ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Wednesday, October 31, 2012

१४०. निमित्त कॉफीचं ...

वैभवला कशाचा तरी आनंद साजरा करायचा होता, कसला ते तो मला आधी सांगायला तयार नव्हता. पण त्यासाठी तो मला एका प्रसिद्ध ‘कॉफी शॉप’मध्ये घेऊन गेला.

वैभवने मला हुकूम सोडला. साधं-सरळ वाच. तुझं उर्दू वाचन इथं आत्ता दाखवायची गरज नाही.

छे! मला उर्दू वाचता येत नाही. पण ‘जनरेशन नेक्स्ट’च्या या मुलाला आमच्या पिढीची सवय माहिती आहे. हॉटेलमध्ये मेन्यू कार्ड वाचताना आधी उजवीकडची पदार्थाची किंमत वाचायची आणि मग नेमकं काय आपल्या खिशाला परवडतंय याचा अंदाज घ्यायचा ही माझी (आणि माझ्या पिढीतल्या अनेकांची) सवय. वैभवचे आई-बाबा माझे मित्र आहेत. त्यामुळे लहानपणापासून अनेकदा वैभवने आम्हाला असं मेन्यू कार्ड वाचताना पाहिलेलं आहे. हातात पैसे आले तरी ती एक प्रतिक्षिप्त क्रिया होतेच अजूनही. वैभव आणि भवतालची ‘जनरेशन नेक्स्ट’ आमच्या या सवयीची ‘उर्दू वाचन’ म्हणून संभावना करते.

आता वैभव मोठा झालाय, तो भरपूर पैसे कमावतो. ही नवी पिढी त्यांच्या पगाराबद्दल बोलते तेव्हा तो महिन्याचा पगार असतो की वर्षाचा असतो याबाबत माझा अनेकदा गोंधळ होतो. एकदा माझे एक सहकारी मला सांगत होते की ‘त्यांच्या जावयाला वीस हजाराची वाढ मिळालीय.’ त्यावर मी ‘वा! छान!’ असं म्हटलं खरं; पण मी बहुतेक फार प्रभावित नव्हते झाले. त्यामुळे त्यांनी लगेच सांगितलं ‘ वर्षाची नाही, महिन्याची पगारवाढ सांगतोय मी’. माझे हे सहकारी माझ्याहून जुन्या काळातले असल्याने ‘महिन्याच्या’ पगाराबद्दल बोलले. नाहीतर आजकाल कोण मासिक उत्पन्नाबद्दल बोलतंय? वैभवही मला लहान असला तरी आता या भरपूर पैसे कमावणा-या गटात मोडतो. पैसे भरपूर कमावत असल्यामुळे या लोकांचा खर्चही अफाट असतो. ‘एवढे पैसे कशाला लागतात?’ या माझ्या प्रश्नावर वैभव आणि त्याच्या वयाच्या मुला-मुलीचं एकचं उत्तर असतं – जाऊ दे, तुला नाही कळायचं ते!’ ते बरोबरचं असणार त्यामुळे मीही जास्त खोलात कधी जात नाही.

काय घेणार मावशी तू?”, वैभवने अगदी मायेनं विचारलं मला.

अरे, हे कॉफी शॉप आहे ना? मग कॉफीचं घेणार ना, दुसरं काय? माझ्या मते मी अत्यंत तर्कशुद्ध मत व्यक्त केलं होतं.

वैभव समंजसपणे हसला. मग मी त्याच्या लहानपणी त्याला ज्या थाटात त्याला समजावून सांगायचे त्याच पद्धतीने म्हणाला, अगं, असं नाही मावशी. इथं कॉफीच्या आधी खायचे पदार्थ मिळतात, कॉफीसोबत खायचे पदार्थ मिळतात. कॉफीचे तर असंख्य प्रकार आहेत. तू फक्त सांग तुला काय हवंय ते. आणि प्लीज, किंमत पाहून नको ठरवूस काय मागवायचं ते! मी काही आता लहान नाही राहिलो ..मला आज पैसे खर्च करायचेत, तुझ्यासाठी खर्च करायचेत. तू उगीच माझी मजा किरकिरी करू नकोस.

मला वैभवची भावना समजली. पण असल्या भपकेबाज ठिकाणी माझी आणखी एक अडचण असते.  ब-याच पदार्थांची नावं वाचून मला नेमकं काहीच कळत नाही. मागवलेला पदार्थ आवडला नाही तरी ‘ताटात काही टाकून द्यायचं नाही’ या सवयीने संपवला जातो. पदार्थांची नावं लक्षात रहात नसल्याने मागच्या वेळी कोणता पदार्थ आवडला नव्हता हेही लक्षात रहात नाही. त्यामुळे अशा ठिकाणी माझ्या प्रयोगशील वृत्तीला मी गप्प बसवते. त्यातल्या त्यात ‘चीज सॅन्डविच’ मला माहिती आहे – मग मी तेच पाहिजे म्हटलं. मी खायला इतकं स्वस्त काहीतरी निवडावं याचं वैभवला वाईट वाटलं, पण तो घेऊन आला ते माझ्यासाठी.

आम्ही गप्पा मारत बसलो. वैभवचे आई-बाबा माझे मित्र असले तरी वैभवचं आणि माझंही चांगलं गूळपीठ आहे. तो अनेक गोष्टी मला सांगतो, अनेक विषयांवर आमच्या गप्पा होतात. मी ब्लॉग लिहिते, मी फेसबुक वापरते – अशा गोष्टींमुळे वैभवला मी नव्या जगाशी जुळवून घेणारी वाटते. मी पहिल्यांदा मोबाईल वापरायला सुरुवात केली तेव्हा काही अडचण आली की वैभवकडे मी धाव घ्यायचे. एस एम एस कसा करायचा, ब्लू टूथ म्हणजे काय, ते कसं वापरायचं – असं काहीबाही वैभवने मला शिकवलेलं आहे. त्यामुळे आम्हाला गप्पा मारायला विषयांची कधी वानवा नसते.

मग कॉफीची वेळ. मीही वैभवबरोबर काउंटरपाशी गेले.

तिथल्या तरुण मुलाने विचारलं, काय घेणार?
कॉफी, मी सांगितलं.
"कोणती?" 
मी एक नाव सांगितलं.
साखर हवी की नको? त्या मुलाने विचारलं.
पाहिजे, मी सांगितलं.
किती? पुढचा प्रश्न – त्याचंही उत्तर मी दिलं.
दूध? आणखी एक प्रश्न.
हो माझं उत्तर.
गरम का थंड? प्रश्न – त्याचंही उत्तर दिलं.
क्रीम हवं? प्रश्न काही संपेनात.

अरे बाबा, मी साधी एक कप कॉफी प्यायला इथं आलेय तर किती प्रश्न विचारशील मला? मी हसत पण काहीशा वैतागाने त्या मुलाला म्हटलं . वैभव आणि तो मुलगा दोघांच्याही चेह-यावर हसू होतं.

काउंटरवरच्या त्या मुलाला माझ्या पिढीला तोंड द्यावं लागत असणार नेहमी – किंवा त्यांना प्रशिक्षण देणारी व्यक्ती थोर असेल. कारण तो मुलगा मिस्कीलपणे मला म्हणाला, आपल्या आवडीचं काही हवं असेल आयुष्यात तर अनेक प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात शांतपणे आणि निर्णय करावा लागतो प्रत्येक टप्प्यावर  ...

मला त्याच्या या उत्तराचं आश्चर्य वाटलं. तो जे काही म्हणाला त्यात तथ्यही होतंच म्हणा. पण माझ्या         चेह-यावरचं आश्चर्य पाहून त्याला राहवलं नाही. तो पुढे म्हणाला, असं परवाच ते तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक त्यांच्या एका विद्यार्थ्याला इथं सांगत होते ... तो हसून पुढच्या ग्राहकाकडे वळला आणि आम्ही आमच्या टेबलाकडे परतलो. वैभवने एकही प्रश्न विचारायला न लागता त्याला काय हवं ते सांगितलं होतं आणि मिळवलंही होतं , हे माझ्या लक्षात आलं.

एक तर प्रश्न माहिती पाहिजेत किंवा त्यांची उत्तरं देता आली पाहिजेत. नाहीतर मग नको ते वाट्याला येईल आणि त्याचा आनंद न मिळता ते फक्त एक ओझं होईल – हे मला पटलंच! साधं कॉफी शॉपमध्येही शिकण्यापासून सुटका नाही.

या प्रसंगानंतर काही महिन्यांनी मी पॉन्डिचेरी आणि कन्याकुमारीला गेले. एकटीच होते मी. कन्याकुमारीला पोचल्यावर कॅन्टीनमध्ये गेले आणि ‘कॉफी’ एवढंच सांगितलं. माझ्यासमोर मला आवडते तशी – अगदी पहिजे तितकी साखर, दूध, पाहिजे त्या चवीची गरमागरम कॉफी समोर आली. तिचा वास, तिची चव, तिचं रूप – सगळं अगदी माझ्या आवडीचं – मुख्य म्हणजे एकही प्रश्न मला न विचारला जाताच! अशी कॉफी मी एक दिवस, दोन दिवस नाही तर पुढचे दहा दिवस घेत राहते. मला कॉफी या विषयाचा काही विचार करावा लागत नाही, त्याबाबत काही निर्णय घ्यावे लागत नाहीत (साखर किती वगैरे...). मला ज्यातून आनंद मिळतो ती कॉफी मिळवण्यासाठी मला डोकेफोड करावी लागत नाही, धडपड करावी लागत नाही.

कॉफी शॉपमध्ये एक ग्राहक म्हणून माझी आवडनिवड लक्षात घेऊन कॉफी बनवली जाते – निदान तसा प्रयत्न तरी असतो. पण तिथं मला मजा येत नाही. मला हव्या त्या चवीची कॉफी तिथं मिळत नाही सहसा. इथं सगळ्यांसाठी जी कॉफी बनते, तीच माझ्या समोर येते. इथं मला काही खास वागणूक  मिळत नाही, पण इथल्या कॉफीचा आस्वाद मी सहाही इंद्रियांनी घेऊ शकते, घेते. हो, इथं ग्लासातून वाटीत कॉफी ओतण्याचा आवाज ऐकायलाही मजा येते!

माझ्या मनात नकळत या दोन्ही प्रसंगांची तुलना होते. कॉफी शॉपमध्ये जे हवं त्यासाठी धडपड करावी लागत तर होती, पण जे हवं तेच हाती येईल अशी खात्री नव्हती. दुस-या परिस्थितीत फार धडपड न करावी लागता जे पाहिजे ते मिळत होतं. पहिली कॉफी दुसरीच्या कैक पट महाग होती (असते) हा मुद्दा फारसा महत्त्वाचा नसला तरी दुर्लक्ष करण्यासारखाही नाही.

जगताना बरेचदा पहिली परिस्थिती आपल्या वाट्याला येते. धडपड करायची आणि काहीतरी कमवायचं पण त्याचा आनंद, समाधान मात्र नाही. पण अनेकदा दुसरी परिस्थितीही असते. फार काही न करता अचानक सुख, समाधान, आनंद समोर येतो. यातली फक्त एकच परिस्थती असत नाही – साधारणपणे दोन्हीही असतात. अनुकूल वातावरण असेल तर चांगलंचं – पण तितकसं अनुकूल नसेल तरी आपल्याला पाहिजे ते मिळवता येतचं – प्रश्न विचारायची आणि उत्तरं शोधायची तयारी मात्र पाहिजे आपली.

मग निमित्त कॉफीचं असेल किंवा नसेल ...
**

35 comments:

 1. विचार करतीये प्रतिक्रिया नक्की कशावर देऊ......कॉफी चा सुगंध तर हे वाचूनच माझ्या आसपास दरवळू लागलाय...."पण तितकसं अनुकूल नसेल तरी आपल्याला पाहिजे ते मिळवता येतचं – प्रश्न विचारायची आणि उत्तरं शोधायची तयारी मात्र पाहिजे आपली."......हो पण कधी कधी प्रश्नांची उत्तरे देताना मूळ प्रश्नच बदलून जातात ना...पण एकंदरीतच लेख मस्त जमून आलाय.....अगदी मनाजोग्या कॉफी सारखा!

  ReplyDelete
 2. गरमागरम कडक पोस्ट!
  कदाचित फरक भारतीय अन पाश्चात्य विचारातलाच असेल का....
  त्यांना वाटतं कि खूप प्रश्न विचारून तुम्हाला हवं तेच नेमकं देता यावं. तुमच्या व्यक्तिगत आवडीनिवडीला महत्त्व देऊन तुमचा मान राखावा...
  पण आपल्याकडे देण्याची सुरुवात वेगळीकडे होते....जे काही उत्तम देणं शक्य आहे तेच द्यावं, त्यात विचारायचं काय?! असा भाव असतो!
  यात घेणाऱ्याच्या आवडीनिवडीला प्राधान्य नाही. अन अर्थात पैशाची बाजू सेवा पुरवणाऱ्याच्या दर्जा अन प्रसिद्धीनुसार किंचित कमी अधिक होणार!

  व्यक्ती तितक्या प्रकृतीना जर वेगवेगळी सेवा पुरवायचे असेल तर देणारा, त्याच्या प्रकृतीला रुचेल असे भक्कम पैसे घेणार! पुन्हा तुमच्या कॉफीला तुम्हीच जबाबदार!

  "इथं ग्लासातून वाटीत कॉफी ओतण्याचा आवाज ऐकायलाही मजा येते!" आता मात्र एक कप हवाच!

  ReplyDelete
 3. महागडी कॉफी शॉप आणि 'कापी'वाली दुकानं ... मला दोन्ही ठिकाणी जायला आवडतं, कारण मला कॉफी पिण्यापेक्षाही तिचा वास जास्त आवडतो, तो दोन्हीकडे फुकट मिळतो :)

  ReplyDelete
 4. मला दोन्ही गोष्टी आवडतात. निव्वळ कॉफी प्यायची असेल तर जिथे बिन कटकटीची उत्कॄष्ट कॉफी मिळते आणि कॉफीबरोबर खूप गप्पा मारायच्या असतील तर महागडं कॉफी शॉप. दोन्ही संस्कृती आपापल्या ठिकाणी आहेत. मला काय हवंय हे मला माहिती असलं की जागा निवडता येतेच:)
  बाकी पोस्ट मस्तच!

  ReplyDelete
 5. पोस्ट खूप आवडली ताई... मला दुसरीच कॉफी आवडते. आणि आयुष्यातही असंच न मागता पण चांगलं मिळावं असं वाटत राहतं मग..... कदाचित मला काय हवंय ते मलाच माहिती नसल्याने असेल... किंवा मला माहिती असेल तर मी स्वत:च बनवून घेईन मग ते.. दुसऱ्याने माझ्यासाठी करण्यात मजा नाही...

  मी काय प्रतिक्रिया दिली ते मलाच समजत नाहीये... :)

  ReplyDelete
 6. अ लॉट कॅन हॅपन ओव्हर (अँड अराऊंड) कॉफी!

  ReplyDelete
 7. अनघा,
  << हो पण कधी कधी प्रश्नांची उत्तरे देताना मूळ प्रश्नच बदलून जातात ना. >>
  या निरीक्षणाशी अगदी सहमत!

  ReplyDelete
 8. अनुज्ञा, 'आपल्या कॉफीला आपणच जबाबदार' - हं! हे ध्यानात नव्हतं आलं आजवर!

  ReplyDelete
 9. गौरी, कॉफीचा वास फुकट मिळतो? पण नुसत्या वासाने मन कुठं भरतं? वास त्या आस्वादाची फक्त एक सुरुवात असते ...

  ReplyDelete
 10. क्षिप्रा, वैभवप्रमाणेच तुलाही बहुधा प्रश्नांची उत्तरं द्यायची वेळ न येता हवं ते मिळवण्याची कला साधली आहे तर :-)

  ReplyDelete
 11. इंद्रधनू, पहिल्या कॉफीचा अनुभव असेल तर दुसरी कॉफी अधिक सुखावह वाटते - फक्त दुसरीच मिळत गेली तर तिचं मोल राहणार नाही तितकं...

  ReplyDelete
 12. अनामिक, अ लॉट डीड हॅपन :-)

  ReplyDelete
 13. अगं, संपूर्ण पोस्टभर दोन्ही कॉफ्यांचा अलटूनपालटून नाकस्वाद घेत होते बघ. :)

  उर्दू वाचनाची सवय माझीही आहेच... कितीही प्रयत्न केला तरी ती जात नाहीच... म्हणून मी आताशा करतच नाही. :D:D

  असं मनकवड्यासारखं घडावं असचं वाटतं पण कधीकधी जरा हटकेही अनुभवण्यात मजा येते. अर्थात घडावं असंच वाटलं तरी ते घडत नाहीच हेही अंगवळणी पडल्यामुळे...

  ReplyDelete
 14. 'उर्दू वाचन' आवडलं !
  मलाही भारी त्रास होतो ह्या प्रश्नांचा !
  आणि त्यापेक्षा मी तुम्ही जे काही समोर आणाल ते मला मान्य आहे...व तीच 'आजची चव' आहे असं म्हणून मी मोकळी होते ! :) :)

  ReplyDelete
 15. भानस, उर्दू वाचनाची खोड एकदा चिकटली की जात नाहीच :-)

  ReplyDelete
 16. अनघा, 'आजची चव' - हं, तेच तर 'स्वातंत्र्य' नसतं ना या आधुनिक कॉफी शॉपमध्ये!!

  ReplyDelete
 17. "जगताना बरेचदा पहिली परिस्थिती आपल्या वाट्याला येते. धडपड करायची आणि काहीतरी कमवायचं पण त्याचा आनंद, समाधान मात्र नाही. पण अनेकदा दुसरी परिस्थितीही असते. फार काही न करता अचानक सुख, समाधान, आनंद समोर येतो. यातली फक्त एकच परिस्थती असत नाही – साधारणपणे दोन्हीही असतात. अनुकूल वातावरण असेल तर चांगलंचं – पण तितकसं अनुकूल नसेल तरी आपल्याला पाहिजे ते मिळवता येतचं – प्रश्न विचारायची आणि उत्तरं शोधायची तयारी मात्र पाहिजे आपली."
  सुपर लाइक..
  बाय द वे, मला बायकोच्या हातची जायफळ वेलची घालून उकळलेली कॉफी जास्त आवडते. सिसिडी मधून कॉफी ६० टक्के चिकोरी वाली पावडर आणली की त्याची जायफळ वाली कॉफी मस्त होते :)

  ReplyDelete
 18. महेंद्रजी, आभार. 'जायफळ' घातलेली कॉफी बहुतेक वेळा अतिगोड असते असा अनुभव आहे. तुमच्या घरची एकदा घेऊन बघायला हवी :-)

  ReplyDelete
 19. वर ईंफाळचा दिलेला फोटो महाराष्ट्र देशा या उद्धव ठाकरे यांच्या पुस्तकातील एका फोटोसारखा दिसतो

  ReplyDelete
 20. अनामिक/का, या माहितीबद्दल आभार. डोंगर आणि भातशेती असलेल्या भागाचे "असे" चित्र भारतात असंख्य ठिकाणी दिसते असा माझाही अनुभव आहे.

  ठाकरे यांचे पुस्तक अद्याप पाहिलेले नाही - पण आता जरूर पाहीन.

  ReplyDelete
 21. सुंदर पोस्त !!! उर्दू वाचन :))))) फारच भारी !!!

  ReplyDelete
 22. हेरंब, 'उर्दू' पद्धतीने वाचायची वेळ नाही आली वाटतं कधी!! ती एक अगदी खास मध्यमवर्गीय संस्कृती आणि परंपरा आहे :-)

  ReplyDelete
 23. हो. तशी वेळ बर्याचदा आली आहे पण त्याला उर्दु वाचन संबोधणं ही कल्पन आवडली :)

  ReplyDelete
 24. Very well said "प्रश्न विचारायची आणि उत्तरं शोधायची तयारी मात्र पाहिजे आपली.
  मग निमित्त कॉफीचं असेल किंवा नसेल ..."

  by the way, coffee वा खाद्यपदार्थ याबाबतीत साध्या वा स्वस्त ठिकाणी हवी ती चव मिळून जाते हा अनुभव अनेकदा येतो, नाही?

  ReplyDelete
 25. उर्दू वाचन ही संकल्पना आवडली
  कॉफी शॉप मध्ये जाणारे सराईत पणे कोणती कॉफी कशी हवी हे एका दमात सांगतात.
  ह्या ठिकाणी नियमित पणे गेलो तर तेथे नियमित येणारे व अनेक तास बसणारे वेगवेगळ्या वयोगटातील तरुण तरुणी येतात.
  सगळ्याच्या युनिक कथा आणि व्यथा असतात,
  माणूस सामाजिक प्राणी आहे जरी सोशल नेटवर्किंग मुळे त्याचा बाहेरील जगाशी संबंध कमी होत चालला आहे तरी त्याला अजून माणसात रहावेसे वाटते व ही गरज कॉफी शॉप पूर्ण करतात.

  ReplyDelete
 26. प्रीति, आपण जास्त काळ साध्या वा स्वस्त ठिकाणी खाल्लेलं असल्याने बहुतेक आपाल्याला तिथलं जास्त आवडत असावं!

  ReplyDelete
 27. निनादजी, आभार.
  नियमित कॉफी शॉपमध्ये जाणारे वैभवसारखे लोक फार प्रश्न न विचारावे लागता स्वत:ला पाहिजे ते सहज मिळवतात. आणि कॉफी शॉप माणसाची सामाजिक गरज पूर्ण करतात या तुमच्या मताशी सहमत आहे मी.

  ReplyDelete
 28. पोस्ट खूप आवडली

  ReplyDelete
 29. छान, लेख आवडला, खरं तर तुम्ही यावर विनोदीही लिहू शकला असता :-).

  मोहना

  ReplyDelete
 30. Pahije te milavnyasathi dhadpadnarya lokanche mla kautuk vatte... Aso khup divsanni tuza blog vachla... evdhya divsat mi khup kahi miss kelyachi mla khant vattey. Pan te mhantat na 'der aye par durust aye' :-)

  ReplyDelete
 31. मोहना, आभार.
  मला पूर्ण लेख विनोदी लिहिणं कधी जमेल असं वाटत नाही. प्रयत्न केला तर जमेल कदाचित, पण मग त्यात गंमत नाही!!

  ReplyDelete
 32. श्रीराज, आभार, वेळ मिळेल तेव्हा सवडीने वाच - म्हणजे मग काही राहून जाणार नाही!!

  ReplyDelete
 33. मस्त पोस्ट. मला अशी प्रश्नोत्तरवाली कॉफ़ी अमेरिकेत आल्यावर पहिल्यांदी प्यायला लागली होती तेव्हा जरा जास्तच कडू लागली होती. मग जशी प्रश्नांची सवय होत गेली तशीच कॉफ़ीच्या चवीची असं काहीसं ही पोस्ट वाचल्यावर जाणवतंय... :)

  दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

  ReplyDelete
 34. म्हणून आपल्याला चहा आवडतो. एक कटिंग सांगितलं की काम फत्ते!

  -गामा पैलवान

  ReplyDelete