भाग १, २(अ) , २ (आ), ३, ४(१)
मागील भाग
सत्तात्रय
जीवो ब्रह्मैव
ईश्वर
मोक्ष
मागील भाग
'ब्रह्म हे अविकृतच राहते. मात्र त्याच्यामुळे सृष्टीची
प्रचिती येते’ असे शंकराचार्य
मानतात. हा सिद्धान्त 'विवर्तवाद’ या नावाने ओळखला
जातो...... (पुढे चालू)
सत्तात्रय
हे सगळे तत्त्वज्ञान तत्त्वज्ञान म्हणून ठीक आहे. पण
प्रत्यक्ष व्यवहारात आपल्याला जेंव्हा साप दिसतो, तेंव्हा 'ते ब्रह्म आहे’ असे म्हणून स्वस्थ बसून कसे चालेल? याबाबत शंकराचार्यांच्या जीवनातील एक प्रसंग सांगितला जातो.
वाराणसीच्या एका अरुंद गल्लीत हत्ती अंगावर आला असताना शंकराचार्य पळू लागले. ते
पाहून एकाने खोडसाळपणे विचारले की, 'किं पलायनम्? गजोSपि मिथ्या:’ - पळताय कशाला?
हत्ती ही तर माया आहे.
त्यावर हजरजबाबी शंकराचार्य उत्तरले, 'गजोSपि मिथ्या - पलायनमपि मिथ्या’ – ‘जशी हत्ती ही माया आहे तसेच माझे पळणे ही देखील
मायाच आहे.’ शंकराचार्य केवळ चतुर होते म्हणून त्यांनी हे
उत्तर दिलेले नाही. त्यामागे त्यांचा सत्तात्रयाचा सिद्धान्त आहे. शंकराचार्यांचा
मायावाद समजावून घेताना त्यांचा सत्तात्रयाचा सिद्धान्तही समजावून घेणे आवश्यक ठरते.
शंकराचार्यांच्या मते जग पूर्णत: ‘सत्’ नाही तसेच ते पूर्णत: ‘असत्’ ही नाही. जे कधीच
कोणाच्या अनुभवास येत नाही त्याला ‘असत्’ म्हणायचे. उदाहरण सांगायचे तर वंध्यापुत्र हा शब्द
घ्या. वंध्येला पुत्र झाला की ती वंध्या राहत नाही आणि त्यामुळेच वंध्यापुत्र ही
संज्ञा ‘असत्’ - कधीही घडून न येणारी - या वर्गात येते. ‘चौकोनी वर्तुळ’ पण याच सदरात मोडेल. जग ‘असत्’ नाही कारण ते तुमच्या आमच्या सर्वांच्या अनुभवास
येते.
सत्तात्रयापैकी पहिली जी सत्ता आहे तिला 'प्रातिभासिक सत्ता’ असे म्हटले जाते. दोरीवर दिसणारा साप, मृगजळ, आपल्याला पडणारी स्वप्ने ही
वंध्यापुत्रासारखी ‘असत्’ नव्हेत. पण ती भास आहेत – ‘सत्’ नव्हेत - हे तर आपण सर्वजण मान्य करतो. स्वप्नाला
त्याच्या जागी ठेवण्याचे, त्याची रोजच्या
कामात सरमिसळ न करण्याइतके व्यावहारिक ज्ञान आपण सर्वजण दाखवतो. स्वप्नात आपल्या
अंगावर धावून येणारा अक्राळविक्राळ
राक्षस त्या क्षणापुरता खरा असला तरी डोळे उघडता क्षणी तो नष्ट होतो.
हे जग म्हणजेही एका प्रकारचे स्वप्नच आहे. जगाची सत्यता
प्रतीत होते ती केवळ व्यावहारिक पातळीवर. म्हणून त्याला 'व्यावहारिक सत्ता’ म्हणायचे. माझे नाव, माझा व्यवसाय, माझा देश या सगळयाला व्यावहारिक सत्यत्व आहे. ज्या नाना पदार्थांचा आपल्याला
प्रत्यय येतो, ज्यांचा आपण उपभोग घेतो, त्या सा-या गोष्टी व्यावहारिकदृष्टया सत्यच आहेत. सर्पाचा जिच्यावर आपल्याला भास होतो
ती दोरी सत्यच आहे. सर्प आणि दोरी या दोन्ही ज्ञानात जेंव्हा आपण सर्पाची सत्ता
दोरीवर अध्यासित करतो तेंव्हा ती ‘प्रातिभासिक सत्ता’ होते. जेंव्हा आपण दोरीची सत्ता मान्य करतो
तेंव्हा ती ‘व्यावहारिक सत्ता’ असते. व्यावहारिक सत्तेने प्रातिभासिक सत्तेचा बाध
होतो म्हणून त्या दोहोंत व्यावहारिक सत्ता वरच्या पातळीवरची आहे.
शंकराचार्यांच्या मतांवर आधारित तर्क चालवायचा तर ब्रह्मसाक्षात्कार
होईपर्यंत व्यवहारातील भेद, लौकिक प्रमाणे, मोक्षशास्त्र या सर्व गोष्टी सत्यच ठरतील. पण अंतत: त्या सत्य असतात काय?
रामगोपाल मोहता शंकराचार्यांचया
सत्तात्रयासंबंधी म्हणतात की, “In the state of watchfulness also it is equally illogical to consider
ourselves subject to differeing reactions such as pain and pleasure, freedom or
bondage. In the acceptance of this variety as opposed to the realization of
oneness, lies embedded all our sorrows, our helplessness in being victims of
actions, reactions and counter actions, for we forget even in the state of
wakefulness, as in the dream state, that the apparent spectacles, changes of
scenes, are entirely imaginary, much as the mirage in a desert is to the
thirsty traveler who has gone off his track and gets confused.”
एकदा ब्रह्मसाक्षात्कार झाला की
मग कसलेच भेद उरत नाहीत. कारण 'ब्रह्मविद् ब्रह्रौव भवति’! मग त्या पातळीवर व्यावहारिक ज्ञानही स्वप्नमयच
भासते. ही आहे सर्वोच्च अशी ‘पारमार्थिक सत्ता’! 'विद्याविनयसंपन्ने ब्राह्राणे गवि
हस्तिनि, शुनि चैव श्वपाके च पंडिता: समदर्शिन:’ असा गीतेमध्ये एक श्लोक आहे. याचा अर्थ असा नव्हे
की ‘पंडित’ (म्हणजे ज्ञानी माणूस) गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाळ (हा शब्द ज्या काळात वापरतात तो
काळ इथे लक्षात घ्यायला हवा) यांना एकाच प्रकारचे अन्न देईल किंवा एकाच प्रकाराने तो त्यांच्याशी व्यवहार
करेल! व्यावहारिक पातळीवरच्या त्याच्या वागणुकीत भेद असेल (जो आवश्यक आहे – उदाहरणार्थ हत्ती आणि कुत्रा
यांची अन्नाची गरज वेगवेगळी आहे) पण तत्त्वत: मात्र असणार नाही. पारमार्थिक सत्तेच्या प्रकाशात तो जगाकडे
पाहतो. तो ज्ञानी असतो, मूर्ख नव्हे. रामकृष्ण परमहंसांनी सांगितलेल्या एका गोष्टीतही पिसाळलेल्या हत्तीने भिरकावून दिलेल्या एका
शिष्याला (हत्ती मस्तवाल झालेला असला तरी अखेर तो ब्रह्म आहे या भावनेतून शिष्य बाजूला होत नाही) त्याचे गुरु म्हणतात की, 'अरे बाबा, माहुताच्या तोंडातूनही
साक्षात ब्रह्मच तुला पळ काढायला सांगत नव्हते का? माहूत ब्रह्माचे का नाही ऐकलेस तू?’
ब्रह्मात्मैक्याचा अनुभव एकदा आला की तो कशानेही बाधित होत नाही. म्हणून ते सर्वोच्च
सत्य आहे. सर्वसाधारणपणे ज्ञानाच्या, सत्याच्या शंकराचार्यांनी सांगितलेल्या या तीन पातळया
लक्षात न घेताच आपण मायावादाची चर्चा करतो आणि त्यामुळेच आपला गैरसमज होतो,
गोंधळ वाढतो.
जीवो ब्रह्मैव
शंकराचार्यांच्या तत्त्वज्ञानातील मायावाद आणि सत्तात्रय हे
दोन मुलभूत सिद्धान्त आपण पाहिले. त्यांचा तिसरा सिद्धान्त म्हणजे जीव आणि ब्रह्म
यांचे ऐक्य! जीव तर अनेक आहेत आणि ब्रह्म तर एकमेव आहे. मग जीव आणि ब्रह्म यांचे
ऐक्य कसे शक्य आहे असा प्रश्न स्वाभाविकपणेच आपल्या मनात येतो.
शंकराचार्यांच्या मते जीव हा साक्षी आणि अंत:करण या दोहोंचा
मिळून बनलेला आहे.
जागृतावस्था = साक्षी + अंत:करण + इंद्रिये
स्वप्नावस्था = साक्षी + अंत:करण
सुषुप्ति अवस्था = साक्षी ( अंत:करण अविद्येत विलीन)
या तिस-या अवस्थेचे वर्णन करताना पी. नागराज राव म्हणतात, ”In this
state there is the concealment of the One but not the projection of the many.
Individuality still persisits. After waking up we are able to recollect the
experience of the happiness in the sleep.”
व्यवहारात आपण ज्याला जीव समजतो, आणि वस्तुत: तो जसा आहे त्यातील भेद आपण नीट
समजावून घेणे गरजेचे आहे. स्वप्न, जागृति, सुषुप्ति अशा जीवाच्या निरनिराळया अवस्था असतात. आत्म्याला मात्र अवस्थाभेद स्पर्श करु
शकत नाहीत. जीवाला विकार असतात. आत्मा विकारांच्या पलिकडे आहे. जीव हा ज्ञानाचा
विषय होऊ शकतो. आत्माच फक्त स्वत:ला जाणू शकतो आणि म्हणून तो ख-या अर्थाने ज्ञानाचा विषय होऊ शकत
नाही. जीव हा वास्तविक
आत्मतत्त्वाशी म्हणजे ब्रह्मतत्त्वाशी एकरुप असतो. पण उपाधींमुळे तो भिन्न वाटतो.
पाणी एकच पण त्याला ज्या भांडयात ठेवावे तसा आकार ते धारण करते तसेच जीवाचेही
असते.
जीवाच्या अनेकत्वासंबंधी तीन सिद्धान्त प्रचलित आहेत. ‘आभासवादा’च्या मते स्फटिकाशेजारी जास्वंदीचे फूल ठेवल्यास स्फटिकावर जडलेला रक्तवर्ण
तेथे जसा भासतो, त्याचप्रमाणे अज्ञान आणि त्याचे कार्य अंत:करण या उपाधीमुळे शुद्धचैतन्यस्वरुप
ब्रह्मावर ईश्वरत्व आणि जीवत्व यांचा आभास होतो. दुसरे मत आहे ‘प्रतिबिंब’वाद! आकाशातील चंद्राची असंख्य प्रतिबिंबे ज्याप्रमाणे आपण पाहतो, त्याप्रमाणे जीव ही ब्रह्माचीच
प्रतिबिंबे होत. तिसरे मत आहे ‘अवच्छेद’वाद! आकाश एकच असते. पण ते घट-मठांनी अवच्छेदित
झालेले असते इतकेच! हे तीन मतप्रवाह शंकराचार्यांच्या शिष्यामध्ये आढळून येतात.
जीव जगात उपभोक्ता म्हणून वावरतो. तो सुखावतो आणि
दुखावतोही. बाहय जगतावर जीवाचे नियंत्रण नसते. मायेमुळे जगत् भासमान होते तर जीव मात्र अविद्येमुळे भासमान होतो.
ज्या क्षणी ही अविद्या नष्ट होते त्या
क्षणीच जीव ब्रह्माशी एकरुप होतो. जीव अल्पज्ञ असतो. 'तत्त्वमसि’ हे छांदोग्य उपनिषदातील वाक्य वेदान्त विचारसरणीत महावाक्य म्हणून प्रसिद्ध
आहे. अविद्येचा विद्येने नाश करुन जीवाची ब्रह्मत्वाशी एकरुपता साधली जाते असे
शंकराचार्यांचा वेदान्त मानतो. ब्रह्मत्वाशी एकरुपता साधणे हेच जीवाचे ध्येय होय.
ईश्वर
‘शंकराचार्यांच्या तत्त्वज्ञानात ईश्वर कसा असणार’ - अशी शंका वाचकांच्या मनात उद्भवणे स्वाभाविक आहे. पण येथे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की शंकराचार्यांनी निर्गुण
ब्रह्माप्रमाणेच सगुण ब्रह्मालाही मान्यता दिलेली आहे. मूळ उपनिषदांमध्ये ब्रह्मामध्ये
सगुण आणि निर्गुण असा भेद केलेला आढळत नाही. निर्गुणातून सगुणाची निर्मिती हा विरोधाभास नाही का? निष्कल, निराकार, निरवयव, निर्गुण, निरंजन अशा ब्रह्माला
सृष्टीचे कर्तृत्व द्यायचे म्हटले की विरोधाभास
निर्माण होतो. सगुण व निर्गुणाच्या विरोधी वाटणा-या विधानांचा समन्वय साधताना शंकराचार्यांनी असे म्हटले आहे की, ‘उपनिषदातील काही वाक्ये सगुण ब्रह्माची तर काही
वाक्ये निर्गुण ब्रह्माची द्योतक आहेत.’
सगुण ब्रह्म म्हणजे मायेच्या उपाधीसह असलेले ब्रह्म. ब्रह्मसाक्षात्कारासाठी
चित्तशुद्धीची आणि चित्तशुद्धीसाठी उपासनेची गरज आहे असे शंकराचार्यांचे प्रतिपादन
आहे. निर्गुण ब्रह्माची उपासना कशी करणार? उपासनेला सोयीस्कर जावे म्हणून मग उपनिषदांनी ब्रह्माचे
सगुण वर्णन केले आहे असे शंकराचार्य मानतात.
या सगुण ब्रह्मालाच शंकराचार्य ‘ईश्वर’ असे म्हणतात. ईश्वर आणि जीव
एका स्तरावर नाहीत. ईश्वर म्हणजे मायेच्या उपाधीत असलेले ब्रह्म हे आपण वरील उता-या त पाहिले आहेच. पण ईश्वर
मायेच्या पाशात गुंतलेला नसतो - जीव मात्र मायेच्या आधीन असतात हा फरक आपण
प्रामुख्याने लक्षात घेतला पाहिजे. पण ईश्वर हे ब्रह्माला समांतर असे शक्तीकेंद्र
आहे असा मात्र याचा अर्थ नाही. ब्रह्म आणि ईश्वर एकच आहेत. मायेतून, मायेच्या चष्म्यातून निर्गुण
ब्रह्माकडे पाहिल्यावर जे दिसते त्याला ईश्वर म्हणायचे. तो जगाचा निर्माता आहे.
इतकेच नव्हे तर तो धारक, तारक आणि संहारकही आहे.
पी. नागराज राव शंकराचार्यांच्या ईश्वराचे स्पष्टीकरण
देताना म्हणतात की, “The God of Shankara lasts as long
as there is even a single finite soul. He is coequal with all souls and the
world. Maya is the interpolating principle between Brahman and Ishwara and in
fact between all that exists and Brahman. Shankara’s God is the absolute in the
world context. Shankara’s God is the Absolute in the world context. He is the
Supreme from the Cosmic end. He is the logical highest as Ishwara and Brahman
is the intuitive highest. Brahman is the philosophical ideal. Ishwara is the
religious goal. We can never realize Brahman by denying and eschewing God. Only
by realizing and transcending Him, we can have Brahman realization. God is
necessary step in the Advaita discipline for Brahman realization. ”
शंकराचार्यांच्या तत्त्वज्ञानात ईश्वराला काहीच स्थान नाही
किंवा असले तरीही ते फारच गौण आहे असा आपला समज आता नक्कीच दूर झाला असेल.
मोक्ष
सर्व भारतीय विचारप्रवांहाप्रमाणेच (अपवाद चार्वाकांचा)
मोक्ष हे अद्वैत वेदान्ताचे ध्येय आहे. वास्तविक पाहता मोक्ष ही काही प्राप्त करुन
घेण्याची वस्तू नाही. आपण खरे तर मुक्तच आहोत. पण अविद्येमुळे आपल्याला ‘आपण बंधनात आहोत’ असे भासते. आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक अशा तापत्रयांनी माणूस पोळून निघतो तो या अज्ञानामुळे,
अविद्येमुळेच! आपण सारेजण वास्तविक नित्य शुद्ध, बुद्ध आणि मुक्तच आहोत. मग
कुठल्या यातना? कोठले दु:ख? आत्म्याच्या या सच्चिदानंद स्वरुपाचा साक्षात्कार म्हणजेच मोक्ष होय.
शंकराचार्यांची मोक्षविषयक संकल्पना वैशिष्टयपूर्ण आहे.
मोक्ष हा शोध नाही तर साक्षात्कार आहे. येथे ‘साक्षात्कार’ हा शब्द असलेल्या
स्वरुपाची जाणीव होणे याच अर्थाने वापरला आहे. जोवर आपण मायेच्या, अविद्येच्या आवरणाखाली असतो तोवर आपण
सर्वत्र भेदच पाहतो. सर्वव्यापी चैतन्य हे माझेच रुप आहे अशी निरंतर भावावस्था
म्हणजे मोक्षावस्था असेही म्हणता येईल.
मोक्ष उत्पाद्य नाही. तो आहेच.
अनादि आहे. शाश्वत आहे. मोक्ष संस्कार्य अथवा विकार्य नाही. मोक्ष म्हणजे अधिक
काही मिळवणे नव्हे तर स्वस्वरुप जाणणे. या संदर्भातील 'दशमस्त्वमसि’ ही गोष्ट प्रसिद्ध आहे. काही माणसे आपल्या दहाच्या गटातील सर्वांची गणती करत होती.
तेंव्हा मोजणारा प्रत्येक जण स्वत:ला वगळत असल्याने त्यांची संख्या नऊच भरत होती.
उरलेला एक जण कोठे आहे याची सर्वजण चिंता करत होते. ‘मोजणारा स्वत:च दहावा आहे’ हे त्रयस्थाने
दाखवून दिले व मोजणा-याला स्वत:ची ओळख पटली!
मोक्ष म्हणजे मृत्यूनंतर मिळणारी अवस्था असा काही लोकांचा
गैरसमज असतो. पण याच जीवनात, याच देहात मुक्तीचा लाभ घेणे शक्य आहे. जे लोक या स्थितीला पोहोचतात त्यांना 'जीवनमुक्त’ म्हटले जाते. गीतेतील दुस-या अध्यायातील स्थितप्रज्ञाचे वर्णन हे जीवनमुक्ताचेच वर्णन आहे. ज्यांना देहनाशानंतर मोक्ष
मिळतो त्यांना 'विदेहमुक्त’ म्हटले जाते.
जीवनमुक्तीचा अधिकार कोणाला आहे? अर्थातच मोक्षावस्था साधणे ही काही सोपी गोष्ट
नाही. त्यासाठी नैतिक, व्यावहारिक व आध्यात्मिक शुचितेचे व अधिकाराचे जीवन जगावे लागते. ज्ञानानेच मोक्ष
मिळतो असा अद्वैत वेदान्ताचा ठाम सिद्धान्त आहे. ज्ञान म्हणजे माहितीचे भेंडोळे
नव्हे तर आत्मसाक्षात्कार, ब्रह्मसाक्षात्कार, अपरोक्षानुभूति.......
'मी ब्रह्मरुप आहे’ अशी खरीखुरी जाणीव होण्यासाठी चित्तशुद्धीची आवश्यकता आहे. कर्म आणि भक्तीने
ही चित्तशुद्धी होते असे शंकराचार्य मानतात. पण कर्माने आणि भक्तीने मोक्ष मात्र
मिळणार नाही असेही ते सांगतात. कर्म आणि भक्ती यांचे साधन म्हणून मोक्षमार्गावर
महत्त्वाचे स्थान आहे पण मोक्षसाधनेतील अखेरचा आणि सर्वात महत्त्वाचा दुवा म्हणजे
त्यांच्या मते ज्ञानच आहे.
'मोक्षाचा अधिकारी कोण?’ या प्रश्नाच्या उत्तरार्थ शंकराचार्य आपल्याला
साधनचतुष्टय सांगतात. मोक्षाची ही चार साधने पुढीलप्रमाणे आहेत: १
नित्यानित्यवस्तुविवेक -नित्य काय आणि अनित्य काय, शाश्वत काय आणि विनाश पावणारे काय यासंबंधीचा विवेक
२ इहामुत्रार्थफलभोगविराग - स्वर्ग आणि पृथ्वी या दोन्ही ठिकाणच्या फळांच्या
भोगाविषयी वैराग्यभावना ३ शमदमादिसाधनसंपद - शम, दम, उपरति, तितिक्षा, समाधान व श्रद्धा या सहा
साधनांची संपदा ४ मुमुक्षत्व - मोक्षाची जबरदस्त इच्छा. अर्थात या चार साधनांच्या
जोडीला श्रवण, निदिध्यास, गुरुंचे मार्गदर्शन हेही आवश्यक आहेच.
शंकराचार्यांच्या मोक्षविषयक विचारांचे वैशिष्टय म्हणजे,
मोक्षाची संधी सर्वांना आहे.
शंकराचार्यांच्या काळी शूद्रांना वेदाध्ययनाचा अधिकार जरी नव्हता तरीही वरील
व्याख्येनुसार त्यांचा मोक्षाचा अधिकार शंकराचार्यांना अप्रत्यक्षपणे मान्य होता असे
म्हणता येईल. प्रत्यक्षात त्या काळच्या समाजव्यवस्थेत तसा अधिकार खरोखरच सर्वांना
नव्हता हेही सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तव आपल्या समोर आहेच. एका अर्थी मोक्ष ही
व्यकितगत बाब असल्याने समाजव्यवस्थेचा आणि मोक्षाचा काही संबंध जोडण्याचा प्रयत्न
पूर्णत: अतार्किक वाटू शकतो. पण एखाद्या व्यक्तीला काय
करता येईल आणि काय करता येणार नाही यासंबधीचे सामाजिक संकेत त्या काळी कडक होते
हेही आपण लक्षात घेतले पाहिजे. मोक्ष हे ‘व्यक्तिगत ध्येय’ समाजासमोर ठेवणा-या शंकराचार्यांना सामाजिक भान नव्हते असाही एक आरोप आधुनिक विचारवंत
त्यांच्यावर करु शकतात. पण प्रत्येक गोष्टीला सामाजिक आणि वैज्ञानिक निकषांवर
तपासून पाहण्याच्या आपल्या सवयीसंबंधीच आपण आता आत्मपरीक्षण करायची वेळ आली आहे.
शंकराचार्यांच्या तत्त्वज्ञानाचा आढावा घेताना पुन्हा एकदा
मला पी. नागराज राव यांचे शब्द उदधृत करण्याचा मोह होतो आहे. ते म्हणतात,
“The philosophy of Shankara can best be described as the best type of
Spiritual Humanism. It is rationalistic in its approach to the problems of
philosophy and experimental in its confirmation of the truth. It is the only
religion that has the chance of being accepted by our generation who are the
children of science and reason. As religion, it is least dogmatic, most
universal and least secterian. It is at once a philosophy of values and a good
metaphysics. Shanakara’s imposing and inspiring system of metaphysics is the
greatest contribution of India to the world thought and religion.”
शंकराचार्यांच्या विचारांचा इतका सविस्तर विचार आपण दोन कारणांस्तव केला. एक म्हणजे
विवेकानंदांच्या विचारांवर शंकराचार्यांच्या वेदान्ताचा फार मोठा प्रभाव आढळून
येतो. अर्थात अनेक ठिकाणी विवेकानंद शंकराचार्यांपेक्षा वेगळया मार्गाने जातात.
त्याचा उहापोह आपण पुढील काही प्रकरणांमध्ये करणार आहोतच.
दुसरे म्हणजे एकदा का शंकराचार्यांचा विचार नीटपणे समजला की,
इतर आचार्यांचा वेदान्तविषयक
विचार समजावून घेणे तुलनेने सोपे जाते. रामानुजाचार्य, मध्वाचार्य, निम्बार्काचार्य आणि वल्लभाचार्य हे सगळेच
मायावादावर टीका करतात. शंकराचार्य प्रच्छन्न बौद्ध असल्याची काहींची टीका मात्र
अतिरंजित आणि एकांगी वाटते. अर्थात ‘गौतम बुद्धाचे हृदय आणि शंकराचार्यांची बुद्धी या दोन्हींची आज आपल्याला गरज आहे’ असे म्हणणारे विवेकानंद जन्माला यायला अजून ब-या च वर्षांचा कालावधी होता!
क्रमश: भाग ५