ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Saturday, August 18, 2012

१३४. 'रंगीत'तीरी

"वाय वाय"? का मोमो? काय खाणार मॅडम तुम्ही?" माझ्या सहका-याने विचारलं.
मोमो मला माहिती आहेत आणि आवडतातही. दिल्लीत आल्यापासून तर ते ब-याचदा खाल्ले आहेत.
पण आज मला नको होते मोमो. काल दुपारी आणि काल संध्याकाळी असे दोन्ही वेळा मोमोच खाल्ले होते मी.
पण 'वाय वाय'  म्हणजे काय? मी विचारलं आणि कळलं की वाय वाय  म्हणजे एक प्रकारचे नूडल्स.

सिक्कीम राज्यातल्या नामची  परिसरातल्या (दक्षिण सिक्कीम जिल्ह्यातल्या) सिक्कीप या गावात होते मी. सोबत स्थानिक पाच सहा सहकारी. सकाळी 'वाक' गावात डोंगर चढून-उतरून कॅलरीज ब-यापैकी  खर्च झाल्या होत्या आणि मला चांगली भूक लागली होती. पण इथं 'वाय वाय'  आणि मोमो असे दोनच पर्याय दिसत होते.

'वाय वाय' खाउन माझं पोट भरलं पण माझ्या सहका-यांची भूक भागली नव्हती. सूप, मोमो मागवण्याचा त्यांचा बेत ऐकून मी म्हटलं, "तुम्ही सावकाश पोटभर खा. मी तोवर बाहेर भटकते; काही फोटो काढते." त्यांना नेपाळी भाषेत बोलता येत नव्हतं आपापसात माझ्या उपस्थितीत - त्यामुळे त्यांनीही लगेच परवानगी दिली मला.

मी बाहेर आले तर डाव्या बाजूला मस्त नदी होती. मघा जाताना दिसली होती - तिचं नाव आहे 'रंगीत' नदी. तिस्ता नदी - जी सिक्कीमची जीवनदायिनी आहे - तिची ही एक उपनदी. तिस्ता नदीबद्दल स्वतंत्रपणे लिहायला हवं - पण ते आज नाही. नदीच्या पाण्यात किमान पाय तरी भिजवावेत असा माझा बेत होता. पण माझ्या लक्षात आलं की नदीचं पात्र एकदम खोल आहे आणि नदीत उतरायला वाटच नाही. शिवाय नजर पोचेल तिथवर कुणीही नदीच्या पात्रात - त्याच्या जवळपासही - नव्हत; आणि हे आजच नाही तर मागचे तीन दिवस. स्वाभाविक आहे म्हणा. नदी इतकी रोरावत धावते आहे की कुणाची हिंमत नसणार तिच्या जवळ जाण्याची. मीही तो विचार सोडून दिला.

डावीकडे एक पूल दिसला. सिक्कीममध्ये हे पूल वारंवार लक्ष वेधून घेतात. हे पूल नसतील त्या काळात अनेक गावांचा इतरांशी संपर्क तुटत असणार नक्कीच. हे पूल दिसतात जुने-पुराणे; कधी कोसळतील माहिती नाही असं त्यांच्याकडे पाहून वाटतं- पण आहेत ते भक्कम. अगदी भक्कम. सारी वाहतूक पेलणारे आणि लोकांना जोडणारे पूल!

मी त्या पुलाचा फोटो काढायला माझ्या कॅमे-याची जुळणी करत होते तेव्हा त्या दोघांना मी पाहिलं. पुलाच्या अगदी मध्यभागी ते दोघे गप्पा मारत उभे होते. माझ्या हातातला कॅमेरा पाहून आधी ते थोडे बिचकले होते पण आता वळून ते थेट माझ्याकडे पहात होते. मी घाई न करता त्यांचा दिशेने चालत गेले. आता ते अधिकच उत्सुकतेने माझ्याकडं पहात होते. हसावं की नाही असा संभ्रम त्यांच्या चेह-यावर स्पष्ट दिसत होता. मी हसले.

"फोटो काढू तुमचा?" मी हिंदीत विचारलं. एकाने लगेच हसून परवानगी दिली आणि सज्जही झाला तो. दुसरा मात्र लगेच संशयाने म्हणाला, "नेपाळी नाही येत तुम्हाला बोलता?" त्यावर मी नकारार्थी मान हलवली. दुसरा विचारात पडला. पण पहिल्याला आता ही संधी गमवायची नव्हती. त्याने आपल्या मित्राला गप्प बसवलं.

फोटो काढला, तो दाखवला. दोघेही एकदम खूष झाले.
"एकटयाच आहात तुम्ही?" एकाने विचारलं.
"नाही, एकटी नाही. माझ्यासोबतचे लोक जेवताहेत. माझं झालं जेवण म्हणून फोटो काढायला आले मी." मी स्पष्टीकरण दिलं.
"हॉटेलात का जेवताय? तुमचं घर नाही इथं" आणखी एक प्रश्न.
"नाही, माझं घर नाही इथं" मी सांगितलं.
"मग कुठ आहे घर?" पुन्हा प्रश्न.
"दिल्लीत" - माझं उत्तर.
"हं.. म्हणून तुम्हाला नेपाळी येत नाही" समंजस प्रतिक्रिया.

"इथं कुणाकडं आलात?" पुन्हा प्रश्न.
मी ज्या कार्यालयात आले होते, ते हाताने दाखवलं.
"हं .. माहिती आहे मला ते ऑफिस. तिथल्या साहेबांकडे आला होतात का कामाला?" आणखी विचारणा.
"हो" माझं उत्तर.
"आता कुठं जाणार?"
"नामचीला" मी सांगितलं.
"ती जीप दिसतेय ती तुमची की त्यामागची पांढरी गाडी?" मुलांच निरीक्षण चांगलं होतं एकंदरित. मी सांगितली कोणती गाडी ती.

मग जरा मीही प्रश्न विचारायचं ठरवल.
दोन्ही पोरं लहानखुरी दिसत असली तरी पाचवीत शिकत होती. शाळा; नेपाळी भाषा; शाळेत मिळणारं जेवण; तिथले शिक्षक; होस्टेल आणि होस्टेलमध्ये राहणारी मुलं... याबाबत त्यांच्याशी मस्त गप्पा झाल्या माझ्या.

"आता इथं काय करताय तुम्ही?" मी विचारलं.
"पाणी पाहतोय नदीचं" त्यांच एकमुखी उत्तर.


मग नदीचं नाव 'रंगीत' आहे, तिच्या वरच्या बाजूला एक धरण आहे; दिवसा पाणी वाढतं आणि रात्री मात्र कमी होतं (कारण पाउस रात्री जास्त पडतो आणि दिवसा कमी) अशी बरीच माहिती त्यांनी पुरवली.  पोहायला येत त्यांना पण या नदीत पावसाळ्यात कुणीच पोहत नाही हेही सांगितलं.

"मासे आहेत का नदीत?" माझा आपला उगाचच एक प्रश्न.
"आत्ता नसतात मासे. फुलांचा जसा सीझन असतो ना, तसा माशांचाही असतो सीझन - पाउस संपल्यावर येतात ते ..."त्याचं समजूतदार स्पष्टीकरण.

"तुमची गाडी निघाली बघा. पळा लवकर, नाहीतर तुम्हाला सोडून जातील ते लोक ..." माझी गाडीकडे पाठ असल्याने मला ती दिसत नव्हती पण या दोघांच लक्ष होत. गाडी काही मला सोडून जाणार नव्हती. त्या मुलांना माझी काळजी वाटावी याची मला गंमत वाटली. 
"इकडून पुलावरूनच जाईल ना गाडी? घेतील ते मला इथं..." मी.
"नामची इकडे कुठे? ते त्या रस्त्याने आहे ..." असं म्हणत त्या दोघांनी मला जवळजवळ ढकललचं म्हणा ना!

मी हात हलवून त्यांचा निरोप घेतला.
सगळ काही हेतू ठेवून करा;  'अनोळखी लोकांशी मैत्री करू नका'; स्वत:चं खाजगीपण जपा ... अशा सूचनांचा भडीमार शहरात सतत होत असतो. माणसांवर विश्वास न ठेवण्याचं शिक्षण आपल्याला वारंवार दिलं जातं - त्याला कारणंही आहेत परिस्थितीने दिलेली आपल्याला.

अशा वातावरणात ओळख नसताना कोणीतरी माझ्याशी अर्धा तास गप्पा मारल्या, माझ्यावर विश्वास ठेवला, माझी काळजी केली, विचारपूस केली, मला समजून घेतलं - याचं मला अप्रूप आहे.

रंगीत नदीच्या खळाळत्या पाण्याबरोबर, तिथल्या नजर पोचेल तिथवर असणा-या हिरव्या डोंगररांगांबरोबर मला लक्षात राहिला आहे तो रंगीततीरी त्या दोन मुलांबरोबर सहज घडून आलेला एक निरागस संवादही. 

Friday, August 3, 2012

१३३. ऑन डयूटी

(सगळ्यात आधी या इंग्रजी शीर्षकाबद्दल माफी मागते. पण या अनुभवाला समर्पक मराठी शब्द मला सुचले नाहीत; कोणी ते सुचवल्यास त्याचा जरुर उपयोग करेन.)

त्यादिवशी मी आणखी एका प्रवासाला निघाले होते. गाडी मुंबई सेंट्रल स्थानकावरुन सुटणार होती आणि त्यासाठी मी तिथं वेळेच्या बरीच आधी पोचले होते. खरं सांगायचं तर या गाडीने प्रवास करताना मी नेहमीच वेळेच्या आधी पोचते. पुण्यातून मुंबईला पोचणा-या रेल्वे गाडीच्या वेळात आणि या गाडीच्या वेळात तब्बल दोन एक तासांच अंतर आहे. डेक्कन क्वीन किंवा प्रगती एक्स्प्रेसने आलं की मी साधारण साडेअकराच्या सुमारास इथं पोचते. मग मी तिथं काहीतरी खाते, पुस्तक किंवा वर्तमानपत्र वाचत बसते. हे काही करायचं नसलं तर स्थानकावरच्या असंख्य प्रवाशांकडे पहात बसते - त्यांच्या ध्यानात येणार नाही अशा बेताने! 

मला जी गाडी पकडायची होती ती होती कर्णावती एक्स्प्रेस. ती भल्या पहाटे अहमदाबादहून निघून इथंवर येते. इथं अर्धा तास थांबून परतीची वाट घेते. सगळा दिवस प्रवासात गेला तरी मला हीच गाडी सोयीची वाटते. माझे इतर सहकारी दुसरे काही प्रयोग करत असतात - म्हणजे पुणे-मुंबई बसचा प्रवास, किंवा पुणे-अहमदाबाद अहिंसा एक्स्प्रेस, किवा पुण्यातून सुरत अथवा वडोद-याला बसने जाणे वगैरे. पण मी मात्र डेक्कन/प्रगती - कर्णावती हेच सूत्र पकडून आहे. अगदी पर्यायच नसेल तेव्हाच मी लांबचा प्रवास बसने करते. 

कर्णावती एक्प्रेस फलाटावर आल्याची घोषणा झाली तरी अर्धा तास थांबून रहावं लागतं. मी आधी म्हटल्याप्रमाणे ही सकाळी निघालेली गाडी असते आणि हा शेवटचा थांबा असतो - त्यामुळे गाडीत प्रचंड कचरा साठलेला असतो. लोक रेल्वेचे डबे किती घाण करतात हे पाहून नवल वाटतं. रेल्वेचे सफाई कर्मचारी गाडी आली की डब्यात चढतात आणि साफसफाई करायला लागतात. 

एकदा सफाई झाली, डब्यातला एसी सुरु झाला की मी आत चढते. आता दहा मिनिटांत कशाची अपेक्षा करायची ते मला अनुभवाने माहिती आहे - मग मी त्याची वाट पहायला लागते. बरोबर दहा मिनिटांत फिकट बदामी रंगाची मऊशार त्वचा असणारा एक सुंदर कुत्रा त्या डब्यात प्रवेश करतो. त्याच्या गळ्यातल्या साखळीची सूत्रं वरवर पाहता पोलिसाच्या हातात आहेत असं दिसतं. पण तो पोलिस आणि तो कुत्रा यांच्यात एकमेकांना त्रास न देण्याचा एक शब्दविरहित करार आहे असं मला त्यांच्याकडे पाहताना नेहमी जाणवतं. त्यांच्या नात्यात कसलाही ताण आणि कसलाही अभिनिवेश दिसत नाही. 

आता हे थोडंसं गंमतीदार आहे. रेल्वे पोलिसांबद्दल पूर्ण आदर राखूनही मला या प्रसंगात नेहमी हसू येतं. कर्णावती गाडीची तपासणी बॉम्ब ओळखता येणा-या कुत्र्याकडून केली जाणं - यात काय विनोदी आहे असा प्रश्न ज्यांनी त्या गाडीने नियमित प्रवास केला नाही त्यांना नक्कीच पडेल. पण मला तो पडतो. रोज घडयाळाच्या काटयाचे पालन करत या गाडीची तपासणी होते. कोण दहशतवादी इतके मूर्ख असतील की ते बॉम्ब सोबतच्या सामानात घेऊन या डब्यात कुत्रा येण्यापूर्वी चढतील? ते अर्थातच बोरिवली स्थानकात - जिथं अशी तपासणी होत नाही - या गाडीच चढू शकतात, ते वापी, वलसाड किंवा वडोदरा स्थानकात गाडीत चढू शकतात आणि घातपात घडवून आणू शकतात. अगदी मुंबई सेंट्रल स्थानकातही कुत्रा डब्यातून बाहेर पडल्यावर चांगली दहा मिनिटं असतात - तेव्हाही ते आरामात डब्यात चढू शकतात.  

त्यामुळे रेल्वेने तपासणीची जागा, वेळ, क्रम .. हे बदलतं ठेवायला हवं. पण आपल्याकडे शिस्त म्हणजे शिस्त, नियम म्हणजे नियम असतो - तो काटेकोरपणे पाळला जातो. अगदी यांत्रिकपणे पाळला जातो. 

मी दोन -तीन महिन्यातून किमान एकदा हा प्रवास करते. त्यामुळे या कुत्र्याला मी अनेकदा पाहिलं आहे, त्याच्याबद्दल माझ्या मनात प्रेम आहे. माणसांनी बॉम्ब निर्माण करायचे आणि ते शोधून काढत कुत्र्यांनी माणसांचे प्राण माणसांपासून वाचवायचे - हा कसला न्याय आहे हे काही मला कळलेलं नाही आजवर! हा कुत्रा अतिशय शांतपणे आपलं काम करतो. तो अतिशय स्वच्छ दिसतो नेहमीच. हा कुत्रा माझ्याजवळून जातो तेव्हा त्याच्या पाठीवरुन मायेने हात फिरवावा अशी इच्छा माझ्या मनात येते - पण मी ते करत नाही. उगाच पोलिसाचं लक्ष मला माझ्याकडे वेधून घ्यायचं नाही आणि तो कुत्रा माझ्या वागण्यावर तितका प्रेमळ प्रतिसाद देईल याचीही मला खात्री नाही - अजिबातच नाही. 

जोपर्यंत कुत्रा डब्यात असतो, तोवर सगळे प्रवासी आपापले बोलणे थांबवून शांत बसतात. कुत्रा जसा पुढे जातो, तशी प्रवाशांची नजरही त्याच्याबरोबर फिरत जाते. वातावरणात 'आता इथं काही सापडेल कां?' असा एक प्रकारचा तणाव असतो. एकदा का तो कुत्रा डब्याच्या बाहेर पडला की सगळ्यांचे रोखून धरलेले श्वास पूर्ववत गतीने चालायला लागतात आणि माणसं निवांतपणे परत आपापल्या उद्योगांना लागतात. हेही सगळे नेहमीचे - अगदी अपेक्षित. 

त्यादिवशी मात्र एक अघटित घडलं. एक पांढ-या रंगाचा शर्ट आणि त्याच रंगांची अगदी कडक इस्त्री केलेली पॅन्ट घातलेला एक माणूस एकदम त्या कुत्र्याशी बोलायला लागला. तो माणूस कोणालातरी गाडीत पोचवायला आला होता असं वाटलं कारण तो उभा राहून कोणाशीतरी बोलण्यात अगदी मग्न होता. जेव्हा तो कुत्रा त्यांच्या जवळून जायला लागला तेव्हा त्या माणसाचे लक्ष तिकडं गेलं. गप्पा थांबवून तो कुत्र्याशी बोलायला लागला - ते बोलणं जणू काही त्या दोघांची खास ओळख असावी अशा थाटाचं होतं. आश्चर्य म्हणजे तो पोलिसही थबकला आणि त्या माणसाने कुत्र्याशी बोलण्यावर त्याने काही आक्षेप घेतला नाही. 

लक्षात यावं न यावं इतक्या काळासाठी कुत्राही थबकला. तो जणू त्या माणसाचं बोलणं ऐकत होता - पण त्याने प्रतिसाद काहीच दिला नाही. कुत्र्याची ना शेपटी हलली, ना त्याने त्या माणसाकडे मान उचलून पाहिलं. त्या सफेद कपडे घातलेल्या माणसाचा हात कुत्र्याच्या पाठीकडे येताना मात्र कुत्र्याने नजर वर केली. त्या नजरेत काय होतं मला माहिती नाही पण त्या माणसाचा हात आपोआप मागे गेला. 

"टायगर माझी ओळख विसरला की काय पार?" त्या माणसाने पोलिसाला तक्रारवजा सुरात विचारलं.

पोलिसाचं नम्र उत्तर मला चकित करणारं होतं. पोलिस म्हणाला, "माफ करा साहेब. रागावू नका. पण टायगर डयूटीवर असताना कोणाला ओळख दाखवत नाही. त्याचं पहिल्यापासून असंच आहे. ..." पोलिसाच्या स्वरांत नकळत एक अभिमान डोकावून गेला यात शंका नाही. 

तो कुत्रा आणि तो पोलिस दोघेही जणू काही घडलंच नाही अशा थाटात पुढे गेले. 

तो पांढ-या कपडयांतला माणूस स्वतःशीच हसला. माझ्या प्रश्नार्थक नजरेचा त्याच्यावर ताण आला असणार. कारण मी काहीही विचारलं नाही तरी तो म्हणाला, "मॅडम, आजकाल कुत्रीसुद्धा हुशार झालीत बघा. मी या टायगरचा प्रशिक्षक होतो - मी त्याला अनेक गोष्टी शिकवल्यात आणि पठ्ठा मलाच ओळख दाखवत नाही. कां, तर म्हणे ऑन डयूटी आहे! काय माणसाची दशा झाली आहे पहा. डयूटीवरचा कुत्रासुद्धा तुमची काही ओळख ठेवत नाही, माझी लाजच काढली म्हणा की टायगरने!"

परत तो माणूस हसला - काहीसं स्वतःशी, काहीसं माझ्याकडं पाहून.   

टायगरच्या वर्तणुकीबद्दल त्याच्या प्रशिक्षकाला समाधान वाटलं की दु:ख - हे मात्र मला सांगता नाही येणार!! 
**