ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Monday, April 30, 2012

१२३. साक्षर देव

देवाबद्दल आजवर बरच काही ऐकलेलं आणि वाचलेलं. त्यात त्याच्या/तिच्या गुणांची वर्णनं भरपूर. म्हणजे कोणताही देव किंवा देवी कसे सर्वशक्तिमान असतात, कसे दयाळू असतात, कसे सर्वज्ञ असतात, कसे सर्वव्यापी असतात, भक्तांची ते कशी काळजी घेतात आणि दुष्टांचा कसा संहार करतात अशा कथा नेहमीच कानावर आलेल्या. त्यातल्या काही रंजक, काही उद्बोधक, काही विचारांत पाडणा-या, काही नकळत त्यातल्या निरागसपणाने हसवणा-या. या सगळ्या गुणांच्या यादीत एक गुण कधी ऐकलेला नव्हता पण तो त्यादिवशी मला दिसला  (म्हणजे भक्तांची तशी श्रद्धा आहे हे दिसलं ). 'गोलू देवतेच्या' मंदिरात श्रद्धेच आजवर कधी न दिसलेलं एक स्पष्ट रूप होतं - ते म्हणजे 'ईश्वर साक्षर आहे; त्याला वाचता येत' ही भक्तांची श्रद्धा. 

मी एकदम निष्कर्षच सांगितला का तुम्हाला? थांबा, जरा नीट सांगते. 

मी होते अल्मोडा शहरात. उत्तराखंड (मला त्याच खर तर उत्तरांचल हे आधीच नाव जास्त आवडत!) राज्यातलं हे एक जिल्ह्याच शहर. या शहरांच एक आकर्षण डोक्यात होत आधीपासून ते विवेकांनंद वाड्मय वाचल्यापासूनच. १९९३ च्या शिकागो सर्वधर्मपरिषदेत भाषण देऊन गाजलेले विवेकानंद चार वर्षांनी भारतात परतले. त्यांच्या व्याख्यानांचा एक झंझावती दौरा मग सुरु झाला कोलंबो शहरापासून आणि त्यातलं शेवटाच भाषण झालं ते अल्मोडा शहरात. 'From Colombo to Almora' हे पुस्तक मी अर्थातच वाचलेलं होत. मायावतीचा 'अद्वैत आश्रम' पण तिथून जवळच आहे असा माझा समज होता पण पहाडात १२० किलोमीटरच अंतर म्हणजे एका दिवसाचा प्रवास असू शकतो हे मला अनुभवाने माहिती होत. पण तरीही अल्मोडा शहरात गेल्यावर जरा चाचपणी करून पाहायची अंतराची हे मी ठरवलं होत. 

हिमालयातल्या हवामानाचा फटका इथून निघतानाच आम्हाला बसला. ज्या दिवशी संध्याकाळी चार वाजता आम्ही अल्मोडा शहरात पोचण अपेक्षित होत त्यापेक्षा आम्ही तिथं एकोणीस तास उशीरा म्हणजे दुस-या दिवशी सकाळी अकरा वाजता पोचलो. तीन जिल्ह्यांतून आलेल्या स्वयंसहायता गटाच्या प्रतिनिधी स्त्रियांशी चर्चा झाली, उशीरा एकत्र जेवण झालं, संस्थेच्या कार्यकर्त्यांशी कार्यक्रमाविषयी चर्चा झाली, उद्याचा कार्यक्रम ठरला .. तोवर पाच वाजले. मी आपलं एकाला सहज 'अद्वैत आश्रम' किती दूर आहे ते विचारलं. तिथं जायला मला वेळ मिळणार नव्हता हे उघड होत - ते पुन्हा एकदा सिद्ध झालं. 

मग तिथल्या एक वरिष्ठ अधिका-याने सांगितलं, " दीदीला गोलू देवता मंदिरात घेऊन जा."

गोलू देवता? मला एखाद्या लहान मुलाच नावं वाटलं 'गोलू' हे; म्हणून गंमत वाटली. तसाही हातात वेळ होता, म्हटलं चला, आज गोलू देवतेच्या दर्शनाच भाग्य आहे ते घेऊया. 

गोलू देवतेच मंदिर बाहेरून कोणत्याही मंदिरासारखं वाटलं आधी. म्हणजे बाहेरचा अरुंद रस्ता, तिकडे दुकानांची गर्दी.. एक वातावरण असत ते वैशिष्टयपूर्ण. त्यामुळे आपण मंदिराच्या परिसरात पोचलो आहोत ते कळत आपण अगदी झोपेत असलो तरी.  आत्ता मात्र संध्याकाळची  वेळ असल्याने आमच्याव्यतिरिक्त कोणी भक्त नव्हते तिथे.  देऊळ बाराव्या शतकात चंद राजवटीत बांधलं गेलं आहे अशी माहिती नंतर मिळाली. 

मंदिराच्या आत प्रवेश करताना दोन्ही बाजूंना असंख्य घंटा दिसल्या टांगलेल्या. मला घंटा आवडतात .. देवळातल्या घंटा वाजवायला मला आजही मजा वाटते. एरवी देवळात गाभा-याकडे जाणा-या मार्गावर घंटा असतात - इथं मात्र त्या सगळीकडे दिसत होत्या. चारी भिंतींवर जिथं शक्य आहे तिथं घंटा होत्याच. त्यांची अगदी दाटीवाटी झाली होती. वेगवेळ्या आकाराच्या घंटा एकमेकीना खेटून बसल्या होत्या. उत्सवात भक्तांची व्हावी तशी त्यांची गर्दी होती. या देवळाला 'लक्ष घंटांच देऊळ' असंही म्हटलं जात हे मला एकाने सांगितलं - त्यात तथ्य असावे -  म्हणजे असतील अगदी एक लाख नाही पण हजारो घंटा. इतक्या सगळ्या घंटा एका वेळी वाजवता आल्या तर काय मजा येईल असं वाटून उपयोग नव्हता. कारण त्या सगळ्या घंटा वाजवायच्या तर मला तिथं काही वर्ष नाही निदान काही महिने तरी नक्कीच घालवावे लागले असते. त्यातल्या छोटया घंटा वा-याच्या झुळूकीसोबत किंचित किणकिणत होत्या ते ऐकून 'अद्वैत आश्रमात' जाण्याची संधी  हाताशी नसल्याने खट्टू झालेलं माझ मन सुखावलं. इथं पशुबळीही देतात भक्त -पण आज आम्हाला काही ते दृश्य सुदैवाने पहायला लागलं नाही. 

"इतक्या घंटा का आहेत इथं" या माझ्या प्रश्नाची अपेक्षाच करत होते स्थानिक लोक. त्यांनी उत्साहाने सांगितलं की, नवसाला देव पावला की भक्त त्याची खूण म्हणून एक नवी घंटा देवाला अर्पण करतात. म्हणजे इथं जितक्या घंटा दिसताहेत, कमीत कमी तितक्या लोकांचे नवस पूर्ण झालेले आहेत तर! 

अशा स्थानांभोवती परंपरेच्या, इतिहासाच्या, श्रद्धेच्या, संस्कृतीच्या  अनेक कथांचे पदर असतात. इथेही ते आहेत. गोलू देवता हा 'गौर भैरवाचा' म्हणजे शिवाचा अवतार मानला जातो. या अवताराचे वैशिष्टय म्हणजे ही एक 'न्याय देवता' मानली जाते. आपल्यावर झालेल्या अन्यायाची तक्रार इथे करायची आणि गोलू देवता या अन्यायाचे परिमार्जन करते अशीही भक्तांची श्रद्धा आहे. उत्तराखंडमधल्या कुमाऊ परिसरात गोलू देवतेची अनेक मंदिरे आहेत. 

दुस-या एका कथेनुसार चम्पावत प्रदेशात गोलू  नावाचा एक राजा होऊन गेला , तिस-या एका कथेनुसार तो एका सैन्याचा अतिशय शूर सेनापती होता आणि तो धारातीर्थी पडल्यावर त्याच्या स्मरणार्थ हे मंदिर उभारले गेले. चुकीचा आळ घेतला जाऊन गोलूची एका राजाने हत्या केली अशीही एक कथा आहे. राजाच्या आवडत्या राणीला मुलगा झाला तेव्हा इतर राण्यांना मत्सर वाटून त्यांनी त्या मुलाला पिंज-यात घालून नदीत सोडून दिला तो पिंजरा आणि राणीच्या कुशीत दगड ठेवून दगड जन्माला घातला अशी बतावणी केली. पिंज-यात सोडून दिलेला तो मुलगा एका कोळ्याच्या घरी वाढला. पुढे तो मुलगा राजाला सापडतो , हाच आपला मुलगा आहे याची त्याला खात्री पटते आणि तो मुलगा पुढे 'ग्वाल्ला देवता' म्हणून ओळखला जातो अशी आणखी एक कथा आहे. 

इसवी सन ७०० ते इसवी सन १३०० या कालावधीत अल्मोडा जिल्ह्यात ४०० मंदिरे बांधली गेली असं इतिहास सांगतो. या परिसरात भैरवाची आठ देवळे आहेत - आठही दिशांनी ते शिवाचे संरक्षण करतात असे मानले जाते. 

देवळात थोड आणखी आत गेल्यावर माझ लक्ष गाभा-याकडे गेलं आणि मी चकित झाले. कारण आता पहिल्यांदाच माझ लक्ष तिथे लटकत असलेल्या कागदांकडे गेलं. मी मागे वळून पाहिलं, चारी दिशांना पाहिलं आणि मला एवढा वेळ न दिसलेले कागद सगळीकडे दिसायला लागले. 

'कसले कागद आहेत हे? आणि ते इथं कुणी आणि कशासाठी लावले आहेत?" मग त्यावर मला जे कळलं ते आजवरच्या माझ्या इतक्या भटकंतीत मी पहिल्यांदाच ऐकत होते. आपल्याला न्याय मिळावा म्हणून कोर्टात जसा  stamp पेपरवर लोक अर्ज करतात, तसाच अर्ज  इथंही केला जातो. विशेषत: न्यायालयात ज्यांच्या बाजूने निकाल लागत नाही, ते भक्त  पुढच्या न्यायालयात जावं या पद्धतीने इथं येतात. या कागदांची संख्या मोजदाद करण्याच्या पलीकडे होती. 

भक्त मंडळी चार प्रकारची असतात हे श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेलं आहे -आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी. इथले भक्त पहिल्या आणि तिस-या प्रकारातले असणार - आर्त आणि अर्थार्थी - हे समजण्याजोग आहे. कदाचित एखादा जिज्ञासूही असेल म्हणा - देव भक्तांना असा पावतो का याची जिज्ञासा बाळगून कोणी तिथं अर्ज केला असेल तर माहिती नाही. अर्ज साधारण कोणत्या विषयांवर असतील हे कळायला कोणा समाजशास्त्रज्ञाची गरज नाहीये. शतकानुशतके लोकांच्या भौतिक गरजा आणि आकांक्षा एकाच प्रकारच्या राहिल्या आहेत - त्यांची बाह्य अभिव्यक्ती बदलते इतकेच काय ते बदलते! बाकी सारे तसेच नाळ जोडून असते जुन्याशी. 


मी सहज म्हणून दोन चार अर्ज वाचले. खर तर मी ते वाचण अपेक्षित नाही. गोलू देवता आणि त्याचे भक्त यांच्यातला हा मामला आहे. माझ्यासारख्या त्रयस्थ व्यक्तीच तिथं काही काम नाही. 

एका अर्थी वैयक्तिक इच्छा, आकांक्षा, स्वप्न, भ्रमनिरास, अपेक्षाभंग जगजाहीर करण्यातून माणसांच्या सुख-दु:खाचा योग्य पद्धतीने निचरा करण्याची ही एक समाजमान्य पद्धत असेल का? माणसाने भावनांच दमन करण्यापेक्षा त्या भावना व्यक्त करण्याचे वैध मार्ग समाजाने उपलब्ध करून देण्यात व्यक्तींचे आणि अंतत: समाजाचेही अधिक भले असते काय? कधीकधी प्रचलित शहाणपण अधिक उपयोगाचे ठरते म्हणतात. 

देवाला वाचता येत, देव साक्षर आहे - ही कल्पना अगदी अलिकडचीच असणार. ती नेमकी कधी आली ती सांगणारे मला कोणी भेटले नाही - पण ब्रिटीश राजवटीत शिक्षण, न्यायालय, अर्ज या गोष्टींना आलेले महत्त्व याच्यामागे असणार असा अंदाज बांधता येतो. धर्माच्या, परंपरेच्या, देवतेच्या शक्तीच्या, रुढीच्या आपल्या कल्पना बदलत जातात हे पुन्ह्पुन्हा दिसते. पण देवतेकडून आपल्या अपेक्षा मात्र त्याच आहेत - माझे, माझ्या कुटुंबाचे भले व्हावे - ते भले म्हणजे माझ्या इच्छेनुसार व्हावे. देवाने भले केले तर आम्ही त्याला परत काहीतरी देऊ - नवस फेडू असं म्हणायचं, पण तो एका अर्थी 'देव-घेवी'चा व्यवहार आहे आपला देवाशी. हे सगळ  काय आहे आणि जे आहे ते असं का आहे? 

गोलू देवतेला एका अर्ज लिहून मी या अशा प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी प्रार्थना करायला हवी होती - पण ते राहूनच गेलं .. पुन्हा कधीतरी ..

Wednesday, April 18, 2012

१२२. भीमनी घंटी

" मॅडम, भीमनी घंटी  इकडं आहे, या बाजूने या," माझ्या सहका-याचा आवाज.

मी गुजरातमध्ये ऑफिसच्या कामासाठी आले आहे. दोन आदिवासी गावांना भेट देऊन इथे चालू केलेल्या  काही कार्यक्रमांची नोंद करायची आहे. इथं एक डॉक्युमेंटेशन टीम आहे -  तिचं प्रशिक्षण आणि कामाची नोंद असा दुहेरी उद्देश आहे. सोबत माझी कार्यक्रमाची पाहणी पण करून होईल. सगळा कार्यक्रम आधीच ठरवलेला आहे.

आदल्या दिवशी एकाने मला हळूच, "जाम्बुघोडा जवळच आहे तिथून. जाऊ यात का वेळ मिळाला तर?" असं विचारून घेतलं आहे. " काय आहे तिथं पाहण्यासारखं?" या प्रश्नावर "हनुमानाची प्रचंड मोठी मूर्ती" असं उत्तर उत्साहाने मला मिळालं. पण एकंदर मी देवभक्त नाही हे माझ्या टीमला माहिती आहे. म्हणून एकजण लगेच पुढे सांगतो, " तिथं मस्त जंगल आहे, तुम्हाला आवडेल ते खूप. ते एक अभयारण्य आहे...". पूर्ण टीमच्या मनात तिकड जायची इच्छा आहे त्यामुळे मी नकार द्यायचा प्रश्न उद्भवत नाही. "काम पूर्ण झालं पाहिजे पण आपण ठरवलेलं, बरं का" अशी फक्त मी सगळ्यांना आठवण करून दिली आहे कालच.

आम्ही पंचमहाल जिल्ह्यात आहोत. वडोदरा शहरापासून सुमारे ७० किलोमीटर अंतरावर.  येताना रस्त्यावर आम्हाला पावागड दिसतो. हा पहाडी किल्ला आहे आणि १६ व्या शतकातल्या संस्थानाची राजधानी होती इथं. आम्ही वेळ नसल्याने तिकडे जात नाही पण एकदा जाण्यासारखी दिसती आहे जागा. रस्त्यावरच्या जाहिराती वाचून तिथं आता 'रोप वे'ची व्यवस्था आहे हे कळत - म्हणजे पर्यटक मोठया संख्येने येत असणार इथं.

आम्ही 'झंड हनुमान' या ठिकाणी पोचतो. 'झंड' शब्दाचा अर्थ काय याबद्दल आधी मी विचारलं, पण कोणाला सांगता नाही आलं  नेमकं - पण झंड म्हणजे भव्य असणार. वाटेत मोहाची झाडे आहेत भरपूर आणि त्यांच्या फुलांचा मंद वास वेडावून टाकतो आहे. काही आदिवासी स्त्रिया आणि पुरुष मोहाची फुले गोळा करताना दिसतात. ती विकून थोडेफार पैसे मिळतात त्यांना - या काळात ती एक उपजीविकाच असते त्यांची. एप्रिल महिन्याचे दिवस असल्याने जंगल  हिरवं नाही पण एकदम थंड आहे हवा. पावसाळ्यानंतर हे जंगल कसं दिसत असेल याची नुसती कल्पना करूनही मी एकदम ताजीतवानी होते. अर्थात एप्रिल-मे या काळातही जंगलाच सौंदर्य वेगळच  असतं हे काही मुद्दाम सांगायला नको. 


हनुमानाची २१ फूट उंच मूर्ती देखणी आहे. इथं फोटो घ्यायला बंदी आहे, त्यामुळे मी डिजीटल कॅमेरा उघडला नाही. गाडीचा चालक आता मार्गदर्शकाच्या भूमिकेत जातो. तो सांगतो की, पांडव त्यांच्या वनवासाच्या बारा वर्षांनतर म्हणजे अज्ञातवासाच्या तेराव्या वर्षी या परिसरात राहिले होते. अर्जुनाने एका बाणाने जमिनीतले पाणी मोकळे करून पांडवांची तहान भागवल्याची एक गोष्टही तो मला सांगतो. आता हा झरा कोरडा पडला आहे पण पावसाळ्यात तो ओलांडणे अवघड असते असेही तो सांगतो. आता रामायणातला हनुमान महाभारतातल्या पांडवांच्या भेटीला इथं कशासाठी आला होता हे मात्र त्याला सांगता येत नाही. मी विचारल्यावर सगळेजण हसतात फक्त - एखाद्या  प्रश्नाचं उत्तर माहिती नसलं की फक्त हसायचं हे धोरण सगळीकडे दिसतं! असो, काहीतरी कथा असेल ती, शोधायला हवी. 

पुढे आहे 'भीमनी घंटी'. मला खर तर गुजराती चांगलं समजतं, त्यामुळे घोटाळा व्हायला नको होता. पण तरीही कुठेतरी आपल्यावर मातृभाषेचे संस्कार जास्त खोल असल्याने  'घंटी' म्हणजे एका मोठया 'घंटेचं' - देवळात असतात त्या 'घंटेचं' - चित्र माझ्या नजरेसमोर येतं. 'ही घंटी भीम कशासाठी वाजवत असेल' असा विचार मी त्यामुळे करते आहे मनातल्या मनात. त्यामुळे 'भीमनी घंटी' पाहिल्यावर क्षणभर माझा विरस होतो. मग माझ्या लक्षात येतं की, मराठी, हिंदी, गुजराती अशा भाषांची सरमिसळ केलीय मी म्हणून घोटाळा झालाय; मग मी स्वत:शीच हसते. कारण माझ्यासमोर जे काही दिसत ते आहे एक प्रचंड मोठं जातं - त्याच्या आकारामुळे आणि पांडवांच्या इथल्या वास्तव्याच्या कथेमुळे ते झालं 'भीमाचं जातं' - भीमनी घंटी! 

अज्ञातवासाच्या तेराव्या वर्षात भीमाने 'बल्लवाचार्याचे' काम केले ही कथा आपल्याला माहिती आहेच. त्यावेळी हे जातं वापरलं गेलं होत का? म्हणजे  या भागाची बरीच प्राचीन पाळेमुळे आहेत म्हणायची. हल्ली असली काही माहिती शोधायची म्हणजे इंटरनेट हे एक हाताशी असलेलं सोपं साधन झालं आहे. नव्या-जुन्याचा हा संगम मला नेहमी गंमातीदार वाटतो. आपली संस्कृती, आपला इतिहास वाचायचा तो इंग्रजीतून! त्या जात्याच्या आसपास मला एकावर एक रचलेले भरपूर दगड दिसतात. "हे काय आहे?" माझा स्वाभाविक प्रश्न. आता माझ्या टीमला माझ्याकडून कधी आणि कोणत्या प्रश्नांची अपेक्षा करायची याचा अंदाज आलेला आहे एव्हाना. आमच्यातला एकजण सांगतो, "इथं पडलेल्या दगडांतून आपल्या मनातलं घर बांधायचं आपण. ते जर स्थिर राहिलं, (म्हणजे ते एकावर एक रचलेले दगड खाली पडले नाहीत) तर आपल्या ख-या आयुष्यात आपल्याला आपण इथं बांधलेल्या घरासारखं घर मिळतं. स्वत:च्या मालकीच्या घराची आपली इच्छा पूर्ण होते इथलं घर टिकलं तर." माझे सहकारी उत्साहाने दोन मजली, तीन मजली घर, चार मजली घर बांधतात. त्यांच्यात ते घर 'बांधताना' लहान मुलांसारखा उत्साह आहे.

अनेक धार्मिक ठिकाणी अशा प्रकारच्या 'इच्छापूर्तीच्या' काही ना काही धारणा, समजुती आढळतात. मला माझ्या सहका-यांच्या डोळ्यात एक स्वप्न दिसते. मला एकदम जाणवत की अशा प्रकारच्या 'इच्छापूर्ती' च्या धारणा म्हणजे काही फक्त अंधश्रद्धा नाही. जे बेघर आहेत,  जे जन्मभर भाड्याच्या घरात राहत आहेत  ज्यांचे स्वत:च्या मालकीचे घर नाही, ज्यांची सध्याच्या घरात कुचंबणा होते आहे .. अशा लोकांच्या मनात एक आशा जागवण्याचे, त्यांना प्रेरणा देण्याचे काम ही जागा करते आहे. एका नजरेत मला तिथे अज्ञात लोकांनी आशेने बांधलेली असंख्य घरं दिसतात.  किती लोकांना आत्ताच्या त्यांच्या जगण्यातून पुढे जाण्याची उमेद हवी आहे, एक नवा रस्ता हवा आहे  त्याच एक चित्रच तिथं आहे. माझ्या हृदयात वेदनेची एक कळ उठते. मी तिथं घर 'बांधत' नाही - पण मी आता इतरांना हसतही नाही. 'इथं ज्यांनी घरं बांधली आहेत त्या सर्व लोकांना त्यांच्या स्वप्नातले घर मिळो' अशी एक प्रार्थना माझ्या मनात उमलते.

आम्ही परत फिरतो. येताना परिसरात असंख्य पोलिस दिसले होते, आता त्यांच्या संख्येत आणखी भर पडली आहे आणि अधिकारीही दिसत आहेत. मी एक दोन पोलिसांकडे पाहून हसते, तेही हसतात. एका अधिका-याला मी विचारते, "आज कोणी व्ही. आय. पी. येणार आहेत का?" एक अधिकारी हसतो पण उत्तर देत नाही.  मी पुढे म्हणते, "सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्ही मला माहिती न देणे मला समजू शकते. पण मीही सहज, फक्त कुतूहल म्हणून विचारते आहे. तुमची संख्याच आहे हा प्रश्न मनात आणणारी." दुस-या अधिका-याला माझ्या साधेपणाची बहुधा खात्री पटते. तो सांगतो, " गुजरातचे सरन्यायाधीश (मुख्य न्यायाधीश?) येत आहेत  इथं दर्शनाला. तुम्ही आधीच लवकर आलात ते बरं केलंत. आता कोणत्याही क्षणी साहेब येतील आणि तुम्हाला अर्धा पाऊण तास थांबायला लागलं असतं ते परत जाईपर्यंत." मी त्याचे आभार मानते.

त्या पाहुण्यांच्या आधी आमची भेट झाली या जागेला आणि वेळ वाचला याचा आम्हाला आनंद होतो. पोलिस उगाच त्रास देत नाहीयेत कोणाला पण वेळ तर गेलाच असता आमचा वाया. आम्ही निघताना समोरून गाडयांचा ताफा येतो. मी उगीच गाडया मोजते. एक, दोन, तीन ..... वीस गाडया धूळ उडवत येतात. सबंध जिल्ह्याची यंत्रणा आज याच कामात दिसते आहे. आज खरं तर कोर्टाच्या इमारतीच्या उद्घाटनासाठी हे  मुख्य न्यायाधीश जाम्बुघोडा इथं आलेले आहेत. एकदा मला  मोह होतो त्या दृश्याचा फोटो काढावा म्हणून. पण मी काही व्यावसायिक फोटोग्राफर नाही - उगीच कशाला पोलिसांचं लक्ष वेधून घ्यायचं?

तर राज्याच्या मुख्य न्यायाधीशांनीही आमच्यासारखी ' थोडं काम आणि थोडी मजा' अशी योजना केलेली दिसते आहे. आमच्या मौजेचा खर्च कोणी उचलला आहे ते मला माहिती आहे - पण या साहेबांच्या मौजमजेच्या खर्चाचा बोजा कोणावर पडणार? - असा एक प्रश्न माझ्या मनात येतोच. उत्तर अर्थातच माहिती आहे आणि पर्याय नसल्याने आपण ते स्वीकारलेलं पण आहे.

त्या न्यायाधीशांनीही 'भीमनी घंटी' ला त्यांच्या स्वप्नातले घर बांधलं की नाही ते मला माहिती नाही. कदाचित नसेलही - स्वतःचं घर असणारे भाग्यवान लोक आहोत आम्ही. कदाचित स्वप्नं पाहण्याइतका  निरागसपणा आता आमच्यात उरलेला नाही. जगताना सारखी बुद्धीची तलवार वापरून आम्ही स्वप्नं पाहण्याची ताकद गमावली आहे का?

आपण सुखी असतो तेव्हाच फक्त बुद्धीवादी असण्याची चैन आपल्याला परवडते का? हाही एक प्रश्नच! अनुत्तरीत प्रश्न!

** 

Tuesday, April 10, 2012

१२१. फिरोजशाह कोटला

दिल्ली आणि फिरोजशाह कोटला हा शब्दांच एकचं नात माहिती होत आजवर. बरोबर ओळखलत - क्रिकेट स्टेडियम. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी दिल्ली टुरिझमच्या बसने प्रवास करताना (हो हो बस) बसमधले अनेक जण 'फिरोजशाह कोटला' या ठिकाणी उतरले तेव्हा मला 'स्टेडियम काय पहायचं' असं वाटलं होत.

त्याआधी कधीतरी एकदा Delhi Metro Walk गटाबरोबर चांदणी  चौकात फिरायला गेले होते. त्यांच्याकडून मागच्या आठवडयात एक पत्र आलं - रविवारी सकाळी 'फिरोजशाह कोटला' कार्यक्रम असल्याच. मग माझ त्यादिवशीच कुतूहल पुन्हा एकदा फणा काढून जागं झालं आणि रविवारी सकाळी मी तिकडे गेले.

नेहमीप्रमाणे पटेल चौक मेट्रो स्थानकाच्या बाहेर भेट, तिथून नवी दिल्ली मेट्रो स्थानक, सायकल रिक्षाने ब्रॉडवे हॉटेलला पोचणे (वाटेत तुर्कमान गेट पाहणे)  आणि तिथून दिल्ली दरवाजा. चालताना एका बाजूचा रस्ता पूर्ण बंद केलेला दिसला. चौकशी केल्यावर कळल की या दर्यागंज भागात दर रविवारी 'पुस्तक बाजार' असतो.  वाटेत दिसलेलं 'तुर्कमान गेट' मला ऐकून माहिती होत ते १९७६ मध्ये आणिबाणीच्या काळात त्या परिसराची 'सफाई' करण्याचा संजय गांधी यांचा प्रयत्न आणि त्यावेळी झालेला गोळीबार या संदर्भात.  दिल्ली दरवाज्यापासून फिरोज शाह कोटलाकडे जाणारा मार्ग प्रशस्त आणि स्वच्छ होता.

खर तर दिल्लीच्या बाबतीत अशी एक धारणा आहे की जो कोणी इथं नवं शहर वसवायचा प्रयत्न करतो; त्याला  सत्ता सोडावी लागते.  अगदी ब्रिटीशांनीही 'आठव  शहर' निर्माण केल आणि त्यांना काही काळातच भारताची सत्ता सोडावी लागली.

तरीही ८व्या शतकापासून ते २० व्या शतकापर्यंत  निरनिराळ्या सत्ताधीशांनी नवनवी शहरे वसवली - आणि या प्रत्येक काळात 'दिल्ली' शहर म्हणजे काय याच्या व्याख्या बदलत राहिल्या. त्यामुळे शहजाहानाबाद या सातव्या शहरात 'दिल्ली दरवाजा' स्वाभाविक असतो - एरवी  दिल्ली शहरात 'दिल्ली दरवाजाच' प्रयोजन काय हे इतिहास माहिती नसेल तर गोंधळाच वाटू शकत. नवी दिल्ली आणि जुनी दिल्ली हे आता वापरले जाणारे शब्द नव्या जमान्यातले आहेत  - त्यांचा इतिहास मात्र वेगळा आहे याच भान ठेवावं लागत सतत.

सातव्या शहरात एकूण १४ दरवाजे होते त्यापैकी आता काश्मिरी , अजमेरी , तुर्कमान आणि दिल्ली हे चार दरवाजे शिल्लक आहेत.  दिल्ली दरवाजाची परिस्थिती - मुख्यत्वे त्याच्या समोरचा परिसर अगदी घाण होता. .

चालत आम्ही फिरोजशाह कोटलाकडे निघालो तेव्हा कळल की आम्ही दिल्लीच्या पाचव्या शहरात प्रवेश करत होतो आणि या शहरांच नावं होत फिरोजाबाद. १३५१ ते १३८८ या काळात फिरोजशाह तुघलक याने या शहराची निर्मिती केली. कोटला म्हणजे कोठी किंवा महाल. फिरोजशहाचा  महाल म्हणून फिरोजशाह कोटला. क्रिकेट स्टेडियम इथून काही मीटर अंतरावर - म्हणून त्याला नावं दिलं फिरोजशाह कोटला.

आज या  महालाचे अर्थात फक्त अवशेष आहेत. दिल्लीत असे अवशेष - खंडहर - जिकडे तिकडे पहायला मिळतात. त्यामुळे नजर मेल्यासारखी होते एका अर्थी. शिवाय अशा स्मारकांची माहिती ऐकण्यात कोणालाही फारसा रस नसतो आणि सांगणारेही नसतात. सुदैवाने मी ज्या समुहाबरोबर गेले होते त्या सगळ्यांना फोटो काढण्यातच फक्त रस नव्हता तर माहिती जाणून घेण्यात पण होता. गटातले निम्मे लोक दिल्लीबाहेरचे होते - पाच जण विदेशी, मी दिल्लीच्या बाहेरची आणि बाकी सगळे दिल्लीचे. आपण या शहरातले असून दिल्लीची आपल्याला माहिती नाही, त्याचा दिल्लीकरांना संकोच वाटत होता. पण त्यामुळे आमची चर्चा चांगली झाली.

फिरोजशाह तुघलक . १३०९ ते २० सप्टेंबर १३८८ हा त्याचा जीवनकाळ. मोहम्मद बिन तुघलकच्या मृत्यूनंतर याच्या हाती सत्ता आली. त्याच्याही राज्यात भ्रष्टचार होता हे वाचताना इतिहासाची नाळ अजून तुटली नाही म्हणून  हसावं की रडावं हे कळलं नाही. त्याच्या कारकीर्दीत पुष्कळ बागा तयार केल्या गेल्या, सराई (धर्मशाळा) आणि कबरी बांधल्या गेल्या  - त्यातून लोकांना काम मिळाले.  शिक्षण अधिक खुले करण्यासाठी त्याने मदरसा खुल्या केल्या. त्याने ३०० गावे वसवली आणि पाच मोठे कालवे  खोदून अधिकाधिक शेतीला पाणी मिळावे याची व्यवस्था केली. त्याने अंबाला आणि मीरतमधून अशोकाचे दोन स्तंभ आणले आणि त्यातला एक स्वत:च्या महालात उभा केला जो आजही आहे. कुतुब मिनारवर वीज पडून  त्याचा वरचा भाग कोसळला तेव्हा त्याने सर्वात वरचे दोन मजले नव्याने बांधले.  हिंदुंच्या दृष्टीने मात्र त्याची कारकीर्द फार सुखावह नव्हती कारण त्याच्या राज्यात हिंदुना जिझिया कर भरावा लागत असे आणि त्यांची कत्तलही मोठया प्रमाणात केली गेली.

या महालातल्या मशिदीला  'जामि मशिद' म्हटले जाते - जामा आणि जामि यात नेमका काय फरक आहे ते मला नाही माहिती.  आजही या मशिदीत तीन वेळा नमाज होतो. मशीद प्रचंड मोठी आहे आणि तिच्या बाजून एके काळी यमुना वहात होती तेव्हा दृश्य रमणीय असेल यात शंकाच नाही.  आता एका बाजूला सुमारे सातशे वर्षांपूर्वीचे बांधकाम आणि दुस-या बाजूला फ्लायओव्हरवरून धावणा-या आधुनिक गाड्या .. असा एक नव्या जुन्याचा संगम आढळतो.


अशोक स्तंभ ज्या चौथा-यावर आहे तिथून परिसराच एकंदर दृश्य दिसलं. त्या काळी आपल्यासारख्या सामान्य लोकांची इथवर यायची काही टाप झाली नसती हे जाणवून गमंत वाटली.

या ठिकाणच आणखी एक आकर्षण म्हणजे ''बाऊली". अनेक वर्ष हिची दुरुस्ती चालली होती म्हणून ती बंदच होती. शिवाय अपघात, दुर्घटना या होतातच अशा ठिकाणी. त्यामुळे पूर्वपरवानगी काढून सुरक्षा रक्षकांच्या सोबतच आता तिथे जावे लागते. "बाऊली" स्वाभाविकपणेच एकदम थंड होती. उतरायच्या पाय-या ब-यापैकी सुस्थितीत होत्या. पाण्यावर भरपूर शेवाळ साठलेले होते. यमुना पूर्वी जवळून वाहात होती - आजही झ-यांच्या पाण्याने विहीर भरलेली आहे. डागडुजी करून आता तिथले पाणी पंपाने उचलून भोवतालच्या बागेला पुरवले जाते.  आम्ही थेट आत उतरलो - म्हणजे पाण्यात नाही पण अगदी हातभर अंतरावरून ते जुने दिसणारे पण प्रत्यक्षात नवे असणारे पाणी न्याहाळताना मजा आली. पूर्वी हा फिरोजशाहच्या कुटुंबियांचा 'हमाम' होता म्हणे!

आणखी एक गमतीशीर गोष्ट म्हणजे दर गुरुवारी संध्याकाळी इथे हजारो लोक येतात - इतक्या संख्येने की तिकीटविक्री बंद ठेवून प्रवेश खुला करावा लागतो. कशासाठी? आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून लोक इथं 'जिन'ची पूजा करतात - इतकेच नाही तर त्यांना पत्रही लिहितात. हे साधारणपणे १९७० च्या आसपास सुरु झाले - पण त्याचा नेमका इतिहास अजून नीट शोधायला लागेल मला. आमच्यातल्या एकाने सुरक्षा रक्षकाला "दिसतात का रे बाबा खरोखर जिन?" असे विचारल्यावर त्याने अगदी नेहमीचे यशस्वी उत्तर दिले, "साहेब, ज्याची श्रद्धा असते, त्याला दिसतात." मी त्यावर मनापासून हसले.

येताना आम्ही 'खुनी दरवाजा' पाहिला. याचे मुळचे नाव 'काबुली दरवाजा' असे साधे सरळ होते, पण इथे घडलेल्या घटनांमुळे आणि या जागेच्या वापरामुळे याला हे वाईट नावं पडले आहे. इथे डाव्या बाजूला मौलाना आझाद वैद्यकीय महाविद्यालयाची इमारत देखणी दिसते. त्यांनतर आम्ही पारसी धर्मशाळेत गेलो आणि त्यांची माहिती जाणून घेतली. दिल्लीत फक्त ८०० च्या आसपास पारसी धर्मीय लोक राहतात हे ऐकून आश्चर्य वाटलं.  मंदिरात अर्थात पारसी नसलेल्यांना प्रवेश नसतो, त्यामुळे ते लांबूनच पाहिलं. पारसी जेवणाचा स्वाद घेऊन आम्ही तिथून परत निघालो.

दिल्लीत फिरताना कधी कधी जाणवत की हे शहर एक प्रकारच्या आंतरिक संघर्षात अडकून बसलं आहे. पुढे जायचं तर इतिहास ओझ होऊन बसलेलं आहे - कारण इथला सत्तेचा इतिहास भयानक आहे. एका अर्थी तो आजच्यासारखाच आहे म्हणा! इतिहास जपायचा तर त्याला जी एक आर्थिक आणि मानसिक सुबत्ता लागते, ती इथं आमच्याजवळ नाही - बहुसंख्य लोक त्यांच्या स्वत;च्या समस्यांनी  ग्रस्त आहेत.   मला वाटत इतिहासाने वेढलेल्या सगळ्याच शहरांची ही एक शोचनीय स्थिती असते - इतिहासात रमणारे लोक या परिसरात राहत नाहीत  - ते उच्चभ्रू वस्तीत राहतात आणि इतिहास अनुभवायला इकडे येतात. जे ऐतिहासिक परिसरात राहतात त्यांचे रोजचे जगण्यामरण्याचे प्रश्न जास्त महत्त्वाचे असतात. त्यामुळे हा तिढा सुटणे अवघड दिसते.

पण दिल्ली जी आहे, ती जशी आहे - तशी का आहे या प्रश्नच उत्तर थोड थोड मिळत आहे मला दिल्लीच्या भटकंतीतून. अर्थात माझ्या या अति आत्मविश्वासाला दिल्ली हसत असणार आणि एखाद्या दिवशी ती मला वेगळच काही दाखवेल  याची मला  खात्री आहे ... त्यासाठी मी अर्थातच तयार आहे! 

Sunday, April 1, 2012

१२०. पुन्हा जंतर मंतर: भाग २


दोन शहीदांची माहिती देऊन झाल्यावर टीम अण्णाचे एक ज्येष्ठ सदस्य श्री. संतोष हेगडे बोलायला येतात तेव्हा त्यांच्यासाठी खुर्ची येते. ते ७२ वर्षांचे आहेत (असे तेच सांगतात पुढे) त्यामुळे त्यांना कदाचित उभ राहून बोलायला त्रास होत असणार. त्यांच्या सोबत श्री. केजरीवाल दुसरा ध्वनिवर्धक हातात घेऊन का उभे आहेत हे मला आधी कळत नाही - पण ते पुढच्याच क्षणी कळत. हेगडे साहेब इंग्रजीत बोलतात आणि दर दोन तीन वाक्यांनंतर त्यांचा अनुवाद केजरीवाल (त्यांचा उल्लेख इथ अरविंदभाई असा होतो आहे) करतात. मला केजरीवालांच्या साधेपणाचं कौतुक वाटत. तितक्याच सहजतेने ते पुढे आंध्र प्रदेशातून सोला रंगा राव यांच्या नातेवाईकांच्या इंग्रजी बोलण्याचा अनुवाद हिंदीत करतात. केजरीवालांशी वैचारिक मतभेद आपले असू शकतात पण हा माणूस हाडाचा  कार्यकर्ता आहे याची खूणगाठ नकळत माझ्या मनात बांधली जाते. कर्नाटकातील अवैध खाणकामाचा तपास लोकायुक्त या नात्याने श्री. हेगडे यांनी सुमारे चार वर्षे केला आहे आणि त्याचा २६००० पानांचा अहवालही सादर केला आहे. श्री. हेगडे यांच्या मते कर्नाटकातील अवैध खाणकामात ३ मुख्यमंत्री, ५ मंत्री आणि ७०७ अधिका-यांचा सहभाग आहे. श्री. हेगडे स्पष्टपणे सांगतात, "राजकीय पाठबळाशिवाय इतक्या मोठया प्रमाणावर बेकायदेशीर काम होऊ शकत नाही."

उत्तर प्रदेशच्या समाजकल्याण खात्यातील अधिकारी श्री. रिंकु सिंग राही हे नंतर बोलायला समोर येतात. त्यांना धमक्या तर अनेक मिळाल्या आहेत  आणि या गृहस्थावर  एकदा सहा  गोळ्या झाडल्या गेल्या आहेत - त्यात त्यांनी एक डोळा गमावला आहे; त्यांचा जबडा कायमचा वाकडा झाला आहे; त्यांच्या दोन्ही हातांत गोळ्या घुसल्या आहेत. आता कृत्रिम डोळा बसवून ते काम करतात. हे असे घडण्याचे कारण? आपल्याच खात्यातील भ्रष्टाचाराविरुद्ध ते लढत आहेत. “मी मेलो नाही या शहीदांसारखा गोळ्या खाऊन याचे मला कधीकधी वाईट वाटते” अशी सुरुवात करून ते म्हणाले, "याचा अर्थ इतकाच की माझे इथले काम अजून संपले नाही." हा गृहस्थ २६ मार्चपासून लखनौमध्ये उपोषणाला बसणार होता. इतके सोसून, हाती काही न पडूनही या माणसाकडे लढण्याची प्रेरणा कुठून आली असेल असा प्रश्न मला त्यादिवशी पडला. हा माणूस अशी लढाई लढताना आणखी किती काळ जिवंत राहू शकेल अशी एक काळजी मला त्या वेळी वाटली, आजही वाटते.

श्री. मनीष सिसोदिया यांनी गेल्या एप्रिलपासून घडलेल्या घटनांचा संक्षिप्त आढावा सादर केला. त्यानंतर बोलायला उभे राहिले अरविंदभाई. अरविंदभाईंनी लोकांना एक थेट प्रश्न विचारला. "सध्याची संसद जन लोकपाल बील आणेल असे तुम्हाला वाटते का?" यावर समुहाने एकमुखाने "नाही" असा घोष केला. हे का शक्य नाही याचे स्पष्टीकरण मग अरविंदभाईंनी सविस्तर दिले. "मी संसदेचे पावित्र्य मानतो, तिचा अपमान होईल असे वक्तव्य मी कधीही केलेले नाही" असे सांगून ते म्हणाले की, "संसदेत बसणारे लोकच संसदेचा अपमान त्यांच्या व्यवहारातून करत असतात हे पुन्हापुन्हा दिसते आणि त्यामुळे मी व्यथित होतो."

प्रसारमाध्यमांचा हवाला देत त्यांनी पुढे म्हटले की, "आज लोकपाल कायदा असता तर केंद्रिय मंत्रीमंडळातील १४ मंत्र्यांवर अधिकृत तक्रार दाखल करता येईल. कोण असतील हे मंत्री, सांगा पाहू" असे लोकांना त्यांनी आवाहन केल्यावर लालूप्रसाद यादव, राहुल गांधी अशी नावे प्रथम पुढे आली. "अरे, हे केंद्रिय मंत्री नाहीत" असे अरविंदभाईंनी समजावून सांगितल्यावर मग लोकांनी चिदंबरम आणि कपिल सिब्बल या दोघांपासून सुरुवात केली. तांदूळ निर्यातीच्या भ्रष्टाचाराचा उल्लेख झाल्यावर "चावलचोर" अशी पदवी लोकांनी दिली. कोळसा घोटाला आदल्या दिवशीच उघड झाला होता - त्याचीही चर्चा झाली. एअर इंडियाला आवश्यकता नसताना कशी विमाने खरेदी करण्यात आली आणि त्यामुळे देशाचे किती नुकसान झाले हेही त्यांनी सांगितले. या चौदा मंत्र्यांच्या यादीत चार मंत्री महाराष्ट्रातले आहेत - म्हणजे निदान या क्षेत्रात तरी महाराष्ट्र मागे नाही(!) असे म्हणता येईल. या चर्चेच्या दरम्यान लोकसभेत लोकपाल बीलावर झालेल्या चर्चेच्या काही क्षणफिती दाखवण्यात आल्या. संसद किती गांभीर्याने या विषयावर चर्चा करत होती, याचे पुन्हा एकदा झालेले दर्शन लोकांना चीड आणणारे होते.

केजरीवालांनी संसदेतील आकडेवारी जाहीर केली. ते म्हणाले: “आज लोकसभेत १६२ खासदार असे आहेत की ज्यांच्यावर ५२२ विविध अपराधांबाबत तक्रार दाखल झालेली आहे. देशभरात एकूण ४१२० आमदार आहेत, त्यांपैकी ११७६ आमदारांवर गुन्हे दाखल आहेत. गुन्ह्याचा आरोप झाला म्हणजे कोणी लगेच गुन्हेगार ठरत नाही हे मान्य करूनही काही प्रश्न शिल्लक राहतातच. न्याय जलद न मिळण्यात राजकीय नेत्यांचा फायदा असतो त्यामुळे तीस तीस वर्ष खटला चालू राहणा-या व्यवस्थेत आपण काहीच दुरुस्त्या केल्या नाहीत असे सांगून त्यांनी मागणी केली की : आमदार-खासदारांवरील गुन्ह्यांचा निकाल लावण्यासाठी 'फास्ट ट्रॅक कोर्ट' स्थापन करा; वर्षभरात त्यांच्यावरचे खटले चालवून निकाल जाहीर करा; जे दोषी आहेत त्यांना शिक्षा होईल; जे निर्दोष आहेत त्यांना परत त्यांचे संसदेतले, विधानसभेतले स्थान द्या.” हीच आकडेवारी पुढे केजरीवाल यांनी राज्यसभेकडून त्यांना आलेल्या 'संसदेचा अपमान केल्याच्या' नोटीसला दिला आहे. ते सविस्तर उत्तर इथे पाहता येईल. ज्यांच्यावर आरोप आहेत अशा लोकांना विविध राजकीय पक्ष निवडणुकीचे तिकिट देतातच का? - असाही एक मूलभूत प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

किरण बेदी यांना मागच्या दोन्ही प्रसंगी मी ऐकलं नव्हत - ती संधी आज मिळाली. थोडसं पुढे झुकून शांतपणे बोलण्याची त्यांची शैली एखाद्या अभ्यासू प्राध्यापकाला साजेशी वाटली. मधेच कोणीतरी बोलत होत आपापसात तेव्हा त्यांना "आप दो मिनिट चूप बैठेंगे?" असं विचारताना त्या पोलिस अधिकारी होत्या त्यांच्या उमेदीची अनेक वर्षं हे चांगलच जाणवलं. आश्चर्य म्हणजे होत असलेल्या घटनांची जबाबदारी काही अंशी आपलीही आहे - हे त्यांनी लोकांना समजावून सांगितलं. आपलं 'एक' मत मौल्यवान आहे आणि आपण ते जबाबदारीने वापरलं पाहिजे याची त्यांनी लोकांना आठवण करून दिली. लोकपाल बील लोकसभेत मंजूर झालेलं आहे आणि राज्यसभेत बाकी आहे, राज्यसभेतली पक्षनिहाय स्थिती कशी आहे, सी.बी.आय. लोकपालच्या अखत्यारीत येत की नाही हा कसा महत्त्वाचा मुद्दा आहे अशा अनेक गोष्टी अतिशय सोप्या भाषेत त्यांनी समजावून सांगितल्या. पण लोकांना बहुतेक त्यांच्यावर जबाबदारी टाकलेली आवडत नाही. कारण बेदी बोलत असताना माझ्याशेजारी सकाळपासून बसलेला एक तरूण फोनवर सांगत होता, " अरे, यह मॅडम अब बोअर कर रही है, चलो, निकल जाते है यहासे ...".

सगळ्यात शेवटी अण्णा बोलायला उठले तेव्हा समूह एकदम शांत झाला. "प्रजासत्ताक दिवस आपण गावात साजरा करतो पण सत्ता मात्र मुंबई-दिल्लीत असते" असं सांगून ते म्हणाले, "की चूक आपलीच आहे. मालक आपण असून आपण झोपी गेलो. ज्यांना आपण सेवा करायला निवडून दिले ते मग आपल्या तिजोरीवर डल्ला मारायला लागले." अण्णांची ही सोपी साधी भाषा समुहाला भुरळ घालते हे मी पुन्हा एकदा पाहिलं. अण्णा अनेक मराठी शब्द त्यांच्या भाषणात वापरतात. आजही ते म्हणाले, "अभी जग गये है अच्छी बात है, लेकिन अब दुबारा डुलकी मत लेना." आता तिथं डुलकी शब्दाचा अर्थ कोणाला कळणार? माझ्या शेजारचा एक माणूस म्हणाला, "यह क्या बोल रहे है अण्णा?" त्यावर दुसरा म्हणाला, "अरे, झपकी मत लेना ऐसा बता रहे है". त्यावर तिसरा म्हणाला, "यह अण्णा थोडे और पढे-लिखे होते तो अच्छा होता" त्यावर चौथा म्हणाला, "अरे, जादा पढे-लिखे लोगोंनेही तो हमको मूर्ख बनाया है आज तक, हमे ऐसाही गाँवका आदमी चाहिये."

"मी मंदिरात राहतो, माझ्याजवळ काही नाही; तरी मी आजवर ४ मंत्र्यांच्या आणि ४०० अधिका-यांच्या विकेट घेतल्या आहेत" हे अण्णांच बोलणं कोणालाच आत्मप्रौढीच वाटलं नाही यातून लोकांचा अण्णांवरचा विश्वास दिसून येतो. अण्णांनी मग नकाराधिकार, निवडून दिलेला प्रतिनिधी परत बोलवण्याचा अधिकार यावर त्यांचे विचार मांडले. बाबा रामदेव आणि ही टीम एकाच लढयाचा भाग आहेत आणि इथून पुढच्या घडामोडींत ते एकमेकांच्या बरोबर असतील अशीही घोषणा त्यांनी केली. (भ्रष्टाचार करणारे एक होतात, तर भ्रष्टाचाराविरोधात लढणा-यांनी एक का होऊ नये असे आधीच कोणीतरी बोलण्याच्या ओघात म्हणून गेला होता.) लोकांनी याही घोषणेचे स्वागत केले. ज्या चौदा मंत्र्यांची नावे केजरीवालांनी वाचून दाखवली होती, त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल न झाल्यास ऑगस्टमध्ये आंदोलन पुढचे पाउल उचलेल असेही त्यांनी सांगितले.

दिवसभराचा कार्यक्रम एकंदर शांततेत आणि शिस्तीत पार पडला. असंख्य तरूण स्वयंसेवक ही शिस्त राखण्यासाठी कायम उभे होते सभोवताली. त्यांचेही कौतुक वाटले.

एक दोन गोष्टी अर्थातच मला खटकल्या. उदाहरणार्थ इमामांचे 'संपूर्ण मुस्लिम समाज या आंदोलनाच्या पाठीशी उभा असल्याची घोषणा'. संपूर्ण मुस्लिम समाजाच्या वतीने बोलण्याचा इमामाचा अधिकार हा देखील माझ्या मते एक पारंपरिक भ्रष्टाचार आहे. मुस्लिम नागरिकांना त्यांचे स्वतंत्र मत असण्याचा अधिकार हे आंदोलन पण नाकारते का - असा एक प्रश्न माझ्या मनात आलाच. 

दुसरे म्हणजे जंतर मंतर इथे आणखी एका गटाचे गेले सहा दिवस आमरण उपोषण चालू होते - तिथेही सुमारे पाचशे लोक होते. प्रसारमाध्यमांनी अण्णांच्या कार्यक्रमाला जितके महत्त्व दिले, तितके त्या दुस-या आंदोलनाला  नक्कीच दिले नसणार. ते बिचारे आधी शांत बसले होते. पण या व्यासपीठावरून कोणी त्यांची साधी दखलही घेतली नाही. मला वाटत होते की सिसोदिया, संजय सिंग, केजरीवाल यांपैकी कोणीतरी त्या आंदोलनकर्त्यांचा उल्लेख करतील पण तसे काहीच झाले नाही. मग ते आंदोलनकर्ते बिचारे थोडे नाराज झाले. "आम्हीही अण्णांचे समर्थक आहोत, भ्रष्टाचाराविरुद्ध आम्हीही लढत आहोत, आपला लढा एकच आहे अशी आम्ही अण्णांना आणि केजरीवालांना विनंती करतो" असे सारखे ध्वनिवर्धकावरून सांगत होते ते - पण इथे व्यासपीठावर बसलेले लोक काही ऐकू येत नसल्यासारखे बसले होते. ते दुसरे आंदोलनकर्ते इकडे बेदी, केजरीवाल, अण्णा बोलले तेव्हा एकदम शांत होते. पण बाकी वेळ त्यांच्या घोषणा, त्यांची भाषणे, त्यांची गाणी चालू होती. मला आंदोलनाचे वागणे काहीसे बालिश वाटले. ठीक आहे, त्या दुस-या आंदोलनाचा अजेंडा काय आहे ते माहिती नसेल, तेही आंदोलन गळ्यात घ्यायची टीम अण्णाची तयारी नसेल - हे सगळे मान्य आहे. पण आपल्यासारखच दुसरही कोणीतरी लढतं आहे, तेंव्हा निदान त्याला पाठिंबा देण्याचा मोठेपणा आंदोलनाने दाखवायला पाहिजे होता असं मला वाटलं. शेवटी कधीतरी तो भाग झाला पण माझ्या मते तोवर बराच उशीर झाला होता.

पण अशा घटनाच तर अधोरेखित करतात की हे आंदोलन माणसांनी चालवलेलं आहे, त्याला मर्यादा आहेत आणि चमत्कार काही एका रात्रीत घडणार नाही!!