ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Monday, October 13, 2014

२१२. मोझाम्बिकची निवडणूक : २


5 सप्टेंबर रोजी झालेल्या 'शांती करारा'बद्दल लिहायचं होतं खरं; पण काही कारणांनी ते जमलं नाही. आता त्याबद्दल लिहायचं तर बराच उशिर झालाय. आता निवडणूक झाल्यावर त्याबद्दल कदाचित लिहिता येईल - म्हणजे या कराराचा निवडणुकीवर नेमका काय परिणाम झाला हा माझ्यासाठी एक महत्त्वाचा मुद्दा आहे; आणि दुसरं म्हणजे निवडणूक झाल्यावर हा 'शांती करार' टिकेल की पुन्हा एका नव्या संघर्षाची सुरुवात होईल ते पाहायला हवं.

मी आधीच्या लेखात लिहिल्यानुसार इथं लोक 'पक्षाला' किती मतं मिळतात ते महत्त्वाचं आहे. रेडीओ आणि टेलीविजनवर विविध पक्षांचा प्रचार ऐकू येतो आणि दिसतो. त्यावरून निदान सरकारी प्रसारमाध्यमांत तरी सर्व पक्षांना समान वागणूक आहे असं दिसतं. 

प्रत्येक पक्षाचं एक प्रचारगीत आहे असं लक्षात आलं. एकूण हा देश संगीत आणि नृत्याचा आहे. साधं रस्त्यावर 'मतदान करा' हा प्रचार करणारी मंडळी (ज्यात स्त्रिया आणि पुरुष दोन्ही असतात) नाचत आणि गात नागरिकाना मतदानाचं आवाहन करत असतात. आपल्याकडे चित्रपटातल्या गाण्यांचा वापर होतो - इथं सगळं "जिवंत" असतं, नक्कल वा उसनवारी नाही.

भिंतीवरचं पोस्टरयुद्ध आपल्याकडची आठवण करून देणारं आहे.




इथं फ्रेलिमो आणि एमडीएम पक्षांची पोस्टर्स दिसताहेत. त्यांच्या संख्येत बराच फरक आहे.

गावांत-शहरांत अनेक पोस्टर्स आणि बॅनर्स दिसतात. फ्रेलिमो (इथला उच्चार फ्रेलीमू s) हा सत्ताधारी पक्ष असल्याने त्यांचा प्रचार भपकेबाज असतो. म्हणजे गर्दी भरपूर असते आणि मोटरसायकल आणि चारचाकी त्यांच्या प्रचारात मोठ्या संख्येने सामील असतात. मोटरसायकलस्वार पक्षाचा ध्वज गाडीवर लावून इकडेतिकडे भटकत असतात. सगळ्यांच्या अंगावर फ्रेलिमोचे लाल टीशर्ट असतात. साधारण मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय लोक फ्रेलिमोच्या प्रचारात जास्त दिसतात असं माझं मत झालं आहे. शिवाय खेडेगावांत तर फ्रेलिमोविना अन्य कुणाच्या जाहिरातीही दिसत नाहीत.

त्यामानाने रेनामो आणि एमडीएम यांच्या प्रचारफे-यांत गरीब लोकांची संख्या मला जास्त दिसली.

रेनामोची प्रचारफेरी 

मानिका प्रोविन्समधल्या चिमोयो शहरात एका संध्याकाळी मुख्य रस्ता बंद होता आणि अनेक पोलीस रस्त्यावर होते. तेव्हा मुकाट रस्ता बदलून आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी पोचलो. इथं दिवस लवकर उगवतो आणि सध्या उन्हाळा असतानाही दिवस साडेपाचला मावळतोही. साधारण सातच्या सुमारास रस्त्यावर बराच कोलाहल ऐकू आला. आधी वाटलं दंगल वगैरे आहे की काय, पण शेकडो लोक नाचत-गात चालले होते. थेट रस्त्यावर न जाता लांबून खिडकीतून मी पाहत होते. आणि अचानक मला एका वाहनात उभे असलेले रेनामो प्रमुख दकामा दिसले. तो एक अविस्मरणीय अनुभव होता. 

दकामा यांना (म्हणजे  रेनामोला) 2009 च्या निवडणुकीत फक्त 17,68 टक्के मतं मिळाली होती. गेली दोन-तीन वर्ष दकामा यांनी सरकारविरुद्ध सशस्त्र संघर्ष पुकारला होता आणि ते जंगलात लपून होते. 5 सप्टेंबर रोजी जो शांती करार झाला त्यासाठी दकामा मापुटोला एकटे गेले नाहीत; युरोपीय राष्ट्रांचे प्रतिनिधी सोफाला प्रांतात आले आणि दकामा यांना मापुटोला घेऊन गेले असा ताजा इतिहास आहे. (दकामा यांना काही दगाफटका होऊ नये म्हणून ही दक्षता!) त्यामुळे रेनामोच्या प्रचारफेरीत इतके लोक सामील झालेले पाहून मला नवल वाटलं. पण अर्थात सभेला आणि प्रचारफेरीला येणारे सगळे लोक त्या पक्षाला शेवटी मत देतीलच असं नाही - हा आपल्याकडचाही अनुभव आहेच की! 

जाहीरनामा
या निवडणुकीचे मुद्दे बरेचसे आपल्या निवडणुकीसारखे आहेत असं जाहिराती पाहून आणि प्रचारसभांच्या बातम्या पाहून वाटतं. म्हणजे आर्थिक विकास, रस्ते, पाणी, वीज, उद्योग यासोबत 'शांती' हे जवळजवळ सर्व पक्षांचे प्रमुख मुद्दे आहेत. भ्रष्टाचार इथेही आहे - पण तो निवडणुकीतला मुख्य मुद्दा दिसत नाही.

मी मुद्दाम फ्रेलिमो आणि रेनामो यांचे निवडणूक जाहीरनामे पाहिले - ते पोर्तुगीजमध्ये असल्याने सविस्तर वाचले नाहीत पण मुख्य मुद्दे लक्षात आले. 

फ्रेलिमोचा जाहीरनामा ५८ पानांचा आहे. 13 मे 2005 रोजी Reunião Extraordinária do Comitê Central ने तो संमत केला आहे असा त्यात उल्लेख आहे. राष्ट्राध्यक्ष, National Assembly  आणि Assembléia Provincial या तीनही निवडणुकींसाठी हा एकत्रित जाहीरनामा आहे. हा जाहीरनामा मोझांबिक जनतेच्या आशा-आकांक्षांचे प्रतीबिंब असून आर्थिक आणि सामाजिक प्रगतीस पक्ष कटिबद्ध असल्याचे म्हटले आहे. फ्रेलिमोने मागच्या पाच वर्षांत काय साध्य केले याची नोंद त्यात आहे - त्यात आर्थिक प्रगती, लोकशाही बळकट करणे, दळणवळण सुधारणे, पायाभूत सुविधा, हॉस्पिटल असे उल्लेख आहेत. 'आम्ही ज्या सुधारणा केल्या आहेत त्यांची गती कायम राखण्यासाठी आम्हाला मत द्या' असा जाहीरनाम्याचा एकंदर सूर आहे. मग थोडी नूसी यांची ओळख आहे. सगळे मुद्दे थोडक्यात मांडले आहेत, त्यामुळे जाहीरनामा शब्दबंबाळ वाटत नाही - निदान वाचायला तरी.

या जाहीरनाम्यात मला सगळ्यात आवडलेला मुद्दा म्हणजे 2009 च्या जाहीरनाम्याचा - त्यातले काय पूर्ण झाले, काय प्रक्रियेत आहे, काय बाकी राहिले आहे याचा थोडक्यात आढावा घेतला आहे. आपल्याकडे राजकीय पक्ष असा आढावा घेतात का हे तपासून पाहायला पाहिजे.

2014 ते 2019 या कालावधीत फ्रेलिमोचे प्राधान्यक्रम आहेत: राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही आणि सामाजिक न्याय अधिक बळकट करणे; सामाजिक सुरक्षा; शासनाची कार्यक्षमता वाढवून ते अधिक लोकाभिमुख करणे; प्रशासकीय सुधारणा; आर्थिक सुधारणा आणि गरिबीशी युद्ध (गरीबी हटाव!); सस्टेनेबल डेवलपमेंट (ज्यात सामाजिक विकास अंतर्भूत आहे); शिक्षण (पब्लिक-प्रायवेट पार्टनरशिपच्या माध्यमातून विकास; सर्वांसाठी शिक्षण, शिक्षणाची गुणवत्ता सुधारणे), संस्कृती (यात साहित्य विकास, नवे संपादक नेमणे असे मुद्दे मला विशेष वाटले); विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रास गती देणे असे मुद्दे आहेत.

"स्त्रिया, कुटुंब आणि सोशल अॅक्शन" असा एक वेगळा विभाग जाहीरनाम्यात आहे. यात विवाहविषयक सुधारणा, महिलांचा सामाजिक, राजकीय आणि आर्थिक सहभाग वाढवणे; निर्णयप्रक्रियेत स्त्रियांचा सहभाग; स्त्रियांसाठी अधिक संधी निर्माण करणे असे मुद्दे आहेत. लहान मुला-मुलींवर होणारा हिंसाचार कमी करणे; लहान मुलांचा सशस्त्र सैनिक म्हणून वापर होण्यावर बंदी; अनाथ मुले-मुली, अपंग व्यक्ती यांच्यासाठी विशेष कार्यक्रम; व्यसनमुक्ती; युवकांचा विकास; क्रीडाक्षेत्रातल्या सुधारणा; पिण्याचे पाणी आणि सामाजिक स्वच्छता; निवास (घरबांधणी); गरीबी निर्मूलन, शेती विकास; औद्योगिक विकास, टुरिझम डेवलपमेंट; नैसर्गिक साधनसंपत्तीचा विकास .... असे सगळे मुद्दे आहेत. हा जाहीरनामा वाचताना मला भारत आणि मोझाम्बिक यांच्यात फार साम्य आहे असं उगाच वाटत राहिलं. जाहीरनामा सर्वसमावेशक करण्याचा फ्रेलिमोचा प्रयत्न स्तुत्य असला तरी प्रत्यक्षात या सगळ्या गोष्टी पाच वर्षांत होणं अवघड असतं. पण सत्ताधारी पक्षांचे किंवा प्रस्थापित राजकीय पक्षांचे जाहीरनामे असेच "मोठे" असतात!

रेनामोचा जाहीरनामा तुलनेत छोटा आहे - फक्त 28 पानांचा. यात अपेक्षेप्रमाणे 'अनेक राजकीय पक्ष लोकशाहीला बळ देतात' अशी सुरुवात आहे. (फ्रेलिमोने अन्य राजकीय पक्षांना संपवले आहे असा रेनामोचा आरोप आहे.) संसद, सरकार आणि न्यायव्यवस्था एकमेकांपासून स्वतंत्र असले पाहिजेत (आम्हाला निवडून दिल्यास आम्ही ते करू) असाही एक वेगळा मुद्दा या जाहीरनाम्यात आहे.

रेनामो पाठपुरावा करेल अशी आठ मूल्ये जाहीरनाम्यात आहेत. देशाच्या घटनेची (संविधान हा अर्थ) काळजीपूर्वक सर्वत्र अंमलबजावणी; मानवी हक्क (नागरिकांचा आत्मसन्मान जपणे); अभिव्यक्ती स्वातंत्र्य; राजकीय वैविध्य जपणे; सर्व नागरिकांना समान वागणूक (रेस, इथनिसिटी, धर्म .. यामुळे भेदभाव न करणे, शासनाचे आणि अधिकारांचे विकेंद्रीकरण  असे थोडे 'वेगळे' मुद्दे आहेत.

संसद, सरकार आणि न्यायव्यवस्था यांच्यात काय सुधारणा घडवून आणायच्या याबद्दल जाहीरनाम्यात लिहिले आहे. सरकारचा कारभार पारदर्शक असेल असे म्हटले आहे. तसेच संस्कृतीचे संरक्षण असाही शब्दप्रयोग आहे. सरकारची आणि प्रशासनाची कार्यक्षमता वाढविण्याचा मुद्दा आहे. सोशल कम्युनिकेशनचा वेगळा मुद्दा आहे. न्यायव्यवस्था अधिक सोपी करण्याबाबत जाहीरनामा अभिवचन देतो आहे. पोलीस आणि संरक्षण दल यांना अधिक समर्थ करण्याचाही मुद्दा या जाहीरनाम्यात आहे. हे मुद्दे फक्त मांडले आहेत, त्याचे सविस्तर विवेचन या जाहीरनाम्यात नाही. पण कदाचित रेनामोला जाहीरनामा तयार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नसेल अशी एक शक्यताही लक्षात घ्यायला हवी.

फ्रेलिमोचा आणि रेनामोचा जाहीरनामा सोबत वाचले की एकसंध चित्र समोर येतं. पहिल्या जाहीरनाम्यात प्रत्यक्षात कोणते प्रश्न आहेत आणि ते कसे सोडवायचे याचा ऊहापोह आहे; तर दुस-यात सामाजिक बदलाची एक तात्विक विचारप्रणाली आहे. पहिला जाहीरनामा सत्ताधारी पक्षाचा आहे आणि दुसरा सत्तेत कधीही न आलेल्या पक्षाचा आहे हे लक्षात घेतले की त्यांच्या जाहीरनाम्यांचा सूर असा विशिष्ट का आहे हे लक्षात येते. कोणताही एक जाहीरनामा वाचला तर या देशाचे एकतर्फी चित्र समोर येते. पण दोन्ही वाचले की या देशाने आजवर काय कमावले आहे याचा अंदाज येतो आणि पुढची वाटचाल किती कठीण आहे- याचाही अंदाज येतो.

प्रत्यक्ष मतदानाला आता फक्त तीन दिवस बाकी आहेत. बघू किती मतदान होते आणि काय निकाल लागतो ते!