्हता.

मी म्हटले, “या, बसा.
सुखदु:खाच्या गोष्टी बोलू हवे तर,
पण उगीच दांभिक
देवत्त्वाचा आव आणू नका.”

“हे तर लई बेस झालं"
म्हणत तो विसावला,
आरामखुर्चीत बसून
गॅलरीतून दिसणारा
आकाशाचा तुकडा
न्याहाळताना हरवून गेला.

त्याने मला
प्रश्न विचारले नाहीत,
मीही नाही.
त्याने मला
उपदेश केला नाही,
मीही नाही.
त्याने स्वत:भोवती
एक अदृष्य भिंत रचली,
मीही तेच केले.
माझ्या सहवासात
त्याने स्वत:चे एकाकीपण
मनमुराद जपले -
मीही तेच केले.

तरीही आम्ही
एकमेकांचे झालो
आणि त्या एकतानतेतही
दोन भिन्न वस्तू उरलो.

खूप दिवसांनी
काचेला तडा जाताना
मधेच एकदा भावूक म्हणाला,
“ज्ञाना, तुका, नामा
गेल्यापासून
जीव रमत नाही....”
त्याला पुढचे बोलू न देता
(ते जरासे चुकलेच माझे!)
मी चकित होऊन म्हटले,
“मायेच्या
या जंजाळात अडकून
देवा, तुम्ही वायाच गेलात!”

त्याने दयार्द्र
(की कसल्याशा त्याच)
नजरेने माझ्याकडे पाहिले
आणि गप्प झाला.
माझे लक्ष नसताना
कधीतरी अचानक
मला न सांगताच
हलके निघून गेला.

माझ्या घरात
अजून त्याची
वैजयंती माळ आहे;
सगळे व्यापून
एकाकीपणाशी
चिरंतन नाळ आहे;
मुठीत आलेले
हरपून गेले
रौद्र त्याचा जाळ आहे;
व्याकूळ स्वर
भिरभिरणारा
अनंत बाहू काळ आहे.

वाट पाहते मी रोज
पण मला खात्री आहे-
तो इकडे फिरकणार नाही,
विटेविना त्याचा
अधांतरी पाय आता
माझ्या दारात थिरकणार नाही.

आता अखेर
मलाच पाऊल उचलावे लागेल,
त्याच्या दारात
जाऊन म्हणावे लागेल,
“बोल".

पण तो अखेर
पांडुरंग आहे.
माझ्या घरात येणे, गुंतणे
आणि निघून जाणे
त्याला शक्य होते -
मला जमेल का गुंतणे?
आणि गुंतल्यावर
सहज निघून जाणे?


पुणे १५ मार्च २००५ २१.३०

Tuesday, April 13, 2010

२७. काही कविता: ११ कृष्ण तो आतला...

रोजचाच त्याने
धावा हा घेतला
गूढ डोहाच्या तळात
उभा अंगार पेटला.

युद्धे घमासानी
हळू प्राण हा बेतला
श्वासामागे श्वास
कसा, न कळे रेटला.


निसटून गेले, त्याचे
भय ना मातीला
उणे काही नाही
भेद जागत्या वातीला.

प्रपंच देहाचा
उन्मळे रातीला
पावसाची लय
अशी अखंड साथीला.

अदूर सुदूर
घन कधीचा मातला
झोपाळला आहे
परी कृष्ण तो आतला.


पुणे ८ सप्टेंबर २००५ १९.००

Saturday, March 13, 2010

२४. काही कविता: १० वेगळा

सुरूवात, शेवट
सारे तेच, तसेच
फक्त मध्य
तुमचा आमचा
सर्वांचा वेगळा;

पडदा वर आहे
तोवर धावपळ
देह रसरसता राखण्यासाठी
मनही हवे जिवंत
म्हणून पसारा सगळा!


कलंदर ईशत्वाला
सहज सोबत घेऊन
थिरकली पावले
शून्यत्व निमाले
भास उरला सगळा.

’एको॓Sहम" तू म्हटलेस
पण नाही म्हटले मी
’बहुस्यामः’ चुकून एकदा
म्हणून जन्म हा असा
सुखाचा, तरीही वेगळा!!

आहवा, (गुजरात)७ डिसेंबर २००६ १३.००

Saturday, February 6, 2010

२१. काही कविता: ९ अप्राप्य

अप्राप्य आहे
तो तीर
म्हणून कदाचित
त्याची अशी
अनावर ओढ....

बेगुमान
हरपून टाकणारे
एकलेच
चिरंतन भटकणारे
मनाचे घोर वेड.....

प्राप्य जे
त्याचे इथे तिथे
पोसून झाले आहे
विणून घेतले आहेत
सारे पीळ, पेड...

देहाच्या या
पुरातन चक्राखातर
निमूट बराच
वेढून घेतला आहे
जगरहाटीचा जोड....

प्रवास
जीर्णशीर्ण होत जाताना
उरला नाही
काही मोह
यत्किंचितही तेढ....

अप्राप्य तू
असेच रहावे
एवढेच मागणे
बाकी सारे
बिनधास्त माझ्यावर सोड...


पुणे १३ सप्टेंबर २००५ ०२.००

Thursday, January 14, 2010

१८. काही कविता: ८ सख्य

आपण ज्या समाजात वावरतो, ज्या संस्कृतीत वाढतो, त्याचा आपल्यावर कळत नकळत - बरेचदा नकळतच! - फार मोठा पगडा असतो. माझ्या कवितांमध्ये जेव्हा जेव्हा कृष्ण प्रकटतो, तेव्हा त्याच्या अचानक येण्याने मी आश्चर्यचकित होते.

मी कोणत्याही अर्थाने धार्मिक नाही. मी व्रत करत नाही, उपास करत नाही, नवस करत नाही, पूजा करत नाही. मला देऊळ आवडते, पण मी देवाला नमस्कार करत नाही. या जगात आपल्याला न कळणारे बरेच काही आहे हे मला जाणवते. दुःख दिसते तसेच सुखही दिसते. या शक्तीचा शोध मानवी मनाच्या पल्याड आहे आणि तो माझा प्रांत नाही असे मी स्वतःला फार पूर्वी सांगितले आहे.

कृष्ण मला माहिती नाही असे नाही. लहानपणापासून अनेक गोष्टी ऐकताना तो भेटला आणि त्याचा खोडकरपणा आणि त्याचे शूरपण भावले. मोठेपणी भगवद्गीता वाचायची संधी मिळाली. ती समजली नाही अजुनही, पण त्याची भव्यता आकर्षक वाटली. हा लोणी वगैरे चोरून खाणारा आपल्या लहानपणीचा कृष्ण तत्त्ववेत्ता आहे हे लक्षात आल. पुढे एकदा नेटाने मी संपूर्ण महाभारतही वाचल.. त्यातला मानवी मनाचा व्यापक आवाका पाहून मन थक्क झाल.

ते सगळ नेणीवेत रूजले असणार आणि संधी मिळताच मला त्याची जाणीव करून देत असणार...अन्यथा या कल्पनेचा दुसरा काय अर्थ लावणार?


सुदाम्याने पोहे केले,
मला बोलावले;
कृष्ण होता भुकेजला,
त्याला सारे दिले.

कृष्ण तृप्त झाला,
जरा डोळाही लागला;
स्वप्न त्याने पाहिले,
त्याचा अंश मला आला.

सख्य ओतप्रोत दिले,
जिणे बहकून गेले;
सावळ्याच्या सावलीला,
मीच घुंगरू बांधले.

पुणे, ८ नोव्हेंबर २००५ ११.५०

Tuesday, December 29, 2009

१५. काही कविता: ७ प्रवाही

तशी ही वर्षाअखेरची कविता वाटावी असेच तिचे शब्द आहेत. ती कदाचित जीवनाअखेरची कविता असेल असं म्हणायला मी धजत नाही, कारण मी नेहमी कविता लिहीन याची मला कधीच खात्री वाटत नाही. प्रत्येक कविता लिहून झाल्यावर 'अरे वा! आपण अजूनही कविता लिहू शकतो’ हे जसं समाधान असतं, तशीच 'ही कदाचित शेवटचीच कविता असणार नाही ना’ अशी एक भयावह शंका पण मनात असते.

कधी वरवर पाहता सगळं काही संपून गेलं आहे असं वाटत असतानाच 'अजून शब्द आहेत जागे आत’ याची अचानक सुखद जाणीव होते. उजाड भासणा-या जमिनीत पावसाच्या एका सरीने लाखो अंकुर तरारून यावेत त्याच धर्तीचा हा चमत्कार असतो. निसर्गाचं आणि मनाचं मला अद्याप न उलगडलेलं हे एक कोडंच! नाहीतर ऐन मे महिन्यात मला अशी जगण्याच्या निरंतर सुरेल प्रवाहाची जाणीव का बरं व्हावी?

जाउ द्या! मी आपली समीक्षकाच्या भूमिकेत शिरायला लागले तर नकळत!


पानगळीचा
रेटा सोसून
काही मागे
उभेच आहे;

पाचोळ्यातून
हलके हलके
जीवनरसही
वहात आहे;

जे झाले , ते गेले
आता, मागे
वळून पाहता
काही नाही;

तरी पाखरे
सुरेल गाती
जगणे होता
पुरे प्रवाही!


९ मे २००८ प्रवासात

Monday, November 23, 2009

१३. काही कविता: ६ ग्वाही

कविता लिहिणं -  ही ज्यावर आपलं कसलंही नियंत्रण नसतं अशी कृती आहे. किंबहुना ती एक स्वतंत्र अशी प्रक्रिया असते, ती एक पूर्ण घटना असते. कधीकधी त्याचं मर्म हाताशी येतं, तर कधी ते निसटून जातं. आणि मागे उरते ती फक्त एक गुदमरवणारी अस्वस्थता. 

लिहिणं आणि न लिहिणं यापैकी कोणताही पर्याय निवडला तरी - तो परिस्थितीनुसार निवडावाही लागतो अपवादात्मक वेळी - त्याचा परिणाम एकच असतो. तो म्हणजे काहीतरी मिळवल्याची आणि ते गमावल्याची क्षणिक का असेना पण तीव्र भावना.

सगळयाच कवींना अस वाटत असेल असा माझा अजिबात दावा नाही.
कदाचित याच्या पूर्ण विरोधी असाही मुद्दा मी कधीतरी लिहिन.
कवितेचा आणि तर्काचा logic चा संबंध क्वचितच असतो म्हणून कदाचित मनासारख्या गोष्टीवर आपण असंख्य ओळी लिहू शकतो आणि तरी ते ओळखीचं होतंच नाही बेटं!

श्वास अर्ध्यातच
थांबतो कधीकधी,
हे नको, तेही नको
म्हणतॊ, शोध पर्याय काही....


लटपटते मन, शरीर
यांची साक्ष अटळ
आणि दुनियादारीत
फक्त दुःखाचीच ग्वाही....

पुणे, ३० नोव्हेंबर २००८

Monday, November 2, 2009

१०. काही कविता: ५

एखादी व्यक्ती एखादं काम अनेक वर्षांपासून करत असेल आणि त्या व्यक्तीला त्या कामाबद्दल विचारल्यावर धड काही सांगता येत नसेल, तर तुम्ही तिला काय म्हणाल?

मी या प्रसंगात दुस-या बाजूला आहे, कारण अशी एक गोष्ट आहे की जी अनेक वर्षे करूनही मला तिच्याबद्दल काही नीटपणे सांगता येणार नाही. मी अर्थातच कविता लिहिण्याच्या प्रक्रियेबाबत बोलते आहे. 

कवितेचा अर्थ 'कवी’च्या जीवनात शोधण्याचा प्रयत्न केवळ समीक्षक करतात असं नाही, तर सर्वसामान्यपणे बहुतेक माणसं करतात. त्याला कंटाळून मी कविता इतरांना वाचायला देणं अनेक वर्षे बंद केलं होतं. मला ओळ्खणा-या असंख्य माणसांना मी कविता लिहिते हे माहितीही नाही. 

आता त्यादिवशीचे उदाहरण घ्या. माझ्यासाठी तो अगदी एक सर्वसामान्य दिवस होता. दिवसभरात काहीही विशेष घडलं नाही. कार्यालयातून आल्यावर घरातल्या घरातच मी अर्धा तास चालते. माझ्या त्या फे-या चालू होत्या. अचानक माझा श्वास थांबला. मी टेबलावरचा कागद पेन घेतला आणि काही ओळी लिहिल्या. पाच मिनिटांत मी पूर्ववत माझं चालणं सुरू केलंही होतं. 

हे शब्द आले कुठून? ते का आले? ते येणार हे मला आधी माहिती होतं का? मी नेमकं असंच का लिहिलं? येणारे शब्द कागदावर न उतरवण्याचं स्वातंत्र्य मला आहे का? मी शब्दांना 'या’ असं आवाहन करू शकते का? 

यातील एकाही प्रश्नाचं उत्तर मला माहिती नाही. आणि मी तीस वर्षांपूर्वी पहिली कविता लिहिली होती. आहे ना गूढ गंमत? 

आता मी प्रसिद्ध कवी नाही म्हणून ठीक! नाहीतर या कवितेचा कुणी काय काय अर्थ लावला असता हे पाहणं मनोरंजक ठरलं असतं. असो.

 तर ही कविता. 

दुःख सरण्याचे नाही, 
दुःख हरण्याचे नाही, 
कळ धुम्मस मनात,
दुःख विरण्याचे नाही. 

दुःख मातले थोडेसे, 
दुःख आतले थोडेसे, 
वसा विरक्तीचा घेता, 
दुःख बेतले थोडेसे. 

काही उणे, बाकी दुणे, 
जगण्याचे ताणेबाणे, 
थेंब पावसाचा नाही, 
आणि पीक सोळा आणे. 

भग्न काळोखली रात, 
जन्म पारखले सात, 
घाव झेलून पडता, 
मंद थरथरे हात. 

दाही दिशा सुप्त शब्द, 
मालक हा मुक्त शब्द, 
देह मनाला सांधतो, 
ताणलेला तृप्त शब्द! 

 पुणे २७  ऑक्टोबर २००९ २०.००

Friday, October 16, 2009

८. काही कविता: ४

थोडे अल्लड, थोडे हुकुमी

नव्हती कधीच कसली ग्वाही;

येता-जाता हसले किंचित

संपून गेले अलगद काही.


आता फुटकळ लागेबांधे

वाहून जरी हे जगणे नेणे;

परिणामांची सीमा लांघून

उरले अविरत - ते माझे गाणे!

१६ आक्टोबर २००९, पुणे, १५.१३

Tuesday, October 6, 2009

७. काही कविता: ३

ही तटबंदी
भक्कमशी
तू उभारली आहेस?
की आहेत
गूढ भास
माझ्याच मनाने रचलेले?

काल - परवाचा
शब्दांविनाही
अविरत संवाद
आणि आता अचानक
तुझ्यापर्यंत नेणारे
सारे पूल खचलेले...

खांद्यांवरचे भूत
जोजवत स्वप्नाळूपणाने
विराण, दिशाहीन
भटकताना अस्थिर
पाउल नकळत अलगद
तुझ्या तालावर नाचलेले....

आता पुन्हा एकदा
नव्याने इतिहास लिहिताना
दिसते बाष्कळ बरेच काहीबाही,
पण त्यातही अवचित एखादा
निर्लेप चिरा, पणती
भयाण विध्वंसक तांडवातून
थोडे आहे तर माझ्यापुरते वाचलेले!

पुणे, १४ मार्च २००९ २२.४५

Monday, April 13, 2009

४. काही कविता २

खेळ मांडलेला तेव्हा
त्याचे खुळखुळे झाले,

ललाटीच्या भग्न रेषा
पायतळी ठसे ओले,

इथे तिथे व्यर्थ व्यर्थ
सारे सारे क्षुद्र झाले,

नाही सुटले काहीही
त्याने भलतेच केले,

खोळ काही काळ पुन्हा
मी टाकते गहाण,

आता त्याच्या पुण्याईला
उरे त्याचेच आव्हान

२७ फेब्रुवारी २००९ पहाटे ००.३० पुणे