ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६
Showing posts with label गुजरात. Show all posts
Showing posts with label गुजरात. Show all posts

Monday, December 3, 2012

१४३. सबलीकरण

पुरुष माणसं मीटिंगमध्ये हजर असताना त्या खुर्चीत बसू शकत नाहीत, मी मात्र बसू शकते.
मी महागडे कपडे वापरू शकते, त्या नाही वापरु शकत.
मी चारचाकीने प्रवास करू शकते, त्या कधीच चारचाकीत बसलेल्या नाहीत.
मी डिजीटल कॅमे-याने फोटो काढू शकते, त्यांनी कधीच फोटो काढलेला नाही.
मी वेगवेगळ्या राज्यांत प्रवास करते, त्यांच्यापैकी अनेकींनी शेजारचा तालुकाही पाहिलेला नाही.
माझ्याकडे मोबाईल फोन आहे, त्यांच्याकडे तो नाही.
मी वाचू शकते,लिहू शकते – त्या शाळेत गेलेल्या नाहीत.
मी माझ्या इच्छेने मला हवे तेव्हा आणि मला पाहिजे तितके पैसे खर्च करू शकते; त्यांना अशी चैन करता येत नाही.
मी इंग्रजी बोलते, त्या बोलायचे तर लांबच, समजूही शकत नाहीत ती भाषा.

माझ्या सोबत असलेल्या स्त्रियांचा दृष्टीने ‘तुम्ही किती हुशार आणि आम्ही किती अडाणी’ असा मुद्दा अधोरेखित करणारी ही यादी न संपणारी आहे. त्यांच्या दृष्टीने मी जणू कुठल्यातरी परग्रहावरून आले आहे. त्यांच्या आणि माझ्या जगण्यात साम्य तर नाहीच पण त्यांना कधी माझ्यासारखं जगता येईल ही शक्यताही त्यांना दिसत नाही. खरं तर या जाणीवेत, या भावनेत, या अभिव्यक्तीत एक संदेश पण आहे माझ्यासाठी. ‘तुम्ही जे काही बोलाल, ते आम्हाला लागू पडणार नाही’ असंच जणू त्या स्त्रिया मला सांगायचा प्रयत्न करताहेत. मी बरीचशी संदर्भहीन आहे त्या परिस्थितीत.
मला त्या स्त्रियांची भावना समजते. पण सत्याला अनेक बाजू असतात आणि त्यांना केवळ सत्याची एक बाजू दिसते आहे असं मला वाटतं. कारण त्या सत्याची दुसरीही एक बाजू आहे – ती मला आत्ताच दिसते आहे असं नाही, तर अनुभवाने मला ती माहिती आहे. त्या बाजूची चर्चा झाल्याविना हा संवाद पूर्ण नाही होणार माझ्यासाठी.
मी गुजरात राज्यात आहे. तापी जिल्ह्यातल्या छिन्दिया गावाच्या एका पाड्यात मी आहे. माझ्या सोबत पंधरा वीस कोटवालिया स्त्रिया आणि काही मुले-मुली आहेत. भारत सरकारने एकंदर ७५ आदिवासी समूहांना ‘आदिम जनजाती’ अशी मान्यता दिलेली आहे. या समुहांची जीवनशैली बरीच जुन्या पद्धतीची  आहे आणि विकासाचा वारा त्यांच्यापर्यंत न पोचल्याने त्याच्या फायद्यांपासून ते वंचित आहेत. त्यांची शेतीची आणि उपजीविकेची साधनं आधुनिक झालेली नाहीत अद्याप.
मीटिंगच्या आधी मी त्यांच्या वस्तीतून एक फेरफटका मारते आहे. त्यामुळे त्यांच्या आयुष्याचा प्राथमिक स्वरूपाचा अंदाज मला आला आहे. शिवाय इथं येण्यापूर्वी माझ्या सहका-यांनी मला या समूहाची, या गावाची माहिती पुरवली आहे. त्यामुळे समोर येत असलेल्या दृश्यात अनपेक्षित, धक्का बसावं असं काही नाही माझ्यासाठी. जे आहे ते काही फारसं सुखावह नाही, हे मात्र निश्चित.
स्त्रियांच्या सोबत फेरफटका मारताना अनेक विषयांवर आमच्या गप्पा होत आहेत. त्यात मी वर उल्लेख केलेले अनेक मुद्दे येताहेत. इथं मला त्यांच्या जगण्याबद्दल जितकं कुतूहल आहे, तितकंच, किंबहुना थोडंसं जास्तच त्यांना माझ्या जगण्याबद्दल आहे. शिवाय मी एकटी आणि त्या वीस जणी – त्यामुळे एकापाठोपाठ मला प्रश्न विचारण्याची संधी त्यांना आहे. मला गुजराती भाषा चांगली समजते त्यामुळे त्या विनासंकोच प्रश्नांच्या फैरी माझ्यावर झाडत आहेत. मला गुजराती फार चांगलं बोलता येत नाही – बोलण्याच्या ओघात मी व्याकरणाच्या चुका करते आहेत. त्यामुळे खूष होऊन त्या स्त्रिया आणि  लहान मुलं हसत आहेत.
माझे प्रश्नही बहुधा विनोदी आहेत. पाड्यात भटकताना मला एक सायकल दिसते, तेव्हा ‘तुमच्यापैकी कुणाला येते सायकल? या माझ्या प्रश्नावर सगळ्याजणी हसतात. कदाचित त्या प्रश्नातूनच ती वरची प्रश्नोत्तरी उगम पावली आहे. झाडाखाली एक पुरुष बसला आहे. तो माझा प्रश्न ऐकतो आणि त्या स्त्रियांना त्यांच्या (आदिवासी) भाषेत काहीतरी सांगतो, त्यावर एकच हशा उसळतो. काय म्हणाले ते भाई? मी विचारते. तर तो भाई म्हणालेला असतो की, सांगा येते सायकल आम्हाला म्हणून. त्या बेनसमोर कशाला काही येत नाही म्हणता? तिला थोडचं खरं काय ते कळणार आहे? पण त्या स्त्रिया खोटं सांगत नाहीत. कदाचित मी ‘दाखवा बरं चालवून’ असं म्हणेन याचा त्याना एव्हाना अंदाज आला असावा.
पण तो माणूस हुशार आहे – अनोळखी लोकांसमोर आपली बलस्थानंच फक्त जाहीर करावीत – हे त्याचं धोरण तसं पहायला गेलं तर योग्यच आहे.
भटकून झाल्यावर आम्ही एक ठिकाणी बसून ‘मीटिंग’ करतो आहोत आता. माझ्या इथं येण्याने स्त्रियांचा न्यूनगंड वाढणं योग्य नाही याची मला जाणीव आहे. त्यांनी त्यांना येत नसणा-या गोष्टी प्रामाणिकपणे मला सांगितल्या आहेत. आता गरज आहे मीही तितकंच प्रामाणिक असण्याची. 



मिटींगमधली औपचारिकता पार पडते – ओळख, स्वागत वगैरे. आता मी बोलायचं आहे. मी ती संधी घेते. त्या स्त्रियांच्या रोजच्या कामाची चर्चा सुरु करते.
आजपर्यंत कोटवालिया समाजाने गायीम्हशी कधीच पाळल्या नव्हत्या. पण सरकारी योजेनेचा भाग म्हणून आता त्यांना म्हशी मिळाल्या आहेत. इथल्या स्त्रिया आणि पुरुष काहीही अनुभव पाठीशी नसताना म्हशीची धार काढायला लागल्या आहेत.
हं! मला नाही येत गायी-म्हशीची धार काढायला.कधीच काढली नाहीये मी धार, मी सांगते. सगळ्या हसतात.
या सगळ्या स्त्रिया शेणाच्या गोव-या करतात, मला हेही काम येत नाही करता.
जंगलात एकटीने जायचं आणि जळणासाठी पाहिजे ती (योग्य या अर्थाने) लाकडं आणायची हे रोजचं काम आहे त्यांचं. मी जंगलात एकटी जाऊ शकणार नाही आणि कोणतं लाकूड जाळण्यासाठी योग्य आहे हे मला कळत नाही आणि मला लाकूड तर तोडताच येणार नाही हे मी जाहीर करते. सगळे पुन्हा हसतात. आता त्यांना गंमत वाटायला लागली आहे. आत्तापर्यंत मी ‘हुशार’ होते त्यांच्या दृष्टीने, पण मला अनेक गोष्टी येत नाहीत हे हळूहळू त्यांच्या लक्षात येतंय!!
हापशावरून त्या पाणी आणतात – घराला लागेल तितकं. मला भरलेली बादली उचलायला फारसं जमणार नाही हे मी त्यांना सांगते.
त्या स्त्रियांना त्यांची आदिवासी भाषा आणि गुजराती दोन्ही चांगल्या येतात, हिंदीही थोडी थोडी बोलता येते. म्हणजे त्यांना तीन भाषा येतात. मलाही हिंदी, गुजराती येत असलं तरी त्यांची भाषा मात्र येत नाही.
त्या चुलीवर स्वैपाक करतात, मला तर चूल पेटवताही येत नाही, स्वैपाक करणं तर फार पुढची गोष्ट!
त्यांना बांबूची बास्केट बनवता येते – जी मला येत नाही.



आता आमच्या चर्चेत रंग भरायला लागला आहे. मला असंख्य गोष्टी येत नाहीत याची त्यांना झालेली जाणीव त्यांच्यात एक वेगळाच आत्मविश्वास जागा करते आहे.
त्यांना तालावर नृत्य करता येतं; मला येत नाही.
त्यांना गाणी गाता येतात वेगवेगळ्या प्रसंगाना अनुरूप; मला गाता येत नाही.
त्यांना झाडं ओळखता येतात, झाडांची नावं सांगता येतात – माझं ज्ञान दोन-चार झाडांपल्याड जात नाही.
त्यांना ‘माशांची आमटी आणि भाजी ’ बनवता येते मस्त – मला मासेही ओळखू येत नाहीत वेगवेगळे.
शहरतली असले, शिकलेली असले, पैसेवाली असले, इंग्रजी बोलता येणारी असले ... तरी मला सगळं येत नाही ही गोष्ट आता त्या स्त्रियांना चकित करून गेली आहे.
माझ्यासाठी ही साधी गोष्ट आहे. जगण्याची काही कौशल्य त्या स्त्रियांकडे आहेत – काही माझ्याकडे आहेत. काही माझ्याकडं असणारी कौशल्य जशी त्यांच्याकडं नाहीत तशीच त्यांच्याजवळ असणारी अनेक कौशल्य माझ्याकडं नाहीत. त्या काही बाबतीत अडाणी आहेत तर मी काही बाबतीत अडाणी आहे.
नेमक्या कोणत्या गोष्टीमुळे आमच्यात फरक पडला आहे हा? शिक्षण? जात? आर्थिक स्थिती? शहर-खेड्यात असणा-या संधी? त्या आदिवासी आहे आणि मी नाही म्हणून? धर्म? हा फरक केवळ वर्तमानाताला आहे की त्याला भूतकाळ आहे? हा फरक इथं संपणार की भविष्यातही असाच राहील?
अनेक प्रश्न. त्या प्रश्नांची उत्तरं माहिती नाहीत; जी माहिती आहेत ती विषण्ण करणारी आहेत. म्हणून मी प्रश्न विचारत नाही, त्यांची उत्तरं इथं शोधायचा प्रयत्न करत नाही. आम्ही मिळून ज्या गप्पा मारतो आहोत, त्यातून आमची एकमेकीच्या आयुष्याबद्दलची समज वाढायला मदत होते आहे हे मात्र नक्की! त्यातून आमचे सगळ्यांचेच सबलीकरण होते आहे कळत नकळत!

स्वत:ला पाहिजे तसे निर्णय घेत स्वत:चं आयुष्य घडवण्याची क्षमता असणं अशी सबलीकरणाची ढोबळ व्याख्या करता येईल. ही क्षमता प्रत्येक व्यक्तीला आणि समूहाला मिळणा-या संधींवर अवलंबून असते. आपली बलस्थानं कोणती याचं भान असणं ही या प्रक्रियेतली महत्वाची गोष्ट आहे. आमच्या या चर्चेतून आम्हाला आमची बलस्थानं कळली हे फार चांगलं झालं! आपल्याला जे चांगलं करता येतं त्याबद्दल आपल्याला काय वाटतं याच्याइतकंच महत्त्व आहे ते आपल्याला जे काही चांगलं करता येत नाही त्याबद्दल आपल्याला काय वाटतं ते!!
त्यादिवशी आमच्या त्या गप्पा आम्हाला सगळ्यांनाच नवा विचार देवून गेल्या.

मी काय केलं मला नाही माहिती; पण त्या स्त्रियांनी मला थोडं अधिक सबल केलं त्यादिवशी!!       
**                                                                                                                     

Friday, May 11, 2012

१२४.निष्ठा

दोन दिवस.
दोन प्रसंग.
दोन माणसं.
त्यांचा अनुभव घेणारे आम्ही तेच.
आमचं मोजमाप मात्र वेगळ.

एक प्रसिद्ध धरण.
ते आम्ही पहायला गेलो.
तिथले कार्यकारी अभियंता जातीने हजर.

"धरण पाहण्याआधी मी केलेलं एक प्रेझेंटेशन पाहणार का?" त्यांची विचारणा.
मला 'धरण' तंत्रज्ञानातलं काहीही कळत नाही.
पण त्यांचा स्वर इतका आर्जवी की मी "हो" म्हणून गेले.
अर्ध्या तासाचं नेटकं प्रेझेंटेशन, सोबत चहा, प्रश्नांना नेमकी उत्तर.
हा माणूस उत्साही, शांत, शिस्तीचा, ज्ञानी आणि नम्र आहे हे मला जाणवलं.
मला अशी माणसं आवडतात.

त्यानंतर धरण पाहण्यासाठी अर्धा पाऊण तास गृहित धरलेला.
प्रत्यक्षात आम्ही दोन अडीच तासांनी बाहेर पडलो.
कारण हा गृहस्थ अतिशय मनापासून माहिती सांगत होता.
प्रत्येक गोष्टीत त्याच हृदय आहे, प्रत्येक गोष्टीचा इतिहास आणि त्यामागचं स्वप्न त्याला आठवतं आहे आणि ते त्याला सांगायचं आहे आम्हाला हे क्षणोक्षणी जाणवत गेलं.
कामातली त्या माणसाची निष्ठा नक्कीच वाखाणण्याजोगी होती.
जणू मी त्यांच घर पाहायला आले होते तितक्या आस्थेने ते मला प्रत्येक गोष्ट दाखवत होते.
मला मजा आली.

दुस-या दिवशी संध्याकाळी एक संग्रहालय पाहायला गेलो.
एक राजा होता इथला, त्याच्या राजवाडयातलं संग्रहालय.
दोन माणसं आधी तयार नव्हती फारशी पण त्यांनी फिरून दाखवलं मला ते - माहिती दिली मी विचारलेल्या प्रश्नांची.
पण एक तासाचा वेळ गृहित धरून मी त्या ठिकाणी गेले होते ती दहा मिनिटांत बाहेर पडायची वेळ आली.
मी जरा नाराजीने मुख्य दरवाजातून बाहेर पडले.

एक पन्नाशीची स्त्री बाहेर उभी होती.
"इकडे या," तिने मला हुकूम सोडला.
मी तिच्या मागोमाग गेले.
मग दरवाजा उघडून तिने मला आत नेले.
तिथं देवीची एक मूर्ती होती.
कोण आहे ही देवी?
त्यावर ती स्त्री म्हणाली, "मला हिंदी नाही बोलता येत."

मग तिने मला दहा मिनिटे ती देवी राजावर प्रसन्न होऊन उज्जैनवरून इथं यायला कशी तयार झाली, तिने राजाला 'मागे वळून पाहायचं नाही' अशी अट कशी घातली, राजाचे शहर जवळ आल्यावर 'आपण महालात बंद होऊ आणि इतर भक्तांना आपलं दर्शन घेता येणार नाही' असं वाटून देवीने पैंजण काढून ठेवलं - त्यामुळे देवी मागे येत नाही अशी राजाला शंका आली आणि त्याने मागे वळून पाहिलं - मग देवी तिथंच थांबली अशी एक मोठी कथा सांगितली. मग देवी जिथं थांबली तिथं राजाने तिच देऊळ कसं बांधलं आणि राजवाडयापासून भुयारी मार्गाने जाऊन राजा देवीला भेटत असे रोज - हेही सांगितलं.

'समजली का गोष्ट? नसली तर पुन्हा सांगते." अस त्या मावशी म्हणाल्यावर मी हसले.
मग तिने मला पुढे नेउन अनेक फोटो दाखवले. या राजवाडयात ब-याच चित्रपटांच चित्रण होतं - त्यातल्या अभिनेत्यांचे आणि अभिनेत्रींचे फोटो आहेत इथं - ते तिने मला दाखवले.
इथल्या राजाला व्हिक्टोरिया राणीने एक बक्षीस दिले होते १८७७ मध्ये - ते दाखवले.
मग राजवाडयातला 'नाचाची जागा' दाखवली.
कोणत्यातरी चित्रपटात वापरल्या गेलेल्या 'जेल'ची जागा दाखवली.
कामातली त्या स्त्रीची निष्ठा नक्कीच वाखाणण्याजोगी होती.
जणू मी तिच घर पाहायला आले होते तितक्या आस्थेने ती मला प्रत्येक गोष्ट दाखवत होती.
मला मजा आली.

ही स्त्री तिच्या वयाच्या अठराव्या वर्षी, लग्नानंतर इथल्या राणीच्या सेवेत आली.
आता ती ५४ वर्षांची आहे. गेली ३६ वर्ष ती इथंच आहे.
दरम्यान तिचा नवरा मरण पावला.
ती इथंच काम करते.
ही स्त्री उत्साही, शांत, शिस्तीची, ज्ञानी आणि नम्र आहे हे मला जाणवलं.
मला अशी माणसं आवडतात.

मी सहज आमच्या टीमला विचारलं (त्यात सगळे पुरुष - दोन चाळीशीचे आणि दोन पंचविशीतले - सगळे टेक्निकल काम करणारे) - "कालच्या आणि आजच्या अनुभवात काही एकसारखं वाटलं का तुम्हाला?"
त्यांनी विचार केला. म्हणाले, "नाही."

मी प्रश्न बदलला - मी विचारलं, "कालचे अभियंता आणि आजच्या मावशी यांच्यात काही सारखेपणा वाटला का तुम्हाला?"
'छे! ते गृहस्थ किती शिकलेले, केवढया मोठया पदावर .. या बाई अडाणी, साध्या पगारी सेवक .. त्यांच्यात काय सारखेपणा असणार?" .. त्यांनी मलाच उलटा प्रश्न विचारला.

कामातली एखाद्याची निष्ठा आपण कोणत्या चष्म्यातून पाहतो?
ज्या व्यक्तीच शिक्षण जास्त;  वय जास्त; पद मोठं; प्रतिष्ठा जास्त; मिळणारा पैसा जास्त; सफाईने बोलता येणा-या भाषा अधिक  .........त्या व्यक्तीची कामावरची निष्ठा जास्त - असं आपल्याला का बरं वाटत असेल?
*

Wednesday, April 18, 2012

१२२. भीमनी घंटी

" मॅडम, भीमनी घंटी  इकडं आहे, या बाजूने या," माझ्या सहका-याचा आवाज.

मी गुजरातमध्ये ऑफिसच्या कामासाठी आले आहे. दोन आदिवासी गावांना भेट देऊन इथे चालू केलेल्या  काही कार्यक्रमांची नोंद करायची आहे. इथं एक डॉक्युमेंटेशन टीम आहे -  तिचं प्रशिक्षण आणि कामाची नोंद असा दुहेरी उद्देश आहे. सोबत माझी कार्यक्रमाची पाहणी पण करून होईल. सगळा कार्यक्रम आधीच ठरवलेला आहे.

आदल्या दिवशी एकाने मला हळूच, "जाम्बुघोडा जवळच आहे तिथून. जाऊ यात का वेळ मिळाला तर?" असं विचारून घेतलं आहे. " काय आहे तिथं पाहण्यासारखं?" या प्रश्नावर "हनुमानाची प्रचंड मोठी मूर्ती" असं उत्तर उत्साहाने मला मिळालं. पण एकंदर मी देवभक्त नाही हे माझ्या टीमला माहिती आहे. म्हणून एकजण लगेच पुढे सांगतो, " तिथं मस्त जंगल आहे, तुम्हाला आवडेल ते खूप. ते एक अभयारण्य आहे...". पूर्ण टीमच्या मनात तिकड जायची इच्छा आहे त्यामुळे मी नकार द्यायचा प्रश्न उद्भवत नाही. "काम पूर्ण झालं पाहिजे पण आपण ठरवलेलं, बरं का" अशी फक्त मी सगळ्यांना आठवण करून दिली आहे कालच.

आम्ही पंचमहाल जिल्ह्यात आहोत. वडोदरा शहरापासून सुमारे ७० किलोमीटर अंतरावर.  येताना रस्त्यावर आम्हाला पावागड दिसतो. हा पहाडी किल्ला आहे आणि १६ व्या शतकातल्या संस्थानाची राजधानी होती इथं. आम्ही वेळ नसल्याने तिकडे जात नाही पण एकदा जाण्यासारखी दिसती आहे जागा. रस्त्यावरच्या जाहिराती वाचून तिथं आता 'रोप वे'ची व्यवस्था आहे हे कळत - म्हणजे पर्यटक मोठया संख्येने येत असणार इथं.

आम्ही 'झंड हनुमान' या ठिकाणी पोचतो. 'झंड' शब्दाचा अर्थ काय याबद्दल आधी मी विचारलं, पण कोणाला सांगता नाही आलं  नेमकं - पण झंड म्हणजे भव्य असणार. वाटेत मोहाची झाडे आहेत भरपूर आणि त्यांच्या फुलांचा मंद वास वेडावून टाकतो आहे. काही आदिवासी स्त्रिया आणि पुरुष मोहाची फुले गोळा करताना दिसतात. ती विकून थोडेफार पैसे मिळतात त्यांना - या काळात ती एक उपजीविकाच असते त्यांची. एप्रिल महिन्याचे दिवस असल्याने जंगल  हिरवं नाही पण एकदम थंड आहे हवा. पावसाळ्यानंतर हे जंगल कसं दिसत असेल याची नुसती कल्पना करूनही मी एकदम ताजीतवानी होते. अर्थात एप्रिल-मे या काळातही जंगलाच सौंदर्य वेगळच  असतं हे काही मुद्दाम सांगायला नको. 


हनुमानाची २१ फूट उंच मूर्ती देखणी आहे. इथं फोटो घ्यायला बंदी आहे, त्यामुळे मी डिजीटल कॅमेरा उघडला नाही. गाडीचा चालक आता मार्गदर्शकाच्या भूमिकेत जातो. तो सांगतो की, पांडव त्यांच्या वनवासाच्या बारा वर्षांनतर म्हणजे अज्ञातवासाच्या तेराव्या वर्षी या परिसरात राहिले होते. अर्जुनाने एका बाणाने जमिनीतले पाणी मोकळे करून पांडवांची तहान भागवल्याची एक गोष्टही तो मला सांगतो. आता हा झरा कोरडा पडला आहे पण पावसाळ्यात तो ओलांडणे अवघड असते असेही तो सांगतो. आता रामायणातला हनुमान महाभारतातल्या पांडवांच्या भेटीला इथं कशासाठी आला होता हे मात्र त्याला सांगता येत नाही. मी विचारल्यावर सगळेजण हसतात फक्त - एखाद्या  प्रश्नाचं उत्तर माहिती नसलं की फक्त हसायचं हे धोरण सगळीकडे दिसतं! असो, काहीतरी कथा असेल ती, शोधायला हवी. 

पुढे आहे 'भीमनी घंटी'. मला खर तर गुजराती चांगलं समजतं, त्यामुळे घोटाळा व्हायला नको होता. पण तरीही कुठेतरी आपल्यावर मातृभाषेचे संस्कार जास्त खोल असल्याने  'घंटी' म्हणजे एका मोठया 'घंटेचं' - देवळात असतात त्या 'घंटेचं' - चित्र माझ्या नजरेसमोर येतं. 'ही घंटी भीम कशासाठी वाजवत असेल' असा विचार मी त्यामुळे करते आहे मनातल्या मनात. त्यामुळे 'भीमनी घंटी' पाहिल्यावर क्षणभर माझा विरस होतो. मग माझ्या लक्षात येतं की, मराठी, हिंदी, गुजराती अशा भाषांची सरमिसळ केलीय मी म्हणून घोटाळा झालाय; मग मी स्वत:शीच हसते. कारण माझ्यासमोर जे काही दिसत ते आहे एक प्रचंड मोठं जातं - त्याच्या आकारामुळे आणि पांडवांच्या इथल्या वास्तव्याच्या कथेमुळे ते झालं 'भीमाचं जातं' - भीमनी घंटी! 

अज्ञातवासाच्या तेराव्या वर्षात भीमाने 'बल्लवाचार्याचे' काम केले ही कथा आपल्याला माहिती आहेच. त्यावेळी हे जातं वापरलं गेलं होत का? म्हणजे  या भागाची बरीच प्राचीन पाळेमुळे आहेत म्हणायची. हल्ली असली काही माहिती शोधायची म्हणजे इंटरनेट हे एक हाताशी असलेलं सोपं साधन झालं आहे. नव्या-जुन्याचा हा संगम मला नेहमी गंमातीदार वाटतो. आपली संस्कृती, आपला इतिहास वाचायचा तो इंग्रजीतून! 



त्या जात्याच्या आसपास मला एकावर एक रचलेले भरपूर दगड दिसतात. "हे काय आहे?" माझा स्वाभाविक प्रश्न. आता माझ्या टीमला माझ्याकडून कधी आणि कोणत्या प्रश्नांची अपेक्षा करायची याचा अंदाज आलेला आहे एव्हाना. आमच्यातला एकजण सांगतो, "इथं पडलेल्या दगडांतून आपल्या मनातलं घर बांधायचं आपण. ते जर स्थिर राहिलं, (म्हणजे ते एकावर एक रचलेले दगड खाली पडले नाहीत) तर आपल्या ख-या आयुष्यात आपल्याला आपण इथं बांधलेल्या घरासारखं घर मिळतं. स्वत:च्या मालकीच्या घराची आपली इच्छा पूर्ण होते इथलं घर टिकलं तर." माझे सहकारी उत्साहाने दोन मजली, तीन मजली घर, चार मजली घर बांधतात. त्यांच्यात ते घर 'बांधताना' लहान मुलांसारखा उत्साह आहे.

अनेक धार्मिक ठिकाणी अशा प्रकारच्या 'इच्छापूर्तीच्या' काही ना काही धारणा, समजुती आढळतात. मला माझ्या सहका-यांच्या डोळ्यात एक स्वप्न दिसते. मला एकदम जाणवत की अशा प्रकारच्या 'इच्छापूर्ती' च्या धारणा म्हणजे काही फक्त अंधश्रद्धा नाही. जे बेघर आहेत,  जे जन्मभर भाड्याच्या घरात राहत आहेत  ज्यांचे स्वत:च्या मालकीचे घर नाही, ज्यांची सध्याच्या घरात कुचंबणा होते आहे .. अशा लोकांच्या मनात एक आशा जागवण्याचे, त्यांना प्रेरणा देण्याचे काम ही जागा करते आहे. एका नजरेत मला तिथे अज्ञात लोकांनी आशेने बांधलेली असंख्य घरं दिसतात.  किती लोकांना आत्ताच्या त्यांच्या जगण्यातून पुढे जाण्याची उमेद हवी आहे, एक नवा रस्ता हवा आहे  त्याच एक चित्रच तिथं आहे. माझ्या हृदयात वेदनेची एक कळ उठते. मी तिथं घर 'बांधत' नाही - पण मी आता इतरांना हसतही नाही. 'इथं ज्यांनी घरं बांधली आहेत त्या सर्व लोकांना त्यांच्या स्वप्नातले घर मिळो' अशी एक प्रार्थना माझ्या मनात उमलते.

आम्ही परत फिरतो. येताना परिसरात असंख्य पोलिस दिसले होते, आता त्यांच्या संख्येत आणखी भर पडली आहे आणि अधिकारीही दिसत आहेत. मी एक दोन पोलिसांकडे पाहून हसते, तेही हसतात. एका अधिका-याला मी विचारते, "आज कोणी व्ही. आय. पी. येणार आहेत का?" एक अधिकारी हसतो पण उत्तर देत नाही.  मी पुढे म्हणते, "सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्ही मला माहिती न देणे मला समजू शकते. पण मीही सहज, फक्त कुतूहल म्हणून विचारते आहे. तुमची संख्याच आहे हा प्रश्न मनात आणणारी." दुस-या अधिका-याला माझ्या साधेपणाची बहुधा खात्री पटते. तो सांगतो, " गुजरातचे सरन्यायाधीश (मुख्य न्यायाधीश?) येत आहेत  इथं दर्शनाला. तुम्ही आधीच लवकर आलात ते बरं केलंत. आता कोणत्याही क्षणी साहेब येतील आणि तुम्हाला अर्धा पाऊण तास थांबायला लागलं असतं ते परत जाईपर्यंत." मी त्याचे आभार मानते.

त्या पाहुण्यांच्या आधी आमची भेट झाली या जागेला आणि वेळ वाचला याचा आम्हाला आनंद होतो. पोलिस उगाच त्रास देत नाहीयेत कोणाला पण वेळ तर गेलाच असता आमचा वाया. आम्ही निघताना समोरून गाडयांचा ताफा येतो. मी उगीच गाडया मोजते. एक, दोन, तीन ..... वीस गाडया धूळ उडवत येतात. सबंध जिल्ह्याची यंत्रणा आज याच कामात दिसते आहे. आज खरं तर कोर्टाच्या इमारतीच्या उद्घाटनासाठी हे  मुख्य न्यायाधीश जाम्बुघोडा इथं आलेले आहेत. एकदा मला  मोह होतो त्या दृश्याचा फोटो काढावा म्हणून. पण मी काही व्यावसायिक फोटोग्राफर नाही - उगीच कशाला पोलिसांचं लक्ष वेधून घ्यायचं?

तर राज्याच्या मुख्य न्यायाधीशांनीही आमच्यासारखी ' थोडं काम आणि थोडी मजा' अशी योजना केलेली दिसते आहे. आमच्या मौजेचा खर्च कोणी उचलला आहे ते मला माहिती आहे - पण या साहेबांच्या मौजमजेच्या खर्चाचा बोजा कोणावर पडणार? - असा एक प्रश्न माझ्या मनात येतोच. उत्तर अर्थातच माहिती आहे आणि पर्याय नसल्याने आपण ते स्वीकारलेलं पण आहे.

त्या न्यायाधीशांनीही 'भीमनी घंटी' ला त्यांच्या स्वप्नातले घर बांधलं की नाही ते मला माहिती नाही. कदाचित नसेलही - स्वतःचं घर असणारे भाग्यवान लोक आहोत आम्ही. कदाचित स्वप्नं पाहण्याइतका  निरागसपणा आता आमच्यात उरलेला नाही. जगताना सारखी बुद्धीची तलवार वापरून आम्ही स्वप्नं पाहण्याची ताकद गमावली आहे का?

आपण सुखी असतो तेव्हाच फक्त बुद्धीवादी असण्याची चैन आपल्याला परवडते का? हाही एक प्रश्नच! अनुत्तरीत प्रश्न!

**