ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६
Showing posts with label मेघालय. Show all posts
Showing posts with label मेघालय. Show all posts

Thursday, August 18, 2011

८५.खासी -गारोंच्या राज्यात : भाग १

आटपाट नगर होत, त्या नगराचा एक राजा होता .. अशी सुरुवात करायला मला आवडला असत आत्ता!  पण एक तर मी होते शिलॉंग  शहरात आणि राजाला नाही भेटले ... पण गेल्या बाजारी निदान गावप्रमुखाला तरी भेटायचं होत मला. एकजण होता असा गावप्रमुख  - एका संस्थेत ग्रंथपालाच काम करणारा. पण  त्याला भेटायची संधी वेळेअभावी चुकली होती.पण आटपाट नगर म्हणजे आपल्या कल्पनाशक्तीपल्याडच जगण असा अर्थ घेतला तर मात्र मग मी तो शब्द वापरू शकते. खासी (Khasi), गारो (Garo )  आणि जैंतिया (Jaintia ) अशा तीन मुख्य टेकड्यांनी व्यापलेला भाग आज मेघालय म्हणून ओळखला जातो. जरी मेघालयात  १७  आदिवासी जमाती असल्या तरी या तीनच मुख्य म्हणता येतील. शिलॉंग शहर इस्ट खासी जिल्ह्यात येत  आणि मी जास्त खासी लोकांशी बोलले म्हणून मला मी  'खासी -गारोंच्या " राज्यात आहे अस वाटत राहिलं.

यावेळी वेळ नव्हता म्हणून मी 'विकीबाबाचा' आधार  न घेता. म्हणजे  अक्षरश: को-या पाटीनिशी इथे आले होते. भूगोल, इतिहास, सामान्य ज्ञान, आदिवासींचे जगणे, निसर्ग .. अशा अनेक क्षेत्रांत नव्याने भर टाकणारा अनुभव आला. पुस्तकातून शिकण्यापेक्षा माणसांकडून शिकायला मला नेहमीच जास्त आवडत. इथ तर एक सोडून सातही जिल्ह्यातली जवळजवळ दीडशे माणस मला शिकवायला उत्सुक होती - त्यामुळे एक बर झाल, की कोणी कंटाळल नाही. मला भरपूर प्रश्न विचारता आले म्हणून मी कंटाळले नाही आणि कोणा एकाला/एकीला माझ्या भडीमाराला तोंड द्याव लागल नाही म्हणून ते कंटाळले नाहीत. 

शिलॉंगबद्दल -तिथे पोचायचं कस- इथपासून सुरुवात झाली. फोनवर चौकशी केल्यावर मला सांगण्यात आलं की, 'गुवाहाटीला उतरा".  तिथे उतरल्यावर कळल की गुवाहाटी -शिलॉंग अंतर साधारण शंभर किलोमीटर आहे. गुवाहाटीतून बाहेर पडताना जोरबाट गावात दुकानाच्या पाट्या पाहून माझा चौकसपणा सुरु झाला. निमित्त तस जोरदार होत. डावीकडे सर्वत्र 'जोरबाट, आसाम' लिहिलेले होत आणि उजवीकडे मात्र 'जोरबाट, मेघालय'! पुन्हा एकदा सीमारेषा अशी समोर आली. वाटेत नंगपोहला (हे गावाच नाव आहे!) चहासाठी थांबलो, तेव्हा एक देखणा डोंगर समोर दिसला .. आणि मग ते डोंगर  असे सतत दिसतच राहिले. आकाशाच निळेपण लपेटून घेतलेल्या मेघालयाच्या  डोंगरांनी  पुढे माझी सतत सोबत केली. ते मला फारच आवडले, इतके की  "तुम्हाला काय आवडल शिलॉंग मधलं?" अस कोणीतरी मला विचारल्यावर मी 'डोंगर, मस्त आहेत ते' अस उत्तर देऊन सगळ्याना कोडयात टाकल काही काळ!

मला गुवाहाटीतून घेऊन जाण्यासाठी एक खासी स्त्री अधिकारी आली होती. तिच्याशी गप्पा मारतांना कळल की 'गुवा' म्हणजे सुपारी. या शहरात पूर्वी (आणि आजही) सुपारीचा मोठा बाजार भरत असे - म्हणून याचे नाव गुवाहाटी. इथे पान, चुना आणि जवळजवळ अर्धी सुपारी खाण्याची प्रथा आहे. त्याला म्हणतात 'क्वाई' (Kowai). हे सारख खातात - अगदी एक दोन तासांनी तल्लफ येतेच इथल्या माणसांना. क्वाई खाण्यात स्त्रिया आणि पुरुष यांच्यात फरक नाही. ही क्वाई तुम्ही नव्या ठिकाणाहून घेत असाल तर त्यात आल्याचा तुकडा देतात - दुकानदार न मागताच देतो. देणा-याची वाईट नजर लागू नये म्हणून ही काळजी घेतात. दुकानदाराला त्यात अपमान वगैरे काही वाटत नाही.

सारख पान तोंडात असल्यामुळे असेल, पण माणस उगाच भसाभस बोलत बसत नाहीत.  सगळा कारभार शांतपणाने चालू असतो. मला इथले सहा लोक आधी एका प्रशिक्षणात भेटले होते चार दिवस - पण तेव्हाही ते शांतच होते. "आता तुम्हाला आमच्या शांततेच रहस्य लक्षात आल असेल" अस एकजण म्हणाला. हैदराबादच्या आठवडाभराच्या वास्तव्यात सगळ्यांना पुरतील एवढ्या क्वाईची तयारी करून आले होते ते! दहा रुपयांना दहा क्वाई मिळतात - ही कोणीही खरेदी करतो तेव्हा बरोबरच्या सगळ्यांसाठी घेतली जाते. आपापले पैसे देण्याची पद्धत नाही. मलाही त्यांनी आग्रह केल्यामुळे मी दोन वेळा क्वाईचा स्वाद घेतला. पान एकदम तिखट होत आणि क्षणार्धात रंगत होत! एका वेळी अर्धी सुपारी मी अर्थातच खाऊ शकत नव्हते! 

खासी समाज स्त्रीप्रधान आहे. गारो आणि जैंतियाही स्त्रीप्रधान आहेत. त्यामुळे मुलीच्या जन्माच इथे दु:ख नसत, मुलगी 'नकोशी' नसते.  अर्थात म्हणून स्त्रियांच्य आयुष्यात काही प्रश्नच नाहीत असा निष्कर्ष काढण चुकीच ठरेल.  स्त्रियांच्या हातात सगळी सूत्र आहेत असही म्हणता येत नाही! बरेचदा जमीनजुमला. स्थावर जंगम, शिक्षण  अशा बाबतीतले निर्णय 'मामा' घेतात - म्हणजे पुरूषच घेतात. सगळ्यात लहान मुलीकडे वारसा हक्क असतो - म्हणजे संपत्ती तिला मिळते आणि कुटुंबाचे पालन पोषणही तिनेच करायचे असते. इथे सून घरात येत नाही तर जावई घरात येतो - आणि मुलगा बायकोच्या घरी रहायला जातो. मला दोन खासी उच्चशिक्षित स्त्रिया भेटल्या - एकीला तीन मुलगे  होते  आणि दुसरीला दोन मुलगे होते. 'आपले म्हातारपणी कोण पाहणार' (कारण मुले बायकोच्या घरी जातील) अशी त्यांना चिंता होती. हे त्या विनोदाने म्हणत नव्हत्या इतक नक्की. कारण  आणखी एक म्हणाली, "सगळ्या काही धाकट्या मुली नसतात, थोरल्याही असतात - तुमच्या मुलांना थोरल्या मुली पाहायला सांगा - म्हणजे त्या तुमच्याकडे येतील."

अर्थात लग्न आणि लैंगिक संबंध, लग्न आणि मुले - यांचा फारसा संबंध नाही. एक २१ वर्षांचा तरुण एका मुलीबरोबर राहतो आहे आणि त्याना दोन वर्षाचे एक मूल आहे - असे चित्र इथ अपवादात्मक नाही. याबाबत धर्मांतरित ख्रिश्चन आणि धर्मांतर न केलेले खासी यांच्यात फरक आढळतो. खासी ख्रिश्चनांना असे वागणे चुकीचे - अनैतिक - वाटते. धर्मांतर न केलेले खासी स्वत:ची ओळख 'नियामी खासी' अशी करून देतात. 'Live in relationship ' हा आपल्याकडे चर्चेचा मुद्दा असताना तिथे मात्र तो अनेकांनी सहज स्वीकारला आहे. कोण मागासलेले आणि कोण पुढारलेले असा एक गंमतीदार प्रश्न माझ्या मनात तेव्हा डोकावून गेला.

साधारणपणे इतर राज्यांत फिरताना मला भाषा अंदाजाने समजते, संदर्भाने समजते. पण खासी आणि गारो या दोन्ही भाषा मला अजिबात म्हणजे अजिबात समजत नव्हत्या. कोणी त्या भाषेत बोलत असेल तर मख्खासारख बसून रहाव लागायचं. मी बोली न म्हणता भाषा म्हणते आहे, कारण त्या त्या भाषेशी बरीच ऐतिहासिक आणि सांस्कृतिक नाळ जुळलेली आहे आजही. मी या आधीच्या पोस्टमध्ये लिहिल्याप्रमाणे खासी, गारो, जैंतिया या भाषांना स्वत:ची वेगळी लिपी नाही, त्या रोमन लिपीत लिहिल्या जातात. खासीत हिंदी आणि बांगला भाषेतून खूप शब्द घेतले आहेत अस म्हणतात - पण  'रास्ता' हा एकच शब्द माझ्या ऐकण्यात आला. बरेच शब्द नेपाळी भाषेतून पण घेतले गेले आहेत. गुवाहाटी आणि मेघालयाचा री- भोई  जिल्हा एकमेकांना लागून आहेत. री-भोईत भोई भाषा बोलली जाते; जी खासीच्या कुळातली आहे. त्यामुळे असममधल्या काही भागात लोक खासी समजू शकतात. खासी आणि जैंतिया भाषा एकमेकींच्या कुळातल्या आहेत, त्यामुळे त्यांच्यातही संवाद असतो. गारो भाषा मात्र बोडो कुळात मोडते. ती भाषा खासी  लोकांना येत नाही. गारो आणि खासी, गारो आणि जैंतिया यांच्यात आज तरी इंग्रजी भाषेमुळेच संवाद शक्य होतो आहे. पूर्वी काय होत असेल देवाणघेवाण यांची आपापसात हे समजणे अवघड आहे.

खासी भाषेत मी एक दोन वाक्य 'बोलायला' शिकले. 'Nga  bam ja" याचा अर्थ "मी भात खाते" आणि "Ngam  lah kren khaasi " म्हणजे "मला खासी बोलता येत नाही" वगैरे. मी ती वाक्य आता विसरले आहे अस म्हणण्यात काही अर्थ नाही कारण तेव्हाही मला ती येत नव्हतीच!

आमच्या एका सहका-याचे नाव banteliang (हे मराठीत बरोबर कसे लिहायचे हा प्रश्नच आहे!) असे होते. त्याला सगळेजण सारखे 'बाबन, बाबन" अस म्हणत होते. एक दोन दिवसांनी मी आपल सहज त्यांना म्हटल, 'आमच्या मराठी भाषेत पण बबन हे नाव आहे." त्यावर सगळे हसायला लागले. मग त्यांनी सांगितलं की पुरुषांना आदराने "bah "- श्रीयुत या अर्थाने लावल जात आणि banteliang च छोट रूप होत 'बन' म्हणून ते होते -बाबन  - H चा उच्चार स्पष्ट केला जात नसल्यामुळे माझा घोटाळा झाला होता. स्त्रियांना श्रीमती या अर्थाने "kaung " असे संबोधले जाते - त्याचा उच्चार मला अजून नीट करता येत नाही. एकंदर इथली नाव हा एक अडचणीचाच मुद्दा होता माझ्यासाठी! Yumiap, Thubru, Rimpachi, Tengaman ही भारतीय माणसांची नाव आहेत हे मला पुन्हा एकदा लक्षात ठेवाव लागल. हे लोक जेव्हा पुणे, मुंबई, दिल्ली इथ येतात (बरेच जण उच्च शिक्षणासाठी येतात) तेव्हा त्यांना किती अडचणी येत असतील हेही कळल त्या निमित्ताने! 

जवळजवळ सगळ्या माणसांना आपण दुस-यांना आवडाव अस वाटत असत. हे 'आपणपण' व्यापक असत - ते माझ गाव, माझा समाज, माझा देश, माझा धर्म, माझ साहित्य .. अशी वेगवेगळी रूप धारण करत. तुम्ही कोणत्याही ठिकाणी नव्याने आला आहात अस कळल की, लोक विचारतात, "आवडल का आमच गाव? आमच राज्य?" हा प्रश्न मला बिहार, कर्नाटक, केरळ, राजस्थान दिल्ली .. अशा अनेक राज्यांत अनेक लोकांनी पुन्हापुन्हा विचारलेला आहे. शिलॉंग तरी त्याला अपवाद कस असणार? आणि गंमत म्हणजे नुसत 'आवडल' अस उत्तर चालत नाही, काय आवडल तेही सांगाव लागत.

मला शिलॉंगमधली सगळ्यात आवडलेली गोष्ट (तिथला निसर्ग एवढा अप्रतिम असताना माझ्या हेच लक्षात रहाव हा माझा करंटेपणा ) म्हणजे कर्कश आवाज अजिबात न करणारी वाहन! पुढे वाहतूक ठप्प झालेली दिसली की वाहनचालक शांतपणे बसून राहतो - एकदाही हॉर्न न वाजवता! मी गीडीयनला (Gideon) (आमच्या गाडीचा चालक)  त्याबद्दल विचारल तर म्हणाला, "सगळ्यांनाच पोचायचं असत लवकर - पण पुढचे थांबलेत ते काही तरी कारण असणार म्हणून. उगाच कशाला आवाज करायचा?" मला त्यांच्या या शहाणपणाच   फार कौतुक वाटल. शेवटच्या दिवशी मी गुवाहाटीला येतांना तर घाटात तासभर वाहतूक ठप्प होती. त्या तासाभरात रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेकडो वाहन होती - पण हॉर्न कोणीच वाजवला नाही. अर्थात पोलिसदेखील सर्वत्र हजर होते आणि वाहतूक नियंत्रण करत होते. पोलिस नेहमीच असतात की स्वातंत्र्यदिन जवळ आल्यामुळे जास्त दक्षता होती ते कळायला मात्र आता मार्ग नाही - हा प्रश्न मी विचारायचा विसरले. या लोकांना दिल्लीत  किंवा पुण्यात आणल तर बर होईल अस वाटलं. पण कोण कोणाकडून काय शिकेल याची मात्र खात्री नाही - त्यामुळे असू देत ते चांगले वाहनचालक निदान तिथे तरी!

(खर तर मला दोन किंवा तीन भागांत पोस्ट लिहायला फारस आवडत नाही. उगीच रेंगाळल्यासारख वाटत माझ मलाच .. पण अजून सांगण्याजोग बरच काही आहे.. तेव्हा ते पुढच्या भागात!)
 *

Wednesday, August 10, 2011

८४ सोस


गेले दोन तीन दिवस मी सातत्याने दोन नव्या भाषा  ऐकते आहे. माझ्या भोवतालचे लोक तसे समंजस आहेत,  मला या दोन्ही भाषा बोलता येणे तर दूरचेच, त्या मला समजतही नाहीत हे त्या सर्वाना चांगले माहिती आहे. त्यामुळे शक्यतो इंग्रजी भाषेचा वापर चालू आहे. इथे एक बरे आहे, की शिपाई आणि वाहचालकही मस्त इंग्रजी बोलतात – माझ्यापेक्षाही सफाईने बोलतात. गावातही अनेकांना इंग्रजी बोलता येते.  त्यामुळे मला संवाद साधायला अडचण अशी काही नाही. पण तरी अनेकदा लोक एकमेकांशी ज्या दोन भाषा सहजतेने बोलतात त्या आहेत खासी आणि गारो.

मी सध्या मेघालयात आहे, अजून चार दिवस असणार आहे. इतर वेळी मी त्या त्या भाषेतली कामचलाऊ वाक्य शिकून घेते; इथ मात्र तशी गरज नसल्याने मी तो विनोदी प्रयत्न करत बसले नाही.खासी आणि गारो दोन्ही भाषा रोमन लिपीत लिहिल्या जातात – त्यात वर्तमात्र आणि मासिकही निघतात. आज एकजण खासी भाषेतल वर्तमानपत्र वाचत होती, तेव्हा अक्षर ओळ्खीची दिसूनही त्या शब्दांचा अर्थ लागत नव्हता तेव्हा मजा वाटली.
=====================================

Pyllait im u khynnah 9 snem ialade bad ka pyrsa na u runar ba pyniap ia ka kmie kpa bad para

Wat lada u Bremingstar Mylliem 28 snem rta ula pynjah burom ia ka shnong Mawsaiñ, da kaba pyniap dusmon ia la u jong u kpa ka kmie bad ka para kynthei ha ka shnong Mawsain Mawkyrwat ha ka 2 tarik mynta u bnai, hynrei ha katei ka miet

http://mawphor.com/
======================================

शब्दाना अर्थ असतो तो नेमका कशामुळे? अनेकदा तसा तो आपल्याला शिकवला गेल्यामुळे! उदाहरणार्थ ‘कागद’ या शब्दाने एक विशिष्ट प्रतिमा आपल्या मनात निर्माण होते. कागदाचा आकार, त्याचा रंग, त्याचा स्पर्श, त्याचा उपयोग, त्याचे मूल्य --- अशा अनेक प्रकारे ही प्रतिमा आपल्या मनात येते. त्यामागे ‘कागद' या शब्दातून आजवर आपल्याला आलेला अनुभवही असतो जमेस धरलेला. जेव्हा शब्द आणि अर्थ यांची सांगड बसत नाही, तेव्हा एक तर आपण शब्द बदलतो ('मला तस नव्ह्त म्हणायच' ही आपली सफाई असते) किंवा त्याचा अर्थ आपण नव्याने लावतो ('हे माझ्या लक्षात नव्ह्त आल' अस आपण म्हणतो!)

नवीन शब्द आपण शिकतो तेव्हा त्याचा अर्थ समजून घेतो आणि त्यानुसार तो शब्द योग्य  प्रसंगी  वापरतो. असे मग शब्द आपल्या अंगवळणी पडत जातात , सवयीचे होतात.

अगदी आपल्या रोजच्या वापरातले शब्द त्यातली अक्षर सुट्टी करून वापरली की निरर्थक वाटायला लागतात. ‘वापर' हा शब्द घ्या उदाहरणार्थ ‘वा', ‘प' आणि ‘र" अशी तीन अक्षरे वेगवेगळी उच्चारत राहिली; की त्या तीन अक्षरांचा एकत्र प्रयोग जो अर्थ देतो तो नाहीसा होतो; आणि मागे उरतात ती  एकमेकांशी काहीही संबंध नसणारी तीन अक्षरे! अस करत राहिल, की हळूहळू मला बोलण, लिहिण, वाचण या सगळ्या क्रिया नेहमी निरर्थक वाटायला लागतात. अस वाटत, की आपल्याभोवती कसलीतरी भयंकर पोकळी आहे आणि ती जाणवू नये म्हणून आपण उगीच शब्दांचे इमले रचत बसलो आहोत. बोलता न येणारे, वाचता न येणारे , लिहिता न येणारे असंख्य जीव या सृष्टीतलावर आहेत – त्यांच जगण काही पूर्णत: निरर्थक असत नाही! 

शिवाय आपले शब्द आणि त्याचे दुस-यानी काढलेले – लावलेले अर्थ यात अंतर राहणार!
दुस-यांचे शब्द आणि आपण त्याचा लावलेला अर्थ यातही  अंतर राहणार!
हे सगळ मी या ब्लॉगवर लिहिते आहे हा पण एक विरोधाभास आहेच!  शब्दांचा सोस - दुसर काय?