ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Tuesday, January 21, 2014

१८६. नजर

त्या सकाळी एक एसएमएस आला. “आज विशेषांक पोस्ट करायचं काम आहे. काम जास्त आहे म्हणून जास्त लोकांच्या मदतीची गरज आहे. तुम्ही येऊ शकाल का?”

निरोप एका संघटनेच्या कार्यकर्त्याचा होता.

अनायासे रविवार होता. मला दुपारी थोडा वेळ मोकळा होता. तीनेक तास या कामासाठी देणं मला सहज शक्य होतं. म्हणून मी गेले. अगदी नेमकी दोन वाजता. अपेक्षेप्रमाणे अजून कुणी आलेलं नव्हतं. पण पाच-दहा मिनिटांत इतर लोक यायला सुरुवात झाली आणि अडीचच्या सुमारास आमचं काम जोमाने सुरु झालं होतं. 

काम तसं सोपं होतं. एक पाकीट घ्यायचं, त्याला दोन तिकीटं लावायची. त्यासाठी दोन लोकांची टीम बनली. अशा खरं तर तीन जोड्या बनल्या. एक जोडी तिकीट लावलेल्या पाकिटात अंक घालून पाकीट नीट बंद करायला लागली. पाचव्या जोडीने बंद पाकिटांवर पत्ते चिकटवायला सुरुवात केली. आणि सहाव्या जोडीने त्या अंकांचे पोस्टात पाठवण्याजोगे गठ्ठे बांधायला सुरुवात केली.

त्या बाराजणांमध्ये मीच नवीन होते. बाकी सगळे अनुभवी, नेहमी हे काम करणारे. त्यामुळे अगदी दोन मिनिटांत कसलाही गोंधळ न होता शिस्तशीर काम सुरु झालं. एकदा ते मार्गी लागल्यावर लोक मग आपापसात गप्पा मारायला लागले. काम मुख्यत्वे ‘हाताचं’ होतं; ‘डोक्याचं’ नव्हतं त्यामुळे ‘सिनेमा’पासून ‘आप’पर्यंत; ‘फेसबुक’पासून ‘लता मंगेशकर’पर्यंत ...कोणताही विषय वर्ज्य नव्हता. मधेच चहा आणि खाण्याचे पदार्थही आले. दोन-तीन चांगली गायक मंडळी होती सोबत, त्यांच्या सुस्वर गायनाचा आस्वाद घेतला.

जो अंक पाठवला जात होता त्याच्या मुखपृष्ठाविषयी लोकांचं अगदी सुरुवातीलाच आपापसात बोलणं झालं. त्याची रंगसंगती, ते तयार केलेला कलाकार, त्यावरच्या मुख्य ओळीतून जाणारा संदेश – यावर सविस्तर बोलणं झालं. या अंकाची मी ‘आजीव सदस्य’ असले तरी मी अंक ‘ऑनलाईन’ वाचते – त्यामुळे मी छापील अंकाकडे पाहिलं नाही. शिवाय माझ्या कामातला ८०% वेळ तिकीटं लावण्यात गेला, आणि फक्त थोडा वेळ मी अंक पाकिटात घालण्याचं काम केलं. शेवटी काम संपवायची घाई असल्याने (मी तीन तास थांबणार होते, ती प्रत्यक्षात साडेचार तास थांबले होते – त्यामुळे मला निघायची घाई होती) मी अंक पहिलाच नाही.

“एक अंक घेऊन जा आणि पाहून सांगा कसा झालाय तो” असं संपादकीय काम करणा-या व्यक्तींनी दोन-तीन वेळा म्हटल्याने मग निघताना एक अंक मी सोबत घेतला. पुन्हा एकदा चहापान झालं, ‘पुन्हा भेटूयात’ असं एकमेकांना-एकमेकींना म्हणून झालं आणि मी तिथून (एकदाची) निघाले.

घरी आले. इतर कामं झाली. दुस-या दिवसाची तयारी करताना हा अंक पिशवीतून काढून टेबलावर ठेवला. सहज म्हणून मी त्यावर नजर टाकली आणि मी चमकले.

कारण अंकावर ‘जानेवारी-फेब्रुवारी विशेषांक २०१४’ ऐवजी ‘जानेवारी-फेब्रुवारी विशेषांक २१०४’ असं छापलं होतं.

माझी पहिली प्रतिक्रिया ‘माझी नजर मला धोका देतेय’ अशी होती. तिथं इतक्या लोकांनी हा अंक पाहिला होता की त्यांना हे दिसलं नसेल असं शक्यच नाही. म्हणजे माझीच नजर मला धोका देतेय. बरं ती सगळी जाणकार मंडळी आहेत – त्यामुळे इतकी ठळक चूक त्यांच्या नजरेतून निसटेल हे अशक्य आहे. त्यांनी मुखपृष्ठावर चर्चा केली होती माझ्यासमोरच; त्यामुळे ‘हे पाहायचं राहून गेलंय’ हेही शक्य नव्हतं.

मनाची कशी पळवाट शोधायची घाई असते बघा. वरचं सगळा तर्क खरा असला तरी माझ्या समोरच्या अंकावर ‘२१०४’ दिसत होतंच मला – मग माझ्या मनात असा विचार आला की ‘एवढ्या एकाच प्रतीवर चुकीने तसं छापलं गेलं असेल, बाकी प्रतींवर बरोबर २०१४ असेल’. माझा हा विचार हास्यास्पद होता. कारण प्रत्येक मुखपृष्ठ काही हाताने तयार करत नाहीत – सगळी एकदम छापली असणार; त्यामुळे एका प्रतीवर जी चूक आहे ती सगळ्या प्रतींवर असणार.

मी थोडी संकटात सापडले. आम्ही तिथून निघताना ‘काम लवकर संपल्याचा आनंद’ संयोजकांनी व्यक्त केला होता. अंक उद्या पोस्टात टाकायचे आहेत. आता ही चूक कळवली तर त्यांना सगळे अंक पाकिटातून पुन्हा बाहेर काढावे लागणार, त्यावर नवीन स्टीकर लावून पुन्हा अंक भरावे लागणार - म्हणजे त्यांची आजची रात्र बरबाद होणार.

हा अंक मी तिथे पाच तास होते तेव्हाच का नाही पहिला, अशी हळहळ वाटत राहिली. तेव्हा अनेक लोक होते, काम वाटून घेता आलं असतं, दुरुस्ती लगेच झाली असती. आता मी उशीरा अंक पहिल्याने आधीचे पुष्कळसे श्रम वायाच गेले म्हणायचे.

एक शक्यता अशीही आहे की, ही चूक लक्षात येउनही त्यांनी ‘ती दुरुस्त करायची नाही’ असं ठरवलं असेल तर? मी कोण त्यांना काही सांगणारी?

पण त्या गटाला मी जेवढी ओळखते, त्यावरून चूक अशी दडपून टाकण्याचा मार्ग ते स्वीकारतील असं वाटत नाही. त्यांना अधिक काम करावं लागेल, पण ते करतील. त्यांच्या नजरेतून सुटलेली एखादी महत्त्वाची गोष्ट मी सांगितली नाही तर ते योग्य ठरणार नाही.

मग मी ठरवलं – मुखपृष्ठावर चुकीचा मजकूर छापला गेला आहे हे सांगण्याचं आपलं काम आपण करावं; त्यावर काय निर्णय घ्यायचा ते संबधित लोक ठरवतीलच. त्यांनी निर्णय काय घ्यावा याबाबत आपल्या इच्छेचा काही प्रश्न उद्भवत नाही! पण आपण काय करावं हे मात्र आपण ‘इतर काय करतील/म्हणतील’ यावर अवलंबून ठेऊ नये.

घेतला फोन आणि केला एसएमएस. त्यावर उत्तर आलं एका शब्दाचं – त्यावरून मला निर्णयाचा अर्थबोध काही झाला नाही. पण निर्णयाचा विचार मी करण्याचं कारण नव्हतं – हे मी स्वत:ला आधीच सांगितलं होतं.

दुस-या दिवशी सकाळी फोन आला तेव्हा कळलं की चूक दुरुस्त करण्याचं काम काल रात्रीच हाती घेतलंय टीमने. ते ऐकून मला आनंद झाला.

मुख्य मुद्दा तो नाही.

मुख्य मुद्दा आहे की: जे इतर दहा लोकांना दिसलं नाही, ते मलाच का दिसलं?
का दिसतं नेहमीच?

अशी ‘नजर’ असली की जबाबदारी वाढते. 

असली कसली नजर लाभली आहे मला?

Sunday, January 12, 2014

१८५ . विवेकानंदांचा वेदान्त विचार: भाग १९: मोक्षमार्ग (१)


मोक्ष हा प्राप्य नाही, उत्पाद्य नाही, विकार्य नाही आणि संस्कार्यही नाही हे खरे. मग माणसाने काय करायचे? एक गोष्ट सांगतात की, एकदा एक माणूस झाडाखाली निवांत झोपला होता. ते पाहून दुस-याने त्याला उठून काही काम करायला सांगितले. तो जे काही सांगेल त्यावर पहिल्याचा 'मग त्याने काय होईल? असा प्रश्न तयारच असे. बरीच लांबण लागता लागता ' तुला उद्योग करुन, भरपूर पैसे मिळवून निवांत बसता येईल असे दुसरा माणूस म्हणाला. त्यावर मग आळशी माणूस हसून म्हणाला, 'मग आत्ता मी निवांत बसलोच आहे की! त्यासाठी एवढी सगळी दगदग करायची काय गरज?

तमस आणि सत्व हे दोन्ही गुण टोकांनी पाहिले असता एकाच प्रकारचे दिसतात. जनकासारखा कार्यरत माणूस मुक्त असेल हा विचार आपल्या सहजी पचनी पडत नाही, हा एक भाग झाला. दुसरे असे की, ही आंतरिक अवस्था नेमकी मिळवायची कशी या प्रश्नाला नेमके एक असे सार्वजनीन उत्तर नाही. त्यामुळे संभ्रम पैदा होतो. जर आम्ही स्वरुपत: मुक्तच आहोत अन प्रत्यक्षात आम्ही स्वत:ला बंधनामध्ये पाहतो तर मुक्तीचा काही ना काही मार्ग, काही ना काही प्रक्रिया असलीच पाहिजे असे आपल्याला वाटत राहते.

विवेकानंद म्हणतात, जगातील माणसांची सर्वसामान्यपणे चार गटांत विभागणी होते. ते म्हणजे बुद्धिवादी, भावनाशील, साक्षात्कारवादी आणि कर्मशील. आता या सर्वांना एकाच प्रकारचा मार्ग देवून चालणार नाही. असे करणे म्हणजे त्या माणसाचे नुकसान करणे होय. एकाच मार्गाचे अनुसरण करण्यात सर्वांचे भले नाही. ज्याच्या त्याच्या स्वभावाला अनुसरुन, त्याला साहायक ठरतील असाच मार्ग प्रत्येक व्यक्तीसाठी असला पाहिजे असा विवेकानंदांचा आग्रह आहे .

अर्थात वेगवेगळे असणारे हे सर्वच मार्ग महत्त्वाचे आहेत - पण साधन म्हणून! त्यांच्याद्वारे प्राप्त होणारे गन्तव्यस्थान एकच असल्याने या मार्गांचे आपापसात भांडण असण्याचे काहीच कारण नाही. एखाद्या व्यक्तीला मुंबईहून दिल्लीला जायला अनेक गाडया आणि साधने आहेत. त्याने आपली सोयीची वेळ, दिवस, ऐपत आणि तिकीटाची किमत...इत्यादी पाहून गाडी ठरवावी व जावे - आपण दिल्लीला पोहोचणारच याबाबत कसलीही शंका न बाळगता! एकदा एका विशिष्ट गाडीत बसल्यावर मात्र अमूक एक स्थानक या मार्गावर आलेच नाही अशी तक्रार करत बसू नये. कारण महत्त्व मार्गावरील स्थानकांना नाही तर महत्त्व आहे मुक्कामास पोहोचण्याला!

स्वामीजी म्हणतात, धर्माचे ध्येय गाठण्याच्या पद्धतींना आम्ही 'योग म्हणतो. या योगाचे चार मार्ग आहेत. १. कर्मयोग - या पद्धतीनुसार कर्म व कर्तव्ये यांच्याद्वारे मनुष्य आपल्या दिव्य स्वरुपाचा साक्षात्कार करुन घेतो. २. भकितयोग - या पद्धतीनुसार सगुण ईश्वरावर प्रेम करुन आणि त्याची भक्ती करुन मनुष्य आपल्या दिव्य स्वरुपाचा साक्षात्कार करुन घेतो. ३. राजयोग- या पद्धतीनुसार मन:संयमाच्या द्वारे मनुष्य आपल्या दिव्य स्वरुपाचा साक्षात्कार करुन घेतो. ४. ज्ञानयोग - या पद्धतीनुसार ज्ञानाच्या द्वारे मनुष्य आपल्या दिव्य स्वरुपाचा साक्षात्कार करुन घेतो. त्या एकमेव स्थानाकडे म्हणजे ईश्वराकडे जाण्याचे हे भिन्न भिन्न मार्ग आहेत.


स्वामीजींनी सांगितलेले हे चार मार्ग बरेच प्रसिद्ध आहेत. त्यांचा आपण आता थोडक्यात आढावा घेऊ.
क्रमश: 

Friday, January 3, 2014

१८४. सावित्रीच्या लेकी ....

३ जानेवारी. सावित्रीबाई फुले यांची जयंती.

“फुले वाड्यापासून दुचाकी फेरी आहे सकाळी. जाणारेस का?” एका ज्येष्ठ कार्यकर्तीशी फोनवर बोलताना त्यांनी विचारलं.

दोन अडचणी होत्या यात.

एक तर काय मोर्चे, फे-या काढायच्या आहेत त्या चालत काढाव्यात – असं माझं मत असल्याने मी असल्या इंधन जाळणा-या फे-यांत कधीच सहभागी होत नाही.
दुसरं म्हणजे आयोजक संस्था होती: ‘राष्ट्र सेवा दल’. या संस्थेची माहिती असली तरी माझा थेट संबंध कधी आला नव्हता.

पण भोवतालचे सगळे विचार पूर्वग्रह न ठेवता जाणून घ्यायचे आणि जे जे चांगलं वाटतं त्यात ‘डाव्या की उजव्या विचारसरणी’चं आहे याची चिकित्सा न करता सामील व्हायचं असं माझं गेली अनेक वर्ष धोरण आहे. तसंही उजव्या वर्तुळात मला ‘डावी’ समजतात आणि डाव्या वर्तुळात ‘उजवी’ समजतात. हे मी पुरेशी मध्यममार्गी असल्याचं द्योतक आहे अशी मी सोयीस्कर समजूत करून घेतली आहे स्वत:ची.

मुख्य म्हणजे यावेळी नाव सावित्रीबाईचं होतं – जे माझ्यासाठी वादातीत आहे.

कधी नव्हे ती मी  ३ जानेवारीला पुण्यात होते, शिवाय त्या निमित्ताने फुले वाड्यात जाणं होईल असं एक आकर्षण मनात होतं. नुकत्याच ओळखी झालेल्या काही मैत्रिणी तिथं भेटायची शक्यता होती.

‘एक अनुभव घेऊन पाहावा’ म्हणून जायचं ठरलं. मग पहिला शोध ‘फुले वाड्यात कसं पोचायचं’ तो घेतला. तीन सुहृदांनी तीन वेगळे मार्ग सांगितले आणि गुगल नकाशाने चौथा रस्ता दाखवला. वाटेत जिथं रस्त्याबाबत मनात शंका येईल, तिथं थांबून लोकांना विचारायचं ही नेहेमीची पद्धत अवलंबली. चहा-नाश्त्याची एक गाडी, एक सायकलस्वार, एक रिक्षावाला आणि शाळेत जाणारी एक मुलगी – इतक्या लोकांना विचारत मी गेले आणि थेट वाड्यात पोचले. त्यांच्यातलं कुणीही ‘कोण फुले, कुठला वाडा’ असं विचारलं नाही, सगळ्यांना ‘फुले वाडा’ माहिती होता; हे खूप बरं वाटलं.  ‘कच-याची पेटी दिसली की त्या बोळात वळा’ ही एकाने सांगितलेली खूण अचूक निघाली आणि त्याचा विषादही वाटला.

एका गावात किती गावं असतातं, एका जगात किती जगं असतात - याचं पुन्हा एकदा दर्शन झालं. रस्ता, तिथली घरं, सार्वजनिक नळावर कपडे धुणा-या स्त्रिया, अंगणात चुलीवर तापवलं जाणारं पाणी – असं वाटलं की काळ या वस्तीसाठी पुढे सरकलाच नाहीये.


वाड्याचं पाहिलं दर्शन लोभस होतं.मी आधी इथं कधी आले होते ते मला आठवत नव्हतं इतकी ऐतिहासिक गोष्ट आहे ती. आज समारंभाचं वातावरण होतं. सनईचे सूर मन प्रसन्न करून गेले. मस्त रांगोळी होती. वाडा आत शिरून बघता आला नाही. अनेक स्त्रिया आणि मुलींचे गट तिथं येत होते, सावित्रीबाई आणि जोतिबांना अभिवादन करत होते. लहान मुली ‘सावित्री’च्या  वेषात पाहून आधी गंमत वाटली – नंतर, अशा अनेक मुली पाहिल्यांनातर  मात्र ही एक ‘फॅन्सी ड्रेस’ स्पर्धा आहे की काय अशी शंका आली.दुचाकी यात्रेचा अनुभव पुण्यातल्या (किंवा खरं तर कोणत्याही शहरातल्या) ‘ट्रॅफिक जाम’च्या अनुभवासारखा होता – म्हणजे दुचाकी अत्यंत सावकाश चालवावी लागत होती. पोलिसांचं सहकार्य चांगलं होतं आणि मुख्य म्हणजे सकाळची वेळ असल्याने वाहनंही तुलनेत कमीच होती रस्त्यावर. जाता जाता अखंड घोषणाही होत्या. ‘सावित्रीच्या लेकी आम्ही, आता मागे राहणार नाही’; ‘आवाज कुणाचा, सावित्रीच्या लेकींचा’ यासारख्या नव्या घोषणांच्या (माझ्यासाठी नव्या) सोबत  ‘हम सब एक है’ ‘बघताय काय, सामील व्हा’ या युगचिरंतन घोषणाही होत्या. एका अर्थाने सामाजिक चळवळी आणि राजकीय चळवळी यांच्यात भाषेची बरीच देवाणघेवाण झाली आहे हे या निमित्ताने लक्षात आलं.

पुण्यात सकाळी दहाच्या आत दुकानं उघडत नाहीत – हे सत्य आज पुन्हा एकदा लक्षात आलं. रस्त्यावर फारसे लोक नसल्याने जनजागरणाचा हेतू कितपत साध्य झाला हे मला सांगता येणार नाही. पण एक दोन चौकात स्थानिक लोकांनी आमचं स्वागत केलं – आमच्यावर फुलं उधळून; एका ठिकाणी मुलींच्या लेझीम पथकाचा जोष होता स्वागताला  – तेव्हा सगळं काही अगदीच वाया गेलं नसणार हे नक्की.

अचानक आम्हाला ‘गाड्या रस्त्यावर लावा आणि इकडे या’ असा आदेश मिळाला. तो होता ‘भिडे वाडा’ – जिथे फुले दाम्पत्याने पहिली शाळा चालवली.


हा एक संघर्ष असतोच नेहमी – जुनं काय टिकवायचं, काय काळाच्या ओघात नामशेष होऊ द्यायचं. इमारत टिकवायची का नाही या मुद्द्यावर स्थानिक लोकांची मतं बाहेरच्या लोकांपेक्षा वेगळी असतात हे दिल्लीत अनेकदा अनुभवलं  आहे. इथल्या स्थानिक लोकांचं काय मत आहे ते मला माहिती नाही – एकदा गेलं पाहिजे त्या परिसरात आणि लोकांशी गप्पा मारायला पाहिजेत अशी मी मनाशी खूणगाठ बांधून ठेवली.

मग आम्ही गेलो ते थेट पुणे विद्यापीठात. या विद्यापिठाला ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले विद्यापीठ’ असं नाव देण्याला मान्यता मिळाली आहे – पण अजून ते दिलं गेलं नाही. आदर्श भूमिका घ्यायची तर व्यक्तींची नावं विद्यापीठांना देऊ नयेत असं मी म्हणेन. पण एकदा ‘जवाहरलाल नेहरु विद्यापीठ’ असं नाव एका विद्यापीठाला दिल्यावर हा आदर्श पर्याय राहत नाही आपल्याला. मग काही ठराविक नावं पुन्हा पुन्हा देशात सगळीकडं दिसत राहणार आणि काही नावं आली की मात्र लोक ‘पण नामांतर करून विद्यापीठाचा दर्जा सुधारणार आहे का’ असे प्रश्न विचारतात याचा खेद होतो. नामांतर हा एक संवेदनशील विषय आहे; त्याची हाताळणी सरधोपट पद्धतीने करून आपण विषय अधिक अवघड कसा बनवून घेतो – हे या निमित्ताने पुन्हा एकदा दिसून आलंय.

पुणे विद्यापीठातही मी ब-याच वर्षांनी गेले. मला तरी विद्यापीठ परिसर बराच उजाड आणि म्हणून उदास वाटला (अर्थात हे माझं वय झाल्याचं लक्षण – बाकी काही नाही!) तिथं गाड्या लावून सगळे जमलो तेव्हा मला एका गोष्टीचा सुखद धक्का बसला. तो म्हणजे ‘तरुणाई’ची उपस्थिती. इतका वेळ गाडी चालवत असल्याने (समोर पाहून!) सोबत नेमके कोण लोक आहेत याचा अंदाज नव्हता. पण अनेक तरुण मुलं-मुली सोबत आहेत, त्यांना सावित्रीबाईंच्या कार्यांचं महत्त्व माहिती आहे हे पाहून बरं वाटलं. समाजात प्रश्न नेहमीच राहतील; जुने संपले तर नवीन उभे राहतील – पण जोवर नवी पिढी परिवर्तनाच्या कामात सहभागी होते आहे (आणि ती अनेक ठिकाणी होते आहे) तोवर फार चिंता करायचं कारण नाही.

आम्ही परत निघालो आणि आम्हाला विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर थांबायला सागितलं. दोन मिनिटांत तीनचार मुलं-मुली प्रवेशद्वारावर चढली आणि तिथं त्यांनी कापडी फलक झळकावला.


त्यांच्या दृष्टीने विद्यापिठाचं नामांतर आज झालंय. त्याचा आनंद तिथल्या जमलेल्या सगळ्यांच्या चेह-यांवर स्पष्ट दिसत होता.

त्या ठिकाणी वाहनांची गर्दी झाली, पोलीस आले. आता काही अपप्रकार तर होणार नाही ना अशी एक शंका मनात आली. पण पोलिसांनी परिस्थिती चांगली हाताळली. प्रवेशद्वारात अडकलेल्या नागरिकांनीही संयम दाखवला त्यामुळे वातावरणात ताण निर्माण झाला नाही.

आम्ही परत आलो ते ‘साने गुरुजी स्मारका’ वर. इथं सेवा दलाच्या काही कार्यकर्त्यांशी ओळख झाली, गप्पा झाल्या. मग पुढचा दिवसभराचा कार्यक्रम चालू झाला पण मी तिथून निघाले.

काय ठरवून?

एक तर फुले वाड्याला सवडीने भेट दिली पाहिजे. आता कुणी ‘पुण्यात काय आहे पाहायला’ विचारलं तर हा वाडा पाहायला सागितलं पाहिजे.

दुसरं म्हणजे जोतीबांची ‘गुलामगिरी’ आणि ‘शेतक-याचा आसूड’ ही दोन पुस्तकं केव्हापासून वाचायची पडली आहेत – ती लगेच वाचायला घेतली पाहिजेत.

तिसरं म्हणजे ‘राईट टू एजुकेशन’ चा थोडा अधिक अभ्यास केला पाहिजे.

चौथं – दुर्गम भागातल्या किमान एका तरी मुलीच्या शिक्षणाची आर्थिक जबाबदारी घेतली पाहिजे.

पाच – सोमवारी ६ जानेवारीला सुषमा देशपांडे यांचा ‘व्हय मी सावित्रीबाई’ हा प्रयोग एसएम जोशी फौंडेशनला संध्याकाळी साडेसहा वाजता आहे; हे ओळखीच्या सगळ्या लोकांना सांगितलं पाहिजे.

पुन्हा मी कधी अशा ‘दुचाकी फेरीत’ सामील होईन अशी शक्यता कमीच आहे. पण आज मी गेले ते चांगलं झालं इतकं नक्की. ‘सावित्रीच्या लेकी’ स्वत:ला म्हणवून घेण्यासाठी अजून बरंच काही करायला हवंय आम्ही आपण सगळ्यांनी!