२३४ मुलींपैकी ती एक. इयत्ता सहावीत, म्हणजे तेरा-चौदा फार फार तर
पंधरा वर्ष वय असेल तिचं. ३९ शाळांमधून प्रत्यकी सहा अशा निवडलेल्या या २३४ मुली.
त्यापैकी ही एक ‘रापारिगा लीडर’ किंवा ‘लीड गर्ल’.
कोणत्याही शाळेत गेलं की या मुलींची भेट घेणं, त्यांच्याशी गप्पा
मारणं हे एक महत्त्वाचं काम. त्यांची जिल्हानिहाय निवासी शिबिरं ठरल्यावर घरोघरी
जाऊन, आई-वडिलांना भेटून मुलीला शिबिरात पाठवण्यासाठी त्यांची परवानगी घेणं. एक
दोन नव्हे तर तब्बल १९४ घरं. इथल्या समाजाचं विराट दर्शन घडवणारी ती एक यात्राच.
दरम्यान अनेकदा या मुलींची नावं संगणकाच्या पडद्यावर उमटली. कधी
वयानुसार गट, कधी भाषेनुसार, कधी कुटुंबाच्या माहितीनुसार. वडील नसलेल्या मुली
किती, नातलगांकडे राहणा-या मुली किती, सावत्र आई/वडील असलेल्या मुली
किती....वेगवेगळ्या पद्धतीनं माहितीचं विश्लेषण आणि त्या अनुषंगाने नवनव्या
कल्पना.
शिबीर आठ जिल्ह्यांत झालं, आता हा शेवटचा जिल्हा. या जिल्ह्यात सहा
शाळा. प्रत्येक शाळेची भेट आणि त्यात ‘रापारिगा लीडर्स’शी संवाद. जमलं तर गृहभेट
आणि पालकभेट.
भर दुपारी बारा वाजता आम्ही शाळेत पोचलो. मुलींचा वर्ग बारा वाजता
सुरु होतो, त्यामुळे ही योग्य वेळ त्यांना भेटायची. पाचेक मिनिटांत लाजून, मान खाली
घालून, तरीही उत्सुक तिरक्या नजरेने पाहणा-या सहा मुली माझ्यासमोर उभ्या. एकेक नाव
सांगतेय आणि मी हातातल्या यादीवर ‘बरोबर’ची खूण करतेय. एक, दोन, तीन, चार, पाच....
वा! इथं एकही ‘रापारिगा लीडर’ शाळा सोडून गेली नाहीये तर! अरेच्चा! पण ही सहावी
मुलगी वेगळंच नाव सांगतेय – कागदावर ते नाव नाहीये. हं! म्हणजे इथंही गळती झालीय
तर! लग्न झालं की काय तिचंही?... एका क्षणात मनात किती ते विचार!
मी त्या नव्या सहाव्या मुलीची आधी व्यवस्थित विचारपूस करते.
मुख्याध्यापकांकडे वळून मी प्रश्न विचारणार – तितक्यात विचार बदलून मी
मुलींना विचारते, “पण सेलेस्टिना कुठेय? ती फक्त आज नाही आली शाळेत की बरेच दिवस
गैरहजर आहे?”
“ela morreu” (ती मेली) निर्विकार चेह-याने एक मुलगी सांगते.
मला काय बोलावं ते सुचत नाही.
“काय झालं”, मी विचारते.
“माहिती नाही. एक दिवस आजारी पडली, दुस-या दिवशी गेलीच ती डॉक्टरकडे
न्यायच्या आत.” मुख्याध्यापक सांगतात.
“कधी झालं हे?” मी विचारते.
आपापसात चर्चा करून ‘आठ दिवस’ या निष्कर्षाप्रत ते येतात.
“तिच्या आई-वडिलांना भेटता येईल का?” या माझ्या प्रश्नावर ते सध्या
कामासाठी गाव सोडून गेल्याचं कळलं.
मृत्यू मला नवा नाही. जिवलगांच्या जाण्यातून त्याची अनेकदा चाहूल
घेतली आहे.
पण मृत्यूची सवय होता होत नाही; प्रत्येकवेळी तो नवा असतो. तितकाच
अंतर्मुख आणि हतबल करणारा असतो. त्याच्या अपरिहार्यतेची जाणीव लख्ख करणारा असतो.
परक्या भूमीतल्या, जिला मी कधीही भेटले नव्हते अशा या मुलीच्या
निमित्ताने मृत्यू आज पुन्हा भेटला. पुन्हा एकदा डोळे ओलावून गेला.
प्रश्न मरण्याचा नसतो तर जगण्याचा असतो हे अधोरेखित करणारी पुनर्भेट.
अजून किती बाकी आहेत?