शारदा
एकदम दचकून जागी झाली.
आपण कुठे आहोत आणि
हा कसला आवाज आहे असा तिचा
गोंधळ क्षणभरच टिकला.
पहाटे पाणी आल्याआल्या
लगेच भरलं तरच मिळतं,
नाहीतर त्याचा काही
भरोसा नसतो, म्हणून
रात्री झोपताना नळ चालू ठेवून
झोपायची तिने स्वतःला सवय
लावून घेतली आहे.
तरीही तिचे हे रोजचे
दचकून जागे होणे मात्र काही
संपत नाही.
खरे तर आज शारदा खूप
दमली आहे. शेजारी
प्रकाश - तिचा
नवरा - घोरत
पडला आहे. रात्रीच्या
जोर जबरदस्तीनंतर त्याचे हे
निवांत झोपणे आणि तिची दमणूक
हेही आता नेहमीचे झाले आहे.
पाणी भरण्यासाठी
त्याला उठवण्याचा मनात आलेला
विचार तिने लगेच झटकून टाकला.
पाणी राहायचे बाजूला,
आणि त्याचे पुन्हा
लगटणे चालू व्हायचे!
त्या कल्पनेनेच
तिच्या अंगावर शहारा आला.
तिचे मन आणि तिचे
शरीर आजकाल त्याच्या मागणीला
तयार नसते. पण
एकदा लाडीगोडीत ’जरा हळू’
असे तिने म्हणताच ’कोण असेल
तसा, त्याच्याकडे
जा मग’ असे म्हणत त्याने तरातरा
बाहेरची वाट धरली होती.
आपण थोडे जरी ताणले
तरी हा लगेच दुस-या
बाईकडे जाईल याची शारदाला
तेव्हा खात्रीच पटली होती.
मग बाहेरची काही
लागण त्याने घेऊन येण्यापेक्षा
त्याच्या इच्छेला निमूट शरण
जाणे तिने स्वीकारले होते.
“नाहीतरी लग्नाची
बायको आहे मी त्याची,
म्हणजे या शरीराचा
मालकच की तो" असा
कडवट विचार तिच्या मनात आला
आणि तिचे अवसान आणखीच गळून
गेले.
या विचारांत पाच एक
मिनिटे गेली असतील नसतील,
शारदा उठली.
शारदाला फक्त तीन
बादल्या पाणी मिळाले.
आता त्यातच कपडे
धुवायचे, अन्न
शिजवायचे, भांडी
घासायची आणि आंघोळ करायची
इतकी कामे तिला उरकावी लागणार
तर! खरे
तर तिच्या डोळ्यांमध्ये अजून
झोप रेंगाळते आहे.
पण आज कामाला दांडी
मारून पण चालणार नाही,
देसाई बाई चांगल्याच
रागावतील, नाही
गेले तर तिचे कामही सुटेल.
आज देसाई बाईंच्या
लेकाचा वाढदिवस आहे,
बरेच पाहुणे येणार
आहेत. शारदाला
’थोडा जास्त वेळ कामाला ये’
असं त्यांनी मागच्या आठवडयातच
सांगितलं आहे. चार
तास जातील पण त्याचे पन्नास
रूपये द्यायचे त्यांनी कबूल
केले आहे. घरात
आज शिजवायला दाणा नाही.
त्या पन्नास रूपयांच्या
आशेने शारदाला थोडा उत्साह
येतो.
स्टोव्ह पेटतच नाही.
बाटलीत केरोसीनचे
जेमतेम चार थेंब दिसतात.
म्हणजे चहाचा विचार
बाजूलाच ठेवणे भाग आहे.
तशीही घरातली साखर
पण संपलीच आहे. निदान
चपात्या भाजी करायचे काम वाचले
याचाच शारदाला आनंद आहे.
कालची रात्रीची
थोडी भाजी आणि एक भाकरी शिल्लक
आहेत. प्रकाशचे
सकाळचे खाणे त्यात भागेल
कसेबसे. नव-याची
झोप उडू नये अशा सावधपणाने
शारदा दार हलकेच लोटून लगबगीने
घराबाहेर पाऊल टाकते.
प्रकाश बरा असतो तेव्हा
त्याच्या त्या जुनाट मोपेडवरून
तो शारदाला ’श्रीराम’
सोसायटीपर्यंत सोडतो.
पण चहासाठी तकतक
नको म्हणून तिने आज त्याला
उठवले नाही. कालची
त्याची अजून उतरली नसणार
म्हणजे आज काम बुडवून तो घरातच
बसणार हे शारदाला आता अनुभवाने
माहिती झाले आहे.
आता त्यामुळे पुढची
वीस मिनिटे शारदाला चालत जावे
लागणार. सकाळी
रस्त्यावर तितकीशी गर्दी
नाही. पण
शारदाच्या अंगात भरभर चालण्याइतकी
ताकद नाही या क्षणी!
शारदाला कामाच्या
पहिल्या घरी पोचायला दहा
मिनिटे उशीर झाला.
मोकाशी बाई त्यामुळे
रागावल्या आहेत.
शारदावर त्या थेट
ओरडायला सुरूवात करतात.
खर तर दिवसभर मोकाशी
बाई घरातच असतात.
त्यांना काही कुठे
कामाला जायचे नसते,
त्यामुळे पाच दहा
मिनिटे इकडे तिकडे झाल्याने
तसा काही त्यांना फरक पडायला
नको. पण
त्या घडयाळावर नजर ठेवून
बसलेल्या असतात.
त्यांना काही
सांगण्यात अर्थ नाही हे आता
शारदाला अनुभवाने माहिती
आहे. मोकाशी
बाईंना काही ऐकून घ्यायची
सवय नाही. शारदा
काही न बोलता कामाला लागते,
याचा मोकाशी बाईंना
आणखी राग येतो.
त्यांच्या तोंडचा
पट्टा आता जोरातच सुरू आहे.
रोजच्याप्रमाणे
स्वयंपाकघरातले बेसिन खरकटया
भांडयांनी गच्च भरले आहे.
लोक खायचे नसताना,
भूक नसताना इतके
अन्न ताटात वाढून कशासाठी
घेतात हा नेहमीचा प्रश्न आजही
शारदाला पडतो. त्या
खरकटयाच्या वासाची तिला खरे
तर शिसारी येते.
बाथरूममध्येही
ढीगभर कपडे आहेत.
मोकाशी बाईंना
शारदाच्या मागे मागे हिंडायची
वाईट खोड आहे. एक
मिनिट त्या काही शांत बसत
नाहीत. ’असेच
कर, तसे
करू नकोस’ असा सूचनांचा सारखा
भडिमार चालू असतो त्यांचा.
त्या शांत राहिल्या
तर शारदाला भरभर काम उरकता
येईल. पण
मोकाशी बाई बोलत राहतात.
शारदाने ’हो,
नाही,
बरोबर’ अशा थाटाचे
काही उत्तर दिले,
की त्यांना जणू
प्रोत्साहन मिळून त्या नव्याने
सुरूवात करतात.
जोवर शारदा काही
बोलत नाही, तोवर
मोकाशी बाई तेच तेच बोलत राहतात.
त्यांनी दिलेल्या
दोन चार जुन्या साडयांवर
शारदाचं वर्ष निभावतं,
आत्ताही शारदाच्या
अंगावर त्यांनी दिलेलीच साडी
आहे. म्हणून
शारदा त्यांच ऐकून घेते.
मोकाशी बाई तशी
मनाने चांगली आहे,
वेळप्रसंगी अडचण
भागवते. त्यांना
तोडून आपल्याला चालणार नाही
याची शारदाला जाणीव आहे.
पुढचं काम जोशी बाईंचं!
शारदाने बेल वाजवल्यावर
लगेच दार उघडतं. दारात
जोशी बाबा हसत उभा असलेला
पाहून शारदाच्या हृदयाचा
ठोका चुकतो. जणू
तॊ शारदाची वाटच पाहत होता.
जोशी बाई आठवडाभरासाठी
त्यांच्या बहिणीकडे गेल्या
आहेत, हे
ती विसरलीच होती.
जोशी बाईंची आई
आजारी आहे, त्यामुळे
त्यांना परत यायला दोन चार
दिवस जास्तही लागू शकतात,
तसे त्या शारदाला
सांगून गेल्या आहेत.
जोशी बाई चांगल्या
आहेत, पण
त्यांचा नवरा मात्र आगावू
आहे. एरवीही
त्याची नजर शारदावर असते.
एक दोनदा तर त्याने
चुकून लागला असं भासवत शारदाच्या
अंगाला नको तिथे हात लावायचाही
प्रयत्न केला होता.
आता त्याचे हसणे
पाहून दोन्ही पोरही घरात नाहीत
हे शारदाला नीटच समजलं.
“मी तासाभराने येते
त्या काकूंचं काम आटोपून"
असं शारदा शेजा-यांना
ऐकू जावं अशा बेताने मोठया
आवाजात म्हणते.
त्यावर जोशी साळसूदपणे
म्हणतो, "मला
काय दुसरे उद्योग नाहीत की
काय? लवकर
काम आटोपून घे. मला
कामाला जायचंय. आई
घरात नसताना कोणाला दार उघडायचं
नाही असं मी मुलांना सांगून
ठेवलंय, म्हणजे
तुला सुट्टीच पाहिजे म्हण
की!”
शारदाचा नाईलाज होतो.
शारदा पुढच दार
उघडंच ठेवते आणि स्वयंपाकघराच्या
खिडकीतून शेजारच्या बाईंशी
मोठमोठयाने गप्पा मारते.
जोशी तिच्या मागेमागे
फिरायला लागल्यावर "साहेब,
उगी एका जागी निवांत
बसा पाच मिनिटं.
माझं काम झालं की मग
काय आवरायचं ते आवरा’ असं मोठया
आवाजात म्हणते. ते
ऐकून शेजारची राणी मॅडम दार
उघडून "काय
जोशी, काय
म्हणतेय सासूबाईंची तब्येत?”
अशी चौकशी करायला
लागते. जोशीला
चडफडत पण हसतमुखाने राणीशी
बोलावे लागते. कधीकधी
शारदाला वाटते की तिची आणि
जोशीबाईंची कहाणी खरे तर
सारखीच आहे. आपल्या
नव-याचे
रंगढंग शारदा चांगली ओळखून
आहे. जोशी
बाई मात्र भोळीभाबडी आहे,
इतकाच काय तो फरक.
शारदा गरीब आहे,
आणि जोशी बाई श्रीमंत
आहे हे खरे, पण
बाई म्हणून दोघींचेही जगणे
तितकेच अभागी आहे असे शारदाला
नेहमीच वाटते. क्षणभर
जोशी बाईबद्दल शारदाच्या
मनात कणव दाटून येते.
उद्यापासून दुपारी
जान्हवीताई घरी असेल तेंव्हा
कामाला यायचं असं स्वत:च्या
मनाशी ठरवून शारदा बाहेर पडते
आणि समोरच्या राणीच्या घरात
शिरते. तिथे
गरम चहाचा कप आणि चार बिस्किटे
शारदाची वाट पाहत असतात.
दोन मिनिटे निवांत
बसून तो आयता चहा पिताना शारदा
सुखावते.
राणी शारदाला एक कागद
देते. “नीट
वाच आणि मग सही कर.
काही शंका असली तर
न लाजता मला विचार,”
असं म्हणत ती शारदाच्या
हातात पेनही देते.
राणीची कोणीतरी
एक मैत्रीण ’घरकाम करणा-या
बायांची’ म्हणजे मोलकरणींची
संघटना चालवते हे शारदाला
माहिती आहे. एकदा
ती बाई राणीकडे आली असताना
तिने शारदाला कामाबद्दल खूप
प्रश्न विचारले होते ते शारदाला
आठवलं. राणी
मोलकरणींच्या हक्कांबाबत
शारदाशी नेहमी बोलते.
आजही तिने नियमित
आणि चांगला पगार,
पगारी रजा,
बोनस,
आठवडयाची हक्काची
सुट्टी अशा गोष्टी शारदाशी
बोलायला सुरूवात केली.
अशा गोष्टी बोलायला
काय ऐकायलाही चांगल्याच
वाटतात.
पण शारदाला राणीच्या
भोळेपणाचं नवल वाटतं.
बाहेर काम मिळवायला
आणि एक एक काम टिकवायला जीवाचा
कसा आटापिटा करावा लागतो,
हे राणी मॅडमला
नाही समजायचं. कामाला
बाया कमी नाहीत,
बाईलाच काम मिळत
नाहीत अशी बाहेर परिस्थिती
आहे. एका
बाईने एका घरचं काम सोडलं तर
ते मिळवायला दहा बाया टपलेल्या
आहेत. पोटापाण्याला
रोजच्या पैसे लागतात आणि
व्यसनी नव-याच्या
बाईला ते स्वत:
कमवावे लागतात,
तिथं ही हक्कांची
भाषा करायची म्हणजे पायावर
धोंडा पाडून घ्यायचा म्हणा
ना! राणी
मॅडम बोलताहेत,
त्यातली एक गोष्ट
जरी बाहेर एखाद्या घरात बोलली
तर त्या दिवशी लगेच ते काम
सुटेल. या
सगळ्या हक्कांशिवाय काम करायला
अनेक बाया तयार आहेत.
बायांची एकी वगैरे
सगळं ठीक आहे, पण
त्या एकीमुळे तांदूळ आणि साखर
थोडीच स्वस्त मिळणार आहे,
असा कडवट विचार
शारदाच्या मनात येतो.
पण राणीशी हे सगळं
बोलण्यात काही अर्थ नाही.
आपण बाई आहोत म्हणून
शारदासारख्या गरीब बायांचं दु:ख
आपल्याला समजतं, असा
राणीचा समज आहे.
राणी चांगली आहे,
पण आपल्या जगण्याची
दुर्दशा राणीला कधीही समजणार
नाही, हे
शारदाला मनातून माहिती आहे.
शारदाला राणीचा
चांगुलपणा समजतो,
म्हणून ती राणीला
कधी उलटून काही बोलत नाही.
आजही ती नुसती मान
डोलावते पण कागदावर काही सही
करत नाही. राणी
वैतागते आणि रागावून शारदाशी
काही न बोलता पेपर वाचायला
लागते. शारदाला
वाईट वाटतं पण तिचा काही इलाज
नाही. कागदावर
सही केली नाही म्हणून राणी
तिला कामावरून काढून टाकणार
नाही याची शारदाला खात्री
आहे.
.
सोसायटीतल्या दुस-या
इमारतीपाशी पोलिस उभे आहेत.
सोबत त्यांचा वास
घेणारा कुत्रा पण दिसतो आहे.
म्हणजे सोसायटीत
आणखी एक चोरी झाली आहे तर!
असा काही प्रकार
झाला की शारदासारख्या हातावर
पोट असणा-या
लोकांवर पोलिसांची वाकडी नजर
फिरलीच म्हणून समजायचे,
हे आता शारदाला
अनुभवाने चांगल माहिती झालं
आहे. अर्थात
पोलिसांना काही चोर पकडायचा
असतो अशातला भाग नाही,
गरीबांकडून पैसे
उकळायला त्यांना चांगल निमित्त
मिळतं इतकं मात्र नक्की.
पैसे दिले नाहीत
तर पोलिस मग उगाच घरी चौकशीला
येणार, कामे
बुडवून चौकीत फुकटच्या चकरा
मारायला लावणार,
हे पाहून शारदाच्या
नव-याचं
डोकं फिरणार आणि तो शारदावर
भलतेसलते आरोप करणार.
शिवाय कामाला दांडी
मारली की ज्या त्या घरी ऐकून
घ्यावं लागणार,
पोलिसांनी चौकीत
बोलावलं होतं हे कळताच जी ती बाई
संशयाने पाहणार.
हे सगळं टाळायचं तर
आज देसाई बाईंकडून जास्तीच्या
कामाचे जे पन्नास रूपये मिळतील,
ते या पोलिसांना
द्यावे लागतील....
शारदाचा कामाचा
उत्साह मावळतो. आता
या सोसायटीत चो-या
नेहमीच्याच झाल्या आहेत.
पन्नासाच्या ऐवजी
वीस रूपयांत पोलिसांना पटवता
आलं तर आजच्या खर्चासाठी थोडे
पैसे हातात राह्तील असाही
विचार शारदाच्या मनात येतो.
आणखी तीन घरचं काम
आटोपून शारदा देसाई बाईंकडे
पोचते तेंव्हा घडयाळाचा काटा
बाराकडे झुकलेला असतो.
लवकर यायला सांगितलेलं
असतानाही शारदा नेहमीच्या
वेळेपेक्षा तासभर उशीराच
पोचली आहे, म्हणूने
देसाई बाईंचा पारा चढलेला
आहे. त्यांचा
आरडाओरडा सुरू होतो.
शारदाला खरे तर
कोणी तिच्याशी असे चढया स्वरांत
बोललेले आवडत नाही,
पण आत्ता या क्षणी
तर शारदाला मुकाटयाने ऐकून
घेण्यावाचून पर्याय नाही.
देसाई बाईंसाठी
आजचा दिवस खास आणि म्हणून
वेगळा असेल. पण
शारदाला त्याचें काय?
तिच्यासाठी हा
नेहमीचाचं आहे.
कोणाच्या घरी वाढदिवस
असो, लग्न
असो, लग्नाचा
वाढदिवस असो, बारसे
असो की आणखी काही सण समारंभ
असो, शारदाला
काय फरक पडतो? या
सगळ्याचा अर्थ शारदासाठी तरी
’अधिक राबणे’ इतकाच असतो.
तिला या जास्तीच्या
कामाचे चार पैसे जास्त मिळतात
हे खरे. पण
राबण्याचं आणि हातात पडणा-या
पैशांचं गणित तिचं तिलाच माहिती
आहे!
शारदा खोल्या झाडते,
फरशी पुसून घेते.
शारदा भांडी घासते.
शारदा कपडे धुते.
रोजची कामे उरकल्यावर
– आज पाहुणे असल्यामुळे हेही
काम जास्त आहे -
शारदा स्वयंपाकघरात
मदत करते. भाजी
चिरणे, नारळ
खोऊन देणे, कणीक
मळणे, भाजी
फोडणीस टाकणॆ,
चपात्या लाटणे …
शारदा कामावर काम करत राहते,
उसंत कसली ती नाहीच
तिला. एखाद्या
यंत्रासारखी शारदा सकाळपासून
गरागरा फिरते आहे.
तिचे मन बंड करते.
तिच्याभोवती देसाई
बाईंच्या घरातली माणसे निवांत
बसली आहेत. खाणे,
पिणे,
गप्पा सारे काही
मजेत चालले आहे.
मधूनच काहीतरी
विनोद झाल्यावर सगळेजण खो खो
हसत आहेत. सगळे
मजेत दिसताहेत.
त्यांच जगण चांगलं
चाललेलं दिसतंय.
शारदाला वाटतं,
यांच्याकडे पैसा
आहे म्हणून केवळ माझ्यासारख्या
गरीबाला हे लोक राबवून घेऊ
शकतात. शारदाला
सगळ्या जगाचाच राग येतो.
’माझ्यात काय कमी
आहे?’ असा
दिवसातून दहादा तिला पडणारा
प्रश्न परत एकदा तिच्या मनात
फणा काढून उभा राहतो.
शारदा शाळेत असताना
हुषार होती, चांगले
मार्कही मिळायचे तिला.
दहावीनंतर शिकायची
स्वप्नं पाहिली होती तिनेही!
शिकून नोकरी करायची,
पैसे कमवायचे तिचे
बेत हवेतच विरले कारण घरच्यांनी
सोळाव्या वर्षीच तिचं लग्न
लावून दिलं! शारदा
नुकतीच अठराची झाली -
ती अद्याप तिची
स्वप्नं विसरलेली नाही.
आपली स्वप्नं कधीही
पूर्ण होणार नाहीत याची तिला
जाणीव झालेली आहे.
कदाचित म्हणूनच
आजकाल तिला शिकल्या सवरल्या
माणसांना असं निवांत बसलेलं
पाहून त्यांचा राग येतो.
शारदाच्या डोळ्यात
पाणी तरारून येतं.
आता या ठिकाणी या
वेळी असे डोळे भरून येणं चांगलंं नाही हे जाणवून ती हलकेच पदराने
आसवं पुसते.
देसाई बाईंच्या घरचं काम संपतं तेंव्हा संध्याकाळचे
पाच वाजलेले आहेत.
आता देसाई बाईंकडे
पोराच्या वाढदिवसासाठीचे
पाहुणे येतील.
शारदाने सगळं तयारच
केलेलं आहे, आता
तिच्या मदतीची गरज संपलेली
आहे. “उद्या
लवकर ये बर का"
असं शारदाला दहा
वेळा बजावायला मात्र देसाई
बाई एवढया गडबडीतही विसरत
नाहीत. शारदाला
आपण ना दिवसभर काही खायला
दिले, ना
एवढया पदार्थांमधले दोन तिला
बांधून देत आहोत – हे देसाई
बाई सोयिस्करपणे विसरल्या
आहेत.
सकाळी राणी मॅडमकडे
मिळालेल्या चहा बिस्किटांव्यतिरिक्त
दिवसभरात शारदाच्या पोटात
दुसरे काही गेलेले नाही.
आता काम संपल्यावर
भुकेच्या जाणीवेने ती व्याकूळ
होते. दिवसभर
कामात गर्क असल्याने जे जाणवले
नव्हते ते सारे तिच्या नजरेसमोर
येते. घराकडे
वळाणारी तिची पावले जड झाल्याचे
तिला जाणवते. घरात
केरोसिनचा थेंब नाही,
डाळ नाही,
तांदूळ नाही,
हे तिला आठवते.
वाटेत पोलिस
हप्त्यासाठी वाट पाहत असणार
त्याच्या हातात काहीतरी
टिकवल्याशिवाय आजची रात्र
सुखाची जाणार नाही याचे तिला
भान येते. शारदाजवळ
वेळप्रसंगी लागली तर असावी
म्हणून नव-यापासून
लपवून ठेवलेली केवळ एक दहाची
नोट आहे. तेवढयाने
त्या पोलिसांची भूक थोडीच
भागणार आहे? आणि
समजा चुकून त्यांची भागली,
तरी शारदाचे काय?
प्रकाशचे काय?
शारदाच्या मनात एक
विचार येतो. जिन्यातून
परत येऊन ती देसाई बाईंकडे
पैसे मागते. तसेही
देसाई बाईंनी आजच्या जास्तीच्या
कामाचे पन्नास रूपये द्यायचे
कबूल केलेले आहेच.
शारदासाठी आज ते
पन्नास रूपये लाखमोलाचे आहेत.
पण शारदाच्या तोंडचे
वाक्य पूर्ण होण्याच्या आतच
देसाई बाईंचा आरडाओरडा सुरू
होतो. “ मी
काय तुझे पन्नास रूपये ठेवून
पळून जाणार आहे की काय?
पैशांच्या बाबतीत
जेवढा चोखपणा दाखवतेस तेवढा
कामाच्या वेळेबाबत बरी दाखवत
नाहीस ती! आजचेच
बघ, एवढे
हजार वेळा तुला सांगूनही दोन
तास उशीरा येऊन माझा खोळंबा
केलासच ना? अगदी
हजार रूपये मी देणे लागत
असल्यासारखी घाई का करतेस?
आलेल्या पाहुण्यांसमोर
माझी अशी लाज का घालवतेस बाई?
महिन्याचा पगार
देताना देईन तुझे पन्नास
रूपये. जा
आता, उद्या
मात्र लवकर ये,
आजच्यासारखी कारणं
नको सांगू मला."
असे म्हणत दे़साई
बाई शारदाची रिकाम्या हाती
बोळवण करतात.
देसाई
बाईंच्या घरातले लोक,
आलेले पाहुणे,
शेजारीपाजारी
विचित्र नजरेने शारदाकडे
पाहतात. कानकोंडी
होऊन शारदा निमुटपणे माघारी
फिरते. आता
आणखी काही बोलले तर हे काम
सुटेल याची शारदाला जाणीव
आहे. देसाई
बाई पैसे काही बुडवणार नाही
हे शारदालाही माहिती आहे.
पण आपण देसाई बाईची
आणि तिच्यासारख्या या ब-या
घरातल्या बायांची नड जाणतो
आणि त्यांच्या वेळेला कामात
मदत करतो. आपल्या
मदतीला, आपल्या
वेळेला मात्र या कोणी उपयोगी
पडत नाहीत अशा कडवट विचाराने
शारदाला निराश वाटते.
आपल्या कामाचे,
हककाचे पैसे मागावे
लागतात आणि ते हातात न पडता
फुकटचा अपमान तेवढा होतो याचे
शारदाला वाईट वाटते.
घराकडे परतताना शारदाला
केरोसिनची मोकळी बाटली दिसते,
मोकळे डबे दिसतात.
आज शिजवायचे काय
आणि पोटात ढकलायचे काय याची
शारदाला चिंता आहे.
घरात प्रकाश कालच्या
त्या शिळ्या भाकरीवरच असेल,
म्हणजे त्याच्याही
पोटात वणवाच पेटला असेल एव्हाना.
अन त्याला तर भूक
सहन होत नाही. कालची
दारू अजून नीट उतरली नसेल तोवर
भुकेच निमित्त त्याला मिळाल
म्हणजे आज त्याच्या हातचा
मार आहेच ठरलेला.
देसाई बाईच्या
कामामुळे आज घरी जायला उशीरच
झालाय. म्हणजे
संध्याकाळचही पाणी येऊन गेलं
असणार. शेजारणीकडून
काही उसनं आणायची पण सोय नाही.
त्यांच्याही घरात
कमी अधिक हेच असणार.
आता त्यांच्या
घरातली पुरूषमाणसं कामावरून
आली असतील, त्यांच्यासमोर
काही उसनं मागणंही अवघड.
त्यांच्यातल्या
कोणाकोणाशी प्रकाशची कधी ना
कधी काहीतरी शिवागीळ,
बाचाबाची झालेली
आहे. पुरूषांची
आपापसातली भांडणं घरातल्या
बाईची इच्छा असो वा नसो,
तिला निभावून न्यावी
लागतात. दुकानदारांची
आधीचीच बाकी आहे,
शारदाला कोणी दारात
उभदेखील राहू देणार नाही,
त्यांना चुकवतच
तिला घराची वाट चालावी लागते
अलिकडे. काय
करायचं? कुठे
जायचं? - शारदाच्या
डोक्यात विचारांचं चक्र अविरतपणे
चालू आहे. सकाळपासून
नाही, गेल्या
दोन वर्षांपासून!
दिवसभर राब राब राबून
शेवटी पोटात फक्त भूक उरावी
या परिस्थितीमुळे शारदाला
अगदी असहाय्य वाटतं,
तिला स्वत:ची
कीव येते. कशासाठी
काम करायचं? कशासाठी
जगायचं? या
सगळ्याला कधी अंत तरी असणार
आहे का? एक
दिवस पोटभर अन्न नाही की एक
दिवस सुखाची झोप नाही.
कशासाठी राबायचं मग इतकं परक्यांच्या घरात,
त्यांच वेडंवाकडं
ऐकून घेत? - या
प्रश्नांनी शारदा गांजून
गेली आहे.
शारदाला वाटतं हे शहर
म्हणजे लहानपणी आपण पुस्तकात
वाचलं होत तशा एखाद्या राक्षसासारख
आहे. दूरवरून
याची भूल पडते, पण
एकदा त्याच्या जवळ आलं की हे
शहर आपल्यालाच गिळून टाकतं
हे शहर आपल्याला हतबल करतं,
आपली नामोनिशाणी
मिटवून टाकतं. हे
सगळं आपण एका क्षणात कां संपवू
नये? नाहीतरी
माहेरच्यांना आपली काही किंमत
नाही, आपण
मेलो तर प्रकाश आनंदाने दुसरं
लग्न करेल; मोकाशी
बाईला काय आणि देसाई बाईला
काय दुसरी कोणीतरी बाई मिळेलच
की कामाला. आपण
नसल्याने कोणाचच काही अडणार
नाही या विचाराने शारदा उद्विग्न
होते. रस्त्यावर
पुष्कळ मोठया इमारती आहेत.
कोठल्यातरी गच्चीवर
जाऊन खाली उडी टाकली की खेळ
खलास होईल. हे
रोजचे काम नको, की
डोक्याला ताप नको.
पण या शहरात शारदाला
मरायचीही सोय नाही.
सगळया उंच इमारतींच्या
दारात वॉचमन बसलेले आहेत.
त्यांच्या पन्नास
प्रश्नांना उत्तरं द्यावी
लागतात. आणि
एकदा आतमध्ये समजा गेल तरी
गच्चीला कुलूप असत.
या शहरात जीव द्यावा
अशी एकही विहीर नाही.
इथल्या नदीला
पावसाळ्यातसुद्धा पाणी नसतं.
शारदाला या शहराचाच
राग येतो. इथं
धड जगायची सोय नाही आणि मरायचीही
सोय नाही. हे
जगणं रेटत नेण्याविना शारदाला
काही पर्यायच नाही.
शारदाच्या डोळ्यांतून
अश्रू झरताहेत.
आपल्या रडण्यालाही
काही किंमत नाही,
या आसवांत काही
बुडवण्याची ताकद नाही हे
शारदाला माहिती आहे.
भुकेची कासाविशी,
घरापासूनच तुटलेपण,
दमणूक,
एकाकीपणा,
अपमान,
भीती ..
….. या सगळ्याला
सामोर जात शारदाचा एक दिवस
पार पडला. असे
आणखी किती दिवस तिला रेटून
न्यायचे आहेत? जमेल
का तिला हे निभावून नेणं?
या प्रश्नाच उत्तर
शारदाकडे नाही. आज
नाही, कदाचित
कधीही असणार नाही!
**
ही कथा ‘मिळून सा-याजणी’ मासिकाच्या
डिसेंबर २०११ च्या अंकात 'तिचे जगणे' या नावाने प्रसिद्ध झाली आहे.