ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Monday, February 28, 2011

६४ शिक्का

पुणे मुंबई ब-याचदा सलग प्रवास करायचा होता. मग मी रेल्वेचा महिनाभराचा पास काढला. 'सुपरफास्ट'चा दर खिशाला परवडत नसण्याच्या काळात 'दख्खनच्या राणीचा' प्रवास हे एक स्वप्न होत. आधी आरक्षण वगैरे करून प्रवास करण्याची पद्धत विनोदी वाटण्याच्या वयात मी होते तेव्हाची ही गोष्ट आहे. त्यामुळे सगळे प्रवास आटापिटा करून गाडी पकडण्याचे किवा मिळेल ती गाडी पकडण्याचे असत. आता अर्थात मी आरक्षण केल्याविना प्रवास क्वचित करते. आणि मधल्या काळात 'मरे'ने सगळ्याच पुणे -मुंबई गाडया निळ्या रंगात रंगवून टाकल्या आणि दख्खनच्या राणीची शान कमी करून टाकली.

डेक्कन क्वीनने थोर लोक प्रवास करतात हे ऐकून माहिती होत. त्यामुळे त्या गाडीने पहिल्यांदा प्रवास करताना आपल्याला त्यापैकी कोणी भेटेल का, अस कुतुहल मनात होत! माझ्या नियमित प्रवासाच्या तिस-या दिवशी सरोजताई माझ्या शेजारी येऊन बसल्या तेव्हा माझ्यावर एक प्रकारच दडपण आल! त्यांच्यासारख्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्तीला कोण ओळखत नाही?

आठवडाभरात आमची गप्पा मारण्याइतपत ओळख झाली. एकदा तर मला पोचायला थोडा उशीर झाला तर त्यानी माझ्यासाठी जागा पकडून ठेवली होती (मासिक पासच्या डब्यात जागा आरक्षित नसतात - निदान तेव्हा तरी नसायच्या!) वलयांकित मोठ्या माणसांपासून चार पावले दूर राहण्याचा धडा दुर्दैवाने (किंवा सुदैवाने!) मी फार लवकर शिकले होते. त्यामुळे मी आपण होऊन सरोजताईंशी काही बोलायला जायचे नाही. पण त्या फारच साध्या आहेत ... त्यामुळे आमच चांगल जमून गेल!

त्यादिवशी गाडीत सौंदर्यस्पर्धांच्या विरोधात कोणीतरी सह्या गोळा करत होत. मग आपोआपोच त्या विषयावर चर्चा चालू झाली आमची आपापसात. सौंदर्यस्पर्धांच्याद्वारा स्त्रीला 'उपभोग्य वस्तू' म्हणून ठसवले जाते या विचारांशी मी सहमत होते.

माझे मत ऐकून सरोजताई एकदम खूष झाल्या. "वा! मार्क्सवादी दिसते आहेस तू'" - त्या मला एकदम म्हणाल्या. त्या प्रसिद्ध विचारवंत असल्या तरी आठवडाभरात आम्ही एकमेकींशी वैचारिक काही बोललो नव्हतो . त्यांची ही प्रतिक्रिया मला काहीशी अनपेक्षित होती. मी विचार करत म्हणाले, "शोषितांच्या, वंचितांच्या दु;खाची जाणीव मला मार्क्समुळे झाली खरी, पण त्याचे सगळे म्हणणे मला कळले नाही आणि जे काही थोडेफार कळले, त्यातले सगळे पटलेही नाही..."

सरोजताई मार्क्सवादी कार्यकर्त्या आहेत हे मला माहिती होत! पण उगाच समोरच्याला बर वाटाव म्हणून खोट बोलण मला जमत नाही. शिवाय माझा हेतू त्याना दुखावण्याचा नव्हता; तरीही त्या दुखावल्या गेल्याच! "मग काय गांधीवादी आहेस का तू?" अस वरकरणी हसत पण जरास खोचकपणे त्यांनी मला विचारलं. मला त्यांचा खोचकपणा लक्षात आला आणि मी गप्प बसले. पण आता त्या एवढ्यावर समाधानी नव्हत्या. पुन्हा मला त्यांनी तोच प्रश्न विचारला.

क्षणभर बोलाव की नाही असा मला प्रश्न पडला. पण मग मी म्हटल, "गांधीजींच्या काही गोष्टी मला खूप आवडतात - जसे सत्य - पण काही अव्यवहार्य वाटतात - उदाहरणार्थ उपोषण. शिवाय धर्म आणि राजकारण यांच्यात त्यांनी निर्माण केलेला संबंध ..." माझे बोलणे अर्ध्यात तोडत सरोजताई म्हणाल्या, "म्हणजे तू नक्कीच हिंदुत्त्ववादी आहेस..."

आता मला जरा मजा वाटायला लागली होती. मी हसून म्हणाले, " माझे काही अतिशय जवळचे मित्र मैत्रिणी कट्टर हिंदुत्त्ववादी आहेत. वृत्तपत्रांच्या भाषेत बोलायचे तर 'संघ परिवारातले'! पण ते काही मला हिंदुत्त्ववादी समजत नाहीत. म्हणजे मी बहुधा हिंदुत्त्ववादी नसावे - निदान मी असल्याचे प्रमाणपत्र तरी माझ्याकडे नाही!" मी हसत होते ते काही सरोजताईंना आवडले नाही.

त्यानी जरा कुतुहलाने माझ्यावर एक नजर टाकली. मग विषय बदलत त्यानी माझ वय, माझ शिक्षण, माझ काम याविषयी चौकशी केली. मग स्वत:चा नाराजीचा स्वर मला कळेल इतका व्यक्त करत त्या म्हणाल्या, " म्हणजे तुला अजून स्वत:ची ओळख पटलेली नाही तर!" मला जरा आश्चर्य वाटल त्यांच वाक्य ऐकून. कदाचित विचारवंत अशी साधी वाक्य बोलतात हे तोवर मी विसरून गेले होते! 'स्वत:ला ओळखण' ही सगळ्यात अवघड बाब आहे हे त्यांच्यासारख्या विचारवंत बाईंना माहिती असेलच अशी माझी अपेक्षा होती.

सरोजताईंनी पुन्हा एकदा विषय बदलला - पण माझी उलट तपासणी काही सोडली नाही. "तुला काय वाचायला आवडत? " त्यांनी विचारला. मग मधेच प्रश्न बदलत म्हणाल्या, "तुझ्यावर कोणत्या तत्त्वज्ञानाचा प्रभाव आहे?"

आता जरा बरी चर्चा होईल अस मला वाटल. मी त्याना सांगितलं, " प्रभाव नाही म्हणता येणार अगदी, पण आकर्षण आहे अनेक विचारांच मला. तुम्हाला जुनाट वाटेल जरा, पण मला उपनिषद आवडतात. शंकराचार्य आवडतात, गौतम बुद्ध आवडतो. चार्वाकसुद्धा मला बराचसा जवळचा वाटतो. ..."

मला पुढे बोलू न देताच सरोजताई म्हणाल्या, " मग तू मायावादी आहेस? की शून्यवादी? की सुखवादी? ...आत्म्याचे अमरत्व पण मानतेस आणि पुनर्जन्म पण मानत नाहीस अस कस? ...."

मी मनातल्या मनात कपाळावर हात मारून घेतला. माझ्यावर कोणतातरी एक शिक्का मारला की सरोजताईंच काम सोप होणार होत. त्यानुसार त्यांना ठरीव साच्याच्या क्रिया- प्रतिक्रिया करता- देता येणार होत्या!

आपल मन प्रत्येक घटनेला, भावनांना, विचारांना अशा साच्यात बसवायचा प्रयत्न करत. म्हणजे मग अनेक गोष्टींचा आपल्याला दर वेळी नव्याने विचार करावा लागत नाही. कप्पे पाडले असे की, आपल्याला त्यांना नीट सामोर जाता येत. पण असे कप्पे पाडणारे मन मग सवयीने कशाचीच सर्वागीण अनुभूती घेऊ शकत नाही; मनाची ती ताकदच संपून जाते. तुकडे पाडणार मन घेऊन आपण असीम आणि शाश्वत आनंदाची, समाधानाची अपेक्षा करतो यातच मोठा विरोधाभास आहे.

आपल्याला समजलेला माणूस म्हणजेच जणू काही तो माणूस अशी आपली धारणा असते. मग ती व्यक्ती काहीतरी वेगळीच होती कोणे एके काळी, किंवा कोणाबरोबर अस समजल्यावर आपल्याला धक्का बसतो तोही याचं प्रकारच्या पठडीतून. पण माणस म्हणजे सुद्धा एक प्रकारचा kaleidoscope चं असतो .. वेगवेगळ्या कोनातून वेगवेगळी दिसणारी .. समजली आहेत अस वाटता वाटता एकदम अपरिचित रंग उधळणारी ...

पण या अनिश्चिततेत पुष्कळ गम्मत आहे .. शिक्के मारायचे आणि वाचायचे अशी आपली सवय आपण सोडली तर !!

कदाचित 'शिक्के न मारण' हा एक प्रकारचा शिक्काच वापरत आलेय मी आजवर!

Thursday, February 17, 2011

६३. 'नाहीसं करण्याचं' व्रत

जगताना फक्त नव्या गोष्टी निर्माण करणं  पुरेसं नसतं, तर अनेक गोष्टी नाहीशाही करत जाव्या लागतात. जे आज हवं वाटतं, त्याचं उद्या ओझं होतं, किंवा जे आज नको वाटतं, त्याचा उद्या मोह पडतो .. त्यामुळे काय टिकवायचं आणि काय नाहीसं करायचं याचा निर्णय आपल्याला नेहमी करावा लागतो. हे लक्षात आल कागदांची आवराआवर करताना.

साफसफाई घराची असो, की ऑफिसची कागदांची विल्हेवाट हे एक मोठंच काम होऊन बसलंय गेल्या अनेक वर्षांत! मी ज्या ऑफिसात दहा वर्ष काम केलं, ते सोडताना तर हे प्रकर्षाने जाणवलं! म्हणजे मी आपली कित्येक दिवस निष्ठेने, चिकाटीने कागद फाडत बसले होते; पण त्यांचा ढीग काही कमी होत नव्हता. पेपरलेस ऑफिसच्या जमान्यात मी इतके कागद कसे जमा करते याचं माझं मलाच नवल वाटायला लागलं! पण ते काही फार मोठं रहस्य नाही.

माझ्या आधीच्या ऑफिसात ‘संगणक विभाग’ म्हणजे एक मजेदार प्रकरण होतं! संगणकाचं कमीत कमी ज्ञान हीच जणू त्या विभागात काम करण्याची सर्वोच्च पात्रता होती. त्यामुळे Local Area Network (LAN) असल तरी ते नेहमी चालू राहील याची आम्हाला कोणाला खात्री नसायची. म्हणून केलेलं प्रत्येक document संगणकाच्या hard disk वर ठेवायची सवय आम्ही स्वत:ला लावून घेतली होती. आम्ही थोडेसे परंपरावादी आणि बरेचसे कंजूष असल्यामुळे इंटरनेट असलं तरी anti virus प्राचीन काळचा असायचा. त्यामुळे आपण संगणकात साठवलेलं काम टिकणार का याची नेहमी शंका रहायची.

मग निमुटपणे त्या त्या दिवशीच काम Pen Drive वर घ्यायचं! पण Pen Drive तर virus साठीचा खुला दरवाजा. म्हणून मग महत्त्वाचं काम सीडीवर घ्यायचं. आता आपण जे काम करत असतो त्याबाबत बाकी कुणाचं काहीही मत असो, आपल्याला तर ते काम महत्त्वाचं वाटतंच! त्यामुळे दिवसभराचं काम शेवटच्या पंधरा वीस मिनिटात कॉपी करायचं हा एक उद्योग असायचा.

आमच्या ऑफिसात वेगवेगळ्या काळात घेतलेले संगणक होते. त्यामुळे सगळ्या संगणकांना Pen Drive अथवा सीडी जोडायची सोय नव्हती. कार्यक्षेत्रात तर अनेकदा संगणक नसायचे. मग मिळेल त्या सायबर कॅफेत जाऊन काम करावं लागायचं. तिथं Pen Drive अथवा सीडी उघडलंच नाही तर भानगड नको, म्हणून ती सगळी documents स्वत:ला ईमेलने पाठवून द्यायची. Rediff किंवा Gmail कधी कधी उघडलं जात नाही. म्हणूण दूरदृष्टी दाखवत स्वत:ला एकाऐवजी दोन पत्त्यांवर ईमेल पाठवायची. वेळ पडलीच तर मग ईमेलवरून ते document वापरता यायचं.

हे सगळ होऊनही शांतता नसायची. विजेचा लपंडाव सगळीकडे सारखा चालू असतो. त्यामुळे महत्त्वाच्या document चे Printout जवळ ठेवावं लागे. कामानिमित्त मी अनेकदा पुण्याबाहेर असायचे. त्या काळात ऑफिसातला माझा संगणक इतरही कोणी वापरायचं. त्यांच्या उद्योगात एक दोनवेळा माझे काम गायब झालं, ते परत करावं लागलं. त्यावेळपासून ऑफिसातलं सगळं  काम घरच्या संगणकावर मी ठेवायला लागले. रविवारी, सुट्टीच्या दिवशी अनेकदा reports, documents, presentations पूर्ण करावे लागत. काहीवेळा ऑफिसात दिवसच्या दिवस निरर्थक मीटिंगमध्ये जात. मग रात्री घरात काम करणं भाग पडायचं. म्हणून घरच्या संगणकात ऑफिसचं काम भरलेलं असायचं.

आता मागे वळून पाहताना मला हे सगळ विनोदी वाटत! किरकोळच गोष्टी असायच्या खर तर त्या – कोणत्यातरी बैठकीचा वृत्तांत, प्रशिक्षणासाठीचे presentation, त्या वर्षीचे बजेट, प्रकल्पांची रूपरेखा .. हे सगळं त्या काळापुरतं महत्त्वाचं होतं .. आता ते दिवस गेले . पण त्या काळात मी SCP (Save, Copy, Print) या रोगाची शिकार बनले.

पण अर्थात माझ्या टेबलावर येणा-या कागदांना मी (म्हणजे माझा SCP रोग) एकटी सर्वार्थाने जबाबदार नव्हते. मला माझे बरेच सहकारी आणि वरिष्ठ अधिकारी मंडळी वाचण्यासाठी कागद पाठवायचे. Endosulfan ते Microfinance आणि गांधी ते Ecotourism असे कोणतेही विषय माझ्याकडे यायचे. स्वत:ला नको असलेले कागद सभ्यपणे पुढे ढकलायचे असतील तर त्या कागदावर ‘Please, discuss’ किंवा ‘This might be of your interest’ असं लिहायचं असतं हे मला कळेपर्यंत अनेक वर्षे उलटली. मला वाचायला, विचार करायला कोणताच विषय वर्ज्य नाही; त्यामुळे आलेला प्रत्येक कागद मी मनापासून वाचायचे. आमच्या कार्यक्रमात त्यातले काय घेता येईल, काय टाळावे यावे एक टिपण तयार करून संबधित लोकांना पाठवून द्यायचे - असं काम मी अनेक वर्ष केलं..

अनेकदा ज्यांनी माझ्याकडे कागद पाठवला ते त्याबाबत सोयीस्करपणे विसरून जात. चर्चेची आठवण मी करून दिली तरी त्यावर बोलायला त्यांना वेळ नसे - मलाही नसे. आपल्या टेबलावरचा पसारा कमी करायला लोक माझ्याकडे कागद पाठवतात हे लक्षात आल्यावर माझाही चर्चेचा उत्साह कमी झाला. पण तोवर माझ्या टेबलावर, आणखी एका डेस्कवर कागदांचा ढीग साठला होता. अजूनही लोक माझ्याकडे कागद पाठवतात आणि मी तो न वाचता पुढं कुणाला देत नाही. मला वाचायला मिळणारा वेळ आणि माझ्याकडे येणारे कागद यांचं प्रमाण व्यस्त आहे. कामातून (म्हणजे संगणकातून) थोडी उसंत मिळाली की मी कागद वाचते. पण माझ्या टेबलावर ‘अजून वाचायच्या’ कागदांचा गठ्ठा मोठा आहे!

संवादाची साधनं वाढल्याने, तंत्रज्ञान सोपां आणि स्वस्त झाल्याने गुंतागुंत कमी होईल असं वाटत होतं. पण माणसांच्या सवयी बदलणं कठीण! एक संदेश द्यायला वेगवेगळी माध्यमं आहेत – पण माणसं त्या वेगवेगळ्या माध्यमांतून एकच संदेश देतात. आमच्या ऑफिसचे लोक याबाबत जास्तच आटापिटा करायचं. म्हणजे कोणीतरी तुम्हाला ईमेल पाठवणार. ती अर्थातच दोन्ही-तीनही Inbox मध्ये येऊन पडणार. मग ‘तुम्हाला ईमेल पाठवली आहे ती बघा’ असा SMS करणार (आम्ही काही सारखे online नसायचो). काही वेळा मीटिंगमध्ये असू तेव्हा SMS कडे लक्ष देत नाही म्हणून फोन करून तेच सांगणार. आणि याउपरही धोका नको म्हणून ती महत्त्वाची एक दोन पाने fax करणार माहितीचा भडिमार म्हणजे त्याच त्याच माहितीचा भडिमार!

माझा स्वभावही या सगळ्या समस्येत भर टाकतो. कोणताही कागद कच-याच्या टोपलीत फेकायला मी कचरते. अनेकदा आज फाडून टाकलेला कागद नेमका उद्या लागतो हा अनुभव तुम्हालाही असेलच! कागदाचा ढीग समोर घेऊन बसल्यावर त्यातले अनेक कागद ‘अजून लागेल कदाचित् पुन्हा’ असं म्हणून मी एका स्वच्छ कोप-यात ठेवते. पहिल्या फेरीत अनेक कागदांना असे जीवदान मिळते. पाहता पाहता त्या स्वच्छ जागेत जुन्या कागदांचा नव्याने ढीग लागतो.

कागद साठवण्यामागं माझं एक ‘तत्त्व’ही आहे. पाठकोरे कागद वापरून बिनमहत्त्वाचे प्रिंटिंग करायचं असा माझा प्रयत्न असतो. ही पोस्ट मी घरात बसून पाठको-या कागदावर लिहिते आहे – पण हाताने लिहिण्याचे प्रसंग आता कमीच! माझ्या ऑफिसात common printer’ होता. मी Print command देऊन प्रिंटरजवळ जाईपर्यंत नव्या को-या A 4 कागदांवर माझे document तयार असायचे. माझ्यानंतर रांगेत असणा-या सहका-याला नेहमी महत्त्वाचं छापायाचं असायचं आणि पाठकोरे कागद चालायचे नाहीत. ‘पाठकोरे कागद’ वापरण्याच्या अटटाहासापायी माझ्या टेबलावर नेहेमी कागद साठलेले असतात.

थोडक्यात काय तर मी सारखं काहीतरी नाहीसं करत असते.

- ऑफिसातल्या संगणकातलं काम
- घरच्या संगणकातलं काम
- Pen drive मधलं काम
- एक दोन तीन Inbox
- मोबाईल मधले SMS

अनेकदा हे करत असताना काल जे महत्त्वाचं होतं ते आज बिनमहत्त्वाचं झालं आहे हे जाणवून ‘आज’बद्दल विरक्ती येते. तुम्हाला हवे असोत की नको, कागद, ईमेल, SMS येत राहणार .. आणि तुम्हाला ते नाहीसे करत राहावे लागणार. एका अर्थी वर्षाचे ३६५ दिवस चालणारे ‘नाहीसं करण्याचं’ हे एक व्रतच आहे म्हणा ना! न उतता, न मातता ते चालवावं लागणार. ते न केलं तर धडगत नाही. काय टिकवायचं आणि काय नाहीसं करायचं याचा निर्णय तारतम्याने करावा लागणार .. तो चुकला तर सगळंच संपलं! संगणकाची system restore करता येते .. आयुष्यात मात्र ते असं चुटकीसरशी करता येत नाही हे भान ठेवून नाहीसं करत राहावं लागणार  .. !
**

Saturday, February 5, 2011

६२ कुरुक्षेत्र

पानिपतनंतर पुढची भेट होती कुरुक्षेत्राची. त्याचा हा वृत्तांत.

*****************************************
इतिहासाला ज्ञात असलेल्या काळापासून या भूमीचे महत्त्व आहे. राजे बदलले, सत्ता बदलल्या, जगण्याची रीत बदलली........ या सगळ्याला कुरूक्षेत्र साक्षी आहे. या भूमीने कितीतरी संग्राम पाहिले. विनाशाच्या गर्तेतून पुन्हा पुन्हा बहरणारी ही भूमी. ती आपल्याला काय सांगेल याच कुतूहल मनात घेऊन १४ जानेवारीच्या संध्याकाळी आमचा प्रवास कुरुक्षेत्राच्या दिशेने सुरु झाला.

कुरुक्षेत्राबद्दल प्राचीन ग्रंथांमध्ये विविध उल्लेख आहेत. उत्तर्वेदी, ब्रह्मवेदी, धर्मक्षेत्र अशा अनेक नावानी हा भूभाग ओळखला जातो. कुरु वंशाचे साम्राज्य असणारी ही भूमी म्हणून हिचे नाव कुरूक्षेत्र हे सहज लक्षात येते. राजा कुरुने या भागात ४८ कोस परिसरातील भूमीवर सोन्याचा नांगर चालवला अशी एक कथा आहे. राजा कुरुने यातून धर्माचे बीज या परिसरात रोवले अशी एक धारणा आहे – म्हणून ते धर्मक्षेत्रही आहे.

आणखी एक कथा असे सांगते की, सगळीकडे अधर्म माजला म्हणून देव चिंतीत झाले. धर्मोत्थानासाठी कुरु स्वखुशीने तयार झाला – त्याच्या शरीराचे विष्णूने सुदर्शन चक्राने ४८ तुकडे केले. हे ४८ तुकडे जिथवर पसरले आहेत ते ‘धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र’ अशीही या परिसराची कथा आहे. हे क्षेत्र इतके पुण्यमय आहे की ब्रह्माने कुरुक्षेत्रापासून यज्ञाद्वारा विश्वाची निर्मिती केली असेही एक कथा सांगते.

कुरुक्षेत्रात आमचा पहिला कार्यक्रम होता तो ‘ज्योतीसर’ या ठिकाणी. श्रीकृष्णाने अर्जुनाला जेथे गीतेचा उपदेश केला ते हे ठिकाण असे परंपरा सांगते. आम्ही तेथे पोचलो तेव्हा रात्रीचे आठ वाजले होते. येथे संध्याकाळी ६.०० ते ७.०० असा तासाभराचा ‘Light and Sound show’ असतो. ‘विवेक’च्या स्थानिक हितचिंतक कार्यकर्त्यानी हा कार्यक्रम आमच्यासाठी तासभर पुढे ढकलण्याची तिथल्या व्यवस्थापानाला केलेली विनंती त्यांनी मान्य केल्यामुळे आम्हाला हा कार्यक्रम पाहता आला. ‘गारठ्यात उघड्यावर बसून हा कार्यक्रम तासभर पाहता येईल का?’ अशी आमच्या मनात आलेली शंका पहिल्या मिनिटातच नाहीशी झाली. समोरच्या विस्तीर्ण परिसरात रंगीबेरंगी दिव्यांच्या साहाय्याने, संस्कृत श्लोकांच्या पठणाने आणि ओघवत्या हिंदीत महाभारत युद्ध आमच्यासमोर सादर केले गेले. (आम्ही कार्यक्रमात रंगलेले असताना स्थानिक कार्यकर्त्यानी आम्हाला गरमागरम चहा आणि बिस्किटे देऊन आमची सेवा केली.) युद्धापूर्वी शांततेची बोलणी करायला धर्मराज तयार होतो तेव्हाचा द्रौपदीचा आक्रोश, आपल्याच लोकांशी आपल्याला लढायचे आहे हे पाहून अर्जुनाला आलेली हतबलता, अभिमन्यु वध, जयद्रथ वध, भीष्म पितामहांचे शरपंजरी पडणे, आत्म्याचे अमरत्व प्रतिपादन करणारे श्रीकृष्णाचे शब्द, विश्वरूपदर्शन, अश्वत्थामा वधाची हूल, दुर्योधन वध .. असे अनेक महत्त्वाचे प्रसंग थरारकपणे आमच्यासमोर मांडले गेले. एका तासाच्या मर्यादित वेळात महाभारत युद्धाचे प्रभावी सादरीकरण ही खरोखर अवघड गोष्ट आहे .. पण ती येथे सहज झाली होती.

जाट भवनातील सुखद मुक्कामानंतर आणि सकाळच्या नाश्त्यानंतर आमही पोचलो ते ‘भद्रकाली’ मंदिराच्या परिसरात. देशभरातील ५२ शक्तीपीठांपैकी हे एक. दक्षकन्या सतीने पित्याच्या इच्छेविरुद्ध शंकराशी विवाह केला. नाराज दक्षाने आपल्या घरच्या यज्ञसमारंभात सतीला आणि शंकराला बोलावले नाही. ‘घरचेच कार्य, त्याला आमंत्रणाची काय गरज’ या भावनेतून शंकराच्या मनात नसतानाही सती एकटीच दक्षाकडे गेली. त्या ठिकाणी दक्षाने सतीकडे पूर्ण दुर्लक्ष तर केलेच, शिवाय जमलेल्या पाहुण्यांसमोर शिवाची निंदा केली. हा अपमान सहन न होऊन सतीने प्राणत्याग केला. दु:खाने वेडेपिसे झालेल्या शंकराने यज्ञाचा विध्वंस केला, दक्षाचा वध केला आणि सतीचे शव हाती घेऊन प्रलयंकारी तांडव सुरु केले. विश्व लयाला जाणार या धास्तीने देवता मंडळाने शेषशायी विष्णूकडे धाव घेतली. विष्णूने सुदर्शन चक्राने सतीच्या मृत देहाचा वेध घेतला (विष्णूचे सुदर्शन किती वेळा चांगल्या लोकांवर सुटले आहे हे पाहण्यासारखे आहे!) आणि त्याचे ५२ तुकडे झाले. हे ५२ तुकडे ज्या ज्या ठिकाणी पडले, ती शक्तीपीठे झाली अशी आख्यायिका आहे.

महाभारत युद्धाला सुरुवात होण्यापूर्वी पांडवानी भद्रकालीची पूजा केली होती आणि तिने त्याना विजयाचा आशीर्वाद दिला होता अशी कथा आहे. ही देवी ‘जागृत’ आहे – भक्तांच्या मनोकामना ती पूर्ण करते अशी त्यांची श्रद्धा आहे. शनिवार हा या देवीचा विशेष दिवस असल्याने देवळात भरपूर गर्दी होती. देवीची मूर्ती छान सजवलेली होती. तिच्या समोरच्या भागात बांधलेल्या असंख्य घंटा किणकिणत होत्या. एका झाडाला भक्तांनी बांधलेले लाल – केशरी रंगाचे अनेक धागे होते. ‘नवस’ बोलताना हा धागा झाडाला बांधायची प्रथा आहे. मुख्य देवळाच्या वरच्या भागात महाभारत युद्धातील चक्रव्युहाची दगडावर कोरलेली प्रतिमा आहे. एक छोटी गुंफाही आहे.

मंदिराच्या मुख्य गुरुजींनी आम्हाला हा इतिहास थोडक्यात सांगितला. नंतर एका सहप्रवाशाच्या उत्साही सूचनेनुसार समस्त मराठी मंडळीनी ‘दुर्गे दुर्गट भारी’ आरती मोठ्या आवाजात म्हणून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

या मंदिरापासून जवळच ‘स्थाणेश्वर महादेव मंदिर’ आहे. या मंदिरावरून या परिसराला ‘थानेसर’ असे नाव पडले. थानेसर ही सम्राट हर्षवर्धनाची राजधानी. कुरुक्षेत्रापासून हे ठिकाण ४-५ किलोमीटर दूर आहे. पण आता कुरुक्षेत्राची वस्ती वाढली, ते जिल्ह्याचे ठिकाण झाले – त्यामुळे सगळा परिसर कुरूक्षेत्र नावाने ओळखला जातो. पण आम्हाला वाटेत ‘कुरूक्षेत्र’ आणि ‘थानेसर’ अशी दोन वेगळी रेल्वे स्थानके दिसली – त्याअर्थी हे आजही दोन वेगळे भाग असावेत. भद्रकाली मंदिराप्रमाणे या मंदिराशीही पांडवांचा संबंध सांगणारी एक कथा आहेच.

त्यानंतर आम्ही पोचलो ते ‘हर्ष का टीला’ या परिसरात. उत्खनन केलेल्या अवशेषामधून आम्ही पुढे पुढे जात राहिलो आणि चकित होत गेलो. हा परिसर पाहायला खरे तर एक दिवसही कमीच पडेल. या परिसरात सहा वेगवेगळ्या कालखंडांचे अवशेष आहेत. कुशाण, गुप्त, वर्धन, राजपूत, मोगल या काळातील इमारतींचे – त्यांच्या अस्तित्वाचे पुरावे येथे सापडले आहेत. येथे प्रचंड मोठे संग्रहालय आहे. वेगवेगळ्या काळातील विटा, वस्तू, मृत्तिका, दागिने, शस्त्रास्त्रे .. यांचा मोठा संग्रह येथे आहे. तो चांगल्या पद्धतीने जतन केला आहे आणि मांडलाही आहे.

संग्रहालयातून बाहेर पडून जिना चढून वर गेलो, तर ‘शेख चेहली’ची कबर दिसली. शेखचिल्ली म्हणजे एक स्वप्नाळू, भोळा-भाबडा, काहीसा मूर्ख माणूस अशी आपल्या मनात एक प्रतिमा आहे. झाडाच्या फांदीवर बसून तिच्यावर कु-हाडीचे घाव घालणा-या शेखचिल्लीची गोष्ट आपल्यापैकी बहुतेकांनी वाचली आहे. वास्तवात ‘शेख चेहली’ हे एक सूफी संत होते. अकबर पुत्र दारा शुकचे ते सल्लागार आणि गुरु होते. कबर अतिशय भव्य आणि देखणी आहे. हा सगळा परिसर अतिशय स्वच्छ आहे. उत्तरेत अशी स्वच्छता हा माझ्यासाठी एक सुखद धक्का होता.

ज्योतीसर परिसरात कामचलाऊ मराठी बोलणा-या विक्रेत्यांनी आमचे लक्ष वेधून घेतले. अश्वत्थ वृक्षाखाली बसून गीतेच्या पंधराव्या अध्यायाचे पठण करण्याचा अनुभव खूपच वेगळा होता.

येथील ‘ब्रह्म सरोवर’ अतिशय प्रचंड आहे. या सरोवराची निर्मिती ब्रह्माने केली अशी कथा आहे. या सरोवरात स्नान केल्याने अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्य लाभते अशी पारंपरिक समजूत आहे. सोमवती अमावास्या, सूर्यग्रहण अशा प्रसंगी लाखो भाविक येथे जमा होतात. या परिसरात अर्जुन, त्याचा रथ, गरुडध्वज हनुमान, सारथी श्रीकृष्ण – थोडक्यात गीता सांगणारा सारथी श्रीकृष्ण – असे एक अप्रतिम शिल्प आहे. २००७ मध्ये हे शिल्प येथे उभे करण्यात आले. पुण्याचे शिल्पकार श्री सुतार यांची ही निर्मिती आहे अशी माहिती श्री पांडुरंग बलकवडे यांनी दिली.

या शिल्पाच्या जवळच एक माणूस ‘अहो पुणेकरानो, शनिवारवाड्यावर नारायण रावाला मारलेत’ असे काहीबाही म्हणत भीक मागत होता. हा माणूस मूळचा पुण्याचा – भवानी पेठेतला. लहानपणी घरातून पळाला आणि आता कुरुक्षेत्रावर भीक मागतो (असे त्यानेच सांगितले) . परप्रांतात मराठी क्षितिजे नेऊन भिडवणारा शिल्पकार आणि त्याच ठिकाणी मराठी भिकारी ... मराठी माणसाला आपले अंगभूत सामर्थ्य व्यक्त करण्यासाठी अजून किती दूरचा पल्ला गाठायचा आहे याची चुणूक दाखवणारा अनुभव होता तो!

कुरुक्षेत्रात आम्ही चार संग्रहालये पाहिली. चारीही संग्रहालये वैशिष्ट्यपूर्ण आहेत. ‘शेख चेहली कबर’ परिसरातल्या संग्रहालयाचा उल्लेख वर आला आहेच. कुरुक्षेत्र विद्यापीठच्या ‘धरोहर’ संग्रहालयात हरियाणवी संस्कृतीचे अनोखे दर्शन घडते. मला सर्वात जास्त आवडले ते तिथले अगदी जिवंत वाटणारे पुतळे आणि रोजच्या जीवनाचे वेगळे दर्शन घडवणारे प्रकाशचित्रांचे दालन! श्रीकृष्ण संग्रहालयात ऐतिहासिक वस्तूंच्या संग्रहाबरोबरच श्रीकृष्णाच्या जीवनाचे दर्शन घडवणारी मनोरम्य दृश्ये आहेत. पनोरमा (Panorama) मध्ये खालच्या मजल्यावर विज्ञान संग्रहालय आहे. वैज्ञानिक तत्वे समजावून सांगणारी उपकरणे आणि खेळणी हाताळताना आमच्यातले अनेकजण प्रौढत्व विसरून कुतूहल घेऊन जगणारे लहान मूल झाले होते. येथे वरच्या मजल्यावर महाभारत युद्धातील विविध दिवसांचे भव्य दृश्य आहे. जयद्रथ वधासारख्या अनेक घटनांचे वैज्ञानिक स्पष्टीकरण तेथे सादर केले आहे.

कुरुक्षेत्रातून बाहेर पडताना या भूमीचा इतिहास आणि सांस्कृतिक वारसा फार मोठा आहे याची जाणीव झाली होती. हा वारसा जपण्याच्या हरियाणा शासनाच्या प्रयत्नाना दाद द्यायला हवी. पानिपत – कुरुक्षेत्र ही युद्धभूमी. अनेक युद्धांचे घाव झेलून इथला समाज पुन्हा कसा उभा राहिला असेल याचा विचार मी करत होते. कुरुक्षेत्रात आता आपल्याला लढण्यासाठी जावे लागत नाही! ही शांतता आणण्यासाठी ज्या लाखो अनाम वीरांनी प्राण वेचले, त्यांच्याबद्दल कृतज्ञता वाटली.

इतिहासाच्या अनेक खिडक्या माझ्यासाठी नव्याने उघडल्या आहेत हे दिल्लीकडे परत फिरताना जाणवत होते. या इतिहासाचा, परंपरेचा योग्य तो धडा घेऊन आपला समाज अधिक एकसंध करण्याचे आव्हान आपल्यासमोर आजही आहे – याचेही भान जागे होते.

एका अर्थी कुरुक्षेत्रावरचा संग्राम निरंतर चालू राहतो – त्याचे स्वरूप बदलते इतकेच!
**************
पूर्वप्रसिद्धी: साप्ताहिक विवेक, ६ फेब्रुवारी २०११

Tuesday, February 1, 2011

६१. पानिपतमध्ये एक दिवस

डिसेंबरमध्ये दवबिन्दु ब्लॉगवर पानिपत पोस्ट वाचली. पानिपतच्या तिस-या रणसंग्रामाला २५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने 'विवेक व्यासपीठ' पानिपत भेटीचा कार्यक्रम आखत आहे अशी त्यात माहिती होती. 'विवेक' साप्ताहिकाशी माझा प्रत्यक्ष -अप्रत्यक्ष संबंध कधी आला नव्हता. पण टीम 'विवेक' मधले काही लोक चांगल्या ओळखीचे आहेत. त्यांच्याशी मेलामेली - फोनाफोनी ( हे दोन्हीही मराठी शब्द नाहीत याची पूर्ण जाणीव आहे मला!) झाल्यावर मीही पानिपतला जायचं ठरल.

निघायच्या दोन तास आधी विवेकच्या संपादकांचा फोन आला. 'पानिपतचा वृत्तांत विवेकसाठी लिहिशील का?' अशी त्यानी विचारणा केली. 'नाही' म्हणायचं काही कारण नव्हत - म्हणून मी 'हो' म्हटल. अनेक वर्षे असे वृत्तांत लिहायची मला सवय आहे. पानिपतच्या भेटीत 'किंचित पत्रकारितेचा' अनुभव मजेदार होता. वृत्तांत लिहिण्याच्या जबाबदारीमुळे मला (संपादकांनी काही बंधन न घालूनही) जरा बांधल्यासारख वाटल! आपला ब्लॉग लिहिण वेगळ आणि कोणातरी दुस-यासाठी लिहिण वेगळ हे जाणवलं! त्याबद्दल नंतर कधीतरी लिहीन.

तोवर विवेकच्या ३० जानेवारीच्या (२०११) अंकात प्रसिद्ध झालेला हा वृत्तांत.

******************************************************
पराभवातूनही मराठ्यांचे शौर्यदर्शन घडविणारा पानिपतचा रणसंग्राम महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण देशाच्या इतिहासात महत्त्वाचा आहे.१४ जानेवारी२०११ रोजी या रणसंग्रामाला अडीचशे वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त "विवेक व्यासपीठ', पानिपत रणसंग्राम स्मृती समिती यांनी संयुक्तपणे पानिपतमध्ये यात्रेकरूंना नेऊन तेथेच या युद्धातील अनेक ज्ञात-अज्ञात वीरांना आदरांजली अर्पित करण्याचा अनोखा सोहळा आयोजित केला. कार्यकमाच्या आयोजनात राष्ट्रीय योद्धा स्मारक समितीचाही सहभाग होता. या स्मरणीय कार्यकमाचा वृत्तांत.

१४ जानेवारी. स्थळ - पानिपतमधील रणसंग्राम स्मारक. वेळ सकाळी अकरा-साडेअकराची. स्मारकात प्रवेश करणारे लोकांचे गट मोठ्या उत्साहाने घोषणा देतात "जय शिवाजी' आणि स्मारकात आधीच हजर असलेल्या लोकांकडून तितक्याच उत्साहाने प्रतिसाद मिळतो,"जय भवानी'.


निमित्त होते, पानिपतच्या तिसऱ्या रणसंग्रामाला दोनशे पास वर्षे पूर्ण झाल्याचे. पानिपत संग्रामात धारातीर्थी पडलेल्या योद्‌ध्याना मानवंदना देण्यासाठी पानिपत रणसंग्राम समिती आणि विवेक व्यासपीठ यांनी एकत्रितपणे कार्यक्रम आयोजित केला होता. महाराष्ट्रातील विविध भागातून सुमारे ४०० स्त्री-पुरुष या कार्यक्रमासाठी आले होते. अनेकांची पानिपतला ही पहिलीच भेट होती. त्यामुळे "काला आम' या ठिकाणी रणसंग्राम परिसरात पाऊल टाकताना अनेकांच्या मनात विविध भावनांचा कल्लोळ माजला होता.


पानिपत ही प्राचीन काळापासून महत्त्वाची युद्धभूमी आहे. कौरव पांडवांचा संग्राम जेथे घडला ते कुरुक्षेत्र येथून सुमारे ७० किलोमीटर अंतरावर आहे. पानिपतची पहिली लढाई दिल्लीचा सुलतान इब्राहीम लोधी आणि काबुलहून आलेला आकमक बाबर यांच्यात झाली. त्यात बाबराचे सैन्य जिंकले आणि हिंदुस्थानात मोगल साम्राज्याचा पाया रचला गेला. जानेवारी मध्ये दिल्लीचा राज्यकर्ता सम्राट हेमचंद्र विकमादित्य आणि अकबर यांच्यात झाली. यात अकबराचा विजय झाला आणि मोगल सा्म्राज्य अधिक बळकट झाले. पानिपतचा तिसरा संग्राम अफगाण आक्रमक अहमदशहा अब्दाली आणि सदाशिवरावभाऊ यांच्या अधिपत्याखालील मराठे सैन्य यांच्यात झाला. दुर्दैवाने मराठ्यांचा यात दारुण पराभव झाला. सात दिवस चाललेल्या या लढाईत प्रतिकूल परिस्थितीत मराठे शौर्याने लढले. विजय मिळूनही अब्दालीची पुन्हा हिंदुस्थानवर आकमण करण्याची हिंमत झाली नाही. विजयातही त्याने काही गमावले.


स्मारक परिसरात या तीनही संग्रामांची माहिती देणारा फलक आहे. स्मारकात पहिल्या दोन लढायांचे चित्रपटल (म्यूरल्स्‌) आहेत, तिसऱ्याचे नाही. तिसऱ्या संग्रामाच्या स्मरणार्थ एक स्तंभ आहे. या तिसऱ्या संग्रामाने इतिहासाला आणि देशाच्या भवितव्याला दिशा दिली असाही उल्लेख मु्ख्य फलकावर आहे.

महाराष्ट्रातून सिंधुदुर्ग, रायगड, सिंहगड, प्रतापगड आणि विजयगड या किल्ल्यांमधून जल कलश येथे आणण्यात आले होते. पुण्यात शनिवारवाड्यावर झालेल्या कार्यकमात हे कलश समारंभपूर्वक एकत्रित जमा करण्यात आले होते. श्री. गोपीनाथ मुंडे आणि श्री. पांडुरंग बलकवडे यांच्यासह जमलेल्या अनेक नागरिकांनी या स्मारकाला जलाभिषेक केला."छत्रपती शिवरायांची परंपरा चालवणाऱ्या योद्‌ध्यांना आम्ही विसरलो नाही" ही मराठी मनाची, अवघ्या महाराष्ट्राची भावना व्यक्त करण्याचा हा एक अभिनव मार्ग होता यात शंका नाही.


या स्मारकाला त्या दिवशी शेकडो हजारो लोक भेट देत होते. बिदर (कर्नाटक), बुरहाणपूर (मध्य प्रदेश) या ठिकाणचे मराठ्यांचे वंशज आवर्जून आले होते. रोहतक (हरियाणा) मधील पाच सहा मराठी भाषिक शिक्षक आले होते. मुंबईतून पंचवीस लोकांचा एक गट आला होता. इतरही अनेक लोक होते. ज्यांचाशी वेळेअभावी बोलता आले नाही. काही लोक श्रद्धेने रणसंग्रामातील मातीचा टिळा भाळी लावत होते; तर काही सोबत आणलेल्या प्लास्टिकच्या पिशवीत माती भरून घेत होते. रणसंग्राम स्मारकातून आमची बस परत फिरली तेव्हा अनेक गाड्या स्मारकाकडे येत होत्या. एकमेकांना रामराम करावा त्या थाटात लोक ओळख नसताना, भाषा प्रांत वेगवेगळे असताना मिळून "जय शिवाजी, जय भवानी' ललकारत होते ते एक हृद्य दृश्य होते.


स्मारकाच्या परिसरात रोड मराठा सेवा संघाचे कार्यकर्ते भेटले. पानिपतच्या तिसऱ्या रणसंग्रामातील पराभवानंतर काही मराठी योद्धे महाराष्ट्रात न परतता कुरुक्षेत्राच्या दक्षिणेकडच्या ढाक जंगलात लपून राहिले. परिस्थितीमुळे मराठापणाची ओळख लपवणे त्याना भाग पडले. अशा प्रसंगी त्यांचे पूर्वज राजा रोड याच्या नावाने ते स्वत:ची ओळख सांगू लागले. छत्रपती शिवाजी राजे या रजपूत राजा रोडचे वंशज आहेत असे काही अभ्यासकांचे मत आहे. रोड मराठा सेवा संघाच्या कार्यकर्त्यांनी हरियाणा, उत्तर प्रदेश आणि उत्तरांचलमध्ये सापडणाऱ्या गोत्रांची यादी प्रसिद्ध केली आहे. या आडनावाची कुटुंबे महाराष्ट्रात असतील तर त्यांची माहिती संघाला कळवावी असे त्यांनी आवाहन केले आहे.


त्याच दिवशी दुपारी पानिपत रणसंग्राम स्मृती समिती आणि राष्ट्रीय योद्धा स्मारक समिती यांनी एकत्रितपणे एस. डी.विद्यालयात जाहीर सभा ठेवली होती. भारतीय जनता पक्षाचे खासदार गोपीनाथ मुंडे मुख्य वक्ते होते तर मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आणि हिमाचल प्रदेशाचे माजी राज्यपाल विष्णू कोकजे समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. ज्योतिरादित्य सिंदिया काही अपरिहार्य कारणांमुळे कार्यकमाला उपस्थित राहू शकले नाहीत. खासदार श्रीमती सुमित्रा महाजन आणि इतर अनेक मान्यवर आणि योद्‌ध्यांचे वंशज मोठ्या संख्येने कार्यक्रमाला हजर होते.


उपस्थितांचे स्वागत आणि पाहुण्यांचा परिचय झाल्यानंतर इतिहास अभ्यासक अतुल रावत यांनी पानिपतच्या तिसऱ्या संग्रामाचे देशाच्या इतिहासातील महत्त्व विषद केले. "इतिहास म्हणजे राष्ट्रीय स्मरणाचे, त्याच्या प्रवासाचे संचित आहे आणि म्हणूनच तो आपण कधीही विसरता कामा नये', असे आवाहन त्यांनी केले. दीर्घकाळ चाललेल्या मध्यकालीन स्वतंत्रता संग्रामाची सविस्तर माहिती देऊन त्यानी म्हटले की, "इतिहासाच्या कटू अनुभवातून आपल्याला शिकायला मिळते म्हणून विजयाइतकेच पराभावाचेही स्मरण ठेवले पाहिजे. पानिपत नसते झाले तर भारताचे आजचे चित्र विदारकपणे वेगळे झाले असते', याची त्यांनी श्रोत्यांना जाणीव करून दिली.


मुंबईतून आलेले शाहीर योगेश यांनी," कौन कहता है पानिपतमे हमने हार खायी थी .... अंतिम विजय हमारी थी' हा पोवाडा गाऊन उपस्थितांची मने भारावून टाकली. या पोवाड्याचे सूत्र पुढे नेत इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे म्हणाले की,"या मानवंदनेच्या निमित्ताने आम्ही पराभवाचे उदात्तीकरण करत नसून प्रेरणा घेत आहोत. याच संग्रामातून १८५७ च्या स्वातंत्र्यसमराची आणि पुढे भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाची बीजे पेरली गेली हे आपण विसरता कामा नये. आपापसातील मतभेदांमुळे त्यावेळी आपण युद्ध जिंकू शकलो नाही हे लक्षात घेऊन आजच्या स्थितीतही एकतेची गरज आहे', असे त्यांनी प्रतिपादन केले.


गोपीनाथ मुंडे यांनी त्यांच्या भाषणात, "राणा प्रतापची लढाई म्हणजे राजपुतांची लढाई, शिवाजी महाराजांची लढाई म्हणजे मराठ्यांची लढाई या प्रवृत्तीतून आपण बाहेर पडले पाहिजे' असे आग"हाने सांगितले. "जे जे लढले ते हिंदुस्थानसाठी लढले हे वास्तव आपण समजून घेतले पाहिजे. पराजयातून विजयाचा रस्ता निघतो हेच पानिपतने सिद्ध केले आहे.' मराठी भाषेत पानिपत होणे शब्दप्रयोग सर्वनाश होणे या अर्थी वापरला जातो हे नमूद करून श्री मुंडे यांनी,"पानिपत म्हणजे प्रतिकूल परिस्थितीत देशासाठी लढण्याची वृत्ती हा पानिपतचा खरा अर्थ आहे,' असे ठासून सांगितले.


स्वागताध्यक्ष दर्शनलाल जैन यांनी पानिपत योद्धा स्मारक उभारण्याची जबाबदारी मुंडे यांनी घ्यावी असे जाहीर आवाहन केले. त्याला प्रतिसाद देताना मुंडे यानी सांगितले की, "पानिपत योद्‌ध्यांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. संसदेत चर्चा आणि प्रश्न यांच्या माध्यमातून केंद्र शासनाकडून निधी मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल पण त्याचबरोबर सामान्य लोकांनीही या कार्यात सामील व्हावे' असे आवाहन त्यांनी केले. सध्याचे पानिपत संग्रहालय स्मारकापासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर आहे. हे संग्रहालय स्मारक परिसरात उभे करण्याविषयी प्रयत्न केले जातील असेही त्यांनी सांगितले. साहित्यिक विश्वास पाटील यांनी पानिपतची महाराष्ट्राला पुन्हा आठवण करून देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे असे सांगून "पानिपत' कादंबरीवर आधारित "रणांगण' नाटकाचे प्रयोग महाराष्ट्रात तर पुन्हा व्हावेतच पण पानिपतमध्येही व्हावेत अशी विनंती विश्वास पाटील आणि वामन केंद्रे यांना ते करतील असेही त्यांनी सांगितले. ग्वाल्हेरस्थित नरसिंह जोशी यांनी लिहिलेल्या आणि "विजित विजेता' या पुस्तकाचे (विवेक प्रकाशन) प्रकाशन मुंडे यांनी केले. मुंडे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत उद्योजक सुरेश चव्हाणके यांनी पानिपत स्मारकात उभारण्यात येणाऱ्या दृकश्राव्य प्रकल्पासाठी २५ लाखापर्यंतचा खर्च उचलण्याचे जाहीर केले. दोन मिनिटे मौन राखून पानिपत योद्‌ध्यांना श्रद्धांजली वाहून आणि वंदे मातरम गाऊन कार्यक्रम संपला.


दुपारी आम्ही पानिपत संग्रहालयाला भेट दिली. हरियाणा सरकारने पानिपतचा इतिहास, कला आणि तिथले जीवन याबद्दल पर्यटकांना माहिती देण्यासाठी या संग्रहालयाची स्थापना केली आहे. पानिपतच्या तीनही युद्धांची माहिती देणारे विशेष कक्ष येथे आहेत. प्राचीन शिलालेख, युद्धातील शस्त्रास्त्रे, प्राचीन भांडी, प्राचीन कागदपत्रे असे पुष्कळ काही या संग्रहालयात आहे. पांडुरंग बलकवडे यातील अनेक गोष्टी आम्हाला समजावून सांगत होते. अर्थातच हे संग्रहालय पाहायला आमच्याकडे पुरेसा वेळ नव्हता आणि विवेकच्या कार्यकर्त्यांच्या "चला, वेळ झाली" या सूचनेवर नाराज होत आम्ही तेथून बाहेर पडलो. पण त्यांचेही बरोबर होते. पुढे कुरुक्षेत्र गाठायचे होते. तिथे दृक्‌श्राव्य कार्यकमासाठी वेळेत पोहोचणे गरजेचे होते.

पानिपत शहरात आम्ही आदल्या रात्री अकराच्या सुमारास पोचलो होतो. दुसऱ्या संध्याकाळी आम्ही तेथून बाहेर पडलो. चोवीस तासही आम्ही तिथे नव्हतो. पण या कमी वेळात आम्हाला खूप काही मिळाले. पुन्हा या भूमीला वेळ काढून भेट दिली पाहिजे, आपला इतिहास अधिक चांगल्या रीतीने जाणून घेतला पाहिजे ही भावना मनात घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो.
***********
पूर्वप्रसिद्धी: साप्ताहिक विवेक, ३० जानेवारी २०११