“नमस्कार” एवढ्या गर्दीत त्या गृहस्थांनी मला नमस्कार केला.
प्रतिक्षिप्त क्रियेने मीही नमस्कार करती झाले.
“कोण आहेत हे?” मी शेजारी बसलेल्या माणसाला विचारलं.
“अरे, तुम्हाला माहिती नाही? सांसद आहेत ते आपले.” त्याने आश्चर्याने मला न्याहाळत
सांगितलं.
मला लगेच त्यांच्या नमस्काराच कारण समजलं. त्या
मंडपात आम्ही दोनच स्त्रिया होतो – एक होत्या जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी
अधिकारी. त्यांना खासदार ओळखत होते. अर्थातच त्या व्यासपीठावर होत्या. दुसरी होते
मी. मी बेधडक गर्दीत मिसळून फोटो काढत होते आणि लोकांशी बोलत होते. शिवाय माझ्या
हातातल्या वहीत मी अधून मधून लिहित होते. हे सगळ मी नेहमीच करते. आणि त्यामुळे
अनेकदा मी पत्रकार असल्याचा समज फैलावतो. आजही तसच झालेलं दिसतंय. म्हणून त्या
खासदारांनी ओळख नसताना मला नमस्कार केला होता.
तिकडे व्यासपीठावर बसलेले खासदार माझ्याकडे पहात
होते. ‘नमस्कार तर केला पण ही बाई आहे कोण’ असे भाव त्यांच्या चेह-यावर दिसत होते.
त्यांनी एकाला बोलावून काहीतरी विचारलं. त्याने दुस-याला. त्याने तिस-याला. मला
काही काम नव्हत. त्यामुळे मी ती साखळी लक्ष देवून पाहत होते. अखेर त्याची सांगता
मघाच्या माझ्या शेजा-याने मला ‘तुम्ही पत्रकार आहात का?” अस विचारण्यात झाली. मी कोण आहे
(आध्यात्मिक अर्थाने नाही तर लौकिकार्थाने) ते सांगितलं. आलेल्या वाटेने निरोप परत
गेला. माझ्याकडे लक्ष द्यायची गरज नाही याची खात्री पडून खासदार महोदय सैलावले.
राजस्थानमधल्या एका गावात ‘प्रधानमंत्री ग्राम सडक योजने’च्या रस्त्याच उदघाटन होत – त्याच्याशी माझा खर तर काही संबंध नव्हता. पण अनेक
वेळा खेडयापाडयात भटकताना ‘सडक, वीज, पाणी’ लोकांसाठी किती महत्त्वाचे असतात हे
पाहिलं होत. विशेषत: जिथ मुल-मुली शाळेत जाऊ शकत नाहीत, आजा-यांना वेळेत उपचार
मिळत नाहीत, शेतातला भाजीपाला सडून जातो किंवा जनावरांना खायला घालावा लागतो –
तेव्हा गावक-यांच्या मनात जे येत ते फक्त त्यांनाच कळेल. प्रधानमंत्री ग्रामसडक
योजनेबद्दल माझ मत चांगल आहे. आणि शिवाय मी कधी रस्त्याच उदघाटन बघितलं नव्हत.
म्हटल चला, हेही एक पाहू काय असत ते.
मोहरीची फुललेली शेत समोर आली. सरकारी कार्यक्रम असल्याने गाडयांचा ताफा होता.
रस्त्यावर जो तो थांबून कुतुहलाने त्याकडे पहात होता. काही अंतर पक्क्या सडकेन
गेल्यावर आम्ही डावीकडे वळलो तर तिथ एक मोठा मंडप दिसला. त्याच्या आत कोणी नव्हत.
आधी मला वाटलं गावात कोणाच तरी लग्न असणार – पण तस काही नव्हत. हा मंडप
रस्त्याच्या उदघाटन कार्यक्रमासाठी होता हे मला दोन तासांनी कळलच.
आम्ही मंडपापाशी न थांबता कच्च्या रस्त्याने पुढे
गेलो. जिकडे तिकडे पुरुष निवांत बिडया फुंकत बसले होते. दोन दिवसांपूर्वी पाउस
झाला होता त्यामुळे शेतात काम नव्हत. थंडीही होती चांगलीच. आम्ही एका विशाल महालवजा
घरापाशी उतरलो. सुटाबुटातले एक गृहस्थ पुढे आले – त्यांनी आमच स्वागत केलं. हे या
गावातले गृहस्थ – आता दिल्लीत उच्चपदस्थ अधिकारी आहेत. एवढया छोटया गावातून येऊन
दिल्लीत स्वत:च एक स्थान निर्माण करण ही काही सोपी गोष्ट नाही. मला त्या गृहस्थांच
कौतुक वाटलं.
रस्ता या गृहस्थांच्या घरावरून जाणारा – किंबहुना त्यांना
घरापर्यंत आणणारा असल्यामुळे बरेच अधिकारी हजर होते. सिमेंटची गुणवत्ता, इंटरलॉकिंग
टाईल्स, रस्त्याची रुंदी, त्याची भारवाहक क्षमता, स्थानिक शेतक-यांच्या पाईप टाकून
पाणी नेण्याचा गरजा लक्षात घेऊन केलेली रस्त्याची रचना .... अशी देशातल्या ज्येष्ठ
इंजिनीअर्स केलेली चर्चा शिक्षणदायी होती. तसे काम प्रत्यक्षात होते का हा प्रश्न वेगळा
अर्थातच!

मग आम्ही सगळे परत त्या मंडपात गेलो. खासदार आले आणि
तो रिकामा मंडप क्षणात भरून गेला. मग अनेकजण बोलले – सगळे अगदी थोडक्यात – दोन
शब्दांच्या बरच जवळ पोचेल इतकच – बोलले. त्यात बरीच माहिती मिळाली. म्हणजे उदाहरणार्थ
या योजनेत एक किलोमीटर रस्ता बनवायला अंदाजे चाळीस लाख रुपये खर्च होतात. या
योजनेच्या माध्यमातून देशात रोज १५६ किलोमीटर रस्ता निर्माण होतो – हे उद्दिष्ट
मला आठवत तस आधी बरच जास्त होत – ते होत नाही असं दिसल्यावर हुशारीने उद्दिष्टच
खाली आणलं गेलं. राजस्थानमध्ये मागच्या अकरा वर्षांत (२००० मध्ये ही योजना आली.) ८८६०
नवे रस्ते निर्माण केले गेले. या रस्त्यांची लांबी ३४, ७९५ किलोमीटर आहे आणि यातून
१०७०३ गावे जोडली गेली.
ही सगळी माहिती ऐकत असताना मला त्या अनामिक गावातील
अनामिक चेहरे दिसत होते. विकासाच्या किमतीबद्दल आपण – ज्यांनी विकासाची फळे चाखली
आहेत – बोलणे आणि त्यामुळे इतरांना संधी नाकारणे हा एक प्रकारचा दांभिकपणा आहे.
रस्ते शहरात लागतात तसेच खेडयातही लागतात – फायदे आपण भोगायचे आणि त्यांच्या
फायद्याची गोष्ट समोर आल्यावर मात्र पर्यावरण प्रेम जागे व्हायचे हे बरोबर नाही.
कार्यक्रम संपला. मंडपाच्या बाहेर अनेक स्त्रिया
उभ्या होत्या – त्यांची जागा नेहेमी अशी परिघाबाहेर का – हा प्रश्न मला पडलाच. मी
त्यांच्याशी गप्पा मारल्या.
आम्ही जेवलो.
टिपीकल राजस्थानी बेत होता – दाल बाटी आणि चुरम्याचे लाडू.
टिपीकल राजस्थानी बेत होता – दाल बाटी आणि चुरम्याचे लाडू.
परत निघालो. तोवर मघाचा मंडप उतरवण्याचे काम जवळजवळ उरकलं
होत. दोन तासांपूर्वीच्या कार्यक्रमाची नामोनिशाणी दाखवणारा उदघाटनाचा फक्त
फलक तिथ होता.
इथ रस्ता नक्की होणार का – अशी शंका माझ्या मनात
आली.
होईल इथ बहुतेक.
कारण दिल्लीचे ते अधिकारी. त्यांचे भाऊ इथ राहतात
आणि त्यामुळे या अधिका-याच इथ नियमित येण असत.
उदघाटन झालेले सगळेच रस्ते इतके भाग्यवान असतात का
पण?
*
*