ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६
Showing posts with label काबूल. Show all posts
Showing posts with label काबूल. Show all posts

Friday, October 28, 2016

२४३. भय इथले ....

नमस्कार.
काबूलमधल्या माझ्या वास्तव्यावर आधारित 'भीतीच्या भिंती' ही लेखमालिका मी इथं प्रकाशित केली आहे.
अर्थात मालिका अर्धवट राहिल्याचे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आलेच असणार.

ही लेखमालिका आता तुम्हाला विस्तारित स्वरूपात वाचायला मिळेल - ती पुस्तकरूपात.
'राजहंस प्रकाशना'ने 'भय इथले .. तालिबानी सावट: प्रत्यक्ष अनुभव' हे पुस्तक जुलै २०१६ मध्ये प्रकाशित केले आहे.


'मिसळपाव' या संस्थळावर या पुस्तकाचा एस यांनी करून दिलेला परिचय  तुम्हाला इथं वाचता येईल.

तुमचा अभिप्रायही जरूर कळवा.

Saturday, October 24, 2015

२३२. भीतीच्या भिंती: ९ हल्ला

गेला एक महिनाभर आमचं मुख्य रस्त्यावरचं प्रवेशद्वार बंद होतं. ते आहे दक्षिण प्रवेशद्वार. त्यानुळे आमची नियमित ये-जा पूर्वेकडच्या प्रवेशद्वारातून चालू होती. या बाजूला एक महत्त्वाचं सरकारी कार्यालय आहे – निवडणूक आयोग. तालिबान हिटलिस्टवरचं आणखी एक ठिकाण. एक दिवस सकाळी साडेदहाला एसएमएस आला, “पूर्व प्रवेशद्वाराजवळ के ९ तपासणीत एक संशयास्पद वाहन आढळले आहे. पुढची सूचना मिळेपर्यंत हे प्रवेशद्वार टाळा”. आमचं ऑफिस त्या प्रवेशद्वाराच्या अंगणातच. ताबडतोब सुरक्षा रक्षक आले आणि आम्हाला evacuate केलं गेलं. धोका बहुधा फार नसावा, कारण परिसरातल्याच दुस-या टोकाच्या इमारतीत आम्ही गेलो.
 मग बॉम्ब तपासणी पथक आलं, तपासणी झाली. तो एक कचरा वाहून नेणारा ट्रक होता, युएनचा नाही तर आउटसोर्स केलेला होता. युएनच्या परिसरात प्रवेश करणा-या प्रत्येक वाहनाची प्रत्येक वेळी श्वानपथकाद्वारे (बॉम्ब) तपासणी होते, कितीही वेळा ये-जा झाली तरी, आणि अगदी युएनच्या वाहनांचीही. शिवाय प्रत्येक व्यक्तीचं ओळखपत्र दरवेळी तपासलं जातं, त्यात अजिबात हयगय होत नसे. कुत्रा बॉम्बचा संशय येताच खाली बसतो – तसा इथं बसला आणि पुढची सगळी चक्रं फिरली. दोन तास तपासणी होऊनही काही संशयास्पद आढळलं नाही हे खरं. पण या ट्रकचा वापर अन्य कामासाठी झाला होता का, दहशतवाद्यांनी ही एक चाचणी करून बघितली का – असे अनेक प्रश्न मनात आलेच – माझ्या, इतरांच्याही.
एक दिवस नजीब होता गाडीवर. रस्त्याने येताना ‘इकडं अशी लढाई झाली होती, इतके लोक मारले गेले’ वगैरे सांगत होता तो. एकदा त्याचं एका अमेरिकन माणसाबरोबर अपहरणही झालं होतं. मग मला एकदम म्हणाला, “तुम्ही इथं काय करताय? आपल्या घरी जाऊन निवांत रहा की”. काय बोलायचं ते न सुचल्याने मी गप्प बसले.
सदैव पुढच्या क्षणी हल्ला होणार आहे अशा तयारीत राहायची सवय या अशा अनुभवांमुळे होत राहिली. हल्ला झालाच तर त्याला तोंड देण्याची मानसिकताही यातून कळत-नकळत घडत गेली असावी.
हल्ल्याचा प्रत्यक्ष अनुभव एक ना एक दिवस मला येणार होताच, तो त्यादिवशी आला.
शुक्रवार हा माझ्यासाठी अगदी निवांत दिवस असायचा. एरवी सुट्टीच्या दिवशी घरातली इतर बरीच कामं उरकायची असतात, पण मी इथं हॉटेलमध्ये रहात असल्याने घरकाम सदृश्य कुठलंही काम नसायच. बाहेर उगाच आपलं फिरून येऊ हे शक्य नव्हतं. हमीद हा माझ्या संस्थेचा एक श्रीलंकन सल्लागार याच हॉटेलमध्ये राहायचा. तो मुस्लिम होता, त्यामुळे जवळच्या मशीदीत जाऊन यायचा तासभर. पंधरा दिवसांनी एकदा ऑफिसबरोबर आधी ठरवून आम्ही मॉलमध्ये खरेदीला जायचो. हॉटेलमध्ये रात्री फक्त ठरावीक जेवण मिळायचं, आणि ते ८ डॉलर्स असं महाग होतं. दुपारी व्यवस्थित जेवले असले तर मला रात्री इतक्या भरपेट जेवणाची गरज नसायची. मॉलमधली खरेदी म्हणजे या जेवणासाठी पर्यायी व्यवस्था – दूध, फळं, ज्यूस यांचा स्टॉक करून ठेवणं. त्यामुळे ही खरेदी झटपट व्हायची. तशीही २० मिनिटं ही आम्हाला मॉलमधल्या खरेदीसाठी घालून दिलेली वेळेची मर्यादा होती, त्यामुळे तिथं उगाच रेंगाळता यायचं नाही. ज्या मॉलमध्ये आम्ही जायचो त्याच्यावर काही महिन्यांपूर्वी हल्ला झाला होता हे एकदा एकाने सांगितल्यावर मॉलमध्ये जाण्याचंही मी शक्यतो टाळायला लागले.
शुक्रवारी मी निवांत उठायचे, रोजच्यापेक्षा अर्धा तास जास्तीचा व्यायाम करायचे, भरपूर  नाश्ता करायचे, वाचायचे, भारतात फोन करायचे, लिहायचे.
सोबतचे काही लोक सुरक्षा नियम मोडायचे, मलाही त्यात ओढायला बघायचे.
त्या शुक्रवारी सकाळी अकराच्या आसपास गुरखा सैनिकाशी हवापाण्याच्या गप्पा मारत मी उभी होते. तेवढ्यात माझी कॅनेडियन शेजारीण माझ्याकडं आली. तशी आमची आपली हाय-हॅलो पुरतीच ओळख होती. पण आज तिचा बोलायचा नूर दिसत होता.
आज काय करणार आहेस दुपारी?” शेजारणीने विचारलं.
विशेष काही नाही, नेहमीचंच. मी उत्तरले.
मी जाणार आहे बाहेर जेवायला. येतेस का? ” तिचा पुढचा प्रश्न.
तुम्ही आधी सांगितलं असतं तर मी ऑफिसची परवानगी घेतली असती, असं आयत्यावेळी नाही मला येता येणार, जणू काही माझाच दोष आहे अशा नम्रपणाने मी उत्तरले.
त्यात काय विचारायचं ऑफिसला? माझ्या ओळखीचा एक टॅक्सीवाला आहे, तो घेऊन जाईल आपल्याला आणि परत आणून सोडेल, शंभर डॉलर्स घेईल तो, निम्मे मी देईन, निम्मे तू दे. मी येणार हे गृहीत धरून बाई बोलत होत्या.
या बाई पण युएनच्या एका संस्थेच्या होत्या. त्यांनी त्यांच्या ऑफिसची परवानगी घेतली असती तर त्या बळावर मला ऐन वेळीही जाण्याची परवानगी मिळाली असती. त्यांच्या ऑफिसचा सिक्युरिटी क्लीअरन्स आहे हे सांगितल्यावर मला काही अडचण आली नसती. पण या परवानगी न घेता चालल्या होत्या तेही खाजगी वाहनाने. अपहरणाविषयी काही दिवसांपूर्वी माझ्या    सहका-यांनी केलेली थट्टामस्करी आणि एक मीटिंग सोडून निघावं लागलं होतं मला – या घटना मी विसरले नव्हते, त्यामुळे मी शेजारणीला शांतपणे नकार दिला.
थोडा धोका तर पत्करायला लागतोच. इथं रूममध्ये नुसत्या भिंती पहात बसणार आहेस का एकटी?” तिने मला उचकवायचा आणखी एक प्रयत्न केला पण मी बधले नाही. निराश होऊन ती आणखी कुणी सोबत येईल का ते पाहायला गेली. तोवर शांतपणे आमचा संवाद ऐकणा-या गुरख्याने मला या देशात काय करायचं नाही हे तुम्हाला चांगलं कळलंय, तुम्ही कधी अडचणीत नाही सापडणार तुमच्या चुकीने असं प्रमाणपत्र कौतुकाने दिलं.  
त्यातले तुमच्या चुकीनेया शब्दप्रयोगाचा अर्थ मला त्यावेळी नीट समजला नव्हता हे थोड्या वेळातच मला समजणार होतं.
चुकीच्या ठिकाणी, चुकीच्या वेळी आणि चुकीच्या लोकांबरोबर असणं टाळलं, की साधारणपणे आपण नको त्या परिस्थितीत सापडत नाही असा आजवरचा अनुभव. पण इथं मुळात परिस्थितीच असाधारण असल्याने तुम्ही कधी संकटात सापडाल त्याचा भरवसा नाही.
दुपारचे चार वाजत आले होते. ही माझी कॉफी प्यायची वेळ. किचनमध्ये जाऊन आपल्याला हवी तशी आणि हवी तितकी कॉफी पिण्याइतका निवांत वेळ. हमीदही यायचा किचनमध्ये आणि मग थोडा वेळ गप्पा मारत बसायचो आम्ही. लिहित असलेली मेल अर्धवट तशीच ठेवून मी स्वच्छतागृहात गेले.
धडाड... धडाड...
खळ्ळ....खळ्ळ
कर्कश सायरन.
तिन्ही आवाज एकदम आले.
********
स्वच्छतागृहाच्या खिडकीच्या काचांचा खच माझ्याभोवती पडला आहे, बाहेर बंदुकांच्या फैरी झडत आहेत आणि सायरन वाजत आहे या तीन्ही गोष्टींची नोंद मी निमिषार्धात घेतली. हे वाक्य वाचायला तुम्ही जेवढा वेळ घेतला असेल, त्याच्या एक दशांश वेळात मी ही नोंद घेतली.
पण आपलं मन कमालीचं हट्टी असतं. अनुभवाला नाव दिल्याशिवाय त्याला पुढं जाता येत नाही, संवेदनेची खूण ओळखण्याचा त्याचा आटापिटा असतो.
बहुतेक भूकंप झालेला दिसतोय – परिस्थितीचं आकलन करून घेण्याची मनाची धडपड.
आधी बंकर गाठ, बुद्धीने प्रतिसाद नियंत्रित करण्यात पुढाकार घेतला.
स्वच्छतागृहातून बाहेर आले. खोलीतही काचांचा खच पडला होता.
सायरन वाजतच होता. बंदुकांचे आवाज येतच होते.
हेल्मेट चढवलं. जाकिट जड असल्याने घालता येत नव्हतं, ते हातात घेतलं. घाई कर.
पासपोर्ट, ओळखपत्र, पैसे असलेलं छोटं पाऊच गळ्यात अडकवलं.
किती सेकंदात? बहुधा दोन.
सायरन अजून वाजतोच आहे.
बंदुकांचे आवाज जवळून येताहेत का ?
माहिती नाही, लवकर चल.
हा तालिबान हल्ला आहे का ?
असेल किंवा नसेलही. तू पळ.
ट्राउझर घे हातात, बंकरमध्ये गेल्यावर घाल, आत्ता वेळ घालवू नकोस.
लॅपटॉप बंद करावा काय?
नाही, तेवढा वेळ नाही. तू पळ आता लगेच.
फोन? चार्जर?
हं, दोन्ही हॅन्डसेट घे.
वॉकी-टॉकी?
ती राहू दे, तू पळ आधी बंकरकडे.
बूट कुठे आहेत?
खिडकीजवळ. हं! काचांनी भरलेत ते. असू दे, तू बंकरमध्ये जा.
बाहेर सगळीकडे काचा आहेत, नीट पळ. पाय पूर्ण टेकवू नकोस.
नेहमी खोलीसमोर असतात ते आपले गुरखा ठीक आहेत ना?
त्यांची काळजी तू नको करूस. पळ जोरात.
तो गुरखा पाहिलास ? किती एकाग्रतेने नेम धरून उभा आहे तो.
त्याचा चेहरा विलक्षण शांत आहे.
नाही, त्याच्याशी आत्ता बोलू नकोस. तू पळ बंकरकडे.
तुला भीती वाटतेय ?
माहिती नाही. पण काय झालंय नेमकं ?
कळेल लवकरच.
सायरन वाजतोय अजून!
अजून ?
हं, आता उजवीकडे.
तो बघ, रशीद उभाच आहे दारात.
तो न बोलता बाजूला होतो आणि मला आत जाण्याची खूण करतो.
बंकर.
कुणीतरी माझं जाकिट चढवायला मला मदत करतं.
हेल्मेट मी नुसतं अडकवलं आहे, तेही तिसरं कुणीतरी नीट बसवतंय.
फोन चौथ्याच्या हातात देऊन मी ट्राउझर घालते.
आतमध्ये पंधराएक लोक आहेत.
हमीद कुठे आहे ? हं, आला तोही.
लोक पळत पळत येताहेत.
सायरन वाजायचा थांबला आणि बंदुकींचे आवाज अधिक स्पष्ट झाले.
****
रशीद आणि दोन गुरखा रक्षक. आधी हजेरी झाली. आम्ही २५ लोक असायला हवे होतो इथं (युएनच्या विविध संस्थांशी संबंधित २५ लोक या हॉटेलमध्ये राहतात), त्यापैकी २२ जण होतो. तिघांचा काय पत्ता ? जखमी तर नाही ना झाले ? नाही. उपस्थित सहका-यांकडून दोघे जेवायला बाहेर गेले असल्याची माहिती मिळाली – ती कॅनेडियन शेजारीण आणि आणखी एक. त्यांच्या ऑफिसला फोन केला. आता पुढचे निरोप ते लोक देतील. एकाला गुरखा सोबत घेऊन आला. नाही, तो जखमी नव्हता, पण काय करायचं हे न सुचून खोलीत नुसता उभा होता. गुरखा प्रत्येक खोलीत जाऊन  कुणी जखमी होऊन पडलं नाही ना हे तपासत होते. सुदैवाने आम्हाला कोणालाही काचा लागलेल्या नव्हत्या.
रशीदने सिक्युरिटीला फोन केला. रशीद आमच्या गटाचा वॉर्डन होता, तो सांगेल तसं आम्ही वागायचं होतं.
आपल्या परिसरात दहशतवादी हल्ला झाला आहे. कार बॉम्बचा स्फोट ही त्याची सुरूवात होती.  हल्ल्याचं लक्ष्य आपण आहोत का अन्य कुणी ते अद्याप माहिती नाही. किती वेळ आपल्याला इथं थांबावं लागेल ते सांगता येत नाही, त्यामुळे मोबाईलची बॅटरी पुरवून वापरा. कदाचित evacuation होईल (या जागेतून हलवलं जाईल) . प्यायच्या पाण्याचा साठा मर्यादित आहे. कोप-यात स्वच्छतागृह आहे. मेडिकल इमर्जन्सी वाटल्यास तत्काळ मला सांगा. रशीद हे सगळं इतक्या धीरगंभीरपणे पण सहजतेने म्हणाला की आता पुढं तो विमानाचे पायलट म्हणतात ना तसं पुश बॅक ऍन्ड रिलॅक्स म्हणणार की काय असं मला क्षणभर वाटलं.
बंकरमध्ये एक प्रकारची अवघडलेली शांतता होती. त्या शांततेत मला माझ्या हृदयाची धडधड मग स्पष्ट ऐकू आली. आम्ही सगळेजण एकमेकांना ओळखत होतो पण या आकस्मिक हल्ल्याने सगळेजण हादरले होते, काय बोलायचं ते कुणाला सुचत नव्हतं.
मग ज्याने-त्याने आपापल्या सुरक्षा अधिका-याला फोन करायला सुरूवात केली. जॉर्जला मी फोन केला. एका रिंगमध्ये फोन उचलला गेला आणि मी काही बोलायच्या आधी त्याने मला विचारलं, तू आणि हमीद दोघेही बंकरमध्ये आहात ?” अच्छा, म्हणजे हल्ला झाल्याला अजून तीन मिनिटंही झाली नाहीत तर याला माहिती आहे हल्ला झाल्याची. काही हेल्थ प्रॉब्लेम ? दर अर्ध्या तासाला आपण बोलत राहू. रशीद सांगेल तसं करा. इतकंच बोलणं झालं आमचं.
मग छोट्या गटात लोक आपापसात बोलायला लागले. हमीद मला म्हणाला की तो भावाशी स्काईपवर बोलत होता. अचानक काचा पडताना पाहून भूकंपअसं वाटून तो ताबडतोब कॉटखाली जाऊन आडवा पडला. मग सेकंदभरात गोळीबाराचे आवाज ऐकल्यावर त्याला हल्ला झाल्याचं लक्षात आलं.
बंकर. अदमासे दहा बाय बाराची खोली. दोन सोफा, दोन खुर्च्या. उरलेले खाली बसले.
पुन्हा एक मोठ्ठा हादरा. जणू आमच्या दारातच.
दुसरा स्फोट, कुणीतरी म्हणालं.
त्याक्षणी मला एका सनातन सत्याचा साक्षात्कार झाला. मला भीती मरणाची वाटत नाही, एक ना एक दिवस तो दरवाजा उघडून त्या अनोळखी प्रदेशात पाऊल टाकायचं आहेच. खरं सांगायचं तर त्या जगाबद्दल काहीसं कुतूहलही वाटतं. पण मृत्यूच्या त्या क्षणाकडे नेणा-या वेदनेची भीती वाटते. तुला वेदनारहित मरण देतो अशी कुणी खात्री दिली तर मला मरायचं भय वाटणार नाही. इथं अशा हल्ल्यात मेले तर ठीकच, पण कायमचं अपंगत्व आणि परावलंबित्व नको. – अर्थातच मरणं आपल्या हाती नसतं, जगणं असतं – म्हणून विचार जगण्याचा करावा हेही ओघाने आलं.
तिस-या स्फोटाने आमचा बंकर हादरला.

हे किती काळ चालणार आहे? यातून सुखरूप बाहेर पडणार की नाही आपण? – सगळ्यांच्या मनात तेच प्रश्न. कुणीही हे प्रश्न विचारले नाहीत. हे प्रश्न विचारायचे नाहीत असा आमच्यात जणू एक अलिखित करार झाला होता. ....

(अपूर्ण) 

Monday, June 15, 2015

२२९: भीतीच्या भिंती: ८. मॉक ड्रिल

भाग १, २ .....७

एक दिवस सकाळी सहा वाजता मजिदचा फोन आला. “आज तुला घ्यायला गाडी अर्धा तास उशिरा येईल, चालेल का?” असं विचारायला. त्यादिवशी मला काही अमुक ठिकाणी अमुक वाजता पोचायचं नव्हतं; ऑफिसमध्ये बसून एक रिपोर्ट पूर्ण करायचा होता फक्त; त्यामुळे अर्धा तास उशीर झाल्याने काही बिघडणार नव्हतं. मी होकार दिला आणि सहज ‘अडचण काय आहे’ ते विचारलं. माझ्या एका सहका-याला ‘ग्रामीण विकास आणि पुनर्वसन मंत्रालयात’ प्रशिक्षणासाठी जायचं होतं; त्याला पोचवून गाडी मला घ्यायला येणार होती. हा सहकारी माझ्याच हॉटेलमध्ये राहत होता. मला एकदम सुचलं. मी मजिदला म्हटलं, “हरकत नसेल तर मी त्याच्याबरोबर जाते आणि त्याला तिथं सोडून ऑफिसमध्ये येते.” माजिदला गंमत वाटली. सहका-यासाठी सुरक्षा सोपस्कार आधीच पार पडले असल्याने काही अडचण नव्हती. “ट्रॅफिक जाम असला तर नंतर तक्रार करू नकोस” अशी सूचना मला देऊन तो पुढच्या कामाला लागला. आणि ‘आज नवा रस्ता पाहायला मिळणार’ म्हणून मी खूष झाले.
“दारूल अमन” रस्ता मला ऐकून माहिती होता. या रस्त्यावर बरेच बॉम्बस्फोट होतात आणि बरेचदा निदर्शनं होतात हे आजवर आलेल्या अनेक ‘सुरक्षा संदेशां’मुळे मला माहिती होतं. हा रस्ता ज्याअर्थी तालिबानचं सतत ‘लक्ष्य’ असतो, त्याअर्थी तो दिल्लीच्या 'राजपथ' सारखा महत्त्वाचा रस्ता असणार हे लक्षात आलं होतं. अनेक महत्त्वाची मंत्रालयं, राष्ट्राध्यक्ष निवास, संसद या रस्त्यावर आहेत. "दारूल अमन" म्हणजे "अल्लाचं निवासस्थान". या शब्दांचा “शांतीचं स्थान” असाही एक अर्थ सांगितला जातो. तिथं इतका रक्तपात होत रहावा हा एक विरोधाभास.
याच रस्त्यावर “दारूल अमन राजवाडा” आहे. १९२० च्या आसपास राजा अमानुल्ला खानने काबूल शहरापासून १६ किलोमीटर अंतरावर हा राजवाडा बांधला. हा राजवाडा अफगाणच्या सुधारणेचा एक भाग होता. पण अमानुल्लाला सत्तेवरून पायउतार व्हावं लागलं आणि राजवाडा दुर्लक्षित झाला. १९६९ साली या राजवाड्याला मोठी आग लागली. मग १९७० ते १९७८ या काळात 'संरक्षण मंत्रालय' तिथ कार्यरत होतं. १९७९ च्या कम्युनिस्ट आक्रमणात ही इमारत पुन्हा आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. मग रशियनांचा पराभव करण्यसाठी मुजाहिद्दिन आणि त्यांचा पराभव करायला तालिबान या राजवाड्याचा उपयोग करत राहिले. आज हा राजवाडा भग्नावस्थेत आहे. त्याची पुनर्बांधणी करून अफगाण संसद तिथं भरेल अशी योजना आहे; पण अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही. राजवाड्यात जाण्याची मला परवानगी नसल्याने (पुढेही अनेकदा या रस्त्यावर गेले तरी प्रत्येक वेळी) मी हा राजवाडा फक्त लांबून पाहिला!
या रस्त्यावर भिंती कमी होत्या आणि पसरत जाणा-या काबूल शहराचं एक वेगळं (रोजच्यापेक्षा वेगळं) दर्शन मला झालं. नवख्या माणसाला हे शहर नॉर्मल वाटावं इतकी गर्दी रस्त्यावर होती. भोवतालच्या टेकड्यांवर घरं दाटीवाटीने उभी होती. 
लोक तिथं कसे पोचत असतील, त्यांच्यासाठी किमान सोयी तरी तिथं असतील का असे अनेक प्रश्न मनात आले. कोणत्याही शहरात ग्रामीण भागातून माणसं येतात ती मुख्यत्वे ‘जगायला’ हा आपल्याकडचा प्रवाह तिथंही आहेच. गावातून इथं लोक येतात ते जीव वाचवण्यासाठीही – शब्दश: जगायला!. इतक्या सगळ्या आंतरराष्ट्रीय संस्था आहेत त्यांना स्थानिक कर्मचारी घ्यावे लागतातच, त्यामुळेही इथं गर्दी आहे. श्रीमंत लोक जिथं असतील त्या परिसरात जवळच गरीबांची वसाहत असते (कारण ‘चीप लेबर’) हा ‘शहरीकरण’ या विषयाच्या अभ्यासात शिकलेला सिद्धान्त इथं पुन्हा एकदा प्रत्ययास आला.
आता काबूलमध्ये बहुमजली इमारती बांधल्या जात आहेत ख-या पण त्याच्या किंमती सामान्य माणसांच्या आवाक्याबाहेर आहेत. 


 राजकारणी (त्यातही सत्ताधारी) आणि बांधकाम व्यावसायिक यांच्यातल्या नातेसंबधांच्या अनेक सुरस आणि चमत्कारिक कहाण्या ऐकायला मिळाल्या. इथं येण्यापूर्वी ‘अतिशय कठीण परिस्थितीत देशाची जबाबदारी निभावून नेणारा नेता’ म्हणून तत्कालीन राष्ट्राध्यक्ष श्री. हमीद करझाई यांचं मला कौतुक वाटायचं. इथं आल्यावर मात्र त्यांच्याबद्दल अशा अनेक गोष्टी कळल्या, की स्वत:च्या भाबडेपणाचं हसू आलं. भारतीय नागरिक या नात्याने इथल्या भ्रष्टाचाराच्या कहाण्यांना नावं ठेवण्याचा नैतिक अधिकार मला नाही याची मला अर्थातच जाणीव होती; आजही आहे.
वाटेत दिसणा-या या कालव्याजवळ ‘खुदा गवाह’ या चित्रपटाचं चित्रीकरण झालं होतं आणि ते दाखवायला एक वाहनचालक मला घेऊन गेला होता. २०१५ मधली ही  दुर्दैवी घटना या कालव्याच्या साक्षीने झाली! 

एक दिवस ऑफिसमधून घरी येताना गाडी वेगळ्या रस्त्याने येत होती आणि त्या रस्त्यावर राहणारे काही सहकारी सोबत होते. एचआरने केलेल्या ओळखपरेडमध्ये यांच्याशी फक्त जुजबी ओळख झाली होतं. किरकोळ बोलणं झालं आणि ‘आज रस्ता का बदलला आपण’ असं मी विचारल्यावर एकाने “आम्ही तुझं अपहरण करतोय” असं म्हटलं. त्यातली गंमत जाणून मीही हसत “माझ्या घरचे लोक काही तुम्हाला पैसे देऊन मला परत घेणार नाहीत. मला तुमच्याकडून परत घेण्यासाठी कदाचित ते तुम्हालाच पैसे मागतील” अशी पुस्ती जोडली. त्यावर दुसरा म्हणाला, “तुझ्या घरच्या लोकांना थोडेच मागणार आम्ही? आम्ही युएनकडे मागू पैसे. तुझा जीव वाचवण्यासाठी युएन देईल हवे तितके पैसे.” पुढे तिसरा म्हणाला, “शिवाय आम्ही तुला पाकिस्तान तालिबानला विकू अशी धमकी दिली, की तुमचं सरकारही दबाव टाकेल युएनवर”. त्यावर सगळे हसले आणि असं काही होऊही शकतं याची मी नोंद घेतली. मग मी शहाणपणा दाखवत विषय बदलला. ‘अलिबाबा आणि चाळीस चोर’ गोष्टीतले वाटावेत असे मोट्ठे रांजण मला दिसले.
यात ‘नान’ बनवले जातात असं कळलं.
अर्थात अपहरणाची घटना घडू नये म्हणून सुरक्षा व्यवस्था नको इतकी काळजी घेते याचा अनुभव मला लगेच आला. एकदा मी शहराच्या दुस-या टोकाला दुस-या एका आंतरराष्ट्रीय संस्थेत एका अधिका-याला भेटायला गेले. साधारण तासभराची मिटिंग, त्यासाठी रीतसर परवानगी घेतली होती. मी तिथं पोचून पाचेक मिनिटं झाली असतील–नसतील, जॉर्जचा फोन आला.
“तू कुठे आहेस?” त्याने विचारलं.
मी ऑफिसचं नाव – जे जॉर्जला माहिती होतं – ते पुन्हा सांगितलं.
“तू त्या ऑफिसमध्ये आहेस का गेटमध्ये?” त्याने विचारलं.
“आत आहे. पाच मिनिटं झाली. एक तास लागेल अजून.” मी सांगितलं.
“तुझी मिटिंग कुणाबरोबर आहे?” त्याचा पुढचा प्रश्न.
त्या अधिका-याचं नाव मी जॉर्जला सांगितलं. “त्याला फोन दे,” जॉर्ज म्हणाला, मी दिला. अर्धा मिनिट जॉर्ज बोलला, तो अधिकारी फोन माझ्या हातात देत म्हणाला, “सॉरी, मला एक तातडीचं काम आहे. आपण पुन्हा कधीतरी भेटू.”
इतकी आधी ठरवलेली मिटिंग हा माणूस जॉर्जच्या फोननंतर रद्द करतोय हे माझ्या नजरेतून सुटलं नव्हतं. काहीतरी गडबड होती हे नक्की. तरीही मी म्हटलं, “मी थांबू शकते थोडा वेळ. तुम्ही तुमचं काम आटोपून या. किंवा मी तुमच्या असिस्टंटशी बोलते.”
“नाही. तुम्ही निघा,” असं म्हणून तो उभा राहिला, त्याने कुणालातरी हाक मारली. एक सैनिक माझ्याजवळ आला आणि त्याने मला दाराकडे येण्याची विनंती केली. खरं तर त्या क्षणी ‘हे लोक मला हाकलून देताहेत’ असं मला जाणवत होतं. राग, अपमान, आश्चर्य, वैताग अशा मिश्र भावना काबूत ठेवत सैनिकासोबत मी गाडीजवळ आले. मी येण्यापूर्वीच चालकाने गाडी सुरु केली होती त्याअर्थी जॉर्जचा त्यालाही फोन आला होता. परत जॉर्जचा फोन. “गाडीत बसलीस का तू” हे विचारण्यासाठी. चालकाने गाडी सुसाट सोडली. ज्या रस्त्याने आम्ही आलो, त्यापेक्षा वेगळ्या रस्त्याने परत जात होतो आम्ही. “काय झालं?” मी चालकाला विचारलं. “कुठे काय? आपण ऑफिसमध्ये परत जातोय,” चालक म्हणाला. एरवी भरपूर गप्पा मारणारा चालक आज बोलायला तयार नव्हता, मी सोडून दिलं विचार करणं.
ऑफिसमध्ये आल्यावर जॉर्जला विचारलं, “काय झालं?” तो म्हणाला “कुठे काय? काही नाही”. “Only those who MUST know, SHOULD know” हे ‘सुरक्षा तत्व’ मला माहिती होतं. आपल्याला काही सांगितलं जाणार नाही हे जाणून मी गप्प बसले. योगायोगाने दुपारच्या जेवणाच्या टेबलावर अचानक दोन श्रीलंकन सेनाधिकारी भेटले. सुचिथमुळे यांच्याशी मैत्री झाली होती. एकाने विचारलं, “आज काय विशेष?”. मी काही उत्तर द्यायच्या आत दुसरा पहिल्याला म्हणाला, “ओके सगळं?” त्यांच्या आपापसातल्या बोलण्यात असे काही शब्द आले, की मी कान टवकारले. मी सकाळी ज्या भागात होते, ते नाव आलं आणि मला संदर्भ लागला.
मी सकाळी ज्या भागात होते, तिथं भारतीय स्त्रीचं अपहरण होण्याच्या शक्यतेचा ‘रेड अ‍ॅलर्ट’ मिळाला होता. म्हणून जॉर्जने मला त्या भागातून तातडीने बाहेर काढलं होतं तर! एक पोलीस गाडी आमच्या गाडीच्या सतत मागे का होती तेही समजलं. अर्थात मीच लक्ष्य असेन असं नाही. माझ्या चेह-याकडे पाहून ते अधिकारी काय समजायचं ते समजले. पहिला अधिकारी म्हणाला, “इंटेलिजन्सला जी माहिती मिळते ती १००% खरी ठरते अशातला भाग नाही, पण आपण धोका पत्करत नाही कधीच. आपल्या सिक्युरिटी व्यवस्थेवर विश्वास ठेव. ओके. काय घेणार आहेस तू? इथं पिज्झा मस्त मिळतो. आजचं जेवण माझ्यातर्फे.” मग आम्ही इतर गप्पा मारत राहिलो. हा धोका खरा होता की फक्त एक मॉक ड्रिल? हे मला कधीच कळणार नाही.
इथं आल्यापासून माझ्यात परिस्थितीवश झालेला एक बदल म्हणजे “सदैव जाण्याच्या (म्हणजे पळून जाण्याच्या) तयारीत असणं!” लॅपटॉप आणि फोन सतत पूर्ण चार्ज्ड ठेवणं, बॅग नेहमी भरलेली ठेवणं, अगदी मध्यरात्रीही एका मिनिटात बाहेर पडता येईल अशा रीतीने पासपोर्ट, युएन ओळखपत्र आणि पुरेसे डॉलर्स जवळ बाळगणं इत्यादी .
माझ्या खोलीच्या समोर चोवीस तास सुरक्षारक्षक असायचाच. हे सगळे भारतीय गुरखा पलटणीतले निवृत्त सैनिक. जातायेता आमच्या गप्पा व्हायच्या. काडतुस काढून त्यांनी मला बंदूक हाताळायला दिली. तिचं वजन न पेलता आल्याने बंदूक चालवायला शिकण्याचा माझा उत्साह मावळला. हे उमदे गुरखा अत्यंत सभ्य होते, त्यांचा आधार वाटायचा. पण चोवीस तास ते समोर नको वाटायला लागले. वरच्या मजल्यावर कोप-यातली, आकाश दिसणारी खोली मला एक दिवस मिळाली खरी पण काही तासांत माझी रवानगी परत जुन्या खोलीत केली गेली. का? माहिती नाही.
 एका शनिवारी दोन गुरखांशी बराच वेळ गप्पा मारत बसले होते. मी सहज विचारलं, “शत्रूला तुम्ही मारता, तेव्हा....?” मला प्रश्न पूर्ण न करू देता माझ्यावर नजर रोखत एकजण शांत आवाजात म्हणाला, “हम किसी को मारते नहीं; हम तो केवल आप जैसे बेगुनाह लोगों की रक्षा करते है”.
सैनिक ही काय चीज असते याचा साक्षात्कार घडवून आणणारा क्षण होता तो.
मी आल्यावर पहिले दोन तीन दिवस जॉर्ज “बंकर पाहिलास का” अशी सारखी विचारणा करत होता. तो अखेर एकदाचा पाहिला. ती एक दहा बाय बाराची खोली, त्यात दोन सोफा, दोन खुर्च्या एक पाण्याचं भांडं आणि दोन ग्लास. विशेष काही वाटलं नाही मला. समोर सुरक्षारक्षक असल्याने माझी खोली सुरक्षित आहे आणि इथून पळत जायला बंकर जवळ आहे हे बंकर भेटीनंतर लक्षात आलं.
एक दिवस सकाळी ऑफिससाठी बाहेर पडताना पहा-यावरच्या सैनिकाने एक कागद हातात दिला. आज संध्याकाळी साडेसात वाजता ‘बंकर मॉक ड्रिल’ होती. ऑफिसमध्ये पोचल्यावर मी सगळ्या सूचना व्यवस्थित वाचून काढल्या. ही ड्रिल एक रुटीन दिसतंय इथलं असं म्हणून मी निवांत बसले.
संध्याकाळी सातच्या सुमारास जिममध्ये व्यायाम करून, येताना रिसेप्शनवरच्या मुलीशी गप्पा मारत उभी होते. तितक्यात सायरन वाजला. मी गोंधळून तशीच उभी होते ते पाहून ती म्हणाली, “बंकरमध्ये पळा.” मी पळत तिकडं गेले. आम्ही सगळे बुलेटप्रुफ जाकिट, कागदपत्रं वगैरे न घेताच रिकाम्या हातांनी तिथं पोचलो होतो. काही लोकांनी तर यायला पाच मिनिटं घेतली तर काही निवांत फोनवर बोलत चालत आले. रशीद, जो आमचा वॉर्डन होता, त्याने आमचं जोरदार बौद्धिक घेतलं – सूचनांचं काटेकोर पालन कसं गरजेचं आहे यावर. “पण ड्रिल तर साडेसातला होती, तुम्ही ती अचानक सात वाजता घेतलीत” – आमच्यातल्या काहींनी (मीही होते त्यात, खोटं कशाला बोला) तक्रारवजा समर्थन करण्याचा प्रयत्न केला.
“दहशतवादी तुमची अपॉइन्टमेंट घेऊन हल्ला करतील याची कुणाला खात्री आहे?” रशीदने आक्रमक शांतपणे विचारलं. आम्ही गप्प बसलो. “हा संगणकावरचा खेळ नाही, हे इथलं वास्तव आहे. हे सगळं तुमचा जीव वाचवण्यासाठी आहे. सगळे नियम पाळले गेलेच पाहिजेत, चोवीस तास. त्याबाबत कुणाची तक्रार असेल तर एकच पर्याय आहे. पहिल्या फ्लाईटने आपल्या घरी जाणं!”
रशीद पोटतिडीकीने बोलत होता त्याचा आम्हा सगळ्यांवर अपेक्षित परिणाम झाला. सूचनांची उजळणी करून आमची ड्रिल संपली. गंभीर होऊन आम्ही त्या परिस्थितीत जगण्यास सज्ज झालो.
ती मॉक ड्रिल ही एक चुणूक होती भविष्याची.
क्रमशः