एप्रिल महिन्यातल्या भर दुपारी एक वाजता जेव्हा समोरचा तो उजाड रस्ता मला दिसला तेव्हा मला क्षणभर माझ्या निर्णयाचा पश्चाताप झाला. या गावात काम सुरु करायचं का नाही यावर आमची भली मोठी चर्चा झाली होती. मुख्य रस्त्यापासून पाच किलोमीटर अंतरावरच हे एक छोट गाव – जेमतेम शंभर घर असतील नसतील! त्यात बरेचजण वस्तीवर – म्हणजे त्यांच्या शेतात – राहायचे आणि सुगीनंतरच गावात यायचे. पाच किलोमीटर डांबरी सडक होती – पण त्यावरून सकाळी एक आणि संध्याकाळी एक अशा महामंडळाच्या फक्त दोन बस यायच्या.
गावातली काही पोर दहा किलोमीटर दूर असणा-या ‘सूत गिरणीत’ कामाला होती. त्यातल्या एका दोघांकडे मोटारसायकल होती. पण बरेचजण सायकलवरून जायचे यायचे – एका सायकलवर तीन तीन जण! काही मुख्य रस्त्यापर्यंत येऊन गिरणीकडे जाणारी बस पकडायचे. गावात प्राथमिक शाळा होती. पाचवीच्या पुढची मुल मुली पाच किलोमीटर चालत यायचे शाळेत – पाउस असो, थंडी असो वा उन्ह असो!
गाव तसं गरीबच म्हणायला हव! शेतकरीच होते सगळे. त्यांची शेती पावसाच्या कृपेवर अवलंबून. त्यामुळे सहा महिने बाप्ये बाया रस्ता तुडवत कामावर जायचे. जनावर होती घरात अनेकांच्या. पण दुधदुभत विकून पैसा कमावण्याकडे त्यांचा स्वाभाविक कल होता. शांत होते गावातले लोक. बाजारच्या दिवशी तालुक्याच्या गावातून काही जण दारू पिऊन यायचे – पण तो त्रास आठवड्यातून एकदाच असायचा!
या परिसरातल्या दहा गावांत आम्ही काम करत होतो. पुण्यातून येऊन दर महिन्यातला एक आठवडा मी या परिसरात असे. या गावात पोचायच तर पाच किलोमीटर चालत येण्याशिवाय पर्याय नव्हता. संध्याकाळी पुढच्या गावात जायला शेवटची बस असायची किंवा गावातून दुधाचे कॅन नेणारी गाडी – तिथल्या भाषेत ‘कॅन्डची’ गाडी - हमखास यायची. आणि तीही नाहीच आली तर कोणीतरी तरुण मोटरसायकलवरून मला सोडायचा. संध्याकाळी गावातून परत येण्याचा फार मोठा प्रश्न नव्हता – एक सोडून तीन पर्याय होते. पण दुपारी गावात पोचताना मात्र पायी चालणे ही एकच पर्याय होता.
म्हणून माझ्या टीमच मत होत की या गावात सध्या काम सुरु करू नये. पण मला वाटलं की जिथं माणस रोज चालतात तिथ महिन्यातून एक वेळ चालायला आपल्याला काय हरकत आहे? या गावात नियमित मी येणार होते, चालाव मला लागणार होत, त्रास काय व्हायचा तो मला झाला असता .. अशा माझ्या युक्तिवादापुढ (खर तर हटटापुढ!) इतरांनी शरणागती पत्करली आणि मी या गावात चालत यायला लागले – त्याला आता एक वर्ष होत आलं होत!
सुरुवातीचे दिवस मस्त गेले. बहुतेक वेळा त्या रस्त्यावर मी एकटीच असायचे .. रस्त्याच्या कडेची झाड शांत उभी असायची. त्यांची पानगळ, नवी पालवी, पावसाच्या शिडकाव्याने न्हाऊन निघणारी झाड .. हे सगळ चक्र जवळून पाहायला मिळाल. आकाशाच्या निळ्या रंगाच्या वेगवेगळ्या छटा मी त्या वर्षभरात पाहिल्या. शेतात पीक असण्याच्या काळात माणस काम करताना दिसायची – मला बघून थांबायची. सुरुवातीला ‘कुणाची पाहुणी बाई तू?’ अस विचारणारे लोक मला पाहिल्यावर आता ‘आज बायांची मीटिंग’ अस आधी एकमेकाना आणि मग मला म्हणायला लागले. दिवाळी संपली की शेळ्या चारणारी बारकी पोर पोरी आणि म्हातारी माणस दिसायला लागली. त्यातल कोणी मग थांबून गप्पा मारायचे – म्हणजे ते एका जागी थांबलेलेच असत – मीच दोन मिनिट थांबायचे त्याच्याशी बोलायला.
पाउस आणि थंडी या भागात जेमतेमच. उन्हाचा तडाका जोरदार असायचा – पण माझी त्याबद्दल काही तक्रार नव्हती. त्या काळात माझ्या आयुष्यात माणसांची फार जास्त गर्दी होती; त्यामुळे मला तासाभराचा तो एकटेपणा आवडायचा. पाच किलोमीटर चालायला मला पन्नास एक मिनिट लागायची. आधी सुरुवातीला रस्त्याच्या उजव्या बाजूला दिसणार एक झाड त्याच्या जवळून जाताना मात्र रस्त्याच्या डाव्या बाजूला असायचं – तो वळणारा रस्ता नेहमी गंमतीदार वाटायचा मला! दूरवरून पाण्याची टाकी दिसली की गाव आता पाच दहा मिनिटांवर राहिल असा दिलासा मिळायचा.
गावात पोचले की ठरलेल्या घरी ‘बायांची मीटिंग’ असायची. त्या घराच्या अंगणात पिंपळाच छान झाड होत. बाया गोळा होईपर्यंत मी निवांत त्या झाडाकडे पहात बसायचे. मला पाहून पोरासोरांना पळवायच्या बाया एकमेकीना हाका मारायला, निरोप द्यायला. कोणी भांडी घासत असायच, कोणी शेतातून नुकतच येऊन भाकरी खात असायचं, कोणी गप्पा मारत असायचं, कोणी मीटिंग आहे हे विसरून शेतात गेलेल असायच .. वीस बायांच्या तीस त-हा होत्या अस म्हणल तर अतिशयोक्ती होणार नाही.
एखादी नवी गोष्ट जेव्हा मी करते तेव्हा कितीही त्रासदायक असली तरी किमान वर्षभर ती करून पाहायची, त्याच्या आत ती बंद करायची नाही असा माझा प्रयत्न असतो. आता वर्षच का? पाच वर्ष का नाहीत? एक तर वर्षभराचा काळ म्हणजे एक पुरेशी संधी असते, हा काळ शिकण्यासाठी पुरतो आणि आपल्या चिकाटीचा आणि सहनशक्तीचा पुरेसा कस वर्षभरात लागतो. आपण पुरेसा वेळ दिला नाही अशी अपराधी भावना मग रहात नाही मनात! या काळात जे रुजत - ते रुजत आणि वाढत; आणि त्याच्यासह जगता येत आनंदान! जे वर्षभरात रुजत नाही, ते नाही आपल्याला जमत करायला; ते आपल्यासाठी नाही - हे मान्य करून पुढे जाव लागत. आणि वर्षभरात आलेल्या वैतागान दूर होण्याची प्रक्रिया सोपी होते!
आता या गावात वर्ष होत आल होत मला ...आणि कामाच गणित काही नीट बसलेल नव्हत हे मला सांगायला कोणा तज्ज्ञाची गरज नव्हती! तशी अडचण काही नव्हती – लोक चांगले होते, मला मदत करायचे, माझ्याशी चांगल वागायचे. बायांचा स्वयंसहायता गट तसा व्यवस्थित चालला होता – म्हणजे बचत होत होती वेळेत, कर्ज घेतल जात होत आणि वेळेत परतही केल जात होत; गटात भांडण वगैरे काही नव्हती! पण सगळ ‘ठीकठाक’ या सदरात मोडेल असच होत! विशेष काही घडत नव्हत!
साधी वेळेवर मिटींगला किंवा कार्यक्रमाला येण्याची गोष्ट घेतली तरी प्रश्न होता. मी पाच किलोमीटरची रपेट करून पोचायचे तर कोणीच जागेवर नसायचं. मी आल्यावर गोळा व्हायचे लोक – मिटींगला किंवा कार्यक्रमाला! गावातल्या लोकांच्या हातात घडयाळ नसत हे मला माहिती आहे – त्यामुळे पाच दहा मिनिटांचा उशीर ठीक आहे. पण अनेक लोक पूर्ण विसरून गेलेले असत त्या दिवशीच्या कार्यक्रमाबद्दल! मला कधीच उशीर झाला नव्हता आजवर! मी पोचायच्या आधी लोक पोचले आहेत अस एकदाही घडल नव्हत! सगळ काम आपल्यावर अवलंबून असण्यान आपला अहंकार सुखावतो हे खर – पण मी तोवर पुरेस अनुभवलं होत! या त-हेने हे काम टिकणार नाही आणि वाढणार नाही हे मला माहिती होत! मी काही या गावाला जन्मभर पुरणार नव्हते – त्यांच्यापैकी काहीनी पुढाकार घ्यायला हवा होता, जबाबदारी घ्यायला हवी होती. एकदा ते आले की खूप काम करत – मला काही करावं लागत नसे – पण ते कधीच ठरलेल्या वेळी नसत जागेवर ही अडचण होती! त्या सगळ्या लोकांना कार्यक्रमाशी बांधून ठेवणारा धागा मी होते आणि त्याच मला ओझ व्हायला लागल होत!
या गावात येण्याची वेळ बदलून पाहली होती, दिवस बदलून पाहिला होता, कार्यक्रमांचे स्वरूप बदलून पाहिलं होत .. आमच्या भाषेत बोलायचं तर वेगवेगळ्या strategies वापरून झाल्या होत्या! ‘माणूस बदलण्याची – म्हणजे कार्यकर्ता बदलण्याची’ एक पद्धत असते अशा वेळी – पण इतक चालत यायला दुसर कोणी तयार नव्हत! शिवाय मी त्यावेळी त्या संस्थेची एकमेव ‘पूर्ण वेळ कार्यकर्ती’ होते – मी सोडून बाकी सगळे घरदार सांभाळून काम करत होते. शिवाय या गावात काम चांगल चालल असत तर कुणीही दुसर हसत आलं असत ते पुढे करायला – पण अपयशाच ओझ कुणालाच नको असत. मलाही माझ अपयश दुस-यांच्या ओंजळीत ते तयार नसताना टाकायचं नव्हत. त्यामुळे याचा शेवट आपणच करायला हवा असा मी निश्चय केला होता. अर्थात तो एकदम करून चालणार नव्हत – काम बंद करण्याचीही एक पद्धत असते हे मला माहती होत!
आज मी याच गावात मुक्काम करणार होते. दुपारची बायांची मीटिंग झाली की रात्री गावक-याबरोबर आणखी एक मीटिंग होती – ज्यात स्त्रिया, पुरुष असणार होते. ग्रामसेवक, सरपंच, शिक्षक, अंगणवाडीच्या ताई अशीही मंडळी असणार होती. काम सुरु करताना जसं सगळ्याना विश्वासात घ्यायचं तसच काम बंद करतानाही घ्यायला हव! माझ्या मागे त्यांच्यात उगीच गैरसमज नको होते मला! आज हे सगळ करायचं होत – त्यांना नाउमेद न करता, त्यांना धक्का न देता, त्यांना पुरेसा वेळ देऊन – ही कसोटीच होती माझी! या रस्त्यावरून आता फार कमी वेळा आपण चालणार आहोत हे लक्षात येऊन मी काहीशी भावूक झाले होते.
रात्रीची मीटिंग जोरदार दिसत होती – आख्ख गाव जमा झालं होत! आजचा ‘माझा’ विषय काय होता ते त्याना कुणालाच माहीत नव्हत! नेहेमीप्रमाणे मागच्या तीन महिन्यांच्या कामाचा आढावा घेऊन झाला आणि सगळेजण कुतुहलाने माझ्याकडे पहायला लागले. मी सगळ्यांचे वर्षभराच्या त्यांच्या मदतीबद्दल आभार मानले आणि अजून साधारण सहा एक महिन्यांनी मी काही तुमच्या गावात नियमित येऊ शकणार नाही अस सांगितलं! सगळे एकदम शांत झाले. वातावरणातला ताण हलका व्हावा म्हणून मी पुस्ती जोडली – ‘अधूनमधून कधीतरी येईन मी, पण दर महिन्यात काही जमणार नाही; आणखी नव्या गावांमध्ये काम सुरु केले आहे; तिकड जावं लागणार आता. पण तुमची आठवण आली की मी येईन तुम्हाला भेटायला!’ तरीही शांतताच. सगळे मान खाली घालून बसले होते. आपला या गावातल काम बंद करण्याचा निर्णय भयंकर चुकलेला आहे अस मला तोवर (नेहमीसारखच!) वाटायला लागल होत!
मी पुढे बोलत राहिले. ‘पण काम तर पुढे चालू राहायला हव. कोण काय काय जबाबदा-या घेणार, कशी व्यवस्था ठेवायची कामाची ते ठरवू आता आपण. मागच्या अनुभवावरून काही बदल करायचे असतील तर करू’ या माझ्या वाक्यावर पण कोणी काही बोललं नाही. सगळे एकमेकांची आणि माझी नजर चुकवत होते. अनेकांच्या चेह-यावर प्रश्नचिन्ह होत; अनेकजण गोंधळले होते; अनेकांना मी काय बोलले त्याचा अर्थच कळला नव्हता. “तुम्ही आमच्यावर रागावलात का? आमच काही चुकल का?” कोणीतरी विचारल. मला त्या रस्त्यावर गाडी जाऊ द्यायची नव्हती. मग घाईघाईने आम्ही एकेका उपक्रमाची सविस्तर चर्चा केली. प्रत्येक उपक्रमासाठी एक छोटी समिती सर्वानुमते नेमली. दर तीन महिन्यांनी आढावा बैठकीला मी आलच पाहिजे अस त्यांनी मला ठासून सांगितलं आणि मी ते मान्यही केल!
योगायोग असा झाला की पुढचा महिना काही कारणाने मला त्या भागात जायला जमल नाही. तेव्हा फोनच काही प्रस्थ नव्हत – त्यामुळे गावक-यांना मी पत्र पाठवून कळवली होती अडचण. ‘तुम्ही काळजी करू नका, ठरल्याप्रमाणे सगळ व्यवस्थित चाललय. मात्र तुमच काम संपल की नक्की चक्कर टाका – दोन दिवस राहायलाच या’ अस मला त्यांच उत्तरही आलं. मला हा सकारात्मक प्रतिसाद अपेक्षित नव्हता. त्यामुळे मला बर वाटलं. काय रहस्य आहे ते जाणून घ्यायचं कुतुहलही वाटल!
दोन महिन्यांनी मी गावात गेले आणि मला चमत्कारच पाहायला मिळाला. बायांच्या स्वयंसहायता गटाच्या बैठकीला सगळ्या बाया वेळेवर हजर होत्या – एकही उशीरा आली नाही. हा एक अनुभवच होता नवा! मुलांचा वर्ग, युवकांच अभ्यास मंडळ, रात्रीची गावसभा .... सगळ वेळेत पार पडल. एका महिन्यात नेमका काय चमत्कार घडला आहे हे मला समजेना. वर्षभर मी धडपड करूनही हे सगळे कधी वेळेत येत नसत, विसरून जात असत – मग नेमक मागच्या महिन्यात काय घडल? माझी कामाची पध्दत चुकत होती का? लोक मला घाबरत होते का? काही लोकाना मी आवडत नसेन म्हणून ते यायचं टाळत होते का? – माझ्या मनात प्रश्नांमागून प्रश्न होते. या गावातल काम बंद कराव लागणार नाही याचा आनंद होता. सर्व उपक्रम समित्यांनी चांगल काम केल होत दोन महिन्यांत – खर्चाची नोंद पण व्यवस्थित ठेवली होती. गावात एक प्रकारचा उत्साह दिसत होता. मला बर वाटलं!
गावसभा संपताना पुढची सभा कधी ते साधारण ठरत असे नेहमीच. आजही ते ठरत होते. ते ऐकताना मला काहीतरी वेगळ जाणवलं. मला लक्षात आलं, की दुपारपासूनच हा वेगळा शब्दप्रयोग मी ऐकते आहे – त्याचा अर्थ तोवर मला लक्षात आला नव्हता – पण तो आता येऊ लागला. आजवर मी पुढची मीटिंग ठरवताना बोलायचे ती तारीख असायची – म्हणजे पाच तारीख, किंवा सात तारीख. आता जो तरुण बोलत होता तो तारखेच्या भाषेत बोलत नव्हता – किंबहुना गावातले कोणीच आज तारखेच्या भाषेत बोलत नव्हते. ‘पहिल्या एकादशीच्या दुस-या दिवशी बायांची मीटिंग’; ‘पौर्णिमेच्या दुस-या दिवशी गावसभा’, ‘चतुर्थीच्या आदल्या दिवशी युवक मंडळाची बैठक’ ही भाषा मी दुपारपासून ऐकत होते.
माझ्या डोक्यात एकदम उजेड पडला. गावातले लोक घडयाळ वापरत नाहीत तसच कॅलेंडरही वापरत नाहीत – किंवा वेगळ्या उद्देशाने ते कॅलेंडर वापरतात हे तोवर माझ्या लक्षातचं आल नव्हत! एकादशी, चतुर्थी, अमावास्या, पौर्णिमा कधी असतात हे मला सांगताही येणार नाही – पण गावाच आयुष्य त्याभोवती केंद्रित होत. त्यांनी ती भाषा कळत होती – पाच तारीख, सात तारीख ही भाषा त्यांची नव्हती. पहिला सोमवार किंवा दुसरा बुधवार; हनुमान जयंती किंवा रामनवमी ही भाषाही त्यांना सोयीची होती – पण ती भाषा आहे हेच तोवर मला कळत नव्हत! लोक कार्यक्रमाची ‘तारीख’ विसरून जायचे कारण तारीख त्यांच्यासाठी महत्त्वाची नव्हतीच तोवर कधी!
जेव्हा लोकांच्या 'भाषेत' लोकांचे निर्णय व्हायला लागले, तेव्हा त्यांचा सहभाग वाढला. जोवर माझी शहरी भाषा (आणि त्याच्या अनुषंगाने येणा-या शहरी संकल्पना) मी वापरत होते तोवर त्यांच्या सहभागात अडचणी होत्या. मी हे कधी नीट समजूनच घेतलं नव्हत. लोकांच्या भाषेत निर्णय व्हायचे तर सूत्र लोकांकडेच असली पाहिजेत ख-या अर्थाने – मी करत होते तशी नावापुरती नाही!
“त्रैमासिक आढावा बैठक कधी घेऊयात? तुम्हाला कसे सोयीचे आहे?” मला कोणीतरी विचारल.
मी मनातल्या मनात विचार केला आणि म्हटल, “ नागपंचमीच्या दुस-या दिवशी चालेल का तुम्हाला?”
त्यावर क्षणभर अविश्वासाने त्यांनी माझ्याकडे पाहिलं. मी त्यांची थट्टा तर करत नाही ना याची त्यांनी खातरजमा केली. आणि मग सगळे जे काही खुशीत हसले – ते मला अजून आठवत! आणि ते आठवून मी स्वत:शीच हसते!
मला एक नवीनच सूत्र गवसल त्यादिवशी!