ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Tuesday, April 13, 2010

२७. काही कविता: ११ कृष्ण तो आतला...

रोजचाच त्याने
धावा हा घेतला
गूढ डोहाच्या तळात
उभा अंगार पेटला.

युद्धे घमासानी
हळू प्राण हा बेतला
श्वासामागे श्वास
कसा, न कळे रेटला.


निसटून गेले, त्याचे
भय ना मातीला
उणे काही नाही
भेद जागत्या वातीला.

प्रपंच देहाचा
उन्मळे रातीला
पावसाची लय
अशी अखंड साथीला.

अदूर सुदूर
घन कधीचा मातला
झोपाळला आहे
परी कृष्ण तो आतला.


पुणे ८ सप्टेंबर २००५ १९.००

Thursday, April 1, 2010

२६. विझता विझता स्वतःला....

नारायण सुर्वे यांची ही एक कविता.

विझता विझता स्वतःला सावरण्याची किमया सर्वांनाच जमते असे नाही..
किंवा असेही होते की, अनेकदा ही किमया जमली तरी कधीतरी एखादा क्षण असा येतो ... की ते जमत नाही. आपल्या डोळ्यांसमोर बघताबघता माणसे जगण्याची ऊर्मी गमावून बसतात... अनेकदा त्यांना असेही जगावे लागते की त्या जगण्यापेक्षा खरे तर मरणही परवडावे...

आपले असे तर होणार नाही ना, किंबहुना आपले आधीच असे ’विझणे’ तर झालेले नाही ना अशी शंका मनात येते.

ही कविता जगता येणे जमले तर आणखी काय हवे?


झूट बोलून आयुष्य कुणालाही सजवता येते
अशी आमंत्रणे आम्हालाही आली; नाहीच असे नाही.

असे किती हंगाम शीळ घालत गेले घरावरून
शब्दांनी डोळे उचलून पाहिलेच नाही, असेही नाही.

शास्त्र्याने दडवावा अर्थ, आम्ही फक्त टाळच कुटावे
आयुष्याचा अनुवादच करा सांगणारे खूप: नाहीत असे नाही.

असे इमान विकत घेणारी दुकाने पाडयापाडयावर
डोकी गहाण टाकणारे महाभाग नाहीत असेही नाही.

अशा बेईमान उजेडात एक वात जपून नेताना
विझता विझता स्वतःला सावरलेच नाही, असेही नाही.