ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Monday, April 29, 2013

१६५. विवेकानंदांचा वेदान्त विचार: भाग १२. ब्रह्म

भाग ११ 

सगुण आणि निर्गुण

विवेकानंदांचा ब्रह्मविषयक विचार जर सांगायचा झाला तर तो 'सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण अशा शब्दांत सांगता येईल. निर्गुण ब्रह्म विवेकानंदांना भयावह अथवा राक्षसी वाटत नाही. पण मानवी मनाला सगुण ब्रह्माची, ईश्वराची गरज आहे हेही ते जाणतात. या दोन्ही स्वरुपांना एकाच वेळी स्वीकारण्यात विवेकानंदांना कसलीही विसंगती, विरोधाभास वाटत नाही. कारण त्यांच्या मते हे दोन्ही शब्द म्हणजे एकाच अंतिम सत्याकडे पाहण्याचे दोन विभिन्न दृष्टिकोन होत. ज्याची जी गरज, त्याने तो मार्ग चालावा - यात भांडण्याचा प्रश्न येतोच कुठे?

एखाद्या व्यक्तीला तिचा मुलगा बाबा म्हणून हाक मारेल, तर भाची मामा म्हणेल. बाबा, मामा हे त्या व्यक्तीशी हाक मारणाराचे नाते दर्शवितात. ती व्यक्ती मात्र एकच असते. कोणी ब्रह्म सगुण आहे असे सांगेल तर कोणी म्हणेल की ब्रह्म निर्गुणच आहे असे म्हणेल. यामुळे आपण गडबडून गोंधळून जाण्याचे काहीच कारण नाही. कारण सगुण आणि निर्गुण हे दोन्ही शब्द अंतिम सत्तेशी त्या व्यक्तीचे असणारे नाते दाखवितात. सगुण आणि निर्गुण ब्रह्म म्हणजे एकच असा अर्थातच या उदाहरणाचा अर्थ नाही. याचा सविस्तर उहापोह आपण यापुढच्या विवेचनात करणार आहोत.

ईश्वर

सगुण ब्रह्म म्हणजे विवेकानंदांचा ईश्वर. खरोखर देव आहे का? असा प्रश्न जर आपण विवेकानंदांना केला तर ते आपल्यावर रागावणार नाहीत. कारण कोणे एके काळी हाच प्रश्न घेऊन विवेकानंद भिरीभिरी हिंडले होते. आणि दक्षिणेश्वरचा तो पुजारी जेंव्हा  होय! मी तुला पाहतो त्याहून कैक पटींनी स्पष्टपणे ईश्वराला पाहतो”, असे म्हणाला; तेंव्हा अवाक् झाले होते.

आपली ईश्वरावर खरीखुरी श्रद्धा आहे का? - असा प्रश्न विवेकानंद आपल्याला आवेशाने विचारतात. रस्त्यावरील कोणत्याही माणसावर आपण विश्वास ठेवतो. जगातील कोणत्याही व्यक्तीवर आपण विश्वास ठेवतो. पण ईश्वरावर मात्र आपला विश्वास नसतो अशी खंत विवेकानंद व्यक्त करतात. आपण तोंडाने ईश्वरावर विश्वास असल्याचे बोलतो. पण प्रत्यक्षात मात्र आपण त्या विश्वासाला जागून जगत नाही. म्हणजे आपला विश्वास हा उगाचच, केवळ शब्दांपुरता असतो. म्हणूनच विवेकानंद आपल्याला विचारतात, 'ईश्वरावर विश्वास असून त्याच्या प्राप्तीसाठी वेडे न होणे तुला शक्य आहे का? मला वाटते की स्वामीजींच्या या प्रश्नातील गर्भितार्थ आपल्याला आत्मपरीक्षणास उद्युक्त करेल.

रामकृष्णांना ईश्वराविषयी अवास्तव चर्चा करणे, वाद घालत बसणे आवडत नसे. ते म्हणत,  ''साक्षात्कार करुन घ्या. विवेकानंदांचेही तेच म्हणणे होते. कशाकरता आपण नुसतेच व्यर्थ बोलत राहायचे? विवेकानंद म्हणतात, आमचे ईश्वरत्व हेच खुद्द ईश्वराच्या अस्तित्वाचे प्रमाण होय. किती प्रगाढ वेदान्तनिष्ठा आहे ही! (हे वाक्य थोडे गोलांकारी आहे – म्हणजे आम्ही ईश्वर आहोत हे आधी मानायचे आणि मग त्यावरून ईश्वर आहे हे मानायचे! पण इथे तर्क बाजूला ठेवून भावनेतून बघितले तर या वाक्याचा अर्थ सोपा वाटतो – असे माझे मत!)

विवेकानंदांना सगुण ब्रह्म (ईश्वर) आणि निर्गुण  ब्रह्म यांचा एकाच वेळी स्वीकार करण्यात काहीच वावगे वाटत नाही. ब्रह्माच्या या दोन्ही संकल्पना एकमेकींना पूरक आहेत असे त्यांना वाटते. आता आपण ईश्वराच्या असितत्वाचे समर्थन त्यांनी कोणकोणत्या प्रकारे केले आहे ते पाहू.

प्रत्येकाला त्याने अथवा तिने इच्छा व्यक्त करताक्षणीच ईश्वरसाक्षात्कार होणे शक्य नाही ही व्यावहारिक अडचण विवेकानंद जाणतात. ईश्वराच्या अस्तित्वाचा पुरावा देताना एखाद्याची डळमळीत झालेली श्रद्धा पुन्हा स्थिर व्हावी आणि माणसांनी ईश्वरसाक्षात्काराचा मार्ग चोखाळावा असाही त्यांचा एक सुप्त हेतू असावा. कदाचित त्यामुळेच 'ईश्वर अनिर्वचनीय आहे, त्याचे वर्णन करता येत नाही असे म्हणून भागणार नाही असे त्यांना वाटत असावे.

आपल्या अवतीभोवती जर आपण पाहिले तर भोवतालच्या जगात एक प्रकारचा नियमितपणा आढळून येतो. सृष्टीचे चक्र एका विशिष्ट त-हेने चाललेले आपण पाहतो. हे विश्व इतके विशाल आहे की साध्या मानवी शक्तीला त्याचे नियमन करता येणे अशक्य आहे. कोणी उच्च प्रकारचा देवच या जगावर नियंत्रण ठेवून असेल. तोच ईश्वर.

कार्यकारणभावाचा सिद्धान्त व्यवहारातही आपण मानतो. एखादी घटना घडली की 'ती याच प्रकारे का घडली असावी? असा विचार आपल्या मनात येतोच. जगत् हेही एक प्रकारचे कार्यच आहे. त्याचे कारण म्हणजेच ईश्वर.

वरवर दिसणा-या  विविधतेच्या अंतरंगात जर आपण डोकावून पाहिले तर आपल्याला एकतेचा प्रत्यय येतो. जगात किती विविध रंगांची, वर्णांची, वंशांची, रक्तांची, भाषा बोलणारी माणसे आहेत! पण या सर्वांमध्ये मनुष्यत्व नामक एक समान गोष्ट आहे. इतर वस्तू आणि माणसे यांच्यातही अस्तित्वाचे एक समान तत्त्व आहेच असे म्हणता येईल. जगात जे जे काही आहे ते एकाच शक्तीच्या वेगवेगळया स्पंदनांमुळे वेगवेगळे प्रतीत होते. ती एक सर्वव्यापी शक्ती म्हणजेच ईश्वर!

प्रेमातूनही विवेकानंद ईश्वरापर्यंत पोहोचतात. एक व्यक्ती दुस-या व्यक्तीवर का बरे प्रेम करते? कारण दुस-या व्यक्तीमध्ये प्रत्येक जण स्वत:लाच शोधत असतो. बहुतेक लोकांना आपल्यातील या सुप्त भावनेची जाणीव नसते हे खरेच! पण आपल्या सर्वांमध्ये समान असणारे ते सुप्त प्रेममय तत्त्व म्हणजेच ईश्वर.

ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी विवेकानंद शब्दप्रामाण्याचाही आधार घेतात. हा आधार उपनिषदांचा आहे तसाच गीतेचाही आहे. अर्थात येथे एक समस्या अशी येते की सर्व हे सर्व प्राचीन ग्रंथ ईश्वरनिर्मित असल्याने आपण त्यांचे प्रामाण्य मानले पाहिजे असे आधी सांगितले जाते. आणि मग हे ग्रंथच ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करायचा प्रयत्न करतात. म्हणजे 'अ चा आधार 'ब आणि 'ब चा आधार अशी स्थिती  निर्माण होते. पण या तार्किक विसंगतीकडे विवेकानंद साफ दुर्लक्ष करतात.

ईश्वर हा या जगाचा चित्रकार आहे अन हे जग म्हणजे त्याने काढलेले एक चित्र आहे अशी कल्पना विवेकानंद मांडतात. चित्रकार असल्याविना चित्र कोठून निर्माण होणार?  कवीशिवाय कविता जशी अशक्य तसेच हे जग ईश्वराविना अशक्यच आहे. या जगाच्या निर्मितीचे सारे श्रेय ईश्वराकडेच जाते.

ईश्वरसंकल्पनेची आवश्यकता हाही मुददा त्याचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी विवेकानंदांना पुरेसा वाटतो. मानवी जाणीवेच्या क्षेत्रात ज्याअर्थी ईश्वर नावाची संकल्पना आहे, त्या अर्थी ईश्वर आहेच असेही एक विधान विवेकानंद करतात.

आणि अनेक संतमहात्म्यांना झालेला ईश्वरसाक्षात्कार! तो तर ईश्वराच्या अस्तित्वाचा सर्वात मोठा पुरावा!! श्री. अमितकुमार मुजुमदार या संदर्भात असे लिहितात, Direct experience of God is the only positive proof of God’s existence, not only because other proofs leave a gap between the prover and the proved, but because religion is not a dogma with Hindus, but realization of potential divinity of man, since every man is potentially divine, or to put it in a different way, man and God – the Individual soul and the Universal soul are basically identical, no proof of God short of realization of this identity is of any value.

सगुण आणि निर्गुण या दोन्हीही संकल्पना माणसांच्या आध्यात्मिक विकासाला आवश्यक आहेत. किंबहुना मानवाचा आध्यात्मिकदृष्टया विकास व्हावा म्हणूनच सगुण ईश्वराची संकल्पना आली आहे. एका अर्थी पाहायला गेले तर सारे देव 'मानवनिर्मित आहेत. माणसांचा देव माणसासारखाच लढाया करतो, त्याला राग येतो आणि खुषीत असला की, तो समोरच्याला हवे ते तो उदारपणे देतो.

निर्गुण ब्रह्माची संकल्पनाच अतिशय सर्वोच्च आहे, श्रेष्ठ प्रतीची आहे, हे विवेकानंद स्पष्टपणे सांगतात. फक्त ईश्वराचीच म्हणजे सगुण ब्रह्माचीच कल्पना आपण मान्य केली तर त्यातून अनेक प्रकारच्या तत्त्वज्ञानात्मक आणि व्यावहारिक समस्या उदभवतात. सगुण ईश्वर हा अनंत कल्याणमय असतो, दयाळू असतो, सद्गुणांचे भांडार असतो. पण मग या त्याच्या जगात सारे काही चांगले कोठे आहे? सैतानी आणि पाशवी प्रवृत्ती आपल्या सभोवताली आहेतच. खून आहेत, दरोडे आहेत, अपघात आहेत, दंगली आहेत, घातपात आहेत, बलत्कार आहेत, युद्ध आहे .....................थोडक्यात काय तर हे जग म्हणजे चांगले आणि वाईट यांची एक सरमिसळ आहे!

आपण जर फक्त सगुण ईश्वराचेच अस्तित्व मानले तर त्याच्यातून वर उल्लेख केलेल्या सा-या  गोष्टी आपल्याला बाजूला कराव्या लागतील. कारण ईश्वर दयाळू आहे - तो क्रूर गोष्टी कशा करेल? मग आपल्याला चांगले आणि वाईट, शुभ आणि अशुभ अशा दोन्ही गोष्टींचे अस्तित्व एकाच वेळी मान्य करावे लागते. ईश्वर आणि सैतान यांची सत्ता एकाच वेळी मान्य करणे याचा अर्थ असा होतो की ईश्वराचे अस्तित्व , त्याची सत्ता मर्यादित आहे. मग त्याचे अनंतत्व, सर्वव्यापित्व नाहीसे होते. या समस्येची उकल करण्यासाठी सगुण ईश्वराच्या पलिकडे जाणे आवश्यक ठरते.

एकदा का आपण निर्गुण ब्रह्माची संकल्पना स्वीकारली की मग हा प्रश्न उरतच नाही. सर्वशक्तिमान  ईश्वर सैतानाला हाकलून का देवू शकत नाही किंवा त्याने सैतानाला कोठे हाकलून द्यावे अशा प्रकारचा वाद निर्गुण ब्रह्माच्या स्तरावर निर्माणच होऊ शकत नाही. कारण चांगले-वाईट हे सापेक्ष जगाच्या पातळीवरचे, व्यावहारिक पातळीवरचे असते. पारमार्थिक पातळीवरुन व्यावहारिक पातळीवरचे सत्य (आणि म्हणून सर्व काही) बाधित होते हे आपण शंकराचार्यांनी प्रतिपादन केलेल्या सत्तात्रयाचा अभ्यास करताना सविस्तर पाहिले आहेच. निर्गुण  ब्रह्म स्वत: चांगले किंवा वाईट नसते तर ते त्या दोहोंच्याही पलिकडचे असते. ते त्रिगुणातीत असते.

हे सगळे ठीक आहे! पण सामान्य माणसाची भावनिक आणि आध्यात्मिक भूक भागवायला निर्गुण  ब्रह्म अगदीच निरुपयोगी आणि निकामी असते. माणसाने मग कशावर श्रद्धा ठेवायची असाच मूलभूत प्रश्न अशा परिस्थितीत समोर येतो. ब्रह्म केवळ निर्गुणच असेल तर माणसाने कोणाची प्रार्थना करायची? कोणाची भक्ती करायची? त्याने कोणाचे गुणवर्णन गायचे? कोणावर विश्वास ठेवायचा? कोणाला पाहायचे? ब्रह्म केवळ निर्गुणच असेल तर माणसाचे सारे भावविश्वच नाहीसे होऊन जाईल.

विवेकानंद म्हणतात, आपल्याला भगवंताचे दर्शन फक्त या मानवी रुपामधूनच होणे शक्य आहे. ते पुढे असेही म्हणतात की, आपण जोवर मनुष्य आहोत तोवर ईश्वरालाही मनुष्य समजण्यापेक्षा त्याच्यापेक्षा अन्य कोणतीही उच्च धारणा करणे आपल्याला शक्य नाही. ..................मानवी मन आणि बुद्धीला गोचर होऊ शकणारी निर्गुणाची सर्वोच्च धारणा सगुण ईश्वर हीच होय.

विवेकानंदांच्या मते एक सृष्टीकर्ता ईश्वर मानल्याने सृष्टीतील विषमतेचा काहीच उलगडा होत नाही. त्यात फक्त एखाद्या सर्वशक्तिमान स्वेच्छाचारी पुरुषाचा निष्ठुरपणा दिसून येतो. यावर उपाय काय? तर सगुण आणि निर्गुण दोन्हीही ब्रह्म मान्य करायचे! निगर्ुणाने सगुणाला बाधा येत नाही उलट निर्गुणामुळे सगुण समजायला सोपे जाते. स्वामीजी म्हणतात, निर्गुणाच्या धारणेमुळे सगुण धारणेचा नाश होईल असे मात्र नाही. निर्गुणाद्वाराच सगुणाचे यथार्थ आकलन होऊ शकते.

याचा अर्थ ईश्वर दोन आहेत असा नाही. अंतिम सत्ता एकच आहे. एक उदाहरण द्यायचे झाले तर असे म्हणता येईल की, निर्गुण आणि सगुण ब्रह्म म्हणजे पाणी आणि बर्फ यांच्यासारखे आहे. बर्फ म्हणजे दुसरे तिसरे काही नसून गोठलेले पाणीच असते आणि बर्फ वितळले की त्याचे पाणी होते. म्हणजे एकाच तत्त्वाच्या या दोन बाहयत: भिन्न अशा अभिव्यक्ती आहेत इतकेच!

ईश्वर सर्वव्यापी आहे. ईशावास्य उपनिषदात सांगितले आहेच की, 'ईशावास्यमिदम सर्वम - या सर्वामध्ये ईश्वराचा वास आहे. अर्थात या जाणीवेतून जगणे हे आपल्याला पहिल्या क्षणी जमणार नाही. पण क्रमाक्रमाने अथवा टप्प्याटप्प्याने आपण या सत्याचे आकलन करु शकतो. आपले कुटुंबीय, आपले शेजारी, आपले शहरवासी, आपले राज्य, आपला देश, आपले जग आणि आपले विश्व यांच्यात सर्वत्र आपण ईश्वर पाहू शकतो. पुढची पन्नास वर्षे हा देश म्हणजेच तुमचा ईश्वर. बाकी सा-या  देवतांकडे काही लक्ष देवू नका असे आवाहन स्वामीजी आपल्याला करतात तेंव्हा त्यामागे केवळ राष्ट्रवादाची भूमिका नसते तर ईश्वराच्या सर्वव्यापकत्वाची एक प्रखर जाणीवही असते.

विवेकानंदांचा ईश्वर मानवी स्वरुप् धारण करतो याबाबत आपल्याला काही आश्चर्य वाटायला नको. कारण वस्तुत: (प्रत्यक्षात नव्हे!) प्रत्येक माणूस ईश्वर नाही काय? सगुण ईश्वरामुळे मानवी मनाचे उत्थान होते आणि तोच त्याचा सर्वात मोठा फायदा आहे.

अर्थात सगुण ईश्वराच्या संकल्पनेचा भरपूर तोटाही या जगाने सोसला आहे म्हणा! मानवी मनाच्या पंथाभिमानाला धुमाकूळ घालायला सगुण ईश्वराचे एक चांगलेच निमित्त मिळाले आहे. माझाच देव किती चांगला, माझाच देव किती श्रेष्ठ यावरुन जो तो भांडत आहे. जगात सर्वात जास्त हिंसा आणि क्रौर्य हे ईश्वराचे नाव घेत, ईश्वरासाठीच झाले आहेत याची विवेकानंद आपल्याला आठवण करुन देतात. त्याउलट निर्गुण  ईश्वराच्या उपासकांत प्रचंड कर्मवीर, प्रचंड नीतिवीर उपजले आहेत. म्हणून निर्गुण  ब्रह्म हेच आपले ध्येय आहे.  सगुण ईश्वराचा आधार घेऊन अंतत: आपल्याला निर्गुण  ईश्वराप्रतच पोहोचायचे आहे याचा विसर पडता कामा नये. 

क्रमश: 

Monday, April 22, 2013

१६४. विवेकानंदांचा वेदान्त विचार भाग ११. समन्वय

भाग १० 

विवेकानंदांचा वेदान्त विचार समजावून घेताना प्रचलित व परंपरागत वेदान्तांपैकी कोणते मत त्यांना मान्य होते असा प्रश्न साहजिकच मनात येतो. एक गोष्ट आधीच स्पष्ट करायला हवी आणि ती म्हणजे विवेकानंदांना सर्वच आचार्यांबददल आदर असला तरी ते कोणत्याही एका विशिष्ट संप्रदायाचे अनुयायी नव्हते.

वेदान्तामधील संप्रदायाविषयी बोलताना विवेकानंद म्हणतात, द्वैती, विशिष्टाद्वैती व अद्वैती यापैकी कोणताही भारतीय संप्रदाय असो, आपण सनातन मतावलंबी आहोत हे सिद्ध करण्यासाठी त्या संप्रदायांनी उपनिषदे, व्याससूत्रे व गीता यांचे प्रामाण्य मान्य केले आहे. या सर्व संप्रदायांचा आधार ही प्रस्थानत्रयी आहे. शंकराचार्य, रामानुजाचार्य, मध्वाचार्य, वल्लभाचार्य, चैतन्य महाप्रभू यांनी म्हणा, आणखी कोणीही म्हणा, जेंव्हा एखादा नवीन संप्रदाय स्थापन केला तेंव्हा त्यांनी ही प्रस्थानत्रयी घेऊन तिच्यावर एक नवे भाष्य लिहिले असे आपल्याला दिसून येते. उपनिषदांतून निर्माण झालेल्या संप्रदायांपैकी कोणा एकालाच वेदान्त हे नाव देणे बरोबर नाही. वेदान्त या शब्दात सर्व संप्रदायांचा समावेश होतो. म्हणूनच विवेकानंद स्वत:ला अमुक वेदान्ती न म्हणवून घेता फक्त वेदान्ती म्हणवून घेतात.

भगिनी निवेदिता विवेकानंद ग्रंथावलीच्या प्रस्तावनेत म्हणतात, जीत सर्व काही एकमेवाद्वितीय होऊन जाते अशा त्या अनुभूतीचा प्रचार करणा-या अद्वैत तत्त्वज्ञानाचे सार्वभौमत्व घोषितानाच स्वामी विवेकानंदांनी हिंदू धर्माला याही तत्त्वांची जोड दिली की, द्वैत, विशिष्टाद्वैत आणि अद्वैत हे एकाच लक्ष्याच्या दिशेने होत असलेल्या प्रगतीचे तीन टप्पे असून त्यातील शेवटी निर्देशिलेला टप्पा हाच तिचे अंतिम लक्ष्य होय.

द्वैताची आणि विशिष्टाद्वैताची उपयुक्तता विवेकानंदांना पूर्णत: मान्य असली तरी शंकराचार्यांचा अद्वैतवाद तार्किक दृष्टया सर्वात उच्च असल्याचीही त्यांची ठाम धारणा होती. एके ठिकाणी ते म्हणतात, अशा रीतीने अनेकेश्वरवाद, द्वैतवाद प्रभृतीतून मार्ग काढून अद्वैत वेदान्त उपस्थित झाल्यावर मग धर्मविज्ञान आणखी पुढे जाऊ शकत नाही.

या तीनही वेदान्तांचा आशय विवेकानंद आणखी एका प्रसंगी वेगळयाच पद्धतीने सांगतात. ते म्हणतात, अद्वैत हे व्यवहारात आणले असता ते विशिष्टाद्वैताच्या भूमिकेवरुन कार्य करते. द्वैतवादाचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे - लहान वर्तुळ मोठया वर्तुळाहून वेगळे आहे व त्याच्याशी फक्त भक्तीने जोडले गेले आहे. विशिष्टाद्वैताचा अर्थ आहे - लहान वर्तुळ मोठया ववर्तुळाच्या आत आहे व त्याची गती मोठया वर्तुळाने नियमित होत आहे. अद्वैतवादाचा अर्थ आहे - लहान वर्तुळ विस्तार पावून मोठया वर्तुळाशी एकरुप होऊन जाते.  स्वामीजींच्या या उदाहरणावरुन जीव - ब्रह्मविषयक तीनही संप्रदायांची कल्पना किती सोप्या रीतीने स्पष्ट होते!

वल्लभाचार्य व निंबार्काचार्य संप्रदायांचा विचार विवेकानंदांनी फारसा स्वतंत्रपणे केला असल्याचे दिसून येत नाही. पण उर्वरित तीनांबाबत बोलताना विवेकानंद म्हणतात, माझ्या अल्पमतीनुसार मी हया निष्कर्षाप्रत आलो आहे; की ही तीनही दर्शने परस्परविरोधी नाहीत. आपल्या षडदर्शनांच्या बाबतीत आपल्याला हे आढळते की त्यात महान सत्यांचा क्रमश: विकास झालेला आहे. त्यांचा प्रारंभ मंद स्वरांत होतो व त्यांची समाप्ती अद्वैतवेदान्ताच्या विजयभेरीने होत असते. तसेच या तीन दर्शनांत मानवी मन क्रमश: अधिकाधिक उच्च आदर्शाप्रत प्रगत होत जाते आणि शेवटी सर्व काही अद्वैतवादाच्या  त्या अदभूत एकत्वात विराम पावते. म्हणूनच ही तीनही दर्शने परस्परविरोधी नाहीत.

वेदान्त संप्रदायाविषयीची विवेकानंदांची ही समन्वयाची भूमिका लक्षात घेऊनच आपण यापुढची वाटचाल करणार आहोत.

क्रमश:

Monday, April 15, 2013

१६३. विवेकानंदांचा वेदान्त विचार: भाग १०. व्यावहारिक वेदान्त

भाग ९ 

विवेकानंद हे मुळात एक लोकशिक्षक असल्याने तात्त्विक चर्चेत, केवळ पारलौकिकाविषयीच्या शब्दच्छलात त्यांना अजिबात रस नव्हता हे आपण यापूर्वीच्या प्रकरणात पाहिले आहेच. पण नीट पहिले तर असे दिसते की वास्तवात मात्र त्यांनी वेदान्ताचाच प्रसार केला आहे. 'प्रत्येक जीव अव्यक्त ब्रह्म आहे हेच स्वामीजींच्या गीताचे ध्रुवपद आहे.

वेदान्त तत्त्वज्ञान म्हणून उच्च असेलही; पण वेदान्ताच्या शिकवणुकीमुळे (त्याबाबतच्या आपल्या समजामुळे) आपल्यापुढे अनेक व्यावहारिक प्रश्न निर्माण होतात. सगळेच जर ब्रह्म असतील तर मग चांगले-वाईट, खरे-खोटे सारे काही ब्रह्माच्याच इच्छेने होत आहे!  त्यात मानवाने करण्यासारखे काय आहे – काही आहे का नाही - असा प्रश्न स्वाभाविकपणेच मनात येतो. माणूस आणि पाषाण यांत काहीच फरक न करणारी ही तथाकथित वेदान्ताची विचारसरणी कोणाला जर अत्यंत भयावह वाटली तर त्यात काहीच नवल नाही. म्हणून मग अशा प्रकारच्या तत्त्वज्ञानावर आपली सर्वसाधारण प्रतिक्रिया असते की - 'तत्त्व म्हणून हे सारे ठीक आहे. पोटभर खाणे झाल्यानंतर आणि उद्याची चिंता नसल्यावर घरात आरामशीर बसून बोलायला हे असले विषय ठीक आहेत. प्रत्यक्ष रोजच्या जगात मात्र त्याप्रमाणे वागून चालत नाही, व्यवहार पाहावाच लागतो. तात्पर्य? वेदान्त तत्त्वज्ञान म्हणून कितीही उच्च प्रकारचे असले तरी ते व्यावहारिक मात्र नाही असे सर्वसाधारण मत आढळून येते.

विवेकानंदांना अर्थातच आपले हे मत अमान्य आहे. ते म्हणतात, वेदान्त दर्शन पूर्णपणे व्यवहार्य आहे. त्याच्या आस-याने जीवन जगणे व घडविणे शक्य आहे, अगदी शक्य आहे. सर्वात आधी आपण ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ती ही की वेदान्ताची तत्त्वे काही अरण्यात जन्माला आलेली नाहीत. सर्वसंगपरित्यागी संन्याशांना नव्हे तर राज्याच्या व्यवस्थेत, प्रजेच्या रक्षणात गुंतलेल्या क्षत्रियांना ब्रह्मज्ञान प्रथम झाले. त्यांनी नंतर ते पुरोहितांना शिकविले. यातील कितीतरी सिद्धान्त अरण्यवासात, एकान्तात जन्मलेले नसून, ज्यांची जीवने सर्वात जास्त गडबडीची आणि धकाधकीची असणे स्वाभाविक होय अशा सिंहासनाधिष्ठीत सम्राटांनी जगाला त्याचे दान दिलेले आहे.

श्रीमद्भगवद्गीता तर कुरुक्षेत्रावर युद्धाच्या धुमश्चक्रीच्या वातावरणात सांगितली गेली आहे. (युद्धप्रसंगी हे तत्त्वज्ञान सांगायला-ऐकायला वेळ असतो का अशी शंका काहीजण घेतात, त्यावर बोलता येईल पण इथे नको!) आपण काय जनक, अर्जुन आणि श्रीकृष्ण यांच्यापेक्षा कार्यव्यस्त आहोत काय? धकाधकीच्या जीवनात जर हे लोक वेदान्त तत्त्वज्ञानाचे आचरण करु शकले तर आपल्यासमोरच अशी काय मोठी अडचण आहे? आपल्यावर ना त्यांच्याइतका कामाचा ताण आहे, ना आपल्याला लाखो लोकांचे जीवन ज्यावर अवलंबून आहेत असे निर्णय घ्यायचे आहेत. मग का नाही आपण वेदान्त जगू शकत?

हं! आता एक मात्र खरे की वेदान्ताचा आदर्श आपल्या आदर्शाच्या कल्पनेपेक्षा फारच उच्च दर्जाचा आहे. एखाद्या माणसाने दिलेली वेळ पाळली, पत्राचे उत्तर लगेच दिले, शासकीय कार्यालयातील माणसाने वेळेत काम केले, रिक्षात विसरलेले पैशांचे पाकीट प्रामाणिकपणे परत केले अशा घटनांचे आणि लोकांचे कौतुक वाटावे अशी सध्याची स्थिती  आहे. आपण जर आपले आदर्श तपासायला गेलो, तर आपल्या असे लक्षात येईल की, जे आपल्या सोयीचे असते तेच आपल्याला व्यवहार्य वाटते. जे काही आपल्या गैरसोयीचे असेल, त्यावर लगेच आपण अव्यवहार्यतेचा शिक्का मारुन मोकळे होतो! चोराला चोरीइतके व्यवहार्य दुसरे काहीच वाटत नाही हे आपण लक्षातच घेत नाही. व्यवहार्यतेचा हा मुददा अतिशय सापेक्ष आहे हे आपण विसरता कामा नये.

मानवी मनाच्या या दुबळेपणाची, स्वार्थी प्रवृत्तीची जाणीव विवेकानंदांना नाही - असे कसे होईल? ते स्पष्टपणे सांगतात की, एक गोष्ट मी तुमच्या मनावर बिंबवू इच्छितो की, वेदान्त हा पूरेपूर व्यवहार्य असला तरी तो या असल्या सर्वसाधारण अर्थाने नव्हे. वेदान्त आमच्यापुढे एखादाही अव्यवहार्य आदर्श ठेवत नाही. आणि त्याचबरोबर शंभर टक्के व्यवहार्य असूनही वेदान्ताचा आदर्श हा 'आदर्श होण्याइतका उच्चही खासच आहे.

माणसाची एक स्वाभाविक प्रवृत्ती अशी असते की, अवघड गोष्टी सोप्या करुन घ्यायच्या. या प्रक्रियेत सोय होते खरी पण मूळ तत्व अथवा नियम शिथिल होतो. ‘सोपे द्या अन्यथा आम्ही करणार नाही’ (शुद्धलेखनाचे नियम माफ असले की कसे बरे वाटते!) ही एक सार्वजनिक प्रवृत्ती आहे. कुणाला ‘क्ष’ ही गोष्ट अवघड वाटेल तर दुस-या कुणाला ‘य’ ही गोष्ट – तो भाग वेगळा.

आपल्या स्वभावातील या उणीवेवर विवेकानंदांनी नेमके बोट ठेवले आहे. आदर्शाला खाली खेचू नका, तर तुम्ही स्वत: त्या आदर्शाइतके उन्नत व्हा असे त्यांचे आपल्याला कळकळीचे सांगणे आहे. वेदान्ताचा आदर्श व्यवहारात चालणार नाही असे तुम्ही का म्हणता? तुमचा व्यवहार तुम्ही वेदान्तातील आदर्शाप्रमाणे ठेवा. भोवतालचे जग कसेही असो, तुम्ही तुमच्या आदर्शानुसार जगा. भर्तृहरी त्याच्या नीतिशतकात म्हणतो,
निन्दन्तु नीतिनिपुणा: यदि वा स्तवन्तु।
लक्ष्मी: समविशतु गच्छतु वा यथेच्छम।
अद्यैव वा मरणमस्तु युगान्तरे वा ।
न्यायात पथ: प्रविचलन्ति पदं न धीरा:।।
(कोणी निंदा करो अथवाच स्तुती, लक्ष्मी येवो अथवा जावो, मरण समोर असेल वा युगांतराने, साहसी लोक न्यायाचा मार्ग सोडत नाहीत – म्हणजे ते आपले आदर्श कधी खाली आणत नाहीत)

याप्रमाणे वागणे तुम्हाला जमले की, तुमचा-आमचा व्यवहार आदर्श होऊन जाणार!

आपला आदर्श आपल्याला व्यवहार्य का वाटत नाही? कारण तशी आपल्या मनात इच्छा नाही म्हणून! एखाद्या खेळाडूकडे/गायिकेकडे पहा. त्या विशिष्ट खेळात/गायनात प्राविण्य मिळविण्याची त्याची किंवा तिची इच्छा असली की त्या व्यक्तीकडून केवढी मेहनत घेतली जाते! अशी व्यक्ती किती प्रकारच्या मोहांवर मात करते! पहाटे पाच वाजता उठून मैदानावर पळणे, विशिष्ट अन्नपदार्थांचे सेवन टाळणे अशा गोष्टी तुम्हा-आम्हाला अव्यवहार्यच वाटतात. पण विशिष्ट ध्येय समोर असणारी व्यक्ती मात्र इतरांना कितीही कठीण वाटले तरी त्यांचे आदर्श आचरणात आणतातच.

विवेकानंद म्हणतात, आपण समजतो त्यापेक्षा कितीतरी अधिक सवड आपल्याला आहे असे आपल्यापैकी बहुतेकांना आढळून येईल. प्रश्न वेळेचा नसतो, प्रश्न असतो वेळेचा सदुपयोग करण्याच्या इच्छेचा! खरोखरच इच्छा असेल तर, आपल्याला जी  सवड आहे तीत एकच काय पण असले पंचवीस आदर्श आपण याच जीवनामध्ये प्रत्यक्ष आणू शकू. इच्छा मात्र हवी. पण काही झाले तरी आपल्या आदर्शाला खाली खेचणे मात्र उचित् नाही.

वेदान्ताने सांगितलेल्या सत्याचा अनुभव प्रत्येकाला येणे शक्य आहे, असे विवेकानंद आवर्जून सांगतात. वेदान्त तत्त्वज्ञान काही निवडक लोकांसाठी मुळीच नाही; ते सर्वांसाठी आहे, ते सर्वसमावेशक आहे. वेदान्त तत्त्वज्ञान कोणालाही कमी लेखत नाही; कोणाचाही तिरस्कार करीत नाही;  कोणालाही नाकारत नाही. माणूस पापी आहे आणि तो हळूहळू पवित्र होत जातो अशी कल्पना वेदान्ताला मान्य नाही. जो मूळचा पापी आहे, तो पवित्र होईलच कसा? आपण पवित्र होऊ शकतो याचा अर्थ असा की, आपण सारे मूलत: पवित्रच आहोत. अज्ञानाने आपण स्वत:ला दुबळे अथवा पापी म्हणवून घेत आहोत. पण वस्तुत: आपण सारे ‘सच्चिदानंद’ स्वरुप आहोत.

अर्थात वेदान्ताचे ध्येय व्यवहार्य जरी असले तरी सोपे मात्र नाही. कोठल्याही ध्येयाप्रत जायचे म्हणजे, काही ना काही त्याग करावाच लागतो. पण आपली गंमत अशी आहे, की हातातले काहीही न सोडता आपल्याला उच्च ध्येयाचा लाभ हवा असतो. ध्येयप्राप्ती ही काही लोकांसमोर, बाहेरच्या जगात मिरवण्याची गोष्ट नाही याचा आपल्याला सोयिस्करपणे विसरच पडलेला असतो. आपल्या आजच्या वागणुकीशी जुळेल असा सिद्धान्त आपण 'सोळा आणे व्यवहार्य म्हणून लगेच स्वीकारतो. पण ध्येयासाठी कोणी आपल्याला एक कप चहा कमी करायला सांगितला तर आपली पहिली प्रतिक्रिया असते - ' नको रे बाबा! कोणी सांगितले आहे इतका अवघड आदर्श ठेवायला? आम्ही आपले आहोत तेच आणि आहोत तसेच बरे आहोत!

इंद्रियांच्या दुर्बलतेचे समर्थन करणारा आदर्श आपल्याला व्यवहार्य वाटतो. पण 'इंद्रियांचे गुलाम असण्यात कसला आलाय आदर्श? - असा विचार आपण कधीही करत नाही. विवेकानंद सांगतात, जे संप्रदाय भोग आणि भगवान यांची सांगड घालण्याचा, त्या दोघांचा मेळ बसविण्याचा कधीच प्रयत्न करत नाहीत, त्यांचीच उन्नती होत असते. जे मिलाफ साधतात, त्यांचा -हास नक्की आहे.

आपल्या शरीरात जर एखाद्या रोगाने प्रवेश केला, तर त्याचा नुसता विचार करुन काय उपयोग?  त्यावर काहीतरी औषध घेणे हाच खरा उपाय आहे. एक गोष्ट आपण जरुर समजावून घ्या की,  वेदान्ताचा ईश्वर काल्पनिक नाही. तो अनेकांना प्रत्यक्ष दिसलेला आहे. तो अनेकांचा अनुभव आहे. आणि ज्याअर्थी मानवी जाणीवेच्या प्रांतात या अनुभवांची नोंद झाली आहे, त्या अर्थी प्रत्येक मानवाला कधी ना कधी हा अनुभव येणारच आहे.

वेदान्ताला व्यावहारिक वेदान्त असे नाव स्वामीजी का देतात हे आता आपल्या लक्षात आलेच असेल. या वेदान्ताचे मुख्य सूत्र म्हणजे 'आत्मविश्वास! आपल्या पुराणातील तेहतीस कोटी देवांवर आणि परकीयांनी आपल्यात घुसवलेल्या आणखी देवदेवतांवर तुमचा विश्वास असेल, पण स्वत:च्या ठायी मात्र अविश्वास असेल, तर तुमच्या नशीबी मुक्ती लिहिलेली नाही. आधी स्वत:वर श्रद्धा ठेवा. त्या श्रद्धेच्या शिळेवर दृढपणे उभे रहा. सामर्थ्यसंपन्न व्हा! आजची आवश्यकता जर काही असेल तर ही आहे! आजची काळाची ही गरज वेदान्त पूर्ण करु शकतो.

आपल्या आदर्शांच आपण सतत चिंतन केले पाहिजे. 'आत्मा वा अरे श्रोतव्य: मन्तव्य: निदिध्यासितव्य: असे उपनिषदांनी सांगितलेले आहेच. आपण त्याचे अनुसरण केले पाहिजे. मग पाहा, आपल्याभोवतालचे जग कसे बदलून जाते ते! 'जशी दृष्टी, तशी सृष्टी अशी जी म्हण आहे त्यात तथ्य आहेच. सृष्टी बदलण्याचे काम अवघड आहे, पण आपली दृष्टी मात्र आपण बदलू शकतो. हे काम अगदी सोपे आहे अशातला भाग नाही, अशक्यप्राय मात्र नक्कीच नाही!

'आपण सारेच स्वरुपत: ईश्वर आहोत अशा म्हणण्याने जगात नुसता गोंधळ माजून जाईल अशी भीती काही लोकांना वाटते. कोणी काहीही करेल आणि त्याचे उत्तरदायित्व मात्र ईश्वरावर टाकेल अशी एक शक्यता या विचारामुळे निर्माण होते. विवेकानंदांना वाटते की, होऊ दे असला गोंधळ! नाहीतरी आम्ही पापी आहोत, आम्ही सैतान आहोत असा घोष करुन जगाचे काय भले झाले आहे? यापेक्षा जगाचे आणखी काय वाईट होणे बाकी राहिले आहे? मग मी ईश्वर आहे असे म्हणताना लोक निदान सत्याच्या निकट तरी असतील. म्हणून भयाचे काहीच कारण नाही.

वेदान्तधर्म सर्वसमावेशक असल्याने भांडणांना, तंटाबखेडयांना येथे अजिबात जागा नाही. निर्गुण  ईश्वराच्या उपासकांपेक्षा सगुण ईश्वराच्या उपासकांनी जगावर जास्त युद्धे लादली आहेत हे विवेकानंद आपल्या लक्षात आणून देतात. वेदान्तधर्मानुसार जर आपण सारेच आचरण करु, तर मग जगात युद्धांना आणि तंटाबखेडयांना जागाच उरणार नाही, सर्वत्र शांतीचे साम्राज्य प्रस्थापित होईल असे विवेकानंदांचे मत आहे. जगाच्या भल्यासाठी आणि स्वत:च्या विकासासाठी आपण वेदान्तधर्माचे पालन करणे आज खरोखरच 'व्यवहार्य ठरेल  यात शंकाच नाही!

छांदोग्य उपनिषदातील सत्यकाम जाबालाची कथा आपणा सर्वाना ठावूक असेल. या बालकाला अग्नीने, क्षाने, वृषभाने ब्रह्मज्ञान दिले असा पुढील कथाभागात उल्लेख आहे. यातील कथेचा भाग सोडला तर तात्पर्य असे निघते की, सर्व ज्ञान हे अंतरंगातच असते आणि बाहय कालादि निमित्तांनी, कारणांनी त्या ज्ञानाची आपल्याला जाणीव होते इतकेच! ज्ञानविषयक वेदान्ताचे हे व्यवहार्य सूत्र आपण लक्षात घेतले तर आजच्या शिक्षणक्षेत्रातील आपल्या ब-याचशा समस्यांचे निराकरण होईल – निदान शक्यता तरी वाढेल.

वेदान्तमत हे जग मिथ्या – खोटे - असल्याचे सांगते असा आपला एक समज आहे. विवेकानंद वेदान्ताची जगत्’विषयक भूमिका फार चांगल्या त-हेने मांडतात. ते म्हणतात, 'वेदान्त जग उडवून देत नाही, तर तो त्याचे स्वरुप खरोखर काय आहे हे स्पष्ट करुन सांगतो. वेदान्त 'मी चा नाश करत नाही, तर खराखुरा 'मी कोणता हे दाखवून देतो. हे जग व्यर्थ आहे, त्याला अस्तित्व नाही असे वेदान्त म्हणत नाही. वेदान्त एवढेच म्हणतो की, हे जग खरोखर काय आहे ते जाणून घ्या म्हणजे तुमचे ते अनिष्ट करु शकणार नाही,  तुम्हाला ते घायाळ करु शकणार नाही.

विवेकानंदांचे हे विचार वाचल्यावर वेदान्त आणि जीवन हातात हात घालून चालू शकतात अशी आपली नक्कीच खात्री पटली असेल! 

क्रमश: