दिल्लीत परतल्यापासून जंतर-मंतर, इंडिया गेट इथल्या
निदर्शनात सामील व्हायची संधी मिळत नव्हती. म्हणजे रोज काही ना काही घडत होतं
तिथं; पण संचारबंदी लागू असल्याने आणि त्याहीपेक्षा दहा मेट्रो स्थानकं बंद
असल्याने मी तिथवर पोचू शकले नव्हते.
आज मात्र गेले. जंतर-मंतरला. आजपर्यंत मी या ठिकाणी
गेले आहे ती अण्णा हजारे यांच्या आंदोलनाच्या निमित्तानं. तेव्हा भरपूर गर्दी
असायची. आज तितकी नव्हती. ते स्वाभाविकच. सोमवार संध्याकाळ किती लोकांना मोकळी असणार?
निळ्या गणवेशातले 'रॅपिड अॅक्शन फोर्स'चे लोक होते – पण कमी
होते तेही. सुरक्षा तपासणी नव्हती. ठिकठिकाणी वेगवेगळे गट बसले होते. एका गटात दोन
पुरुष गेले आठ दिवस उपोषण करत आहेत – तिथं मेणबत्त्या लावलेल्या
होत्या बरेचजण बसून घोषणा देत होते. त्यात पुरुषांचा सहभाग चांगला दिसत होता. ‘देश
का युवा जाग गया, राहुल गांधी भाग गया’ ही एक नवी घोषणा ऐकायला
मिळाली.
दुसरा एक गट अनेक ट्यूबलाईट घेऊन बसला होता . त्यावर
लोक मार्करने सह्या करत होते, संदेश लिहित होते. दोन-तीन लोक होते तिथं. दुस-या एका
गटात आठ दहा स्त्रिया आणि दोन पुरुष उभे राहून घोषणा देत होते. ‘बलात्कार
करणा-यांना फाशी द्या’ ही त्यांची मुख्य मागणी होती. एका गटात ‘शहर कुणाचं’ अशा
आशयाचं एक गीत चालू होतं. एका ठिकाणी कागदावर संदेश लिहून तिथं मेणबत्त्या ठेवल्या
होत्या. दोन मुली बसल्या होत्या तिथं. एक मुलगी एकटीच ‘न्याय मिळाल्याविना नव्या
वर्षाचा आनंद होणार नाही’ असा फलक हातात घेऊन एकटीच बसली
होती. तिचा चेहरा अतिशय विदीर्ण दिसत होता. आणखी एका गटात बरीच जास्त गर्दी होती,
मेणबत्त्याही जास्त होत्या. तिथं काहीतरी धार्मिक वाटावा असा विधी चालला होता.
त्या विधींकडे मी पाहतच होते तेवढ्या माझ्या पाठीवर
हात पडला. स्वेटर, जीन्स, गळ्यात मफलर अशी एक तिशीची स्त्री होती. “तुम्ही निदर्शनात सहभागी
व्हायला आलात का?” तिनं मला विचारलं.
“हो,” मी सांगितलं.
“माझ्याबरोबर पाच मिनिटं याल?” ती स्त्री.
मला काही कळेना. कुठं जायचं? कशासाठी?
“ती म्हणाली मी ----- वाहिनीची
आहे (नाव सांगत नाही, सगळ्या वाहिन्या सारख्याच, एकीला झाकावं आणि दुसरीला काढावं!). आमचा आत्ता पाच वाजता लाईव्ह शो आहे. तुम्ही प्रतिक्रिया
द्याल का? प्लीज..”
या ठिकाणी वाहिन्यांचे कॅमेरे अगणित होते. नेहमीच
असतात. पण मी त्यांच्यापासून नेहमी लांब राहते. परिवहन मंडळाच्या बसस्थानकावर
प्रवासी शोधत जसे खासगी जीपवाले फिरतात तसे पत्रकार फिरत असतील याची मात्र मी कधी
कल्पना केली नव्हती. मला जरा हसू आलं पण मी नकार दिला.
ती म्हणाली, “या बलात्काराच्या घटनेत एक
अल्पवयीन मुलगा आहे. त्याच्या शिक्षेबद्दल तुमचं काय मत आहे?”
“ही काही एका क्षणाची घटना नव्हती.
स्व-संरक्षणार्थ अथवा भीतीतून हे कृत्य घडलेलं नाही. त्या मुलाने जे क्रौर्य केलं
त्याची शिक्षा त्याला व्हायला हवी. ते घृणास्पद कृत्य करताना तो लहान नव्हता मग
शिक्षेच्या वेळीच कसा लहान?” मी उत्तर दिलं.
“अगदी हेच हवं आहे मला, “ ती पत्रकार स्त्री
म्हणाली. “बालगुन्हेगार कायद्यात बदल -याच विषयावर आमचा शो आहे.”
“अहो, पण मला कायद्याची काही माहिती नाही.
इथं पुष्कळ अभ्यासक कार्यकर्ते असतील, त्यांची तुम्हाला जास्त मदत होईल,” मी काढता पाय घेत
म्हणाले.
“छे! मी जास्त काही विचारणार नाहीच.
तुम्ही आत्ता जे वाक्य बोललात ना तेच फक्त बोला, मी माईक धरणारच नाही तुमच्यापुढे
त्याहून जास्त.” ती अजीजीने म्हणाली.
माझे काही मित्र-मैत्रिणी पत्रकार आहेत. त्यांना बिचा-यांना
अशीच अजीजी करावी लागत असेल का रोज – असा विचार माझ्या मनात आला, आणि मी तिच्याबरोबर गेले.
एका टोकाला वाहिन्यांच्या कॅमे-यांची भिंत होती. वाट काढत, मी
येत आहे अशी खात्री करून घेत ती चालत होती. मी म्हटलं, हाही एक अनुभव घेऊन पाहू.
एक सरदारजी होते. पन्नाशीचे असतील. एक बाई होत्या त्याही
त्याच वयाच्या. आणि मी.
सरदारजी म्हणत होते, “लहान असला म्हणून
काय झालं? त्याला तर उलट जास्त शिक्षा द्या. ते पाहून बाकीच्या लहान मुलांना चांगली
जरब बसेल आणि पुन्हा कुणी असं वागणार नाही.”
त्यांच्या पाठीमागे काही पुरुष उभे होते. एक म्हणाला, “लहान आहे मुलगा,
त्याला सुधरायची संधी दिली पाहिजे.” आणखी कुणीतरी म्हणालं, “त्या मुलाला कसली
शिक्षा देताय? त्याच्या आई-बापाला दिली पाहिजे शिक्षा. मुलाला वळण लावत नाहीत
म्हणजे काय?” आणखी कुणी विचारत होतं, “त्याला आयुष्यभर
तुरुंगात टाकून द्या, तीच शिक्षा त्याला.” “झोपडपटटी वाढली की दुसरं काय होणार?” आणखी एक प्रश्न.
प्रश्नातच जणू उत्तर आहे दडलेलं अशा अविर्भावात.
तेवढ्यात कॅमेरामन आणि एक पुरुष यांची वादावादी झाली. कॅमेरामन
त्याला बाजूला व्हायला सांगत होता आणि तो माणूस म्हणत होता, ‘होऊ तर द्या तुमचं
सुरु, मग होतो की बाजूला.”माझ्या डावीकडे दुस-या वाहिनीचा माणूस ताडताड माईकमध्ये
बोलत होता. आता रोजची सवय असणार झालेली त्याला या विषयावर बोलायची. ‘सिंगापूरमधल्या
डॉक्टरांची साक्ष महत्त्वाची’ असं काहीतरी तो बोलत होता. उजवीकडे तिसरा वाहिनीवाला कुणालातरी फोनवर ‘अबे, अंग्रेजी बोलनेवाला चाहिये, पकडके ला किसीको जल्दी’ असं सांगत होता.
माझ्या शेजारच्या बाई मुलाला सांगत होत्या – “मावशीला फोन कर लगेच. तिला सांग हे लाईव्ह पहायला.” त्यांची मुलगी
तिच्या डिजीटल कॅमे-यात बहुधा व्हिडीओ रेकॉर्डिंग करत होती. मागे घोषणा चालूच
होत्या. आमच्याभोवती बरेच बघे जमा झाले होते. वेगवेगळ्या विषयांवर चर्चा चालू
होती. पाच मिनिटं झाली, दहा मिनिटं झाली .. पंधरा झाली. आमची पत्रकार हेडफोन
कानात अडकवून तयारीत उभी होती. तेवढ्या एक पठ्ठा धावत आला. कॅमेरामन आणि त्याची
गळाभेट झाली. मग तो “लाईव्ह शो" सुरु झाला.
पहिला नंबर सरदारजींचा. ते आधी बरेच तावातावाने बोलत होते
पण कॅमे-यासमोर अगदी शांत निर्धाराने बोलले. त्यांना बहुधा सवय असावी अशा कार्यक्रमात
सामील व्हायची. नंतर नंबर त्या बाईंचा. त्याही “इतर देशात बालगुन्हेगारांना
अशा प्रसंगी कडक शिक्षा दिली जाते’ अशा आशयाचं एक वाक्य बोलल्या. मग अचानक
ती पत्रकार आणि कॅमेरामन दोघंही निवांत झाले आणि मागच्या मेणबत्त्यांकडे पहायला
लागले. मग मला कळलं की ते लाईव्ह दाखवलं जातंय. सरदारजी आणि बाई दोघांनाही अजून
काही बोलायला सुचत होतं. ते पत्रकार बाईना सारखं काहीतरी सांगू पाहत होते. आणि ती
त्यांना ‘गप्प रहा, नंतर बोलू” अशी खूण करत होती. ती बहुतेक ऐकत असणार
कार्यक्रम.
अशी आणखी पाच एक मिनिटं गेली. मेणबत्त्यांजवळचा कॅमेरामन
परत आला.
“मेरा हो गया?” असं पत्रकार
स्त्रीने कुणालातरी विचारलं.
मग मला म्हणाली, “सॉरी, तिकडे स्टुडीओत पण एक-दोन लोक होते
बोलायला. त्यामुळे वेळ संपली.”
मी “ठीक आहे” म्हणून निघाले.
बाईट हुकली माझी. ते चांगलंचं झालं. त्यामुळे काहीच बिघडलं
नाही. वरवर पाहता.
एका बाईटमागे काय काय असतं ते कळलं.
मात्र आत खूप काही विस्कटून गेलं.
बाहेरच्या झगमगाटात खरी
घटना, खरी वेदना, खर दु:खं किती क्षुल्लक होऊन जातं तेही अनुभवाला आलं.