(भवताल, पुणे तर्फे आयोजित दोन दिवसांच्या पर्यावरण-अभ्यास सहलीत मी सामील झाले होते. १६ आणि १७ सप्टेंबर रोजी आम्ही पुणे आणि सातारा जिल्ह्यांतल्या निवडक ऐतिहासिक जलव्यवस्थांना भेट दिली. या दोन दिवसांत मला जे दिसलं, समजलं, भावलं – त्याची ही नोंद. या लेखात काही तथ्यात्मक चूक असेल तर ती माझी चूक आहे. योग्य माहिती आपण दिलीत तर चूक दुरूस्त करेन.)
जेजुरी. खंडोबाची
जेजुरी. आपल्यापैकी अनेक लोक एकदा तरी जेजुरीला जाऊन आले असतील. मीही पूर्वी गेले
होते. आज जेजुरीला जाऊनही आम्ही खंडोबाच्या दर्शनाला गेलो नाही. जलव्यवस्थापन हा
या अभ्यास दौऱ्याचा विषय असल्याने आम्ही गेलो ‘पेशवे तलाव’कडं. भोर तालुका सोडून आम्ही आता पुरंदर तालुक्यात आलो होतो.
जेजुरीच्या
पूर्वेला हा विशाल तलाव आहे. आपण साधारणपणे तलाव पाहतो ते एक किंवा दोन बाजूंनी
बांधलेले असतात. हा तलाव वर्तुळाकार नसून अष्टकोनी आहे आणि पूर्णपणे दगडाने
बांधलेला आहे.पहिले बाजीराव पेशवे यांनी अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात (इसवी सन
१७३४ ते १७४०) हा तलाव बांधला म्हणून याला ‘पेशवे तलाव’ असे नाव आहे. तलावाचे क्षेत्र सदतीस एकर आहे अशी माहिती एका ठिकाणी
आहे तर दुसऱ्या ठिकाणी तो एकोणीस एकर क्षेत्रात आहे असं म्हटलं गेलं आहे.
डोंगररांगातून येणारं पाणी निर्विघ्नपणे तलावात यावं म्हणून तलावाच्या अनेक बाजूंना
छिद्रं आहेत. गाळ-दगड न येता फक्त पाणी तलावात यावं यासाठी ही रचना असावी.
आम्ही गेलो
तेव्हा सुदैवाने तलावावर फारशी गर्दी नव्हती. तलावावरून मल्हारगड (खंडोबा आणि
महादेवाचे मंदिर असलेले प्रसिद्ध देवस्थान) स्पष्ट दिसतो.
पाण्यावर किंचित तरंग
उमटत होते. तलावाच्या बांधावर मोट बांधण्यासाठीची व्यवस्था स्पष्ट दिसते.
तलावाच्या भिंतीवर ठराविक अंतरावर एकामागून एक असे चार जिने (दगडी पायऱ्यांचे
आहेत, म्हणजे पुरेसे जुने आहेत हे जिने) भिंतीमध्ये उतरताना दिसले. ते पाहुन
कुतुहल वाटलं. पण जिने उतरण्यापूर्वी जरा मागं जाऊन बघूयात म्हणून उतरून भिंतीच्या
खालच्या बाजूला आलो. तर समोर दिसलं जमिनीत उभं केलेलं ‘बल्लाळेश्वर मंदिर’.
सुमारे
पंचवीस पायऱ्या उतरल्या की समोर एक कुंड आहे. त्या कुंडाभोवती एका वेळी एक व्यक्ती
चालत जाऊ शकेल असा दगडी मार्ग आहे. त्या मार्गाने चालत गेलं की उतरून आलेल्या
पायऱ्यांच्या अगदी समोर तीन कमानी दिसतात आणि त्यातल्या मधल्या कमानीत शिवलिंग
आहे. शिवलिंगाकडं जाताना त्याच्या डाव्या (आणि नंतर परत येताना उजव्याही) बाजूला
पाणी वाहत येताना दिसलं. हे पाणी कुंडात जातं. आधी वाटलं की शिवदर्शन करण्यापूर्वी
भाविकांना पाय धुता यावेत म्हणून नळ बसवला आहे की काय. पण पाण्याच्या स्रोताचा वेध
घेता डावीकडे एक जिना दिसला. त्यातून पाणी अखंड वहात होतं. हे धरणातून येणारं पाणी
होतं. स्थानिकांच्या माहितीनुसार या कुंडातल्या पाण्याचा स्तर कधीही कमी-जास्त होत
नाही. या कुंडाच्या तळाशी एक लाकडी दरवाजा असून तो बंद आहे. पण याच दरवाज्याच्या
आसपास कुठंतरी पाणी बाहेर जाण्याचा मार्ग आहे. जमिनीखालून हे पाणी वाहतं आणि
शेतीसाठी वापरलं जातं. १९८० पर्यंत हे पाणी शेतीसाठी वापरलं जात होतं, ते आम्ही
पाहिलं आहे, वापरलं आहे – असं सांगणारे शेतकरी भेटलो. त्यांनीच आम्हाला थोडं दूरवर
नेऊन शेतात जिथं पाणी बाहेर येत होतं, तो भाग दाखवला.
पाण्याचा
प्रवाह नियंत्रित करण्यासाठी या जिन्यात पूर्वी तीन वेगवेगळ्या पातळ्यांवर दट्टे
बसवले होते. (हे दट्टे दगडी होते की लाकडी याविषयी वेगवेगळी माहिती आढळते.) आता हे
दट्टे काढून टाकले आहेत आणि दट्ट्यांची जागा सिमेंटने बंद केलेली आहे. तसाच जिना
शिवलिंगाच्या उजव्या बाजूलाही आहे. हे दोन्ही जिने चढून थेट धरणाच्या भिंतीवर आजही
जाता येतं. भिंतीवरून दिसलेल्या चारपैकी दोन जिन्यांचं रहस्य इथं लक्षात आलं.
बल्लाळेश्वर
मंदिराच्या पायऱ्या उतरण्यापूर्वी डाव्या आणि उजव्या बाजूला छोटे बंदिस्त दगडी
मार्ग आहेत. त्यातून चालत गेलं की खालच्या शिवलिंगाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला
परत जिने आहेत – ज्यातून धरणाच्या भिंतीवर जाता येतं. थोडक्यात सांगायचं तर हे
दुमजली मंदिर आहे आणि ते धरणाच्या भिंतीत साठ फूट खोल आहे. प्रत्येक मजल्यावर दोन जिने आहेत. या मंदिराची आणि धरणाची
जोडरचना हे वास्तूशास्त्रातलं एक आश्चर्य तर आहेच, पण पाणी व्यवस्थापनातलंही एक
उत्तम उदाहरण आहे. पाण्याच्या अशा महत्त्वाच्या ठिकाणी मंदिरांची स्थापना करणं
यातून जनमानसाचा अभ्यासही दिसून येतो. देवाच्या प्रेमाने (अथवा भयाने – कोण कशाने
प्रभावित असेल ते सांगता येत नाही) लोक पाण्याचीही काळजी घेत असत असं दिसतं.
मोरगाव-सुपे
रस्त्यावर एके ठिकाणी चविष्ट भोजन करून आम्ही काही काळ तिथल्या अंगणात स्थिरावलो
तेव्हा आकाशात ढग दाटून आले होते. रस्त्यावरची रहदारी थंडावली होती. मोकळी हवा, शांतता, झोपाळा ....सकाळी हलकासा शिडकावा झाला होता. आता पाऊस येणार असं वाटत असतानाच दहा मिनिटांत ते ढग
निघून गेले. आम्ही लोणी-भापकरच्या दिशेने निघालो. आता आम्ही आलो होतो ते
बारामती तालुक्यात. पुणे जिल्ह्यातल्या तालुक्यांचं या अभ्यास सहलीच्या निमित्ताने वेगळंच दर्शन होतंय.
लोणी भापकर
गाव तसं मोठं असावं असं वाटेत दिसलेल्या ग्रामपंचायतीच्या दुमजली इमारतीवरून
वाटलं. ‘पाच रूपयांत
दहा लीटर आरओ फिल्टर पाणी मिळेल’ असं ग्रामपंचायत कार्यालयाच्या एका भिंतीवर लिहिलेलं
दिसलं, म्हणजे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असावा.
ज्येष्ठ नागरिक संघाचीही
पाटी दिसली. गावात बरीच मंदिरं आहेत असं दिसतंय.
कालभैरवनाथ हे ग्रामदैवत आहे. तिथं काही आम्ही गेलो नाही. सरदार
भापकरांच्या गढीचे अवशेषही पाहिले नाहीत. सोनजी भापकर हे पेशवेकाळात मोठे सरदार
होते. हा पराक्रमी सरदार पानिपतच्या लढाईत (१७६१) मारला गेला. एके काळी हे बरंच महत्त्वाचं गाव किंवा स्थान असावं हे नक्की. अशा ऐतिहासिक स्थानी राहणाऱ्या लोकांना त्या त्या गावाबद्दल काय वाटत असावं याचं कुतूहल वाटतं. पण अर्थात त्याचा अंदाज मी माझ्यावरून आणि माझ्या ओळखीच्या माणसांवरून करू शकते म्हणा 😀
आम्ही गेलो
ते थेट मल्लिकार्जुन मंदिरात. हा परिसर आता दत्त मंदिर या नावाने ओळखला जातो. पण
दत्त मंदिर तिथं गेल्या दीडेकशे वर्षांत आलं असावं. परिसरातले सगळे गाभारे बंद
होते, त्यामुळे देवतांच्या मूर्ती पाहता आल्या नाहीत. पण नंदी बाहेर होता,
त्यावरून (आणि मल्लिकार्जुन नावावरुन) हे शिवमंदिर आहे हे सहज कळतं.
परिसरात
प्रवेश करतानाच दोन – नाही तीन – गोष्टी तत्काळ नजरेत भरल्या. एक, मोकळ्या जागेत
ठेवलेलं वराहशिल्प. दुसरी पुष्करिणी. आणि तिसरं म्हणजे मंदिराचं शिखर. या मंदिराच्या
वरच्या भागाची पडझड झाली असल्याने, बाकी भाग कोसळण्याची शक्यता असल्याने भाविकांना
आत जाता येत नाही असं समजलं. काही वर्षांपूर्वीपर्यंत हे दरवाजे उघडे असत असं आंतरजालावरच्या काही लेखांवरून दिसून आलं. पण सुरक्षितता महत्त्वाची, तिच्याशी तडजोड नकोच.
भारतीय
हिंदू परंपरेत वराह हा विष्णूचा तिसरा अवतार मानला जातो. हिरण्यक्ष राक्षसाने
पृथ्वी समुद्राच्या तळाशी ओढून नेली. विष्णूने वराहाचं रूप धारण करून. एक हजार वर्ष
राक्षसाशी लढाई करून पृश्वीला वाचवलं ...ही कथा आपण अनेकांनी लहानपणी ऐकली-वाचली असेल.
वराहावताराचं काम संपल्यावर विष्णून ते शरीर त्यागलं, आणि मग त्या शरीरापासून
यज्ञाची विविध अंगं बनली अशी कथा विष्णुपुराणात आहे. महावराहाचं किंवा यज्ञवराहाचं
शिल्प काहीसं भग्नावस्थेत असलं तरी विलक्षण देखणं आहे. वराहाचं शिल्प आपल्याला
आवडू शकेल अशी कल्पनाही मी कधी केली नव्हती. पुष्करणीसमोरच्या मोकळ्या अंगणात आता
हा असला तरी पूर्वी तो पुष्करिणीतल्या मंडपात असावा असा अंदाज लावता येतो. तिथं
श्रीदत्त या देवतेचं आगमन झाल्यावर वराहाला बाहेर हलवण्यात आलं असावं. वराहाच्या
पाठीवर जी झूल दिसते, त्यात विष्णूच्या प्रतिमा कोरलेल्या दिसतात. फोटोतल्या
वराहाचे पायही पाहा. तिथंही शंख, गदा ही विष्णूची आयुधं दिसतील.
मल्लिकार्जुन मंदिर पांडवकालीन आहे असा समज लोकांमध्ये
प्रचलित आहे. पण मंदिराच्या हेमाडपंथी शैलीवरून हे मंदिर यादवकालीन (तेराव्या किंवा चौदाव्या शतकातलं) असावं असं म्हणता येईल. स्थानिक लोकांच्या माहितीनुसार या मंदिरात दोन शिवलिंगं आहेत. एक शंकराचं आणि दुसरं पार्वतीचं.
मल्लिकार्जुन
मंदिराच्या समोर दगडी बांधकाम असलेली पुष्करणी आहे. एका नजरेत तिचं समग्र दर्शन
होत नाही, इतकी ती मोठी आहे.
या पुष्करणीचा फोटो काढण्यासाठी ड्रोन वापरायला हवं
असं मला वाटलं. पुष्करणीत खाली उतरून पाण्याच्या चारी दिशांना फिरता येते.
उतरण्यासाठी एका बाजून पायऱ्या आहेत. ठिकठिकाणी लहान कोनाडे दिसतात, त्यातल्या
काहींमध्ये मूर्तीही दिसतात, त्या नव्या असाव्यात. पाणी वापरात नसल्याने भरपूर शेवाळ साठलं आहे. इथं असं वाटलं की जुन्या काळी काय भव्यता असेल या वातावरणात. आणि मग असंही वाटलं की जुन्या काळी कदाचित माझ्यासारख्या सामान्य माणसांना (त्यातही स्त्रियांना) दिवसाढवळ्या इथं निवांत येऊन बसण्याची चैनही कदाचित करता आली नसती. असो. हा जर-तरचा विचार बिनकामाचा आहे.
पुष्करिणीतल्या
मंडपासमोर आता दत्ताचं मंदिर आहे. या दत्ताला दहा हात आहेत असं कळलं. या मंडपातील खांबांवर सुंदर कोरीवकाम दिसतं. या कोरीवकामात काही कामशिल्पंही दिसली.
छतावरची नक्षीही सुंदर
आहे. आता इथं नंदी नाही, पण पूर्वी या मंडपात नंदी असावा. आणि आता जिथं दत्तमंदिर
आहे तिथं शिवमंदिर असावं – आणि कदाचित शिवमंदिराच्या पूर्वी विष्णूचं मंदिर होतं
की काय असा एक प्रश्न मनात आला. इथं जात्यासारखा एक मोठा दगड दिसला. ते जातं वगैरे नसून चुन्याच्या घाणीचा एक भाग होता असं अभिजित घोरपडे यांनी सांगितलं. त्याविषयी अधिक पुढच्या भागात पाहू.
परतीच्या
वाटेवर सोमेश्वर मंदिराला आम्ही भेट दिली ती इथले 'वीरगळ' पाहण्यासाठी.
देवळाच्या
नामफलकावर विर्घळ असा शब्द दिसतो खरा, पण ते वीरगळ आहे. मराठी विश्वकोश
प्रथमावृत्तीनुसार “युद्धभूमीवर
अथवा कोणत्याही संग्रामात वीरगती पावलेल्या माणसाच्या स्मरणार्थ उभारलेला
वैशिष्ट्यपूर्ण दगड म्हणजे 'वीरगळ' होय. 'वीराचा दगड' ह्या अर्थाच्या 'वीर-कल' ह्या कन्नड शब्दावरून 'वीरगळ' हा शब्द
आलेला आहे. वीरगळाला 'वीराचा दगड' किंवा केवळ 'वीर' म्हणूनही
संबोधतात. 'वीरगळां' चा उगम कर्नाटकात झाला, असे दिसते.” इथली महत्त्वाची
गोष्ट म्हणजे या एकाच मंदिरात अदमासे चौदा-पंधरा वीरगळ आहेत. लढाईचे विविध प्रसंग
या वीरगळांवरती कोरलेले आहेत. हे वीरगळ जमिनीत पक्के रोवलेले आहेत. किती खोल आहेत, ते मला माहिती नाही.
सुप्याजवळच्या
शिवकालीन पाणपोयीच्या दिशेने मग आम्ही निघालो तेव्हा मनात अनेक नवे प्रश्न होते. इतिहासातल्या या दालनांकडं आजवर कधी पाहिलं नव्हतं, आता त्यातली जादू कळायला लागली आहे. अर्थातच त्या त्या काळचा सामाजिक-सांस्कृतिक संदर्भ नीट समजून घेतल्याविना केवळ वास्तुतून इतिहास समजत नाही. पण वास्तू, प्रतीकं, स्मारकं आपल्याला दिशा दाखवतात. शेवटी वाट कुठलीही असो, ती आपली आपल्यालाच चालावी लागते.
(क्रमश:)
छान माहिती. जिना असलेला पाणीसाठा हे राजस्थान हैदराबाद इथेही आहे.
ReplyDeleteराजस्थान आणि हैद्राबादला जायला हवं आता, माहितीसाठी आभार.
Deleteदोन्ही भाग अतिशय आवडले. डोळ्यासमोर चित्र उभी राहिली. आणि हे मुद्दाम जाऊन बघायला हवं असंही आता वाटतंय. बघूया कधी योग येतोय
ReplyDeleteभवतालची लिंक दिली आहे सुरूवातीला. त्यावरून पुढच्या भेटीबाबत माहिती मिळेल.
Deleteनेहमीप्रमाणे सहज आणि छान लिहिले आहे
ReplyDeleteधन्यवाद.
Deleteही सफरही छान झाली......
ReplyDeleteधन्यवाद. तुमचा एकच प्रतिसाद (चुकून) दोन वेळा प्रकाशित झालेला दिसतो आहे. त्यामुळे एक काढून टाकते आहे.
Deleteछान चालू आहे ही लेखमालिका.
ReplyDeleteधन्यवाद.
Delete'गाभारा बंद होता' हे वाक्य तीन वेळा आलं आहे. :-)
ReplyDeleteसही पकडे हो :-) दुरूस्ती केली, धन्यवाद.
Deleteपुढच्या भागाची (की भागांची) उत्सुकता वाढली आहे.
ReplyDeleteधन्यवाद. अजून बहुधा दोन भाग होतील असं वाटतंय, कधी लिहून होतील ते मात्र सांगता येत नाही.
Deleteमला थोडा गोंधळ वाटतो आहे . पेशवा तलाव म्हणजेच बादशहा तलाव का ? आणि मस्तानी तलाव वेगळा , सासवडला जाताना लागतो तो?
ReplyDeleteमस्तानी तलावाबाबत तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. बादशहा तलाव मला माहितीही नव्हता. थोडी शोधाशोध केल्यावर ही माहिती समजली : बादशहा तलाव हे नारायणगाव-जुन्नर मार्गावरचं एक गाव आहे. तिथं (अर्थातच) एक तलाव आहे. या तलावाजवळ बादशहाच्या सैन्याचे तळ लावले जात म्हणून या तलावाला (आणि गावाला) हे नाव पडलं आहे. मी या ठिकाणी कधी गेलेले नाही.
Delete