मणिपूर. मेरी कोम आणि मीराबाई चानू यांच्यामुळे आपल्याला माहिती असलेलं मणिपूर. इरोम शर्मिलामुळे आपल्याला माहिती असलेलं मणिपूर. मणिपूरमध्ये आणखीही अनेक लोक राहतात हे जणू आपण विसरूनच जातो. आपली भारतीयांची एक जुनी सवय आहे. कुणीही यशस्वी ठरलं की ते लगेच 'आपले' ठरतात. इतर वेळी आपल्याला त्यांच्याशी काही देणं-घेणं नसतं. मणिपूर काही त्याला अपवाद नाही.
तर मणिपूर २७ एप्रिलपासून पेटलेलं आहे. मैतेयी
समुदाय आणि अन्य समुदायातला संघर्ष संपायची चिन्हं दिसत नाहीत. अधिकृत आकडेवारीनुसार गेल्या दोन महिन्यांत
मणिपूरमध्ये ११५ लोक दंगलीत मरण पावले आहेत, सुमारे १००० लोक जखमी झाले आहेत, तर ६०,००० पेक्षा जास्त लोक विस्थापित झाले
आहेत.
'आपण मणिपूरच्या लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे' असं वाटत होतं, पण नेमकं काय करायचं ते समजत नव्हतं. त्यामुळे पुण्यात 'मणिपूर शांति मोर्चा' आहे असं कळल्यावर निदान त्यात सहभागी होऊयात – अगदी ती फक्त प्रतिकात्मक कृती असली तरीही – असं ठरवलं. यातून प्रत्यक्ष कृती करणाऱ्या लोकांशी भेट होईल असा मला विश्वास वाटत होता.
क्वार्टर गेटजवळच्या Ornellas School पासून ८ जुलै रोजी सकाळी दहा वाजता 'मणिपूर शांति मूक
मोर्चा'ची सुरवात होणार होती. गुगल मॅप्सचा उपयोग करून मी साडेनऊच्या सुमारास तिथं
पोचले. साधारणपणे अशा कार्यक्रमांना गर्दी जेमतेमच असते असा अनेकदा अनुभव येतो.
इथं मात्र शाळेचं आवार सर्व वयोगटातील लोकांनी भरलं होतं. अनेकजण गटांनी आले होते.
एक बाई एकट्याच दिसल्या म्हणून मी त्यांच्याशी बोलू लागले तर त्यांचा पहिलाच
प्रश्न होता – “तुम्ही कुठल्या
पॅरिशमधून आला आहात?” मी कुठल्याही चर्चची
अनुयायी नाही हे कळल्यावर त्यांना आधी आश्चर्य आणि मग कौतुक वाटलं. हा फक्त ख्रिश्चन धर्मियांचा मोर्चा आहे की काय अशी एक शंका आली, पण तसं नव्हतं. व्यासपीठावरून 'सर्व धर्मांच्या' लोकांचंही स्वागत करण्यात आलं. काही सूचना पुन्हापुन्हा सांगितल्या जात होत्या तोवर आम्ही थोड्या गप्पा मारल्या.
अनेक तरूण स्वयंसेवक-सेविका जमलेल्या लोकांमध्ये फिरत
होते आणि प्रत्येकाला मोर्चात चालताना धरायला छोटे फलक देत होते. अनेक गटांनी
त्यांचे बॅनर्सही आणले होते. फलक मराठी आणि इंग्रजी भाषांमध्ये होते. ‘आम्ही मणिपूरच्या सोबत आहोत’; ‘शांतीच्या मार्गाने प्रश्न सुटतात, हिंसेने
सुटत नाहीत’; ‘Peace is
the Goal as we march with our Soul’; ‘Walking for Peace, Healing the Wounds’; ‘मणिपूर वाचवा’; ‘आम्ही शांतीचे राखणदार’; ‘India is a secular nation and all
have a place in this country’; ‘Give peace a chance’; ‘शांतीचे दूत बना’; ‘जगा आणि जगू द्या’ असे संदेश फलकांवर लिहिले होते.
मोर्चात सामील होणाऱ्या लोकांना व्यासपीठावरून सूचना दिल्या गेल्या. चार रांगांमध्ये सगळ्यांनी चालायचं होतं. मूक मोर्चा असल्याने कुठल्याही घोषणा द्यायच्या नव्हत्या, इतकंच नाही तर मोर्चा चालू असताना आपापसातही बोलायचं नव्हतं. कुठल्याही राजकीय चिन्हांचा, प्रतिकांचा वापर करायचा नव्हता (राजकीय संदेश असणारे टोपी, टीशर्ट वगैरे). एक महत्त्वाची सूचना होती ती म्हणजे मीडियाशी (प्रसारमाध्यमांशी) कोणीही बोलायचं नव्हतं. संयोजकांनी मीडियाशी बोलायला काही लोक निवडले होते आणि तेच फक्त मीडियाशी बोलणार होते. वास्तविक हा मूक मोर्चा जुलैच्या पहिल्या आठवड्यात ठरला होता. पण आधी परवानगी काढूनही आयत्यावेळी पोलिसांनी परवानगी नाकारल्याने तो रद्द झाला होता. संयोजक त्यामुळे जरा जास्तच सावध होते हे समजण्याजोगं होतं. कुणी काही सहज बोललं आणि त्याबाबत जाणीवपूर्वक गैरसमज पसरवले गेले तर संपूर्ण समुदायाला त्याची किंमत मोजावी लागेल अशी त्यातून व्यक्त होणारी भीती फार वेदनादायी होती.
जमलेल्या गर्दीवर एक नजर टाकली तर बहुतांश ख्रिश्चनधर्मीय
लोक होते (नन्स आणि फादर्सही होते मोठ्या संख्येने). मैतेयी आणि नागा-कुकी यातल्या
एका समूहाचं तर हा मोर्चा प्रतिनिधित्व करत नाहीये ना अशी मला शंका आली. पण
व्यासपीठावरून संयोजकांपैकी जे जे बोलले त्यांच्या बोलण्यातून ही शंका लगेच दूर
झाली. हा मोर्चा हिंसेच्या विरोधात आहे, हिंसेने प्रश्न सुटत नाहीत यावर विश्वास
असणारे लोक इथं जमले आहेत ही दिलासा देणारी गोष्ट होती.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला काही लोक बोलले – सर्वांची नावं
लक्षात नाहीत. बिशप जॉन रॉड्रिग्ज, बिशप थॉमस डाब्रे, आणि फादर माल्कम एवढी तीनच
नावं माझ्या लक्षात राहिली. बोलणारे मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये बोलत
होते, एक-दोघांच्या बोलण्याचा मराठी अनुवाद एक ताई सफाईदारपणे करत होत्या.
कार्यक्रमाची सुरूवात साने गुरूजींच्या ‘खरा तो एकचि
धर्म’ या गीताने झाली – याचं मला आश्चर्य वाटलं हे कबूल करायला हवं. मग काही
वेळाने आपल्याला आश्चर्य वाटलं याचंच मला आश्चर्य वाटलं. महाराष्ट्रातले लोक मराठी
गीताने कार्यक्रमाची सुरूवात करणार नाहीत तर कशाने करणार? पण आपल्या डोक्यात धर्म आणि भाषा यांची एक सांगड बसलेली
असते – ती जाणीवपूर्वक काढावी लागते याचं भान आलं. (कार्यक्रम संपल्यावर बसची वाट
पहात असताना एक मुस्लिम स्त्री – हे परत कपड्यांवरून कळतंच – पण तिथं होती. मी
तिच्याशी नकळत हिंदीत बोलायला लागले. त्या ताई माझ्याशी मराठीत बोलायला लागल्यावर
मी परत भानावर आले.) शहरांमध्येही एका प्रकारे जाती-धर्मावर आधारित वस्त्या होत
आहेत आणि त्यामुळे आपल्या रोजच्या जगण्यात इतर धर्मीय माणसं कमीच असतात हेही
पुन्हा एकदा लक्षात आलं.
मणिपूर दंगलीत होरपळलेल्या लोकांसोबत असणं, संवादातून
प्रश्नांचा गुंता सोडवण्याचं महत्त्व अधोरेखित करणं हे मोर्चाचे दोन मुख्य उद्देश
होते. भारताची विविधता ही भारताची ताकद आहे आणि एकमेकांशी सद्भावाने आणि सलोख्याने
आपण एकत्र राहू शकतो हेही वक्त्यांनी ठामपणे सांगितलं. ‘आम्ही प्रथम भारतीय आहोत आणि मग ख्रिश्चन आहोत; भारताची समृद्धी आणि विविधतेतली एकता टिकली
पाहिजे; हिंसेची साखळी तोडणं आवश्यक
आहे ’ असे वेगवेगळे मुद्दे वक्त्यांनी मांडले. गांधींजी आणि
मार्टिन लुथर किंग यांचेही समयोचित उल्लेख झाले.
त्यानंतर प्रार्थना आणि ‘Make me channel of your Peace’ हे गीत एकाने
गायलं आणि त्याला समूहाने साथ दिली. एक बाब विशेषत्वाने लक्षात आली की संपूर्ण
कार्यक्रमात वातावरण पूर्णपणे स्वयंशिस्तीचं होतं. व्यासपीठावरून वक्ते बोलत
असताना लोक आपापसात बोलताहेत, किंवा मोबाईलवर मग्न आहेत असं अजिबात दिसलं नाही.
साधारण पंचेचाळीस मिनिटं ते एक तास लोक शाळेच्या अंगणात उभे होते. पण कुणी पाय
दुखताहेत किंवा कंटाळा आलाय म्हणून खाली बसलेलं दिसलं नाही. पावसाची सर आली तेव्हाही शांतपणे छत्र्या उघडल्या गेल्या, कसलीही पळापळ न करता. एवढ्या हजारो लोकांना
चारच्या रांगेत उभं करणं हेही अतिशय लगेच आणि कसलीही धावपळ, गडबड न होता झालं. सगळे
लोक एकमेकांना ओळखत नसतानाही ही शिस्त होती हे विशेष.
मोर्चात सहभागी झालेल्या लोकांनी पाळलेली शिस्त, ठिकठिकाणी
संयोजकांनी उभे केलेले स्वयंसेवक-सेविका यामुळे पोलिसांचं काम सोपं झालं होतं. पोलिसांनीही
व्यवस्थापनात काही कसूर ठेवली नाही. रस्त्याने जाणाऱ्या वाहनचालकांना त्रास झाला
असणार. काही शाळकरी मुलांनाही मोर्चा ओलांडून पलिकडे जायचं होतं. अशा वेळी
मोर्चेकरी चालणं थांबवून वाहनांना, मुलांना, पालकांना जागा देत होते. एक भटका
कुत्राही जायला वाट शोधत होता, त्यालाही आम्ही वाट दिली.
क्वार्टर गेट ते जिल्हा परिषद कार्यालय आणि पुढं
जिल्हाधिकारी कचेरी असं दीड ते दोन किलोमीटरचं अंतर (आम्ही वळसा घालून गेल्याने
कदाचित थोडंस जास्त असेल) चालताना दोनदा वळलो. दोन्हीही वेळा मोर्चाचं पुढचं आणि
मागचं दर्शन होईल तितके लोक दिसत होते. पाचेक हजार लोक असावेत असा माझा अंदाज आहे –
पण नेमकं सांगता येणार नाही.
मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संपला. आभारप्रदर्शन झालं आणि ‘हम होंगे कामयाब’ हे गाणं सर्वांनी मिळून म्हटलं. संयोजकांचे प्रतिनिधी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायला आत गेले आणि मोर्चेकरी आपापल्या घराकडं निघाले. माझ्या मागं चालणाऱ्या लोकांचा एक मजेदार संवाद कानावर आला. एकजण म्हणाला, “अरे चल, बिर्याणी खाऊ आता”. दुसरा उत्तरला, “नको यार बिर्याणी. सध्या आमच्याकडं रोज भात-पुलाव-बिर्याणीच होतेय.” पहिल्याने विचारलं, “काय विशेष?” त्यावर दुसरा उत्तरला, “अरे, बायकोचा हात मोडलाय, त्यामुळे सध्या स्वैपाकाचं खातं माझ्याकडं आहे. भात सोडून मला दुसरं काहीच येत नाही ना करता!” गंभीर प्रसंग असूनही तो संवाद ऐकताना मला हसू आलं.
कॅम्प परिसरात मी फारशी कधी गेले नाही, त्यामुळे रस्ता
चुकले. मग आता चुकलाच आहे रस्ता तर हिंडूयात कॅम्पमध्ये थोडं म्हणून एकटीच भटकले.
वाटेत एका अंध गृहस्थाला रस्ता ओलांडून देताना त्याच्याशी गप्पा झाल्या. ते एका
कपड्यांच्या दुकानात शिलाईचं काम करतात. दोन महाविद्यालयीन विद्यार्थी
माझ्याशी बोलायले आले. ते उद्योजक महिलांसाठी एक बाजारपेठ मेळावा करताहेत आणि
त्यासाठी त्यांना काही पैसे हवे होते. मग त्यांच्याशी थोडं बोलणं झालं.
घरी आल्यावर सहज ‘पुणे मणिपूर मोर्चा’ असे शब्द इंटरनेटवर टाकले आणि लक्षात आलं की मणिपूरसाठी
हा काही पुण्यातला पहिला मोर्चा नव्हता. १० मे रोजी औंध परिसरात पुण्यात
वास्तव्यास असलेल्या मणिपूरच्या लोकांनी शांति मेळावा घेतला होता. २७ जून रोजी
मैतेयी समुदायाने (Meitei Nupi Lup
तर्फे आयोजित) पुण्यात
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं धरलं होतं आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिलं
होतं. पुणे शहर विस्तारलं आहे, आणि मणिपूरचा प्रश्न अजून सुटलेला नाही, त्यामुळे
वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या ठिकाणी मणिपूरवासियांसाठी कार्यक्रम करणं चांगलं
आहे. फक्त यात मैतेयी आणि नागा-कुकी असे दोन वेगळे कार्यक्रम होत नाहीत ना याबाबत अधिक
माहिती घ्यायला लागेल.
केंद्र शासन आणि मणिपूर राज्य शासन लवकरात लवकर मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यात यशस्वी होवो आणि मणिपूरसाठी कुणालाही आणखी एखादा शांति मोर्चा काढण्याची वेळ न येवो ही सदिच्छा.