मी
तिला पाहते तेव्हा सकाळचे नऊ वाजले आहेत. अर्थात लाकडाची मोळी डोक्यावर वाहताना तिचा
चेहरा खाली झुकला आहे त्यामुळे मला तो दिसत नाही. तिची आणि माझी ओळख नाही आणि मी तिच्याशी
बोलत नाही, त्यामुळे ती ओळख होतही नाही. स्वत:च्या कामात मग्न असणा-या त्या अनोळखी
स्त्रीचा फोटो काढणं खरं तर योग्य नाही, ते एका अर्थी तिच्या खासगीपणावर आक्रमण आहे याची
मला जाणीव आहे. पण तरीही मी हा फोटो काढते. माझ्या सभोवतालच्या अनेक स्त्रिया रोज अशा
ओझ्यासह जगतात याची मला आठवण रहावी म्हणून मी हा फोटो काढते आहे.
मी
बिहारमधल्या मुंगेर जिल्ह्यातल्या एका आदिवासी पाड्यावर चालले आहे. वाटेत एका ढाब्यावर
आम्ही नाश्ता करायला थांबलो आहोत. रस्त्यावर काही ’स्वच्छ’ खायला मिळणार नाही हे माहिती असल्याने माझे
सहकारी खाण्याची तजवीज करून आले आहेत. ब्रेड,
बटर आणि जाम असा सुखासीन नाश्ता आम्ही गरीबीने वेढलेल्या वातावरणात करत आहोत. आमची
चारचाकी एअर कंडिशन्ड आहे. माझ्याजवळ बाटलीबंद पिण्याचे पाणी आहे; हातात मोबाईल आहे
आणि डिजीटल कॅमेराही आहे. माझ्या खिशात पुरेसे पैसे आहेत.मला उद्याची चिंता करण्याच
काही कारण नाही. माझ्या समोरून चाललेल्या स्त्रीचं जगणं आणि माझं जगणं यात प्रचंड अंतर
आहे. तिला त्याची जाणीव आहे की नाही मला माहिती नाही, पण मी मात्र त्या विरोधाभासाने,
त्या अंतराने अस्वस्थ आहे.
आम्ही
पुढे जातो. एका टेम्पोच्या टपावर बसून माणस प्रवास करताना दिसतात. मग ते चित्र सारखं दिसत राहतं. या भागात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नावाची काही गोष्टच नाही, त्यामुळॆ
लोकांना मिळॆल त्या वाहनातून आणि मिळेल त्या सोयीने प्रवास करावा लागतो. गाडीच्या आत
खचाखच गर्दी आहे. इतक्या उकाड्यात त्या आतल्या लोकांच काय भरीत होत असेल याची कल्पनाही
करवत नाही. अनेक स्त्रिया त्या आतल्या गर्दीत कशाबशा उभ्या आहेत. त्यांना बसणारे धक्के
कसे असतील याची मला जाणीव आहे. हेही त्यांच्या जगण्याचं एक प्रकारचं ओझं आहे. माझा सुखासीन
प्रवास आणि त्या स्त्रियांचा प्रवास यातला विरोधाभास, त्यातलं अंतर मला पुन्हा एकदा जाणवतं.
एका
ठिकाणी रस्ता अचानक संपतो आणि आमची गाडी तिथं थांबते. एक संथाल तरूण आमची वाट पहात तिथं थांबलेला आहे. त्याच्या वस्तीत आम्हाला घेऊन जायची जबाबदारी त्याच्यावर आहे. तो एकदम
व्यवस्थित हिंदी बोलतोय आणि मुख्य म्हणजे अजिबात लाजत नाही. भाताच्या खाचरातून त्याच्या
मागोमाग, अगदी त्याच्या पावलांवर पावलं ठेवत मी चालले आहे. माझं पूर्ण लक्ष पायवाटेवर
आहे. तो बिचारा सारखा मागे वळून पहात माझ्याकडे लक्ष ठेवून
माझी काळजी घेतो आहे. तो तरूण भरभरून बोलतो आहे, ते मी प्रश्न न विचारता ऐकते आहे.
सभोवतालची हिरवाई मनमोहक आहे. पण इकडे तिकडे पहायची काही सोय नाही – कारण थोडं दुर्लक्ष झालं की मी थेट खालच्या भाताच्या खाचरात जाणार अशी मला भीती आहे. त्या आदिवासी तरूणाच्या
आणि माझ्या जगण्यातल्या विरोधाभासाचा मी विचार करते आहे. मी ’माझ्या समाजासाठी’ असं काही स्वयंसेवी काम करत नाही. माझा वेळ खर्च करून मी काही समाजपयोगी काम करत नाही.
या तरूणाला त्याच्या वस्तीची जेवढी माहिती आहे तेवढी मला मी राहते त्या परिसराची माहिती
नक्कीच नाही.
आम्ही
आदिवासी पाड्यावर पोचतो तेव्हा हात पाय धुण्यासाठी आमच्यासमोर बादलीभर पाणी ठेवलं जातं.
पाच मिनिटांत तिथल्या समाज मंदिरात स्त्रिया जमा होतात. त्यांच्यासोबत त्यांची लेकरबाळं असतात. पुरुषही जमा होतात – ते मागे बसतात आणि स्त्रिया पुढे बसतात. ती जागा गच्च भरली
आहे. माझ्यासाठी एक खुर्ची ठेवलेली आहे. एरवी खरं तर मी एकटीच खुर्चीत बसत नाही, सगळ्यांसाठी
पुरेशा खुर्च्या नसतील तर मी पण जमिनीवर बैठक मारते. पण आत्ता मी खाली जमिनीवर बसले
तर लोकांचे चेहरे मला नीट दिसणार नाहीत. चेहरा दिसला नाही तर बोलण्यात, ऐकण्यात काही
मजा नसते. शिवाय आज आणखी एक अडचण आहे. आम्ही आलो त्या वाटेवर बरेच काटे होते आणि माझी
सलवार त्या काट्यांनी भरलेली आहे हे माझ्या लक्षात आलंय. खाली मांडी घालून बसलं, की ते
सगळॆ काटे टोचणार. म्हणून आज मला खुर्चीत बसण्याशिवाय गत्यंतर नाही. इथल्या स्त्रिया
आणि इथले पुरुष रोज या काटेरी वाटेवरून चालतात. या वस्तीवर दुकान नाही, दवाखाना नाही,
प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना मुख्य रस्त्यापर्यंत चालत जावं लागतं. त्याबद्दल ते तक्रार
करत बसत नाहीत, त्यांनी त्यातल्या त्यात स्वत:साठी आनंदाच्या जागा, आनंदाचे क्षण शोधले
आहेत. त्यांच्याकडे जे कौशल्य आहे या काटेरी वाटेवरून चालण्याचं, ते माझ्याकडे अजिबातच
नाही! मला पुन्हा एकदा त्या आदिवासींच्या आणि माझ्या जगण्यातला विरोधाभास, त्यातलं अंतर जाणवतं.
गावात
जाऊन अशा प्रकारच्या बैठका घेणं ही माझी एक जबाबदारी आहे. खरं सांगायचं तर अशा बैठकातून
मी त्यांना फारसं काही शिकवत नाही, मला मात्र त्यांच्याकडून बरंच काही शिकायला मिळतं.
या वस्तीचं नाव आहे ’वन्नारकोला’. इथ अवघी ३६ घरं आहेत. विजेचे खांब दिसताहेत पण प्रत्यक्षात
वीज अजून इथं यायची आहे. स्त्रिया आणि लहान मुलं कुपोषित आहेत हे एका नजरेत लक्षात येतं माझ्या. मला त्यांच्या भाषेत – संथाली भाषेत – बोलता येत नाही याबद्दल मी दिलगिरी व्यक्त
करते – तेव्हा ते सगळॆ समजुतीने मान डोलावतात – ’चालायचंच’ अशा अर्थाने. माझ्या अडाणीपणामुळॆ
त्यांचं काही माझ्याबद्दल वाईट मत होत नाही हे मला विशेष वाटतं. घरटी जमिनीचा छोटा तुकडा
आहे – त्यात पोटापुरता भात कसतात. इथल्या स्त्रियांनी ’स्वयंसहाय्यता गट’ स्थापन केले
आहेत. काही जण शेती विकासाच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. साधारण तासभर मी त्यांच्याशी अनेक विषयांवर बोलते आणि माझ्या सहका-याच्या हाती पुढची सूत्र
सोपवते.
कोणाच
लक्ष नाही असं पाहून मी त्या समाज मंदिराच्या बाहेर पडते. मला हा आदिवासी पाडा आवडलाय.
घरं मातीची आणि छोटी आहेत. सभोवताली भातशेतीतल्या लाटांचा नाच चालू आहे. आकाश एकदम निळं दिसतंय – तो हिरवा आणि निळा रंग आणि भवतालची शांतता यांनी माझं मन एकदम शांत झालंय. शहरात
हा निवांतपणा कधी लाभणार नाही हे माहिती असल्याने मी तो क्षण पुरेपूर उपभोगते आहे.
अर्थात माझा हा एकांत फार काळ टिकत नाही.
माझे
दोन सहकारी माझा शोध घेत येतात. त्यांच्याबरोबर गावातले एक दोन लोकही आहेत. मग आमची
’गावात काय काय करता येईल पुढच्या काळात’ यावर चर्चा चालू होते. मी अनेक प्रश्न विचारते,
ते सगळॆ माहिती पुरवतात. आम्ही त्या वस्तीत चक्कर टाकतो. अनेक घरं नुसती बाहेरून कडी
लावून बंद आहेत – (ते लोक तिकडे कार्यक्रमात आहेत) – आम्ही त्यांचं घर उघडून आत जातो.
घराची पाहणी करतो – चुलीत काय सुधारणा करता येईल, घरात प्रकाश कसा आणता येईल, पिण्याचे
पाणी कसे ठेवले आहे, घरात किती ओल आहे …. अशी पाहणी होते, चर्चा होते. ही चर्चा माझे सहकारी नंतर गावातल्या लोकांशी करतील सविस्तर. वाटेत एक दहा
वर्षांची मुलगी दिसते. तिला बोलता येत नाही – त्यामुळे तिचे नाव इतरांनी ठेवले आहे
’गुंगी’. तिच्यासाठी काय सरकारी योजना आहेत त्याबद्दल आम्ही बोलतो. एक पुरुष एका छोट्या
मुलीला खांद्यांवर घेऊन उभा आहे – त्या दहा महिन्यांचा मुलीचे नाव आहे खुषबू. घरांतली
भांडीकुंडी, कपडे सगळं वेगळं आहे. घरातच कोंबड्या आहेत, बक-या आहेत. काही अंगणात गाय
आहे, झाडांवर पक्षी आहेत. माझ्या घरापेक्षा या घरांच चित्र अगदीच वेगळं आहे. मला पुन्हा
एकदा माझ्या आणि या आदिवासींच्या जगण्यातला विरोधाभास जाणवतो आहे. इथली शांतता, इथली
मातीची घर … हे सगळं काही काळ चांगलं वाटतं – धकाधकीच्या जगण्यात बदल म्हणून! पण रोज असं मला जगता
येईल का? अशा जगण्याची माझ्यावर सक्ती झाली तर आजची माझी शांतता टिकेल का? जर मला जगण्यासाठी
अधिक सुखसोयी लागतात तर त्या या लोकांनाही का मिळू नयेत?
कार्यक्रम
संपतो. गावातल्या स्त्रियांनी सगळ्यांसाठी चहा आणि बिस्किटांची व्यवस्था केली आहे. बारक्या पोरांना मात्र फक्त बिस्किटं आहेत, चहा
नाही हे मला दिसतं. बरोबर आहे, साखर, दूध सगळ्याचा प्रश्न असणार इथं! त्या बारक्या पोरापोरींच्या डोळयांत मला चहाची इच्छा
दिसते. मग मी माझा चहाचा कप पुढे करून ’यात बिस्किटं बुड्वून खा’ असं त्यांना सांगते.
क्षणार्धात माझ्याभोवती पोरं जमा होतात. त्यांचा ’चहा बिस्किटांचा’ आनंद अगदी निरागस
आहे. मला त्यांचे चमकते डोळॆ आणि चेहरे पाहून फार बरं वाटतं.
मला
पुन्हा एकदा त्यांच्या आणि माझ्या जगण्यातला विरोधाभास जाणवतो. तसं पाहायला गेलं तर आनंद
किती छोट्या गोष्टींत दडलेला असतो आणि तो किती उत्स्फूर्त असतो. पण सुख, समाधान, आनंद या सगळ्या बाबी केवढ्या
गुंतागुंतीच्या करून घेतल्या आहेत मी स्वत:साठी!
आम्ही
निघतो. गावातले काही स्त्री पुरुष आम्हाला पोचवायला मुख्य रस्त्यापर्यंत म्हणजे साधारणपणॆ
दोन किलोमीटर येतात. हाच तो मघाचा भातखाचरातला आणि काट्यांनी भरलेला रस्ता. आम्ही एकमेकांशी
बोलतो आहोत, हसतो आहोत. मी आता चिखलात पडेन अशी भीती मला नाही कारण माझे दोन्ही हात
आता दोन स्त्रियांच्या हातात आहेत, आणखी दोघी माझ्या खांद्यांवर हात ठेवून चालल्या आहेत; ती एवढीशी पाउलवाट आता आम्हा सर्वांना सामावून घेते आहे. चालता चालता आम्ही मधेच थांबून हसतो आहोत. आम्ही पुढच्या गोष्टी ठरवतो आहोत. “आमची
वस्ती आवडली का तुम्हाला, परत कधी येणार तुम्ही?” असा प्रश्न जवळजवळ सगळॆच जण विचारत
आहेत. मला कधी बोलवायचं परत याबाबत त्यांचा आपापसात विचारविनिमय चालू आहे – आणि त्यांचं काही एकमत होत नाहीये.
आम्ही
आजच भेटलो, आणि चार पाच तासांचीच काय ती भेट – पण आम्हाला एकमेकांबद्दल आपुलकी वाटते
आहे – आमच्यात एक प्रकारची जवळीक निर्माण झाली आहे. आता आमच्यात न भाषेचा अडसर आहे
, न वयाचा, न शिक्षणाचा, न परिस्थितीचा, न पैशांचा, न आणखी कशाचा. आमचं एक नाव नसलेलं नातं निर्माण झालं आहे.
परस्परभेटीची
इच्छा त्यांना आणि मलाही आहे. एकमेकांना भेटल्याचा
आनंद त्यांना झाला आहे, तितकाच मलाही झाला आहे. आमचे एकमेकांच्या हातातले हात, आमचे फुललेले चेहरे,
आमच हसू, आमची परस्पर भेटीची इच्छा … त्यात खोटं काही नाही, वरवरचं काही नाही.
अखेरच्या क्षणी,
निरोपाच्या या क्षणी आमच्या जगण्यात काहीही
विरोधाभास नाही, काहीही अंतर नाही.
सकाळपासून
मला अस्वस्थ करणा-या सगळ्या विरोधाभासाला, अंतराला पेलून कसल्यातरी अनामिक धाग्याने
आम्ही एकमेकांशी जोडले गेलो आहोत. कदाचित आम्ही
कधीच भेटणार नाही पुन्हा, तरीही …..
**
Posted my comment as 'Apratim Akher' but don't know what hapnd.
ReplyDeleteRajyashree
खूप जिवंत वर्णन आहे आणि या सगळ्याकडे बघण्याचा तुमचा एक वेगळा दृष्टीकोन....
ReplyDeleteएक दीर्घ श्वास हे वाचून संपल्यावर गेला...जणू काही हा अनुभव मीच घेतला....
अपर्णा +१
ReplyDeleteखरंच अगदी जिवंत वर्णन आहे.
आणि तो पाड्याचा फोटो दिलाय ना, ते अगदी माझेच गाव वाटतेय, अर्थात भारतातली सारी खेडी सारखीच. :)
माझ्या अडाणीपणामुळॆ त्यांच काही माझ्याबद्दल वाईट मत होत नाही हे मला विशेष वाटतं. >> विरोधाभास नाही का ? शहरात ह्याच्या अगदी उलट होतं असं वाटत नाही का ? समोरच्याला आपलं कळलंच पाहिजे हा अट्टाहास असतो ! :)
लेख अप्रतिम आहे. तुम्ही घेतलेला आणि इथे लिहीलेला प्रत्येकच अनुभव तुमचे आणि आमचेही जगणे समृद्ध करत असतो.
राज्यश्री, :-)
ReplyDeleteअपर्णा, हा अनुभव तुम्हाला तुमचा वाटला हे वाचून बर वाटलं ...
ReplyDeleteसंकेत, लोक आपले जगणे सतत समृद्ध करत असतात ... आपण आपल्या लक्षात येत नाही इतक त्यांच्याकडून सतत शिकत असतो. हो, आणि तुम्ही म्हणालात तसा 'अडाणीपणाचा' मुद्दा आहे. एखाद्याला 'शुद्ध'(!!) मराठी बोलता येत नसेल तर लगेच आपण त्याची/तिची किती थट्टा करतो .. पण गावातले लोक इतक्या सहज तस करत नाहीत .. त्यांच्याही 'अडाणीपणाच्या' व्याख्या आणि प्रथा असतात अर्थातच!
ReplyDelete>>>लेख अप्रतिम आहे. तुम्ही घेतलेला आणि इथे लिहीलेला प्रत्येकच अनुभव तुमचे आणि आमचेही जगणे समृद्ध करत असतो.
ReplyDelete१०० % सहमत ...
"आपण ह्यांच्याकरता काय करू शकतो"
ReplyDeleteही दात्याची भूमिका आपल्याकडे यदृच्छया आलेली नाही.
नकळत, जबरदस्तीने, जमीनधारणा कायद्यान्वये, त्यांच्या अधिकारांवर कधीकाळी अतिक्रमण झाले. खरे तर ते आपल्या सत्तेचे मिंधे नव्हते. त्यांच्या भूमीवर, त्यांच्याच कष्टाने जमेल ते पिकवून स्वाभिमानाने राहत होते. एक दिवस त्यांची भूमी सरकारची झाली. त्यांच्या जंगलांतून, त्यांनाच रसद मिळवायची तर सरकारची परवानगी घ्यावी लागू लागली. मग जंगले आपली म्हणून जोपासायची त्यांचीही इच्छा क्षीण झाली.
यात त्यांचा लाभ झाला, सरकारचा झाला, की आपला झाला हे मला अजूनही उमगत नाही.
तुम्ही काय म्हणता?
देवेन, आभार.
ReplyDeleteऊर्जस्वलजी, तुमच्याशी मी सहमत आहे. दात्याची ही भूमिका हा आपण शोषण व्यवस्थेत कळत नकळत सामील झाल्याचा परिणाम आहे. आपण थेट शोषण कदाचित कुणाचे करत नसू देखील, पण सध्याची शोषणावर आधारित जी व्यवस्था आहे त्याचे फायदे आपल्याला मिळाले आहेत.
ReplyDeleteया सगळ्यात दीर्घकालीन लाभ असा कुणाचाच नाही. पण ज्यांना अल्प काळ का होईना फायदे मिळतात ते सहजासहजी फायद्याची व्यवस्था बदलायला मागत नाहीत.
'ऐसी अक्षरे' वरील प्रतिसाद - http://aisiakshare.com/node/808
ReplyDelete