ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Monday, December 11, 2023

२६६. दुवा

अनोळखी माणसांसोबत बोलायला उत्सुक असणारी तीन माणसं – खरं तर तीन स्त्रिया, एक पुरूष, आणि एक आठेक वर्षांची मुलगी - एका दिवसात मला भेटले. समोर दिसलेल्या अनोळखी माणसाला कुठल्याही शिक्क्यांविना स्वीकारणं मोठ्या माणसांना जमतच नाही की काय असं वाटण्याजोगे अनुभव होते ते.

पहिल्या ताई बसमध्ये भेटल्या. पुणे शहरातली बस. शनिवारची कलती संध्याकाळ. त्यामुळे की काय गर्दी जराशी कमी होती. पण सवयीने मी स्त्रियांसाठी आरक्षित असलेल्या सीटवर जाऊन बसले. तिकिट काढलं. शेजारी बसलेल्या ताईंनीही काढलं. त्या खिडकीतून बाहेर पहात होत्या, त्यामुळे त्यांच्याशी बोलण्याचा माझा इरादा थंडावला. तितक्यात त्यांच्या हातातलं तिकिट खाली त्यांच्या पायाशी पडलं. त्यांनी पायांच्या बोटांनी ते तिकिट उचलून घेण्याचा प्रयत्न केला खरा. पण बसच्या त्या तिकिटाला जाडी अशी काही नसतेच, त्यामुळे ते तिकिट काही उचललं जाईना. मग मी जागेवरून उठले, खाली वाकून तिकिट घेतलं आणि त्यांच्या हातात दिलं. त्या हसल्या. ते धन्यवाद, आभार वगैरे शब्द माणसं सरसकट वापरत नाहीत ते बरं आहे.

त्यांचा पहिला प्रश्न होता, तुमचं आडनाव काय?” अनेक लोकांना आडनावावरून जात कळते हे मला माहिती आहे. शिवाय माझं आडनाव काही त्यावरून जात कोणती ते कळू नये या प्रकारातलं नाही. मी मुद्दामच फक्त माझं नाव सांगितलं. मग त्या म्हणाल्या, हो, पण आडनाव काय?” फार आढेवेढे न घेता ते मग मी त्यांना सांगितलं. मग त्यांचा चौकशीचा सूर लागला तो त्या काही थांबायचं नाव घेईनात. कुठं राहता, काय करता, घरी कोण असतं, आत्ता कुठं चाललात, तिकडून परत कधी येणार .... वगैरे वगैरे.

पाच-सहा स्टॉपनंतर मला उतरायचं होतं. त्यामुळे एवढ्या चौकशीची काही गरज नव्हती. आम्ही एकमेकींना आधी कधीच पाहिलेलंही नव्हतं. मी त्यांना एकही व्यक्तिगत प्रश्न विचारत नव्हते. अर्थात त्या ताई मला काही विचारायला वावही देत नव्हत्या हा भाग वेगळा. पण संधी मिळाली असती तरी मी काही त्याना खोलात जाऊन त्यांची माहिती घेतली नसती. पुन्हा कधी भेटलो तर कदाचित विचारेन, पण पहिल्याच भेटीत या माहितीची मला काही गरज वाटत नव्हती.

त्यांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायच्या नादात मी एक स्टॉप पुढं आले. गुगल मॅप चालू करून मी इच्छित ठिकाणाच्या दिशेने चालायला लागले. आधीच पोचायला थोडा उशीर झाला होता. त्यात मी एक स्टॉप पुढं येऊन चालण्याचं अंतर दहा मिनिटांनी वाढवलं होतं. नकाशावर मला दिसलेल्या एका जवळच्या रस्त्याकडं (म्हणजे शॉर्ट कट) मी वळले. एकूणच दिशांबाबत माझं अज्ञान अगाध आहे. त्यामुळे जीवनाची दिशा वगैरे शब्दांपासून मी लांब राहणं स्वाभाविक आहे. ते असो.

तात्पर्य काय तर पुणे शहरातल्या एरवी फक्त नावानेच माहिती असलेल्या एका वस्तीत मी घुसले. ८५० मीटर अंतरावरचं माझं पोचण्याचं ठिकाण मग ९५० मीटर झाल्याचं माझ्या लक्षात आलं आणि मी दिशा बदलली. एकमेकांनी चिकटून असेलली असंख्य छोटी घरं, घरांच्या दारात बसलेल्या स्त्रिया-मुली, रस्त्यावर खेळणारी मुलं (मुलगे खेळत होते, आणि त्याच वयाच्या मुली आईजवळ बसून होत्या). समोरसमोरच्या घरांमध्ये तीन-चार फुटांचं अंतर असेल-नसेल, त्यातूनही वाट काढत जाणारे दुचाकीस्वार होते. माझ्याकडं काही जणांनी आश्चर्याने पाहिलं, पण मी काही न बोलल्याने तेही काही बोलले नाहीत. मी चालत असलेला रस्ता मुख्य रस्त्याला जाऊन मिळतो आहे ना याची मी वाटेत एका घरात बसलेल्या स्त्रियांबरोबर खातरी करून घेतली. पण मी जितकी जास्त चालत होते, तितकी मी माझ्या पोचण्याच्या ठिकाणाहून दूर जात होते. आपण भूलभुलय्यात फसलो आहोत की काय असं मला वाटायला लागलं. मला काही कुणी त्रास देत नव्हतं, किंवा मला काही असुरक्षित वगैरेही वाटत नव्हतं. मला फक्त वेळेत माझ्या ठिकाणी पोचायचं होतं.

वाटेतल्या एका घराच्या दारात एक ताई उभ्या होत्या. मग मी थांबले. त्यांना मी म्हणलं, मी रस्ता चुकलेय असं दिसतंय. मी तुमच्या वाडीतच गोल गोल फिरतेय बहुतेक. मला .....सोसायटीत जायचं आहे. इथून कसं जायचं? सांगाल का मला?” मीही अर्थात प्लीज, कृपया वगैरे शब्द वापरले नाहीत. बोलताना असे शब्द अनेकदा औपचारिक वाटतात. त्या ताई हसल्या, म्हणाल्या, इथं सोसायटी वगैरे काही नाही. ही अशी घरं दिसताहेत ना, तशीच वस्ती आहे इथं. तुम्ही चुकलायत रस्ता. बाजूलाच आठ-नऊ वर्षांची एक मुलगी उभी होती, तिला म्हणाल्या, जा गं, मावशीला त्या रस्त्यापत्तुर सोडून ये.मुलगीही लगेच तयार झाली. मला जरा संकोच वाटला. मी म्हणलं, अहो, सांगा मला, मी जाईन. तिला कशाला त्रास. ताई हसल्या. म्हणाल्या, दिवसातून दहा वेळा जातेय ती. शिवाय तुम्हाला नाही सापडायचा रस्ता, तुम्ही पुन्हा चुकाल.

नाव नाही, गाव नाही, जात नाही, धर्म नाही .... मला मदत करायला त्यांना माझ्या अशा कोणत्याच ओळखीची गरज पडली नाही.

छोटी पोरगी बडबडी होती. ती एकदम तिच्या मैत्रिणीशी तिचं काही भांडण झालं होतं, त्याबद्दल सांगायला लागली. कुठल्यातरी बोळकांडातून डावी-उजवीकडं वळून तिने मला तीन मिनिटांत मुख्य रस्त्यावर आणून सोडलं. आता तुम्ही जा असा मला आदेश देऊन ती सुसाट तिच्या घराकडं पळाली.

त्या सोसायटीतलं काम आटोपून पत्रकार नगरमध्ये एका कार्यक्रमाला गेले. कार्यक्रम संपल्यावर निवांत चालत आले ती जवळजवळ लॉ कॉलेजपर्यंत. रोजची ठराविक पावलं चालायची असतात तीही पूर्ण झाली त्या निमित्ताने. चालताना सभोवतालच्या जागा, आकाश, माणसं काहीशी वेगळीच भासतात हा नेहमी येणारा अनुभव पुन्हा एकदा आला.

सिग्नलसाठी थांबले असताना कोपऱ्यावर एक नवा कॅफे दिसला, म्हणून तिकडं गेले. शनिवारची संध्याकाळ असूनही कॅफे पूर्ण रिकामा होता याचं नवलं वाटलं. (नंतर लक्षात आलं की तिथं वाहनांच्या पार्किंगची सोय नाही.) मी ऑर्डर देऊन बसत होते तेवढ्यात एका ताईंनी प्रवेश केला. आमची नजरानजर झाली आणि मी हसून मोबाईल उघडला. त्यांनी दोन मिनिटं वाट पाहिली आणि म्हणाल्या, तुम्ही एकट्याच असाल तर या ना इकडं माझ्या टेबलावर.मी उठून त्यांच्या टेबलाकडं गेले, बसले. त्यांनीही नाव, आडनाव, कुठं राहता, वय किती, घरी कोण असतं, इकडं कुठं आला होता, आता घरी परत कसं जाणार ... अशी प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. त्या ... भागात राहतात, गाडी (चारचाकी) नाही आणली ते बरं झालं ... अशी स्वत:बद्दलची माहिती त्या कळत-नकळत पुरवत होत्या.

मी सँडविच मागवलं होतं आणि त्यांनी समोसा. शेअर करायला चालेल का असं त्यांनी विचारल्यावर मी हो म्हटलं. गप्पा मारत राहिलो. वाहतूक व्यवस्थेबद्दल, देशातल्या सध्याच्या स्थितीबद्दल वगैरे. त्यांनी त्यांचं बील दिलं, त्या बाहेर पडल्या. आता वेळ होती काउंटरवच्या पुरूषाची. आम्ही दोघींची ओळख आधीपासून होती का असा त्याचा मुख्य प्रश्न होता. त्याने अर्थात नाव-गाव काही विचारलं नाही मला. मीही हा कॅफे कधी सुरू झाला, गर्दी कोणत्या वेळी जास्त असते ... असे माझ्या उपयोगाचे प्रश्न विचारले, बील दिलं आणि बाहेर पडले.

आपली सर्वांचीच ओळख (आयडेंटिटी) अनेक पदरी असते. नाव-गाव-जात-धर्म-भाषा या काही ठळक ओळखी. माणसं आपल्यासारखी माणसं शोधत असतात. सार्वजनिक जीवनात आपल्यासारख्या माणसांसोबत – ती अनोळखी असली तरी – आपण जास्त आरामात असतो. आपली मतं एकसारखी असणार याची आपल्याला काहीशी खातरी (किमानपक्षी अपेक्षा) असते. आपलं अनुभवविश्व सारखं असणार या गृहितकावर आधारित ही अपेक्षा असते.

समजा मी मराठी बोलणारी नसते, समजा मी स्त्री नसते, समजा मी अमुक एका वयाची नसते, समजा माझं नाव-गाव-धर्म काही वेगळाच असता तर मला हाच अनुभव आला असता का? कदाचित मला रस्ता दाखवणाऱ्या वाडीतल्या त्या आई-मुलगी माझ्याशी वेगळ्या वागल्या नसत्या. पण बसमधल्या ताई आणि कॅफेमधल्या ताई?

समजा बसमधल्या आणि कॅफेमधल्या ताई मराठी बोलणाऱ्या नसत्या, स्त्रिया नसत्या, अमुक एका वयाच्या नसत्या .... तर मीही त्यांना माझी व्यक्तिगत माहिती सांगितली असती का?

अनेकपदरी ओळखींमधला काहीतरी दुवा आपण सगळेच शोधत असतो.

हा दुवा नसेल्यांशी आपला संवाद होऊ शकेल असं आपण (आणि समाजही) बदललो तर ......

23 comments:

 1. कधी कधी एखाद्याचं किंवा एखादीचं व्यक्तिमत्त्व असं असतं की अनोळखी माणस़ं पण मोकळी होऊन बोलतात.निर्व्याज कुतुहलापोटी खुशाल प्रश्न विचारतात.त्यांची ती सहजता सर्वांसाठी खुली नसते.
  तू सहजपणे ,naturally सर्व category मधल्या , irrespective of age,gender,social status,languge,religion..
  लोकांना आपलीशी वाटू शकतेस. विश्वासाची व्यक्ती वाटतेस. ही तुझी quality, हाच खरा दुवा.

  ReplyDelete
  Replies
  1. वंदना, माझं कौतुक जरा जास्तच झालंय :-) आपल्या सगळ्यांनाच अनेकदा असा अनुभव येतो, मी एक अनुभव इथं मांडला आहे इतकंच. आभारी आहे.

   Delete
 2. भेटणारी अनोळखी मानसे त्यांचे आपल्याशी व्यवहार. वय, लिंग, भाषा, प्रांत बदलला तर तसाच व्यवहार राहील का हा विचार.

  Totally relevant thought. पूर्वी माणसे निखळ आणि सर्वांशी सामान वागायची (माझा अनुभव तरी). आता काम, हुद्दा, जात इत्यादी गोष्टी बघून कुणाशी कसे वागायचे ठरवतात.

  ReplyDelete
  Replies
  1. धन्यवाद, ऋषिकेश. 'सर्वांना समान वागवण्याची' तुमची आठवण ही एकाच प्रकारच्या गटातल्या लोकांसाठी (homogeneous groups) होती की खरोखर सर्वांसाठी होती? अनेकदा आपल्या आयुष्यात आपल्यापेक्षा वेगळ्या प्रकारचे (सामाजिक ओळख), वेगळा विचार करणारे लोक नसतात असं दिसतं. अपवाद होते, आहेत, आणि पुढंही असतीलच.

   Delete
 3. It is fun to read... Our identities, as perceived, change the quality of the conversations we have with people around us...
  My husband and I observe this in the context of living and working in a small town.
  He gets some advantages being a man... and I get some being a local...
  We both get treated differently because we look like "city people" and speak with each other in English.
  But we both also experience the downsides of not being a local and not being a man, respectively.

  ReplyDelete
  Replies
  1. Indeed! Our conversations change. It is fun to observe if and when it changes our styles of conversations as well!

   Delete
 4. मस्त लिहिलं आहे. आवडलं. ती पाण्याची मालिका अर्धी राहिली वाटत.

  ReplyDelete
  Replies
  1. धन्यवाद. हो, ती मालिका आता मागेच पडली. इतका उशीर झालाय की लिहिण्यातही मजा नाही आणि वाचण्यातही. क्षमस्व.

   Delete
 5. Very nice article! Your keen observation of the people and their ways is so relatable.

  ReplyDelete
 6. मेधा कुळकर्णीDecember 12, 2023 at 11:20 PM

  आवडलं लिखाण. आवेग आणि अभिनिवेश यापासून दूर. म्हणून दूरस्थपणे न्याहाळल्यासारखं. आणि जे तुला सांगायचंय ते अगदी नेमकेपणे आलंय.

  ReplyDelete
  Replies
  1. धन्यवाद, मेधाताई.

   Delete
 7. खूपच छान, नितळ अनुभव लिहिला आहेस. सर्वसामान्य माणसं अशीच वागतात , एकमेकांना मदत करतात असा अनुभव आहे मलाही. आणि वेगळी भाषा, वेगळा प्रांत, वेगळे gender असेल तर माणूस तसेच वागेल का अशी कल्पना करणे हल्लीच्या WhatsApp काळात अवघड असेल तरी अडचणीत सापडलेल्या व्यक्तीला मदत करतात लोक सहसा असे वाटते

  ReplyDelete
  Replies
  1. धन्यवाद. मदत करण्याचा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे तो आपण कोणाशी संवाद साधताना जास्त comfortable असतो हा. आपापले comfort zones अधुनमधून का होईना सोडले तर चांगलं!

   Delete
 8. हो. हा मुद्दा लक्षात नव्हता आला उत्तर देताना. पण अनोळखी ठिकाणी एकट्याने जाताना असा comfort zone सोडण्याची वेळ आलेली आहे आणि तेव्हा अवघडल्या सारखे आधी वाटले तरी नंतर त्यात काही अवघड आहे असे वाटले नाही.

  ReplyDelete
  Replies
  1. << आणि तेव्हा अवघडल्या सारखे आधी वाटले तरी नंतर त्यात काही अवघड आहे असे वाटले नाही >> अगदी नेमकं!

   Delete
 9. Very nice article!! To be able to relate to anyone irrespective of anything is a great quality !! Thanks for sharing 👌
  Nutan

  ReplyDelete
  Replies
  1. Thanks, Nutan. Glad to know that you enjoyed reading it!

   Delete
 10. तुम्ही उडवून लावलं असतं तर त्या दोघी बिचाऱ्या गप्प बसल्या असत्या. बोलायची हौस तुम्हालाही असल्याने असे प्रसंग तुमच्या वाट्याला येत असावेत. (Just being sarcastic! )

  ReplyDelete
  Replies
  1. हाहा!! सही पकडे हो 🤣

   Delete
 11. मस्त लिहिलंयस. I can relate it.
  मला आपली पहिली भेट आठवली 😊

  ReplyDelete
  Replies
  1. प्रतिसादामध्ये नाव नसल्याने मला काही संदर्भ लागणार नाही. अर्थात दोन माणसांच्या एकाच प्रसंगाच्या आठवणी एकसारख्या असतील अशी काही खातरी नाही. असो. तेव्हा मी बसवाल्या किंवा कॅफेवाल्या ताईंसारखी चौकस नव्हते अशी आशा करते 🤣

   Delete
 12. Nice article. वाचताना मजा आली. एवढ्या साध्या विषयावर ही तु भारी लिहू शकते. असेच छान छान लिहीत जा.

  ReplyDelete