ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Tuesday, September 27, 2011

९१. भक्तीहीनता

आजवर अनेक लोकांनी माझ्यात भक्तीचं, श्रद्धेचं बीज रुजावं म्हणून प्रयत्न केले आहेत पण ते दुर्दैवाने सगळे फोल ठरले. मी कधीच चांगली ‘भक्त’ नव्हते आणि पुढेही बहुधा मी ती होऊ शकणार नाही. पण कोणा पंथावर, धर्मावर, देवावर श्रद्धा नसतानाही आजवरचे माझे आयुष्य एकंदरित आनंदाचे गेले आहे.

पण अर्थातच मला देवळांत जायला आवडतं – विशेषत: तिथ गर्दी नसते तेव्हा! मला देऊळ पहायला आवडतं. माझ मन भूतकाळात जातं आणि त्या काळाची चित्र रंगवतं – काल्पनिकच! या चित्राची मी वर्तमानाशी तुलना करते. कधी त्या चित्रात फरक पडलेला असतो तर कधी ते चित्र तंतोतंत तसंच असतं! देवापेक्षा लोकांचा देवाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मला नेहमी कुतुहलाचा विषय वाटतो. अनेकदा अशा ठिकाणांबाबत ज्या कथा असतात, त्या विलक्षण असतात आणि अशा देवळांभोवतीचा बाजारही चित्तवेधक असतो. तुमच्या माझ्यासारखी सामान्य माणसं एका हातात भौतिकवाद आणि एका हातात अध्यात्म घेऊन(?) वाटचाल करत असतात. या प्रक्रियेत नेमकं काय घडतं हे ज्याचं त्याला – जिचं तिलाच कळतं!

त्यादिवशी कारेकल (Karaikal) या पुदुचेरीतील जिल्ह्याच्या शहरात प्रवेश करताना सुंदरराजनने या परिसरात जागृत शिव मंदिर असल्याचं मला सांगितलं आणि त्याने मला उत्साहन विचारलं, “तुम्हाला जायला आवडेल का या देवळात?” खरं तर आज दिवसभर भरपूर काम आहे, म्हणून आम्ही भल्या सकाळी सहा वाजता पुदुचेरीतून बाहेर पडलो आहे. पण आत्ताच कशाला नकारघंटा वाजवायची म्हणून मी म्हणते, “ बघू, आपलं काम वेळेत संपलं तर जाऊ”. अनुभवाने मला माहिती आहे की मी स्पष्ट नकार देत नाही तेव्हा आमचं काम ‘वेळेत’ हमखास संपतं!

दिवसभरात दोन तीन मीटिंग होतात, काही गावांत आम्ही जातो तिथ गावक-यांशी चर्चा होते, अडचणी काय आहेत आणि त्यातून पुढं  कसं जायचं यावर विचारविनिमय होतो. हे करताकरता संध्याकाळचे साडेपाच वाजतात. “जायचं का आपण मंदिरात?” गावातला एकजण अपेक्षेने विचारतो. आमच्यातला एक गट मागच्याच आठवड्यात तिथ जाऊन आलाय त्यामुळे ते सगळे थेट पुदुचेरीकडे प्रयाण करतात.  

दिवसभर ब-यापैकी दगदग झालीय. पुदुचेरीला पोचायला अजून चार तास लागतील. पण अर्धा एक तास जास्तीचा या देवळासाठी द्यायला माझी हरकत नाही. मग आम्ही थिरूनल्लार (Thirunallar) ला जातो.

इथल्या देवळात शिव आणि शनी असे दोघे एकत्र आहेत. मी आजवर फार थोडी शनीची देवळं  पाहिली आहेत. पुण्यातलं (शानिपारापाशी असलेलं!) शनीच देऊळ कधी आत जाऊन पाहिलेलं नाही. एकदा कधीतरी शनी शिंगणापूरला गेले होते असं आठवतं. दिल्लीत आश्चर्य वाटावं इतक्या जास्त संख्येत शनीची देवळं दिसतात. पण सगळ्याच शनी मंदिरांभोवती भिकारी असतात, अपंग लोक असतात. शनी आणि दु:ख, शनी आणि वेदना, शनी आणि जगण्याची धडपड असंच चित्र माझ्या मनात आहे. शिवाय एकदा कधीतरी वाचलेलं शनिमाहात्म्य पण आनंददायी नाही. त्यामुळे ‘शनी’च्या देवळात जाणं  मी आजवर टाळत आलेय. त्याउलट मी ब-याच ‘शिव’ मंदिरांत गेलेय. ती सगळी साधारणपणे थंड, सुंदर आणि शांत होती. अशा प्रत्येक भेटीत मी एक प्रकारच्या अपूर्व शांतीचा अनुभव घेतला आहे.  

इथल्या देवळाला जैन आणि शैवांच्या संघर्षाचा इतिहास आहे. एक राजा होता, एक संत होते आणि काही चमत्कारही होते. या जागेचा महाभारतकालीन नल राजाशीही संबंध आहे. इथे नलाने शनी देवतेची कृपा प्राप्त करून घेतली अशी कथा आहे. भक्त सांगतात की, हे एकच ठिकाण आहे की जिथं शनी ‘कृपेच्या’ अवस्थेत आहे. इथे शंकराच्या शक्तीमुळे शनी ‘नियंत्रणात’ आहे!

कोणत्याही धार्मिक ठिकाणी गेलं, धर्मग्रंथ वाचले आणि पुराणकथा वाचल्या की एक गोष्ट लक्षात येते – ती म्हणजे आपले देव अगदी मानवी आहेत. देवांचे विचार, देवांच्या कल्पना, देवांचे स्वभाव आणि देवांच वागणं  अनेकदा माणसांसारखं असतं. कदाचित मानवी मन देवाची कल्पना ‘इतकीच’ करू शकतं. अज्ञाताला जाणण्याचा प्रयत्न ज्ञात बाबींमधून करायचा ही आपली शिकण्याची नेहमीची पद्धत आहे.  

मला ते देऊळ आवडतं. त्याची वास्तू आकर्षक आहे. मला काही कळायच्या आधी मला एका रांगेतून पुढं  नेलं जातं रांग मोडून – आणि तिथं पूजा आहे. आम्ही रांग मोडून पुढे घुसतो तेव्हा कोणी तक्रार करत नाही. नंतर  माझ्या  लक्षात येतं की सगळ्याच मंदिरांत “जास्त पैसे दया आणि लवकर दर्शन घ्या” अशी व्यवस्था असते. मला अशी रांग मोडून जाणं  आवडत नाही, देवापुढे कोणी कसा काय जास्त मोठा असतो – आणि तेही केवळ पैसे जास्त आहेत किंवा पद मोठं  आहे म्हणून? खरं सांगायचं तर लोकांचा देवावर विश्वास नाही हेच यातून सिद्ध होतं! मी देवळात पूजा वगैरे कधी करत नाही पण इथं मी अगतिक आहे. म्हणजे मी अजूनही त्यातून बाहेर पडू शकते हे आहेच – पण जे काही चाललं आहे त्यात आधी नकळत का होईना सहभागी होऊन मी माझी संमती दिलेली आहे अप्रत्यक्षपणे – आता एकदम बाहेर पडायचं तर माझे सहकारी दुखावले जातील. ग्रंथालयात निरक्षर माणसाची जी अवस्था होईल तशीच माझी इथं झाली आहे.


पूजेत लगेचच एक अडचण येते. “तुमची रास काय?” असं मला पुजारी विचारतो आणि मी “मला रास  नाही” असं उत्तर देते. त्यावर सगळे एकदम चिडीचूप होतात. मग आपापसात ते तामिळ भाषेत काहीतरी बोलतात – जे मला सुदैवाने समजत नाही. मग पुजारी मला “तुमचा जन्म कोणत्या महिन्यातला?” असं विचारतात. इथं काहीतरी ठोकून द्यावं, खरं सांगू नये असं मला वाटतं. पण मी खरी माहिती सांगते. पूजा संपल्यावर सुंदररा जन मला दक्षिणा द्यायला सांगतो. पण माझं पैशांच पाकीट गाडीतच आहे. तो घाईघाईने एक नोट माझ्या हातात देतो ती मी आरतीच्या तबकात टाकते. नंतर त्याला मी पैसे देते तेव्हा तो घेतो कारण हे पैसे मी दिले नाहीत तर या पूजेचं पुण्य मला मिळणार नाही. म्हणजे एका अर्थी माझ्या इच्छेविरुद्ध मला पैसे द्यावे लागले आहेत. पण सुंदरराजनचा हेतू चांगला आहे हे मला माहिती आहे – म्हणून मी वाद घालत नाही.

आता कसल्यातरी महागड्या मण्याची पूजा आहे. हा मणी कसला, त्याची काय गोष्ट आहे हे काहीच मला समजत नाही. एक पुजारी किल्ल्यांचा भला मोठा जुडगा घेऊन येतात आणि कुलुपांमागून कुलूपं उघडतात. भक्तांचा एक गट शांतपणे या समारंभाची वाट पाहतोय – म्हणजे काहीतरी महत्त्व असणार याचं. अचानक दोन स्त्रिया शंकराच एक तामिळ भक्तीगीत गायला सुरुवात करतात. मला ते गाणं  आठवतंय. एके काळी ते मी खूपदा ऐकलं होतं. इतर भक्तांसोबत मीही ते  गाणं त्या दोन स्त्रियांच्या पाठीमागं म्हणते आहे. मी ते विसरलेय असं वाटतं होतं मला – पण आता ते मला व्यवस्थित आठवतंय. मला लहान मुलीसारखा आनंद होतो – मला ते गाणं आठवतंय याचा आणि ते अवघड तामिळ शब्द मला उच्चारता येताहेत याचाही.

एकदाच्या सगळ्या पूजा संपतात. मंदिराचे मुख्य पुजारी मला प्रसाद देतात. त्यांच्या मोडक्यातोडक्या हिंदी इंग्रजीत ते मला सांगतात की हे मंदिर तिरुपती बालाजी मंदिराच्या खालोखाल प्रसिद्ध आणि जागृत आहे. देवांमधला हा श्रेणीक्रम मला कधी समजत नाही. ते सगळेच शक्तिशाली आणि सर्वसमावेशक नसतात का? आता उदाहरणार्थ इथं मी प्रार्थना केली नाही म्हणून शिव माझ्यावर रागावला अशी आपण कल्पना केली, तर त्यातून असं निष्पन्न होईल की शिव हा माणसासारखा मातीचा आहे – त्याला सलाम नाही केला की तो रागावतो! असल्या सगळ्या मानवी भावांच्या पल्याड देव पोचलेले असतात असं मी समजते!

मुख्य पुजारी पुढे सांगतात: इथं तुम्ही जी काही इच्छा मनात धरली असेल ती पूर्ण होईल.

त्यावर सगळे समाधानाने हसतात. मीही हसते. त्यांची श्रद्धा त्यांना सुखी ठेवते आहे तर असू दे, उगाच कशाला प्रश्न विचारायचे त्यांना?

“तुम्ही काय इच्छा धरली होती?” परतीच्या वाटेवर सुंदरराजन मला विचारतो.

“मला हा देव इतका शक्तिशाली आहे हे जर आधी माहिती असतं, तर मी नक्की दोन तीन गोष्टी मागितल्या असत्या ..” मी सांगते. सामान्यपणे सगळ्या भक्त मंडळींचं या उत्तराने समाधान होतं असा माझा आजवरचा अनुभव आहे. आजचा प्रसंग त्याला अपवाद नाही.

मी काय विचार करत होते मंदिरात? मी प्रार्थना नक्कीच करत नव्हते – ती कशी करतात ते मला माहिती नाही. मी ईश्वराकडे काही मागत नव्हते हेही नक्की.

मी भक्त आणि त्यांची भक्ती पहात होते – त्यात कुठेतरी प्रामाणिक आणि खरी भक्ती असणार, त्यात कुठेतरी भक्तीची असीम प्रेरणा असणार. मी नेहमीप्रमाणे पहात होते; आपल्याला किती कमी माहिती आहे याचं नेहमीप्रमाणे मला आश्चर्य वाटतं होतं; शेकडो वर्षांपूर्वी इथलं चित्र काय असेल आणि आणखी पाचशे वर्षांनी चित्र कसं असेल याचा मी विचार करत होते; उत्पत्ति-स्थिती-लय यांच्या अविरत चक्राचा मी विचार करत होते; माझ्या आजच्या जगण्याबद्दल मी समाधानी होते – सुख असो की दु:ख;  यातलं काहीच अखेर टिकणार नाही या जाणीवेने मी शांत होते.

भक्तीहीनतेच्या त्या क्षणी मला ते जुनपुराणं  सत्य पुन्हा एकदा सापडलं. माझ्या भक्तीहीनतेमुळे न शिवाचे काही बिनसते, ना शनीचे, ना आणखी कोणा देवतेचे – आणि मुख्य म्हणजे न माझेही काही बिघडते. आम्ही एक निर्णय घेतला आहे – तो आहे एकमेकांकडून काही न मागता, काही अपेक्षा न करता; काही देवाणघेवाण न करता एकमेकांसोबत जगायचं. त्यात आम्ही समाधानी आहोत. निदान मी तरी नक्कीच आहे. 

तस पहायला गेलं तर भक्तीची मला काय गरज?
**

तुम्हाला कदाचित 'यशस्वी माघार' वाचायला आवडेल.

Monday, September 19, 2011

९०. अखेर ...


मी तिला पाहते तेव्हा सकाळचे नऊ वाजले आहेत. अर्थात लाकडाची मोळी डोक्यावर वाहताना तिचा चेहरा खाली झुकला आहे त्यामुळे मला तो दिसत नाही. तिची आणि माझी ओळख नाही आणि मी तिच्याशी बोलत नाही, त्यामुळे ती  ओळख होतही  नाही. स्वत:च्या कामात मग्न असणा-या त्या अनोळखी स्त्रीचा फोटो काढणं खरं तर योग्य नाही, ते एका अर्थी तिच्या खासगीपणावर आक्रमण आहे याची मला जाणीव आहे. पण तरीही मी हा फोटो काढते. माझ्या सभोवतालच्या अनेक स्त्रिया रोज अशा ओझ्यासह जगतात याची मला आठवण रहावी म्हणून मी हा फोटो काढते आहे. 

मी बिहारमधल्या मुंगेर जिल्ह्यातल्या एका आदिवासी पाड्यावर चालले आहे. वाटेत एका ढाब्यावर आम्ही नाश्ता करायला थांबलो आहोत. रस्त्यावर काही  ’स्वच्छ’ खायला मिळणार नाही हे माहिती असल्याने माझे सहकारी  खाण्याची तजवीज करून आले आहेत. ब्रेड, बटर आणि जाम असा सुखासीन नाश्ता आम्ही गरीबीने वेढलेल्या वातावरणात करत आहोत. आमची चारचाकी एअर कंडिशन्ड आहे. माझ्याजवळ बाटलीबंद पिण्याचे पाणी आहे; हातात मोबाईल आहे आणि डिजीटल कॅमेराही आहे. माझ्या खिशात पुरेसे पैसे आहेत.मला उद्याची चिंता करण्याच काही कारण नाही. माझ्या समोरून चाललेल्या  स्त्रीचं जगणं आणि माझं जगणं यात प्रचंड अंतर आहे. तिला त्याची जाणीव आहे की नाही मला माहिती नाही, पण मी मात्र त्या विरोधाभासाने, त्या अंतराने अस्वस्थ आहे.

आम्ही पुढे जातो. एका टेम्पोच्या टपावर बसून माणस प्रवास करताना दिसतात. मग ते चित्र सारखं दिसत राहतं. या भागात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नावाची काही गोष्टच नाही, त्यामुळॆ लोकांना मिळॆल त्या वाहनातून आणि मिळेल त्या सोयीने प्रवास करावा लागतो. गाडीच्या आत खचाखच गर्दी आहे. इतक्या उकाड्यात त्या आतल्या लोकांच काय भरीत होत असेल याची कल्पनाही करवत नाही. अनेक स्त्रिया त्या आतल्या गर्दीत कशाबशा उभ्या आहेत. त्यांना बसणारे धक्के कसे असतील याची मला जाणीव आहे. हेही त्यांच्या जगण्याचं एक प्रकारचं ओझं आहे. माझा सुखासीन प्रवास आणि त्या स्त्रियांचा प्रवास यातला विरोधाभास,   त्यातलं अंतर मला पुन्हा एकदा जाणवतं.

एका ठिकाणी रस्ता अचानक संपतो आणि आमची गाडी तिथं थांबते. एक संथाल तरूण आमची वाट पहात तिथं थांबलेला आहे. त्याच्या वस्तीत आम्हाला घेऊन जायची जबाबदारी त्याच्यावर आहे. तो एकदम व्यवस्थित हिंदी बोलतोय आणि मुख्य म्हणजे अजिबात लाजत नाही. भाताच्या खाचरातून त्याच्या मागोमाग, अगदी त्याच्या पावलांवर पावलं ठेवत मी चालले आहे. माझं पूर्ण लक्ष पायवाटेवर आहे.  तो बिचारा सारखा मागे वळून पहात माझ्याकडे लक्ष ठेवून माझी काळजी घेतो आहे. तो तरूण भरभरून बोलतो आहे, ते मी प्रश्न न विचारता ऐकते आहे. सभोवतालची हिरवाई मनमोहक आहे. पण इकडे तिकडे पहायची काही सोय नाही – कारण थोडं दुर्लक्ष झालं की मी थेट खालच्या भाताच्या खाचरात जाणार अशी मला भीती आहे. त्या आदिवासी तरूणाच्या आणि माझ्या जगण्यातल्या विरोधाभासाचा मी विचार करते आहे. मी ’माझ्या समाजासाठी’  असं काही स्वयंसेवी काम करत नाही. माझा वेळ खर्च करून मी काही समाजपयोगी काम करत नाही. या तरूणाला त्याच्या वस्तीची जेवढी माहिती आहे तेवढी मला मी राहते त्या परिसराची माहिती नक्कीच नाही.

आम्ही आदिवासी पाड्यावर पोचतो तेव्हा हात पाय धुण्यासाठी आमच्यासमोर बादलीभर पाणी ठेवलं जातं. पाच मिनिटांत तिथल्या समाज मंदिरात स्त्रिया जमा होतात. त्यांच्यासोबत त्यांची लेकरबाळं असतात. पुरुषही जमा होतात – ते मागे बसतात आणि स्त्रिया पुढे बसतात. ती जागा गच्च भरली आहे. माझ्यासाठी एक खुर्ची ठेवलेली आहे. एरवी खरं तर मी एकटीच खुर्चीत बसत नाही, सगळ्यांसाठी पुरेशा खुर्च्या नसतील तर मी पण जमिनीवर बैठक मारते.  पण आत्ता मी खाली जमिनीवर बसले तर लोकांचे चेहरे मला नीट दिसणार नाहीत. चेहरा दिसला नाही तर बोलण्यात, ऐकण्यात काही मजा नसते. शिवाय आज आणखी एक अडचण आहे. आम्ही आलो त्या वाटेवर बरेच काटे होते आणि माझी सलवार त्या काट्यांनी भरलेली आहे हे माझ्या लक्षात आलंय. खाली मांडी घालून बसलं, की ते सगळॆ काटे टोचणार. म्हणून आज मला खुर्चीत बसण्याशिवाय गत्यंतर नाही. इथल्या स्त्रिया आणि इथले पुरुष रोज या काटेरी वाटेवरून चालतात. या वस्तीवर दुकान नाही, दवाखाना नाही, प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना मुख्य रस्त्यापर्यंत चालत जावं लागतं. त्याबद्दल ते तक्रार करत बसत नाहीत, त्यांनी त्यातल्या त्यात स्वत:साठी आनंदाच्या जागा, आनंदाचे क्षण शोधले आहेत. त्यांच्याकडे जे कौशल्य आहे या काटेरी वाटेवरून चालण्याचं, ते माझ्याकडे अजिबातच नाही! मला पुन्हा एकदा त्या आदिवासींच्या आणि माझ्या जगण्यातला विरोधाभास, त्यातलं अंतर जाणवतं.

गावात जाऊन अशा प्रकारच्या बैठका घेणं ही माझी एक जबाबदारी आहे. खरं सांगायचं तर अशा बैठकातून मी त्यांना फारसं काही शिकवत नाही, मला मात्र त्यांच्याकडून बरंच काही शिकायला मिळतं. या वस्तीचं नाव आहे ’वन्नारकोला’. इथ अवघी ३६ घरं आहेत. विजेचे खांब दिसताहेत पण प्रत्यक्षात वीज अजून इथं यायची आहे. स्त्रिया आणि लहान मुलं कुपोषित आहेत हे एका नजरेत लक्षात येतं माझ्या. मला त्यांच्या भाषेत – संथाली भाषेत – बोलता येत नाही याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते – तेव्हा ते सगळॆ समजुतीने मान डोलावतात – ’चालायचंच’ अशा अर्थाने. माझ्या अडाणीपणामुळॆ त्यांचं काही माझ्याबद्दल वाईट मत होत नाही हे मला विशेष वाटतं. घरटी जमिनीचा छोटा तुकडा आहे – त्यात पोटापुरता भात कसतात. इथल्या स्त्रियांनी ’स्वयंसहाय्यता गट’ स्थापन केले आहेत. काही जण शेती विकासाच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. साधारण तासभर मी त्यांच्याशी अनेक विषयांवर बोलते आणि माझ्या सहका-याच्या हाती पुढची सूत्र सोपवते.

कोणाच लक्ष नाही असं पाहून मी त्या समाज मंदिराच्या बाहेर पडते. मला हा आदिवासी पाडा आवडलाय. घरं मातीची आणि छोटी आहेत. सभोवताली भातशेतीतल्या लाटांचा नाच चालू आहे. आकाश एकदम निळं दिसतंय – तो हिरवा आणि निळा रंग आणि भवतालची शांतता यांनी माझं मन एकदम शांत झालंय. शहरात हा निवांतपणा कधी लाभणार नाही हे माहिती असल्याने मी तो क्षण पुरेपूर उपभोगते आहे. अर्थात माझा हा एकांत फार काळ टिकत नाही.


माझे दोन सहकारी माझा शोध घेत येतात. त्यांच्याबरोबर गावातले एक दोन लोकही आहेत. मग आमची ’गावात काय काय करता येईल पुढच्या काळात’ यावर चर्चा चालू होते. मी अनेक प्रश्न विचारते, ते सगळॆ माहिती पुरवतात. आम्ही त्या वस्तीत चक्कर टाकतो. अनेक घरं नुसती बाहेरून कडी लावून बंद आहेत – (ते लोक तिकडे कार्यक्रमात आहेत) – आम्ही त्यांचं घ उघडून आत जातो. घराची पाहणी करतो – चुलीत काय सुधारणा करता येईल, घरात प्रकाश कसा आणता येईल, पिण्याचे पाणी कसे ठेवले आहे, घरात किती ओल आहे …. अशी पाहणी होते, चर्चा होते. ही चर्चा माझे सहकारी नंतर गावातल्या लोकांशी करतील सविस्तर.  वाटेत एक दहा वर्षांची मुलगी दिसते. तिला बोलता येत नाही – त्यामुळे तिचे नाव इतरांनी ठेवले आहे ’गुंगी’. तिच्यासाठी काय सरकारी योजना आहेत त्याबद्दल आम्ही बोलतो. एक पुरुष एका छोट्या मुलीला खांद्यांवर घेऊन उभा आहे – त्या दहा महिन्यांचा मुलीचे नाव आहे खुषबू. घरांतली भांडीकुंडी, कपडे सगळं वेगळं आहे. घरातच कोंबड्या आहेत, बक-या आहेत. काही अंगणात गाय आहे, झाडांवर पक्षी आहेत. माझ्या घरापेक्षा या घरांच चित्र अगदीच वेगळं आहे. मला पुन्हा एकदा माझ्या आणि या आदिवासींच्या जगण्यातला विरोधाभास जाणवतो आहे. इथली शांतता, इथली मातीची घर … हे सगळं काही काळ चांगलं वाटतं –  धकाधकीच्या जगण्यात बदल म्हणून! पण रोज असं मला जगता येईल का? अशा जगण्याची माझ्यावर सक्ती झाली तर आजची माझी शांतता टिकेल का? जर मला जगण्यासाठी अधिक सुखसोयी लागतात तर त्या या लोकांनाही का मिळू नयेत?

कार्यक्रम संपतो. गावातल्या स्त्रियांनी सगळ्यांसाठी चहा आणि  बिस्किटांची व्यवस्था केली आहे.  बारक्या पोरांना मात्र फक्त बिस्किटं आहेत, चहा नाही हे मला दिसतं. बरोबर आहे, साखर, दूध सगळ्याचा प्रश्न असणार इथं!  त्या बारक्या पोरापोरींच्या डोळयांत मला चहाची इच्छा दिसते. मग मी माझा चहाचा कप पुढे करून ’यात बिस्किटं बुड्वून खा’ असं त्यांना सांगते. क्षणार्धात माझ्याभोवती पोरं जमा होतात. त्यांचा ’चहा बिस्किटांचा’ आनंद अगदी निरागस आहे. मला त्यांचे चमकते डोळॆ आणि चेहरे पाहून फार  रं वाटतं.

मला पुन्हा एकदा त्यांच्या आणि माझ्या जगण्यातला विरोधाभास जाणवतो. तसं पाहायला गेलं तर आनंद किती छोट्या गोष्टींत दडलेला असतो आणि तो किती उत्स्फूर्त असतो.  पण  सुख, समाधान, आनंद या सगळ्या बाबी केवढ्या गुंतागुंतीच्या करून घेतल्या आहेत मी स्वत:साठी!

आम्ही निघतो. गावातले काही स्त्री पुरुष आम्हाला पोचवायला मुख्य रस्त्यापर्यंत म्हणजे साधारणपणॆ दोन किलोमीटर येतात. हाच तो मघाचा भातखाचरातला आणि काट्यांनी भरलेला रस्ता. आम्ही एकमेकांशी बोलतो आहोत, हसतो आहोत. मी आता चिखलात पडेन अशी भीती मला नाही कारण माझे दोन्ही हात आता दोन स्त्रियांच्या हातात आहेत, आणखी दोघी माझ्या खांद्यांवर हात ठेवून चालल्या आहेत; ती एवढीशी पाउलवाट आता आम्हा सर्वांना सामावून घेते आहे.  चालता चालता आम्ही मधेच थांबून हसतो आहोत. आम्ही पुढच्या गोष्टी ठरवतो आहोत. “आमची वस्ती आवडली का तुम्हाला, परत कधी येणार तुम्ही?” असा प्रश्न जवळजवळ सगळॆच जण विचारत आहेत. मला कधी बोलवायचं परत याबाबत त्यांचा आपापसात विचारविनिमय चालू आहे – आणि त्यांचं काही एकमत होत नाहीये.

आम्ही आजच भेटलो, आणि चार पाच तासांचीच काय ती भेट – पण आम्हाला एकमेकांबद्दल आपुलकी वाटते आहे – आमच्यात एक प्रकारची जवळीक निर्माण झाली आहे. आता आमच्यात न भाषेचा अडसर आहे , न वयाचा, न शिक्षणाचा, न परिस्थितीचा, न पैशांचा, न आणखी कशाचा.  आमचं एक नाव नसलेलं नातं निर्माण झालं आहे.

परस्परभेटीची इच्छा त्यांना आणि  मलाही आहे. एकमेकांना भेटल्याचा आनंद त्यांना झाला आहे, तितकाच मलाही झाला आहे.  आमचे एकमेकांच्या हातातले हात, आमचे फुललेले चेहरे, आमच हसू, आमची परस्पर भेटीची इच्छा … त्यात खोटं काही नाही, वरवरचं काही नाही.

अखेरच्या क्षणी, निरोपाच्या  या क्षणी आमच्या जगण्यात काहीही विरोधाभास नाही, काहीही अंतर नाही.

सकाळपासून मला अस्वस्थ करणा-या सगळ्या विरोधाभासाला, अंतराला पेलून कसल्यातरी अनामिक धाग्याने आम्ही एकमेकांशी जोडले गेलो आहोत. कदाचित आम्ही कधीच भेटणार नाही पुन्हा, तरीही …..
**

Monday, September 12, 2011

८९. ताळेबंद

वसंता म्हणाली, “दीदी, प्रदर्शन पहायला जायच?”
हे ती अर्थातच मोडक्यातोडक्या हिंदी इंग्रजीला अभिनयाची जोड देत म्हणाली.चेन्नैला एका कामानिमित्त गेले होते तेव्हा मी वसंताच्या घरी उतरले होते. तिच्या वडिलांची आणि माझी खूप जुनी ओळ्ख होती म्हणून गप्पा मारायला मी इकडेच रहायच अस आमच ठरल होत.  पण वसंताची आत्या गंभीररीत्या आजारी पडल्याने वसंताच्या आई -बाबांना अचानक सेलमला जाव लागल होत. मी रात्री मुंबईला परतणार होते. संध्याकाळी सात वाजता वसंताचे मामा आम्हा दोघींना त्यांच्या घरी घेऊन जाणार होते. मला रात्री स्टेशनवरही तेच पोचवणार होते. आता फक्त दुपारचे तीन वाजले होते.
वसंता आठवीतली मुलगी – तामिळ माध्यमातून शिकणारी. माझे तामिळ भाषेचे ज्ञान  ’वणक्कम’ (नमस्कार) पासून सुरु व्हायचे आणि दोन तीन मिनिटांत ’तामिळ तेरीयाद’ (मला तामिळ येत नाही) इथवर धापा टाकत पोचायचे. त्यामुळे वसंताबरोबर काय बोलायचे हा प्रश्नच होता. म्हणून मग मी वसंताची प्रदर्शन पहायची सूचना लगेच उचलून धरली. जरा बाहेर पडून तिला तिच्या आवडीचे काहीतरी खायला घालावे, एखादे पुस्तक द्यावे असा विचार मी करत होते.
प्रदर्शन चित्रांचे होते. वसंता स्वत: चांगली चित्र काढते, त्यामुळॆ ती त्यात रंगून गेली. तिच मन रमलेल पाहून मला बर वाटल. मी मात्र जरा विमनस्क मन:स्थितीत होते. आमच्या कामाचा गाडा काही पुढे रेटला जात नव्ह्ता. जे जे म्हणून हाती घ्याव, त्यात अपयशच येत होत. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे हे सुभाषित आम्ही वारंवार एकमेकांना सांगत होतो. पण खर तर आम्ही त्या ’पहिल्या पायरीवर’ फार काळ रेंगाळलो होतो. सगळी अपयशी माणस दैवाला दोष देतात आणि आम्हीही कळत नकळत दैववादी बनत चाललो होतो. आता इथलेही काम न झाल्याने मुंबईला वाट पहात असणारी माझी मित्रमंडळी निराश होणार होती तर!
कोणत्याही चित्रकला प्रदर्शानात असत, तसच वातावरण सभोवताली होत.सौम्य प्रकाशात रंगांची उधळण मोहक वाटत होती. कलाकाराभोवती लोक घोळ्क्याने उभे होते. काहींच्या चेह-यावर सारे काही समजल्याचा भाव होता तर काही चित्राचा अर्थ लावताना विचारात पडलेले दिसत होते.काही एकटे उभे होते तर काही समुहात फिरत होते. काही निवांत होते तर काही घाईघाईने पुढे सरकत होते. मला चित्रकलेत(ही) काही गम्य नाही त्यामुळे माझी नजर निरुद्देशपणे फिरत होती.
तितक्यात त्या घोळक्यातून पंचविशीचा एक तरूण माझ्याकडे धावत आला. “दीदी, तुम्ही इकडे कशा काय? “ मी गोंधळून इकड- तिकड पाहिल पण तो माझ्याशीच बोलत होता. बोलता बोलता त्याने मला वाकून नमस्कारही केला. त्याच्या स्वरांतली आस्था आणि कृतज्ञता विलक्षण होती. मला वाटल तो चुकून मला दुसरच कोणीतरी समजला आहे. वसंता पण भलत्याच आश्चर्याने माझ्याकडे पहात होती. तिची आणि त्या मुलाची चांगली ओळख दिसत होती कारण ती त्याला ’चित्र छान आहेत रे तुझी’ अशा थाटाच काहीतरी म्हणाली आणि तोही तिच्या पाठीवर हात ठेवत कौतुकाने हसला. मी आणखी काही बोलणार तेवढ्यात त्याने वसंताला तामिळमधून काहीतरी विचारले. मग त्याने ओरडून कोणालातरी गाडी आणायला सांगितली. मला म्हणाला, “आपण माझ्या घरी चाललोय. आई-बाबा एकदम खूष होतील तुम्हाला इथे पाहून.”
वसंता हसत होती. त्या दोघांनी कट केल्यासारख मला काही बोलू दिल नाही आणि मी ’जे जे होईल ते पहावे’ अशा अविर्भावात गाडीत बसले. मी वसंताला हळूच “याचे नाव काय” अस विचारल पण ते त्यालाही ऐकू गेल आणि ते दोघही हसायला लागले. मग मी काही जाणून घेण्याचा नाद सोडून दिला. ते दोघ आपापसात बोलत होते आणि ते माझ्याबद्दल होत एवढ मला समजत होत.
त्याच्या घरी त्याच्या आई वडिलांना पाहिल्यावर मला तो प्रसंग आठवला.
सात आठ वर्षांपूर्वीची गोष्ट. अशाच एका मुंबई –चेन्नई प्रवासात वेंकटरमण (हाच तो मुलगा) आणि त्याचे आई वडील माझे सहप्रवासी होते. (वसंताची आई आणि रमणची आई मैत्रिणी आहेत त्यामुळे त्या दोघांची ओळ्ख आहे हा खुलासाही लगेचच झाला.) चेन्नईजवळच्या एका छोट्या गावात ते रहात होते. तिघेही खूप अस्वस्थ, दु:खी, आणि तणावग्रस्त होते. हळूहळू आमच बोलण झाल. रमण खूप हुशार मुलगा, म्हणून त्यांनी मुद्दाम त्याला मुंबईला शिकायला पाठवले होते – बहुधा आय. आय. टी. किंवा कसल्यातरी परीक्षेच्या अभ्यासासाठी. पण हा मुलगा बारावीच्या परीक्षेला बसलाच नव्हता. वर्षभर कॉलेजच्या नावाखाली कुठ जात होता कोण जाणे! व्यसनाधीनही झाला होता. आता या मुलाचे काय करायचे, कसे निभावायचे पुढे याचे, हा नीट रस्त्यावर येईल का पुन्हा – अशा चिंतेत त्याचे आईवडील होते. आणि रमण बेदरकारपणे, बधीरपणे बसला होता. त्याला राग आला होता आपण पकडले गेलो याचा, आपल्याला आता आई वडील सांगतील ते ऐकावे लागेल याचा – की आणखी कशाचा ते कळत नव्हते आम्हाला कोणालाच.
कसल्याशा रेल्वे अपघातामुळे आमचा तो प्रवास अनेक तास लांबला होता. त्या काळात आम्ही चौघे खूप बोललो. रमण आधी गप्प गप्प होता, पण नंतर तोही खुलला. ’मी कधी नापास झाले नव्हते आणि तो अनुभव घेण्यासाठी मी एकदा केमिस्ट्रीचा पेपर कसा कोरा दिला होता – उत्तर येत असूनही’ असा माझा एक अनुभव सांगितल्यावर तर त्याला त्याच्यापेक्षा मूर्ख लोक असतात याचा प्रत्यय आला – आणि अशा एखाद्या मूर्खपणामुळॆ सगळे आयुष्य काही बिघडत नाही असा दिलासाही मिळाला.
लांबच्या प्रवासात वाचायला म्हणून एखादे पुस्तक माझ्याजवळ असतेच. त्यादिवशी योगायोगाने विवेकानंदांचे ’कर्मयोग’ माझ्याजवळ होते. चेन्नैला उतरताना रमणला ते पुस्तक मी देऊन टाकल. मी अर्थातच हे सगळ आजवर विसरून गेले होते. प्रवासात अशी कितीतरी माणस भेटतात, कितीतरी भावना कळतात, कितीतरी गोष्टींची देवाणघेवाण होत राहते. तो प्रवासाचा एक अविभाज्य भाग असतो. त्या क्षणांना चिकटून राहता येत नाही, आणि ते क्षण पकडूनही ठेवता येत नाहीत – ते आपोआप विस्मरणात जातात.
रमणच्या अम्मा सांगत होत्या की, ’कर्मयोग’ वाचून रमण खूप अंतर्मुख झाला. जवळजवळ सगळे ’विवेकानंद साहित्य’ त्याने वाचून काढले. मनाच्या निग्रहाने त्याने व्यसनावर मात केली. चित्रकलेतली पदवीही त्याने चांगल्या प्रकारे मिळवली. आता तो पैसाही पुष्कळ कमावतो, नावही मिळ्वले त्याने अल्पावधीत. मुख्य म्हणजे त्यांचा रमण त्यांना परत मिळाला.
रमणच्या या यशाचे सारे श्रेय तो आणि त्याचे आई वडील मला देत होते. मी भेटले प्रवासात, मी गप्पा मारून त्यांना मानसिक आधार दिला, मी ’कर्मयोग’ रमणला वाचायला दिले … म्हणूनच पुढच सगळ व्यवस्थित घडल अस ते सारखे म्हणत होते. त्यांची भावना अगदी प्रामाणिक होती यात शंकाच नाही. पण ते ऐकताना मला फार संकोचल्यासारख झाल. खर तर यात मी काहीच केल नव्हत .. मी फक्त निमित्तमात्र होते. देण्याघेण्याच्या प्रक्रियेत मधला एक हात माझा होता हा फक्त योगायोग होता, त्यात माझे ना कर्तृत्त्व होते ना काही श्रेय होते!
आपण केलेल्या कामाचे फळ नेहमी मागतो. ते अपेक्षेप्रमाणे मिळाले तर स्वत:च्या प्रयत्नांमुळे, गुणांमुळे, कष्टांमुळे ते मिळाले असे मानतो. ’दुस-या कोणाच्या तरी निरपेक्ष मदतीमुळॆ मला इतके यश मिळाले’ असेही कोणी क्वचितच मनापासून म्हणताना दिसते. यशात  आपण स्वत:ची पाठ थोपटून घेतो, स्वत:ची टिमकी वाजवतो. अपयश आले तर मात्र दैवाला, परिस्थितीला, नशिवाला किंवा दुस-याच कोणाला तरी दोष देतो. ’माझ्यात काही तरी कमी आहे, म्हणून मला अपयश आले’ अस माणस क्वचितच म्हणताना दिसतात.
पण आयुष्यात किती तरी वेळा आपण न केलेल्या कष्टांचे फळ, त्याचे श्रेय आपल्याला मिळत असत, हे आपल्या कधी लक्षात आल आहे का? रमणच्या घरातून बाहेर पडल्यावर पुढेही असे कितीतरी प्रसंग आले, कितीतरी माणस भेटली – जी सहजपणे मी न केलेल्या कर्माचे फळ मला देत गेली. कोणालातरी सहज दिलेला हात, कोणालातरी सहज केलेली मदत, कोणाचे तरी फक्त ऐकून घेतलेले शब्द, कोणालातरी न बोलता दिलेले काही क्षण, कोणासाठी तरी खर्च केलेली काही किरकोळ रक्कम …. आपल्या स्मरणातही नसते ती … पण ते ’कोणातरी’ कधीतरी अचानक भेटतात आणि त्याबद्दल भरभरून बोलतात. प्रत्येक वेळी असा अनुभव मला आयुष्यातल्या सकारात्मक गोष्टींची नव्याने जाणीव करून देतो.
खर तर आपल्यासाठीही हे सगळ कोणीतरी केलेल असतच.. मदत केलेली असते, आधार दिलेला असतो, सेवा केलेली असते, आपल्या पाठीशी उभे राहिलेले असते, आपले ऐकून घेतलेले असते, निरपेक्षपणे …. आपण सुखात रहावे एवढ्याच अपेक्षेने ...अशी माणस, असे क्षण, असे  प्रसंग…  आपण समजतो त्यापेक्षा अनेक पटींनी जास्त असतात ते आपल्या आयुष्यात!
जगण्यात जमेची बाजूही असते पुष्कळ . ती विचारात न घेता आपण फक्त दोष देत राहतो परिस्थितीला, दैवाला, नशिबाला, इतरांना! चांगल्या माणसांना, क्षणांना विसरून जायच आणि फक्त वाईट तेवढ लक्षात ठेवायच, पुन्हापुन्हा उगाळत रहायच अस आपण का करत असतो?
आपला ताळेबंद चुकणार नाही, तर काय मग?

Tuesday, September 6, 2011

८८. प्रतिमा निर्मिती


जन्माला येताना बहुतेक मी परमेश्वराला ‘मला भरपूर जग दाखवणार असशील तरच जन्म घेईन’ अशी काहीतरी अट घातली असणार. कारण मी खूप प्रवास करते. माझ्या या प्रवासाची इतरांना चिंता वाटत राहते. उगाच त्यांना बरंं वाटावं म्हणून दरवर्षी मी ‘यंदा प्रवास कमी करायचा’ असा संकल्प करते खरी – पण तो कधीच साध्य होत नाही. कारण मी त्यासाठी कधी प्रयत्न करत नाही. मला प्रवास करायला आवडतं. सकाळी जाग आल्यावर ‘आज आपण नेमके कोणत्या गावात आहोत’ असा प्रश्न मला पडला की तो दिवस माझ्यासाठी चांगला जातो. म्हणून मी नेहमी वेगवेगळ्या ठिकाणी असते. शिवाय एका ठिकाणी फार काळ राहिलंं की मला कंटाळा यायला लागतो. माझ्यासाठी स्थिरता जणू शाप आहे. मी अस्थिर असले की जास्त जागीं असते आणि सगळ्या सभोवतालाशी जोडलेली राहते. म्हणून मला भटकत राहायला आवडतं!

अशा ब-याच प्रवासांमध्ये मी बहुतेक एकटीच स्त्री असते – बाकी सगळे सहकारी पुरुष असतात. तीनपेक्षा जास्त लोक एकत्र प्रवास करत असू तर चारचाकी घेऊन  जायची अन्यथा सार्वजनिक वाहतूकं व्यवस्थेचा वापर करायचा अशी माझ्या आधीच्या ऑफिसमधली पद्धत होती. माझे सगळे सहकारी  नेहमी चांगले होते. त्यांच्याबरोबर एकटीने प्रवास करताना मला कधी माझ्या सुरक्षिततेची काळजी करावी लागली नाही; कारण ते सगळे माझी खूप काळजी घ्यायचे – कधी कधी वैताग यावा इतकी काळजी घ्यायचे!

समाजात वावरताना कोणी कोणाशी कसं वागायचं याचे फार पारंपरिक दृष्टिकोन आहेत हे नेहमी अनुभवाला येतं. मी या ठिकाणी दोन फायदा देणा-या भूमिकेत असायचे – एक तर आधी म्हटल्याप्रमाणे पुरुष सहका-यांत मी एकटी स्त्री असायचे आणि मी नेहमीच संस्थेच्या मुख्यालयातून आलेली असायचे. आपल्याकडे ज्याचा/जिचा अधिकार (म्हणजे पद) मोठं, त्या व्यक्तीला सर्वात चांगल्या सुखसोयी मिळतात – म्हणजे बसायला सगळ्यात चांगली खुर्ची , रहायला सगळयात चांगली खोली , सगळ्यात चांगल्या कपात चहा – बहुधा तो अधिक चांगलाही असतो! साहेबाला पाण्याचा पहिला ग्लास मिळतो आणि कोणत्याही चर्चेत अंतिम शब्द त्यांचाच असतो! मी जिथं काम करायचे तिथं साहेब आले की सगळ्यांनी उठून उभं राहायचं अशी प्रथा होती. असं कोणी उभं राहत असलं की त्याला तिला आपल्याबद्दल आदर असतो असं माणसं का समजतात देव जाणे!

आमच्याकडे माणसाचा अधिकार, त्याचे/तिचे पद दाखवण्याची आणखी एक पद्धत अशी होती की चारचाकीत सगळ्यात वरिष्ठ अधिका-याने पुढे बसायच. मला ते सगळच विनोदी वाटायच. पण कोणाही अधिकारी माणसाला हे बदलायला सांगितलं की त्यांना राग येतो. माझ्या एका वरिष्ठ सहका-याला मी “मी आलो की तुम्ही उभ राहायची गरज नाही अस का सांगत नाही” अस म्हटल्यावर त्याने मला इतकचं म्हटलं की, “तू उभी रहात नाहीस म्हणून मी कधी तक्रार केली आहे का?” -  खर म्हणजे सौम्य शब्दांत ती तक्रारच होती माझ्याबद्दल. लोकांना सहसा आपले अधिकार सोडायचे नसतात असा निष्कर्ष काढून मी गप्प बसत असे.

पण माझ्यापुरत्या असल्या प्रथा मी कधी पाळत नसे. लोकाना जे काही सांगायच ते आपल्या कृतीतून दिसायला पाहिजे नुसत्या समतेच्या आणि माणुसकीच्या मोठमोठ्या गोष्टी बोलून काय उपयोग? त्यामुळे चारचाकीतून प्रवास करताना मी नेहमीच एकदम मागे जाऊन बसत असे आणि माझ्या सगळ्यात नव्या सहका-याला पुढे बसायची विनंती करत असे.  माझ्या परीने अधिकार असे मोडून काढण्याचा माझा प्रयत्न असे. प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात त्यांचे काम असते त्यामुळे त्याचा आदर करायला पाहिजे अशीही त्यामागे भावना होती. (म्हणजे एका अर्थी मी ज्याचा अधिकार जास्त त्याला पुढची जागा या संकल्पनेची बळी होतेच म्हणा!) माझ्या नव्या सहका-यांना ते तितकस पटायचं नाही – “ताई. तुम्ही पुढे बसा” असा मला  ते आग्रह करायचे. पण माझ्यापुढ त्यांच काही चालायच नाही – हाही एका अर्थी अधिकाराचा गैरवापरच होता! अस सगळ सुरळीत चालू होत.

पण एक प्रसंग मात्र असा आला, की आम्हाला बदलाव लागल आमच्या मनाविरुद्ध!

आम्ही एका आदिवासी पाड्यावर गेलो होतो कामासाठी. तिथ स्त्रियांचा आणि पुरुषांचा एक मोठा गट आमची वाट पहात होता. जिथं त्यांनी बैठक आयोजित केली होती, तिथ आम्ही गेलो. मी त्या बैठकीतली मुख्य वक्ता होते (खर तर एकमेव वक्ता होते अस म्हणायला पाहिजे!) मी अर्थात मोठ भाषण फारस कधी देत नाही. आम्ही अनेक विषयांबर गप्पा मारल्या. तिथल्या लोकांच जगण, त्यांच रोजच काम, आरोग्याचे प्रश्न, रोजगाराची संधी, मुलीचं शिक्षण, सामाजिक प्रश्न, बाजार, लाकूडफाटा, रेशनच दुकान, दारू .. अशा अनेक मुद्द्यांवर आम्ही तीन एक तास बोललो. सगळ्या प्रश्नांना एकदम हात घालण्यात अर्थ नाही यावर सहमती झाल्यावर आम्ही पुढच्या काळासाठी काही प्रश्न प्राधान्याने निवडले. सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नातून आपल् जगण अधिक चांगल कस करायचं यावर आम्ही भर दिला. निवडलेल्या प्रत्येक प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी काय उपाय करावेत, कोणी काय जबाबदारी घ्यायची अशीही आमची चर्चा झाली. पुढच्या तीन महिन्यांची सविस्तर योजना सर्वांनी मिळून ठरवली. मग आम्ही काही घरांत गेलो. आधी सुरु झालेल्या कार्यक्रमांची काय स्थिती आहे त्याची पाहणी आणि समीक्षा झाली. एकूण बैठक आणि भेट समाधानकारक झाली.

मग आम्ही खास आदिवासी जेवणाचा आस्वाद घेतला. दुपार झाली होती, भूकही लागली होती, काम चांगल झाल होते आणि लोक प्रेमाने आणि आग्रहाने खायला घालत होते. त्यामुळे मी नेहमीसारखी जास्तच जेवले. मग आमच्या परतीच्या प्रवासासाठी आम्ही निघालो. प्रत्येक स्त्री पुरुषाने पुढे येऊन हात हातात घेतला – हल्ली ‘नमस्कारा’ ऐवजी  आदिवासींची पण handshake ला पसंती असते.

आम्ही जेव्हा आमच्या चारचाकीच्या जवळ पोचले, आणि मी सवयीने मागच्या सीटकडे वळले, तेव्हा एका स्त्रीने विचारल, “ताई, तू पुढ नाही बसणार?”

त्यावर मी काही उत्तर देण्याच्या आत दुसरी स्त्री म्हणाली, “ताई कशी पुढ बसलं इतके भाऊ (पुरुष) सोबत असताना? कितीही हुषार असली आणि कामाची असली तरी बाईची जागा नेहमी मागच असते!”

त्या उद्गारांनी मी थक्क झाले. बिचारे माझे सहकारी! त्यांची काहीही चूक नसताना त्यांच्यावर असा आरोप होत होता. एकदा मला वाटलं की त्या स्त्रीला स्पष्टीकरण द्याव मी का माग बसते याच – पण तिच्या चेह-याकडे पाहून मी माझा विचार बदलला. माझ्या सहका-यांचे चेहरेही भलतेच गंभीर झाले होते. मी त्या सगळ्यांकडे हसत पाहून म्हटल, “अग, हातातली bag माग ठेवून निवांत पुढ बसणार आहे! हे सगळे भाऊ आहेत ना आपले ते काही बायांची जागा मागच आहे अस मानत नाहीत – उगीच का बिचा-यांवर असा आरोप करतेस तू?”

माझ्या या बोलण्यावर वातावरण एकदम निवळलं, सगळे हसले आणि आम्ही पुढे निघालो.

मला अस लक्षात आलं की माझ बोलण आणि माझ वागण यातून एकदम विरोधाभासी संदेश स्त्रियांना मिळत होता. बैठकीत मी ‘स्त्रियांनी पुढ आलं पाहिजे’, ‘पुरुषांनी स्त्रियांना समान वागणूक दिली पाहिजे’ असल्या गोष्टी बोलत होते आणि आमची कृती मात्र नेमकी त्याच्या विपरीत घडत होती.  स्त्रियांच्या सबलीकरणाबद्दल बोलणारी मी प्रत्यक्षात त्यांच्यासमोर ‘निर्बल’ स्त्रीच चित्र सादर करत होते – जरी त्यामागे आमची वेगळी भूमिका असली तरी त्या स्त्रियांना अथवा पुरुषांना ती माहिती असण्याच काही कारण नव्हत!

आपण जे बोलतो, त्यानुसार कृती करण सार्वजनिक जीवनात फार महत्त्वाच असता. आपल्या बोलण्याला एक संदर्भ असेल आणि वागण्याला दुसरा तर लोक गोंधळतात – काही गोष्टी फक्त बोलायच्या असतात, तस वागायची काही गरज नसते अस समजून चालतात. मी जे बोलते तशी माझी प्रतिमा निर्माण करण – अर्थात खोटी नाही तर प्रामाणिक – ही माझी जबाबदारी होती – ज्याचा मला आजवर विसर पडला होता. जरी काही गोष्टी माझ्या संदर्भात कृत्रिम ठरत असल्या तरी लोकांच्या संदर्भात त्याच महत्त्व होत – आणि त्यांच्या दृष्टिकोनातून ते माझ्या वागण्याचा अर्थ लावणार हे विसरून चालणार नव्हत!

त्या दिवसापासून मी आणि माझ्या सहका-यांनी एक नियम केला. एखाद्या गावात प्रवेश करताना कमी लोक हजर असतात – त्यामुळे तेव्हा मी मागे बसून जायला हरकत नाही. पण गावातून निघताना बरेच जण पोचवायला येतात – तेव्हा मात्र मी पुढच बसायच. मला वाटत म्हणून नाही – तर स्त्रीही पुढे बसू शकते, पुरुषही संवेदनशील असतात – असा स्पष्ट संदेश देण्यासाठी. मला आणि माझ्या सहका-यांना याची गरज नव्हती पण आमच्या कामाच्या दृष्टीने याची गरज होती. मी चारचाकीत पुढे बसताना गावातल्या स्त्रिया ज्या कौतुकाने हसतात – ते माझ कौतुक नसत, ते त्यांच्या भविष्याच एक स्वप्न असत. ते स्वप्न खर होऊ शकत हे त्यांना पुन्हापुन्हा सांगण्याची जबाबदारी माझी आहे. त्यासाठी मला न आवडणा-या काही गोष्टी मला करायला लागल्या तरी माझी हरकत नाही. गावातल्या स्त्रियांच्या इच्छा आणि आकांक्षा माझ्या आवडी-निवडीपेक्षा जास्त महत्त्वाच्या आहेत – कारण त्यांनी न बोलावताच मी त्यांच्या आयुष्यात आले आहे. म्हणून त्यांच्या भावनांची कदर करण आवश्यक आहे. माझ्या जगात मी जे पाहिजे ते करू शकते, त्यांच्या जगात त्यांच्या स्वप्नांना धक्का बसेल अस मी काही करू नये. माझ्यात आणि माझ्या सहका-यांत जोवर संवाद आणि सामंजस्य आहे तोवर अशा प्रतिमा निर्मितीतून आमचेही काहीच बिघडत नाही!
**