ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६

Thursday, June 30, 2011

७८. त्रिपुरामय: भाग १

“म्हणजे तुम्ही ब्राह्मण का?” आकस्मिकपणे त्या तरुणाने मला प्रश्न विचारला. माझ वजन पुरेसं नसत तर हा प्रश्न ऐकून मी उडालेच असते.

नाही, म्हणजे हा प्रश्न काही नवा नाही – तो अनेकदा विचारला जातो. आपल्या समाजात अजूनही ‘जात’ ही एक मोठी ओळख आहे. पण या ठिकाणी हा प्रश्न आणि तोही शुद्ध मराठीत ऐकून मी चकित झाले. म्हणजे मी होते आगरताळा शहरात. एका प्रशिक्षण कार्यक्रमात. सुरुवातीला माझी ओळख करून दिली होती संयोजकांनी सर्वांना. त्यात नावासह आडनावही सांगितलं होत त्यानी माझ. मधली चहाची सुट्टी म्हणजे अनौपचारिक गप्पांची सोय. त्यात हा तिशीचा एक माणूस येऊन मला हा प्रश्न विचारत होता. त्याच्या चेह-यावरून तो स्थानिक वाटत होता – म्हणजे तो काही त्रिपुरात स्थायिक झालेला मराठी तरुण नव्हता.

त्यामुळे ‘मी जात मानत नाही’ असे उत्तर देऊन लगेच त्या तरुणाला तुम्ही कस काय मराठी बोलताय?” अस न राहवून विचारल.

तो तरुण हसला. तो म्हणाला, “बरेच मराठी लोक जात मानत नाहीत म्हणतात; पण महाराष्ट्रातही जातीवाद आहेच.” पुढे त्याने सांगितलं की त्याने औरंगाबादमधून बी. टेक. केल आणि दोन वर्ष मुंबईत नोकरी केली. सात वर्ष महाराष्ट्रात राहिल्यामुळे त्याला मराठी चांगली येते. खूप दिवसानी तो कोणाशीतरी मराठी बोलू शकत होता म्हणून खूष होता. पुढचे दोन दिवस मग मी त्याला त्रिपुराबाबत काहीबाही विचारत राहिले – मराठीत!

खर तर पंधरा दिवसांपूर्वी मला त्रिपुराबाबत दोनच गोष्टी माहीत होत्या; एक म्हणजे ते भारतातले एक राज्य आहे आणि दुसरे म्हणजे आगरताळा ही त्याची राजधानी आहे. शाळेत भूगोलाच्या शिक्षकांनी घोटून घेतलं असणार ते चांगल म्हणून लक्षात राहिलं! आगरताळाचं तिकीट माझ्या हातात आलं तेव्हा मी घाईघाईने विकिपीडियावर नजर टाकली आणि त्रिपुराबाबात थोड वाचल. आजकाल मी विकिपीडियाचा फारच आधार घ्यायला लागलेय – एका नव्या ग्रंथप्रामाण्याची मी शिकार तर बनत नाही ना – अशी माझी मलाच शंका येते कधीकधी.

तशीही मी फार माहिती गोळा करायच्या कधी फंदात पडत नाही. सामान्य ज्ञानाच्या सर्व चाचण्यांत मी नक्की नापास होईन. एक तर आजकाल इतकी माहिती असते भोवताली की माहिती घेणे कधी संपत नाही आणि ‘मला हा विषय माहिती आहे’ असे धडपणे कधी म्हणता येत नाही. शिवाय पुस्तके, वेबसाईट, वृत्तपत्रे आणि मुख्य म्हणजे माणसं – असे माहितीचे स्रोत असतात आसपास. आपले अज्ञान इतरांना कळण्याची लाज वाटली नाही की भरपूर माहिती मिळते पाहिजे तेव्हा. अनुभवाने मला हेही माहिती आहे की अखेर कोणतीही माहिती ही एका प्रकारे वस्तुस्थितीचा लावलेला अर्थ असतो. माहिती गोळा करणा-या व्यक्तीचे पूर्वग्रह, अपेक्षा आणि माहिती गोळा करण्याचे पद्धत यावरून हाती येणा-या माहितीचे स्वरूप ठरते. आणि हाती आलेल्या माहितीचा अर्थ कसा लावायचा आणि तिचा उपयोग कसा करायचा हेही ठरवणारे पुन्हा आपणच असतो! असो.

‘त्रिपुराची लोकसख्या किती आहे’ अशी आमची चर्चा चालू असताना एकाने ३६ लाख अस सांगितलं. जनगणनेत काम केलेल्या त्याच्या सहका-याने लगेच दुरुस्ती केली ‘ खर म्हणजे ती ३,६७१,०३२ आहे’ (ती ३२ की २३ यावर पण त्यांची चर्चा झाली!) त्या माणसाच्या माहितीची अचूकता, त्याचा उत्साह, त्याची कार्यक्षमता यांनी मी प्रभावित झाले. पण निदान त्या क्षणी तरी ७१,०३२चा फरक माझ्यासाठी महत्त्वाचा नव्हता. त्रिपुराची लोकसंख्या साधारणपणे पुण्याइतकी आहे इतका अंदाज मला पुरेसा होता.

एक आठवडाभर आगरताळा शहरात राहिल्यावर आणि आठ गावांत जाऊन आल्यावर त्रिपुराबद्दलचे माझे ज्ञान वाढले नक्कीच आहे. आता मला माहिती आहे की त्रिपुरामध्ये चार जिल्हे आहेत – कारण त्या चारही जिल्ह्यातल्या लोकांना मी भेटले आहे. त्रिपुराच्या सीमा तीन दिशांनी बांगला देशाला भिडतात हे आता मला माहिती आहे – कारण त्या सीमारेषेवर मी काही वेळा प्रत्यक्ष होते. बांग्ला आणि कोक्बोरोक (Kokborok) या दोन भाषा त्रिपुराच्या अधिकृत भाषा आहेत हे मला माहिती आहे – कारण त्या भाषांतले अधिकृत फलक मी पाहिले आहेत. स्वातंत्र्यापूर्वी त्रिपुरा एक संस्थान होते हे आता मला कळले – कारण त्या काळच्या राजाचा महाल मी पाहिला – तिथे अनेक वर्षे विधानसभा भरत असे. त्रिपुरात अजूनही मंदिरांत पशुबळी दिला जातो – कारण पशुबळी देण्याची जागाही मी मंदिरांत पाहिली.

अर्थात मी आधी म्हटल तसं माहिती ही नेहमी अपुरीच असते. त्रिपुराबद्दल मला जितक माहिती आहे त्याहून कैक पटींनी माहिती नाही! पण माझ्या मनावर त्रिपुराची शेकडो, हजारो क्षणचित्र कोरली गेली आहेत गेल्या आठ दिवसांत.

पहिल्या संध्याकाळी मी एकटीच आगरताळा शहरात भटकले. चालताना मला नेहमी मजा येते – कोणतीही जागा वेगळ्या कोनातून दिसते, सगळ जणू सावकाश उलगडत जात! हवा चांगली होती आणि रविवारची संध्याकाळ असल्याने रस्त्यावर वाहनांची वर्दळ नव्हती. या शहरात पहिल्यांदाच आलेले असूनही शहर मला ओळखीच वाटलं. चढ-उतारावरचे रस्ते, नदीवरचे पूल, तळी .. अस एकंदर रम्य दृश्य होत. चढण-उतार पाहताना मला धारवाड शहराची आठवण आली आणि गम्मत वाटली. धारवाडला मी आजवर एकदाच गेले आहे तरीही ते शहर अस स्मरणात राहिल आहे तर!
दुस-या दिवशी जाग आली तेव्हा लख्ख उजाडलं होत. मला वाटलं सात तरी वाजले असतील. भिंतीवरच्या घड्याळात पाच वाजून सात मिनिट झालेली दिसत होती. हे घड्याळ बंद पडलेलं दिसतय असा विचार मी करत होते तेवढ्यात मला एकदम आठवल की मी नॉर्थ-ईस्ट भागात आहे. इथे सूर्य लवकर येतो. पुढचे काही दिवस मी पहाटे चार साडेचारच्या प्रकाशाचा आनंद घेतला.

अर्थात सूर्य लवकर उगवतो म्हणून लोक कार्यक्रमाला वेळेवर येतात अस काही नाही – ते उशीरा येतात आणि त्यांना उशीर का झाला याची अनेक कारण असतात. लोक लवकर जातात आणि त्याचीही असंख्य कारण असतात! भारतात बाकी कितीही वैविध्य असू दे, एवढ्या बाबतीत मात्र ‘हम सब एक है’ अस म्हणता येत!

त्रिपुरात माझी बांग्ला भाषेची हौस भागली. (बंगाली ‘लोक’ आहेत आणि बांग्ला ‘भाषा’ आहे असा फरक एकाने मला ठणकावून सांगितला तिथ!) या भाषेच – मला ती येत नसली तरी – मला वेड आहे. इथे मी भरपूर बांग्ला ऐकल – व्यवहाराची भाषा तीच आहे इथे. जाता येता रस्त्यावरच्या पाट्या वाचल्या – आणि त्या पुष्कळशा बरोबर वाचायला शिकले मी! ‘तोमार नाम की?’ (तुमचे नाव काय?), ‘ आमि बांग्ला अल्प बुझे तो पारी, बोलते पारी ना’ (मला बांग्ला थोड समजत, बोलता मात्र येत नाही) अशी ‘जीवनावश्यक’ वाक्य मी शिकून घेतली. त्यातला उच्चार महत्त्वाचा. म्हणजे ‘पंचायत समिती’ हे बांग्ला भाषेत ‘पोन्चायोत शोमिती’ अस म्हणायचं! माझ्या भाषेच्या हौसेपायी आणि त्यात मी करत असलेल्या चुकांमुळे भोवतालच्या लोकांना भरपूर हसायची संधी मिळाली. शाळेत मी संस्कृत कधी शिकले नाही. पण एक समजल की बांग्ला भाषेत संस्कृतच्या जवळचे अनेक शब्द आहेत. त्यामुळे अनेक शब्दांचा मी अंदाजाने लावलेला अर्थ बरोबर निघे. शिवाय ज्या विषयावर चर्चा चालू होती तो विकसित करणा-या टीमची मी एक सदस्य आहे. त्यामुळे काय बोललं जातय त्याचा संदर्भ मला माहिती होता. अनेकदा कोणीतरी बांग्लामध्ये विचारलेल्या प्रश्नाच मी थेट (अर्थात हिंदीत) उत्तर देऊ शकले. “तुम्ही महिनाभर इथ रहा म्हणजे बांग्ला एकदम छान शिकाल” अस प्रमाणपत्रही लोकांनी मला दिल! त्यात प्रोत्साहनाचा भाग जास्त होता हे मला समजत. नवी भाषा शिकण तितक सोप नसत!

उत्तर, दक्षिण आणि पश्चिम अशा तीनही बाजूंनी त्रिपुरा बांगला देशाने वेढला आहे. आगरताळाकडून मिझोराम आणि असमकडे नेणारा राष्ट्रीय महामार्ग ४४ हा एकमेव रस्ता आहे. या रस्त्यावर गोहातीकडे जाणा-या अनेक बसेस मला दिसल्या. आगरताळा ते गोहाती हा बसने सुमारे ३० तासांचा प्रवास आहे अस लोकांनी सांगितलं. आगरताळ्याच रेल्वे स्थानक सुंदर आहे. तिथून सिल्चर जंक्शनपर्यंत आणि पुढे गाड्या जातात. बांगला देशात जाणारी एक गाडीही मला लोकांनी दाखवली – ती कुठे जाते हे मी आता विसरून गेले. त्रिपुरा उर्वरित भारताशी फक्त एकाच दिशेने जोडलेल आहे हे त्या जमिनीवर उभ राहून लक्षात येण भीतीदायक होत.
मी पश्चिम त्रिपुरा जिल्ह्यात आठ गावांत गेले आणि मला एकूण जे दिसलं ते फारच आवडल. पहिले दोन दिवस फारच उकाडा होता. दहा वर्षांपूर्वी आगरताळामध्ये पंख्याचीही गरज नव्हती; आता मात्र एयर कन्डीशनर लागतो असे लोक सांगत होते. हे केवळ जागतिक पातळीवरच्या हवामान बदलामुळे (climate change) झाले असे म्हणता येणार नाही. १९७० नंतर त्रिपुरात मोठया प्रमाणावर रबराची लागवड होते आहे. बांबूला विस्थापित करून रबर जागा व्यापते आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना रबराचे मळे दिसतात; बांबू फक्त दुर्गम भागात दिसतो. मेलाघर परिसरात बांबू कारागिरांच्या एका फेडरेशनच्या सभासदांना भेटायची मला संधी मिळाली. ते सांगत होते की, ‘आधी एक पावरा बांबू दहा रुपयांना मिळायचा, आता त्यालाच एकशे ऐशी रुपये मोजावे लागतात.’ बांबू लागवडीची जमीन घटत चालली आहे हा त्यांच्या चिंतेचा विषय आहे. सगळा बांबू गेला तर आम्ही काय करायचं आणि काय खायचं असा त्यांच्यापुढे प्रश्न आहे.
त्रिपुरा आकाराने लहान असल तरी इथल्या बाजारात अनेक प्रकारची फळ आणि भाजीपाला दिसला. फणस (कठाल), अननस (ऑनोरश), केळी, आंबे भरपूर दिसले. लोक मासे भरपूर खातात – तो रोजच्या जेवणाचा अविभाज्य भाग आहे. सोबत कोंबडी आणि मटण असते. मिठाईही भरपूर. शाकाहारी माणसांना मात्र डाळ-भातावर राहावे लागते. त्यात गोड पदार्थ आवडत नसतील तर काय खायचे हा प्रश्न येतोच. हेझामारा गावातून येताना माझ्या गाडीचा चालक म्हणाला, “तुम्हाला जेवण आवडलं का इथल?” मी विचारल, “का, तुम्हाला नाही का आवडल?” त्यावर तो म्हणाला, “छे! या त्रिपुरी लोकांनी बनवलेल्या जेवणाला काही चव नसते. जेवण बनवाव तर बंगाली लोकांनीच!’ त्रिपुराचे स्थानिक लोक आणि आता पिढ्यान पिढ्या त्रिपुरात वास्तव्य करून असले तरी बंगालीपण जपणारे लोक यांच्यात एक प्रकारच तणाव आहे. ते अनेक बाबतींत एकमेकांपेक्षा वेगळे आहेत. इथे भाषिक आणि सांस्कृतिक वर्चस्वाचा मुद्दा आहे लोकांच्या मनात.

त्रिपुरा विधानसभा फार छोटी आहे – फक्त साठ सदस्यांची. फेब्रुवारी २००८ मध्ये इथे डाव्या आघाडीचे सरकार ४९ जागा जिंकून सत्तेवर आले आहे. गेली पंधरा वर्षे ही आघाडी सत्तेवर आहे. आता २०११ च्या निवडणुकीत केरळ आणि पश्चिम बंगाल मधली सत्ता गेल्यापासून डाव्या आघाडीचे हे एकमेव राज्य उरले आहे. रस्ताभर लाल झेंडे, अनेक ठिकाणी कोपरा सभा असे एकंदर आगरताळ्यात वातावरण होते – इथे २०१३ मध्ये निवडणुका होणार आहेत.

आगरताळा राजधानी आहे आणि तीन बाजूंना बांगला देश आहे त्यामुळे इथे सैन्यदलाचे अस्तित्व ठळकपणे नजरेस भरते. Border Security Force (BSF), Tripura State Rifles (TSR), and Assam Rifles (AR) अशा अनेकांचे भव्य परिसर आहेत. ताल्मुरीया गावातून येताना “For your tomorrow BRO is here” असा एक फलक मला दिसला तेव्हा BRO म्हणजे काय असा प्रश्न मला क्षणभर पडला. मग लक्षात आले की ही आहे Border Road Organization.

सीमारेषेचा मला आलेला अनुभव माझ्यासाठी फार महत्त्वाचा होता. त्याबद्दल नंतर कधीतरी – कदाचित पुढच्या पोस्टमध्ये!

त्रिपुरामय होण्याची ही केवळ एक सुरुवात आहे माझ्यासाठी!

Friday, June 24, 2011

७७. चंपावतच्या स्त्रिया: भाग २


त्यार्सोमध्ये नळान पिण्याच पाणी पुरवल जात. बर्फवृष्टीच्या काळात पाणी गोठत तेव्हा हे नळ बंद असतात. उन्हाळ्यात बर्फ वितळल्यामुळे इकडून तिकडून वाहणा-या झ-यांना पाणी असत.  परिसरातल्या कोणत्यातरी डोंगरात झरे वाहते आहेत इतकं स्त्रियांना पुरत! स्व्च्छ, शुद्ध, पिण्यायोग्य पाणी वगैरे कल्पनांनी त्यांच्या राज्यात अजून प्रवेश केलेला नाही.

आरोग्यविषयक चर्चेच्या ओघात कळलं की, इथे लोहाघाटमधून एक नर्सबाई येते. ती पण इतर      गावक-यांसारखी चालतच येते. “काही आजार झाला तर नर्सबाईला बोलावतो” अस स्त्रियांनी सांगितलं. “कसा निरोप देता त्यांना?” या माझ्या प्रश्नावर “टेलिफोनवरून” अस उत्तर आल्यावर मी चकितच झाले.

या परिसरात नुकत्याच दळणवळणाच्या काही सोयी झाल्या होत्या. त्यार्सोत एक टेलीफोन आला होता. एकदा ग्रामप्रधानाने (सरपंच) टेलीफोन वापरून नर्सबाईला निरोप दिला होता, ही वस्तुस्थिती. स्त्रियांनी काही अद्याप  टेलीफोन वापरला नाहीये. पण आकस्मिक आजारांवर उपचार मिळण्याची सोय झाली आहे ही आशा त्यांना वाटतेय.

माझ्या मनात अनेक प्रश्न उमटतात. टेलीफोन नेहमी चालू राहील का? – हा अनुभवातून आलेला प्रश्न. नर्सबाईला घरी जाऊन निरोप कोण देणार? आणि निरोप मिळाला तरी वादळवा-यात, थंडीच्या कडाक्यात, अपरात्री नर्सबाई इथवर कशी पोचणार? – पण हे प्रश्न मी विचारत नाही. सध्या तरी टेलीफोन ही त्या गावात आणि त्या स्त्रियांच्या आयुष्यात घडलेली क्रांतिकारक घटना आहे. या स्त्रियांना या टेलीफोनचा उपयोग व्हावा अशी सदिच्छा बाळगत मी परत फिरते.

संध्याकाळी सहा वाजता चौंडी गावात जायला निघालो तेव्हा सर्वत्र काळोखाच साम्राज्य पसरलं होत! लोहाघाटपासून हे गाव फक्त दोन किलोमीटरवर. चौंडीचे चार पाच तरुण लोहाघाटला दुकानांत काम करतात – ते आम्हाला घेऊन जायला आले होते. नदी ओलांडून आम्ही जंगलात प्रवेश केला तेव्हा त्या तरुणांनी सोबत आणलेले ढोल वाजवायला आणि मोठया आवाजात गाणी म्हणायला सुरुवात केली. चौकशी केल्यावर कळलं, त्या जंगलात वाघोबाचा वावर आहे. आधीच अंधार, त्यात जंगलातून जाणारी चिंचोळी चढण आणि त्यात वाघोबाच्या भीतीची भर!

तासाभराच्या चालण्यानंतर आम्ही ग्रामप्रधानाच्या घरी पोचलो. तिथ पंधरा वीस पुरुष जमले होते. स्त्रिया नव्हत्याच. संध्याकाळी सातची वेळ स्त्रियांना बैठकीसाठी कधीच सोयीची नसते. दिवसभरातील शेताच्या, लाकूडफाट्याच्या, चा-याच्या कामान दमलेल्या स्त्रियांना स्वैपाकाची गडबड होती. पुरुष साधारणपणे गावसभा याच वेळी ठेवतात आणि स्त्रियांचा सहभाग कमी असल्याची तक्रार करतात.

ग्रामप्रधानाने चर्चेत पुढाकार घेतला. बैठकीत मी असल्यामुळे असेल कदाचित्, पण स्त्रियांच्या अडचणीचा विषय निघाला. गावाच्या भोवतालच जंगल वन खात्याच्या ताब्यात आहे. जनावरांसाठी चारा आणण हे इथे स्त्रियांच काम आहे. पावसाळा आणि हिवाळ्याच्या जवळजवळ सहा महिन्यांच्या चा-याची तरतूद स्त्रियांना करावी लागते. शिवाय जळणासाठी लाकडाची व्यवस्था पण! वन खात जंगलातल काही तोडू देत नाही. चारा आणि जळणासाठी चार महिने स्त्रियांना फार वणवण करावी लागते.

एक पुरुष म्हणाला, “बाया चार महिने चा-यासाठी इतक्या घराबाहेर असतात, की आम्हाला वेळेवर जेवणखाण पण मिळत नाही. लहान लेकरांचे हाल तर विचारू नका.” जणू काही स्त्रियांबद्दल फार उदार चर्चा चालली आहे अशा थाटात दुस-याने पुस्ती जोडली, “ ताई, बायांना या काळात इतक काम असत, की आम्हाला बरेच दिवस न धुतलेले कपडे घालावे लागतात. “ त्यावर सगळ्या पुरुषांनी माना डोलावल्या.

मी थक्क झाले. रागही आला मला. हे पुरुष स्वत:ला काय समजतात? बायांच्या कष्टची इतकी कदर आहे तर स्वत: जेवण का नाही बनवत? स्वत: लेकरांची काळजी का नाही घेत? स्वत: थोडा चारा का नाही गोळा करत? निदान स्वत:चे कपडे स्वत: का नाही धूत? – माझ्या या प्रश्नांवर सगळे पुरुष हसले. ग्राम प्रधान समजावणीच्या स्वरांत म्हणाला, “ही बायांची काम आहेत – पुरुष कशी करणार?”

त्या बैठकीत गावातली एक जरी बाई असती तरी चर्चेला वेगळ वळण मिळालं असत याची मला खात्री आहे. कधीतरी गावातल्या स्त्रियाच या असंवेदनशीलतेच्या विरोधात उभ्या ठाकतील याचीही मला खात्री आहे.

दीड तासाची अत्यंत कठीण चढण चढून आम्ही दुस-या दिवशी सकाळी फोर्तीला पोचलो. रामलीलेसाठी उभारलेल्या मंडपात सुमारे पन्नास स्त्रिया आणि वीस पुरुष होते. बोलण्याचे काम पुरुषच करत होते. अर्ध्या तासानंतर त्यांना गप्प बसवण्यात मला यश आलं. पुढचा काही काळ स्त्रियाना बोलत करण्यात गेला. स्त्रिया बोलायला लागल्यावर हळूहळू पुरुष उठून गेले आणि मग त्या मोकळेपणाने बोलल्या. अगदी आरोग्यविषयक बाबींवर पण आमची चर्चा झाली.

बैठक संपल्यावर तिशीतली एक स्त्री तावातावाने ग्रामप्रधानाशी बोलू लागली. स्थानिक भाषा कळत नसल्यान मला त्या संवादाचा पूर्ण अर्थ लागत नव्हता; पण ती स्त्री रागावली आहे हे सहज कळत होत. काय झालं अशी मी चौकशी केली असता, गावातील पुरुषांनी आणि माझ्या सहका-यांनी (तेही पुरुषच होते!) ‘काही विशेष नाही’ अशा थाटाची उडवाउडवीची उत्तर दिली.

मी त्या स्त्रीच्या जवळ जाऊन उभी राहिले. मला पाहताच ती दिलगिरीच्या स्वरांत म्हणाली, “माफ कीजिये दीदी, हम इनसे यह पूछ रहे है कि, सुबह के समय ये मीटिंग क्यो रखी गयी? औरंतों के काम का वक्त है यह! पुरुष थोडा ही घर का काम करनेवाले है? आप भी हमारी जैसी औरत है, इसलिये हम मीटिंग के लिये आये! अगली बार हमसे सलाहमशवीरा किये बिना मीटिंग रखी तो औरते नाही आयेगी यही मै प्रधानजी को बता राही हू .. आप ही बताईये दीदी मैने कुछ गलत कहा क्या?”

चंपावतच्या त्या स्त्रियांचे चेहरे मला अजून आठवतात. त्या स्त्रियांना प्रतिकूल परिस्थितीत आनंदान जगण्याची कला साध्य झाली होती. आपली वाट संघर्षाची आहे हे त्यांनी जाणलेलं होत. हा संघर्ष निसर्गाशी तर आहेच पण त्यांना दुय्यम लेखणा-या माणसांशी आणि व्यवस्थेशी पण आहे. कष्टांनां त्या घाबरत नाहीत पण विषमता त्यांना बोचते. त्या स्त्रियांना भेटून जगण्याची एक नवी ताकद मला मिळाली. जीवनाकडे कस सकारात्मक दृष्टीकोनातून पाहाव हे त्यांनी मला शिकवलं.

इतक्या वर्षानंतर  या स्त्रियांच्या घरात मोबाईल आले ही चांगली गोष्ट आहे. पण त्या पाणी मात्र अजून झ-याचे पितात. अजूनही शुद्ध, स्वच्छ पाणी त्यांच्या दुनियेत पोचले नाही.

विकासाचे आपले मॉडेल चुकीचे तर नाही ना अशी माझी शंका दिवसेंदिवस बळावत चालली आहे. 

Thursday, June 16, 2011

७६. चंपावतच्या स्त्रिया: भाग १


काही दिवसांपूर्वी उत्तराखंडमधून माझ्यापर्यंत आलेली माहिती वाचत होते. तिथल्या स्त्रियांबरोबर काम करणा-या संस्थेने काही स्त्रियांची माहिती पाठवली होती. त्यातल्या निम्म्यापेक्षा जास्त स्त्रियांनी पाण्याचा स्रोत झरा अस लिहील होत आणि निम्म्याहून अधिक घरांत मोबाईल मात्र होता. ती माहिती वाचताना मला उत्तराखंडच्या माझ्या खूप जुन्या भेटीची आठवण झाली.

*******
(हे चित्र बरच जुन आहे - आज काय आहे तिथली परिस्थिती ते माहिती नाही.)

चंपावतला जाण्याची संधी अचानक समोर आली तेव्हा मी क्षणभर चकित झाले. तोवर का कोण जाणे पण चंपावत हा महाभारत काळातील प्रदेश आहे आणि त्यामुळे तो सध्या अस्तित्वात नाही अस मला वाटत होत. चंपावतला जाण्याचा मार्ग निश्चित करताना नकाशा पाहणे आणि रेल्वेचे वेळापत्रक वाचणे हे दोन्ही छंद मी ब-यापैकी पुरे करून घेतले.

पुणे-मुंबई प्रवास किरकोळ होता. मग पुढे लखनौपर्यंतचा रेल्वे प्रवास. लखनौ स्थानकात काही वेळ इकडे तिकडे काढून नैनिताल एक्स्प्रेसने मी लालकुवा गावात पोचले. हा सगळा प्रवास तसा नेहमीसारखाच होता. माणसं, निसर्ग, संवाद .. दर टप्प्यावर थोड थोड बदलत गेल. पण लालकुवाहून टणकपूरला जाताना मात्र मी पूर्ण जागी झाले.

टणकपूर ते लोहाघाट प्रवास म्हणजे मौज होती. एका बाजूला नजर पोचणार नाही इतकी खोल दरी तर दुस-या बाजूने आकाशाला गवसणी घालणारे पहाड. या पहाडांवरच्या प्रचंड शिळा कोणत्याही क्षणी आपले स्थान सोडून मैदानावर उडी घेण्याच्या पवित्र्यात दिसत होत्या. जगण आणि मरण यात क्षणाचाही अंतर असत नाही याची सतत जाणीव करून देणारा हा रौद्र आणि तरीही सुंदर निसर्ग! हिमालयाच्या अंगाखांदयावर वावरताना माझ्या मनात नेहमीच कृतज्ञता आणि समाधान असत.

लोहाघाटला पोचले तेव्हा सभोवताली अंधार दाटला होता. अंधारात एखाद्या गावात पहिल्यांदाच प्रवेश करताना गावाचा काही अंदाजच येत नाही. दिवसाच्या उजेडात लोहाघाटचे दर्शन होईपर्यंत मी अस्वस्थ होते; रात्री नीट झोपही आली नाही. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातल्या दमदार थंडीतही त्यामुळे मी दुस-या दिवशी पहाटेच जागी होते.

त्या सकाळी हिमालयाच्या बर्फाच्छादित शिखरांच अत्यंत विलोभनीय दर्शन झालं. पुढचे दोन चार दिवस आसपासच्या गावांमध्ये भटकताना त्या झळाळत्या शिखरांनी सतत सोबत केली. आम्ही डोंगर उतरत असलो की काही काळ ती दिसेनाशी व्हायची. डोंगर चढून पुढच्या वस्तीत पोचताना लपंडाव खेळत असल्यासारखी ती सोनेरी शिखर पुन्हा दिसायची. ती इतक्या जवळ होती की थोडा हात लांब केला तर मी त्यांना स्पर्श करू शकेन अस मला वाटत होत!! पण त्या शिखरांच्या प्रसन्न आत्ममग्नतेला दुसर काही स्पर्श करू शकणार नाही असही कळत होत. त्यांच्या प्रसन्नतेला आमचा वावर लिप्त करू शकत नव्हता. त्या नीरव शांतेतेन मला एकदम उत्साही आणि आनंदी बनवल!

आमच्या संस्थेने ‘स्त्रियांचे आरोग्य आणि सबलीकरण’ अस मुख्य सूत्र असलेला एक कार्यक्रम हाती घेतला होता. लोहाघाट परिसरात हा कार्यक्रम घेण्याची गरज आहे का, आणि असल्यास नेमक काय करावं याचा अंदाज घेण्यासाठी मी इथे आले होते. आमच्या स्थानिक कार्यकर्त्यानी चार गावच्या भेटींचा कार्यक्रम आखला होता.

प्रत्येक गाव म्हणजे काही काळ जीवघेण्या घाटातून मोटरसायकलचा प्रवास (मी अर्थातच मागे बसून) आणि मग रस्ता संपला की एक दोन डोंगर पायी चढून जाणे. प्रत्येक डोंगर चढताना आता हृदय फुटेल की काय अशी शंका येण्याइतपत दमछाक होत होती. पण गम्मत म्हणजे एकदा डोंगरावर पोचलं की क्षणार्धात थकवा पळून जायचा. मग गावातील स्त्री-पुरुषांसमवेत चर्चा, गप्पा. तसाच परतीचा प्रवास. डोंगर उतरताना पाय लटपटायचे आणि वाटायचं की डोंगर चढण परवडल पण हे उतरण नको! तुलनेत सुख शोधण्याची माझ्या मनाची लगबग मला लोहाघाटने एकदम अधोरेखित करून दाखवली!

टपनीपालचा दुसरा डोंगर चढून जाताना मधेच मी श्वास घ्यायला थांबले. खूप दूरवर चाळीशीची एक स्त्री डोक्यावर मोठा भारा घेऊन येताना दिसली. जे अंतर तोडायला मला अर्धा तास लागला होता, ते अंतर त्या स्त्रीने डोक्यावरच्या ओझ्यासह दहा मिनिटांत तोडल! टपनीपालमध्ये एकही दुकान नव्हत तेव्हा! सहा किलोमीटर अंतरावरच्या खेतीखानमधून ती स्त्री घरासाठीच आवश्यक सामान घेऊन आली होती. “एवढ अंतर तुम्ही चालत आलात?” या माझ्या आश्चर्यचकित प्रश्नावर “डोंगरातून मधन आलं की तेवढ लांब नाही ते ...” अशी तिन माझी समजूत घातली.

उन्हाळा, पावसाळा, हिवाळा ऋतु कोणताही असो; टपनीपालच्या सर्व स्त्रिया खेतीखानमधून असच सामान आणतात. नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात हा भाग बर्फमय होतो. पावसाळ्यात डोंगराचे कडे खचून खाली येतात आणि अनेकदा रस्ते नाहीसेच होतात. तरीसुद्धा इथल्या स्त्रिया आनंदान, हसतमुखान हा प्रवास करताना दिसतात. त्याविना त्यांना गत्यंतर नाही आणि तक्रार करण हा त्यांचा स्वभाव नाही.

तिथल्या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाल्यावर मी हळूच दुकानाचा विषय काढला. गावासाठी रेशन दुकानाची मागणी करावी अस स्त्रियांना वाटत होत; पण त्यावर पुरुषांची प्रतिक्रिया वेगळीच होती. ‘खेतीखानच्या दुकानात रेशन दुकानापेक्षा स्वस्त मिळत, वेळप्रसंगी उधार मिळत – मग कशाला हव गावात रेशन दुकान?” असा त्यांचा युक्तिवाद होता. पुरुष बोलण्यात कितीही हुशार असले तरी प्रत्यक्षात ते फार कमी वेळा खेतीखानला जाऊन सामान आणतात – हे त्यांनीही कबूल केल! “क्वचित कधी वेळ आली त्यांच्यावर तिथ जायची तर ते सामान वाहण्यासाठी सोबत खेचर घेऊन जातात” अशी पुस्ती स्त्रियांनी जोडल्यावर पुरुषांचा त्या विषयावरचा अभिनिवेश काही काळ तरी ओसरला.

उत्तर प्रदेश सरकारन (तेव्हा हे अजून स्वतंत्र राज्य झालं नव्हत) गावोगाव दारूची दुकान उघडण्याचे परवाने दिले तेव्हा इथल्या स्त्रिया त्याच्या विरोधात उभ्या राहिल्या. मुळात गावातले पुरुष फारसं काही काम करत नाहीत – ठेकेदार, जंगल खात यांच्याकडे कधी काही काम असल आणि त्यांची मर्जी असली तर काम करतात. घरातल्या आणि शेतातल्या कामांची जबाबदारी स्त्रिया सांभाळतात. पुरुष दारू पिऊन पैशांची नासाडी करतात, प्रकृती बिघडवतात आणि वातावरणही खराब करतात असा स्त्रियांचा अनुभव. म्हणून या स्त्रियांनी दारू दुकानाच्या परवान्यांना विरोध केला. राष्ट्रीय महामार्गावर चार दिवस ठिय्या देऊन तो बंद पाडला. स्त्रियांच्या ताकदीपुढ नमत घेऊन सरकारला आपला निर्णय माग घ्यावा लागला. एकजुटीतून नुकत्याच मिळालेल्या या यशाच स्त्रियांना फार अप्रूप वाटत होत!

(लेख फार मोठा होतोय म्हणून इथे थांबते, बाकी पुढच्या भागात ...)

Thursday, June 9, 2011

७५. अनोळखी


शिबिराची पहिली संध्याकाळ. डोंगर चढून दमून येणारी पण प्रफुल्लित चेह-याची तरुण मुल आणि मुली. त्यांच स्वागत तितक्याच उत्साहाने करणारी महेश, स्वाती, रंजना, प्रकाश वगैरे कार्यकर्ती मंडळी! तूर्त माझ्याकडे कोणतचं काम नसल्याने मी निसर्गास्वाद घेत निवांत....

तेवढयात रंजना चिंताक्रांत चेहरा घेऊन आली. सहसा ती अशी नसते कायम हसतमुख असते म्हणून मी जरा विचारांत पडले. ती मुलगी आहे ना, ह, तीच निळा शर्ट आणि जीन्स घातलेली ..: रंजनाने सुरुवात केली. ती मुलगी तर मला एकदम आवडली. काय झालं तिचं? मी रंजनाला विचारलं! अग, तिन आधी नाव नोंदवलेल नाही, तशीच आलीय आणि आता ती अर्ज भरून देणार नाही म्हणतेय जरा बघतेस का? रंजनाला खरचं टेन्शन आलं होत!

आता आठ दिवसांच हे निवासी शिबिर. कोणी आजारी पडल, काही अडचण आली तर घरचा पत्ता हवाच की सगळ्यांचा. कधी कधी पोलिस पण येतात विचारायला. आपल्या बाजूने आपण सगळ व्यवस्थित ठेवायला पाहिजे. ही मुलगी ठीकठाक दिसत होती म्हणजे तिच्या चेह-यावरून तरी सगळ काही नॉर्मल आहे अस वाटत होत. मग काय असेल नेमक?

ती मुलगी माझ्याकडे आली. मी तिला बसायला सांगितल. मी काही विचारण्याची वाट न पाहताच ती म्हणाली, मी ललिता. पण यापलिकडे मला काहीच सांगायचं नाही. माझ्याकडे पैसे आहेत शिबिराची फी भरायला. मला यायचं आहे या शिबिरात. तुम्ही प्लीज मला नाही म्हणू नका..... तिच्या स्वरांत प्रामाणिकपणा होता, एक प्रकारचा ठाम निश्चय होता. इतकी शिबिरं आजवर मी घेतलीत, पण अशी विनंती कोणी कधी केली नव्हती.

मी क्षणभर विचार केला. मी सहसा कोणावर अविश्वास दाखवत नाही. शिवाय ही मुलगी काही अगदी लहान नव्हती स्वत:चं भलंबुरं समजण्याइतकी मोठी होती. ती जे बोलत होती त्यामागे काहीतरी कारण असणार पण ते ती सांगणार नाही. काही माणस पत्ता लागू देत नाहीत त्यांच्या अडचणींचा ही त्यातली दिसत होती. मी म्हटल, ठीक आहे, काही हरकत नाही. माझा विश्वास आहे तुझ्यावर. फक्त मला एक सांग तुझी इच्छा असली तर सांग तू काही अडचणीत तर नाहीस? काही मदत हवी आहे? आम्ही काही करू शकतो का?

माझ्या प्रश्नावर ती स्वच्छ हसली. म्हणाली, तुम्हाला मोकळेपणाने सांगायला हरकत नाही माझी. मला ओळखी करून घ्यायचा फार कंटाळा आलाय. माझ आडनाव, माझे आई वडील, माझ कॉलेज .. ही माझी ओळख कशी काय असू शकते? ते सगळ समोरच्यानं विचारायचं आणि मी सांगायचं आणि मग आम्ही एकमेकाना ओळखतो अस म्हणायचं हे मला फार औपचारिक आणि विनोदी वाटत. इतकी वर्ष तेच तर केलं. आता जरा अनोळखी लोकांमध्ये राहायचा अनुभव मिळवण्यासाठी इथे आलेय.

मला तिचा विचार आवडला. मी तिला सांगितलं, ठीक आहे. मी बघते काय करायचं त्या अर्जाच ते. पण काहीही अडचण आली तर आम्ही आहोत इथे आम्ही सगळे तुझे हितचिंतक आहोत हे विसरू नकोस. इतक्या कमी वेळात मला तिची बाजू पटेल अस तिला वाटलं नव्हत बहुतेक. एक क्षण ती नुसतीच उभी राहिली. मग भानावर येत हसून म्हणाली, माझ्यामुळे तुम्हाला काहीही त्रास होणार नाही याची खात्री बाळगा.

रात्रीची कार्यकर्ता बैठक अपेक्षेप्रमाणे या मुद्द्यावर आलीच. एका मुलीला तिचं आडनाव, शिक्षण, पत्ता असल्या माहितीविना मी शिबिरात प्रवेश द्यायला सांगितला हे कोणालाच आवडलं नव्हत. खर तर हा माझा मूर्खपणा होता अस इतरांना वाटत होत. पण तोंडावर टीका करायची आपली पद्धत नाही – म्हणून ते सगळे मला “तू फार भोळी आहेस, असा भाबडेपणा उपयोगाचा नाही, आपण कठोर निर्णय वेळीच घ्यायला पाहिजेत..” अस काहीबाही म्हणत होते. “ललिता एक नवा प्रयोग करू पाहतेय” या माझ्या स्पष्टीकरणावर तर सगळे मस्त हसले.

माणसांना कधीकधी एकमेकाची भाषा समजत नाही हे मला अनुभवाने माहिती होतं – इथ अर्थातच मी विचारांबद्दल, दृष्टीकोनाबद्दल बोलतेय! त्या सगळ्यांना समजेल अशा भाषेत मग मी म्हटलं, “एका तरुण मुलीला रात्री तर आपण इथून जायला सांगू नये हे तुम्हाला पटेल. कोठेतरी जाण्यापेक्षा आपल्याजवळ सुरक्षित राहिल ती. आणि आठ दिवस आहे शिबिर – त्या अवधीत तिची ओळख होईलच! काही संशयास्पद वाटलं तर आपण पोलिसांना कळवू – पण उगीच घाई करू नका. तरुण मुला मुलींची मन वेगळ्या पद्धतीने चालतात – आपण तेही जरा समजून घेतलं पाहिजे.” आमच्या गटातल्या सगळ्यात ज्येष्ठ आणि अनुभवी जाधव काकांनी पण हा मुद्दा उचलून धरला आणि चर्चा एकदाची थांबली.

ललिताने पुढच्या आठ दिवसांत कसलेच प्रश्न आमच्यापुढे उभे केले नाहीत. पहाटे पाचपासून रात्री दहापर्यंत चालणा-या भरगच्च कार्यक्रमात ती उत्साहाने सामील झाली. व्याख्यात्यांना तिने अनेक प्रश्न विचारले, पुढे येऊन समूहगीते गायिली, नाटकात भाग घेतला, एका प्रकल्पाची गटप्रमुख म्हणून काम पाहिले, जोरदार चर्चा केल्या, सगळ्याना हसवलं ....फक्त तिचं आडनाव, कॉलेज, भाऊ-बहीण किती, कोणत्या गावात राहते .. असले प्रश्न कोणी विचारले की ती हसून गप्प बसायची. शिबिरातल्या इतर पोरा-पोरींनी तिच हे मत समजून घेतलं; आणि त्याबद्दल पूर्ण आदर दाखवत हे प्रश्न तिला विचारण बंद केल.

मी आणि जाधव काका ललितावर बारीक लक्ष ठेवून होतो पण आम्हाला तरी काही वेगळ वाटलं नाही. शिबिरात ती भलतीच लोकप्रिय झाली. मधल्या मोकळ्या वेळात जिकडून तिकडून तिच्या नावाचा पुकारा होत राहायचा. तिच्याभोवती उत्साहाने सतत काहीतरी चालू असायचं. तिला आनंदात पाहताना मलाही बर वाटायचं. या मुलीच्या आयुष्यात काही अडचण असू नये अशी मनोमन मी इच्छा करत होते.

शिबिर आता उदया दुपारी संपणार. आदल्या रात्री कार्यक्रम अकराच्या सुमारास संपला. बाकी कार्यकर्ते उद्याच्या समारोप कार्यक्रमाची चर्चा करत होते – त्यात माझी गरज नव्हती मुल-मुली आज काही झोपणार नव्हती हे नक्की. सगळीकडे शेवटची एक चक्कर टाकून, ‘दंगा करू नका जास्त’ अस उगीच सगळयांना सांगून (कोणी माझ ऐकणार नव्हत हे मलाही माहित होत!) मी एकटीच झोपाळ्यावर बसले होते.. पौर्णिमा बहुतेक नुकतीच होऊन गेली होती. रात्रीच्या उघड्या आकाशाखाली असे बसता येण्याचे क्षण आता क्वचितच असतात. शिबिर व्यवस्थित पार पडल याच समाधानही होत.

अचानक मी पाहिलं तर ललिता माझ्या शेजारी उभी होती – कधीपासून उभी होती कोण जाणे! मी तिला माझ्या शेजारी बसण्याची खूण केली. मला काही बोलायचं नव्हतं. तीही काही बोलत नव्हती. मला स्वत:ला अनेकदा बोलायचं नसत – त्यामुळे इतर कोणी बोलत नसल तर ते मला चालत – मी समजू शकते मौन! त्यामुळे मी उगीच काही बोलले नाही. पाच दहा मिनिट तशीच शांततेत गेली. ललिताने माझा हात पकडला आणि आणखी काही वेळ ती नुसतीच बसून राहिली. थोडया वेळाने म्हणाली, “ताई, Thank You!!” मी पाहिलं तर तिच्या डोळ्यांत पाणी तरारलं होत .. पण ओठांवर हसूही होत. तेवढयात कोणीतरी तिला हाक मारली. “बोलू नंतर” अस मला सांगत ती पळाली.

पुढ सगळ शिस्तीत झालं. अनेकदा ललिताच्या घरी आम्ही गेलो, जेवलो, राहिलो. अनेक बैठका तिथे झाल्या. ओळखीशिवाय जगण्याच्या त्या शिबिरातल्या ललिताच्या प्रयोगावर “त्यातून निष्पन्न काय झालं तर आणखी काही ओळखी” अशी थट्टाही तिच्या मित्र-मैत्रिणीनी केली.

पण मला ललिताचा तो प्रयोग तेव्हाही अनोखा वाटला होता – आजही वाटतो. ओळखींशिवाय जगण्याची ताकद आपल्यात असते का? आपण माणसांच्या महासागरात आपले एक बेट निर्माण करू शकतो का? त्याचे फायदे –तोटे काय असतात? असे अनेक प्रश्न मला तेव्हा पडले होते.

आता समजत की भौतिक स्तरांवरच्या ओळखीचं एवढ काही महत्त्व नसत – ते बदलत जात. आपण अगदी सहजतेने गावांची, माणसांची ओळख जोडू शकतो आणि तोडूही शकतो. परिस्थिती अनेकदा आपल्याला ओळखी बदलायला भाग पाडते – त्याची सवय होते. तो जगण्याचा एक प्रवाह असतो. सतत पुढे नेणारा.

पण विचारांचं, मूल्यांचं, तत्त्वांचं, दृष्टिकोनाचं काय? एक तर त्यांच्याशी ओळख होण अवघड – ओळख झाली तर ती टिकण अवघड! पण एकदा ते टिकले की त्यांना अनोळखी होऊन जाण, आपण त्या गावचे नाही, आपला त्यांचा काही संबंध नाही असा आव आणण आणखी अवघड!

माणसांना अनोळखी होऊन जाण सोपं आहे तुलनेने, पण विचारांना अनोळखी होऊन जाण मात्र मला आजही अवघड वाटत!