ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Thursday, October 28, 2010

५०. काही कविता: १४ नाळ

वेताळाची
हाक येथे
झटकून उगाच
सोंग आण:

आणलेस? ठीक.

निसटून गेले
मर्म जरी
प्रपाताच्या माथी
चार बुक्के हाण;

हाणलेस? भले.

संदर्भांच्या
नागमोडी दगडांआड
विसरून ये एकदा तरी
रसरसले पंचप्राण;

विसरलेस? आता पुढे.

उरलेसुरले लक्तरांचे
शब्द घेऊन
खोल गुहेत बुडवून टाक
लवलव जाण.

जमले इतके? ग्रेट.

आता काय?
काही नाही.
कशाचीच
घाई नाही.

रुतून येथे
जाऊ नको;
हाती कोणाच्या
येऊ नको;
मागे वळून
पाहू नको;
गुंतून कोठे
राहू नको.

डोळे उघडून
पेलून ने हे
अपरंपार मायाजाळ
तोडता तोडता
जुळवून  तीच नाळ.


वांसदा, गुजरात ९ सप्टेंबर २००४ २३.००

Thursday, October 21, 2010

४९. कॉमन सेन्स

कॉलेजमध्ये आमचा पाच सहा जणांचा ग्रुप बनला. एक तर सगळेच होस्टेलमध्ये राहणारे. पुणेकरांच्या खडूसपणाचा अनुभव हा आम्हाला जोडणारा धागा ठरला सुरूवातीला. रोज संध्याकाळी गप्पांसाठी आम्ही भेटू लागलो.

खरं तर आमची किती छान मैत्री! पण तरूण मुलं-मुली रोज एकमेकांना भेटताहेत हे पाहून दोन्ही वसतिगृहांचे अधिक्षक जरा जास्तच चौकस झाले, सतरा प्रश्न विचारायला लागले. त्याचा वैताग येऊन आम्ही मग कॉलेजच्या मैदानात तळ ठोकला. गप्पा मारायला आम्हाला असंख्य विषय होते. सगळे जण भरपूर वाचायचे. शिवाय पुण्यात व्याख्यानांची उणीव कधीच नव्हती. त्यातून आमच्या वादांना, चर्चांना खतपाणी मिळत राहिले.

बराच काळ असा चर्चेत गेल्यावर ’आता प्रत्यक्ष काहीतरी करायला हवे’ या निष्कर्षाप्रत आम्ही आलो. फार चिकित्सा न करताच समोरच्या कामगार वस्तीतल्या लहान मुलामुलींचा अभ्यास घ्यायला, त्यांच्याबरोबर खेळायला जाऊ लागलो.

संस्था - संघटना या गोष्टींशी आमचा कोणाचाही तोवर कधी संबंध आला नव्हता. पण काहीतरी काम सुरू झाले हे पाहून आणखी मित्र मैत्रिणी आमच्याबरोबर आले. आमच्या गटाची ओळख म्हणून आम्ही ’मंथन’ असे नाव घेतले. आता नियमित बैठकांसाठी एका जागेची गरज भासू लागली. शनिवारवाडा ही आमची लाडकी जागा होती, पण ती नेहमीच सोयीची नव्हती.

अशा वेळी अगदी देवाने पाठवल्यासारख्या कमलमावशी आम्हाला भेटल्या. त्या चंदुच्या आईची मैत्रीण. ब-याचदा आम्हाला सर्वांना (म्हणजे चंदुला मुलींबरोबर!!) पाहून त्यांनी चंदुला हटकले होते. पण वस्तुस्थिती कळल्यावर त्यांनी त्यांच्या घरातली एक खोली आमच्या बैठका, आमचे कागद, मुलांच्या शिबिरांसाठी खरेदी केलेले सामान.. वगैरे गोष्टींसाठी दिली. आस्थेने त्या प्रत्येक वेळी आमच्यासाठी चहाही करायच्या. बघताबघता त्या ’मंथन’चा एक भाग होऊन गेल्या.

कमलमावशी नुसत्या गप्पा मारायच्या तोवर ठीक होते. पण त्या कामात मदत करायला लागल्यावर मात्र आम्हाला त्यांचा त्रास व्हायला लागला. त्यांचे अक्षर अगदीच वाईट होते. साधी नावांची यादी करायला सांगितली तर त्यात शुद्धलेखनाच्या शंभर चुका करायच्या. कागदाला समास सोडायचा असतो हे त्यांच्या गावीही नव्हते. कागद फाईल करायला सांगितले, तर पुढे मागे, वेडावाकडा पंच करायच्या कागद! पत्रांवर तिकिटे चिकटवण्याचे काम असले की तिकिटांना इतका डिंक लावून ठेवायच्या की, तिकिटेच काय, पत्रेही एकमेकांना बिलगून बसायची!

कमलमावशींच्या ’मदतीने’ आम्ही हैराण होऊन गेलो. त्यांना आम्ही काही बोलूही शकत नव्हतो. एक तर त्या वयाने मोठया, त्यांच्याच घरात आम्ही बसलेलो आणि त्या सगळं करायच्याही आपुलकीने! ’मला मेलीला काही येत नाही’ असं त्यांनी ओशाळून म्हटलं, की आम्हीच कानकोंडे व्हायचो.

पण आम्हाला त्यांचा मनातून रागही यायचा. जेमेतेम विशीत होतो आम्ही सगळे, त्यामुळे असेल पण आमच्याकडे सहनशीलता कमी होती दुस-यांच्या चुकांकडे पाहण्याची. जे आम्हाला चांगले करता येते, तेच फक्त जगात गरजेचे आहे अशी आमची त्यावेळी धारणा होती. ’कॉमन सेन्स’ कसा शिकवायचा कमलमावशींना - अशी चर्चा आम्ही आपापसांत संधी मिळेल तेव्हा करत असू.

एक दिवस बैठक चालू असताना कधी नव्हे ती उत्साहाने मी चहा करायला उठले. चहाला उकळी फुटायच्या आतच गॅस संपला. “मावशी, गॅस संपला", मी आतून ओरडले. कमलमावशी बहुधा काहीतरी कामात होत्या. “दुसरा सिलिंडर आहे कोप-यात, तो लाव", त्यांनी मला बाहेरूनच सूचना केली आणि त्या त्यांचे काम करत राहिल्या.

मी कोप-यातला दुसरा सिलिंडर ओढून आणला कसाबसा. पण तो उघडायचा कसा आणि जोडायचा कसा हे मला कळेना. मी इकडून तिकडून जोर लावत घामेघूम झाले, पण मला काही जमेना. खालून, वरून, चहू बाजूंनी न्याहाळूनही मला काही युक्ती सुचेना. माझ्या घरात गॅस नव्हता, त्यामुळॆ तोवर मी कधीच सिलिंडर शेगडीला जोडलेला नव्हता.

मला जसजसा वेळ झाला तसतशी बाहेर ’बाईसाहेब दार्जिलिंगला गेलेल्या दिसताहेत चहा पत्तीच्या खरेदीसाठी’ अशी थटटा सुरू झाली होती. ती ऐकून कमलमावशी हातातले काम टाकून आत आल्या. माझ्या हताश चेह-याकडे पाहून म्हणाल्या, “मला हाक नाही का द्यायचीस पुन्हा एकदा? एवढं काही वाईट वाटून घेऊ नकोस. एखादी गोष्ट कधी केली नसेल, तर पहिल्यांदा जमायला वेळ लागतोच!”

जगताना प्रत्येकाच्या कौशल्याचे क्षेत्र वेगळे असते आणि त्यामागे उपजत गुणांपेक्षाही परिस्थिती अनेकदा कारणीभूत असते हा ’कॉमन सेन्स’ मी त्यादिवशी नकळत शिकून गेले. श्रेष्ठत्त्व – कनिष्ठत्त्वाचे सरसकट निकष असू शकत नाहीत, असू नयेत या माझ्या मतावर कमलमावशी मात्र आजही खळखळून हसतात आणि मीही नकळत त्यात सामील होते.

Thursday, October 14, 2010

४८. निमित्तमात्र दिल्ली : भाग १

आपण अनेक घटनांमध्ये, प्रसंगांमध्ये, शहरांमध्ये, माणसांच्या आयुष्यांमध्ये निमित्तमात्र असतो. पण तशाच अनेक घटना, प्रसंग, माणसे, शहरे आपल्याही आयुष्यात निमित्तमात्रच असतात. माझ्या जगण्यातल्या निमित्तमात्र दिल्लीची ही झलक.....

दिल्लीला यापूर्वीही अनेकदा गेले होते. चांगली दहा दहा दिवस राहिलेही होते. पण तरीही यावेळचे दिल्लीला जाणे थोडेसे वेगळे होते. कारण सगळे ठीकठाक जमले तर वर्षभर दिल्लीत राहण्याचा माझा इरादा होता. तसे पाहायला गेले तर, पुण्यात तरी माझे काय होते? एके दिवशी अशीच पुण्यात आले होते. मग राहिले, ओळखी झाल्या, नाती जुळली. तसेच दिल्लीत गेले की आजही ओळखी होतील, नाती जुळतील .. हे मला अनुभवाने माहिती होते. आणि नाहीच जमले ते तर दिल्लीत राहिलेच पाहिजे अशी काही माझ्यावर सक्ती नव्हती.

पहाटे चार वाजता माझा मित्र आणि त्याची मुलगी माझ्या घरात होते. त्याच्या गाडीतून अर्ध्या तासात आम्ही विमानतळावर पोचलो. बोर्डिंग पास घेतल्यावर खिडकी मिळाली आहे हे पाहिल्यावर मला आनंद झाला. मला विमानप्रवास फारसा आवडत नाही. इथं माणसं एकमेकांशी बोलायला उत्सुक तर सोडाच तयारही नसतात. त्यामुळे या प्रवासात गप्पा होत नाहीत. खिडकीची जागा मिळाली तर मस्त ढग दिसतात – मग प्रवासाचा कंटाळा येत नाही.

 इतक्या वेळा विमान प्रवास केला आहे मी - पण पहाटेच्या प्रवासात खिडकीची जागा मिळण्याचा हा पहिलाच प्रसंग. उगवत्या सूर्याची किरणे हळूहळू आकाशभर पसरत जाताना जणू मलाही प्रकाशमान करून गेली. मनातले सगळे प्रश्न, सगळ्या शंका नाहीशा झाल्याचा अनुभव मला आला (- तो काही काळच टिकला ते सोडा!) आपण परत एकदा नि:शंक आनंदात असू शकतो, ती क्षमता आजही आपल्यात आहे हाही मला एक दिलासा होता.

दिल्ली जवळ आल्यावर यमुनेने विळखा घातलेला भूप्रदेश विमानातून दिसला. दूरवरून ते चित्र देखणं दिसत होतं - पण त्यात जे अडकले असतील त्यांची काय अवस्था असेल तेही समजत होतं. कोणत्याही परिस्थितीपासून आपण काय अंतरावर असतो, त्यावर आपल्या भावना अवलंबून असतात – म्हणून आपल्या भावनांबाबत, विचारांबाबत एका मर्यादेपल्याड आपण फार आग्रही असू नये याची जाणीव पुन्हा एकदा झाली.

विमानतळावरून बाहेर पडताना मी दिल्लीचा नकाशा घेतला. दिशांचे माझे अज्ञान लक्षात घेता, मला नकाशाचा फार काही उपयोग करता येईल अशी माझीही अपेक्षा नव्हती. पण पुढच्या दहा बारा दिवसांत मला नकाशाचा वापर करून, फारशी कोणाची मदत न घेता दिल्लीत व्यवस्थित फिरता आलं. माझ मलाच आश्चर्य वाटलं. स्वभावाला औषध नसतं वगैरे काही नाही - स्वभाव बदलतात, फक्त तशी वेळ यावी लागते. माझ्या दिल्ली वास्तव्यातल्या आठवडाभरात मेट्रो स्टेशनवर एका दिवसात मी तीन लोकांना राजीव चौकात गाडी बदला, केंद्रिय सचिवालयात व्हायोलेट लाईन घ्या, ही गाडी इथ टर्मिनेट होईल, दुस-या फलाटावर जा .. असं सांगितलं (अर्थात त्यांनी विचारल्यावरच!) तेंव्हा माझी मलाच गंमत वाटली. मी दिल्लीत पोचले आणि मेट्रोत स्त्रियांसाठी राखीव डबा सुरू झाला (हा केवळ योगायोग!) - त्यामुळे माझा प्रवास ब-यापैकी सुखावह होतो. इथे मुंबईच्या लोकल प्रवासाचा दांडगा अनुभव कामी आला. अर्थात दिल्ली मेट्रो म्हणजे मुंबई लोकल ++ असं प्रथमदर्शनी तरी माझ मत झालं आहे. पुढचं पुढे!
एखाद्या नव्या ठिकाणी आपण जातो, तेव्हा आपल्या ओळखी कशा होतात? म्हणजे आपलं नाव, आपलं त्या संस्थेतलं पद, आपलं शिक्षण या गोष्टी महत्त्वाच्या असतातच, पण त्याहीपेक्षा छोटया-मोठया गोष्टींतून लोक आपल्याला तपासून पाहत असतात, आपल्याबद्दल मत बनवत असतात. ही प्रक्रिया अर्थातच एकतर्फी नसते - आपणही तेच करत असतो. त्यातून मग ’कामाच्या पलिकडची’ - म्हणजे अनौपचारिक नाती निर्माण होण्याची प्रक्रिया आकाराला येते.

मी पहिल्या दिवशी सकाळी विमानतळावरून थेट कामाच्या ठिकाणी पोचले होते. संध्याकाळी बाहेर पडताना आता नेमकं कोणत्या दिशेनं, कोणत्या रस्त्यानं बाहेर पडावं असा माझा संभ्रम चेह-यावर दिसत असणार. कार्यालयातून बाहेर पडणा-या एका स्त्रीने मला विचारलं, “कुठं जायचेय तुला?” (हे तिने इंग्रजीत विचारले सुरूवातीला - मग आमचा संवाद इंग्रजी आणि हिंदी अशा दोन भाषांमध्ये होत राहिला,) मी सांगितल्यावर ती म्हणाली, “मलाही तिकडेच जायचे आहे. आपण टॅक्सी शेअर करू.” पत्ता शोधावा लागणार नाही याचा मला आनंद झाला. मी अर्थातच टॅक्सीचे निम्मे पैसे तिच्याकडून घेतले नाहीत. मी एकटी गेले असते तर मला लागलेच असते तितके पैसे असा माझा साधा विचार होता. पण तिला माझ्या या वागण्याचं अत्यंत अप्रूप वाटलं.

पुढचे तीन दिवस  यामिनीने रोज मी राहत असलेल्य़ा ठिकाणापासून कार्यालयापर्यंत आणि नंतर पुन्हा घरापर्यंत तिच्या स्वत:च्या गाडीतून अत्यंत प्रेमाने मला सोडलं. नंतर मी दुसरीकडे राहायला गेले आणि मेट्रोने प्रवास करायला लागले. दिल्लीतल्या पहिल्या दिवशीच एक नातं - निरपेक्ष मैत्रीच ना्तं निर्माण झालं. अशी नाती पुढच्या दहा दिवसांत आणखीच जुळत गेली. माझी राहण्याच्या जागेची व्यवस्था होत नाही हे कळल्यावर ’तू काही काळजी करू नकोस. माझ्या घरी चल राहायला’ असं म्हणणा-या शीना आणि उमा भेटल्या. मैत्रिणीची मैत्रीण असलेल्या हिमजाने फोन करून माझी चौकशी केली. ’एवढ तर आम्ही केलचं पाहिजे’ असं म्हणणारा दीपंकर भेटला, सौरभ भेटला. शामजी भेटले. जुन्या ओळखीतले तीन मित्र आणि एक मैत्रीण भेटले. माझ्या तीनही टीमच्या वरिष्ठ अधिका-यांनी मदत केली. आठवडाभर मी जिथे राहिले तो अरविंद आश्रम तर मला परका वाटलाच नाही. त्यामुळे ’दिल्लीत माझ्या ओळखीच कोणी नाही’ हे वाक्य तिस-या दिवसापासून मला बोलता आलेलं नाही. या शहरातही मला अनेक चांगली माणसं भेटणार आहेत, मी या शहराशी जोडली जाणार आहे अशी ग्वाही पहिल्या तीन चार दिवसांत मला मिळाली.

दिल्लीत सुरक्षा तपासण्यांना मात्र सारखे सामोरे जावे लागते. किंबहुना दिल्लीच्या वास्तव्याचा तो अविभाज्य भाग आहे. रोज मेट्रो स्थानकात (दोन वेळा - सकाळी जाताना आणि संध्याकाळी परतताना) सुरक्षा तपासणी होते. शिवाय कार्यालयात प्रवेश करतानाही. ते आता रोजचेच कर्मकांड बनल्याने त्यात फारसे गांभीर्य राहिलेले नाही. म्हणजे हौज खास मेट्रो स्थानकात दोन दिवस सकाळी महिला सुरक्षा रक्षक नव्हतेच. त्यामूळे तपासणी न होताच माझ्यासारख्या अनेक स्त्रिया स्थानकात प्रवेश करत होत्या. एखादा दहशतवादी गट अशा गोष्टी बारकाईन पाहत असणारच. दहशतवादी गटांत स्त्रियाही काम करतात – हे सगळे आपल्याला माहिती आहे. तरीही आपण असला बेजबाबदारपणा आणि निष्काळजीपणा करतो. अनेकदा त्याची किंमत मोजूनही आपण शहाणपण शिकलेलो नाही ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे. माणसांच्या जीवनाचं आपल्याला मोल नाही हेच खरं!

कॉमनवेल्थ हा दिल्लीतला चर्चेचा विषय होता. त्यात भर पडली अयोध्या निकालाची. या दोन्हीमुळे दिल्लीत जिकडे तिकडे संगीनधारी पोलिस दिसतात. वेगवेगळया ठिकाणी वाळूने भरलेल्या पोत्यांच्या थप्पीआड कधी दक्ष तर कधी कंटाळलेला पोलिस हे दृश्य जागोजागी दिसते. गडचिरोली ते चंद्रपूर प्रवासात रस्त्यावर, झाडांआड उभे असलेले शेकडो पोलिस मी एकदा पाहिले होते - तेव्हाची अस्वस्थता (माणसाचे जगणे किती असुरक्षित झाले आहे, याला प्रगती म्हणायचे का? - अशा विचारांतून आलेली अस्वस्थता) यावेळी जाणवली नाही. सगळयाच परिस्थितीची सवय होऊन जाते मनाला.

काही झाले तर ही व्यवस्था तरीही अपुरीच पडेल आणि आणखी काही माणसांचे जीव यात जातील – हे जणू मीही आता गृहीत धरले आहे. त्या जाणा-या माणसांत एक आपणही असू या भीतीच्या पल्याड आता महानगरातले लोक गेले आहेत. ’जो वाचला तो जगतो’ असा आमचा नियम बनला आहे आणि मेलेल्यांसाठी मेणबत्त्या वगैरे लावून प्रार्थना केल्या की आम्ही आमच्या कर्तव्यातून मोकळे होतो. सगळ्याच गोष्टींचे कर्मकांड बनवण्यात आपण समाज म्हणून अगदी पटाईत आहोत.

केंद्रिय सचिवालय स्थानकात फलाटावर दोन महिला सुरक्षा रक्षक एकमेकींशी बोलत होत्या. त्यांच्या वजनापेक्षा त्यांच्या हातात असलेल्या संगीनीचे वजन जास्त असेल. त्या दोघी मला माहिती नसलेल्या भाषेत बोलल्या. त्या दोघींच्या चेह-यावरून त्या अरूणाचल – मेघालय भागातल्या असाव्यात असे वाटले. मी सहज "तुम्ही कोणत्या भाषेत बोललात आता?” असे एकीला हिंदीत विचारले. त्यावर ती नुसतीच हसली. मग तोच प्रश्न मी तिला इंग्रजीत विचारला, त्यावरही ती नुसतीच हसली. तिला त्या दोनही भाषा येत नाहीत असे तिने मला मानेने सूचित केले. आता हे खरं की खोटं देव जाणे! प्रवाशांशी बोलू नका, त्यांच्यात मिसळू नका अशा त्यांना कदाचित सूचना असतील – पण प्रवाशांशी बोलल्या नाहीत तर त्या काय मदत करणार त्यांना? आणि खरेच दोन्हीही भाषा येत नसतील – तर संकटकाळात त्यांची कोणाला मदत होणार? शिवाय प्रवाशांच्या संभाषणांतून काही धागेदोरे मिळवण्याची शक्यताही यांच्याबाबतीत पूर्ण मावळतेच. काय विचार असतो, काय प्रक्रिया असते या सगळ्या सुरक्षा व्यवस्थेमागे आणि ती किती उपयोगी असते असे प्रश्न माझ्या मनात आलेच.

पहिल्या आठवडयात राष्ट्रपती भवनावरून मी किमान दहा वेळा गेले. श्री. वेंकटरमण राष्ट्रपती असताना मला त्यांना राष्ट्रपती भवनात भेटायची संधी मिळाली होती. डॉ. अब्दुल कलाम राष्ट्रपती असताना मी त्यांना लिहिलेल्या एका पत्राला त्यांनी अनपेक्षितपणे उत्तर दिले होते - या दोन्ही गोष्टी मला आठवल्या – त्याबद्दल नंतर कधीतरी लिहीन.. एका राष्ट्रीय राजकीय पक्षाच्या एरवी फक्त असंख्य टीव्ही कॅमेरांच्या माध्यमातून पाहिलेल्या कार्यालयातही मी एका संध्याकाळी गेले. एका वेगळ्या कोनातून त्या परिसराकडे पाहताना मजा आली.

शनिवारी मैत्रिणीच्या घरी जेवल्यावर आम्ही फिरायला बाहेर पडलो. हाताशी तिची गाडी आणि चालक होता - त्यामुळे बाहेर पडलो. “छत्तरपुरची देवळं पाहायला आवडतील का तुला?’ या प्रश्नावर मी होकार दिला. मला वाटलं हे बहुधा छत्रपुर नावाच जुन शहर असणार आणि तिथे काही जुनी देवळं पाहायला मिळतील. देवाकडं मी कधी काही मागत नाही पण मला देवळं पाहायला आवडतात. पण ही सगळी आधुनिक देवळं आहेत. कोणीतरी नागपाल नावाचे स्वामीजी होते - त्यांच्या अफाट संपत्तीच प्रदर्शन आहे तिथ – चांदीची भांडी, भरजरी वस्त्रं वगैरे. “जे लक्ष्मी त्यागतात त्यांच्याकडे लक्ष्मी येते" असा माझ्या मैत्रिणीने त्याचा अर्थ लावला, मी त्यावर अर्थातच वाद घातला नाही. दोन तीन गोष्टी तिथल्या विशेष लक्षात राहिल्या. एक म्हणजे जुन्या लाकडी रथावरचं अप्रतिम कोरीवकाम.; दुसरं म्हणजे त्या नागपाल स्वामींचा अत्यंत जिवंत वाटणारा पुतळा. आणि तिसरं म्हणजे शंकरासोबत अलंकारांनी सजलेल्या पार्वतीच चित्र. एरवी ’लंकेची पार्वती’ हा शब्दप्रयोग जास्त ऐकलेला.

मग कुतुब मिनारला गेलो. तिथ असंख्य कबरी आहेत – किंवा थडगी - या दोन शब्दांचा वेगवेगळा अर्थ आहे की नाही हे मला माहिती नाही; शोधावं लागेल. असंख्य पर्यटक होते तिथे आणि कशाचाही फोटो काढायचा म्हटलं तरी सारखं कोणी ना कोणी त्या फ्रेममध्ये येत होतं. ते सगळे अवशेष पाहताना ’एके काळी इथ काय धमाल वातावरणं असेल’ असा विचार मनात येत राहिला. त्या पडक्या अवशेषांची एक कथा असणार, पण ती मला समजली नाही. खरं सांगायच तर मी ती समजून घेण्याचा प्रयत्नही केला नाही.

ती सगळी थडगी पाहताना थोडसं हसायलाही आल – कारण त्यावर नावंही नव्हती. आणि नुसती नावं वाचून काय कळत म्हणा? इतिहास ब-यापैकी विसरभोळा असतो. आपले पराक्रम, आपलं यश, आपली प्रतिष्ठा .. या सगळ्यासाठी आपण धावतो -पण ते सगळच फार क्षणिक असतं. या सगळयासाठी माणसाने धडपडू नये असं मला अजिबात म्हणायचं नाही. जगणं अधिक अर्थपूर्ण व्हावं यासाठी आपण सगळ्यांनीच सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत यात शंकाच नाही. पण तो करताना फार जास्त अभिनिवेश बाळगू नये.

सगळ्यात मला विशेष भावला तो अलई मिनार. १२९६ ते १३१६ या काळात अल-उद-दिन खलजी या राज्यकर्त्याने येथील मशिदीचा विस्तार केला. कुतुब मिनाराच्या दुप्पट आकाराचा अलई मिनार त्याने १३११ मध्ये बांधायला घेतला. पण त्याच्या मृत्युनंतर ते काम तसेच अर्धवट पडून राहिले आहे ते आजतागायत!  दुस-याची ईर्षा करून, दुस-याला कमी लेखण्यासाठी कोणतेच काम हाती घेऊ नये असा संदेश हे अपूर्ण राहिलेले स्वप्न देत आहे असं मला वाटलं. सत्ताधीशांचीही सगळीच स्वप्नं पूर्ण होतात असे काही नाही - असंही ते पाहताना जाणवलं

दिल्ली तस पाहायला गेलं तर थडग्यांच, कबरींच, समाध्यांच आणि स्मारकांच शहर आहे. अमर्याद सत्तेची किंमत मोजावी लागते, काळाच्या पडद्याआड गेलं की सगळेच अनामिक होऊन जातात याची आठवण हे शहर करून देतं. जीवनाच्या क्षणभंगुरतेची इतकी तीव्र जाणीव अशी जागोजागी क्वचितच एखाद्या शहराने जपली असेल. मला दिल्लीची ही तात्त्विक बैठक आजवर कधी लक्षात आली नव्हती. ती आता अधिक खोलात जाऊन समजाऊन घेणे हाच माझा पुढच्या काही महिन्यांतला कार्यक्रम असेल!

Saturday, October 9, 2010

४७. खैरखेडीतील अंधार

कामानिमित्त मी बराच प्रवास करते. ज्या गावाचे नाव कधी ऐकलेही नव्हते, अशा गावांतही जाते. तिथल्या लोकांशी बोलते. भूगोलाच्या पुस्तकाने मनावर पक्क्या ठसवलेल्या सीमारेषा या प्रवासात नकळत अदृश्य होत जातात. गाव, तालुका, जिल्हा, राज्य इतकेच नव्हे तर राष्ट्राचीही सीमारेषा आपल्याला माहितीच नसती - तर काय झालं असतं, असा एक विचार मधूनच कधीतरी मनात डोकावतो.


अशा प्रकारच्या कृत्रिम सीमारेषांचा अर्थातच एक फायदाही असतो. आपल्या मनात ’आतले’ आणि ’बाहेरचे’ अशी एक भिंत तयार झालेली असते. ’आत’ल्यांशी आपली सांस्कृतिक वीण घट्ट जुळलेली असते. मात्र त्याचवेळी आपण ’बाहेर’च्यांशी नाते प्रस्थापित करताना साहसाचाही अनुभव घेत असतो. सीमारेषेच्या आतल्या जगावर बाहेरच्या जगाचा सतत परिणाम घडत असतो आणि त्यामुळे आतले जगणे आपल्याही नकळत अधिक प्रगल्भ आणि समृद्ध होत जाते.

पण ज्यांच जगच मुळी मर्यादित परिघात बांधलं गेलं आहे, त्यांच काय होत असेल? त्यांच्या जीवनाला या बंधनाने काही बाधा येत असेल का? जगण्याच्या भौतिक मर्यांदामुळे माणसांची स्वप्नही मर्यादित राहत असतील का? असे अनेक प्रश्न आनंदपुरच्या (हिंदी भाषेप्रमाणे ’पुर’ असचं लिहिते आहे मी!) वाटेवर माझ्या मनात येत होते.

आनंदपुर हे मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यातील गाव. तसं बघायला गेलं तर राजधानी भोपाळपासून ते अवघ्या १२० किलोमीटर अंतरावर आहे. पण स्वत:ची गाडी घेऊन गेलो तरी हे अंतर पार करायला चार साडेचार तास सहज लागतात. (आलिकडे परिस्थिती थोडी सुधरली आहे म्हणा!) खड्डय़ांतून रस्ता शोधायला भरपूर कल्पकता, चिकाटी आणि दूरदृष्टी लागते. इथल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या मनमानी कारभारापुढे पुण्यातली बसबाहतूकही कौतुकास्पद वाटते!

आनंदपुर हे तीनशे घरांच गाव. इथे दहावीपर्यंत शाळा आहे. दूरध्वनी केंद्र आहे. मुख्य म्हणजे परिसरातल्या गावांसाठी हे बाजा्राचं ठिकाण आहे. सोमवार हा आठवडी बाजाराचा दिवस. पण एरवी देखील छोटया मोठया गोष्टींसाठी माणसे (मुख्यत्वे पुरूष) आनंदपुरला येतात. ’बिजली, सडक, पानी’ हे इथले कायमचे त्रासाचे आणि म्हणून चर्चेचे विषय! भारतातलं एक प्रातिनिधिक खेडं!

पुढे पाच-सहा किलोमीटर अंतरावर आतल्या भागात गेलं की मात्र आनंदपुर म्हणजे स्वर्ग वाटायला लागतो. हेही भारताचं प्रातिनिधिक चित्र! त्या दिवशी आम्ही खैरखेडीची वाट पकडली, तेव्हा सर्वात आधी सामोरी आली ती लाल धूळ. आणि त्यानंतर आम्हा पाहुण्यांना ’पाहायला’ आलेला बालचमू!

ममता ही त्या गावातली एक चुणचुणीत मुलगी. आठवीनंतर इतर मुलींची सोबत नसल्याने तिची शाळा सुटली. पण इथे बायकांचे बचत गट स्थापन करण्यात आणि ते चालवण्यात ती पुढाकार घेते. सायकल चालवता येणारी गावातली ही एकमेव मुलगी! स्त्रियाच्या गटांच्या बैठका झाल्यावर ममताचे माझ्याकडे आणखी एक काम आहे. ते म्हणजे मुलींची बैठक घेण्याचे.

ममताने येथे ’किशोरी गट’ स्थापन केला आहे. ममताने बोलवून आणल्यानंतर किशोरी गटाच्या सात मुली मान खाली घालून माझ्यासमोर येऊन बसल्या. नजरेच्या खाणाखुणांनी त्यांचा आपापसांत संवाद चालू होता. पण माझ्याशी मात्र त्या बोलायला तयार नव्हत्या. माझ्यासारख्या बाहेरच्या जगातल्या व्यक्तीशी बोलण्याचा हा त्यांच्या आयुष्यातला बहुधा पहिलाच प्रसंग होता.

ममताने त्यांना माझी ओळख करून दिली. मी पुण्याहून आले आहे, काय काम करते वगैरे सांगितलं. त्या सातही जणी माझी नजर चुकवत नुसत्याच हसत होत्या. पूल सांधावेत असं जणू आमच्यात काहीच नव्हत...मला ते एक मोठं आव्हान वाटल!

गप्पांना सुरूवात व्हायला थोडा वेळ गेला खरा पण हळूहळू त्यांच्या परिस्थितीचे एक एक पदर उलगडू लागले. त्या सात जणींपैकी पाच जणी कधीच शाळेत गेलेल्या नव्हत्या. उरलेल्या दोघी तिसरी चौथीपर्यंत शिकून थांबल्या होत्या आणि आता अक्षरओळखही विसरल्या होत्या. गावात चौथीपर्यंतच शाळा आहे त्यामुळे मुली फार फार तर तिथवरच शिकतात. नंतर धाकटया भावंडांना सांभाळायला त्या घरात हव्या असतातच.

’तुम्ही दिवसभर काय करता?’ या माझ्या प्रश्नावर ’कुछ नही’ हे एकमुखी उत्तर आलं. मी खोदून खोदून विचारल्यावर त्यांना जरा मजा वाटायला लागली आणि त्या खुलल्या, बोलायला लागल्या. दहा बारा वर्षांच्या या कोवळ्या मुली घर झाडण्यापासून ते जनावरांसाठी चारा आणण्यापर्यंत आणि लहान भावंडांना सांभाळण्यापासून ते विहिरीवरून पाणी आणण्यापर्यंत सर्व कामं करतात. या कामांत त्यांचे दिवसाला सहा ते आठ तास सहज जातात.

त्या सातपैकी दोन मुलींचं लग्न झालं होतं! त्यांना लग्नाचा अर्थ तरी समजला होता की नाही देव जाणे! त्या अजून ’पुरेशा मोठया झालेल्या नाहीत’ (हे त्यांचेच शब्द!) म्हणून सध्या त्या आई-वडिलांकडे राहत होत्या. इतर मुलींची स्वप्नही ’लग्न करून नवरा मिळवणे’ याचे सीमेवर रेंगाळताना दिसली.

या मुली आजपर्यंत गाव सोडून कोठवर जाऊन आल्या आहेत, याची चौकशी केली आणि आश्चर्याचा आणखी एक धक्का बसला. अवघ्या पाच किलोमीटर अंतरावरच्या आनंदपुरलाही त्यातल्या दोघी कधीच गेल्या नव्हत्या. जास्तीत जास्त दूर जाऊन आलेली होती ती रमा. पंचवीस किलोमीटरवर असलेल्या सिरोंजला ती एकदा जाऊन आली होती. तिचा अपवाद वगळता कोणतीही मुलगी बसमध्ये बसलेली नव्हती. इतर चौघी त्या मानाने भाग्यवान म्हणायच्या - त्यांनी बस निदान पाहिली तरी होती. दोन मुलींनी तर बस पाहिलीही नव्हती. तीन मुलींना आगगाडीच चित्र पाहिल्याचं आठवतं होतं. पण अर्थातच आगगाडीत त्या कोणीही बसलेल्या नव्हत्या. बाप- चुलता - मामा - भाऊ यांच्या सायकलवर कधीतरी लहान असताना त्या बसल्या होत्या. पण सायकला चालवणं ही गोष्ट त्यांना अशक्यप्राय वाटत होती. सायकल चालवल्याबद्दल गावातले लोक काय म्हणतात ते ममता चिडून सांगत होती तर या सगळ्या त्यावर मस्त हसत होत्या.

त्यांनी कोणीच टीव्ही पाहिलेला नव्हता. गावात एक दोन लोकांकडेच रेडिओ आहे. पण त्यावर आवर्जून काही ऐकायचं असतं हे या मुलींना माहितीही नाही. चित्रांचं, गोष्टींचं पुस्तक त्यांच्या कल्पनाशक्तीपलिकडे आहे. आणि त्यांचे खॆळ? त्याबद्दल त्यांना काहीही सांगता आलं नाही. कृष्ण मात्र त्यांना चांगलाच माहिती आहे. हा कृष्ण नावाचा देव सगळीकडे असा ऐसपैस विराजमान असतो.. मौखिक परंपरेबद्दल अशा वेळी आदर वाटतोच.

परिस्थितीने पाश आवळलेल्या या मुलींना भविष्याची काहीही स्वप्नं नाहीत. वर्तमानाच्या मर्यादेची जाण नाही आणि त्यामुळे त्यात काही बदल घडवून आणण्याची ऊर्मीही नाही. आला दिवस जातो, हे त्यांच्या अनुभवांच्या इवल्याशा गाठोडयामुळे त्यांना पुरेसे उमगले आहे. पण या दिवसाला, आणि पर्यायाने जगण्याला आपण काही आकार देऊ शकतो, याची त्यांना जाणीवच नाही. दोष त्यांचा नाही आणि परिस्थितीने गांजलेल्या त्यांच्या आई वडिलांचाही नाही.

या मुली अशाच मोठया होणार. एक दिवस लग्न करून घर चालवायची, पोराबाळांना वाढवायची जबाबदारी घेणार. यांच्या आयुष्यात करमणूक, विश्रांती, ध्येय, वेगळया वाटा, मनस्वीपणा .. असले शब्द असतील? की कधीच असणार नाहीत?

यांना त्यांच्या पंचक्रोशीचीही माहिती नाही. यांच राज्य कोणत? यांचा देश कोणता? यांच जग कोणत? यांना आणि मला जोडणारा धागा तरी कोणता?

यांच्या आईच आणि आजीचही आयुष्य असच असणारं! त्यांच्या आयुष्यात फक्त दु:ख आणि वेदनाच असतील असं मी नाही म्हणणार. मात्र सुखाच्या, आनंदाच्या कल्पना पारंपरिक किती आणि ’स्व’च्या जाणीवेतून आलेल्या किती? माझ्या मनात प्रश्नांची मालिका सुरू होती.

समीरने मला वेळ झाल्याची खूण केली. माझं घडयाळाकडं लक्ष गेलं. गेलं वर्षभर माझ घडयाळ अधूनमधून चक्क उलटं चालतयं. पण त्यामुळे माझ फारसं काही बिघडत नाही. एक तर शहरात ज्याच्या त्याच्या हातात घडयाळ असतं - त्यामुळे कोणालाही वेळ विचारता येते. दुसरं म्हणजे थोड ठाकठीक केलं की माझ घडयाळ नीट चालायला लागतं. आणि मुख्य म्हणजे घडयाळाच्या तालावर न नाचण्याची चैन मला करता येते.

पण इकडे पाहावे तर यांचे दिवस आणि वर्षं गोठून गेली आहेत. सगळयांची जर हीच परिस्थिती असेल, तर कोणी कोणाला हात धरून पुढे न्यायचे? यांना ’आतले’ आणि ’बाहेरचे’ जग हा संघर्ष नाही - कारण यांच्यासाठी दुसरे जगच अस्तित्त्वात नाही. यांना बाहेरचे’ जग दाखवायला हवे. परिस्थितीने यांच्याभोवती बांधलेल्या भिंती तोडायला हव्यात. निदान बाहेरचा वारा येईल इतकी तरी फट निर्माण करायला हवी. त्याने काही जुने बुरूज ढासळले, तर त्याची अपरिहार्यता समजून घ्यायला हवी.

मला कृत्रिम सीमारेषा माहिती होत्या. दिवसेंदिवस त्या पुसट होत जाऊन माझ्यासाठी जग ’एक’ होत आहे याचे मला अप्रूप वाटते. मात्र इकडे यांचे जग फक्त एक वाटावे इतके बंदिस्त आहे. यांच्यासाठी बाहेरचे, दुसरे जग ही गरज आहे. सामाजिक वास्तवाच्या या घट्ट भिंतीतून पलीकडे पोचण्यासाठी अथक प्रयत्न करणे, बाहेरच्या जगाला सामोरे जाणे – हा यांच्यासाठी एकाच वेळी वेदनेचा आणि सृजनाचा अनुभव असेल. पण तो त्यांना कधी घेता येईल का?

(टीप: हा अनुभव २००३– ०४ मधला. आशा आहे की आता तिथले चित्र बदलले असेल!)

पूर्वप्रसिद्धी: लोकसत्ता: २९ मे २००४