ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Sunday, March 22, 2015

२२५. भीतीच्या भिंती: ६: 'दरी'

भाग १,२,३,४,५
(विनंती : या लेखात मी ‘दरी’ शब्दांचे जे उच्चार दिले आहेत, ते वाचकांनी कृपया ग्राह्य धरू नयेत.)
भारतासारख्या बहुभाषिक देशात जगण्याचा एक फायदा असा की, कुठल्याही नव्या भाषेत रूळायला आपल्याला फार अडचण वाटणार नाही असा (उगाच) वाटणारा आत्मविश्वास. आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, बंगाल अशा अनेक राज्यांत अनेकदा प्रवास झाले. प्रत्येक वेळी निरक्षर माणसांना काय अडचणी येत असतील याचं भान आलं; आणि दुसरं म्हणजे शब्द ‘ऐकायची‘ सवय लागली. एखादा नवा शब्द ऐकला की हिंदी-इंग्रजी जाणणा-या सहका-याला त्याचा अर्थ विचारायचा आणि तो शब्द पुन्हा कानावर पडला की त्याच्या अनुषंगाने संवादाचा अर्थ लावत बसायचा – हा माझा छंदच म्हणा ना!

‘दरी’ आणि ‘पाश्तो’ या अफगाणिस्तानच्या दोन ‘अधिकृत’ भाषा. अर्थात इतरही अनेक भाषा आणि बोली या देशात आहेत. २००४ च्या राज्यघटनेच्या १६ व्या कलमानुसारज्या प्रांतात जी भाषा प्रामुख्याने बोलली जाते, त्या प्रांतात त्या भाषेला ‘अधिकृत’ भाषेचा दर्जा आहे; म्हणजे त्या प्रांतात तीन अधिकृत भाषा आहेत. दरी आणि पाश्तो या दोन्ही भाषा ‘इंडो-युरोपीयन’ गटातल्या आहेत. पाश्तो ही पश्तून लोकांची भाषा, त्यामुळे ही पाकिस्तानमधल्याही एका प्रांताची अधिकृत भाषा आहे.

‘दरी’ आणि ‘पाश्तो’ दोन्ही भाषा मला अर्थातच येत नाहीत; त्यामुळे मला मदतीसाठी कार्यालय एक अनुवादक देईल असं आधीच बोलणं झालं होतं. पण अनुवादक काही चोवीस तास माझ्या सोबत नव्हता. कार्यालयात, हॉटेलमध्ये भवताली इंग्लीश बोलणारे लोक होते; वाहनचालक मंडळी कामापुरतं इंग्रजी बोलू शकत. पहिल्याच दिवशी विमानतळावर हिंदी बोलणारे लोक भेटले होते. एक दिवस तर अनपेक्षितपणे ‘मराठी’ शब्ददेखील भेटले.

त्याचं असं झालं; आमच्या टीममधले सगळे लोक कुठे ना कुठे बाहेर गेले होते, मी एकटीच होते. मी आले तेव्हा आमच्या खालाजान साफसफाई करत होत्या. ‘सलाम आलेकुम, सुब्बो खैर’ (सुब्बो खैर म्हणजे सुप्रभात. मुस्लिमेतरांनी 'सलाम आलेकुम' म्हटलेलं चालतं की नाही हे मी विचारून घेतलं होतं) म्हणून मी संगणक उघडून कामाला लागले. अर्ध्या पाऊण तासाने मला जाणवलं, की खालाजानना मला काहीतरी विचारायचं आहे. आता आला का प्रश्न! पण आमच्या खालाजान हुषार होत्या. त्यांनी स्वत:कडे हात दाखवून, मग तो हात दाराकडे दाखवत ‘मी बाहेर जातेय’ असं मला खुणेनं सांगितलं. मी हसून मान डोलावली. पण त्यांना अजून काहीतरी विचारायचं होतं.

“किली?” त्यांनी विचारलं. क्षणभर मी गोंधळले. शब्द ओळखीचा वाटत होता खरा. मग माझ्या डोक्यात उजेड पडला. माझ्याकडे किल्ली आहे का असं त्या मला विचारत होत्या. मी माझ्याकडची किल्ली त्यांना दाखवली. त्यावर खालाजान म्हणाल्या, “दरवाजा.... मुश्किल...” – स्वर प्रश्नार्थक होता. कुलूप लावायला प्रयत्न करावा लागायचा, सहज लागत नव्हतं इथलं कुलूप – त्यामुळे ‘कुलूप लावायला तुला काही त्रास नाही ना होणार’ हा त्यांचा प्रश्न. ‘मुश्किल नेई (हा उच्चार ने आणि नेई यांच्या मधला काहीतरी) तशक्कुर’ (अवघड नाही, धन्यवाद) असं मी म्हणाल्यावर हसत बाहेर गेल्या; आणि ‘स्वीताजानला दरी बोलता येतं’ असं त्यांनी माझ्या इतर सहका-यांना सांगायला सुरुवात केली.

‘शुद्ध मराठी’चा अनाठायी आग्रह धरणा-या लोकांचा प्रतिवाद करायला ‘किली’, ‘दरवाजा’ यांसारखे बरेच शब्द मला माहिती होणार आता; म्हणून मी खूष झाले अगदी!

शुक्रवार म्हणजे सुट्टीचा दिवस. त्यामुळे थोडा निवांत नाश्ता. उशिरा नाश्ता. सुट्टीच्या दिवशी दुपारच्या जेवणाची गरज भासू नये असा भरपेट नाश्ता.

मी भोजनगृहात जाते. तिथे स्वैपाकीबुवा बसलेले आहेत निवांत.
"सुब्बो खैर, सलाम आलेकुम" वगैरे झाल्यावर आमच्यात असा काहीसा संवाद होतो.

"ऑम्लेट?" खानसामा
"बले," मी (हो).
"अंडा? याक? दुई?" खानसामा.
"दुई," मी (दोन).
"चीज?" तो मला स्लाईस दाखवत विचारतो.
"याक," मी (एक)
"चिली?" खानसामा
"काम," मी. (इथं 'का'चा उच्चार क आणि का याच्या मधला काहीतरी आहे - कम आणि काम यांच्यात कुठेतरी..) - म्हणजे कमी.
तो ऑम्लेट घेऊन येतो.

मग विचारतो - "ज्यूस?" - खरं तर मी ‘ज्यूस का घेतला नाहीये’ असं त्याला विचारायचं आहे बहुतेक - कारण ज्यूस सगळे खाण्याच्या आधी घेतात. पण मी खाऊन झाल्यावर ज्यूस किंवा कॉफी घेते.

मी हसून सांगते, "बले, ज्यूस बेते" – “हो, ज्यूस द्या”. पण भला मोठा ग्लास भरून ज्यूस नकोय मला. म्हणून मी लगेच स्पष्ट करते - "निम गिलास बेते" - म्हणजे “अर्धा ग्लास द्या”.
अशा रीतींने पोट भरण्याइतकी "दरी" मी शिकले.

माझ्या लहानपणी मी वारांची नावं कशी लक्षात ठेवायला शिकले हे आता आठवत नाही. ‘दत्ताला पेढे गुरुवारी, चणे-फुटाणे शुक्रवारी, ....शाळेला सुट्टी रविवारी’ असलं गाणं बालवर्गाकडून ऐकलं आहे पुढे कधीतरी. इथल्या लहान मुलांना ‘वारांची नावं’ शिकायला फार सोप्पं आहे. शुक्रवार म्हणजे जुम्मा (jumah). शनिवारला म्हणायचं ‘शाम्बे’ (shanbeh)! आणि एवढे दोन शब्द लक्षात ठेवले की बास! कारण मग रविवार म्हणजे “याक (yaik) शाम्बे”, सोमवार म्हणजे “दु (doo) शाम्बे”, मंगळवार म्हणजे “से (say) शाम्बे”, बुधवार म्हणजे “चार (chaar) शाम्बे” आणि गुरुवार म्हणजे “पेंज (painj) शाम्बे”. त्यामुळे ‘मीटिंग चार शाम्बेला आहे की से शाम्बेला’ असं काहीतरी विचारून मी भाषेचा सराव करत राहिले.

लक्ष देऊन ऐकायला सुरुवात केल्यावर बरेच ओळखीचे शब्द कानावर पडायला लागले. जग पूर्वीच्या काळी आपापसात संवाद राखून होतं – असा संवाद फार जुना आहे याचा प्रत्यय देणारा आणखी एक अनुभव होता तो.

म्हणजे पाऊस पडला की इथं(ही) ‘गरमी’ कमी होते आणि ‘सर्दी’ वाढते; पाऊस ‘खलास’ झाला की जेवायला जायचं असं कुणीतरी सुचवतं; आज गाडी वेगळ्या रस्त्याने जातेय कारण रोजचा रस्ता आज ‘याक तरफी’ आहे; थोडी अधिक ‘कोशिश’ केली पाहिजे यावर सर्वांचं एकमत होतं; मॉल ‘नजदीक’ असतो; कधीतरी कुणीतरी ‘अजीब’ वागतं; अमुक ‘खबर’ वाचायचा मला सल्ला मिळतो; ‘सलामत’ (स्वास्थ्य, तब्ब्येत) ठीक नसेल तर ‘आराम’ केला पाहिजे याबद्दल दुमत नाही; कुणालातरी ही ‘चौकी’ (खुर्ची) बदलून दुसरी हवी असते; कुठल्याही कार्यालयात गेलं की लोक ‘बिशी’ (बसा) म्हणतात; तालिबान काळातल्या ‘खतरनाक’ अनुभवांची आठवणही काढू नका; पुलाव ‘खूब’ असला की जास्त खाल्ला जातो; आज बॉसची ‘मयेरबानी’ दिसतेय; काल मला ‘ताब’ (ताप) होता आणि ‘सरदर्दी’ही; त्याचे वडील ‘दुकानदार’ आहेत; मी आले असते, ‘लाकिन’ (लेकिन)...; ‘कुर्तीश सफेद आस’ (शर्ट पांढरा आहे); काय ‘खरीददरी’ केली काल; ‘किताबखाना’ ‘दूर’ आहे; ‘शिर्पेरा’ (शीर म्हणजे क्षीर –दूध; शिर्पेरा म्हणजे मिठाई) आवडेल तुम्हाला; कपड्याचा ‘रंग’; माझे ‘काका’ पोलीस आहेत; ‘छत’; ‘दवाखाना’;....

या सगळया शब्दांमुळे आपण आपला देश सोडून फार ‘दूर’ आलोत असं कधी वाटलंच नाही. (तसंही दूर नाहीये ते. काबूल-दिल्ली आणि पुणे-दिल्ली विमानप्रवासाला लागतात सुमारे दोन तास!)

अर्थात मी आत्ता हे जितक्या सहजतेने लिहितेय, तितकं काही हे सोपं नव्हतं. नवी भाषा शिकताना ऐकता ऐकता काही वाचलं तर भाषा कळायला मदत होते हा आजवरचा अनुभव. गुजराथी आणि काही अंशी बांगला आणि तामिळ शिकताना याचा उपयोग झाला होता (सरावाअभावी आता तामिळ विसरले!). इथं मोठी अडचण होती ती लिपीची. ही आहेत ‘दरी’ची मुळाक्षरं आणि ही आहेत ‘पाश्तो’ची मला ही काय वाचता येणार? त्यामुळे वाचनाचे दरवाजे बंद. लिपी शिकण्याइतका वेळ हातात नव्हता. मग रोमन लिपीत शब्द आणि त्यांचे अर्थ लिहून घ्यायला सुरुवात केली.

पण ‘दरी’चे उच्चार रोमनमध्ये (खरं तर कोणत्याही भाषेचे दुस-या लिपीत) लिहिणं हा एक खटाटोप असतो. (सध्या ‘पोर्तुगीज’चाही तोच अनुभव घेतेय.) म्हणजे स्पेलिंग yaik, पण उच्चार मात्र येक आणि याक यांच्या मध्ये कुठतरी. नेई आणि कम या शब्दांचा उल्लेख आधी आला आहेच. ख (खबर), ज (दरवाजा), फ (सफेद) असे बरेच उच्चार माझ्या सवयीपेक्षा वेगळे. ‘ट’ चा उच्चार अनेकदा ‘त’ – motor म्हणायचं मोतार. फोन वाजला की पहिला शब्द म्हणायचा ‘बले’ (balay:yes); पण त्या अफगाण ‘ब’ची नजाकत माझ्या आवाक्याबाहेर राहिली.. या लेखात मी दरी शब्दांचे जे उच्चार दिले आहेत ते वाचकांनी कृपया ग्राह्य धरू नयेत. मी रोमन अक्षरांनुसार उच्चारलेला शब्द माझ्या मते दरी असायचा; पण समोरच्याला तो कळायचा नाही (!) असं अनेकदा व्हायचं.

आपल्यासारखेच दरी भाषेने अनेक इंग्लिश शब्द स्वीकारले आहेत - गिलास म्हणजे ग्लास; dokhtar (daughter); nayktaayee; nars (nurse); injinyar (engineer); daaktaar (doctor); madar (mother); padar (father);

काही शब्द मात्र माझ्यासाठी गंमतीदार ठरले. एकदा एका खात्याच्या डायरेक्टरला भेटायला गेले. त्यांच्या सेक्रेटरीने मला बसायला सांगितलं; गोळी आणि चहा दिला आणि म्हणाली, “बसा थोडा वेळ; खानम (madam) ‘जलसा’मध्ये आहेत.’ कामाच्या वेळी कसले ‘जलसा’ला जातात हे अधिकारी – असा विचार माझ्या मनात आलाच. डायरेक्टर खानम आल्यावर खुलासा झाला की ‘जलसा’ म्हणजे मीटिंग. अफगाणिस्तानमध्ये मी अनेक ‘जलसा’त सहभागी झाले, हे वेगळं सांगायला नको! एका ‘जलसा’मध्ये एक ‘उस्ताद’ भेटले. ‘आमच्या देशात उस्तादांना खूप मान असतो’ असं मला एकजण सांगत होता. ‘जलसा’मुळे मी शहाणी झाले होते. अधिक माहिती घेताना कळलं की ‘उस्ताद’ महाविद्यालयात अथवा विश्वविद्यालयात शिकवतात. मग ‘शागीर्द’ म्हणजे विद्यार्थी हे ओघाने आलं. आपल्याकडे हे तीनही शब्द संगीतक्षेत्राशीच का जोडले गेले असावेत याचं कुतूहल आहे.

पोटदुखीला ‘दिलदर्दी’ (deildardee) हा शब्द काहीतरीच आहे. तसंच एकदा गारांचा पाऊस पडला तेव्हा सगळे त्याला ‘ज्वाला’ म्हणत होते (म्हणजे तसं मला ऐकू आलं!) हे शब्द मात्र ‘अजीब’ वाटले. बॉसला ‘रईस/सा’ हा अगदी योग्य शब्द आहे ना!

फरहाद माझा “दरी” भाषेचा शिक्षक. फरहाद का कोण जाणे, मला “सावित्री” म्हणायचा, मी काही ‘दुरुस्त’ करायच्या फंदात पडले नाही. नावात काय आहे अखेर? पण तो अतिशय शांतपणे शिकवायचा. पहिल्या तासातला हा आमचा एक छोटा संवाद:

Chitor astyn? (how are you?) चितोर अस्तेन?
Maam khub astum, tashakur (I am fine, thank you) मा खूब अस्तुम, तशक्कुर.
Name shumaa chees? (What is your name?) नामे शुमा ची आस?
Name maa Savita as. नामे मा सविता आस.
Shumaa az kujaastayn?( Where are you from?) शुमा आझ कुजा अस्तेन?
Ma az kaabul astum (I am from Kabul) मा आझ काबूल अस्तुम
Bisyaar khoob (very good) बिस्यार खूब.
वगैरे वगैरे

डेप्युटी मिनिस्टरच्या (मंत्री म्हणजे ‘वजीर’) पहिल्या तीन भेटीत अनुवादक सोबत होता; त्या ‘दरी’मध्ये बोलल्या; मी इंग्रजीत; अनुवादकाने दुभाषाचे काम केले. एकदा अशीच अचानक कॉरिडॉरमध्ये डेप्युटी मिनिस्टरशी गाठ पडली आणि पाच-सात मिनिटं आम्ही आंग्ल भाषेत बोललो. माझ्या चेह-यावर प्रश्न दिसत असणार स्पष्ट त्यांना. हसून म्हणाल्या, “आम्ही नेहमी इंग्लीश बोलत राहिलो, तर दरी आणि पाश्तो लयाला जातील ना! त्यामुळे वेळ ठरवून भेटायला येशील तेव्हा दुभाषा हवाच!’

भाषेसोबत त्या समूहाच्या संस्कृती आणि मूल्यांची ओळख होत जाते ती ही अशी!
क्रमशः

Wednesday, March 11, 2015

२२४. पत्रमीटिंग संपली.
बाया लगबगीने घराकडे परतल्या.
“माज्या घरी चल,” रखमामावशीने हुकूम सोडला.

मला तिच्याबद्दल अधिक जाणून घ्यायची संधी हवीच होती.
गेले .
चहा झाल्यावर ती म्हणाली, “येक पत्तुर लिवायचंय. लिवशील?”

तेवढी मदत मी नक्कीच करू शकते.

तिने एक ‘कार्ड’ आणलं.
ती सांगत गेली तसंतसं मी लिहिलं.
नव-याला होतं पत्र.

त्या वीसेक ओळींत मला तिच्या जगण्याचं चित्र दिसलं.

“पत्ता?” मी विचारलं.
“नाय ठावं”, रखमामावशी म्हणाली.
मी चमकून तिच्याकडे पाहिलं.
“कुठलं गाव?” “त्याचं एखादं पत्र?”
मी विचारलं.
मावशी गप्पच.

“मावशे, पत्र पोचणार कसं?” मी म्हटलं.
तिने डोळे पुसले.

तिची लहानगी पोर बाजूला खेळत होती.
ती म्हणाली, “गावात कुणालाबी नाय ठावं आबाचा पत्त्या”.

Sunday, March 1, 2015

२२३. उलगडा

“आई गं, तू छोटी होतीस; म्हणजे खूप खूप पूर्वी; तेव्हा माझ्यासारखीच होतीस?” दीपिकाचा प्रश्न ऐकून श्वेता हसली. ही प्रश्नमालिका हे तिच्या लेकीचं मागच्या आठवडाभरातलं एक नवं खूळ होतं.

“अगदी थेट तुझ्यासारखी होते मी!” श्वेता उत्साहाने सांगते.
पण का कुणास ठावूक, दीपिकाच्या मनात अजून शंका आहेत.

“तू इतकी मोठी आहेस आता; आणि मी इतकी लहान! मग तू माझ्याएवढी असताना मी केवढी होते? आणि होते कुठे मी तेव्हा?” दीपिकाचे प्रश्न आत्ताशी सुरु झालेत.

“जवळच तर होतीस माझ्या”, श्वेता सांगते. आता आज कहाणी कोणत्या दिशेने जाणार आहे, देव जाणे!
आता आई सांगेल ते तंतोतंत खरं मानण्याइतकी दीपिका काही लहान नाही. मागच्याच आठवड्यात तर तिचा सहावा वाढदिवस साजरा झालाय.

“जवळ नव्हते काही मी तुझ्या; तेव्हा आकाशात स्टार होते मी. तू हाक मारलीस म्हणून आले मग मी ४०४, गजानन अपार्टमेंट....”

सायकल फेरी मारायला लेकीच्या मित्र –मैत्रिणींच्या हाका आल्या आणि श्वेताची सुटका झाली.

पण दीपिकाच्या प्रश्नांसमोर फार काळ तग धरता येणार नाही हे श्वेताला कळून चुकलं होतं. किती दिवस ती लपवू शकणार आहे सत्य? दहा नाही पण अजून किमान साताठ वर्ष आहेत हातात या प्रश्नांना सामोरं जायला हे तिचं गृहितक. पण प्रत्यक्षात मात्र दिवसेंदिवस स्मार्ट होत चाललेल्या दीपिकाच्या आकलनशक्तीला कमी लेखून चालणार नव्हतं आता.

*****
दीपिकाच्या प्रश्नांच्या सरबत्तीला सामोरं जाताना श्वेताला वारंवार तिच्या लहानपणीची आठवण येते. लहानगी श्वेताही असाच प्रश्नांचा भडीमार करायची – तो तिच्या बाबांवर. आणखी एक मोठा फरक म्हणजे श्वेता गेलेल्या दिवसांबद्दल, पूर्वीच्या काळाबद्दल कधीच प्रश्न विचारायची नाही; तिला वेध असायचे ते येऊ घातलेला दिवसांचे; भविष्याचे. “बाबांना ‘पूर्वी’ असा शब्द असेलेला प्रश्न विचारला की त्रास होतो’ हे लहानग्या श्वेताला जाणवलं होतं. म्हणून श्वेताचे प्रश्न “बाबा, मी मोठेपणी कोण होऊ?“; “बाबा, मी तुमच्याएवढी होईन तेव्हा पण माझ्या सोबत असाल ना?” या धर्तीचे असत.

घरात आजी पण होती; बाबाची आई. का कुणास ठावूक, आजीचा श्वेतावर भयंकर राग होता. सारखी श्वेताच्या तकारी सांगत राहायची ती. तसं घरी फार कुणी यायचं नाही म्हणा; त्यामुळे त्या सगळ्या तक्रारी बाबासमोर व्हायच्या. बाबा ब-याचदा हसून प्रसंग निभावून न्यायचा. अति झालं की गंभीर होत म्हणायचा, “जे घडलं त्यात या निष्पाप जीवाचा काही दोष नाही. उगा तिला त्रास देऊ नकोस आणि स्वत:लाही त्रास करून घेऊ नकोस. आई, तुला जसा फक्त मी आहे; तसाच या पोरीलाही या जगात फक्त मी आहे...” असं काही झालं की आजी दोन चार दिवस ठीकठाक असायची. मग पुन्हा पहिले पाढे पंचावन्न!

आजीची बोलणी कमीत कमी खावी लागावीत अशा बेताने वागायला श्वेता लहान वयात शिकली. घरात अधेमध्ये कुणीतरी नातलग मंडळी यायची. त्यांनी श्वेताबाबत काही भोचक प्रश्न विचारले तर मात्र आजी त्यांना फटकारायची. “तिचा बाप समर्थ आहे तिची काळजी घ्यायला, तुम्हाला काय पडलंय?” अशी आजीची भाषा ऐकून समोरचा गपगार होऊन जायचा. एरवी आपल्याला धारेवर धरणारी आजी आपली बाजू घेऊन भांडतेय याचं श्वेताला नवल वाटायचं पण हळूहळू आजीच्या या दोन्ही रूपांची तिला सवय होऊन गेली. पण आजीचा आधार वाटावा इतकी जवळीक मात्र त्यांच्यात कधीच झाली नाही.

घरातला विषय मार्गी लागला तरी पण शाळेत प्रश्न यायचेच. शाळेतल्या इतर मैत्रिणी ‘आई’बद्दल बोलायला लागल्या की श्वेताला काही सुचायचं नाही, रडू यायचं. एकदा तर गृहपाठ म्हणून ‘माझी आई’ असा विषय दिला बाईंनी निबंध लिहायला तेव्हा श्वेता घाबरून बसली होती घरी आल्यावर. पण बाबाने तेव्हा मस्त युक्ती काढली होती. श्वेताने चक्क ‘भारतमाता’ या विषयावर निबंध लिहिला आणि कौतुकाची थाप मिळवली होती वर्गात. पुढे पुढे मात्र कुणी विचारलं तर ‘माझी आई मी लहान असताना देवाघरी गेली’ असं श्वेता सांगायला लागली – बाबा आणि आजीने तसं काही कधी म्हटलेलं नव्हतं तरीही! पाचवीत शाळा बदलली आणि ‘श्वेताची आई नाहीये’ हे जणू सगळ्यांनी न बोलता मुकाट स्वीकारलं.

पण श्वेताला मात्र आईबद्दल अनेक प्रश्न होते. कशी होती ती? माझ्यासारखी सावळी? तिचे केस कुरळे होते का? तिच्या गालावर खळी पडायची का? तिचा आवाज कसा होता? तिला पाऊस आवडायचा? आणि दही-भात? तिला डोसा बनवता यायचा का चांगला? मैत्रिणी जमवून घरात दंगा केला तर आई रागावली असती का? ती रोज नाचाच्या क्लासला घेऊन गेली असती का मला? .....

आपण बाबासारख्या नाही हे श्वेताला कळत होतं. बाबा उंच होता भरपूर – श्वेता दहावीतही पाच फूट दोन इंचाच्या पल्याड गेली नव्हती. बाबाच्या आणि तिच्या खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी जुळत नव्हत्या – बाबा तिला आवडते म्हणून कॉफी घ्यायचा खरा; पण चहा पिताना तो जास्त खुलायचा. बाबा सावकाश; शांतपणे बोलायचं तर श्वेताचा नेहमी तारस्वर. इवल्याशा गोष्टींनी श्वेताचे डोळे पाण्याने भरून येत; बाबा मात्र कितीही अडचण असली तरी हसतमुख असतो. बाबा वक्तशीर इतका की त्याच्याकडे पाहून घड्याळ लावावं. श्वेताला अनेकदा वाटायचं की ती बाबाची मुलगी नाहीचय मुळी. पण बाबाची तिच्यावर इतकी माया कशी असेल मग?

सातव्या-आठव्या इयत्तेत असताना आजीचा दुपारी डोळा लागला की श्वेताचा एकच उद्योग असायचा; तो म्हणजे बाबा ऑफिसातून यायच्या आधी घरात असतील नसतील तितकी कागदपत्रं उचकून बघायची. पण श्वेताची निराशा झाली. तिला ना आईचा एखादा फोटो सापडला; ना कोणत्या कागदावर तिचं नाव दिसलं. ना बाबाने आईला किंवा आईने बाबाला लिहिलेलं पत्र दिसलं; ना आईंची एखादी जुनी साडी दिसली. एकाही पुस्तकावर आईचं नाव नव्हतं; श्वेता जणू आईच्या गर्भातून जन्माला न येता सीतेसारखी भूमीतून उगवली होती.

कधीतरी एकदा विचारांच्या तंद्रीत श्वेताने बाबाला विचारलं, “बाबा, माझी आई कशी होती रे?”

“मला नाही माहिती, शोना....” बाबाच्या स्वरांतली वेदना जाणवून तिने त्याच्याकडे पाहिलं होतं आणि बाबाचा विदीर्ण चेहरा पाहून ती हबकली होती. आईचा विषय बाबाला त्रासदायक आहे हे कळल्यावर श्वेताने तो विषय कायमचा बंद केला होता. आईबद्दल बाबाला काही माहिती नाही हा धक्का तिने आतल्या आत सोसला. तिची दहावीची परीक्षा संपली आणि आजी आजारी पडली. आजारी आजी श्वेताला सारखी काही सांगू पहात होती. पण तिने ‘आजी, राहू दे आता. काय फरक पडतो त्याने? तू बरी झालीस की बोलू मग हवं तर’ असं म्हणून आजीचा सूचक संवाद सुरु होण्यापूर्वीच बंद केला होता. त्या आजारपणात आजी गेली आणि मग आई हा बंद कप्पा होऊन गेला श्वेतासाठी.

*****
दीपिका धावत येऊन श्वेताच्या कुशीत शिरते. तिचा चेहरा लालभडक झालाय, डोळ्यातून पाणी वाहतेय. आईचा हात पाठीवरून फिरतानाही तिचे हुंदके कमी होत नाहीत. दीपिका आईला घट्ट मिठी मारते. दीपिकाला किती भीती वाटतेय ते त्या स्पर्शातून श्वेताला समजतं.

“काय झालं राणी? कुणी त्रास दिला तुला?” श्वेता विचारते.
“आई, रोशनी म्हणाली की मी तुझी मुलगी नाहीये; तू मला हॉस्पिटलमधनं विकत आणलंयस. मग विकी, सनी, जादू, मोना सगळे मला चिडवायला लागले.” दीपिकाचा स्वर दुखावला आहे चांगलाच.
“आपण त्यांच्या आई –बाबांकडे तक्रार करू हं!” श्वेता समजावते आहे लेकीला. पण त्या वाक्यात असं काहीतरी आहे की लेक आईपासून दूर होते.

“सगळ्यांना बाबा आहेत. माझा बाबा कुठं आहे? तो मला कधीच का भेटला नाही अजून? तो कधी फोन पण नाही करत. माझ्या वाढदिवसाला विश पण नाही करत तो कधी. कुठं आहे माझा बाबा?” दीपिका स्फुंदते आहे.

ज्याच्यावर प्रेम केलं; ज्याची साथ आयुष्यभर असेल असं मानलं तो ‘श्वेताला मूल होऊ शकत नाही’ असं लक्षात आल्यावर बदलला. मुलगी दत्तक घेऊन एक पाऊल पुढे टाकेतोवर तो आणखीच बदलला. दीपिका घरात आल्यावर ‘दुस-याचं मूल माझं नाही मानता येत मला. तुला पर्याय नसेल पण माझ्या बीजातून मी नवा जीव निर्माण करू शकतो’ असं म्हणून घरातून निघून गेलेला तिचा तो जीवनसाथी. घटस्फोटाला तिने लगेच संमती दिली. प्रेम करता येतं; मागता येत नाही. जीव लावता येतो पण त्या बदल्यात समोरच्याने पण आपल्यात जीव गुंतवावा अशी अपेक्षा नाही करता येत. त्याची सावलीही दीपिकावर पडू नये म्हणून मग नवं शहर; नवं काम ......

हे सगळं सहा वर्षांच्या कोवळ्या पोरीला कसं समजावून सांगायचं? कसं सांगायचं की मी तुला जन्म नसला दिला तरी सर्वार्थाने मी तुझी आई आहे? या इवल्या जीवाला कसा पेलवेल हा भार? हा निरागस जीव मिटून जाईल. तिला न दुखावता कसं सांगायचं सत्य?

दीपिका स्तब्ध बसलेल्या आईकडे पाहून भेदरली आहे आणखीच. श्वेता तिला जवळ घ्यायचा प्रयत्न करते. पण “तू मला विकत घेतलंस, मला बाबा नाही...” असं आक्रंदत दीपिका तिच्यापासून दूर होते आहे. लेकीला जपायचं तर आहे पण या क्षणी आपल्याला तिला जपता येत नाही हे कळून श्वेता आतल्याआत उध्वस्त होते आहे.

“आजू, मला आईने विकत आणलंय का रे?” दीपिकाने दारात उभ्या असलेल्या आजोबाकडे धाव घेतली आहे.

श्वेता कोप-यात उभ्या असलेल्या बाबाच्या चेह-याकडे पाहून दचकते. असा का दिसतोय हा आत्ता? याला काय होतंय? डॉक्टरांना फोन करावा का?

बाबाने नातीला उचलून कुशीत घेतलेय आणि तो तिला थोपटतोय. पण त्याची नजर कुठे हरवली आहे?

“बाबा ....” श्वेता हळूच हाक मारते.

“शोना, रडू नकोस. मी आहे ना. ....” बाबाच्या बोलण्यावर श्वेता दचकते. कितीतरी वर्षांनी त्याचा तोंडून ‘शोना’ ऐकताना ती परत एकदा लहान होऊन जातेय.

बाबाच्या खांद्यावर डोकं ठेवत ती म्हणते, “बघ ना रे बाबा, आता कसं सांगू मी राणीला? लहान आहे रे ती फार अजून.”

“श्वेता, बेटा रडू नकोस. तू माझी आहेस. माझीच मुलगी आहेस. मी आहे ना तुझ्याजवळ! मी तुला सोडून कधी कुठे जाणार नाही.....” बाबा त्याचं तंद्रीत बोलतो आहे.

रडतेय नात. बाबा बोलतोय लेकीशी. नातीला ‘लेक’ समजून तिची समजूत घालणा-या बाबाकडे पाहताना, त्याचे शब्द ऐकताना श्वेता चकित झाली आहे.

एक हात बाबाच्या गळ्यात आणि एक हात दीपिकाच्या केसांतून फिरवत गलितगात्र अवस्थेत उभ्या असलेल्या श्वेताला एका क्षणी बाबाच्या बोलण्याचा अर्थ उमगतो.
तिच्याही नकळत श्वेताचं मन उभारी घेतं.

इतकी वर्ष अबाधित असलेल्या त्या रहस्याचा अखेर उलगडा झाला आहे.

**