ग्रॅन्ड पॅलेस, बँकॉक, जून २०१६
Showing posts with label विचित्रपणा. Show all posts
Showing posts with label विचित्रपणा. Show all posts

Friday, January 12, 2024

२६८. कातरवेळी ...

झोपेतून जागी झाले आणि क्षणभर ही सकाळ आहे की संध्याकाळ आहे या संभ्रमात पडले. कधी कधी तर मैं कहा हूं असं फिल्मी थाटात स्वत:ला विचारण्याची वेळ येते. हल्ली प्रवास कमी झालाय, त्यामुळे तो फिल्मी संभ्रमदेखील कमी झालाय. पण ते असो. सांगत होते ते कातरवेळी जाग आल्यावर येणाऱ्या अनुभवाबाबत. आपल्यापैकी अनेकांना असा अनुभव येत असणार याची मला कल्पना आहे. त्यामुळे काळजी न वाटता हसू येईल याचीही कल्पना आहे. 😊

संध्याकाळी झोपणं अशुभ आहे असं काही लोक मानतात. शुभ-अशुभावर माझा विश्वास नसला तरी संध्याकाळी झोपले, तर उठते तेव्हा प्रत्येकवेळी मला उदास, खिन्न वाटतं हा अनुभव आहे. त्यामुळे कितीही दमले तरी संध्याकाळी पाचनंतर (किमान रात्री दहापर्यंत तरी) झोपायचं मी टाळते. पण त्यादिवशी खूप दमणूक झाली होती, बरेच दिवस वर्क फ्रॉम होममुळे झोप पुरेशी झाली नव्हती. त्यामुळे कितीही अनुभव गाठीशी असला तरी त्यादिवशी मी संध्याकाळी पाच वाजता झोपलेच.

पाऊण तासाने उठले. गजर लावला होता, नाहीतर मी थेट दुसऱ्या दिवशी सकाळीच उठले असते. तर मग अपेक्षेप्रमाणे अतिशय उदास वाटायला लागलं. काही सुचेना. काही हालचाल करावी वाटेना. अगदी परत झोपावं असंही वाटेना. म्हटलं चला, कुणालातरी फोन करू. फोनवर गप्पा मारून बरं वाटेल. कुणाला बरं फोन करावा असा विचार करायला लागले.

तसे माझ्या संपर्कयादीत (म्हणजे कॉन्टक्ट लिस्टमध्ये) चारेकशे लोक आहेत. त्यातले काही नंबर विविध सेवांच्या कस्टमर केअरचे आहेत, म्हणजे ते अशा अनौपचारिक संवादासाठी बाद. काही अन्य सेवांचे आहेत – जसे की फार्मसी, इलेक्ट्रिशियन, प्लंबर, वाहन दुरूस्ती वगैरे. त्यांचाही उपयोग नाही. काही नंबर कामाच्या ठिकाणचे आहेत. माझ्या कामाच्या ठिकाणचे लोक दुसऱ्या देशांत आहेत, त्यामुळे सहज म्हणून फोन होत नाहीत. वेळ ठरवून ते करावे लागतात. त्यांच्याशी होणाऱ्या अनौपचारिक संवादातही मुख्य भर फोनऐवजी चॅटिंगवर असतो. काही नंबर मी पूर्वी ज्या लोकांसोबत काम केलं, त्यांचे आहेत. ते कधीतरी कामासाठी अजूनही फोन करतात, त्यामुळे ते अद्याप काढून टाकलेले नाहीत. फक्त फॉरवर्ड पाठवणाऱ्या लोकांचे (आणि अनेक व्हॉट्सऍप गटांचे) नंबर archive करण्याची युक्ती मला अलिकडेच समजली आहे. त्यामुळे माझी अजिबात चौकशी न करता फक्त स्वत:चे लेख, फोटो, वर्तमानपत्रांची कात्रणं वगैरे पाठवणारे सध्या तिकडं आहेत. या लोकांचे आणि माझे काही कॉमन ग्रुप्स असल्याने यांना यादीतून काढून टाकणं जरा अवघड असतं.

काही नंबर अशा लोकांचे आहेत, की जे मरण पावले आहेत. आता तो नंबर ठेवण्यात काहीही अर्थ नाहीये, हे माहिती असूनही त्यांचे नंबर मात्र काढून टाकावेसे वाटले नाहीत, तसा विचारसुद्धा कधी केला नाही. पण या लोकांना काही फोन करता येत नाही.

काही लोकांशी वर्षानुवर्ष काहीही संवाद नाहीये. १ जानेवारीला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि दिवाळीला लक्ष लक्ष दिव्यांची…” छापाचे फॉरवर्डेड मेसेजेस ते मला पाठवतात, यापल्याड आमच्यात काहीही संवाद नाही. काही लोक मला फक्त व्हॉट्सऍप फॉरवर्ड पाठवतात, व्यक्तिगत संवाद साधण्यात त्यांना काही रस नसतो. मग बहुतेक अशा वेळी मी त्यातले दोन-चार नंबर डिलीट करून टाकते. तो या कातरवेळच्या उदासीनतेचा एक फायदा.

या गाळणीतून काही ठरलेली नावं मागे राहतात. हे लोक अनेक वर्ष माझ्या संपर्कात आहेत ही जमेची बाजू. यातल्या सर्वांची वर्ष दोन वर्षांतून एकदा तरी निवांत भेट होते, गप्पागोष्टी होतात. त्यांच्या घरी माझं जाणं आहे. मी फार कमी लोकांना घरी बोलावते, मात्र हे लोक कधीही माझ्या घरी येऊ शकतात, येतातही. त्यांच्या घरातली माणसं मला ओळखतात. मला काही अडचण आली तर यातले अनेक लोक धावत येतात, मदत करतात. वेळी-अवेळी, पूर्वनियोजित नसलेला फोन करण्यासाठी खरं तर एवढं पुरेसं आहे.

पण त्यातल्या कुणालाही मी लगेच फोन करायला तयार होत नाही. काहीजण काही मिनिटांनंतर त्यांच्या आध्यात्मिक गुरूविषयी बोलायला लागतात. हे मला ओळखतात का खरंच -असा प्रश्न पडावा इतकं ते अध्यात्मिक बोलतात. यातले काहीजण फक्त तक्रार करतात. कुणाबद्दल तक्रार हे महत्त्वाचं नाही, फक्त तक्रार करतात. मला या तक्रारखोर लोकांबाबत नेहमी एक प्रश्न पडतो. ज्या लोकांबाबत हे तक्रार करताहेत, त्यांच्याशी तर यांचे चांगले संबंध आहेत, ते एकंदर एकमेकांच्या सहवासात सुखी दिसतात. मग माझ्याकडेच तक्रार का? आणि दुसरं म्हणजे मी फोन केलाय. तरीही माझी जुजबी चौकशी करून मग हे लगेच आपल्या तक्रारीच्या विषयाकडं वळतात. सुखाच्या काही गोष्टी सांगायला यांना जमतच नाही. मी फक्त उदास वाटल्यावर नाही, तर चांगलं घडल्यावरही या लोकांना फोन करत असे. हल्ली मात्र मी टाळते.

काहीजणांना फक्त गॉसिप करण्यात आणि नकारात्मक बातम्या पसरवण्यात रस असतो – तेही नको वाटतं. क्ष या व्यक्तीचं माझ्याबद्दल किंवा माझं क्ष या व्यक्तीबद्दल काहीही मत असलं तरी त्याने माझ्या किंवा क्षच्या जगण्यात काय फरक पडतो? काहीच नाही. मग असू द्यावं ज्यांचं मत त्यांच्यापाशी. काहीजण लगेच खूप काळजी करत भरमसाठ सल्ले द्यायला लागतात. कुणी जेवणाखाणाचा उपदेश करायला लागतं. प्रत्येकाची तऱ्हा वेगळी. एरवी मी त्या प्रत्येकाच्या वैशिष्ट्याचा, वेगळेपणाचा आनंद घेते. त्यांच्या व्यक्तिमत्वासकट ते माझे मैत्रीण-मित्र असतात, त्यांनी माझ्यासाठी खूप काही केलं आहे याबद्दल मी कृतज्ञही असते. पण यावेळी मात्र फोन करायला नको वाटतं.

काहीजण त्यांच्या व्यापात खोलवर बुडालेले आहेत हे माहिती असतं. मग त्यांना असा अवेळी फोन केला जात नाही. काहीजण ऑफिसच्या कामात किंवा परतीच्या प्रवासात असतील म्हणून फोन करायला नको वाटतो.

असं मी एकेक नाव पहात जाते. पुढं जाते. फोन कुणालाच करत नाही. आपल्या उदासीनतेला काही कारण नाही, ती आपोआप नाहीशी होईल हे मला माहिती आहे. बोलण्यासारखं आपल्याकडं काही नाहीये हेही मला कळतं. आणि या क्षणी कुणाचं काही ऐकत बसण्याइतका उत्साह मला नाहीये, हेही मला माहिती आहे. खरं सांगायचं तर त्या निरर्थक, पोकळ वाटणाऱ्या त्या क्षणांमध्ये एक अद्भूत असं काहीतरी असतं. त्याच्या मोहात मी त्या क्षणी असते, त्यामुळे माणसांची सोबत नकोशी वाटते.

शेवटचा नंबर नजरेखालून गेल्यावर मी स्वत:शीच हसते. उरतो तो फक्त आपलाच नंबर. आपणच आपल्याशी संवाद साधणं, राखणं महत्त्वाचं असतं याची आठवण करून देणारा तो आपलाच नंबर.

मग O Mister Tambourine manलावते.

किंवा हृदयसूत्र ऐकते.

किंवा मग आमि शुनेछि शेदिन तुमि हे बंगाली गीत ऐकते.

उन्हाळ्याचे दिवस असतील तर कपाटातली दुर्बिण काढते. गॅलरीतून दिसणारे पक्षी पाहते. पावसाळा असेल तर पाऊस पहात बसते.

कुठल्यातरी पुस्तकातलं एखादं वाक्य आठवून संग्रहातलं ते पुस्तक शोधते. एखादी कविता, गाणं गुणगुणत बसते.

डोळे मिटून निवांत श्वासाकडे बघत बसते. झोपाळ्याच्या हालचालीसोबत वाजणाऱ्या छोट्या घंटेच्या किणकिणाटाच्या नादाने स्तब्ध होऊन जाते.

मग कधीतरी विनाकारण आलेली खिन्नता विनासायास निघून जाते.

रिकामपणाचा तो एक क्षण मात्र सोबत राहतो. बाहेर कितीही गर्दी असली तरी तो क्षण सोबत राहतो. तो वेदनादायी वगैरे अजिबात नसतो, फक्त वेगळा असतो. क्वचित कातडी सोलून काढणारा असतो आणि तरीही वेदनादायी नसतो. अधुनमधून असा क्षण अनुभवता येणं ही एक चैनच आहे एका अर्थी. ती वाट्याला येईल तेव्हा मी ती करून घेते.

मग कुणाचातरी फोन येतो. गप्पा सुरू होतात.

आत्ताच मला हे असं वाटतं होतं - वगैरे इतकं सगळं काही मी त्या मैत्रिणीला-मित्राला सांगत बसत नाही. आपल्याला फोन आला की आपण ऐकायचं हे सूत्र उभयपक्षी लाभदायक असतं हे मला अनुभवाने माहिती आहे.

मी कन्याकुमारी स्थानकातून पहाटे पाच वाजता सुटणाऱ्या रेल्वेने प्रवासाला निघाले आहे असं स्वप्नं मला अनेक वर्ष पडायचं. कन्याकुमारी कायमचं सोडण्याचा तो क्षण मी स्वप्नांमध्ये अनंत वेळा पुन्हापुन्हा अनुभवला होता. एकदा कधीतरी मी त्याबद्दल लिहिलं आणि मग मला कधीच ते स्वप्न पडलं नाही.

मला आत्ता भीती वाटतेय की रिकामपणाच्या, निरर्थकतेच्या अनुभवाबद्दल मी लिहिते आहे, तर कदाचित ते क्षण मला परत कधाही अनुभवता येणार नाहीत. लिहिणं हे भूतकाळाचं ओझं कमी करण्याचा माझ्यासाठी तरी एक रामबाण उपाय आहे.

बघू, आगे आगे क्या होता हैं 😊

 

Friday, July 20, 2012

१३२. विचित्रपणा

कधी कधी आपण विचित्र वागतो. 
गोष्ट काही फार गंभीर नसते, किरकोळच असते - तरीही 'असं का वागलो त्यावेळी' हा प्रश्न काही पाठ सोडत नाही. 
त्याच उत्तर आता मिळून काही फरक पडणार नसला तरीही. 

ही गोष्ट दुस-या कुणालाच माहिती नाही मी सोडून. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर शोधण्याची धडपड स्वत:ची प्रतिमा जपण्यासाठी नाही - एका अर्थी तो स्वत:चा शोध आहे - न समजलेल्या स्वत:चा शोध! 

त्या दिवशी मी एका जिल्ह्याच्या शहरात होते. छोटसंच शहर आहे ते, फार मोठ नाही. तिथल्या एका स्वयंसेवी संस्थेनं एका कार्यक्रमासाठी मला बोलवलं होतं.  दगदगीचा दिवस होता तो.  कार्यक्रमात मला मुख्य वक्ता म्हणून काम होतं आणि त्याच्या पुढे मागे अनेक औपचारिक आणि अनौपचारिक भेटीगाठी आणि मीटिंग होत्या.  कार्यक्रमाला ब-यापैकी गर्दी होती आणि श्रोत्यांचा उत्साह मला काहीसा अनपेक्षित होता. त्यामुळे मुख्य कार्यक्रमानंतरही माझं बोलणं चालूच राहिलं. लोक अनेक गोष्टी सांगतात - त्यांचे विचार, त्यांचे अनुभव, त्यांची दु:खं, त्यांची स्वप्नं ....कोणत्याही व्यक्तीच 'एक' आयुष्य हे ब-यापैकी एकसारखं आणि म्हणून एकसुरी असल्याने मी अशा गप्पा ऐकायला नेहमीच उत्सुक असते. त्यातून मला इतरांच आयष्य कसं असेल याच एक दर्शन होतं! 

दिवस संपताना मी खूप दमले होते. पण हा थकवा अपयशातून येणारा नव्हता ( निरर्थक, वांझोटा दिवस कसा असतो तेही मला माहिती आहेच .. ). मी दिवसभर ब-यापैकी खाल्लं होतं - त्यामुळे ती दमणूक भुकेमुळे अथवा तहानेमुळेही नव्हती. कदाचित बोलण्याचा थकवा असावा तो. माझी ट्रेन रात्री साडेअकराला होती. हितचिंतकाच्या मागे लागून मी रात्री  साडेदहालाच स्टेशनवर सोडायला लावलं मला त्यांना. ते दोघे "थांबतो गाडी येईपर्यंत" म्हणत होते - पण त्यांची दोन लहान मुलं घरात होती म्हणून मी त्यांना लगेच परत घरी जायचा आग्रह करत होते. म्हणजे ते थांबायचा आग्रह करत होते आणि मी त्यांना परत पाठवायचा आग्रह करत होते. मला खरं तर सकाळपासून अजिबात निवांतपणा मिळाला नव्हता - रेल्वे स्थानकावर निदान अर्धा तस जरी माझा मला  मिळाला तरी ते मला पुरेसं होतं. 

अखेर हो ना करता अकरा वाजता ती मंडळी मला स्थानकावर सोडून नाराजीने घरी गेली. आता काय अर्ध्या तासात गाडी येईलच असं मी म्हणेतो 'गाडी अर्धा तास उशीराने धावत आहे' अशी उद्घोषणा झाली.  शहर लहान असल्याने फारशी गर्दी नव्हतीच स्थानकावर. मी एक स्वच्छ बाक शोधला, तिथं बैठक मारली, सकाळी वाचायचं राहून गेलेलं वर्तमानपत्र काढलं आणि वाचायला सुरुवात केली.  एखादी  गाडी येण्याची वेळ झाली की पाच दहा मिनिट गर्दी व्हायची आणि स्थानक पुन्हा शांत होऊन जायचं.  रात्री ब-याच गाड्या इथं थांबतात तर - असा एक विचार माझ्या मनात येऊन गेलाच. 

एक गाडी आली, काही प्रवासी त्यातून उतरले, काही त्यात चढले आणि गाडी निघून गेली. स्थानकातून बाहेर पडणारे प्रवासी आपापसात बोलत असताना त्यातला एक आवाज मला माझ्या मैत्रिणीचा वाटला. या शहरात माझ्या ओळखीचे काही लोक होते आणि त्यातल्या एक दोन घरांशी माझी जवळीक होती. पण भेटायला वेळ मिळणार नाही म्हणून मी त्यांना कोणालाच माझ्या शहर भेटीविषयी कळवले नव्हते. मी ज्या संस्थेच्या कार्यक्रमासाठी आले होते, ती छोटी संस्था होती त्यामुळे माझ्या आजच्या भाषणाच्या कार्यक्रमाविषयी स्थानिक वृत्तपत्रांत काही बातमी येण्याची शक्यता नव्हती. या संस्थेशी माझ्या परिचितांचा काही संबंध नव्हता.  मला भास तर होत नव्हता परिचितांना न कळवण्याच्या अपराधी भावनेतून? 

मी नीट लक्ष देऊन पाहिलं. तो आवाज ओळखीचा आहे असा मला भास नव्हता झाला - तो माझ्या एका मैत्रिणीचा आवाज होता. तिच्या घरच्या इतर लोकांबरोबर ती होती.  त्यांच्या बरोबर असलेल्या सामानावरून ते सगळेजण कुठून तरी घरी परतत होते हे कळत होतं. 

आणि मग फारसा विचार न करताच मी हातातलं वर्तमानपत्र पुन्हा वाचायला लागले. 

छे! छे! आमचं काही भांडण वगैरे नाही झालेलं!  मैत्रिणीशी माझे चांगले संबंध आहेत. तिच्या घरच्यांशीही माझा घनिष्ठ संबंध आहे. त्यांच्या घरी मी अनेकदा जाऊन राहिले आहे. माझ्या अडचणीच्या काळात त्यांचा  मला आधार असतो. त्यांना कुणालाच आज मी इथं आहे हे माहिती असण्याचं कारण नव्हत. ते जेव्हा उजेडात आले तेव्हा त्यांच्या चेह-यावरचा प्रवासाचा शीण मला स्पष्ट दिसला.  इतर वेळी फक्त त्यांना भेटण्यासाठी हजारो किलोमीटरचा प्रवास करून मी आले असते. पण त्या क्षणी मला त्यांना भेटावसं वाटत नव्हत हे मात्र खरं! काय कारण? काही नाही. 

त्या फलाटावरून माझी मैत्रीण आणि तिच्या घरची मंडळी दिसेनाशी होऊ लागली. अजूनही ते सगळे माझ्या हाकेच्या अंतरावर होते. मी एक हाक मारून त्यांना थांबवू शकले असते. त्यांच्या घरी मी जाऊ शकले नसते पण त्यांच्याशी बोलू शकले असते. पण मला त्यांच्याशी बोलायचं नव्हत त्या क्षणी. मी वर्तमानपत्रातल्या निरर्थक बातम्या वाचत बसले. 

मी त्या दिवशी अशी का वागले? मला माहिती नाही. अनेकदा मला एकट राहायला आवडतं आणि मी माणसांना टाळते हे आहेच. पण या मैत्रिणीची गोष्ट वेगळी होती. 'मला बोलायचा कंटाळा आलाय' असं मी तिला सहज सांगू शकले असते आणि तिला ते समजलं असतं. माझ्या इच्छेविरुद्ध काही वागायला तिने मला कधीच भाग पाडलेलं नाही आजवर ...

प्रत्येक नात्यात विश्वास असतो एक. तो जोवर असतो तोवर नात्याला कशाची झळ नाही पोचत. सगळ्या अडचणींना, परिस्थितींना हे नातं झेलू शकत ते विश्वासाच्या आधारेच. एकदा तो विश्वास गमावला कोणी एकाने की नातं संपत. 

मी त्यादिवशी रेल्वे स्थानकावर तिला टाळलं - हे माझ्या मैत्रिणीला माहिती नाही - पण मला माहिती आहे. मी तिचा एक प्रकारे विश्वासघात केला आहे माझ्या मते. मी जे करायला नको होतं ते केलं आहे अशी एक अपराधी भावना माझ्या मनात आहे. मी आजही तिला हे सांगितलं तर ती फक्त हसेल आणि 'विचित्र आहेसच तू' असं म्हणून मला माफ करेल हे मला माहिती आहे. तिने आणि तिच्या घरच्यांनी माझ्याकडून काही साध्या अपेक्षा ठेवणंही केव्हाच सोडून दिलंय! 

जे काही मी केलं ते आता 'अनडू' तर नाहीच करता येत. बिरबलाने म्हटलं होतं तसं 'बूंद सें गयी वह हौद सें नही आती' हेही मला माहिती आहे. आपल्या काही कृत्यांबरोबर आपल्याला जन्मभर राहावं लागतं - आपल्याला आवडो की न आवडो. 

माझ्या आयुष्यात विचित्रपणाचा हा एकच क्षण आहे असं मात्र नाही ... भरपूर आहेत ते .. त्यामुळे त्यांच मला काही अप्रूप वाटत नाही ...

(आता  ' हे नेमकं कोण होतं '- असा विचार करत बसू नका! खूप जुनी गोष्ट आहे ही! 
हे खरंच घडलं होतं की मला झालेला भास आहे - हेही मला सांगता नाही येणार इतकी जुनी गोष्ट :-) )
**